सार्थश्रीरामायणसुभाषितानि
मंगलाचरणम् ।
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥
हर्ता आपत्तींचा, दाता निखिलार्थसिद्धिंचा तेवीं । श्रीराम लोकनंदन, तच्चरणां नित्य नित्य मी सेवीं ॥
१ अकुर्वन्तोऽपि पापानि शुचयः पापसंश्रयात् । का.स.श्लो.
परपापैर्विनश्यन्ति मत्स्या नागहृदे यथा ॥ ३.३८.२६
ज्याप्रमाणे सर्प असलेल्या डोहांतील मासे नाश पावतात, त्याप्रमाणे स्वतः शुचिर्भूत व पापकर्म न करणारे असेहि लोक पापीजनांचा आश्रय केल्यामुळे त्या दुसऱ्यांच्या पातकांनी नाश पावतात.
२ अकृतात्मानमासाद्य राजानमनये रतम् ।
समृद्धानि विनश्यन्ति राष्ट्राणि नगराणि च ॥ ५.२१.११
ज्याच्या चित्ताला ज्ञानाचा संस्कार नाही, व जो अनीतीचे ठायीं आसक्त झालेला आहे, अशा राजाची प्राप्ति झाली असतां, समृद्ध राष्ट्रे आणि नगरें नाश पावतात.
३ अग्निं प्रज्वलितं दृष्ट्वा वस्त्रेणाहर्तुमिच्छसि ।
कल्याणवृत्तां यो भार्यां रामस्याहर्तुमिच्छसि ॥ ३.४७.४३
(सीता रावणाला म्हणते) ज्याअर्थी तू रामाच्या सदाचरणी भार्येला हरण करण्याचे इच्छितोस, त्याअर्थी तूं प्रदीप्त झालेला आग्नि पाहून, त्याला वस्त्राने बांधून आणण्याचीच इच्छा करीत आहेस.
४ अङ्गप्रत्यङ्गजः पुत्रो हृदयाच्चाभिजायते ।
तस्मात्प्रियतरोमातुः प्रिया एव तु बान्धवाः ॥ २.७४.१४
(मुख, वक्षःस्थळ, उदर, हस्त, चरण इत्यादि) अंगांपासून व (नेत्र अंगुलि, इत्यादि) प्रत्यंगांपासून आणि हृदयापासून सर्व अंगांपासूनौत्पन्न झालेल्या तेजाच्या योगें - होणारा पुत्र मातुश्रीस अत्यंत प्रिय असतो. इतर बांधव हे साधारणच प्रिय असतात.
५ अञ्जलिं कुर्मि कैकेयि पादौ चापि स्पृशामि ते ।
शरणं भव रामस्य माऽधर्मो मामिह स्पृशेत् ॥ २.१२.३६
(दशरथ म्हणतो) हे कैकेयि, मी तुला हात जोडितों, व तुझ्या पायांनाही स्पर्श करितो, रामाचे रक्षण कर. ह्या जगांत अधर्म मला स्पर्श न करो.
६ अतिथिः किल पूजार्हः प्राकृतोऽपि विजानता ।
धर्म जिज्ञासमानेन किं पुनर्यादृशो भवान् ॥ ५.१.११३
(मैनाकपर्वत मारुतीला म्हणतो.) धर्मजिज्ञासु ज्ञात्या पुरुषाने सामान्य अतिथिही पूजावा, हे योग्य आहे; मग तुजसारखा अतिथि प्राप्त झाला असता, त्याची पूजा करावी, हे वेगळे कशाला सांगितले पाहिजे?
७ अतिमानिनमग्राह्यमात्मसम्भावितं नरम् ।
क्रोधनं व्यसने हन्ति स्वजनोऽपि नराधिपम् ॥ ३.३३.१६
हट्टी, कशानेही न वळणारा, अति अभिमान बाळगणारा, व सदा क्रोध करणारा, असा मनुष्य, मग तो राजा का असेना, संकटांत आला असता, त्याचेच लोक त्याचा नाश करितात.
८ अतिस्नेहपरिष्वङ्गाद्वर्तिरार्द्रापि दह्यते ॥ ४.१.११७
अति स्नेहाच्या तेलाच्या संपर्काने भिजलेलीही वात दग्ध होते.
९ अतुष्टं स्वेषु दारेषु चपलं चपलेन्द्रियम् ।
नयन्ति निकृतिप्रज्ञं परदाराः पराभवम् ॥ ५.२१.८
स्वस्त्रीचे ठायीं असंतुष्ट, अजितेंद्रिय, विपरीत बुद्धीच्या, चंचल मनाचे पुरुषास परस्त्रिया अपकीर्तीस पोचवितात.
१० अत्येति रजनी या तु सा न प्रतिनिवर्तते ।
यात्येव यमुना पूर्ण समुद्रसुदकार्णवम् ॥ २.१०५.१९
ज्याप्रमाणे उदकाने परिपूर्ण भरलेल्या समुद्राकडे यमुना नदी जाते ती कधी मागे परतून येत नाही, त्याप्रमाणे जी रात्र एकदा निघून जाते, ती पुनः परत येत नाही.
११ अथवा किं ममैतेन राज्यद्रव्यमयेन तु ।
उद्धृतं मे स्वयं तोयं व्रतादेशं करिष्यति ॥ २.२२.२८
(राम लक्ष्मणाला म्हणतो वनवासाच्या व्रताचा संकल्प करण्यासाठी मी या अभिषेक जलाने स्नान करीन) अथवा राज्यांतील द्रव्य ज्याकरितां खर्ची पडले आहे असे हे उदक तरी मला कशाला पाहिजे? मी स्वतः आणिलेल्या उदकानेच माझा व्रतग्रहणाचा संकल्प होईल.
१२ अथात्मपरिधानार्थं सीता कौशेयवासिनी ।
सम्प्रेक्ष्य चीरं सन्त्रस्ता पृषती वागुरामिव ॥ २.३७.९
(राम व लक्ष्मण यांनी वल्कले स्वीकारली) नंतर पैठणी नेसलेली सीता आपल्याला नेसण्याकरितां (कैकेयीने) आणून दिलेले वल्कल पाहून, जाळे पाहिल्यावर त्रस्त होणाऱ्या हरिणीप्रमाणे त्रस्त झाली.
१३ अधर्मः सुमहान्नाथ भवेत्तस्य तु भूपतेः ।
यो हरेब्दलिपड्भागं न च रक्षति पुत्रवत् ॥ ३.६.११
(तपस्वी ऋषि रामाला म्हणतात) हे नाथ, जो राजा प्रजेपासून उत्पन्नाचा सहावा भाग करभार म्हणून घेऊन तिचे पुत्रवत् पालन करीत नाही, तो त्याचा मोठा अधर्म होय.
१४ अधर्षितानां शूराणां समरेष्वनिवर्तिनाम् ।
धर्षणामर्षणं भीरु मरणादतिरिच्यते ॥ ४.१६.३
(वाली तारेला म्हणतो) हे भित्र्ये, परोत्कर्ष सहन न करणारे व समरांत माघार न घेणारे, अशा शूरांना शत्रुंनी केलेला अपमान सहन करणे हे मरणाहूनहि अधिक दुःखदायक आहे.
१५ अनभिज्ञाय शास्त्रार्थान्
पुरुषाः पशुबुद्धयः
प्रागल्भ्याद्वक्तुमिच्छन्ति
मन्त्रिष्वभ्यन्तरीकृताः ॥ ६.६३.१४
मंत्रिजनांमध्ये समाविष्ट केलेले पशुबुद्धि पुरुष आपल्या आंगच्या बोलकेपणाच्या जोरावर अनभिज्ञास अज्ञान्यास शास्त्रार्थाच्या गोष्टी सांगू इच्छितात.
१६ अनवस्थौ हि दृश्येते युद्धे जयपराजयौ ॥ ५.३७.५५
युद्धामध्ये जय काय किंवा पराजय काय, हे अनिश्चित असतात.
१७ अनागतविधानं तु कर्तव्यं शुभमिच्छता ।
आपदाशङ्कमानेन पुरुषेण विपश्चिता ॥ ३.२४.११
कल्याण इच्छिणाऱ्या विद्वान पुरुषाने पुढे विपत्ति येईल, अशी शंका येतांच, ती विपत्ति प्राप्त होण्यापूर्वीच परिहाराची योजना करावी.
१८ अनिर्वेदं च दाक्ष्यं च मनसश्चापराजयम् ।
कार्यसिद्धिकराण्याहुस्तस्मादेतद्ब्रवीम्यहम् ॥ ४.४९.६
(सीतेचा शोध लावण्याविषयी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असें अंगद वानरमंडळीला सांगतो) उत्साह, दक्षता, आणि कार्याविषयी उन्मुखता, ही कार्यसिद्धि घडवून आणितात, असें म्हणतात, म्हणून हे मी सांगतो.
१९ अनिर्वेदः श्रियो मूलमनिर्वेदः परं सुखम् ॥ ५.१२.१०
उत्साह हे संपत्तीचे कारण होय, आणि उत्साह म्हणजेच परम सुख होय.
२० अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः ।
करोति सफलं जन्तोः कर्म यच्च करोति सः ॥ ५.१२.११
सर्व गोष्टींची प्रवृत्ति होण्याला उत्साह हेच एक नेहमींचे कारण आहे. प्राणी जे काही कर्म करितो, ते त्याचे कर्म हाच उत्साह सफल करितो.
२१ अनुबन्धमजानन्तः कर्मणामविचक्षणाः ।
शीघ्रमेव विनश्यन्ति यथा त्वं विनशिष्यसि ॥ ३.५१.२६
(जटायु पक्षी रावणाला म्हणतो) जे मूढ पुरुष आपल्या कृत्यांच्या परिणामाकडे लक्ष देत नाहीत ते तुझ्याप्रमाणे सत्वरच नाश पावतात.
२२ अनृतं नोक्तपूर्वं मे न च वक्ष्ये कदाचन ।
एतत्ते प्रतिजानामि सत्येनैव शपाम्यहम् ॥ ४.७.२२
(राम सुग्रीवाला म्हणतो) आजपर्यंत मी पूर्वी कधीं अनृत भाषण केले नाही, आणि पुढेही कधी करणार नाही, हे मी तुला प्रतिज्ञेनें सांगतों व यासंबंधी सत्याची शपथ वाहतो.
२३ अन्तकाले हि भूतानि मुह्यन्तीति पुरा श्रुतिः ।
राज्ञैवं कुर्वता लोके प्रत्यक्षा सा श्रुतिः कृता ॥ २.१०६.१३
(भरत रामाला म्हणतो - दशरथ पित्याने कैकेयीचे म्हणणे मान्य केलें - यावरून) अंतकाल प्राप्त झाला असतां प्राण्यांची बुद्धि विपरीत होते, असें पूर्वीपासून ऐकिवांत आहे; आणि ही गोष्ट, असें करणाऱ्या राजानें, आज लोकांत सिद्ध करून दाखविली आहे.
२४ अपक्षो हि कथं पक्षी कर्म किञ्चित्समारभेत् ॥ ४.५९.२३
(गृधराज संपाति वानरांना सांगतो) पंख नाहींतसे झालेला पक्षी कांहीं पराक्रमांचे कृत्य करण्यास प्रवृत्त होणार कसा?
२५ अप्यहं जीवितं जह्यां त्वां वा सीते सलक्ष्मणाम् ।
न तु प्रतिज्ञां संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः ॥ ३.१०.१८
(राम म्हणतो) हे सीते, मी तुझा, लक्ष्मणाचा, व स्वतःच्या जीविताचाही त्याग करीन. परंतु कोणाजवळ, विशेषतः ब्राह्मणांजवळ, केलेल्या प्रतिज्ञेचा त्याग कधीही करणार नाही.
२६ अप्यहं जीवितं जह्यां युष्मान्वा पुरुषर्षभाः ।
अपवादभयाद्भीतः किं पुनर्जनकात्मजाम् ॥ ७.४५.१४
(राम बंधूंना म्हणतो) पुरुषश्रेष्ठांनो, लोकापवादाला भिऊन मी स्वजीविताचा व तुमचाहि त्याग करीन; मग जनककन्येचा त्याग करीन, यांत आश्चर्य तें काय?
२७ अप्येव दहनं स्पृष्ट्वा वने तिष्ठन्ति पादपाः ।
राजदण्डपरामृष्टास्तिष्ठन्ते नापराधिनः ॥ ६.२९.१२
अग्नीने स्पर्श केलेले वृक्षही वनांत राहतात, परंतु राजदंडास पात्र झालेले अपराधी (जिवंत) राहात नाहीत.
२८ अप्रमत्तश्च यो राजा सर्वज्ञो विजितेन्द्रियः ।
कृतज्ञो धर्मशीलश्च स राजा तिष्ठते चिरम् ॥ ३.३३.२०
जो राजा (सर्वदा) सावधान, सर्वज्ञ, जितेंद्रिय, कृतज्ञ आणि धर्मशील असतो, तो राज्यावर चिरकाल स्थिर राहातो.
२९ अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा ।
भवेथा गुह राज्यं हि दुरारक्षतमं मतम् ॥ २.५२.७२
(राम म्हणतो) हे गुहा, तूं सैन्य, कोश, किल्ले, तसेच देश यांसंबंधाने सावधान रहा. कारण, राज्याचे रक्षण करणे म्हणजे अत्यंत कठीण होय, असें मानिले आहे.
३० अमृतं विषसम्पृक्तं त्वया वानर भाषितम् ।
यच्च नान्यमना रामो यच्च शोकपरायणः ॥ ५.३७.२
(सीता मारुतीला म्हणते) हे वानरा, तुझें भाषण विषमिश्रित अमृतासारखे आहे. ``रामाचे मन (तुजवाचून) कोणत्याही ठिकाणी आसक्त होत नाही'', हे जे तूं बोललास, तें अमृतासारखें, व ``राम (तुझ्यासंबंधाने) एकसारखा शोक करीत आहे'' असे जें तूं सांगितलेंस, ते मला विषासारखे वाटत आहे.
३१ अयं हि सागरो भीमः सेतुकर्मदिदृक्षया ।
ददौ दण्डभयाद्गाधं राघवाय महोदधिः ॥ ६.२२.४७
(वानरश्रेष्ट नल म्हणतो) ह्या भयंकर महोदधि सागराने, दंडाच्या भीतीमुळे, सेतुकार्य पाहाण्याची इच्छा धरून राघवास (आपला) ठाव दिला.
३२ अयुक्तचारं दुर्दर्शमस्वाधीनं नराधिपम् ।
वर्जयन्ति नरा दूरान्नदीपङ्कमिव द्विपाः ॥ ३.३३.५
जो राजा (राष्ट्रांतील बातम्या समजाव्या म्हणून) हेरांची योजना करीत नाहीं; (प्रजाजनांस) दर्शन देत नाही. जो परतंत्र असतो, (स्त्रियादिकांच्या स्वाधीन असतो) त्याला नदीतील चिखल पाहतांच हत्ती नदीचा त्याग करून जातात, त्याप्रमाणे लोक वर्ज्य करितात.
३३ अरयश्च मनुष्येण विज्ञेयाश्छमचारिणः ।
विश्वस्तानामविश्वस्ताश्छिद्रेषु प्रहरन्त्यपि ॥ ४.२.२२
कपटानें संचार करणाऱ्या शत्रुंचा मनुष्याने शोध घेत रहावें. कारण, ते सावध राहून, संधि सांपडली असतां, विश्वास पावलेल्या (शत्रु) जनांवर प्रहार करण्यास चुकत नाहीत.
३४ अर्थं वा यदि वा कामं शिष्टाः शास्त्रेष्वनागतम् ।
व्यवस्यन्त्यनुराजानं धर्मं पौलस्त्यनन्दन ॥ ३.५०.९
(जटायु म्हणतो) हे रावणा, शास्त्रामध्ये ज्याचा नीट बोध होत नाही असा धर्म, अर्थ, अथवा काम राजाचेंच आचरण पाहून शिष्ट लोक निश्चित करीत असतात.
३५ अर्थानान्तरे बुद्धिर्निश्चितापि न शोभते ।
घातयन्तीह कार्याणि दूताः पण्डितमानिनः ॥ ५.२.३८
(लंका अवलोकन केल्यानंतर मारुतीचे स्वगत विचार) कार्याकार्याविषयी स्वामीनें मंत्र्यासहवर्तमान जरी एखादा विचार निश्चित केला असला, तरी अयोग्य दूताशी गांठ पडल्यावर त्या विचारापासून काहीएक निष्पन्न होत नाही. कारण, शहाणपणाच्या घमेंडींत असणारे दूत स्वामिकार्याचा घात करितात.
३६ अर्थिनः कार्यनिवृत्तिमकर्तुरपि यश्चरेत् ।
तस्य स्यात्सफलं जन्म किं पुनः पूर्वकारिणः ॥ ४.४३.७
ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केला नाही, अशा अर्थिजनाची (याचकाची) कार्यसिद्धि केल्याने जीवित सफल होईल; मग ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केले आहेत, त्याचे कार्य केल्याने तें जीवित सफल होईलच, हे कशाला सांगितले पाहिजे?
३७ अर्थिनामुपपन्नानां पूर्व चाप्युपकारिणाम् ।
आशां संश्रुत्य यो हन्ति स लोके पुरुषाधमः ॥ ४.३०.७१
पूर्वी ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत, अशा याचकांना त्यांच्या कार्यसिद्धीच्या कामी वचन देऊन जो कार्यहानि करितो, तो पुरुष लोकांमध्ये अधम होय.
३८ अर्थी येनार्थकृत्येन संव्रजत्यविचारयन् ।
तमर्थमर्थशास्त्रज्ञाः प्राहुरथ्याः सुलक्ष्मण ॥ ३.४३.३४
(राम म्हणतो) हे भल्या लक्ष्मणा, कोणी पुरुष एखाद्या अर्थाची अपेक्षा करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करितो, तो, विचार न करितां केलेला असला, तरी अर्थशास्त्रज्ञ शहाणे लोक त्यास ``अर्थच'' म्हणत असतात.
३९ अर्थेन हि विमुक्तस्य पुरुषस्याल्पचेतसः ।
विच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितो यथा ॥ ६.८३.३३
ग्रीष्म ऋतूंत ज्याप्रमाणे लहान लहान नद्या आटून जातात त्याप्रमाणे द्रव्यहीन आणि अल्पबुद्धि अशा मनुष्याच्या सर्व क्रिया नाश पावतात.
४० अर्थेभ्योऽथ प्रवृद्धेभ्यः संवृत्तेभ्यस्ततस्ततः ।
क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः ॥ ६.८३.३२
पर्वतापासून ज्याप्रमाणे नद्या उत्पन्न होत असतात, त्याप्रमाणे संपादन केलेल्या आणि सर्वत्र वृद्धिंगत झालेल्या द्रव्यापासून सर्व क्रिया सिद्ध होतात.
४१ अर्थो हि नष्टकार्यार्थैरयत्नेनाधिगम्यते ॥ ४.१.१२१
नष्ट झालेली वस्तू ज्यांना अवश्य मिळवावयाची आहे त्यांना ती यत्नावांचून कधीहि मिळत नाही.
४२ अवश्यं लभते कर्ता फलं पापस्य कर्मणः ।
घोरं प्रत्यागते काले द्रुमः पुष्पमिवार्तवम् ॥ ३.२९.८
ज्याप्रमाणे वृक्षावर त्या त्या ऋतुकालाला उचित अशी पुष्पें उत्पन्न होतात, त्याप्रमाणे पापकर्माचं दुःखरूप फल भोगकाल आला असतां काला अवश्य भोगावे लागते.
४३ अवश्यं प्राणिना प्राणा रक्षितव्या यथावलम् ॥ ६.९.१४
प्रत्येक प्राण्याने आपले प्राण अवश्य यथासामर्थ्य रक्षण करावे.
४४ अविज्ञाय फलं यो हि कर्म त्वेवानुधावति ।
स शोचेत्फलवेलायां यथा किंशुकसेवकः ॥ २.६३.९
जो पुरुष कर्माच्या फलाचा विचार न करितां तें कर्म करण्यास प्रवृत्त होतो, त्याची फळ मिळण्याची वेळ प्राप्त झाली असतां, पळसाच्या झाडाची (फलप्राप्त्यर्थ) सेवा करणाऱ्यासारखी शोकस्थिति होईल.
४५ अविस्तरमसन्दिग्धमविलम्बितमव्यथम् ।
उरःस्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् ॥ ४.३.३१
अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यञ्जनस्थया ।
कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि ॥ ४.३.३३
(मारुतीचे भाषण ऐकून राम लक्ष्मणाला म्हणतो) (उत्तम वाक्य म्हंटले म्हणजे) जे अति विस्तृत नसते, संदिग्ध नसते, त्वरित उच्चारितां येते, श्रोत्यांच्या कर्णास पीडा देत नाही. उरःस्थलापासून कंठाकडे मध्यम स्वरांत अति उच्च नाही. किंवा आति नीचही नाही अशा स्वरांत जातें तें होय. (हृदय, कंठ आणि शिरस्थान अशा) तीन ठिकाणी स्पष्टपणे व्यक्त होणाऱ्या (ह्याच्या) वाणीने खड्ग उगारून आलेल्या शत्रूचेही रंजन झाल्यावांचून रहाणार नाही. (मग इतरांचे होईल, हे उघडच आहे.)
४६ अशोक शोकापनुद शोकोपहतचेतनम् ।
त्वन्नामानं कुरु क्षिप्रं प्रियासन्दर्शनेन माम् ॥ ३.६०.१७
(राम म्हणतो.) हे शोकहारका अशोका ! माझी शोकानें ज्ञानशक्ति नष्ट झाली आहे. प्रिये (सीते) च्या दर्शनाने मला त्वरित तुझ्या नामाप्रमाणे (अशोक) कर.
४७ असृजद्भगवान्पक्षौ द्वावेव हि पितामहः ।
सुराणामसुराणां च धर्माधर्मों तदाश्रयौ ॥ ६.३५.१३
ऐश्वर्यसंपन्न अशा पितामहाने ब्रह्मदेवानें देव आणि असुर असे दोन पक्ष निर्माण केले, आणि त्यांच्या ठिकाणी अनुक्रमें धर्म व अधर्म उत्पन्न केले.
४८ अस्मिञ्जीवति वीरे तु हतमप्यहतं बलम् ।
हनूमत्युज्झितप्राणे जीवन्तोऽपि मृता वयम् ॥ ६.७४.२२
(मारुति जिवंत आहे काय, असा जांबवानाने बिभीषणाला प्रश्न केला असतां बिभीषणाने विचारले की, मारुतीबद्दलच प्रश्न कां विचारला यावर जांबवान् बिभीषणाला सांगतो) हा वीर हनुमान जिवंत असतां सैन्य मारले गेले, तरी तें न मारिल्यासारखे आहे, आणि हा मेला असता आम्ही जिवंत असूनही मेल्यासारखे आहो.
४९ अस्वाधीनं कथं देवं प्रकारैरभिराध्यते ।
स्वाधीनं समतिक्रम्य मातरं पितरं गुरुम् ॥ २.३०.३३
(राम सीतेला म्हणतो) माता, पिता व गुरु ही आपल्या हातची दैवते टाकून देऊन स्वाधीन नसलेल्या दुसऱ्या दैवताची नाना प्रकारांनी आराधना, करावी तरी कशी?
५० अहं हि वचनाद्राज्ञः पतेयमपि पावके ॥ २.१८.२८
भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे ।
नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च ॥ २.१८.२९
(राम कैकेयीला म्हणतो) मी राजाच्या सांगण्यावरून अग्नीत देखील पडेन. हितकर्ता गुरु, माझा बाप (दशरथ) राजा, याने आज्ञा केली असतां, मी तीक्ष्ण विषाचे भक्षण करीन, किंवा समुद्रातही उडी घेईन.
५१ अहितं च हिताकारं धार्ष्टयाजल्पन्ति ये नराः ।
अवश्यं मन्त्रबाह्यास्ते कर्तव्याः कृत्यदूषकाः ॥ ६.६३.१६
जे कोणी वस्तुतः अहितप्रद, परंतु बाहेरून हितकारक वाटण्याजोगे भाषण धार्ष्टयाने करितात, ते कार्यनाशक होत. त्यांस आपल्या विचारांत सल्लामसलतींत घेऊ नये.
५२ अहिरेव अहेः पादान्विजानाति न संशयः ॥ ५.४२.९
सर्पाचे पाय - चरणरहित गति - सर्पच जाणतो, यांत संशय नाही.
५३ अहो तम इवेदं स्यान्न प्रज्ञायेत किञ्चन ।
राजा चेन्न भवेल्लोके विभजन्साध्वसाधुनी ॥ २.६७.३६
चांगले आणि वाईट याची निवड करणारा राजा जर पृथ्वीवर नसेल, तर सर्वच अंधार होईल, आणि (कार्याकार्य) कांहींच समजणार नाही.
५४ अहोरात्राणि गच्छन्ति सर्वेषां प्राणिनामिह ।
आयुंषि क्षपयन्त्याशु ग्रीष्मे जलमिवांशवः ॥ २.१०५.२०
ग्रीष्म ऋतूंत उदकाचा नाश करणाऱ्या (सूर्य) किरणांप्रमाणे या मृत्युलोकी निघून जाणाऱ्या दिवसरात्री सर्व प्राण्यांच्या आयुष्याचा शीघ्र नाश करितात.
५५ आकारश्छाद्यमानोऽपि न शक्यो विनिगूहितुम् ।
बलाद्धि विवृणोत्येव भावमन्तर्गतं नृणाम् ॥ ६.१७.६४
मनुष्याने आपला आकार - हर्षविकारादि मनोभावनांनी चेहऱ्यावर होणारा फेरफार आंवरून धरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो आंवरता येत नाही. तो आकार, मनुष्यांचा अंतर्गत (चांगला वाईट) भाव कशाना कशा प्रकारे प्रगट करितोच.
५६ आढ्यो वापि दरिद्रो वा दुःखितः सुखितोऽपि वा ।
निर्दोषश्च सदोषश्च वयस्यः परमा गतिः ॥ ४.८.८
श्रीमंत असो, वा दरिद्री असो; सुखी असो वा दुःखी असो; निर्दोष असो, वा सदोष असो, मित्र म्हणजे परम गति होय.
५७ आत्मप्रशंसिनं दुष्टं धृष्टं विपरिधावकम् ।
सर्वत्रोत्सृष्टदण्डं च लोकः सत्कुरुते नरम् ॥ ६.२१.१५
आत्मप्रशंसा करणारा, दुष्ट आचरणाचा, साहसी, आपल्या प्रसिद्धीकरितां धांवपळ करणारा, व सर्वत्र दंड करीत जाणारा, अशाच पुरुषाचा लोक सत्कार करितात.
५८ आत्मानं नियमैस्तैस्तैः कर्षयित्वा प्रयत्नतः ।
प्राप्यते निपुणैर्धर्मो न सुखाल्लभते सुखम् ॥ ३.९.३१
(धर्मसंपादनार्थ जे जे नियम सांगितले आहेत) त्या त्या नियमांच्या योगेंकरून प्रयत्नांनों शरीर झिजवून शहाणे लोक धर्माची प्राप्ति करून घेतात. कारण, सुखापासून सुख मिळत नसते. (कष्ट करून सुख मिळवावे लागते.)
५९ आत्मानमनुशोच त्वं किमन्यमनुशोचसि ।
आयुस्तु हीयते यस्य स्थितस्याथ गतस्य च ॥ २.१०५.२१
(राम भरताला म्हणतो) तूं आपल्याविषयीं शोक कर. दुसऱ्याविषयी काय म्हणून शोक करितोस? कोणी मनुष्य, मग तो उभा असो, किंवा चालणारा असो त्याचे आयुष्य क्षीण होत असते.
६० आत्मा रक्ष्यः प्रयत्नेन ॥ ५.४६.१६
(प्रत्येकानें) प्रयत्नपूर्वक स्वदेहाचे रक्षण करावें.
६१ आत्मा हि दाराः सर्वेषा दारसङ्ग्रहवर्तिनाम् ॥ २.३७.२४
प्रत्येक विवाहित पुरुषाची स्त्री हा त्याचा आत्माच आहे.
६२ आनृशंस्यं परो धर्मः ॥ ५.३८.३९
(प्राणिमात्रावर) दया करणे हाच श्रेष्ठ धर्म होय.
६३ आभिजात्यं हि ते मन्ये यथा मातुस्तथैव च ।
न हि निम्बात्स्रवेत्क्षौद्रं लोके निगदितं वचः ॥ २.३५.१७
(सुमंत्र सारथि कैकेयीला धिक्कारपूर्वक म्हणतो) तुझा कुलीनपणा तुझ्या आईप्रमाणेच मी समजत आहे ! (तुझ्या आईप्रमाणेच तूं दुष्ट आहेस.) ``लिंबाच्या झाडांतून कधी मध पाघळत नाही'' ही म्हण लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.
६४ आम्म्रं छित्त्वा कुठारेण निम्बं परिचरेत्तु कः ।
यश्चैनं पयसा सिञ्चेन्नैवास्य मधुरो भवेत् ॥ २.३५.१६
आंब्याचे झाड कुऱ्हाडीने तोडून टाकून लिंबाच्या झाडाची जोपासना कोण करणार आहे? कारण, या लिंबाच्या झाडाला जो पाणी घालील त्याच्याकरितां ते कधीं मधुर होणार नाही.
६५ आयस्ते विपुलः कच्चित्कच्चिदल्पतरो व्ययः ।
अपात्रेषु न ते कच्चिकोशो गच्छति राघव ॥ २.१००.५४
(राम भरताला विचारतो.) हे राघवा, तुझी प्राप्ति विपुल आहेना? तुझा खर्च अति अल्प आहेना? तुझ्या खजिन्यांतील द्रव्य अपात्रीं खर्च होत नाहींना?
६६ आराधिता हि शीलेन प्रयत्नैश्चोपसेविताः ।
राजानः सम्प्रसीदन्ति प्रकुप्यन्ति विपर्यये ॥ २.२६.३५
राजे लोकांची सद्वर्तनाने आराधना आणि प्रयत्नपूर्वक सेवा केली असता ते प्रसन्न होतात. याच्या उलट वर्तनाने ते क्रुद्ध होतात.
६७ आस्फोटयामास चुचुम्ब पुच्छं
ननन्द चिक्रीड जगौ जगाम ।
स्तम्भानरोहन्निपपात भूमौ
निदर्शयन्स्वां प्रकृतिं कपीनाम् ॥ ५.१०.५४
(ही सीता असावी असा तर्क झाल्यावर मारुतीला आनंद झाला त्याचं वर्णन) वानरांना योग्य असा आपला जातिस्वभाव दर्शविण्यास उद्युक्त झालेला तो हनुमान् आपले पुच्छ आपटूं लागला, त्याचे चुंबन घेऊं लागला, मनामध्ये आनंदित होऊन क्रीडा करूं लागला, ग्ॐ लागला. इकडे तिकडे धावाधाव करूं लागला. आणि खांबावर चढून फिरून जमिनीवरही उड्या मारूं लागला.
६८ आहुः सत्यं हि परमं धर्मं धर्मविदोजनाः ॥ २.१४.३
``सत्य हाच परम धर्म होय,'' असें धर्मवेत्ते लोक म्हणतात.
६९ इदं शरीरं निःसञ्ज्ञं बन्ध वा घातयस्व वा ।
नेदं शरीरं रक्ष्यं मे जीवितं वापि राक्षस ॥ ३.५६.२१
न तु शक्यमपक्रोशं पृथिव्यां दातुमात्मनः ॥ ३.५६.२२
(सीता रावणाला म्हणते) हे राक्षसा, हे जड शरीर बांधून ठेव, अगर याचा घात कर. कारण माझी पृथ्वीवर (सीता गैर चालीची निघाली अशा प्रकारची) निंदा होणार असेल तर शरीर काय, अथवा जीवित काय, यांचे रक्षण मला करावयाचें नाहीं.
७० इदं तु मम दीनस्य मनो भूयः प्रकर्षति ।
यदिहास्य प्रियाख्यातुर्न कुर्मि सदृशं प्रियम् ॥ ६.१.१२
एष सर्वस्वभूतस्तु परिष्वङ्गो हनूमतः ।
मया कालमिमं प्राप्य दत्तस्तस्य महात्मनः ॥ ६.१.१३
(राम म्हणतो) सीतेचा शोध लागला ही प्रियवार्ता कथन करणाऱ्या ह्या वानराचे - मारुतीचे - त्याने केलेल्या कार्यानुरूप प्रिय मी करूं शकत नाही, त्यामुळे मज दीनाचे मन अत्यंत खिन्न होत आहे. अशा वेळी कडकैन भेट देणे हेच काय ते माझ्यापाशी उरलें आहे आणि ही भेट मी त्या महात्म्या हनुमंताला देत आहे.
७१ उत्तरं नोत्सहे वक्तुं दैवतं भवती मम ।
वाक्यमप्रतिरूपं तु न चित्रं स्त्रीषु मैथिलि ॥ ३.४५.२९
(लक्ष्मण म्हणतो) हे सीते, तूं माझें दैवत असल्यामुळे माझ्याने तुला उत्तर देववत नाही. स्त्रियांनी अनुचित भाषण करणे, ह्यांत कांही आश्चर्य नाही. (हे साहजिक आहे.)
७२ उत्साहवन्तः पुरुषा नावसीदन्ति कर्मसु ॥ ४.१.१२३
उत्साही पुरुष कोणत्याही कार्यात खचून जात नाहीत.
७३ उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् ।
सोत्साहस्य हि लोकेषु न किञ्चिदपि दुर्लभम् ॥ ४.१.१२२
(लक्ष्मण रामाला म्हणतो) हे आर्या, उत्साह हा (अत्यंत) बलवान आहे. उत्साहापेक्षा दुसरें श्रेष्ठ असें बल नाही. उत्साही पुरुषाला लोकांमध्ये दुर्लभ असे काहीच नाही.
७४ उद्विजन्ते यथा सर्पान्नरादनृतवादिनः ।
धर्मः सत्यपरो लोके मूलं सर्वस्य चोच्यते ॥ २.१०९.१२
सर्पापासून जशी लोकांना भीति असते, त्याचप्रमाणे असत्यवादी मनुष्यापासून लोकांना भीति असते. ज्यांत सत्य मुख्य आहे, असा जो धर्म, तोच लोकांत (सर्व इष्टप्राप्तीचे) मूळ आहे, असे सांगतात.
७५ उद्वेजनीयो भूतानां नृशंसः पापकर्मकृत ।
त्रयाणामपि लोकानामीश्वरोऽपि न तिष्ठति ॥ ३.२९.३
जो प्राणिमात्राला उद्विग्न करितो, जो पापकर्मी व दुष्ट असतो तो तीनही लोकांचा प्रभु झाला, तरी फार कालपर्यंत टिकणार नाही.
७६ उपकारफलं मित्रमपकारोऽरिलक्षणम् ॥ ४.८.२१
उपकाररूप फल है मित्रत्वाचे लक्षण व अपकार करणे हे शत्रुत्वाचे लक्षण होय.
७७ उपकारेण वीरस्तु प्रतिकारेण युज्यते ।
अकृतज्ञोऽप्रतिकृतो हन्ति सत्त्ववतां मनः ॥ ४.२७.४५
वीर पुरुषावर कोणीही उपकार केला असता, तो वीर पुरुष प्रत्युपकार करितोच. उपकार न जाणून प्रत्युपकार न करील, तर तो सत्त्वशील पुरुषांचा मनोभंग करितो.
७८ उपभुक्तं यथा वासः स्रजो वा मृदिता यथा ।
एवं राज्यात्परिभ्रष्टः समर्थोऽपि निरर्थकः ॥ ३.३३.१९
ज्याप्रमाणे वापरलेले वस्त्र अथवा चुरगळलेल्या माळा निरुपयोगी होतात, त्याचप्रमाणे राज्यापासून भ्रष्ट झालेला पुरुष समर्थ असूनही निरुपयोगी होतो.
७९ उपशान्तवणिक्पण्या नष्टहर्षा निराश्रया ।
अयोध्या नगरी चासीनष्टतारमिवाम्बरम् ॥ २.४८.३५
(राम वनवासाला गेल्यावर अयोध्येची स्थिति.) वाण्यांची दुकानें बंद झाली, हर्ष नाहीसा झाला, लोकांचा आश्रय तुटल्यासारखा झाला अशा प्रकारे ती अयोध्या नगरी नक्षत्रशून्य आकाशाप्रमाणे निस्तेज दिसू लागली.
८० उपायकुशलो ह्येव जयेच्छत्रूनतन्द्रितः ॥ ६.८.१२
उपाययोजनेंत कुशल अशा मनुष्याने आळस टाकून शत्रूस जिंकावें.
८१ उभे सन्ध्ये शयानस्य यत्पापं परिकल्प्यते ।
तच्च पापं भवेत्तस्य यस्यार्योऽनुमते गतः ॥ २.७५.४४
(आपल्या निरापराधिपणाविषयी खात्री करून देणारा भरत कौसल्येला म्हणतो) ज्याची अनुमति मिळवून आर्य - श्रीरामचंद्रवनवासाला गेला, त्यास सकाळी व संध्याकाळी निद्रा करणाऱ्याला जें पाप लागते, तें लागावें.
८२ ऋद्धियुक्ता हि पुरुषा न सहन्ते परस्तवम् ॥ २.२६.२५
वैभवयुक्त पुरुषांस दुसऱ्याची स्तुति सहन होत नाही.
८३ एक एव हि वन्ध्यायाः शोको भवति मानसः ।
अप्रजास्मीति सन्तोषो न ह्यन्यः पुत्र विद्यते ॥ २.२०.३७
(कौसल्या रामाला म्हणते) पुत्रा, वंध्येला (मला संतति नाहीं, असा) एकच मानसिक शोक असतो; इतर कोणतेही दुःख तिला असत नाही.
८४ एकाङ्गहीनं वस्त्रेण जीवितं मरणाद्वरम् ॥ २.९५प्र.५३
(राम कावळ्याला म्हणतो) मरणापेक्षा (माझ्या) अस्त्राने एक अवयव कमी होऊन (तुला) जिवंत राहणे बरे आहे.
८५ एकैकस्योपकारस्य प्राणान्दास्यामि ते कपे ।
शेषस्येहोपकाराणां भवाम ऋणिनो वयम् ॥ ७.४०.२३
(राम मारुतीला म्हणतात) हे कपे, तुझ्या एकेका उपकाराकरितां मी प्राण देईन. शेष राहिलेल्या उपकारांचेबद्दल आम्ही तुझे ऋणी राहूं.
८६ एतदर्थं हि राज्यानि प्रशासति नराधिपाः ।
यदेषां सर्वकृत्येषु मनो न प्रतिहन्यते ॥ २.५२.२५
राजे लोक याकरितांच राज्य करितात की, (कामक्रोधादिविषयक प्रवृत्ति करणाऱ्या) कोणत्याही कृत्यांत आपला मनोभंग होऊ नये.
८७ एष स्वभावो नारीणामनुभूय पुरा सुखम् ।
अल्पामप्यापदं प्राप्य दुष्यन्ति प्रजहत्यपि ॥ २.३९.२१
स्त्रियांचा असा स्वभाव असतो की, पूर्वी सुखाचा अनुभव घेऊन पुढें अल्पही विपत्ति आली असता, त्या (पतीला) दोष देतात, किंवा त्याचा त्यागही करितात.
८८ एषा हि प्रकृतिः स्त्रीणामासृष्टे रघुनन्दन ।
समस्थमनुरज्यन्ते विषमस्थं त्यजन्ति च ॥ ३.१३.५
(अगस्त्यमुनि रामाला म्हणतात) सृष्टि निर्माण झाल्यापासून स्त्रियांचा स्वभावच असा दिसून येतो की, चांगल्या स्थितीत (पति) असल्यास त्या त्याचे अनुरंजन करितात. परंतु तो विषम - दरिद्री - स्थितीत असल्यास त्या त्याचा त्याग करितात.
८९ एष्टव्या बहवः पुत्रा गुणवन्तो बहुश्रुताः ।
तेषां वै समवेतानामपि कश्चिद्गयां व्रजेत् ॥ २.१०७.१३
गुणवंत आणि बहुश्रुत असे अनेक पुत्र असावे, अशी इच्छा (मनुष्याने) करावी. कारण, त्या एकत्र झालेल्या पुत्रांतून एखादा तरी (पितरांच्या स्वर्गप्राप्त्यर्थ) गयेला जाईल.
९० ऐश्वर्यमदमत्तो हि सर्वोऽहमिति मन्यते ॥ ५.६४.१९
ऐश्वर्याच्या मदाने मत्त झालेला प्रत्येक इसम ``मीच (प्रभु)'' असे मानतो.
९१ ऐश्वर्ये वा सुविस्तीर्णे व्यसने वा सुदारुणे ।
रज्ज्वेव पुरुषं बद्ध्वा कृतान्तः परिकर्षति ॥ ५.३७.३
अत्यंत विपुल ऐश्वर्याच्या स्थितीत काय, किंवा महाभयंकर संकटाच्या स्थितीत काय, यम पुरुषास दोरीने बद्ध करून आकर्षण करीत असतो.
९२ औरस्यानपि पुत्रान् हि त्यजन्त्यहितकारिणः ।
समर्थान्सम्प्रगृह्णन्ति जनानपि नराधिपाः ॥ २.२६.३६
राजे लोक औरस पुत्रांचा, ते अहित करणारे असल्यास, त्याग करितात. आणि समर्थ अशा प्राकृत मनुष्यांचाही संग्रह करितात.
९३ कच्चिजानपदो विद्वान् दक्षिणः प्रतिभानवान् ।
यथोक्तवादी दूतस्ते कृतो भरत पण्डितः ॥ २.१००.३५
(राम म्हणतो) हे भरता, स्वदेशातील, विद्वान, हुशार, बुद्धिमान, आज्ञेनुसार वागणारे आणि चतुर दूत तूं ठेविले आहेस ना?
(श्लोक ९३ ते १०० यांमध्ये रामाने भरताला कुशल प्रश्न विचारिले आहेत.)
९४ कच्चित्सहस्रैमर्खाणामेकमिच्छसि पण्डितम् ।
पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निः श्रेयसं महत् ॥ २.१००.२२
हजारों मूर्खाचा त्याग करून एकाच पण्डिताचा (सहवास) करण्याचें तूं इच्छितोस ना ! कारण, कोणत्याही कार्यासंबंधानें संकट आले असतां पंडितच (तरणोपाय सुचवून) कल्याण करितो.
९५ कच्चित्स्वादुकृतं भोज्यमेको नाश्नासि राघव ।
कच्चिदाशंसमानेभ्यो मित्रेभ्यःसम्प्रयच्छसि ॥ २.१०.७५
हे राघवा, (भरता) स्वादिष्ट केलेले भोज्य पदार्थ तूं एकटाच भक्षण करीत नाहींस ना? त्या पदार्थांची इच्छा करणाऱ्या मित्रांना तूं ते देतोस ना?
९६ कच्चिदर्थं च कामं च धर्मं च जयतां वर ।
विभज्य काले कालज्ञ सर्वान्वरद सेवसे ॥ २.१००.६३
हे वीरश्रेष्ठा ! तूं कालज्ञ आहेस, तसाच वरदही आहेस; तरी धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थाचें तूं वेळा नेमून योग्यकालीं सेवन करीत असतोस ना?
९७ कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलं महोदयम् ।
क्षिप्रमारभसे कर्म न दीर्घयसि राघव ॥ २.१००.१९
(राम भरताला म्हणतो) हे राघवा, जें अल्प यत्नाने साध्य होणारे व ज्याचे फल मोठे आहे, अशा कार्याचा निश्चय करून तें कार्य त्वरित करितोस ना? त्या कामी विलंब लावीत नाहीस ना?
९८ कच्चिन्न सर्वे कर्मान्ताः प्रत्यक्षास्तेऽविशङ्कया ।
सर्वे वा पुनरुत्सृष्टा मध्यमेवात्र कारणम् ॥ २.१००.५२
(राम भरताला विचारतो) तुझे सर्व चाकर निर्भयपणे तुझ्या दृष्टीसमोर येत नाहीत ना? किंवा त्या सर्वांना तूं बंदी केली नाहींस ना? अशा संबंधांत (राजाने) मध्यम मार्ग धरिलेला बरा.
९९ कचिनिद्रावशं नैषि कच्चित्कालेऽवबुध्यसे ।
कच्चिच्चापररात्रेषु चिन्तयस्यर्थनैपुणम् ॥ २.१००.१७
तूं निद्रावश होत नाहींस ना? तूं योग्य काली जागृत होतोस ना? द्रव्यप्राप्ति कोणत्या उपायाने होईल, याचे चिंतन उत्तररात्रीं करितोस ना?
१०० कच्चिन्मन्त्रयसे नैकः कच्चिन्न बहुभिः सह ।
कच्चित्ते मन्त्रितो मन्त्रो राष्ट्र न परिधावति ॥ २.१००.१८
(राम भरताला विचारतो) तूं आपल्या स्वतःशीच एकटा अथवा पुष्कळ मण्डळीशी मसलत करीत नाहींस ना? तूं ठरविलेली मसलत अमलान्त येण्यापूर्वीच राष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत नाही ना?
१०१ कथं राजा स्थितो धर्मे परदारान्परामृशेत् ॥ ३.५०.६
(प्रजापालनरूप) धर्माचे ठिकाणी स्थित असणारा राजा परस्त्रीला कसा बरें स्पर्श करील?
१०२ कन्यापितृत्वं दुःखं हि सर्वेषां मानकाङ्शिणाम् ॥ ७.९.१०
सर्व मानी मनुष्यांना पोटीं कन्या येणे म्हणजे खरोखर दुःख होय.
१०३ कर्णवन्ति हि भूतानि विशेषेण तुरङ्गमाः ।
यूयं तस्मानिवर्तध्वं याचनां प्रतिवेदिताः ॥ २.४५.१५
(राम रथांत बसून अरण्यांत जाऊ लागला असतां, द्विजमंडळी रथाच्या घोड्यांना ``तुम्ही परत फिरा'' असे म्हणतात) प्राण्यांना कान आहेत, विशेषेकरून अश्वांचे कान तर आधिक तिखट आहेत. म्हणून हे अश्वांनो, आमच्या याचनेकडे लक्ष देऊन तुम्ही परत फिरा. (बहिऱ्यांसारखे पुढे जाऊ नका.)
१०४ कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभिः ॥ २.५६.२२
(राम म्हणतो) हे लक्ष्मणा, चिरकाल जीविताची इच्छा करणाऱ्यांनी वास्तुशांति करावी.
१०५ कर्म लोकविरुद्धं तु कुर्वाणं क्षणदाचर ।
तीक्ष्णं सर्वजनो हन्ति सर्पं दुष्टमिवागतम् ॥ ३.२९.४
(राम खर राक्षसाला म्हणतो) हे राक्षसा, प्राप्त झालेल्या दुष्ट सर्पाचा सर्व लोक वध करितात. त्याचप्रमाणे लोकविरुद्ध कर्म करणाऱ्या क्रूर पुरुषाचाही वध करितात.
१०६ कल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति माम् ।
एति जीवन्तमानन्दो नरं वर्षशतादपि ॥ ६.१२६.२
(भरत मारुतीला म्हणतो) मनुष्य जिवंत राहिल्यास, शंभर वर्षानी का होईना, त्याला आनंद प्राप्त होतो, ही लोकप्रसिद्ध म्हण कल्याणप्रद आहे, असे मला वाटते.
१०७ कश्चिदाम्रवणं छित्त्वा पलाशांश्च निषिञ्चति ।
पुष्पं दृष्ट्वा फले गृध्नुः स शोचति फलागमे ॥ २.६३.८
जो कोणी आम्रवन तोडून पलाश वृक्षांचे सिंचन करितो, व त्या पळसांचे पुष्प पाहून फळही तसेंच मिळेल, अशी आशा करितो, तो फलप्राप्तिकाली शोक पावतो.
१०८ कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावणस्त्रियः ।
न तु मे मनसा किञ्चिद्वैकृत्यमुपपद्यते ॥ ५.११.४२
(सीतेचा शोध लावण्यासाठी रावणाच्या अंतःपुरांत शिरलेला मारुति म्हणतो) परपुरुष आपणाला पाहील, अशी यत्किंचितही शंका ज्यांच्या मनांत नाही, अशा निःशंकपणे पडलेल्या सर्व रावणस्त्रिया मी पाहिल्या, परंतु या पाहण्यामुळे मनामध्ये काहींच विकार उत्पन्न झाला नाही.
१०९ कायेन कुरुते पापं मनसा सम्प्रधार्य तत् ।
अनृतं जिह्वया चाह त्रिविधं कर्म पातकम् ॥ २.१०९.२१
मनुष्य प्रथमतः अंतःकरणांत पापकर्माचा निश्चय करितो, नंतर त्या पापाचा जिह्वेनें उच्चार करितो, व तदनंतर देहाने त्याचे आचरण करितो, असे तीन प्रकारचे पापकर्म आहे.
११० कार्याणां कर्मणा पारं यो गच्छति स बुद्धिमान् ॥ ६.८८.१४
जो कृति करून कार्याच्या पार जातो, तो बुद्धिमान होय.
१११ कार्यार्थिनां विमर्दो हि राज्ञान्दोषाय कल्पते ॥ ७.५३.२४
कार्यार्थी लोकांचा कलह म्हंटला म्हणजे राजांना दोषास्पद होतो.
११२ कार्ये कर्मणि निर्वृत्ते यो बहून्यपि साधयेत् ।
पूर्वकार्याविरोधेन स कार्यं कर्तुमर्हति ॥ ५.४१.५
मुख्य कार्य सिद्धीला गेले असता, त्या पूर्वकार्यास विरोध न येईल, अशा रीतीने दुसरीही बहुत कायें जो करितो, तोच कार्य करण्याविषयी योग्य होतो.
११३ कालो हि दुरतिक्रमः ॥ ३.६८.२१
कालाचे अतिक्रमण करणे ही गोष्ट दुःसाध्य आहे.
११४ किं त्वामन्यत वैदेहः पिता मे मिथिलाधिपः ।
राम जामातरं प्राप्य स्त्रियं पुरुषविग्रहम् ॥ २.३०.३
(वनवासाला येण्यासंबंधाने अनुमति मिळावी म्हणून सीता रामाला म्हणते) हे रामा, माझा पिता मिथिलापति जनक यास, आकृतीने मात्र पुरुष, परंतु वस्तुतः स्त्री अशा तुम्हां जांवयाची प्राप्ति होऊन काय बरे वाटले असेल?
११५ कीर्त्यर्थं तु समारम्भः सर्वेषां सुमहात्मनाम् ॥ ७.४५.१३
सर्व महात्मे कीर्ति संपादन करण्याकरितांच खटपट करीत असतात.
११६ कुलीनमकुलीनं वा वीरं पुरुषमानिनम् ।
चारित्रमेव व्याख्याति शुचिं वा यदि वाशुचिम् ॥ २.१०९.४
पुरुष चांगल्या कुळांतील आहे किंवा वाईट कुळांतील आहे, वीर आहे किंवा अधीर आहे आणि पवित्र आहे की अपवित्र आहे, हे सर्व त्याच्या वर्तनावरून समजून येते.
११७ कृतकृत्या हि वैदेही छायेवानुगता पतिम् ।
न जहाति रता धर्मे मेरुमर्कप्रभा यथा ॥ २.४०.२४
छायेप्रमाणे पतीला अनुसरणारी सीता खरोखर धन्य आहे. कारण, सूर्याची प्रभा ज्याप्रमाणे मेरुपर्वताला सोडीत नाही, त्याप्रमाणे धर्माचे ठिकाणी रत असलेली ही सीता आपल्या पतीला सोडून रहात नाही.
११८ कृतं न प्रतिकुर्याद्यः पुरुषाणां हि दूषकः ॥ ४.३८.२६
पुरुषांमध्ये तोच धर्मनाशक होय की, जो केलेल्या उपकाराची फेड प्रत्युपकाराने करीत नाही.
११९ कृतार्था ह्यकृतार्थानां मित्राणां न भवन्ति ये ।
तान्मृतानपि क्रव्यादाः कृतघ्नान्नोपभुञ्जते ॥ ४.३०.७३
जे स्वतः कृतार्थ होऊन कृतकार्य न झालेल्या आपल्या मित्रांच्या उपयोगी पडत नाहीत, त्या कृतघ्नांस मेल्यावर श्वानादि मांसभक्षक पशुसुद्धा भक्षण करीत नाहीत.
१२० कृते च प्रतिकर्तव्यमेष धर्मः सनातनः ॥ ५.१.१०६
उपकाराची प्रत्युपकाराने फेड करावी, हा सनातन धर्म होय.
१२१ कृत्स्नाद्भयाज्ज्ञातिभयं सुकष्टं विदितं च नः ॥ ६.१६.८
(रावण बिभीषणाला म्हणतो.) कोणत्याही भयापेक्षा भाऊबंदांचे भय फारच कठीण, हे आम्हाला समजून चुकले आहे.
१२२ कैकेयि मामकाङ्गानि मा स्प्राक्षीः पापनिश्चये ।
नहि त्वां द्रष्टमिच्छामि न भार्या न च बान्धवी ॥ २.४२.६
(राम वनांत निघून गेल्यावर दशरथ कैकेयीला म्हणतो) हे कैकेयि, तूं माझ्या अवयवांना स्पर्श करूं नको. हे पापनिश्चये, मला तुझें तोंड पाहण्याची इच्छा नाही. तूं माझी भार्या नव्हेस इतकेंच नव्हे परंतु (लांबची कोणी) नातेवाईक सुद्धा नव्हेस.
१२३ कोपं न गच्छन्ति हि सत्त्ववन्तः ॥ ५.५२.१६
सत्त्वशील मनुष्य कधीही कोपवश होत नाहीत.
१२४ क्रुद्धः पापं न कुर्यात्कः क्रुद्धो हन्याद्गुरूनपि ।
क्रुद्धः परुषया वाचा नरः साधूनधिक्षिपेत् ॥ ५.५५.४
क्रुद्ध झाला असतां कोण बरें पाप करणार नाहीं? क्रुद्ध पुरुष गुरूचाही वध करील. कुद्ध मनुष्य आपल्या कठोर भाषणाने साधूंनाही टाकून बोलेल.
१२५ क्रोधः प्राणहरः शत्रुः क्रोधो मित्रमुखो रिपुः ।
क्रोधो ह्यसिर्महातीक्ष्णः सर्व क्रोधोऽपकर्षति ॥ ७.५९ प्र. २.२१
क्रोध हा प्राणहरणकर्ता शत्रु होय. क्रोध हा मित्रमुख शत्रु (हितशत्रु) आहे. क्रोध अत्यंत तीक्ष्ण असा खड्ग आहे. क्रोध हा सर्वनाशक आहे.
१२६ क्षत्रियाणां तु वीराणां वनेषु नियतात्मनाम् ।
धनुषा कार्यमेतावदार्तानामभिरक्षणम् ॥ ३.९.२६
क्षत्रिय वीरांचा धर्म म्हंटला म्हणजे, वनांत राहून मनोनिग्रह करणाऱ्या पीडित जनांचे धनुष्याच्या साह्याने रक्षण करणे, हा होय.
१२७ क्षत्रियाणामिह धनुर्हताशस्येन्धनानि च ।
समीपतः स्थितं तेजो बलमुच्छ्रयते भृशम् ॥ ३.९.१५
अग्नीचें तेज काष्ठाचे योगाने या लोकी जसें वृद्धिंगत होते, त्याप्रमाणे क्षत्रियांजवळ असलेले धनुष्य, त्यांच्या तेजोबलाची वृद्धि करिते.
१२८ क्षत्रियैर्धार्यते चापो नार्तशब्दो भवेदिति ॥ ३.१०.३
(रक्षण होत नसल्यामुळे) पीडित होऊन लोकांना रडत बसण्याची पाळी येऊ नये, एवढ्याचकरितां क्षत्रियांनी धनुष्य धारण करावयाचे असते.
१२९ क्षत्रियो निहतःसङ्ख्ये न शोच्य इति निश्चयः ॥ ६.१०९.१९
क्षत्रिय रणांगणावर पडला असता, त्याबद्दल शोक करू नये, ही निश्चित गोष्ट आहे.
१३० क्षमया हि समायुक्तं मामयं मकरालयः ।
असमर्थं विजानाति धिक् क्षमामीदृशे जने ॥ ६.२१.२०
(समुद्राने दर्शन दिले नाही तेव्हां राम लक्ष्मणाला म्हणतो) मी क्षमेचे अवलंबन केले असल्यामुळे हा समुद्र मला अशक्त समजत आहे. म्हणून अशा पुरुषाचे ठिकाणी दर्शविलेल्या क्षमेला धिक्कार असो.
१३१ गतिं खर इवाश्वस्य हंसस्येव च वायसः ।
नान्वेतुमुत्सहे वीर तव मार्गमरिन्दम ॥ ६.१२८.५
(भरत रामाला म्हणतो.) हे शत्रुदमना वीरा, ज्याप्रमाणे घोड्याच्या गतीचे अनुकरण करण्यास गर्दभ असमर्थ आहे, अथवा हंसाची गति स्वीकारण्यास कावळा असमर्थ आहे. त्याप्रमाणे प्रजेचे रक्षण करण्याच्या तुझ्या मार्गाचे अवलंबन करण्यास मी असमर्थ आहे.
१३२ गतिरेका पतिर्नार्या द्वितीया गतिरात्मजः ।
तृतीया ज्ञातयो राजश्चतुर्थी नैव विद्यते ॥ २.६१.२४
(कौसल्या दशरथाला म्हणते) हे राजा, स्त्रियांना पहिली गति म्हणजे पति ही होय. त्यांची दुसरी गति म्हणजे पुत्र, आणि तिसरी गति म्हंटली म्हणजे ज्ञाति होत. त्यांना चवथी गति (आधार) म्हणून नाही.
१३३ गतोदके सेतुबन्धो न कल्याणि विधीयते ॥ २.९.५४
(मंथरा कैकेयीला म्हणते) हे कल्याणि, पाणी निघून गेल्यावर कोणी बांध घालीत नसतात.
१३४ गर्जन्ति न वृथा शूरा निर्जला इव तोयदाः ॥ ६.६५.३
शूर लोक, निर्जल मेघांप्रमाणे, व्यर्थ गर्जना करीत नसतात.
१३५ गात्रेषु वलयः प्राप्ताः श्वेताश्चैव शिरोरुहाः ।
जरया पुरुषो जीर्णः किं हि कृत्वा प्रभावयेत् ॥ २.१०५.२३
(राम भरताला सांगतो) अवयवांवर सुरकुत्या पडतात, मस्तकावरील केस पांढरे होऊन जातात आणि जरेनें मनुष्य जीर्ण होऊन जातो. तेव्हा कोणता उपाय करून हे सर्व टाळण्याला प्राणी समर्थ होणार आहे?
१३६ गायन्ति केचित्प्रहसन्ति केचित्
नृत्यन्ति केचित्प्रणमन्ति केचित् ।
पठन्ति केचित्प्रचरन्ति केचित्
प्लवन्ति केचित्प्रलपन्ति केचित् ॥ ५.६१.१७
(सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले वानर मधुपान करून तर्र झाले) कित्येक (वानर) ग्ॐ लागले, कित्येक हसूं लागले, कित्येक नाचू लागले, कित्येक प्रणाम करू लागले, कित्येक पठण करूं लागले, कित्यक संचार करू लागले, कित्येक उड्या मारू लागले, तर कित्येक बडबड करूं लागले.
१३७ गुणवान्वा परजनः स्वजनो निर्गुणोऽपि वा ।
निर्गुणः स्वजनः श्रेयान् यः परः पर एव सः ॥ ६.८७.१५
(इंद्रजित् बिभीषणाला म्हणतो) स्वजन निर्गुण असून दुसरे जरी गुणी असले तरी निर्गुणी स्वजन बरे, परंतु जे परके ते परकेच होत.
१३८ गुरुलाघवमर्थानामारम्भे कर्मणां फलम् ।
दोष वा यो न जानाति स बाल इति होच्यते ॥ २.६३.७
कोणत्याही कर्मालाआरंभ करण्याच्या वेळी त्याच्या फलासंबंधाने उत्कृष्टानिकृष्टभाव आणि गुणदोष जो जाणीत नाही त्याला मूर्ख असें म्हणतात.
१३९ गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः ।
उत्पथं प्रतिपन्नस्य कार्यं भवति शासनम् ॥ २.२१.१३
कार्याकार्यविचार न जाणणारा, दुर्मार्गाला लागलेला, व गर्विष्ठ, अशा गुरूसही दंड करणे योग्य होय.
१४० गृह्यन्ते यदि रोषेण त्वादृशोऽपि विचक्षणाः ।
ततः शास्त्रविपश्चित्त्वं श्रम एव हि केवलम् ॥ ५.५२.८
(विभीषण रावणाला म्हणतो) तुझ्यासारखे शहाणे लोक जर क्रोधाधीन होतात, तर मग शास्त्रांमध्ये पांडित्य संपादन करणे म्हणजे केवळ वृथा श्रमच होत.
१४१ गोघ्ने चैव सुरापे च चौरे भग्नव्रते तथा ।
निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ॥ ४.३४.१२
गोहत्या करणाराला, सुरापान करणाराला, चोराला, व्रतभंग करणाराला, सज्जनांनी प्रायश्चित्त सांगितले आहे; परंतु कृतघ्नाला प्रायश्चित्त सांगितले नाही.
१४२ गोदावरीं प्रवेक्ष्यामि हीना रामेण लक्ष्मण ।
आबन्धिष्येऽथवा त्यक्ष्ये विषमे देहमात्मनः ॥ ३.४५.३७
पिबामि वा विषं तीक्ष्णं प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
न त्वहं राघवादन्यं कदापि पुरुषं स्पृशे ॥ ३.४५.३८
(सीता म्हणते) हे लक्ष्मणा, रामाचा वियोग झाला असता मी गोदावरीमध्ये उडी टाकीन, गळ्याला फास लावून घेईन, कड्यावर उभी राहून तेथून आपला देह लोटून देईन, नाहीतर तीक्ष्ण विष सेवन करीन अथवा अग्नीमध्ये प्रवेश करीन. परंतु रामावांचून इतर पुरुषाला मी कधीहि स्पर्श करणार नाही.
१४३ गोब्राह्मणहितार्थाय देशस्य च हिताय च ।
तव चैवाप्रमेयस्य वचनं कर्तुमुद्यतः ॥ १.२६.५
(विश्वामित्र मुनींनी ताटकेचा वध करण्याविषयी रामाला सांगितले असतां राम विश्वामित्रांना म्हणतो) गोब्राह्मणांच्या हिताकरितां आणि देशाच्या कल्याणाकरितां अतर्क्य प्रभावाने युक्त जे आपण त्या आपल्या आज्ञेप्रमाणे वागण्यास मी तयार आहे.
१४४ चतुर्णामाश्रमाणां हि गार्हस्थ्यं श्रेष्ठमुत्तमम् ॥ २.१०६.२२
चारही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम हाच उत्तम होय.
१४५ चन्द्रहीनमिवाकाशं तोयहीनमिवार्णवम् ।
अपश्यनिहतानन्दं नगरं ते विचेतसः ॥ २.४७.१८
(रामाच्या पाठोपाठ गेलेले लोक खिन्न होऊन परत अयोध्येमध्ये आले त्या वेळी) चंद्रहीन आकाशाप्रमाणे अथवा उदकशून्य सागराप्रमाणे आनंदरहित झालेलें नगर त्या भांबावून गेलेल्या लोकांनी अवलोकन केलें.
१४६ चारेण विदितः शत्रुः पण्डितैर्वसुधाधिपैः ।
युद्धे स्वल्पेन यत्नेन समासाद्य निरस्यते ॥ ६.२९.२२
शहाण्या राजांनी हेरांकडून ज्याची माहिती मिळविली आहे असा शत्रु युद्धभूमीवर प्राप्त झाला असतां, अल्प प्रयत्नाने नाश पावतो.
१४७ छिन्ना भिन्ना प्रभिन्ना वा दीप्ता वाग्नौ प्रदीपिता ।
रावणं नोपतिष्ठेयं किं प्रलापेन वश्चिरम् ॥ ५.२६.१०
(सीता राक्षसस्त्रियांना म्हणते) तुमच्या या पुष्कळ बडबडीचा उपयोग काय? मी छिन्नभिन्न झाले असतां, माझे तुकडे तुकडे झाले असतां, मी अग्नीने भाजून गेले असतां, अथवा पेटले असतांही रावणाचा स्वीकार करणार नाही.
१४८ जानामि शीलं ज्ञातीनां सर्वलोकेषु राक्षस ।
हृष्यन्ति व्यसनेष्वेते ज्ञातीनां ज्ञातयः सदा ॥ ६.१६.३
(रावण बिभीषणाला म्हणतो) हे राक्षसा, त्रैलोक्यामध्ये भाऊबंदांचा स्वभाव कसा असतो, हे मी जाणीत आहे. अरे, भाऊबंदांवर संकटे आली असतां दुसरे भाऊबंद नेहमी आनंद मानीत असतात.
१४९ जीवन्त्या हि स्त्रिया भर्ता दैवतं प्रभुरेव च ॥ २.२४.२१
स्त्री जिवंत असतांना पति हेच तिचे दैवत आहे, त्याचप्रमाणे तो तिचा प्रभुही आहे.
१५०. जीवेच्चिरं वज्रधरस्य पश्चा-
च्छचीं प्रधृष्याप्रतिरूपरूपाम् ।
न मादृशीं राक्षस धर्षयित्वा
पीतामृतस्यापि तवास्ति मोक्षः ॥ ३.४८.२४
(सीता रावणाला म्हणते) हे राक्षसा, वज्र धारण करणाऱ्या इंद्राची जी अनुपम सौंदर्यसंपन्न भार्या शची तिचा अपहार केल्यानंतरही कदाचित् पुष्कळ दिवसपर्यंत जिवंत राहणे शक्य आहे; परंतु बलात्काराने मजसारख्या रामभार्येला हरण करून नेल्यावर तूं जरी अमृतपान केलेस तरी मृत्यूपासून तुझी सुटका होणार नाही.
१५१ जेतव्यमिति काकुत्स्थो मर्तव्यमिति रावणः ।
धृतौ स्ववीर्यसर्वस्वं युद्धेऽदर्शयतां तदा ॥ ६.१०७.७
रामाने जिंकण्याचा व रावणाने मरण्याचा निश्चय करून आपले सर्व काही सामर्थ्य त्या वेळी युद्धामध्ये प्रगट केले.
१५२ ज्येष्ठो भ्राता पिता वापि यश्च विद्यां प्रयच्छति ।
त्रयस्ते पितरो ज्ञेया धर्मे च पथि वर्तिनः ॥ ४.१८.१३
(राम वालीला म्हणतो) वडील बंधु, पिता आणि जो विद्या शिकवितो तो हे तिघेजण, धर्ममार्गाने चालणाऱ्यांचे पिते आहेत असे समजले पाहिजे.
१५३ तडित्पताकाभिरलङ्कृताना ।
मुदीर्णगम्भीरमहारवाणाम् विभान्ति रूपाणि बलाहकानां
रणोत्सुकानामिव वानराणाम् ॥ ४.२८.३१
(वर्षाकालाचे वर्णन) ज्यांच्याकडून गंभीर आणि मोठा शब्द उच्चारला जात आहे, अशी ही विद्युल्लतारूप पताकांनी शोभणारी मेघांची रूपें युद्धार्थ उत्सुक झालेल्या वानरांसारखीं शोभत आहेत.
१५४ ततः सुमन्त्रेण गुहेन चैव
समीयतू राजसुतावरण्ये ।
दिवाकरश्चैव निशाकरश्च
यथाम्बरे शुक्रबृहस्पतिभ्याम् ॥ २.९९.४१
(भरत शत्रुघ्न वनामध्ये असलेल्या रामाला भेटले) नंतर सूर्य आणि चंद्र हे जसे आकाशांत शुक्राणि बृहस्पति यांच्याशी संयुक्त होतात (भेटतात), त्याप्रमाणे ते राजपुत्र - रामलक्ष्मण - अरण्यांत सुमंत्र (प्रधान) आणि गुह यांना भेटले.
१५५ तदद्भुतं स्थैर्यमेवक्ष्य राघवे
समं जनो हर्षमवाप दुःखितः ।
न यात्ययोध्यामिति दुःखितोऽभवत्
स्थिरप्रतिज्ञत्वमवेक्ष्य हर्षितः ॥ २.१०६.३४
रामाच्या आंगचें (पितृवचनपालनरूप) अद्भुतं स्थैर्य पाहुन लोकांना दुःख झालें, तसाच हर्षही झाला. रामचंद्र अयोध्येला येत नाही, म्हणून दुःख झाले, त्याप्रमाणे त्याच्या प्रतिज्ञेची स्थिरता पाहून त्यांना हर्ष झाला.
१५६ तद्ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकाङ्क्षितम् ।
करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते ॥ २.१८.३०
(राम म्हणतो) देवि (कैकेयि,) राजाच्या मनांत जो काही अभिप्राय असेल, तो सांग. राम कधीही (परस्परविरुद्ध) दोनदा बोलत नसतो.
१५७ तन्मे दहति गात्राणि विषं पीतमिवाशये ।
हा नाथेति प्रिया सा मां ह्रीयमाणा यदब्रवीत् ॥ ६.५.७
(राम लक्ष्मणाला म्हणतो) उदरामध्ये विष घेतले असता तें ज्याप्रमाणे गात्रे दग्ध करून टाकिते, त्याप्रमाणे रावण हरण करून नेत असतांना ``हे नाथ'' असें जें ती सीता मला उद्देशून म्हणाली ते म्हणणे माझी गात्रे दग्ध करीत आहे.
१५८ तपते यजते चैव यच्च दानं प्रयच्छति ।
क्रोधेन सर्व हरति तस्मात्क्रोधं विसर्जयेत् ॥ ७.५९ प्र. २.२२
मनुष्य जें कांहीं तप करितो, यजन करितो, अथवा दान देतो, त्या सर्वांचा क्रोध नाश करितो; म्हणून क्रोधाचा त्याग करावा.
१५९ तपो हि परमं श्रेयः संमोहमितरत्सुखम् ॥ ७.८४.९
तप हें परम कल्याण करणारे आहे; इतर सुख मोह पाडणारे आहे.
१६० तीक्ष्णकामास्तु गन्धर्वास्तीक्ष्णकोपा भुजङ्गमाः ।
मृगाणां तु भयं तीक्ष्णं ततस्तीक्ष्णक्षुधा वयम् ॥ ४.५९.९
(गृधराज संपाति वानरांना म्हणतो) ज्याप्रमाणे गंधर्वांची कामवासना तीक्ष्ण असते, सर्पाचा क्रोध तीक्ष्ण असतो आणि मृगांचे भय तीक्ष्ण असते त्याप्रमाणे आम्हां गृध्रपक्ष्यांची क्षुधा तीक्ष्ण असते.
१६१ तीक्ष्णमल्पप्रदातारं प्रमत्तं गर्वितं शठम् ।
व्यसने सर्वभूतानि नाभिधावन्ति पार्थिवम् ॥ ३.३३.१५
जो (आपल्या प्रधानादिकांशी) कठोरपणाने वागतो, त्यांस वेतन वगैरे स्वल्प प्रमाणाने देतो, जो उन्मत्तपणे वागतो, गर्व धारण करितो, गुप्तपणे लोकांचे अहित करितो, अशा राजावर संकट आले असता, त्याच्या संरक्षणाकरितां कोणीही (त्याचे स्वजनहीं) धावून येत नाहीत.
१६२ त्वद्विधा न हि शोचन्ति सततं सर्वदर्शनाः ।
सुमहत्स्वपि कृच्छ्रेषु रामानिर्विण्णदर्शनाः ॥ ३.६६.१४
(लक्ष्मण म्हणतो) हे रामा, तुझ्यासारखे सर्वज्ञानसंपन्न लोक, केवढीही मोठी संकटे आली, तरी विषादरहित असतात. कधीही शोक करीत नाहीत.
१६३ त्वं तु बालस्वभावश्च बुद्धिहीनश्च राक्षस ।
ज्ञातव्यं तं न जानीषे कथं राजा भविष्यसि ॥ ३.३३.८
(शूर्पणखा रावणाला म्हणते.) हे राक्षसा, तुझा बालस्वभाव अजून गेला नाही. तूं बुद्धिहीन आहेस. जे जाणण्यास योग्य ते तूं जाणत नाहीस. तूं राजा कसा होणार !
१६४ त्वं पुनर्जम्बुकः सिंही मामिहेच्छसि दुर्लभाम् ।
नाहं शक्या त्वया स्प्रष्टुमादित्यस्य प्रभा यथा ॥ ३.४७.३७
(सीता रावणाला म्हणते) तूं तर कोल्हा असून दुर्लभ अशा सिंहपत्नीची माझी इच्छा करीत आहेस, सूर्यापासून सूर्यप्रभा वेगळी करून स्पर्श करणे जसे शक्य नाही, त्याप्रमाणे तूं मला स्पर्श करणे ही गोष्ट शक्य नाही.
१६५ दण्ड एव परो लोके पुरुषस्येति मे मतिः ।
धिक्क्षमामकृतज्ञेषु सान्त्वं दानमथापि वा ॥ ६.२२.४६
(नल वानर रामाला म्हणतो अकृतज्ञ अनुपकारी पुरुषाला) दंड करणे, ही गोष्ट पुरुषाची मोठी कार्यसिद्धि घडवून आणणारी आहे, असे मला वाटते. कृतघ्नाला क्षमा करणे, सामोपचाराच्या गोष्टी सांगणे, किंवा दान करणे, हे धिक्कारास्पद आहे.
१६६ दद्यान्न प्रतिगृह्णीयात्सत्यं ब्रूयान्न चानृतम् ।
अपि जीवितहेतोर्हि रामः सत्यपराक्रमः ॥ ५.३३.२५
(लंकेमध्ये अशोक वनांत सीता दृष्टीस पडल्यावर तिच्यापुढे मारुतीने श्रीरामचंद्राचे गुण वर्णन केले) सत्यपराक्रमी राम दान करील. प्रतिग्रह करणार नाही सत्यभाषण करील, असत्य बोलणार नाही. किंबहुना जीविताचाही त्याग करील, परंतु सत्य सोडणार नाही.
१६७ दीनो वा राज्यहीनो वा यो मे भर्ता स मे गुरुः ।
तं नित्यमनुरक्तास्मि यथा सूर्यं सुवर्चला ॥ ५.२४.९
(सीता रावणाला म्हणते) माझा भर्ता, मग तो दीन असो, अगर राज्यहीन असो, तो मला पूज्य आहे. ज्याप्रमाणे सूर्यपत्नी सुवर्चला सूर्याचे ठिकाणीं अनुरक्त असते, त्याप्रमाणे मी नेहमी त्या रामाचेच ठिकाणीं अनुरक्त आहे.
१६८ दीप्तमग्निमरण्यं वा यदि रामः प्रवेक्ष्यति ।
प्रविष्टं तत्र मां देवि त्वं पूर्वमवधारय ॥ २.११.७
(लक्ष्मण कौसल्येला म्हणतो) हे देवि, प्रज्वलित अग्नीत, अथवा अरण्यांत जर राम प्रवेश करील, तर त्याच्या आधीच मी त्या ठिकाणी प्रवेश करीन हे तूं पक्कं समज.
१६९ दुःखितः सुखितो वापि सख्युर्नित्यं सखा गतिः ॥ ४.८.४०
दुःखी असो, अगर सुखी असो, मित्राला मित्रच गति होय.
१७० दुःखे मे दुःखमकरोर्व्रणे क्षारमिवाददाः ।
राजानं प्रेतभावस्थं कृत्वा रामं च तापसम् ॥ २.७३.३
(भरत कैकेयीला म्हणतो) राजाला ठार मारून व रामाला तपस्वी करवून, व्रणावर क्षाराचें सिंचन करावे, त्याप्रमाणे तूं माझ्या दुःखावर दुःखाची डागणी दिली आहेस.
१७१ दुर्बलस्य त्वनाथस्य राजा भवति वे बलम् ॥ ७.५९ प्र.३.२२
दुर्बल व अनाथ यांचे बल म्हंटले म्हणजे राजा होय.
१७२ दुर्लभं हि सदा सुखम् ॥ २.१८.१३
नेहमी सुख मिळणे म्हणजे दुर्लभ आहे.
१७३ दुर्लभस्य च धर्मस्य जीवितस्य शुभस्य च ।
राजानो वानरश्रेष्ठ प्रदातारो न संशयः ॥ ४.१८.४२
(राम वालीला म्हणतो) हे वानरश्रेष्ठा, दुर्लभ धर्म, जीवित आणि कल्याण यांची (प्रजेला) प्राप्ति करून देणारे राजेच आहेत. यांत संशय नाही.
१७४ दुःशीलः कामवृत्तो वा धनैर्वा परिवर्जितः ।
स्त्रीणामार्यस्वभावानां परमं दैवतं पतिः ॥ २.११७.२४
वाईट आचरणाचा, स्वेच्छाचारी किंवा धनहीन असा जरी पति असला, तरी तो सुस्वभावी स्त्रियांना परम दैवतच होय.
१७५ दृश्यमाने भवेत्प्रीतिः सौहृदं नास्त्यदृश्यतः ।
नाशयन्ति कृतघ्नास्तु न रामो नाशयिष्यति ॥ ५.२६.३९
(लंकेमध्ये कारागृहांत पडलेली सीता विचार करते) दृष्टीसमोर असलेल्या मनुष्याचे ठिकाणी प्रेम कायम असते. तेंच मनुष्य दृष्टीआड झाले असता त्याच्यासंबंधाने प्रेम कायम रहात नाही. परंतु (सांप्रत असेंही म्हणता येणार नाही.) कारण कृतघ्न पुरुष दृष्टीआड झालेल्या मनुष्यावरील प्रेम नाहींसें करतात, तसें राम करणार नाही.
१७६ दृष्टपूर्वं न ते रूपं पादौ दृष्टौ तवानघे ।
कथमत्र हि पश्यामि रामेण रहितां वने ॥ ७.४८.२२
(``तूं माझ्याकडे समक्ष बघून जा'' असे सीतेने लक्ष्मणाला सांगितले असतां लक्ष्मण सीतेला म्हणतो) हे निष्पापे (सीते,) तुझें रूप मी पूर्वी पाहिलेले नाही. तुझे चरण मात्र मी पाहिलेले आहेत. ह्या वनांत राम संनिध नसतांना मी तुझ्याकडे कसा बरे पाहूं?
१७७ दृष्टा देवीति हनुमद्वदनादमृतोपमम् ।
आकर्ण्य वचनं रामो हर्षमाप सलक्ष्मणः ॥ ५.६४.४३
हनुमंताच्या तोंडून आपण देवी (सीता) पाहिली, असें अमृततुल्य वचन ऐकून लक्ष्मणाला व रामाला परम हर्ष झाला. (आनंदाची वार्ता लौकर समजावी, अशी सर्वांना स्वाभाविक उत्सुकता असते, म्हणून मारुतीने वाक्य उच्चारतांना देखील त्यांतल्या त्यांत जो महत्त्वाचा शब्द ``दृष्टा'' हाच आरंभी उच्चारला आहे.)
१७८ देशकालविहीनानि कर्माणि विपरीतवत् ।
क्रियमाणानि दुष्यन्ति हवींष्यप्रयतेष्विव ॥ ६.६३.६
अयोग्य ठिकाणी व अयोग्यवेळी घडणारी विपरीतकर्मे असंस्कृत अग्नीमध्ये टाकलेल्या हविर्द्रव्याप्रमाणे दुःखाला कारणीभूत होतात.
१७९ देशे देशे कलत्राणि देशे देशे च बान्धवाः ।
तं तु देशं न पश्यामि यत्र भ्राता सहोदरः ॥ ६.१०१.१४
किंतु राज्येन दुर्धर्ष लक्ष्मणेन विना मम ।
कथं वक्ष्याम्यहं त्वम्वां सुमित्रां पुत्रवत्सलाम् ॥ ६.१०१.१५
(युद्धामध्ये रावणाने लक्ष्मणाला पाडिले असतां राम शोक करितो.) ठिकठिकाणी भार्या आहेत व ठिकठिकाणी बांधवही आहेत; परंतु लक्ष्मणासारखा भ्राता कोठे दृष्टीस पडेल असें मला वाटत नाही. हे अजिंक्य, तुज लक्ष्मणावांचून मला राज्याशी काय कर्तव्य आहे? पुत्रवत्सल सुमित्रा मातेला मी आतां काय बरें सांगू?
१८० दैवतं हि पतिः स्त्रियाः ॥ ७.९५.१०
स्त्रीचे दैवत म्हणजे पति होय.
१८१ दैवं पुरुषकारेण यः समर्थः प्रबाधितुम् ।
न दैवेन विपन्नार्थः पुरुषः सोऽवसीदति ॥ २.२३.१८
जो पुरुष आपल्या पराक्रमाने दैवाचा निरास करण्यास समर्थ असतो, त्याचा दैवाने कार्यनाश झाला, तरी तो खचून जात नाही.
१८२ द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित् ।
एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः ॥ ६.३६.११
(रावण माल्यवान राक्षसाला म्हणतो) प्रसंग पडल्यास माझ्या (कळकाप्रमाणे) दोन चिरफळ्याही होऊन जातील परंतु मी कोणाच्याही पुढे नम्र होणार नाही. हा माझा स्वाभाविक दोष आहे. परंतु स्वभाव पालटतां येणे अशक्य आहे.
१८३ धनत्यागः सुखत्यागो देशत्यागोऽपि वानघ ।
वयस्यार्थे प्रवर्तन्ते स्नेहं दृष्ट्वा तथाविधम् ॥ ४.८.९
(सुग्रीव रामाला म्हणतो) हे निष्पापा, तशा प्रकारचा स्नेह पाहून, त्या स्नेह्याकरितां द्रव्याचा, सुखाचा किंवा देशाचाही त्याग केला जातो.
१८४ धन्याः खलु महात्मानो ये बुद्ध्या कोपमुत्थितम् ।
निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवाम्भसा ॥ ५.५५.३
प्रदीप्त झालेला अग्नि ज्याप्रमाणे उदकाने विझवून टाकितात, त्याप्रमाणे उत्पन्न झालेला क्रोध जे महात्मे आपल्या बुद्धीनें नाहींसा करतात ते खरोखर धन्य होत.
१८५ धर्ममर्थं च कामं च काले यस्तु निषेवते ।
विभज्य सततं वीर स राजा हरिसत्तम ॥ ४.३८.२१
(राम सुग्रीवाला म्हणतो) हे वानरश्रेष्ठ वीरा, जो धर्म, अर्थ आणि काम यांचे कालविभागाने त्या त्या काळी सेवन करितो तोच (खरा) राजा होय.
१८६ धर्मलोपो महांस्तावत्कृते ह्यप्रतिकुर्वतः ।
अर्थलोपश्च मित्रस्य नाशे गुणवतो महान् ॥ ४.३३.४७
उपकाराबद्दल प्रत्युपकार न करणाऱ्याच्या हातून मोठा धर्मलोप होतो. त्यामुळे गुणवान मित्राच्या मैत्रीचा नाश होऊन मोठी अर्थहानिही होते.
१८७ धर्मात्प्रच्युतशीलं हि पुरुषं पापनिश्चयम् ।
त्यक्त्वा सुखमवाप्नोति हस्तादाशीविषं यथा ॥ ६.८७.२२
हातांतून सर्पास टाकिलें असतां जसे सुख होते, त्याचप्रमाणे धर्मभ्रष्ट पापमति पुरुषाचा त्याग केला असतां सुख होते.
१८८ धर्मादर्थः प्रभवति धर्मात्प्रभवते सुखम् ।
धर्मेण लभते सर्वं धर्मसारमिदं जगत् ॥ ३.९.३०
धर्मापासून अर्थलाभ होतो, धर्मापासून सुख होते. धर्मापासून सर्व काही प्राप्त होते. हे जग म्हणजे धर्माच्या आश्रयावर आहे.
१८९ धर्मेण राष्ट्र विन्देत धर्मेणैवानुपालयेत् ।
धर्माच्छरण्यतां याति राजा सर्वभयापहः ॥ ७.९५ प्र.२.१५
धर्माने राजाला राष्ट्र प्राप्त होत असून धर्माच्याच योगाने तो प्रजेचे परिपालन करण्यास समर्थ होतो. धर्माच्याच योगाने राजा सर्व भयांचे निवारण करणारा होत असल्यामुळे शरण जाण्यास तो योग्य होत असतो.
१९० धर्मो हि परमो लोके धर्मे सत्यं प्रतिष्ठितम् ॥ २.२१.४१
लोकांमध्ये धर्म हा अत्यंत श्रेष्ठ आहे, आणि धर्माच्याच ठिकाणी सत्य प्रतिष्ठित आहे.
१९१ धर्मो हि श्रूयते पक्ष अमराणां महात्मनाम् ।
अधर्मो रक्षसां पक्षो ह्यसुराणां च राक्षस ॥ ६.३५.१४
(मातामह माल्यवान रावणाला म्हणतो) हे राक्षसा, धर्म हा महात्म्या देवांचा पक्ष आहे, आणि अधर्म हा राक्षस आणि असुर यांचा पक्ष आहे, असें ऐकण्यांत येते.
१९२ धर्षितं मर्षणीयं च चेष्टितं कृतकर्मणाम् ॥ ५.६३.३०
(सुग्रीव दधिमुखाला म्हणतो. सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेल्या वानरांनी मधुवन फस्त करून टाकिलें.) हे वानर कृतकार्य असल्यामुळे, त्यांची दांडगाई आणि त्यांच्या चेष्टा क्षम्य आहेत.
१९३ धारणाद्धर्ममित्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।
यस्माद्धारयते सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ॥ ७.५९ प्र.२.७
धारणामुळे ``धर्म'' असे नांव प्राप्त झाले आहे. प्रजा धर्माने धारण केल्या जातात, याच कारणास्तव सर्व स्थावरजंगम त्रैलोक्याचं धारण धर्म करीत असतो.
१९४ धारणाद्विद्विषां चैव धर्मेणारञ्जयन्प्रजाः ।
तस्माद्धारणमित्युक्तं स धर्म इति निश्चयः ॥ ७.५९ प्र.२.८
शत्रुचे - अधर्माचें - नियमन करून व न्यायाला अनुसरून धर्म, प्रजांचे अनुरंजन करीत असतो. असा जो धर्म त्यासच ``धारण'' असें निश्चित म्हंटले आहे.
१९५ धिगस्तु परवश्यताम् ॥ ५.२५.२०
परवशतेला धिक्कार असो.
१९६ धिगस्तु योषितो नाम शठाः स्वार्थपरायणाः ।
न ब्रवीमि स्त्रियः सर्वा भरतस्यैव मातरम् ॥ २.१२.१००
(दशरथ म्हणतो) ज्या स्वार्थपरायण लबाड स्त्रिया आहेत, त्यांना धिक्कार असो. सर्व स्त्रियांविषयी मी बोलत नाही. भरताच्या मातेला मात्र माझं बोलणे लागू आहे.
१९७ धुरमेकाकिनां न्यस्तां वृषभेण बलीयसा ।
किशोरवद्गुरुं भारं न वोढुमहमुत्सहे ॥ ६.१२८.३
(भरत रामाला म्हणतो) ज्याप्रमाणे एकाद्या बलिष्ठ बैलाने आपल्या खान्द्यावरील जोखडाचा मोठा भार (जवळील) कोवळ्या गोह्यावर लादला असता तो त्या वत्साच्याने वाहवत नाही, तसा मी हा मोठा राज्यभार वाहण्यास उत्साह पावत नाही.
१९८ धृतिप्रवालः प्रसभाग्र्यपुष्प-
स्तपोबलः शौर्यनिबद्धमूलः ।
रणे महानाक्षसराजवृक्षः
संमर्दितो राघवमारुतेन ॥ ६.१०९.१०
(रणाङ्गणान्त रावण मरून पडल्यानन्तर विभीषण म्हणतो) धैर्य हेच ज्याचे कोमल पल्लव, हट्ट हेच ज्याचें उत्कृष्ट पुष्प, तप हेच ज्याचे बल आणि शौर्य हेच ज्याचे खोल गेलेले मूळ, असा राक्षसराजरूप प्रचण्ड वृक्ष रणामध्ये रामरूप वायूनें उलथून पाडिला.
१९९ न कश्चिन्नापराध्यति ॥ ४.३६.११
ज्याच्याकडून अपराध घडत नाही, असा कोणी नाही.
२०० न कालस्यास्ति बन्धुत्वं न हेतुर्न पराक्रमः ।
न मित्रज्ञातिसम्बन्धः कारणं नात्मनो वशः ॥ ४.२५.७
कालाला बंधुत्व नाही, त्याला कोणत्याही कारणाची गरज लागत नाही; त्याला फिरविण्यास पराक्रम समर्थ होत नाही, मित्र व ज्ञातिजन यांचा संबंधही त्याला लागत नाही, तो कोणाच्याही अधीन राहत नाही.
२०१ न कालादुत्तरं किञ्चित्परं कर्म उपासितुम् ॥ ४.२५.३
वेळ निघून गेली म्हणजे कोणतेही सत्कर्म करितां येत नाही.
२०२ न कुलेन न रूपेण न दाक्षिण्येन मैथिली ।
मयाधिका वा तुल्या वा तत्तु मोहान्न बुध्यसे ॥ ६.११.२८
(मरण पावलेल्या रावणाकडे पाहून त्याची स्त्री मंदोदरी विलाप करते) कुलाने, रूपाने अथवा सरळस्वभावाने सीता माझ्यापेक्षा जास्त नाही, इतकेच नव्हे, तर माझ्या बरोबरीचीही नाही; परंतु मोहामुळे तुला या गोष्टीचा उमज पडला नाही.
२०३ न खल्वद्यैव सौमित्रे जीवितं जाह्नवीजले ।
त्यजेयं राजवंशस्तु भर्तुर्मे परिहास्यते ॥ ७.४८.८
(सीता म्हणते) हे लक्ष्मणा, गंगेच्या पाण्यांत मी आज प्राणत्याग करीत नाही. तसे केल्यास (मी गर्भवती असल्याकारणाने) पतीचा राजवंश नष्ट होईल.
२०४ नखैस्तुदन्तो दशनैर्दशन्त
स्तलेश्च पादैश्च समापयन्तः ।
मदात्कपि ते कपयः समन्ता-
न्महावनं निर्विषयं च चक्रुः ॥ ५.६.२४
(सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले वानर दधिमुखाने रक्षण केलेल्या मधुवनांत शिरले व त्याला न जुमानतां तेथे त्यांनी धुमाकूळ घातला.) काही जण नखांनी त्या दधिमुखाचे बोचकारे काढू लागले, काहीजण दांतांनी त्याला चावू लागले, आणि काहीजण चपराकांनी व लाथांनी त्याला मृतप्राय करूं लागले. असो. अशा रीतीने मद चढल्यामुळे त्या वानरांनी त्या सर्व महावनांतील यत्किंचितही योग्य वस्तु शिल्लक ठेविली नाही.
२०५ न च कर्मसु सीदन्ति महत्स्वमिततेजसः ॥ ५.६८.१९
महातेजस्वी लोक मोठ्या कामांत कधीही श्रम पावत नाहीत. (खचून जात नाहीत.)
२०६ न च पश्यामि सदृशं पृथिव्यां तव किञ्चन ।
सदृशं यत्प्रियाख्याने तव दत्त्वा भवेत्सुखम् ॥ ६.११३.१९
(रामाने रावणाचा वध केला ही आनंदाची वार्ता मारुतीच्या मुखांतून ऐकल्यावर सीता म्हणते हे मारुते,) तूं जी प्रियवार्ता कथन केलीस, त्याबद्दल योग्य देणगी तुला देऊन सुख पावेन, अशी एकही वस्तु पृथ्वीवर मला दिसत नाही.
२०७ न च सीता त्वया हीना न चाहमपि राघव ।
मुहूर्तमपि जीवावो जलान्मत्स्याविवोद्धृतौ ॥ २.३५.३१
(लक्ष्मण म्हणतो) हे राघवा, उदकांतून बाहेर काढलेले मासे ज्याप्रमाणे जिवंत राहणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे तुझा वियोग झाला असतां, सीतेला अथवा मला थोडावेळही जिवंत राहणे अशक्य आहे.
२०८ न चातिप्रणयः कार्यः कर्तव्योऽप्रणयश्च ते ।
उभयं हि महादोषं तस्मादन्तरदृग्भव ॥ ४.२२.२३
(सुग्रीवाबरोबर कसे वागावे याविषयी मरणोन्मुख वाली आपल्या अंगद पुत्राला उपदेश करतो.) सुग्रीवाशी तूं अति लगटपणाही करूं नकोस, व तुटकपणानेही वागू नकोस; कारण ही दोन्ही मोठी अनर्थावह आहेत. म्हणून तूं मध्यम मार्गाकडे लक्ष देऊन वागत जा.
२०९ न चिरं पापकर्माणः क्रूरा लोकजुगुप्सिताः ।
ऐश्वर्यं प्राप्य तिष्ठन्ति शीर्णमूला इव द्रुमाः ॥ ३.२९.७
ज्यांची मुळे छिन्न झाली आहेत, असे वृक्ष वाचत नाहीतः त्याप्रमाणे जे कर असून पापकर्मे करणारे असतात, व तेणेकरून लोकनिंदेस पात्र झालेले असतात, त्यांस ऐश्वर्य प्राप्त झाले, तरी त्याचा ते चिरकाल उपभोग घेऊ शकत नाहीत.
२१० न चिरात्प्राप्यते लोके पापानां कर्मणां फलम् ।
सविषाणामिवान्नानां भुक्तानां क्षणदाचर ॥ ३.२९.९
(राम खर राक्षसाला म्हणतो) हे निशाचरा, भक्षण केलेल्या सविष अन्नाचे फल प्राप्त होण्यास जसा फार वेळ लागत नाही, तसा जगामध्ये पापकर्माचे फळ प्राप्त होण्यास फार वेळ लागत नाही.
२११ न तत्कुर्यादसिस्तीक्ष्णः सर्पो वा व्याहतः पदा ।
अरिर्वा नित्यसङ्क्रुद्धो यथात्मा दुरनुष्ठितः ॥ ७.५९ प्र.२.२५
कुमार्गाला लागलेलें मन ज्याप्रमाणे घात करते, त्याप्रमाणे तीक्ष्ण खड्ग, शेपटीवर पाय दिलेला सर्प किंवा नेहमी क्रुद्ध असलेला शत्रुदेखील घात करीत नाही.
२१२ न तत्समाचरेद्धीरो यत्परोऽस्य विगर्हयेत् ।
यथात्मनस्तथान्येषां दारा रक्ष्या विमर्शनात् ॥ ३.५०.८
(जटायु रावणाला म्हणतो) दुसरा ज्याला नांव ठेवील तें कर्म विचारी पुरुषाने कधीही करूं नये. आपल्या स्त्रीप्रमाणेच परस्त्रीचेही परपुरुषाच्या स्पर्शापासून रक्षण केले पाहिजे.
२१३ न तं पश्याम्यहं लोके परोक्षमपि यो नरः ।
स्वमित्रोऽपि निरस्तोऽपि योऽस्य दोषमुदाहरेत् ॥ २.२१.५
(लक्ष्मण कौसल्येला म्हणतो) अपमान करून सोडलेला हाडवैरी जरी झाला, तरी रामाच्या मागेंसुद्धा त्याचा दोष काढणारा पुरुष या जगतामध्ये कोणी असेलसा मला दिसत नाही.
२१४ न तु सद्योविनीतस्य दृश्यते कर्मणः फलम् ।
कालोऽप्यङ्गीभवत्यत्र सस्यानामिव पक्तये ॥ ३.४९.२७
बेफामपणे केलेल्या कृत्याचे फळ ताबडतोब दृष्टीस पडत नाही. कारण धान्ये परिपक्व होण्यास ज्याप्रमाणे कालाची अपेक्षा आहे।. त्याप्रमाणे कर्माचे फल प्राप्त होण्यास कालाची अपेक्षा आहे.
२१५ न ते मनुष्या देवास्ते ये चारु शुभकुण्डलम् ।
मुखं द्रक्ष्यन्ति रामस्य वर्षे पञ्चदशे पुनः ॥ २.६४.६८
(मरणोन्मुख दशरथराजा म्हणतो) रामचंद्राचे सुंदर कुंडलमंडित मनोहर मुख पंधराव्या वर्षी जे पुनः पाहातील, ते मनुष्य नव्हेत, तर साक्षात् देव होत.
२१६ न त्वां पश्यामि कौसल्ये साधु मां पाणिना स्पृश ।
राम मेऽनुगता दृष्टिरद्यापि न निवतेते ॥ २.४२.३४
(राम वनवासाला गेल्यामुळे दुःखी झालेला दशरथराजा मध्यरात्री कौसल्येला म्हणतो.) हे कौसल्ये, तूं मला दिसत नाहीस. तूं मला आपल्या हस्ताने स्पर्श कर बरें ! माझी दृष्टि रामाच्या बरोबर गेली आहे, ती त्यापासून निवृत्त होत नाही.
२१७ न त्वेवानागते काले देहाच्यवति जीवितम् ॥ २.३९.५
काल प्राप्त झाल्याशिवाय देहापासून जीवित नष्ट होत नाही.
२१८ न दूतवध्यां प्रवदन्ति सन्तो ।
दूतस्य दृष्टा बहवो हि दण्डाः ॥ ५.५२.१४
दूताचा वध करण्यास सज्जनांनी सांगितले नाही. दूताला इतर दंड सांगितले आहेत.
२१९ न देशकालौ हि यथार्थधर्मा ।
ववेक्षते कामरतिर्मनुष्यः ॥ ४.३३.५५
कामासक्त झालेल्या मनुष्याला देशकालांचे भान राहात नाहीं आणि तो धर्म व अर्थ या पुरुषार्थांचीही पर्वा करीत नाही.
२२० न नूनं चात्मनः श्रेयः पथ्यं वा समवेक्षसे ।
मृत्युकाले यथा मर्त्यो विपरीतानि सेवते ॥ ३.५३.१७
(सीता रावणाला म्हणते) स्वतःला कोणती गोष्ट तात्काल किंवा परिणामी सुखावह होणारी आहे, याचा विचार तूं खरोखर मुळीच करीत नाहीस. मृत्यु समीप आलेला मनुष्य ज्याप्रमाणे विपरीत कृत्यांचे अवलंबन करूं लागतो, त्याप्रमाणे तूं करीत आहेस.
२२१ नन्दन्त्युदित आदित्ये नन्दन्त्यस्तमितेऽहनि ।
आत्मनो नावबुध्यन्ते मनुष्या जीवितक्षयम् ॥ २.१०५.२४
सूर्योदय झाला असतां मनुष्ये आनंदित असतात, आणि दिवस अस्ताला गेला असतांही आनंदीच असतात. परंतु आपल्या जीविताचा क्षय होत आहे, हे त्यांना समजत नाही.
२२२ न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति ।
एवमेव नरव्याघ्रः परलीढं न मन्यते ॥ २.६१.१६
(कौसल्या दशरथाला म्हणते) ज्याप्रमाणे व्याघ्र दुसन्याने आणिलेले भक्ष्य खाण्याची इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे श्रेष्ठ पुरुष दुसऱ्याचे उष्टे कधी घेत नाही.
२२३ न पापानां वधे पापं विद्यते शत्रुसूदन ॥ ५.५२.११
(रावण बिभीषणाला म्हणतो) हे शत्रुनाशका, पाप्याचा वध करण्यांत पाप कधीही लागत नाही.
२२४ न पिता नात्मजो वात्मा न माता न सखीजनः ।
इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गतिः सदा ॥ २.२७.६
(सीता रामाला म्हणते) इहलोकीं, आणि परलोकीही स्त्रियांस पिता, पुत्र, आत्मा (स्वतः ती,) माता, किंवा सख्या ह्यांतून एकही गति नसून त्यांची गति म्हणजे एक पतिच होय.
२२५ न पित्र्यमनुवर्तन्ते मातृकं द्विपदा इति ।
ख्यातो लोकप्रवादोऽयं भरतेनान्यथा कृतः ॥ ३.१६.३४
मनुष्ये पित्याच्या स्वभावाचे अनुकरण न करितां मातेच्या स्वभावाचे अनुकरण करितात, म्हणून लोकांत प्रसिद्धि आहे. ती भरताने खोटी करून दाखविली. (भरत कैकेयीच्या वळणावर गेला नाही.)
२२६ न बुद्धिपूर्वं नाबुद्धं स्मरामीह कदाचन ।
मातृणां वा पितुर्वाहं कृतमल्पं च विप्रियम् ॥ २.२२.८
(राम लक्ष्मणाला म्हणतो) मातांना अथवा पित्याला अप्रिय असलेली क्षुल्लकही गोष्ट समजून अथवा न समजून कधीही केल्याचे मला स्मरत नाही.
२२७ न मे दुःखं प्रिया दूरे न मे दुःखं हृतेति च ।
एतदेवानुशोचामि वयोऽस्या ह्यतिवर्तते ॥ ६.५.५
(राम लक्ष्मणाला म्हणतो) प्रिया दूर झाली म्हणून मी शोक करीत नाही किंवा तिचे शत्रूने हरण केले म्हणूनही मला दुःख नाहीं; परंतु हिचा आयुष्यकाल फुकट जात आहे, म्हणून मला दुःख होत आहे.
२२८ नयनाभ्यां प्रसुप्तो वा जागर्ति नयचक्षुषा ।
व्यक्तक्रोधप्रसादश्च स राजा पूज्यते जनैः ॥ ३.३३.२१
(शूर्पणखा रावणाला म्हणते) डोळे मिटून निजला तरी न्यायदृष्टि उघडी ठेवून जो जागत असतो, आणि योग्य ठिकाणींच ज्याचा क्रोध व कृपा ही व्यक्त होत असतात, त्याच राजाला लोक मान देत असतात.
२२९ न राज्यभ्रंशनं भद्रे न सुहृद्भिविनाभवः ।
मनो मे बाधते दृष्ट्वा रमणीयमिमं गिरिम् ॥ २.९४.३
(राम चित्रकूट पर्वताची शोभा सीतेला दाखवितो) हे कल्याणि, हा रमणीय पर्वत अवलोकन करून राज्यभ्रंश आणि सुहृदांचा वियोग यांच्या योगाने माझ्या मनाला पीडा होत नाही.
२३० नराम परदारान्स चक्षुर्भ्यामपि पश्यति ॥ २.७२.४८
(कैकेयी भरताला म्हणते) तो राम परस्त्रीकडे कधी डोळ्यांनी पहात देखील नाही.
२३१ नवमासधृतं गर्भं भास्करस्य गभस्तिभिः ।
पीत्वा रसं समुद्राणां द्यौः प्रसूते रसायनम् ॥ ४.२८.३
(माल्यवान् पर्वतावर राहात असतां राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) सूर्यकिरणांच्या योगाने समुद्राचे पाणी शोषून घेऊन (कार्तिकादि) नऊ महिनेपर्यंत धारण केलेला व रसायनाप्रमाणे लोकांच्या जीवनास कारण होणारा जलरूप गर्भ आकाशरूपी स्त्री टाकून देत आहे.
२३२ न वाक्यमात्रेण भवान्प्रधानो ।
न कत्थनात्सत्पुरुषा भवन्ति ॥ ६.७१.५९
(लक्ष्मण अतिकाय राक्षसाला म्हणतो) केवळ बडबड करण्याने तूं श्रेष्ठ होत नाहींस आणि फुशारक्या मारण्याने कोणी सत्पुरुषही होत नाहीत.
२३३ न विषादे मनः कार्य विषादो दोषवत्तरः ।
विषादो हन्ति पुरुषं बालं क्रुद्ध इवोरगः ॥ ४.६४.९
(समुद्र पाहून खिन्न झालेल्या वानरांना धीर देऊन अंगद म्हणतो) तुम्ही मनामध्ये खेद करूं नका, खेद हा फार वाईट आहे. कारण कुद्ध झालेला सर्प ज्याप्रमाणे बालकाचा घात करतो, त्याप्रमाणे खेद हा मनुष्याचा घात करितो.
२३४ न शक्तस्त्वं बलाद्धर्तुं वैदेहीं मम पश्यतः ।
हेतुभिर्न्यायायसंयुक्तैर्ध्रुवां वेदश्रुतीमिव ॥ ३.५०.२२
(जटायु रावणाला म्हणतो) ज्याप्रमाणे न्याययुक्त हेतूंनी (प्रमाणांनी) सनातन वेदश्रृतीस अन्यथा करणे शक्य नाही, (मीमांसकांपुढे सनातन वेदश्रुतीला हेत्वाभासांच्या योगानें भलतीकडे नेण्यास ज्याप्रमाणे शास्त्री समर्थ होत नाही) त्याप्रमाणे तूं माझ्या समक्ष बलात्काराने सीतेला हरण करण्याविषयी समर्थ होणार नाहीस.
२३५ न शेकुः समवस्थातुं निहते वाहिनीपतौ ।
सेतुबन्धं समासाद्य विशीर्णं सलिलं यथा ॥ ६.५८.५९
(प्रहस्त सेनापतीचा वध झाल्यावर राक्षसांची झालेली स्थिति) फुटलेल्या बंधाऱ्यापाशी येऊन पोचलेले पाणी ज्याप्रमाणे स्थिर राहण्यास समर्थ होत नाही, त्याप्रमाणे सेनापतीचा वध झाल्यावर ते राक्षस समरांगणामध्ये उभे राहण्यास समर्थ झाले नाहीत.
२३६ न शोकपरितापेन श्रेयसा युज्यते मृतः ॥ ४.२५.२
शोकसंतापामुळे मृताला कधीही सद्गति प्राप्त होत नाही.
२३७ न शोभार्थाविमौ बाहू न धनुर्भूषणाय मे ।
नासिराबन्धनार्थाय न शराः स्तम्भहेतवः ॥ २.२३.३१
अमित्रमथनार्थाय सर्वमेतच्चतुष्टयम् ॥ २.२३.३२
(लक्ष्मण रामाला म्हणतो) हे माझे बाहु कांहीं शोभेकरिता नाहीत, हे धनुष्य भूषण म्हणून मी बाळगिलेले नाही. ही तरवार मी काही कंबरेला बांधून ठेवण्याकरितांच घेतलेली नाही व हे बाण स्वस्थ पडून राहण्याकरितां मी धारण केलेले नाहीत. या सर्व चारीही वस्तु शत्रूचा नाश करण्याकरितांच आहेत.
२३८ नष्टं दृष्ट्वा नाभ्यनन्दन् विपुलं वा धनागमम् ।
पुत्रं प्रथमजं लब्ध्वा जननी नाप्यनन्दत ॥ २.४८.५
(वनात निघालेल्या रामाच्यामार्गे जाऊन परत आलेल्या लोकांची स्थिति.) नष्ट झालेली वस्तु सांपडली असता अथवा पुष्कळ द्रव्य मिळाले असतांही कोणाला आनंद होईनासा झाला व पहिल्याच खेपेस पुत्र झाला तरी मातेला आनंद होईनासा झाला.
२३९ न स क्षमः कोपयितुं यः प्रसाद्यः पुनर्भवेत् ।
पूर्वोपकारं स्मरता कृतज्ञेन विशेषतः ॥ ४.३२.२०
(हनुमान सुग्रीवाला म्हणतो) ज्याची पुनरपि कृपा संपादन करण्याचा प्रसंग यावयाचा असेल त्याला क्रोध आणणेच योग्य नाही. विशेषतः स्वतःवर पूर्वी झालेला उपकार स्मरणाऱ्या कृतज्ञ पुरुषाने तर ही गोष्ट करितांच उपयोगी नाही.
२४० न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः ।
मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः ॥ ६.१८.१५
(सर्व वानरमंडळीकडे पाहून राम लक्ष्मणाला म्हणतो) बाबारे, सर्वच भ्राते भरतासारखे नाहीत, पित्याचे सर्वच पुत्र माझ्यासारखे नाहीत किंवा तुमच्यासारखे मित्रही सर्वांना मिळत नाहीत.
२४१ न स सङ्कुचितः पन्था येन वाली हतो गतः ।
समये तिष्ठ सुग्रीव मा वालिपथमन्वगाः ॥ ४.३०.८१
(राम लक्ष्मणाला म्हणतो, तूं सुग्रीवाकडे जाऊन त्याला असें सांग की,) माझ्याकडून वध पावलेला वाली ज्या मार्गाने गेला, तो मागे कांहीं अगदी संकुचित नाही. (वाली जात असतांना तुलाही त्याच्या बरोबर जाता येईल, इतका तो मोठा आहे.) म्हणून आपल्या वचनाविषया खबरदार रहा. आणि वालीच्या मार्गाला जाऊ नकोस.
२४२ न साम रक्षस्सु गुणाय कल्पते
न दानमर्थोपचितेषु युज्यते ।
न भेदसाध्या बलदर्पिता जनाः
पराक्रमस्त्वेष ममेह रोचते ॥ ५.४१.३
(लंकेंत शिरल्यावर मारुति विचार करतो.) या राक्षसांचे ठिकाणीं सामाचा काही उपयोग होणार नाही. जे धनसंपन्न असतात, त्यांच्या ठिकाणी दानाचा उपयोग होत नाहीं; जे लोक बलाने गर्विष्ठ असतात. ते भेद उपायाने साध्य होत नसतात. (या राक्षसांना जिंकण्याकरितां) पराक्रमाचीच योजना करणे मला इष्ट वाटते.
२४३ न साम्ना शक्यते कीर्तिर्न साम्ना शक्यते यशः ।
प्राप्तुं लक्ष्मण लोकेस्मिञ्जयो वा रणमूर्धनि ॥ ६.२१.१६
(राम म्हणतो) हे लक्ष्मणा, सामोपायाने (देशांतरी) कीर्ति होत नाही, किंवा (स्वदेशीही) यश प्राप्त होत नाही. तसेच इहलोकी रणांगणावर जयही सामोपचाराने प्राप्त होत नाहीं.
२४४ न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा
वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् ।
नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत्सत्यं यच्छलेनानुविद्धम् ॥ ७.५९ प्र. ३.३३
जीमध्ये वृद्धमंडळी नाहीं, ती सभा नव्हे; जे धर्माला अनुसरून बोलत नाहीत ते वृद्ध नव्हेत; ज्यामध्ये सत्य नाहीं तो धर्म नव्हे; आणि ज्यांत कपट आहे, तें सत्य नव्हे.
२४५ न सुप्रतिकरं तत्तु मात्रा पित्रा च यत्कृतम् ॥ २.१११.९
आईबापांनी (पुत्रावर) केलेले उपकार फेडणे कधीही शक्य नाही.
२४६ न हि कञ्चन पश्यामो राघवस्यागुणं वयम् ॥ २.३६.२७
(सिद्धार्थ प्रधान दशरथाला म्हणतो) राघवाच्या ठिकाणी आम्हांला कोणताच दोष दिसून येत नाही.
२४७ न हि गन्धमुपाघ्राय रामलक्ष्मणयोस्त्वया ।
शक्यं सन्दर्शने स्थातुं शुना शार्दूलयोरिव ॥ ५.२१.३१
(सीता रावणाला म्हणते) कुत्रा वाघाच्या दृष्टीपुढे उभा राहणे जसे अशक्य आहे, त्याचप्रमाणे रामलक्ष्मणांची यत्किंचितही गंधवार्ता (सुगावा) लागतांच त्यांच्या दृष्टीसमोर राहणे तुला अशक्य आहे.
२४८ न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः ।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥ २.३७.२९
(वसिष्ठमुनि कैकेयीला म्हणतात) जेथें राम राजा नाही, तें (स्थल) कधीही राष्ट्र होणार नाहीं; आणि जेथें राम वास्तव्य करील, ते वनही राष्ट्र होईल.
२४९ न हि ते स्त्रीवधकृते घृणा कार्या नरोत्तम ॥ १.२५.१७
(विश्वामित्र रामाला ताटकेचा वध करण्याविषयी सांगतात) हे पुरुषश्रेष्ठा, स्त्रीवध करावा लागत आहे म्हणून तूं मनामध्ये दया आणूं नकोस.
२५० न हि धर्मविरुद्धेषु बह्वपायेषु कर्मसु ।
मूलघातिषु सज्जन्ते बुद्धिमन्तो भवद्विधाः ॥ ५.१.१८
(मारुति रावणाला म्हणतो) जी कृत्ये धर्माच्या विरुद्ध आहेत, ज्यांत अनेक अपाय आहेत, जी समूळ घात करणारी आहेत, त्या कृत्यांच्या ठिकाणी तुमच्यासारखे बुद्धिमंत लोक आसक्त होत नाहीत.
२५१ न हि धर्माभिरक्तानां लोके किञ्चन दुर्लभम् ॥ ७.१०.३३
जगांत धर्माच्या ठिकाणीं अनुरक्त असणाऱ्यांना कांहींच दुर्लभ नाही.
२५२ न हि प्रकृष्टाःप्रेष्यन्ते प्रेष्यन्ते हीतरे जनाः ॥ ५.३९.३९
(कार्याविषयी योजना करितांना) कनिष्ठ श्रेष्ठांना प्रेरणा करीत नसून श्रेष्ठच कनिष्ठांना प्रेरणा करितात.
२५३ न हि प्रतिज्ञां कुर्वन्ति वितथां सत्यवादिनः ।
लक्षणं हि महत्त्वस्य प्रतिज्ञापरिपालनम् ॥ ६.१०१.५१
सत्यवादी लोक आपली प्रतिज्ञा कधीही खोटी करीत नसतात. प्रतिज्ञेचे परिपालन करणे हेच मोठेपणाचे लक्षण होय.
२५४ न हि प्रेषयिता तात स्वामी प्रेष्यः कथञ्चन ॥ ४.६५.२२
(जांबवान् अंगदाला म्हणतो) बाबारे, जो प्रभु इतरांस (दूत म्हणून) पाठविणारा, तो दूतांनी पाठविण्यास योग्य - प्रेष्य - कदापि होणार नाही.
२५५ न ह्यतो धर्मचरणं किञ्चिदस्ति महत्तरम् ।
यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिया ॥ २.१९.२२
(राम कैकेयीला म्हणतो) पित्याची शुश्रूषा करणे, अथवा त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे यापेक्षा कोणतेही धर्माचरण श्रेष्ठ नाही.
२५६ न ह्यनिष्टोऽनुशास्यते ॥ ३.१०.२०
जो अप्रिय असेल त्याला कोणी हिताचा उपदेश करीत नसतो.
२५७ न ह्यबुद्धिं गतो राजा सर्वभूतानि शास्ति हि ॥ ४.२.१८
बुद्धिभ्रष्ट झालेला राजा सर्व प्रजांवर अंमल चालविण्यास समर्थ होत नाही.
२५८ न ह्यर्थास्तत्र तिष्ठन्ति न दारा न च बान्धवाः ।
सुप्रीतो भृत्यवर्गस्तु यत्र तिष्ठति राघव ॥ ७.६४.६
जेथें (शत्रु चालून आला असतां) संतुष्ट भृत्यवर्ग राहतो (उपयोगी पडतो) तेथें द्रव्य, स्त्रिया किंवा बांधव, हे रहात नाहीत (उपयोगी पडत नाहीत.)
२५९ न ह्येकः साधको हेतुः स्वल्पस्यापीह कर्मणः ।
यो ह्यर्थ बहुधा वेद स समर्थोऽर्थसाधने ॥ ५.४१.६
स्वल्पही कार्य साधण्याच्या कामी एकच हेतु पुरा होत नाही. ज्याला भरपूर साधनें माहीत आहेत, तोच कार्यसिद्धि करू शकतो.
२६० नाग्निरग्नौ प्रवर्तते ॥ ५.५५.२२
अग्नीस दग्ध करण्यास आग्नि प्रवृत्त होत नाही.
२६१ नाग्निर्नान्यानि शस्त्राणि न नः पाशा भयावहाः ।
घोराःस्वार्थप्रयुक्तास्तु ज्ञातयो नो भयावहाः ॥ ६.१६.७
(पद्मवनांत पूर्वी हत्तींनी म्हंटलेले श्लोक रावण बिभीषणाला सांगतो) अग्नि, इतर शस्त्रे आणि पाश ही आम्हांला भय उत्पन्न करणारी नाहीत, परंतु हे ऋर, स्वार्थसाधु भाऊबंद मात्र आम्हांला भयावह आहेत.
२६२ नातन्त्री विद्यते वीणा नाचक्रो विद्यते रथः ।
नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा ॥ २.३९.२९
वीणा जशी तारेवांचून वाजणे शक्य नाही, रथ जसा चक्रावांचून असणे शक्य नाही, तशी शतपुत्रवती स्त्री असली, तरी ती पतीवांचून सुख पावणार नाही.
२६३ नात्र कश्चिद्यथाभावं प्राणी समतिवर्तते ।
तेन तस्मिन्न सामर्थ्य प्रेतस्यास्त्यनुशोचतः ॥ २.१०५.२८
ह्या लोकी कोणीही प्राणी जन्ममरणांचें उलंघन करूं शकत नाही. (असें आहे तरी तो मृतास उद्देशून शोक करितो.) वस्तुतः ह्या शोक करणाऱ्याच्या आंगांत स्वजनावर येणारा मृत्यु टाळण्याचे सामर्थ्य नसतें.
२६४ नाददानं शरान्घोरान्विमुञ्चन्तं महाबलम् ।
न कार्मुकं विकर्षन्तं रामं पश्यामि संयुगे ॥ ३.३४.७
(शूर्पणखा रामाची हकीकत रावणाला सांगते) हा महाबलवान राम (भात्यांतून) घोर बाण केव्हां काढितो, केव्हां शत्रूवर सोडितो, तसेंच रणांगणावर धनुष्य केव्हां आकर्षण करितो, हे मला काहीच कळत नाही.
२६५ नाराजके जनपदे तूद्यानानि समागताः ।
सायाह्ने क्रीडितुं यान्ति कुमार्यो हेमभूषिताः ॥ २.६७.१७
अराजक देशामध्ये सुवर्णभूषणांनी भूषित झालेल्या कुमारिका एकत्र जुळून सायंकाळी बागांतून क्रीडा करण्यास जात नाहीत.
२६६ नाराजके जनपदे धनवन्तः सुरक्षिताः ।
शेरते विवृतद्वाराः कृषिगोरक्षजीविनः ॥ २.६७.१८
राजहीन देशांत धनवान लोक सुरक्षित नसतात. कृषि करणारे गोरक्षण करणारे लोकही दरवाजे उघडे टाकून निजू शकत नाहीत.
२६७ नाराजके जनपदे प्रहृष्टनटनर्तकाः ।
उत्सवाश्च समाजाश्च वर्धन्ते राष्ट्रवर्धनाः ॥ २.६७.१५
अराजक देशांत आनंदित नट व सूत्रधार ज्यामध्ये आहेत असे देवादिकांचे उत्सव व राष्ट्रोन्नतीला कारण होणारे समाज वृद्धिंगत होत नाहीत.
२६८ नाराजके जनपदे योगक्षेमः प्रवर्तते ॥ २.६७.२४
राजहीन देशांत लोकांचे योगक्षेम सुखाने चालत नाहीत.
२६९ नाराजके जनपदे स्वकं भवति कस्यचित ।
मत्स्या इव जना नित्यं भक्षयन्ति परस्परम् ॥ २.६७.३१
राजहीन देशांत कोणाचाही जीव स्वस्थ नसतो. मत्स्य जसे परस्परांचे भक्षण करीत असतात, तसेंच अशा देशांत लोक परस्परांस भक्षण करितात.
२७० नाहं जानामि केयरे नाहं जानामि कुण्डले ।
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥ ४.६.२२
(सीतेचे अलंकार ओळखण्यास सांगितले असता लक्ष्मण रामाला म्हणतो) सीतेची बाहुभूषणे मला ठाऊक नाहीत, व कुंडलेही माहीत नाहीत. परंतु नेहमी सीतेच्या पायां पडण्याचा प्रसंग येत असल्यामुळे तोरड्यांची मात्र मला ओळख पटत आहे.
२७१ नित्यमन्योन्यसंहृष्टा व्यसनेष्वाततायिनः ।
प्रच्छन्नहृदया घोरा ज्ञातयस्तु भयावहाः ॥ ६.१६.५
(रावण विभीषणाला म्हणतो ! एकमेकांच्या विपत्तीमध्ये आनंद मानून आपला आशय गुप्त ठेवणारे हे क्रूर आततायी (एकमेकांच्या घरावर अग्नि ठेवणारे) भाऊबंद फारच भयंकर आहेत.
२७२ निमित्तं लक्षणं स्वप्नं शकुनिस्वरदर्शनम् ।
अवश्यं सुखदुःखेषु नराणां परिदृश्यते ॥ ३.५२.२
सुखाचे किंवा दुःखाचे प्रसंग यावयाचे असल्यास स्वप्न अथवा पक्ष्यांचा स्वर असें कांहीं तरी सूचक चिन्ह मनुष्यांच्या दृष्टीस अवश्य येत असते.
२७३ नियुक्तैर्मन्त्रिभिर्वाच्यो ह्यवश्यं पार्थिवो हितम् ॥ ४.३२.१८
नियोजित मंत्र्यांनी राजाला हिताच्या गोष्टी अवश्य सांगाव्या.
२७४ निरायुधानां क्रमतामसङ्गगतिपौरुषाः ।
दारा ह्युपहसिष्यन्ति स वै घातः सुजीवताम् ॥ ६.६६.२०
(युद्धाचे वेळी पळत सुटणाऱ्या वानरांना अंगद म्हणतो.) तुमची गति व पराक्रम ही दोन्ही कोठेही कुंठित होणारी नसतांना आयुधांचा त्याग करून जर तुम्ही जाऊ लागला, तर तुमच्या बायकाही तुम्हाला हसतील आणि स्त्रियांनी उपहास करणे हा तर मानाने राहणाऱ्यांचा घातच होय.
२७५ निरुत्साहस्य दीनस्य शोकपर्याकुलात्मनः ।
सर्वार्था व्यवसीदन्ति व्यसनं चाधिगच्छति ॥ ६.२.६
निरुत्साह, दीन, शोकाने व्याकुल, अशा पुरुषांची सर्व कार्ये नाश पावतात, आणि त्यांजवर संकट कोसळतात.
२७६ नीत्या सुनीतया राजा धर्मं रक्षति रक्षिता ।
यदा न पालयेद्राजा क्षिप्रं नश्यन्ति वै प्रजाः ॥ ७.५९ प्र.२.२५
प्रजेचे रक्षण करणारा राजा उत्कृष्ट चालविलेल्या नीतीने धर्माचें रक्षण करीत असतो. राजा जेव्हां धर्माचे रक्षण करीनासा होतो तेव्हां प्रजेचा सत्वर नाश होतो.
२७७ नृशंसमनृशंसं वा प्रजारक्षणकारणात् ।
पातकं वा सदोषं वा कर्तव्यं रक्षता सदा ॥ १.२५.१८
ज्यास प्रजारक्षण करावयाचे आहे, त्याला त्या रक्षणाकरितां क्वचित् प्रसंगी थोडेसे क्रौर्याचे किंवा किंचित् पातक, अगर कांहीं सदोष कर्म करणे भाग पडले, तरी त्याने ते करावें.
२७८ नेयं मम मही सौम्य दुर्लभा सागराम्बरा ।
नहीच्छेयमधर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण ॥ २.९७.७
(राम म्हणतो) हे सौम्य लक्ष्मणा, ही सागररूप वस्त्र परिधान केलेली पृथ्वी मला दुर्लभ आहे, असें नाही. तथापि मी तिची इच्छा करीत नाही. अधर्माने इंद्रपद मिळाले, तरी त्याची मी इच्छा करीत नाही.
२७९ नैकान्तविजयो युद्धे भूतपूर्वः कदाचन ।
परैर्वा हन्यते वीरः परान्वा हन्ति संयुगे ॥ ६.१०९.१८
युद्धांत निश्चयात्मक जयच होतो, असें पूर्वी कधीही झाले नाही. वीरपुरुष रणांगणावर शत्रूकडून मारला जातो. किंवा शत्रूला मारितो.
२८० नैतच्चित्रं नरव्याघ्रे शीलवृत्तविदां वरे ।
यदार्यं त्वयि तिष्ठेत्तु निम्नोत्सृष्टमिवोदकम् ॥ २.११३.१६
(भरद्वाज मुनि म्हणतात हे भरता,) तूं नरश्रेष्ठ आणि उत्तम प्रकारचा शीलवृत्तज्ञ आहेस. तसेंच, तुझ्या ठिकाणी उत्तम चारित्र्य वसत आहे, त्यांत आश्चर्य नाही. टाकलेले पाणी खोलगट जागेतच रहात असते.
२८१ नैतच्छिथिलया बुद्धथा त्वं वेत्सि महदन्तरम् ।
क्व च स्वजनसंवासः क्व च नीचपराश्रयः ॥ ६.८७.१४
(इंद्रजित बिभीषणाला म्हणतो.) स्वजनासह वास्तव्य करणे कोणीकडे, आणि शत्रूच्या आश्रयाला राहून नीच बनणे कोणीकडे यांतील महदंतर तुझ्या कोत्या बुद्धीमुळे तुला समजत नाही.
२८२ नैवंविधमसत्कारं राघवो मर्षयिष्यति ।
बलवानिव शार्दूलो वालधेरभिमर्शनम् ॥ २.६१.१९
(कौसल्या दशरथाला सांगते, भरताने उपभोगिलेले राज्य राम स्वीकारणार नाही.) बलवान् व्याघ्र ज्याप्रमाणे पुच्छस्पर्श सहन करीत नाही, त्याप्रमाणे राम अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही.
२८३ नैषा हि सा स्त्री भवति श्लाघनीयेन धीमता ।
उभयोर्लोकयोर्लोके पत्या या सम्प्रसाद्यते ॥ २.६२.१३
स्वर्गलोक व मनुष्यलोक या दोहोंमध्ये स्तुत्य असलेल्या विचारी भर्त्याकडून जी स्त्री आपण प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करून घेते, ती स्त्री लोकामध्ये कुलीन म्हणून गणली जात नाही.
२८४ न्यस्तदण्डा वयं राजन् जितक्रोधा जितेन्द्रियाः ।
रक्षणीयास्त्वया शश्वद्गर्भभूतास्तपोधनाः ॥ ३.१.२२
(महर्षि रामाला म्हणतात.) हे राजा, आम्ही क्रोधसंयमन व इंद्रियदमन करून प्राण्यांचा निग्रह करण्याचे सोडिलें आहे. म्हणून माता ज्याप्रमाणे गर्भाचे रक्षण करिते, त्याप्रमाणे तुला आमचे रक्षण करणे अवश्य आहे.
२८५ पतिर्हि देवता नार्याः पतिर्बन्धुः पतिर्गुरुः ।
प्राणैरपि प्रियं तस्माद्भर्तुः कार्यं विशेषतः ॥ ७.४८.१८
पति ही स्त्रियांची देवता आहे. स्त्रियांचा बंधु आणि गुरुही तोच आहे. म्हणून भर्त्याचे प्रियकार्य प्राण खर्ची घालूनही विशेषेकरून त्यांनी करावें.
२८६ पतिशुश्रूषणान्नार्यास्तपो नान्यद्विधीयते ॥ २.११८.९
पतिशुश्रूषेपलीकडे स्त्रीला दुसरे कोणतेही तप नाही.
२८७ पद्ममातपसन्तप्तं परिक्लिष्टमिवोत्पलम् ।
काञ्चनं रजसा ध्वस्तं क्लिष्टं चन्द्रमिवाम्बुदैः ॥ २.१०४.२५
मुखं ते प्रेक्ष्य मां शोको दहत्यग्निरिवाश्रयम् ।
भृशं मनसि वैदेहि व्यसनारणिसम्भवः ॥ २.१०४.२६
(कौसल्या म्हणते.)हे सीते, उन्हाने संतप्त झालेले पद्म, चुरडलेले रक्तकमल, धुळीने मलिन झालेले सुवर्ण, अथवा मेघाच्छादित चंद्र, यांप्रमाणे तुझें मुख पाहून (अरणीपासून उत्पन्न झालेला) अग्नि आश्रयभूत काष्ठांस दहन करितो, तसाच माझ्या अंतःकरणांत दुःखरूप अरणीपासून उत्पन्न झालेला शोक मला दहन करीत आहे.
२८८ परत्रवासे हि वदन्त्यनुत्तमम् ।
तपोधनाः सत्यवचो हितं नृणाम् ॥ २.११.२९
(कैकेयी दशरथाला म्हणते.) परलोकी वास्तव्य करण्यामध्ये मनुष्यांना सत्यवचन अत्यंत हितकारक होते असें तपोधन म्हणत असतात.
२८९ परदाराभिमर्शात्तु नान्यत्पापतरं महत ॥ ३.३८.३०
परस्त्रीगमनापेक्षा अधिक असें दुसरे कोणतेही महापातक नाही.
२९० परदारावरोधस्य प्रसुप्तस्य निरीक्षणम् ।
इदं खलु ममात्यर्थं धर्मलोपं करिष्यति ॥ ५.११.३९
(सीतेचा शोध लावण्यासाठी रावणाच्या अंतःपुरात शिरलेला मारुति म्हणतो.) अंतःपुरांत निजलेल्या परस्त्रियांचे अवलोकन, ही गोष्ट माझ्या धर्माचा अतिशयेंकरून लोप करील.
२९१ परं निर्वेदमागम्य न हि नोन्मीलनं क्षमम् ॥ ४.४९.८
(अंगद वानरांना म्हणतो.) मनामध्ये अतिशय खिन्न होऊन उद्योग सोडून देणे योग्य नाही.
२९२ परमापद्गतस्यापि धर्मे मम मतिभवेत् ॥ ७.१०.३०
(बिभीषणाने ब्रह्मदेवाजवळ वर मागितला.) मी पराकाष्ठेच्या विपत्तीत जरी सांपडलों तरी धर्माकडेच माझी बुद्धि असावी.
२९३ परस्पर्शात्तु वैदेह्या न दुःखतरमस्ति मे ।
पितुर्विनाशात्सौमित्रे स्वराज्यहरणात्तथा ॥ ३.२.२१
(विराध राक्षसाने सीतेला उचलून नेले हे पाहून राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, सीतेला झालेला परपुरुषाचा स्पर्श, ह्याहून अधिक दुःखदायक असें मला काही वाटत नाही. पित्याचे मरण आणि स्वराज्यहरण ह्याहूनही तें दुःख अधिक आहे.
२९४ परस्य वीर्यं स्वबलं च बुद्ध्वा
स्थानं क्षयं चैव तथैव वृद्धिम् ।
तथा स्वपक्षेऽप्यनुमृश्य बुद्धया
वदेत्क्षमं स्वामिहितं स मन्त्री ॥ ६.१४.२२
जो पुरुष शत्रूचे आणि आपलें बल जाणतो, शत्रूच्या आणि आपल्या सैन्याची स्थिति, वृद्धि, आणि क्षय ह्यांचा बुद्धिपूर्वक विचार करितो, आणि स्वामीचे हित कशांत आहे ते योग्य रीतीने सांगतो, तोच खरा मंत्री होय.
२९५ परस्वहरणे युक्तं परदाराभिमर्शकम् ।
त्याज्यमाहुर्दुरात्मानं वेश्म प्रज्वलितं यथा ॥ ६.८७.२३
परद्रव्यापहारी आणि परस्त्रीहरणकर्ता असा जो दुरात्मा तो प्रज्वलित गृहाप्रमाणे त्याज्य होय.
२९६ परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम् ।
सुहृदामतिशङ्का च त्रयो दोषाः क्षयावहाः ॥ ६.८७.२४
परद्रव्य हरण करणे, परस्त्रीसमागम आणि मित्रांच्या ठिकाणी शंकित वृत्ति हे तीन दोष नाशकारक आहेत.
२९७ पराक्रमोत्साहमतिप्रताप
सौशील्यमाधुर्यनयानयैश्च ।
गाम्भीर्यचातुर्यसुवीर्यधैर्यै-
र्हनूमतः कोऽप्यधिकोऽस्ति लोके ॥ ७.३६.४३
पराक्रम, उत्साह, बुद्धि, प्रताप, सुशीलता मधुरवाणी, नीति व अनीति यांचे ज्ञान, गांभीर्य, चातुर्य, उत्कृष्टवीर्य, आणि धैर्य या गुणांनी जगतामध्ये हनुमानापेक्षां कोण बरें अधिक आहे?
२९८ परान्तकाले हि गतायुषो नरा ।
हितं न गृह्णन्ति सुहृद्भिरीरितम् ॥ ६.१६.२७
ज्यांचे आयुष्य संपले आहे असे पुरुष सुहृदांनी केलेले हितकारक भाषण अंतकालीं ऐकून घेत नाहीत.
२९९ परिमृष्टो दशान्तेन दशाभागेन सेव्यते ॥ ३.७२.८
(सुग्रीव तुझ्या सारखाच दुःखी आहे त्याच्याशी तूं सख्य कर, असें कबंधानें रामाला सांगितले.) जो ग्रहदशेच्या फेऱ्यांत सांपडला आहे, त्याला ग्रहदशेच्या फेऱ्यांत सांपडलेल्याचीच मदत होत असते.
३०० पापानुबन्धो वै यस्य कर्मणः को नु तत्पुमान् ।
कुर्वीत लोकाधिपतिः स्वयम्भूर्भगवानपि ॥ ३.५१.३२
(जटायु रावणाला म्हणतो.) ज्याचा परिणाम चांगला नाहीं तें कर्म प्रत्यक्ष लोकाधिपति भगवान् ब्रह्मदेवही जरी झाला, तरी कोणता बरें (कल्याणेच्छु) पुरुष करण्यास प्रवृत्त होईल?
३०१ पिता हि दैवतं तात देवतानामपि स्मृतम् ॥ २.३४.५२
(राम दशरथाला म्हणतो.) बाबा, देवतांना सुद्धा पिता हेच दैवत म्हणून म्हंटले आहे.
३०२ पितुर्हि वचनं कुर्वन्न कश्चिन्नाम हीयते ॥ २.२.३७
पितृवाक्याचे पालन करणारा कोणीहि हानि पावत नाही.
३०३ पितुर्हि समतिक्रान्तं पुत्रो यः साधु मन्यते ।
तदपत्यं मतं लोके विपरीतमतोऽन्यथा ॥ २.१०६.१५
(भरत रामाला म्हणतो.) पित्याच्या हातून काही अतिक्रम झाला असतां जो पुत्र तो सुधारून घेतो, त्यालाच लोकांमध्ये अपत्य म्हणून म्हणतात. याच्या उलट वागणारास अपत्य म्हणत नाहीत.
३०४ पीडाकरममित्राणां यच्च कर्तव्यमेव तत् ॥ ६.८१.२९
शत्रूंना जें जें म्हणून पीडादायक आहे, तें तें (त्यांत पाप असले तरी) कर्तव्यच होय.
३०५ पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः पितृऋन्यः पाति सर्वतः ॥ २.१०७.१२
``पुत्'' नामक नरकापासून पित्याचे रक्षण करितो, अथवा (स्वर्गलोकप्राप्तिकारक कर्मांनी) जो पितरांचे नित्यशः रक्षण करितो, त्यासच ``पुत्र'' असे म्हणतात.
३०६ पुरुषस्य हि लोकेस्मिन् शोकः शौर्यापकर्षणः ॥ ६.२.१३
या लोकीं शोक हा पुरुषाच्या शौर्याचा नाश करणारा आहे.
३०७ पूर्वं कृतार्थो मित्राणां न तत्प्रतिकरोति यः ।
कृतघ्नः सर्वभूतानां स वध्यः प्लवगेश्वर ॥ ४.३४.१०
(लक्ष्मण सुग्रीवाला म्हणतो.) हे वानरश्रेष्ठा, पूर्वी मित्रांच्या हातून स्वतःचे कार्य झाले असतांही जो त्या मित्रांचे उपकार फेडीत नाही, असा कृतघ्न पुरुष सर्व लोकांस वध्य आहे.
३०८ पूर्वापकारिणं हत्वा न ह्यधर्मेण युज्यते ॥ २.९६.२४
ज्याने प्रथम अपकार केला आहे, अशाचा वध केला असतां अधर्म घडत नाही.
३०९ पौरकार्याणि यो राजा न करोति दिने दिने ।
संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः ॥ ७.५३.६
जो राजा पौरजनांची कार्ये प्रत्यही करीत नाही, तो वायूचा संचार नसलेल्या घोर नरकांत पडतो यांत संशय नाही.
३१० पौरा ह्यात्मकृताहुःखाद्विप्रमोच्या नृपात्मजैः ।
न तु खल्वात्मना योज्या दुःखेन पुरवासिनः ॥ २.४६.२३
(राम लक्ष्मणाला सांगतो.) आपणांकरितां जर नगरवासी लोकांना दुःख होत असेल, तर राजपुत्रांनी त्यांना दुःखांतून मुक्त केलें पाहिजे. आपल्याकारतां लोकांना दुःख होऊ देणे खरोखर योग्य नाही.
३११ पौरुषेण तु यो युक्तः स तु शूर इति स्मृतः ॥ ६.७१.६०
ज्याच्या आंगी पराक्रम आहे त्यालाच शूर असे म्हणतात.
३१२ प्रतिग्रहो हि विप्रेन्द्र क्षत्रियाणां सुगर्हितः ॥ ७.७६.३५
(राम अगस्त्य मुनींना म्हणतो.) हे ब्राह्मणश्रेष्ठा, क्षत्रियांस प्रतिग्रह म्हणजे अत्यंत निंद्य होय.
३१३ प्रतिज्ञायां हि नष्टायां धर्मो हि विलयं व्रजेत् ॥ ७.१०६.९
प्रतिज्ञा नष्ट झाली असतां धर्म लयाला जातो.
३१४ प्रतिवक्तुं प्रकृष्टे हि नापकृष्टस्तु शक्नुयात् ॥ ४.१८.४७
(वाली रामाला म्हणतो.) श्रेष्ठाच्यापुढे उत्तर देण्यास कनिष्ठ समर्थ होणार नाही.
३१५ प्रत्यगारमिवायान्ती सवत्सा वत्सकारणात् ।
बद्धवत्सा यथा धेनू राममाताभ्यधावत ॥ २.४०.४३
(राम वनवासाला निघाला असता त्याच्यामागें कौसल्या ज्ॐ लागली.) घरांत वासरूं बांधून ठेविले असले म्हणजे गाय परत येतांना वासराकरितां जशी धावत धावत घरी येते, तशी राममाता कौसल्या रामाच्या मागोमाग धावू लागली.
३१६ प्रधानं साधकं वैद्यं धर्मशीलं च राक्षस ।
ज्ञातयोऽप्यवमन्यन्ते शूरं परिभवन्ति च ॥ ६.१६.४
(रावण बिभीषणाला म्हणतो.) हे राक्षसा, आपल्या कुलामध्ये श्रेष्ठ पदास चढलेला, राज्यरक्षण वगैरे करणारा, ज्ञानी आणि धर्मशील असा जरी कोणी असला, तरी भाऊबंद त्याचा अपमान करीत असतात. आणि तो जरी शूर असला तरी छिद्र पाहून त्याचा पराजय करीत असतात.
३१७ प्रवादःसत्यमेवायं त्वां प्रति प्रायशो नृप ।
पतिव्रतानां नाकस्मात्पतन्त्यश्रूणि भूतले ॥ ६.१११.६६
(रावणवधामुळे विलाप करणारी मंदोदरी रावणाला उद्देशून म्हणते.) हे राजा, ``पतिव्रता स्त्रियांचे अश्रु कांहीतरी अनर्थ ओढवल्यावांचून विनाकारण कधीहि भूमीवर पडत नाहीत'' अशी जी लोकांमध्ये म्हण आहे, ती तुझ्या संबंधानें खरी ठरली.
३१८ प्रशमश्च क्षमा चैव आर्जवं प्रियवादिता ।
असामर्थ्यफला ह्येते निर्गुणेषु सतां गुणाः ॥ ६.२१.१४
शांति, क्षमा, सरलपणा, प्रियवादित्व हे सज्जनांचे गुण निर्गुण पुरुषांच्या ठिकाणी निरुपयोगी होतात.
३१९ प्राप्तचारित्रसन्देहा मम प्रतिमुखे स्थिता ।
दीपो नेत्रातुरस्येव प्रतिकूलासि मे दृढा ॥ ६.११५.१७
(राम सीतेला म्हणतो.) ज्याप्रमाणे नेत्ररोगी पुरुषाला दिवा अतिशय प्रतिकूल होत असतो, त्याप्रमाणे माझ्या समोर असलेली तूं, तुझ्या वर्तनासंबंधानें संशय उत्पन्न झाल्यामुळे माझ्या दृष्टीला अतिशय प्रतिकूल झाली आहेस.
३२० प्राप्स्यामि यानध गुणान्को मे श्वस्तान्प्रदास्यति ।
अपक्रमणमेवातः सर्वकामैरहं वृणे ॥ २.३४.४०
(राम दशरथाला म्हणतो, ठरल्याप्रमाणे वनांत गेलो असतां) आज जे गुण मला प्राप्त होतील, ते मला उद्यां कोण देणार आहे? येथून गमन करणे यांतच माझे सर्व मनोरथ परिपूर्ण होत आहेत, यासाठी आजच्या आज वनवासाला जाणे हेच मला पसंत आहे.
३२१ प्रासादाग्रे विमानैर्वा वैहायसगतेन वा ।
सर्वावस्थागता भर्तुः पादच्छाया विशिष्यते ॥ २.२७.९
(सीता रामाला म्हणते.) कोणतीही अवस्था प्राप्त झाली तरी स्त्रीने पतिचरणांच्या छायेला असणेंच - राजवाड्यांत राहण्यापेक्षा, विमानांत बसून फिरण्यापेक्षा अथवा सिद्धि प्राप्त झाल्यामुळे आकाशमार्गाने गमन करण्यापेक्षा - अधिक श्रेयस्कर आहे.
३२२ प्रियं चेद्भरतस्यैतद्रामप्रव्राजनं भवेत् ।
मा स्म मे भरतः कार्षीत्प्रेतकृत्यं गतायुषः ॥ २.१२.९२
(दशरथ म्हणतो.) रामाचा वनवास जर भरताला प्रिय असेल, तर मी मृत झाल्यावर माझें उत्तरकार्य त्याने करूं नये.
३२३ प्रैष्यं पापीयसां यातु सूर्य च प्रति मेहतु ।
हन्तु पादेन गां सुप्तां यस्यार्योऽनुमते गतः ॥ २.७५.२२
(रामाला वनांत पाठविणाऱ्यास भरताचे शिव्याशाप.) ज्याच्या अनुमतीने श्रेष्ठ राम वनवासाला गेला, त्याला अत्यंत पापी जनांची सेवा करणे भाग पडो. त्यास सूर्याचे पुढे मूत्र केल्याचे पाप लागो; तसेंच निद्रिस्त गाईला लाथ मारल्याचे पाप त्याच्या आंगीं जडो.
३२४ प्रोत्साहितोऽयं कैकेय्या सन्तुष्टो यदि नः पिता ।
अमित्रभूतो निःसङ्गं बध्यतां वध्यतामपि ॥ २.२१.१२
(लक्ष्मण रामाला व कौसल्येला म्हणतो.) कैकेयीच्या प्रोत्साहनाने तिजवर संतुष्ट होऊन आमचा पिता जर आमच्यांशी शत्रत्वाने वागू लागेल, तर खरोखर त्याला बांधून टाकण्याला अथवा त्याचा वध करण्यालाही काही चिंता नाही.
३२५ बलिषड्भागमुद्धत्य नृपस्यारक्षितुः प्रजाः ।
अधर्मो योऽस्य सोऽस्यास्तु यस्यार्योऽनुमते गतः ॥ २.७५.२५
(भरत म्हणतो.) प्रजांपासून (कररूपाने) सहावा भाग घेऊनही त्यांचे रक्षण न केल्याने जे पाप राजास लागते, ते पाप ज्याच्या अनुमतीने श्रेष्ठ राम वनाला गेला, त्याला लागो.
३२६ बलैः समग्रैर्युधि मां रावणं जित्य संयुगे ।
विजयी स्वपुरं यायात्तत्तस्य सदृशं भवेत् ॥ ५.३९.२९
(सीता मारुतीला म्हणते.) समग्र सैन्यासह येऊन व रणांगणावर रावणाला जिंकून विजयी होत्साता राम मला राजधानीला घेऊन जाईल, तर ती गोष्ट त्याला शोभण्यासारखी होईल.
३२७ बहवः साधवो लोके युक्ता धर्ममनुष्ठिताः ।
परेषामपराधेन विनष्टाः सपरिच्छदाः ॥ ३.३९.२१
धर्मानुष्ठान करूनही इतरांच्या अपराधाने परिवारासह नाश पावलेले अनेक साधुपुरुष या लोकी आहेत.
३२८ बालिशस्तु नरो नित्यं वैक्लव्यं योऽनुवर्तते ।
स मञ्जत्यवशः शोके भाराक्रान्तेव नौर्जले ॥ ४.७.१०
(सुग्रीव रामाला म्हणतो.) ओझ्याने जर्जर झालेली नौका ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बुडते, त्याप्रमाणे जो बालिश पुरुष नेहमी खेद करीत बसतो, तो निरुपाय होऊन शोकामध्ये बुडून जातो.
३२९ बालिशो बत कामात्मा रामो दशरथात्मजः ।
इति वक्ष्यति मां लोको जानकीमविशोध्य हि ॥ ६.११८.१४
(राम म्हणतो.) मी सीतेची शुद्धि न करितां (तिचे ग्रहण केल्यास) राम हा अत्यंत विषयलंपट झाला आहे आणि मूर्ख आहे, असें लोक मला म्हणतील.
३३० बालेन्द्रगोपान्तरचित्रितेन ।
विभाति भूमिर्नवशाद्वलेन
गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण
नारीव लाक्षोक्षितकम्बलेन ॥ ४.२८.२४
(राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) लहान लहान इंद्रगोपसंज्ञक कीटकांनी मधून मधून चित्रविचित्र झालेल्या हिरव्यागार गवताने युक्त झालेली भूमि, लाक्षाबिंदुयुक्त अशी पोपटी रंगाची शालजोडी आंगासरशी पांघरून बसलेल्या स्त्रीप्रमाणे दिसत होती.
३३१ बाष्पेण पिहितं दीनं रामः सौमित्रिणा सह ।
चकर्षेव गुणैर्बद्धं जनं पुरनिवासिनम् ॥ २.४५.१२
(वनांत जाणाच्या रामाच्या मागोमाग प्रजाजन जाऊ लागले.) अधूंनी ज्यांचे नेत्र भरून गेलेले आहेत अशा त्या नगरवासी दीन जनांना लक्ष्मणासहवर्तमान राम आपल्या गुणांनी बांधून टाकून जसा कांहीं ओढूनच नेऊ लागला.
३३२ ब्रह्मन्ब्रह्मबलं दिव्यं क्षात्राच बलवत्तरम् ॥ १.५४.१४
(कामधेनु वसिष्ठांना म्हणते.) हे ब्राह्मणा, क्षात्रबलापेक्षां दिव्य ब्रह्मबल अधिक श्रेष्ठ आहे.
३३३ ब्रवन्परार्थं परवान्न दूतो वधमर्हति ॥ ५.५२.१९
दूत म्हंटला म्हणजे परवश असून तो दुसऱ्याचा निरोप सांगणारा असतो, त्याअर्थी त्याचा वध करणे योग्य नाही.
३३४ भगवन्याणिनां नित्यं नान्यत्र मरणाद्भयम् ॥ ७.१०.१६
(रावण ब्रह्मदेवाला म्हणतो.) हे भगवन, प्राण्यांना नेहमी मरणापेक्षा दुसरें कशाचेही भय नाही.
३३५ भर्ता तु खलु नारीणां गुणवान्निर्गुणोऽपि वा ।
धर्म विमृशमानानां प्रत्यक्षं देवि दैवतम् ॥ २.२६.८
(दशरथ कौसल्येला म्हणतो.) हे देवि, पति गुणवान असो, वा निर्गुण असो, धर्माने
चालणाऱ्या स्त्रियांचे तो खरोखर प्रत्यक्ष दैवत आहे.
३३६ भर्ता नाम परं नार्याः शोभनं भूषणादपि ॥ ५.१६.२६
अलंकारापेक्षाही पति हे स्त्रियांचे परम सुंदर भूषण आहे.
३३७ भर्तुरिच्छा हि नारीणां पुत्रकोट्या विशिष्यते ॥ २.३५.८
पतीच्या इच्छेला अनुसरून वागणे हे, स्त्रियांना एक कोटि पुत्र प्राप्त होण्यापेक्षाही अधिक आहे.
३३८ भर्तुर्भक्तिं पुरस्कृत्य रामादन्यस्य वानर ।
नाहं स्पष्टुं स्वतो गात्रमिच्छेयं वानरोत्तम ॥ ५.३७.६२
यदहं गात्रसंस्पर्शं रावणस्य गता बलात् ।
अनीशा किं करिष्यामि विनाथा विवशा सती ॥ ५.३७.६३
(सीता मारुतीला म्हणते.) हे वानरा, हे वानरश्रेष्ठा, भर्त्याच्या ठिकाणी अतिशयच भक्ति असल्यामुळे त्या रामावांचून दुसऱ्या कोणाच्याही शरीराला आपण होऊन स्पर्श करण्याची माझी इच्छा नाही. रावणाच्या शरीराचा स्पर्श मला झाला आहे; परंतु तो माझ्या इच्छेविरुद्ध झाला आहे. मी अनाथ, स्वतः असमर्थ आणि पराधीन असल्यामुळे करणार काय?
३३९ भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् ।
अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ॥ २.२४.२७
(राम कौसल्येला म्हणतो.) जी स्त्री देवादिकांस नमस्कार करीत नाही, किंवा त्यांचे पूजन करीत नाही, केवळ भर्त्याची शुश्रूषा करिते, त्या स्त्रीला उत्कृष्ट स्वर्ग प्राप्त होतो.
३४० भवान्कलत्रमस्माकं स्वामिभावे व्यवस्थितः ।
स्वामी कलत्रं सैन्यस्य गतिरेषा परन्तप ॥ ४.६५.२३
(जांबवान् अंगदाला म्हणतो.) स्वामी या नात्याने असलेला तूं आम्हांला भार्येच्या स्थानी आहेस. (भर्ऱ्याने भायेचे रक्षण करणे जसें अत्यंत अवश्य आहे, तसे आम्ही सर्व वानरांनी जिवांत जीव आहे तोपर्यंत तुझें रक्षण करणे अवश्य आहे।) हे शत्रुतापना, स्वामी हीच सैन्याची भार्या होय. तोच सैन्याचा आधार आहे.
३४१ भावज्ञेन कृतज्ञेन धर्मज्ञेन च लक्ष्मण ।
त्वया पुत्रेण धर्मात्मा न संवृत्तः पिता मम ॥ ३.१५.२९
(पर्णशालेमध्ये तयार केलेला आश्रम पाहून संतुष्ट झालेला राम लक्ष्मणाला म्हणतो.) हे लक्ष्मणा, तूं माझ्या मनांतील अभिप्राय जाणणारा आहेस. तूं कृतज्ञ आहेस, धर्मज्ञ आहेस, असा तूं पुत्र असल्यामुळे माझा धर्मात्मा पिता (दशरथ) मरण पावलाच नाहीं असे मला वाटते. (कारण तूंचं माझें पित्याप्रमाणे परिपालन करीत आहेस।)
३४२ भृताश्चार्था विनश्यन्ति देशकालविरोधिताः ।
विक्लवं दूतमासाद्य तमः सूर्योदये यथा ॥ ५.२.३७
सूर्योदय झाला असता ज्याप्रमाणे अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे अयोग्य दूताची गांठ पडली असता, देश व काल विरुद्ध झाल्या कारणाने जवळ जवळ सिद्धीस गेलेलीही कार्ये नाहींशी होत असतात.
३४३. मत्ता गजेन्द्रा मुदिता गवेन्द्रा ।
वनेषु विक्रान्ततरा मृगेन्द्राः
रम्या धरेन्द्रा निभृता नरेन्द्राः
प्रक्रीडितो वारिधरैः सुरेन्द्रः ॥ ४.२८.४३
(वर्षाकालाचे वर्णन.) वनामध्ये जिकडे तिकडे गजेंद्र मत्त झाले आहेत, मोठमोठे वृषभ आनंदित झाले आहेत, सिंह आपला पराक्रम जास्त जास्तच गाजवू लागले आहेत, पर्वत रमणीय दिसू लागले आहेत, राजे लोक स्वस्थ बसले आहेत आणि देवराज इंद्र मेघांच्या योगानें क्रीडा करीत बसला आहे.
३४४ मदङ्गे जीर्णतां यातु यत्त्वयोपकृतं कपे ।
नरः प्रत्युपकाराणामापत्स्वायाति पात्रताम् ॥ ७.४०.२४
(राम मारुतीला म्हणतो.) हे कपे, तूं केलेले उपकार माझ्या आंगी जिरून जावोत. ( तुझ्या उपकारांची फेड तुझ्यावर तसा प्रसंग येऊन माझ्या हातून न होवो।) मनुष्य संकटकालीं उपकारांच्या फेडीला पात्र होत असतो. (तुझे उपकारांचे ओझें मजवर जशाचे तसें राहणार।)
३४५ मनो हि हेतुः सर्वेषामिन्द्रियाणां प्रवर्तने ।
शुभाशुभास्ववस्थासु तच्च मे सुव्यवस्थितम् ॥ ५.११.४३
(सीतेचा शोध लावण्यासाठी रावणाचे अंतःपुर पाहिल्यावर मारुति म्हणतो.) बऱ्या वाईट स्थितीमध्ये कोणत्याही इंद्रियाची प्रवृत्ति होण्याचे कारण मन हेच आहे. आणि तें माझें मन तर अगदी स्वस्थ आहे.
३४६ मन्त्रमूलं च विजयं प्रवदन्ति मनस्विनः ॥ ६.६.५
जय मसलतीवर अवलंबून असतो, असे विचारी लोक म्हणत असतात.
३४७ मन्ये प्रीतिविशिष्टा सा मत्तो लक्ष्मण सारिका ।
यत्तस्याः श्रूयते वाक्यं शुक पादमरेर्दश ॥ २.५३.२२
(राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, (माझ्या मातेने पालन करून बोलण्यास शिकविलेली) साळुंकी माझ्यापेक्षा माझ्या मातेवर अधिक प्रीति करणारी आहे असे मला वाटते. कारण ``हे शुका, शत्रूच्या पायाला दंश कर'' असें तरी त्या साळुंकीचे वाक्य तिच्या कानावर पडत असते. (परंतु शत्रूचा पराजय करण्यासंबंधाचे तसे नुसते माझे शब्द देखील तिच्या कानावर पडत नाहीत।)
३४८ ममैव नूनं मरणं न विद्यते ।
न चावकाशोऽस्ति यमक्षये मम
यदन्तकोऽद्यैव न मां जिहीर्षति
प्रसह्य सिंहो रुदतीं मृगीमिव ॥ २.२०.५०
(कौसल्या म्हणते.) शोक करीत बसलेल्या हरिणीला एकाएकी उचलून नेणाऱ्या सिंहाप्रमाणे मृत्यु मला नेण्याचे मनांत आणीत नाही, यावरून मी खरोखर अमर आहे, व यमाच्या घरीं मला जागा नाही हेच खरें.
३४९ मयैकेन तु नियुक्तः परिमुच्यस्व राघव ।
मां हि भूतबलिं दत्त्वा पलायस्व यथासुखम् ॥ ३.६९.३९
अधिगन्तासि वैदेहीमचिरणेति मे मतिः ॥ ३.६९.४०
(कबंध राक्षसाच्या तावडीत सांपडल्यावर लक्ष्मण रामाला म्हणाला.) हे राघवा, माझ्या एकट्याचा या राक्षसाला (कबंधाला) बलि देऊन आपणाला सोडीव, आणि येथून सुखाने पळून जा. लवकरच जानकीची तुला प्राप्ति होईल, असे मला वाटते.
३५० मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम् ।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव ॥ ६.१०९.२६
(रावणाचें और्वदेहिक कर्म करण्याविषयी अनुज्ञा देतांना राम बिभीषणाला सांगतो.) वैराचा अंत मरणाबरोबर होत असल्यामुळे, ते आमचे वैराचे प्रयोजन आतां संपलें. (आपला कार्यभाग उरकला आहे।) तर जसा तो तुझा आप्त, तसाच माझाही असल्यामुळे, त्याचा संस्कार कर.
३५१ महतेवाम्बुवेगेन भिन्नः सेतुर्जलागमे ।
दुरावरं त्वदन्येन राज्यखण्डमिदं महत् ॥ २.१०५.५
(भरत रामाला म्हणतो.) ज्याप्रमाणे पर्जन्यकाली जलवेगाने मोडलेला पूल दुरुस्त करणे अत्यंत कठीण आहे, त्याप्रमाणे हे भरतखंड नांवाचे प्रचंड राज्य तुझ्यावांचून इतरांस आवरतां येणे कठीण आहे.
३५२ महर्षयो धर्मतपोभिरामाः ।
कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः
अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु
कथं न सज्जेत सुखेषु राजा ॥ ४.३३.५७
(कामासक्त झालेल्या सुग्रीवाबद्दल तारा लक्ष्मणाला म्हणते.) धर्मार्थ तपश्चर्या करून त्यांत रममाण होणारे असे महर्षिही कामातुर होऊन स्त्रियांविषयी मोहित झाले आहेत, मग जातीनेच चंचल असलेला हा वानर, आणि त्यांतूनही राजा असतांना विषयसुखाविषयी कसा बरें आसक्त होणार नाहीं?
३५३ मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥ १.२.१५
(वाल्मीकि मुनीञ्च्या मुखान्तून निघालेले सहज उद्गार.) हे निषादा, ज्याअर्थी या क्रौञ्च पक्ष्याञ्च्या जोडप्यापैकी काममोहित झालेल्या एकाचा (नराचा) तूं वध केला आहेस, त्याअर्थी तुझे पाय फार वर्षे भुईला लागणार नाहीत. (तूं फार दिवस जगणार नाहीस।) (या श्लोकाचा अन्य रीतीने आशीर्वादपर खालीलप्रमाणे अर्थकरितां येतो. हे मा - निषाद - लक्ष्मीचे निवासस्थानभूत रामचन्द्रा ! मन्दोदरी व रावण या दम्पत्यान्तून रावणाचा तुम्ही वध केला, त्याअर्थी अनेक वर्षेपर्यन्त अखण्ड प्रतिष्ठेस - ऐश्वर्यास - आपण प्राप्त व्हावें।)
३५४ मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितं सुतः ।
अमितस्य तु दातारं भर्तारं का न पूजयेत् ॥ २.३९.३०
पिता भ्राता किंवा पुत्र यांनी कितीही दिले, तरी ते परिमितच असावयाचें; अपरिमित देणारा म्हणजे एक पतिच होय. अशा पतीची सेवा कोणती स्त्री करणार नाही?
३५५ मुमुर्षाणां तु सर्वेषां यत्पथ्यं तन्न रोचते ॥ ३.५३.१८
जे मरणोन्मुख झालेले असतात, त्यांना पथ्य म्हणून आवडतच नाही.
३५६ मूलमर्थस्य संरक्ष्यमेष कार्यविदां नयः ।
मूले हि सति सिध्यन्ति गुणाः सर्वे फलोदयाः ॥ ४.६५.२५
कोणत्याही गोष्टीचे मूळ रक्षण करून ठेविले पाहिजे, असा कार्यवेत्त्या पुरुषांचा न्याय आहे. कारण मूळ जर कायम असेल तर इतर सर्व उदयोन्मुख गुण सिद्धीस जातात. (सर्व किरकोळ गोष्टी सिद्ध होतात.)
३५७ मृदुर्हि परिभूयते ॥ २.२१.११
जो मृदु असतो, त्याचा (सर्वत्र) पराजय व्हावयाचाच. (मऊ सांपडले म्हणजे लोक कोपराने खणूं लागतात.)
३५८ यः कृते हन्यते भर्तुः स पुमान् स्वर्गमृच्छति ॥ ६.९२.९
जो स्वामिकार्यासाठी वध पावतो, तो पुरुष स्वर्गाला जातो.
३५९ यः खल्वपि वनं प्राप्य मृगव्यालनिषेवितम् ।
न पिबेन्मधु सम्प्राप्य स नरो बालिशो भवेत् ॥ ६.१३.२
मृग आणि सर्प यांनी आश्रय केलेले दुर्गम वन प्राप्त झाल्यावर मध हाती आला असतां, जो त्याचे सेवन करीत नाहीं तो मूर्ख पुरुष होय.
३६० यः पश्चात्पूर्वकार्याणि कर्माण्यभिचिकीर्षति ।
पूर्व चापरकार्याणि स न वेद नयानयौ ॥ ६.१२.३२
पूर्वी कर्तव्य असलेल्या कर्माचा जो मागाहून विचार करितो आणि नंतरची कामें पूर्वी करूं पाहतो. त्याला न्याय अन्याय काहींच समजत नाही.
३६१ यतो मूलं नरः पश्येत्प्रादुर्भावमिहात्मनः ।
कथं तस्मिन्न वर्तेत प्रत्यक्षे सति दैवते ॥ २.१८.१६
(राम कैकेयीला म्हणतो.) जो (पिता) आपल्या जन्मास मूळ कारण, ज्यापासून आपण जन्माला आलो, व म्हणून जो आपले प्रत्यक्ष दैवत, त्या पित्याच्या मनाप्रमाणे कोणता बरें पुरुष वागणार नाही?
३६२ यत्कर्तव्यं मनुष्येण धर्षणां प्रतिमार्जता ।
तत्कृतं रावणं हत्वा मयेदं मानकाङ्क्षिणा ॥ ६.११५.१३
(राम सीतेला म्हणतो.) अपमानाचे परिमार्जन करणाऱ्या मनुष्याच्या हातून जें होण्यासारखे आहे, ते मी लौकिकाची चाड बाळगणाऱ्या रामाने रावणाचा वध करून केले आहे.
३६३ यत्कृत्वा न भवेद्धर्मो न कीर्तिर्न यशो ध्रुवम् ।
शरीरस्य भवेत्खेदः कस्तत्कर्म समाचरेत् ॥ ३.५०.१९
(जटायु रावणाला म्हणतो.) जे केल्याने धर्म, कीर्ति, अढळ यश यांपैकी काही एक प्राप्त होत नाही, उलट शरीराला क्लेश मात्र होतात त्या कर्माचे आचरण कोण बरें करील?
३६४ यत्र रामो भयं नात्र नास्ति तत्र पराभवः ॥ २.४८.१५
ज्या ठिकाणी राम आहे त्याठिकाणी भय नाही व पराजयही नाही.
३६५ यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे ।
समेत्य तु व्यपेतायां कालमासाद्य कञ्चन ॥ २.१०५.२६
एवं भार्याश्च पुत्राश्च ज्ञातयश्च वसूनि च ।
समेत्य व्यवधावन्ति ध्रुवो ह्येषां विनाभवः ॥ २.१०५.२७
ज्याप्रमाणे महासागरामध्ये एक काष्ठ आणि दुसरें काष्ठ यांचा समागम होतो, नंतर काही वेळाने त्यांचा वियोग होतो, त्याचप्रमाणे भार्या, पुत्र, भाऊबंद व संपत्ति यांचा समागम होत असून नंतर तीं एकमेकांपासून दूर धावू लागतात. कारण, ह्यांचा वियोग हा ठरलेलाच आहे.
३६६ यथागारं दृढस्थूणं जीर्णं भूत्वोपसीदति ।
तथावसीदन्ति नरा जरामृत्युवशं गताः ॥ २.१०५.१८
घराचे खांब बळकट असले, तरी ते घर जीर्ण होऊन नाश पावतें, त्याप्रमाणे मनुष्ये जरा व मृत्यु यांच्या स्वाधीन होऊन नाश पावतात.
३६७ यथा तव तथान्येषां रक्ष्या दारा निशाचर ।
आत्मानमुपमां कृत्वा स्वेषु दारेषु रम्यताम् ॥ ५.२१.७
(सीता रावणाला म्हणते.) हे राक्षसा, जशा तुझ्या स्त्रिया तुला संरक्षणीय आहेत तशाच दुसऱ्यांच्याही आहेत, म्हणून जे आपणाला दुःख तेच दुसऱ्याला दुःख, असे समजून तूं स्वतःच्याच स्त्रीजनांचे ठिकाणी रममाण हो.
३६८ यथा दृष्टिः शरीरस्य नित्यमेव प्रवर्तते ।
तथा नरेन्द्रो राष्ट्रस्य प्रभवः सत्यधर्मयोः ॥ २.६७.३३
ज्याप्रमाणे शरीराचे हिताहित पाहण्याविषयी दृष्टि नेहमी तत्पर असते, त्याचप्राणे सत्य आणि धर्म ह्यांची प्रवृत्ति करणारा राजा राष्ट्राच्या हिताहिताविषयीं नेहमी दक्ष असतो.
३६९ यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोयबिन्दवः ।
न श्लेषमभिगच्छन्ति तथाऽनार्येषु सौहृदम् ॥ ६.१६.११
कमलपत्रांवर पडलेले जलबिंदु ज्याप्रमाणे त्या पत्रांना चिकटत नाहीत, त्याचप्रमाणे दुष्ट पुरुषांचे अंतःकरणांत मैत्री ठरत नाही.
३७० यथा पूर्व गजः स्नात्वा गृह्य हस्तेन वै रजः ।
दूषयत्यात्मनो देहं तथाऽनार्येषु सौहृदम् ॥ ६.१६.१५
ज्याप्रमाणे हत्ती प्रथमतः स्नान करितो, आणि नंतर लगेच सोंडेनें धूळ घेऊन आपले सर्व शरीर मलिन करितो, (म्हणजे स्नानामुळे प्राप्त झालेली निर्मलता नाहीशी करून टाकितो) त्याप्रमाणे दुष्ट लोक पूर्वी संपादन केलेला स्नेह स्वतःच नाहीसा करून टाकितात.
३७१ यथा फलानां पक्कानां नान्यत्र पतनाद्भयम् ।
एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद्भयम् ॥ २.१०५.१७
ज्याप्रमाणे पक्व फलांना पतनावांचून दुसरें भय नाही, त्याचप्रमाणे जन्मास आलेल्या मनुष्यांना मरणावांचून दुसरे भय नाही.
३७२ यथा हि कुरुते राजा प्रजास्तमनुवर्तते ॥ ७.४३.१९
जसे राजा करूं लागतो, तसे लोकही त्याला अनुसरून वागू लागतात.
३७३ यथा ह्यनुदका नद्यो यथा वाप्यतृणं वनम् ।
अगोपाला यथा गावस्तथा राष्ट्रमराजकम् ॥ २.६७.२९
जशा उदकहीन नद्या, जसें तृणरहित वन, जशा गुराख्यावांचून गाई, त्याप्रमाणे अराजक राष्ट्र होय.
३७४ यदन्तरं वायसवैनतेययो-
र्यदन्तरं मद्गुमयूरयोरपि ।
यदन्तरं हंसकगृध्रयोर्वने
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३.४७.४७
(सीता रावणाला म्हणते.) कावळा आणि गरुड यांमध्ये जेवढे अंतर आहे, पाणकोंबडा आणि मोर यांमध्ये जेवढे अंतर आहे हंस आणि गिधाड यांमध्ये जेवढे अंतर आहे, तेवढे अंतर तूं आणि दाशरथि राम यांच्यामध्ये आहे.
३७५ यदन्तरं सिंहशृगालयोर्वने
यदन्तरं स्यन्दनिकासमुद्रयोः ।
सुराग्र्यसौवीरकयोर्यदन्तरं
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३.४७.४५
(सीता रावणाला म्हणते.) सिंह आणि कोल्हा ह्यांच्यात जें अंतर वनामध्ये दिसून येते, किंवा समुद्र आणि ओढा यांच्यामध्ये जें अंतर दृष्टोत्पत्तीस येते, अथवा अमृत आणि कांजी ह्यांच्यामध्ये जें अंतर अनुभवाला येते, तें अंतर दाशरथि राम आणि तूं यांच्यामध्ये असल्याचे निदर्शनास येत आहे.
३७६ यदन्तरं काञ्चनसीसलोहयो-
र्यदन्तरं चन्दनवारिपङ्कयोः ।
यदन्तरं हस्तिबिडालयोर्वने
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३.४७.४६
(सीता रावणाला म्हणते.) जेवढे अंतर सुवर्ण आणि शिसे या धातूंमध्ये आहे, जेवढे अंतर चंदनोदक आणि चिखल यांत आहे, आणि जेवढें अंतर हत्ती व मांजर यांत आहे, तेवढे अंतर दाशरथि राम आणि तूं यांत आहे.
३७७ यदन्नःपुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः ॥ २.१०३.३०
(राम म्हणतो.) जें अन्न पुरुष भक्षण करीत असेल तेंच अन्न त्याने आपल्या देवतांना द्यावे.
३७८ यदाचरति कल्याणि शुभं वा यदि वाशुभम् ।
तदेव लभते भद्रे कर्ता कर्मजमात्मनः ॥ २.६३.१६
(दशरथ कौसल्येला म्हणतो.) हे कल्याणि, मनुष्य शुभ अथवा अशभ जे काही कर्म करितो. त्याचे फल त्या कर्त्या पुरुषाला कर्माप्रमाणे प्राप्त होतेच.
३७९ यदा विनाशो भूतानां दृश्यते कालचोदितः ।
तदा कार्ये प्रमाद्यन्ति नराः कालवशं गताः ॥ ३.५६.१६
जेव्हां कालाच्या प्रेरणेप्रमाणे प्राण्यांचा नाश होण्याचा समय दिसत असतो, तेव्हां कालाच्या अधीन झालेल्या लोकांची बुद्धि कर्तव्यासंबंधानें विपरीत होत असते.
३८० यदि त्वं प्रस्थितो दुर्गं वनमद्यैव राघव ।
अग्रतस्ते गमिष्यामि मृद्नन्ती कुशकण्टकान् ॥ २.२७.७
(सीता म्हणते.) हे राघवा, आपण जर आजच दुर्गम वनवासाला निघाला, तर तुमच्यापुढे मीहि दर्भ व कांटे तुडवीत तुडवीत जाणार.
३८१ यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसौ सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नमः ॥ ४.३९.२
चन्द्रमा रजनीं कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् ।
त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परन्तप ॥ ४.३९.३
(राम सुग्रीवाला म्हणतो.) इंद्राने जर पर्जन्यवृष्टि केली किंवा हजारों किरणांनी युक्त असलेल्या सूर्याने आकाश अंधकाररहित केलें, चंद्राने आपल्या प्रभेच्या योगाने रात्र निर्मल करून टाकिली किंवा हे विनयसंपन्न शत्रुतापना, तुझ्यासारख्याने मित्रांवर प्रेम केले, तर ते काही आश्चर्य म्हणता येणार नाही.
३८२ यदि ह्यकाले मरणं यदृच्छया
लभेत कश्चिद्गुरुदुःखकर्शितः
गताहमद्यैव परेतसंसदं
विना त्वया धेनुरिवात्मजेन वै ॥ २.२०.५३
(कौसल्या रामाला म्हणते.) अत्यंत दुःखपीडित मनुष्य स्वेच्छेनुरूप जर मरण पावेल, तर वत्सरहित धेनूप्रमाणे मीहि तुझ्या वियोगाने आजच यमसदनाला गेल्ये असत्ये.
३८३ यद्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् ।
नाहं तत्प्रतिगृह्णीयां भक्ष्यान्विषकृतानिव ॥ २.९७.४४
(राम लक्ष्मणाला म्हणतो.) बांधवांच्या व मित्रांच्या नाशाने प्राप्त होणारे द्रव्य विषमिश्रित भक्ष्य पदार्थांप्रमाणे मी स्वीकारणार नाही.
३८४ यद्विना भरतं त्वां च शत्रुघ्नं वापि मानद ।
भवेन्मम सुखं किञ्चिद्भस्म तत्कुरुतां शिखी ॥ २.९७.८
(राम म्हणतो.) हे मान देणाऱ्या (लक्ष्मणा,) तुझा, भरताचा किंवा शत्रुघ्नाचा वियोग होऊन जे काही सुख मला होणार असेल त्याचे अग्नि भस्म करून टाको.
३८५ यद्वृत्ताःसन्ति राजानस्तद्वृत्ताः सन्ति हि प्रजाः ॥ २.१०९.९
राजे ज्या वर्तनाचे असतात, त्याच वर्तनाच्या प्रजा असतात.
३८६ यमक्षयमनुप्राप्ता द्रक्ष्यन्ति न हि मानवाः ॥ २.६४.६१
(दशरथ कौसल्येला म्हणतो.) यमसदनाला निघालेल्या मानवांना काही दिसेनासें होतें.
३८७ यमिच्छेत्पुनरायातं नैनं दूरमनुव्रजेत् ॥ २.४०.५०
(देशांतरी जाणाऱ्याने) पुनः सत्वर परत यावे, अशी इच्छा असल्यास त्याला फार दूरपर्यंत पोहोचविण्यास जाऊ नये.
३८८ यमिच्छेन्नरकं नेतुं सपुत्रपशुबान्धवम् ।
देवेष्वधिष्ठितं कुर्याद्गोषु तं ब्राह्मणेषु च ॥ ७.५९ प्र.२.४८
ज्याला पुत्र, पशु, बांधव या सर्वांसह नरकांत पाडण्याची आपली इच्छा असेल, त्याला देवांवर, ब्राह्मणांवर किंवा गाईवर अधिकारी नेमावें.
३८९ यस्तु राजा स्थितोऽधर्मे मित्राणामुपकारिणाम् ।
मिथ्या प्रतिज्ञां कुरुते को नृशंसतरस्ततः ॥ ४.३४.८
जो राजा अधर्माने वागणारा असून, उपकार करणाऱ्या मित्रांपाशीं खोटी प्रतिज्ञा करितो, त्याहून अत्यंत दुष्ट असा कोण बरें आहे?
३९० यस्तु हित्वा मतं भर्तुः स्वमतं सम्प्रधारयेत् ।
अनुक्तवादी दूतः सन् स दूतो वधमर्हति ॥ ६.२०.१९
जो दूत आपल्या धन्याचे मत सोडून आपलेंच मत प्रतिपादन करितो, तो दूत धन्याने न सांगितलेले बोलत असल्यामुळे वधास पात्र आहे.
३९१ यस्त्वया सह स स्वर्गो निरयो यस्त्वया विना ।
इति जानन्परां प्रीतिं गच्छ राम मया सह ॥ २.३०.१८
(सीता रामाला म्हणते.) आपल्याबरोबर जी स्थिति मला प्राप्त होईल तो माझा स्वर्ग आहे, आणि आपला वियोग होऊन कसलीही स्थिति जरी प्राप्त होणार असली, तरी तो मला नरक आहे; हे माझे आपल्या ठिकाणी असलेलें पराकाष्ठेचे प्रेम जाणून हे राम, आपण मला बरोबर घेऊन वनांत चला.
३९२ यस्मात्पश्यन्ति दूरस्थान्सर्वानर्थान्नराधिपाः ।
चारेण तस्मादुच्यन्ते राजानो दीर्घचक्षुषः ॥ ३.३३.१०
राजेलोक दूरदूरच्या सर्व गोष्टी हेरांकडून जाणून घेतात म्हणून त्यांना ``दीर्घदृष्टि'' असे म्हणतात.
३९३ यस्य भृत्याश्च दासाश्च मृष्टान्यन्नानि भुञ्जते ।
कथं स भोक्ष्यते रामो वने मूलफलान्ययम् ॥ २.२४.३
(कौसल्या म्हणते.) ज्याचे नोकर आणि ज्याचे दास मिष्टान्न भोजन करीत आहेत, असा हा राम वनामध्ये मुळे आणि फळे खाऊन कसा राहणार !
३९४ यस्याः पुत्रसहस्राणि सापि शोचति कामधुक् ।
किं पुनर्या विना रामं कौसल्या वर्तयिष्यति ॥ २.७४.२८
जिला हजारों पुत्र आहेत, ती कामधेनु देखील (आपल्या पुत्रांना दुःखी पाहून) शोक करिते, (मग जिला एकच पुत्र आहे) अशी कौसल्या रामावांचून (रामाला वनांत होणारे क्लेश मनांत आणून) कसे बरें जीवन धारण करील?
३९५ यस्यार्था धर्मकामार्थास्तस्य सर्व प्रदक्षिणम् ।
अधनेनार्थकामेन नार्थः शक्यं विचिन्वता ॥ ६.८३.३८
ज्याच्यापाशी द्रव्य असेल त्याचेच धर्म, अर्थ व काम हे पुरुषार्थ सिद्धीस जातात. सर्व काही त्याला अनुकूल असते. द्रव्याची इच्छा करणारा मनुष्य शोधक असला तरी दरिद्री असल्यास त्याला द्रव्यप्राप्ति होणार नाही. (आरंभी थोडे तरी द्रव्य असल्यावाचून द्रव्य मिळणे शक्य नाही.)
३९६ यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तस्य बान्धवाः ।
यस्यार्थाः स पुमाँल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः ॥ ६.८३.३५
ज्याच्याजवळ पैसा आहे, त्याला मित्र आणि बांधव यांची प्राप्ति होते. ज्याच्याजवळ संपत्ति आहे, तोच जगांत मनुष्य, आणि तोच जगांत पंडित.
३९७ यस्यार्थाः स च विक्रान्तो यस्यार्थाः स च बुद्धिमान् ।
यस्यार्थाः स महाबाहुर्यस्यार्थाः स गुणाधिकः ॥ ६.८३.३६
ज्याच्याजवळ पैसा आहे, तोच पराक्रमी; ज्याच्याजवळ धन आहे, तोच बुद्धिमान्. ज्याच्याजवळ द्रव्य आहे, तो महाबाहु आणि तोच अधिक गुणवान्.
३९८ यः समुत्पतितं क्रोधं क्षमयैव निरस्यति ।
यथोरगस्त्वचं जीर्णां स वै पुरुष उच्यते ॥ ५.५५.६
सर्प जशी जीर्ण त्वचा सोडतो, त्याप्रमाणे उत्पन्न झालेल्या क्रोधाला जो क्षमेने घालवितो, तोच खरोखर पुरुष म्हंटला आहे.
३९९ यः स्वपक्षं परित्यज्य परपक्षं निषेवते ।
स स्वपक्षे क्षयं याते पश्चात्तैरेव हन्यते ॥ ६.८७.१६
(इंद्रजित् बिभीषणाला म्हणतो.) जो स्वकीय पक्ष सोडून परपक्षाचा स्वीकार करितो, तो, स्वपक्ष नाशाला गेला असता, त्याच्या (परपक्षा) कडून मारला जातो.
४०० या त्वं विरहिता नीता चलचित्तेन रक्षसा ।
दैवसम्पादितो दोषो मानुषेण मया जितः ॥ ६.११५.५
(रावणवधानंतर राम सीतेला म्हणतो.) चंचल चित्ताच्या राक्षसाने (रावणाने) तुला एकटी असतांना नेले, हा अनर्थ दैवामुळे घडला व तो मी मनुष्याच्या पराक्रमानें नाहींसा केला.
४०१ यादृशं कुरुते कर्म तादृशं फलमश्नुते ॥ ७.१५.२४
ज्या प्रकारचे कर्म मनुष्य करितो, त्याचप्रकारचे फळ त्याला मिळते.
४०२ ये तु सभ्याः सदा ज्ञात्वा तूष्णीं ध्यायन्त आसते ।
यथाप्राप्तं न ब्रुवते ते सर्वेऽनृतवादिनः ॥ ७.५९ प्र.३.३४
जे सभासद एकादी गोष्ट जाणूनही स्वस्थ बसून राहतात, बोलणें प्राप्त झाले असतांही बोलत नाहीत, ते खोटे बोलणारे होत.
४०३ ये शोकमनुवर्तन्ते न तेषां विद्यते सुखम् ।
तेजश्च क्षयते तेषां न त्वं शोचितुमर्हसि ॥ ४.७.१२
(सुग्रीव रामाला म्हणतो.) जे शोकाला अनुसरून वागतात, त्यांना सुख होत नाही. त्यांच्या तेजाचा क्षय होतो. म्हणून तूं शोक करूं नकोस.
४०४ यो विषादं प्रसहते विक्रमे समुपस्थिते ।
तेजसा तस्य हीनस्य पुरुषार्थो न सिध्यति ॥ ४.६४.१०
(अंगद वानरांना म्हणतो.) पराक्रम करून दाखविण्याचा प्रसंग आला असतां जो पुरुष खिन्न होऊन बसतो, त्या तेजोहीन पुरुषाचा मनोरथ कधीही सिद्धीस जात नाही.
४०५ यो हि कालव्यतीतेषु मित्रकार्येषु वर्तते ।
स कृत्वा महतोऽप्यर्थान्न मित्रार्थेन युज्यते ॥ ४.२९.१५
जो योग्य काल निघून गेला असतां, मित्रकार्यांकरिता प्रयत्न करितो, त्याने मोठमोठी कार्य केली, तरी मित्रकार्य सिद्धीस नेल्याचे फळ त्याला प्राप्त होत नाही.
४०६ यो हि दत्त्वा द्विपश्रेष्ठं कक्ष्यायां कुरुते मनः ।
रज्जुस्नेहेन किं तस्य त्यजतः कुञ्जरोत्तमम् ॥ २.३७.३
(राम दशरथाला म्हणतो.) श्रेष्ठ हत्तीचे दान करून जो त्याला बांधावयाच्या दोरीवर मन ठेवील, (तर ते आश्चर्य होय।) त्याला उत्तम हत्तीचा त्याग केल्यानंतर त्या दोरीशी काय कर्तव्य असते?
४०७ यो हि भृत्यो नियुक्तः सन्भर्त्रा कर्मणि दुष्करे ।
कुर्यात्तदनुरागेण तमाहुः पुरुषोत्तमम् ॥ ६.१.७
धन्याने दुर्घट कार्याकडे योजना केली असतां तें कार्य पार पाडून त्याच्या ठिकाणी प्रेम असल्यामुळे जो सेबक दुसरेही कार्य शेवटास नेतो, तो उत्तम पुरुष होय.
४०८ यो हि विक्लवया बुद्धया प्रसरं शत्रवे दिशेत् ।
स हतो मन्दबुद्धिः स्याद्यथा कापुरुषस्तथा ॥ ७.६८.२०
जो अविचाराने शत्रूला अवसर देतो, त्या मंदबुद्धि पुरुषाचा दुर्बल पुरुषाप्रमाणे वध होतो.
४०९ रकारादीनि नामानि रामत्रस्तस्य रावण ।
रत्नानि च रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे ॥ ३.३९.१८
(मारीच म्हणतो.) हे रावणा, रामाची जरब बसून गेल्यामुळे रकाराने ज्या नांवांचा आरंभ होतो, ती नांवें म्हणजे उदाहरणार्थ, रत्ने, रथ इत्यादि ही माझे ठिकाणी भय उत्पन्न करितात.
४१० रक्ष्या हि राज्ञा धर्मेण सर्वे विषयवासिनः ॥ २.१००.१४८
राजाने आपल्या देशांत राहणाऱ्या सर्व लोकांचे धर्माने परिपालन केले पाहिजे.
४११ राघवस्य प्रियां भार्यामधिगन्तुं त्वमिच्छसि ।
अवसृज्य शिलां कण्ठे समुद्रं तर्तुमिच्छसि ॥ ३.४७.४१
(सीता रावणाला म्हणते.) रामाची प्रिय भार्या प्राप्त होण्याची तूं इच्छा करीत आहेस; म्हणजे गळ्यामध्ये शिळा बांधून समुद्र तरून जाण्याचेच तूं मनामध्ये आणिलें आहेस.
४१२ राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।
असद्वृत्ते हि नृपतावकाले म्रियते जनः ॥ ७.७३.१६
अन्यायाने पाळलेल्या प्रजांचा राजाच्या दोषांनी नाश होतो. राजा दुर्वर्तन करणारा निघाल्यास प्रजा अकाली मरतात.
४१३ राजमूला प्रजाः सर्वा राजा धर्मःसनातनः ॥ ७.५९ प्र.३.३८
सर्व प्रजा राजमूलक असतात. राजा म्हणजे सनातन धर्म होय.
४१४ राजा कर्ता च गोप्ता च सर्वस्य जगतः पिता ।
राजा कालो युगं चैव राजा सर्वमिदं जगत् ॥ ७.५९ प्र.२.६
राजा हा कर्ता, रक्षक, तसाच सर्व जगाचा पिता आहे. राजा काल आणि युग असून हे सर्व जगत् राजाच आहे.
४१५ राजा धर्मश्च कामश्च द्रव्याणां चोत्तमो निधिः ।
धर्मः शुभं वा पापं वा राजमूलं प्रवर्तते ॥ ३.५०.१०
(जटायु रावणाला म्हणतो.) धर्म, काम आणि उत्तम वस्तूंचे उत्कृष्ट भांडार हे सर्व राजाच आहे. कारण, धर्म, पुण्य अथवा पातक हे सर्व राजमूलकच प्रवृत्त होत असते.
४१६ राजा माता पिता चैव राजा हितकरो नृणाम् ॥ २.६७.३४
राजा (प्रजांची) माता, त्याप्रमाणे पिताही आहे. राजा प्रजांचे हित करणारा आहे.
४१७ राजैव कर्ता भूतानां राजा चैव विनायकः ।
राजा सुप्तेषु जागर्ति राजा पालयति प्रजाः ॥ ७.५९ प्र.२.४
राजाच सर्व भूतांचा कर्ता असून, त्यांचा मोठा नायकही तोच आहे. सर्व लोक निजले असतां राजा जागतो, आणि प्रजापालन करितो.
४१८ राज्यं भ्रष्टं वनेवासः सीता नष्टा मृतो द्विजः ।
ईदृशीयं ममालक्ष्मीर्दहेदपि हि पावकम् ॥ ३.६७.२४
संपूर्णमपि चेदद्य प्रतरेयं महोदधिम् ।
सोऽपि नूनं ममालक्ष्म्या विशुष्येत्सरिताम्पतिः ॥ ३.६७.२५
(जटायु पक्षी मूच्छित झालेला पाहून राम म्हणतो.) राज्य नाहींसें झालें, वनामध्ये वास्तव्य करण्याचा प्रसंग आला, सीतेचा ठिकाण नाही, आणि (कैवारी जटायु) पक्षीही मरून गेला; अशा प्रकारची ही माझी आपत्ति अग्नीलाही जाळून टाकील. हा दुःखसंताप शमन होण्याकरितां संपूर्ण महासागरामध्ये जर मी आज उडी घातली, तर तो नद्यांचा अधिपति असलेला सागरही माझ्या आगीमुळे खरोखर शुष्क होऊन जाईल.
४१९ रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनकात्मजाम् ।
अयोध्यामटवीं विद्धि गच्छ तात यथासुखम् ॥ २.४०.९
(सुमित्रा लक्ष्मणाला म्हणते.) बाबा, तूं रामाचे ठिकाणी दशरथ राजाची भावना कर, जनकात्मजा सीता मी आहे, असें समज. आणि अरण्य म्हणजे अयोध्या, असे समजून वनाला सुखाने जा.
४२० रामो भामिनि लोकस्य चातुर्वर्ण्यस्य रक्षिता ।
मर्यादानां च लोकस्य कर्ता कारयिता च सः ॥ ५.३५.११
(मारुति लंकेमध्ये सीतेच्यापुढे रामाचे गुण वर्णन करितो.) बाई सीते, राम हा चातुर्वर्ण्याचा रक्षणकर्ता असून लोकांना धर्ममर्यादा घालून देणारा व त्याप्रमाणे लोकांना वागविणाराही आहे.
४२१ लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् ।
अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ २.११२.१८
(राम भरताला म्हणतो.) फारतर काय, कांति चंद्राला सोडून जाईल, हिमालयपर्वतावरीलही बर्फ नाहीसे होईल व समुद्रही मर्यादेचे उलंघन करील, परंतु मी आपल्या पित्याच्या प्रतिज्ञेचा त्याग करणार नाही.
४२२ लोकप्रवादः सत्योऽयं पण्डितैः समुदाहृतः ।
अकाले दुर्लभो मृत्युः स्त्रिया वा पुरुषस्य वा ॥ ५.२५.१२
(सीता म्हणते.) स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय, अकाली मृत्यु येणे दुर्लभ होय, ही विद्वानांच्या तोंडची म्हण सत्य आहे.
४२३ वक्तव्यतां च राजानो वने राज्ये व्रजन्ति च ॥ ७.४३.६
(राम म्हणतो.) राजे वनामध्ये असोत अथवा राज्यावर असोत; लोक त्यांना काहींना काही तरी नावे ठेवीतच असतात.
४२४ वयस्यस्योपकर्तव्यं धर्ममेवानुपश्यता ॥ ४.१८.२९
धर्माकडे दृष्टि देऊन वागणाऱ्याने मित्रावर उपकार केलाच पाहिजे.
४२५ वर्जयेद्वज्रमुत्सृष्टं वर्जयेदन्तकश्चिरम् ।
त्वद्विधं नतु सङ्क्रुद्धो लोकनाथः स राघवः ॥ ५.२१.२३
(सीता रावणाला म्हणते.) इंद्राच्या हातून सुटलेले वज्र अथवा प्रत्यक्ष मृत्युही पुष्कळ दिवसपर्यंत कदाचित् तुझी उपेक्षा करील. परंतु ऋद्ध झालेला लोकनाथ राम तुझ्यासारख्याचा प्राणघात केल्याशिवाय रहाणार नाही.
४२६ वसेत्सह सपत्नेन कुद्धेनाशीविषेण च ।
न तु मित्रप्रवादेन संवसेच्छत्रुसेविना ॥ ६.१६.२
(रावण विभीषणाला म्हणतो.) शत्रूशी सहवास करावा. क्रुद्ध झालेल्या सर्पाबरोबरही रहावे; परंतु मित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि शत्रूची शुश्रूषा करणाऱ्या पुरुषाबरोबर कधी वास्तव्य करूं नये.
४२७ वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति
ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति ।
नद्यो घना मत्तगजा वनान्ताः
प्रियाविहीनाः शिखिनः प्लवङ्गमाः ॥ ४.२८.२७
(माल्यवान् पर्वतावर राहत असतां राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) सांप्रतकाळी नद्या वाहूं लागल्या आहेत, मेघांनी वर्षाव सुरू केला आहे, मदोन्मत्त हत्ती गर्जना करीत आहेत, वनप्रदेशामध्ये शोभा येत चालली आहे, प्रिय स्त्रियांचा वियोग झालेले पति स्त्रियांचे ध्यान करीत आहेत, मोर नृत्य करूं लागले आहेत आणि (सुग्रीवाला राज्य प्राप्त झाल्यामुळे) वानरांनाही धीर येऊ लागला आहे. (या श्लोकांतील पहिल्या दोन चरणांमध्ये क्रियापदे आली असून शेवटच्या दोन चरणांमध्ये त्या क्रियापदांचे कर्ते क्रमाने दिले आहेत।)
४२८ वाच्यावाच्यं प्रकुपितो न विजानाति कर्हिचित् ।
नाकार्यमस्ति क्रुद्धस्य नावाच्यं विद्यते क्वचित् ॥ ५.५५.५
अतिशय क्रुद्ध झालेला मनुष्य बोलावे काय, आणि बोलू नये काय, हे जाणत नाही. क्रुद्ध मनुष्याला अकार्य असे काही नाही, आणि अवाच्य असेंही काही नाही.
४२९ वामः कामो मनुष्याणां यस्मिन्किल निबध्यते ।
जने तस्मिस्त्वनुक्रोशः स्नेहश्च किल जायते ॥ ५.२२.४
(रावण सीतेला म्हणतो.) हा मनुष्यांचा काम दुष्ट आहे. रागावण्यास योग्य अशा मनुष्याचे ठिकाणी हा जडला, तर त्याविषयीं सुद्धा मनुष्याचे मनांत स्नेह व दया ही उत्पन्न होतात.
४३० वाहि वात यतः कान्ता तां स्पृष्ट्वा मामपि स्पृश ।
त्वयि मे गात्रसंस्पर्शश्चन्द्रे दृष्टिसमागमः ॥ ६.५.६
(सीताविरहामुळे शोकाकुल झालेला राम वाऱ्याला म्हणतो.) हे वायो, ज्या ठिकाणी माझी कांता आहे, तेथें जा, आणि तिला स्पर्श करून ये, नंतर मला स्पर्श कर. कारण, चंद्र दृष्टीस पडला असतां ज्याप्रमाणे उष्णतेमुळे झालेला संताप नाहीसा होतो, त्याप्रमाणे कांतेच्या शरीराला स्पर्श करून तूं मला स्पर्श केलास, म्हणजे माझा विरहजन्य संताप काही कमी होईल.
४३१ विक्लवो वीर्यहीनो यः स दैवमनुवर्तते ।
वीराः संभावितात्मानो न दैवं पर्युपासते ॥ २.२३.१७
जो भित्रा आणि पराक्रमहीन असतो, तो देवाच्या मागे लागतो. वीर आणि अबूदार पुरुष दैवाची कास धरून बसत नाहीत.
४३२ विगर्हितं च नीचं च कथमार्योऽभिधास्यति ।
त्राहीति वचनं सीते यस्त्रायेत्रिदशानपि ॥ ३.५९.११
(लक्ष्मण म्हणतो.) हे सीते; जो देवांचेही रक्षण करूं शकेल तो आर्य राम ``लक्ष्मणा, माझें संरक्षण कर'' हे क्षत्रियाला अयोग्य आणि म्हणूनच निंद्य असे शब्द कसे उच्चारील?
४३३ विदितश्चास्तु भद्रं ते योऽयं रणपरिश्रमः ।
सुतीर्णः सुहृदां वीर्यान्न त्वदर्थं मया कृतः ॥ ६.११५.१५
रक्षता तु मया वृत्तमपवादं च सर्वतः ।
प्रख्यातस्यात्मवंशस्य न्यङ्ग च परिमार्जता ॥ ६.११५.१६
(राम सीतेला म्हणतो.) तुझें कल्याण असो. मित्रांच्या सामर्थ्यामुळे ज्याच्यांतून मी चांगल्या रीतीने पार पडलों, तो हा संग्रामासंबंधी खटाटोप तुझ्या करिता केलेला नाही. हे तुला माहीत असू दे. आपले वर्तन कायम राखण्याकरितां, अपवाद सर्वस्वी टाळण्याकरितां आणि आपल्या प्रख्यात वंशाला आलेला कमीपणा नाहीसा करण्याकरिता हा सर्व खटाटोप मी केला आहे.
४३४ विद्यते गोषु सम्पन्नं विद्यते ज्ञातितो भयम् ।
विद्यते स्त्रीषु चापल्यं विद्यते ब्राह्मणे तपः ॥ ६.१६.९
(पद्मवनांत हत्तींनी म्हंटलेले श्लोक रावण विभीषणाला सांगतो.) गाईचे ठिकाणी हव्यकव्यसाधनसंपत्ति, ज्ञातींचे ठिकाणी भय, स्त्रियांचे ठिकाणी चंचलता व ब्राह्मणाचे ठिकाणी तप ही ठरलेलीच आहेत.
४३५ विनाशयन्ति भर्तारं सहिताः शत्रुभिर्बुधैः ।
विपरीतानि कृत्यानि कारयन्तीह मन्त्रिणः ॥ ६.६३.१७
विचारी शत्रूंशी मिळून गेलेले काहीं मंत्री धन्याचा नाश करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडून विपरीत कृत्ये करवितात.
४३६ विनाशे बहवो दोषा जीवन्प्राप्नोति भद्रकम् ।
तस्मात्प्राणान्धरिष्यामि ध्रुवो जीवति सङ्गमः ॥ ५.१३.४५
(लंकेत सीतेचा शोध लागेना त्यावेळी मारुति म्हणतो.) प्राणत्याग करण्यांत पुष्कळच दोष असून पुरुष जिवंत राहिला असतां त्याचे कधीतरी कल्याण होतेच. म्हणून मी प्राण धारण करून राहीन. कारण पुरुष कायम राहिल्यास त्याला इष्ट असलेली गोष्ट कधीतरी निःसंशय प्राप्त होतच असते.
४३७ विनीतविनयस्यापि प्रकृतिर्न विधीयते ।
प्रकृतिं गूहमानस्य निश्चयेन कृतिर्धुवा ॥ ७.५९ प्र.२.२६
ज्याला विनयाचे शिक्षण मिळाले आहे, त्यालाही मूळस्वभाव टाकितां येत नाही. ह्यास्तव (दुष्ट) स्वभाव जरी एखाद्याने बाहेर दाखविला नाही, तरी (दुष्ट) कृत्य त्याच्या हातून होणार हे ठरलेलेच आहे.
४३८ विलीयमानैर्विहगैर्निमीलद्भिश्च पङ्कजैः ।
विकसन्त्या च मालत्या गतोऽस्तं ज्ञायते रविः ॥ ४.२८.५२
सांप्रत पक्षी आपापल्या घरट्यांत जाऊ लागले आहेत, सूर्यविकासी कमले मिटली आहेत, आणि मालती प्रफुलित झाली आहे, यावरून सूर्य अस्तास गेला आहे असे समजतें.
४३९ विव्यथे भरतो तीव्रव्रणे तुद्येव सूचिना ॥ २.७५.१७
(कौसल्येनें निर्भर्त्सना केली असता) भरत, तीव्र व्रणाचे ठिकाणी सुईने टोचावे, त्याप्रमाणे व्यथित झाला.
४४० विषादनक्राध्युषिते परित्रासोर्मिमालिनि ।
किं मां न त्रायसे मग्नां विपुले शोकसागरे ॥ ३.२१.१२
(कान व नाक कापले गेल्यानंतर शूर्पणखा भ्रात्या खराला म्हणते.) खेदरूप नक्रांचें ज्यांत वास्तव्य आहे, आणि ज्यावर त्रासरूप लाटा उसळत आहेत अशा अगाध शोकसागरांत मग्न झालेल्या माझा उद्धार तूं का बरे करीत नाहींस?
४४१ व्यसने वार्थकृच्छ्रे वा भये वा जीवितान्तगे ।
विमृशंश्च स्वया बुद्ध्या धृतिमान्नावसीदति ॥ ४.७.९
संकटकाली, धनाचा नाश झाला असतां, अथवा जीविताचा नाश करणारे असें भय प्राप्त झाले असतांही स्वताच्या बुद्धीने विचार करणारा धैर्यवान पुरुष मनामध्ये खचत नाही.
४४२ व्रतोपवासनिरता या नारी परमोत्तमा ।
भर्तारं नानुवर्तेत सा च पापगतिर्भवेत् ॥ २.२४.२६
आचरणाने सर्वोत्कृष्ट आणि नेहमी व्रतें व उपवास करणारी अशी जरी स्त्री असली, तरी भर्त्याच्या अनुरोधाने जर ती वागत नसेल तर तिला नरकप्राप्ति होते.
४४३ शक्यमापतितः सोढुं प्रहारो रिपुहस्ततः ।
सोढुमापतितः शोकः सुसूक्ष्मोऽपि न शक्यते ॥ २.६२.१६
शत्रूच्या हातचा प्रहार सहन करणे शक्य आहे. परंतु प्राप्त झालेला अतिसूक्ष्मही शोक सहन करणे शक्य नाही.
४४४ शक्या लोभयितुं नाहमैश्वर्येण धनेन वा ।
अनन्या राघवेणाहं भास्करेण यथा प्रभा ॥ ५.२१.१५
(सीता रावणाला म्हणते.) ऐश्वर्याच्या योगाने अथवा धनाच्या योगाने माझे मन कोणालाही वळविता येणे शक्य नाही. कारण, सूर्यापासून जशी त्याची प्रभा भिन्न नाही, तशीच मी रामापासून भिन्न नाही.
४४५ शतयोजनविस्तीर्णः सागरो मकरालयः ।
विक्रमश्लाघनीयेन क्रमता गोष्पदीकृतः ॥ ५.३६.८
(सीता मारुतीला म्हणते.) मकरांचे वसतिस्थान, तसेंच शंभर योजनें विस्तीर्ण अशा समुद्राचे उल्लंघन करून तूं त्याला गाईच्या पावलाप्रमाणे करून टाकिलें आहेस. त्याअर्थी तुझा पराक्रम अत्यंत वर्णनीय आहे.
४४६ शरार्चिषमनाधृष्यं चापखड्गेन्धनं रणे ।
रामाग्निं सहसा दीप्तं न प्रवेष्टुं त्वमर्हसि ॥ ३.३७.१५
(मारीच रावणाला म्हणतो.) बाण ह्या ज्याच्या ज्याला आहेत, धनुष्य व खड्ग ही ज्याची इंधने आहेत, व ज्याच्यासमोर जाणेही दुर्घट आहे अशा रामरूप प्रदीप्त अग्नीत रणामध्ये अविचाराने प्रवेश करणे तुला योग्य नाही.
४४७ शिलातलं प्राप्य यथा मृगेन्द्रो
महारणं प्राप्य यथा गजेन्द्रः ।
राज्यं समासाद्य यथा नरेन्द्र-
स्तथा प्रकाशो विरराज चन्द्रः ॥ ५.५.७
(लंकेंत गेलेल्या मारुतीने आकाशाच्या मध्यभागी आलेला चंद्र अवलोकन केला.) शिलातलावर प्राप्त झालेला सिंह, मोठ्या रणांगणावर येऊन ठेपलेला गजश्रेष्ठ, राज्यप्राप्ति झालेला नरपति जसे शोभतात, त्याप्रमाणे ह्या वेळी प्रकाशमान झालेला चंद्र शोभत होता.
४४८ शुभं वा यदि वा पापं यो हि वाक्यमुदीरितम् ।
सत्येन प्रतिगृह्णाति स वीरः पुरुषोत्तमः ॥ ४.३०.७२
शुभ किंवा अशुभ वाक्य एकदां उच्चारिले असता तें जो खरें करून दाखवितो तोच वीर पुरुषश्रेष्ठ होय.
४४९ शुभकृच्छुभमाप्नोति पापकृत्पापमश्नुते ।
विभीषणः सुखं प्राप्तस्त्वं प्राप्तः पापमीदृशम् ॥ ६.११.२६
(मंदोदरी वध पावलेल्या रावणाला उद्देशून म्हणते.)
पुण्यकर्म करणाऱ्याला कल्याणप्राप्ति होते, तर पापकर्म करणाऱ्याला पापफळ भोगावे लागते. बिभीषणाला सुखाची प्राप्ति झाली, आणि (त्याच्या उलट) तुला अशी वाईट स्थिति प्राप्त झाली आहे.
४५० शुष्ककाष्ठैभवेत्कार्यं लोष्टैरपि च पांसुभिः ।
न तु स्थानात्परिभ्रष्टैः कार्यं स्याद्वसुधाधिपैः ॥ ३.३३.१८
शुष्क काष्ठांनी, मातीच्या ढेकळांनी, तसेंच रजःकणांनीही कार्ये होतात. परंतु राजा एकदा स्थानभ्रष्ट झाला म्हणजे त्याजपासून कोणतेही कार्य होत नाही.
४५१ शूराश्च बलवन्तश्च कृतास्त्राश्च रणाजिरे ।
कालाभिपन्नाः सीदन्ति यथा वालुकसेतवः ॥ ३.६९.५०
शूर असोत, बलवान् असोत, अथवा रणभूमीवर अस्त्रविद्यानैपुण्य दाखविणारे असोत, कालानें व्याप्त झाले असतां ते वाळूच्या सेतूप्रमाणे नाश पावतात.
४५२ शूरेण धनदभ्रात्रा बलैः समुदितेन च ।
अपोह्य रामं कस्माच्चिद्दारचौर्यं त्वया कृतम् ॥ ५.२२.२२
(सीता रावणाला म्हणते.) सैन्यांच्या योगाने प्रबल झालेला तूं कुबेराचा भ्राता मोठा शूर पडलास; म्हणूनच मारीच राक्षसाच्या मायेनें रामाला दूर घालवून स्त्रीचौर्य करण्याचे शौर्य तुझ्या हातून घडले.
४५३ शोकश्च किल कालेन गच्छता ह्यपगच्छति ।
मम चापश्यतः कान्तामहन्यहनि वर्धते ॥ ६.५.४
(राम लक्ष्मणाला म्हणतो.) काल जसजसा जातो, तसतसा शोक खरोखर कमी होत असतो. परंतु सीता दृष्टीस पडत नसल्यामुळे माझा शोक तर दिवसेंदिवस वाढत आहे.
४५४ शोकः सर्वार्थनाशनः ॥ ६.२.१७
शोक हा सर्वार्थांचा नाशक आहे.
४५५ शोकेनाभिप्रपन्नस्य जीविते चापि संशयः ॥ ४.७.१३
शोकाने मनुष्य व्याप्त झाला असता जीविताविषयीं देखील संशय उत्पन्न होत असतो.
४५६ शोको नाशयते धैर्य शोको नाशयते श्रुतम् ।
शोको नाशयते सर्वं नास्ति शोकसमो रिपुः ॥ २.६२.१५
शोक धैर्याचा नाश करितो, शोक (शिकलेल्या) शास्त्रविद्येचा नाश करितो, शोक सर्वांचा नाश करितो. म्हणून शोकासारखा दुसरा शत्रु नाही.
४५७ शोच्यस्त्वमसि दुर्बुद्धे निन्दनीयश्च साधुभिः ।
यस्त्वं स्वजनमुत्सृज्य परभृत्यत्वमागतः ॥ ६.८७.१३
(इंद्रजित बिभीषणाला म्हणतो.) हे दुर्बुद्धे, ज्याअर्थी स्वजनांचा त्याग करून तूं परक्यांचा दास झाला आहेस, त्याअर्थी तुझी स्थिति शोचनीय झाली असून तूं सज्जनांच्या निंदेस पात्र झाला आहेस.
४५८ श्रूयते हि द्रुमः कश्चिच्छेत्तव्यो वनजीवनैः ।
सन्निकर्षादिषीकाभिर्मोचितः परमाद्भयात् ॥ २.८.३०
(मंथरा कैकेयीला म्हणते.) वनामध्ये उपजीविका करणाऱ्यांना एक वृक्ष तोडावयाचा होता; परंतु त्याच्या भोवताली असलेल्या कांटेरी झुडपांनी त्या पराकाष्ठेच्या तोडण्याच्या भीतीपासून त्या वृक्षाला मुक्त केलें असें ऐकण्यांत आहे.
४५९ षट्पादतन्त्रीमधुराभिधानं
प्लवङ्गमोदीरितकण्ठतालम् ।
आविष्कृतं मेघमृदङ्गनादै-
र्वनेषु सङ्गीतमिव प्रवृत्तम् ॥ ४.२८.३६
(राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) वनामध्ये आज गायन सुरू झाल्यासारखे वाटत आहे. कारण भृंग गुंजारव करीत असल्यामुळे तंतुवाद्यांच्या मधुरध्वनीचा भास होत आहे. बेडूक शब्द करीत असल्यामुळे कोणी गवईच आपल्या कंठांतून तालसूर काढीत असल्यासारखे भासत आहे. आणि मेघांची गर्जना चालू असल्यामुळे मृदंगवादनच सुरू असल्याचा भास होत आहे.
४६० संश्रुत्य च न शक्ष्यामि जीवमानः प्रतिश्रवम् ।
मुनीनामन्यथाकर्तुं सत्यमिष्टं हि मे सदा ॥ ३.१०.१७
(राम सीतेला म्हणतो.) एकदां जी मुनींच्या जवळ प्रतिज्ञा केली, त्या प्रतिज्ञेचे जिवांत जीव आहे तोपर्यंत माझ्याने उल्लंघन होणे शक्य नाही.
४६१ सक्तं ग्राम्येषु भोगेषु कामवृत्तं महीपतिम् ।
लुब्धं न बहु मन्यन्ते श्मशानाग्निमिव प्रजाः ॥ ३.३३.३
जो राजा ग्राम्य विषयांचे ठिकाणी आसक्त होऊन मनास येईल, तसें वर्तन करणारा आणि लोभी असतो, त्यास प्रजा स्मशानांतील अग्नीप्रमाणे अनादरणीय समजतात.
४६२ सञ्जीवितं क्षिप्रमहं त्यजेयं
विषेण शस्त्रेण शितेन वापि ।
विषस्य दाता न तु मेऽस्ति कश्चि-
च्छस्त्रस्य वा वेश्मनि राक्षसस्य ॥ ५.२८.१६
(रावणाच्या कारागृहांत त्रस्त झालेली सीता म्हणते.) विषानें किंवा तीक्ष्ण शस्त्राने मी आतां जीविताचा त्याग सत्वर करणार आहे, परंतु या राक्षसाच्या गृहांत विष किंवा शस्त्र कोणी मला आणून देईल, असा नाही.
४६३ स तु श्रेष्ठेर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ।
बहिश्चर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥ २.१.१९
उत्कृष्ट गुणांनी संपन्न असलेला तो राजकुमार राम आंगच्या गुणांमुळे प्रजाजनांना शरीराबाहेर संचार करणारा प्राणच की काय असा - प्रिय झाला.
४६४ सत्यधर्माभिरक्तानां नास्ति मृत्युकृतं भयम् ॥ ६.४६.३४
सत्यधर्माचे ठिकाणी आसक्त झालेल्या लोकांना मृत्यूचें भय नसते.
४६५ सत्यमेकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः ।
सत्यमेवाक्षया वेदाः सत्येनावाप्यते परम् ॥ २.१४.७
सत्य हे एकपदरूप (Oंकाररूप) ब्रह्म आहे; सत्याचे ठिकाणी धर्माची स्थिति आहे; अक्षय वेदही सत्याच्याच आश्रयाने आहेत. सत्याने परब्रह्माची प्राप्ति होते.
४६६ सत्यमेवेश्वरो लोके सत्ये धर्मः सदाश्रितः ॥ २.१०९.१३
सत्य म्हणजेच परमेश्वर होय, सज्जनांनी आश्रय केलेला धर्म सत्याचे ठिकाणी आहे.
४६७ सत्यं बतेदं प्रवदन्ति लोके ।
नाकालमृत्युर्भवतीति सन्तः ॥ ५.२८.३
(सीता म्हणते.) अकाली कोणालाही मरण येत नाही, म्हणून सत्पुरुष बोलतात, ते सत्य आहे.
४६८ सत्यश्चात्र प्रवादोऽयं लौकिकः प्रतिभाति मा ।
पितृन्समनुजायन्ते नरा मातरमङ्गनाः ॥ २.३५.२८
(सुमंत्र सारथि कैकेयीला म्हणतो.) पुरुष पित्याप्रमाणे होतात आणि स्त्रिया मातेप्रमाणे निपजतात, या लौकिक म्हणीची सत्यता ह्या तुझ्या आचरणांत तर मला अगदी खरोखर पटत आहे.
४६९ सदृशाच्चापकृष्टाच लोके कन्यापिता जनात् ।
प्रधर्षणमवाप्नोति शक्रेणापि समो भुवि ॥ २.११८.३५
कन्येचा पिता हा पृथ्वीवर इंद्रासारखा असला, तरी आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्याहून कमी योग्यतेच्याही वरपक्षाकडून त्याचा अपमान होतो. (मग योग्यतेने अधिक असलेल्या वरपक्षाची तर गोष्ट पाहिजे कशाला !)
४७० सन्तश्चारित्रभूषणाः ॥ ६.११३.४२
सजनांचे भूषण म्हणजे त्यांचे चारित्र्य होय.
४७१ सन्निकर्षाच्च सौहार्दं जायते स्थावरेष्विव ॥ २.८.२८
(मंथरा कैकेयीला म्हणते.) वृक्षलतादिकांचे ठिकाणी सांनिध्यामुळे जसें परस्परसंयोगरूप प्रेम वाढत असते, तसें मनुष्यांमध्येही सांनिध्यामुळेच प्रेम वाढत असते.
४७२ स भारः सौम्य भर्तव्यो यो नरं नावसादयेत् ।
तदन्नमपि भोक्तव्यं जीर्यते यदनामयम् ॥ ३.५०.१८
(जटायु रावणाला म्हणतो.) हे सौम्या, ज्याच्याखाली चिरडून जाण्याची पाळी येणार नाही, तो भार मनुष्याने उचलावा आणि अन्न तरी रोगोत्पत्ति न होतां जें जिरेल तेच खावें.
४७३ समुत्पतितमेघस्य वीचिमालाकुलस्य च ।
विशेषो न द्वयोरासीत्सागरस्याम्बरस्य च ॥ ६.४.१२०
उद्भवलेल्या मेघांनी युक्त असलेलें आकाश आणि लाटांच्या समुदायांनी व्याप्त होऊन गेलेला समुद्र ह्यांमध्ये काहीएक भेद दिसेनासा झाला.
४७४ सम्पृष्टेन तु वक्तव्यम् ॥ ३.४०.९
विचारले असतां बोलावें.
४७५ सम्प्राप्तमवमानं यस्तेजसा न प्रमार्जति ।
कस्तस्य पौरुषेणार्थो महताप्यल्पचेतसः ॥ ६.११५.६
(राम सीतेला म्हणतो.) अपमान झाला असतां जो तेजाच्या योगाने त्याचे परिमार्जन करीत नाही, त्या मंदमति पुरुषाचा पराक्रम जरी मोठा असला तरी त्याचा काय उपयोग?
४७६ सरितां तु पतिः स्वल्पां मर्यादां सत्यमन्वितः ।
सत्यानुरोधात्समये वेलां स्वां नातिवतेते ॥ २.१४.६
समुद्र सत्यव्रत असल्या करणाने सत्याचा त्याग होईल, या भीतीने (चंद्रोदयकाली) स्वल्प मर्यादा उलंध्य असूनही तो स्वतःच्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाही.
४७७ सर्वत्र खलु दृश्यन्ते साधवो धर्मचारिणः ।
शूराःशरण्याःसौमित्रे तिर्यग्योनिगतेष्वपि ॥ ३.६८.२४
(सीतेला सोडविण्यासाठी रावणापाशी युद्ध करीत असतां जटायु पक्षी मरण पावला हे पाहून राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, शूर व शरण जाण्यास योग्य असे धर्माने वागणारे साधुजन खरोखर सर्वत्र म्हणजे तिर्यग्योनि प्राप्त झालेल्या प्राण्यांतही दृष्टीस पडतात.
४७८ सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं प्रतिपालनम् ।
अनित्यत्वात्तु चित्तानां प्रीतिरल्पेऽपि भिद्यते ॥ ४.३२.७
(सुग्रीव मंत्र्यांना म्हणतो.) मित्र संपादन करणे सुलभ आहे, परंतु त्याच्याशी सख्य कायम राखणे मात्र सर्व प्रकारे कठीण आहे. कारण, अंतःकरणे स्थिर नसल्यामुळे शत्रुंनी अल्पस्वल्प जरी मित्राच्या कानांत सांगितले, तरी सुद्धा उभयतांतील प्रेमाला व्यत्यय येतो.
४७९ सर्वदा सर्वभूतानां नास्ति मृत्युरलक्षणः ।
तव तद्वदयं मृत्युर्मैथिलीकृतलक्षणः ॥ ६.१११.२९
(मंदोदरी रावणाला उद्देशून म्हणते.) सर्व प्राण्यांना सर्वकाळी निमित्तावांचून मृत्यु नाही, त्याप्रमाणे तुला हा आलेला मृत्यु सीतेच्या निमित्ताने आहे.
४८० सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः ।
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं च जीवितम् ॥ ७.५२.११
तस्मात्पुत्रेषु दारेषु मित्रेषु च धनेषु च ।
नातिप्रसङ्गः कर्तव्यो विप्रयोगो हि तैर्ध्रुवम् ॥ ७.५२.१२
सर्व ऐश्वर्यांचा शेवट नाशांत होतो, उच्चत्वाचा शेवट पतनांत होतो, संयोगाचा शेवट वियोगांत होतो, आणि जीविताचा शेवट मरणांत होतो. म्हणून पुत्र, स्त्री, मित्र, धनसंपत्ति यांच्या ठिकाणी अतिशय आसक्ति कधीं करूं नये. कारण, त्यांचा वियोग निःसंशय व्हावयाचाच आहे.
४८१ सर्वे चण्डस्य बिभ्यति ॥ ६.२.२१
जो अत्यंत क्रुद्ध असतो, त्याला सर्व भितात.
४८२ स सुहृयो विपन्नार्थं दीनमभ्युपपद्यते ।
स बन्धुर्योपनीतेषु साहाय्यायोपकल्पते ॥ ६.६३.२७
ज्याचा कार्यभाग नष्ट झाला आहे, अशा दीनावर जो उपकार करितो, तोच सुहृद होय, आणि नीतिमार्गापासून दूर गेलेल्या लोकांना नीतिमार्गावर आणून सोडण्यासाठी जो साह्य करण्यास तयार असतो तो बंधु होय.
४८३ सहस्राण्यपि मूर्खाणां यदयुपास्ते महीपतिः ।
अथवाप्ययुतान्येव नास्ति तेषु सहायता ॥ २.१००.२३
एकोऽप्यमात्यो मेधावी शूरो दक्षो विचक्षणः ।
राजानं राजपुत्रं वा प्रापयेन्महतीं श्रियम् ॥ २.१००.२४
(राम भरताला म्हणतो.) हजारोंच नव्हे परंतु लाखों मूर्ख लोक जरी राजाजवळ असले तरी त्यांची राजाला मदत होत नाही. परंतु बुद्धिमान, शूर, दक्ष व नीतिशास्त्रवेत्ता असा एक जरी अमात्य जवळ असला, तरी तो राजाला अथवा राजपुत्राला मोठे वैभव प्राप्त करून देईल. (``अयुत'' म्हणजे दहा हजार, असा अर्थ असतांना ``अयुतानि'' याचे भाषांतर भाषेत जुळण्याकरितां लाखों असें केले आहे।)
४८४ सहैव मृत्युर्व्रजति सह मृत्युर्निषीदति ।
गत्वा सुदीर्घमध्वानं सह मृत्युर्निवर्तते ॥ २.१०५.२२
(राम भरताला म्हणतो.) प्राणी जाऊ लागला तरी मृत्यु त्याच्या बरोबर जातोच; तो बसला तरी मृत्यु त्याच्या बरोबर बसतोच, आणि बराच दूर मार्ग चालून प्राणी परत फिरूं लागला, तरी देखील मृत्यु त्याच्या बरोबरच चालत जाऊन परत फिरतो (मृत्यु प्राण्यांच्या संनिध एकसारखा आहेच आहे।)
४८५ सागरं चाम्बरप्रख्यमम्बरं सागरोपमम् ।
रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव ॥ ६.१०७.५१
सागर आकाशासारखा आहे तसें आकाश सागरासारखे आहे. परंतु रामरावणाचे युद्ध म्हणजे रामरावणांच्या सारखेच होय. (त्याला उपमाच नाही.)
४८६ सापराधोऽपि बालो हि रक्षितव्यः स्ववान्धवैः ॥ ७.१३.२०
कोणी बालक जरी अपराधी असला, तरी त्याचे बांधवांनी रक्षण करणे योग्य आहे.
४८७ सीताहरणजं दुःखं न मे सौम्य तथागतम् ।
यथा विनाशो गृध्रस्य मत्कृते च परन्तप ॥ ३.६८.२५
(जटायूचा वध झाल्यानंतर राम लक्ष्मणाला म्हणतो.) हे विनयसंपन्न शत्रुतापना, माझ्याकरितां गृध्रपक्ष्याचा (जटायूचा) वध झाला, याबद्दल जसा माझ्या मनाला चटका लागून राहिला आहे, तसा सीतेचा अपहार झाल्यामुळे होणाऱ्या दुःखाचा चटका लागून राहिलेला नाही.
४८८ सुजीवं नित्यशस्तस्य यः परैरुपजीव्यते ।
राम तेन तु दुर्जीवं यः परानुपजीवति ॥ २.१०५.७
(भरत म्हणतो.) हे रामा, ज्या पुरुषाच्या जीवितावर दुसरे जीवित चालवितात, त्या पुरुषाचे जीवित धन्य होय. तसेंच ज्या पुरुषाचे जीवित दुसऱ्यावर अवलंबून असते, तें जीवित दुःखावह होय.
४८९ सुनीतं हितकामेन वाक्यमुक्तं दशानन ।
न गृह्णन्त्यकृतात्मानः कालस्य वशमागताः ॥ ६.१६.२०
(बिभीषण रावणाला म्हणतो.) हे दशानना, हितेच्छ पुरुषाने उत्कृष्टनीतीला अनुसरूनही केलेले भाषण कालाच्या तावडीत सापडलेले अजितेंद्रिय पुरुष स्वीकारीत नाहीत.
४९० सुमुखं दुर्मुखी रामं वृत्तमध्यं महोदरी ।
विशालाक्षं विरूपाक्षी सुकेशं ताम्रमूर्धजा ॥ ३.१७.९
प्रियरूपं विरूपा सा सुस्वरं भैरवस्वना ।
तरुणं दारुणा वृद्धा दक्षिणं वामभाषिणी ॥ ३.१७.१०
न्यायवृत्तं सुदुर्वृत्ता प्रियमप्रियदर्शना ।
शरीरजसमाविष्टा राक्षसी राममब्रवीत् ॥ ३.१७.११
(रामाजवळ शूर्पणखा आली आणि बोलू लागली.) राम सुंदर मुखाचा, तर ती (शूर्पणखा) दुर्मुखी; राम कृश उदराचा, तर ती महोदरी, राम विशालाक्ष, तर ती विरूपाक्षी; राम सुंदर केशांचा, तर ती ताम्रकेशी; राम सुस्वरूप, तर ती कुरूप; रामाचा सुस्वर तर तिचा कर्कश स्वर, राम तरुण तर ती क्रूर व वृद्धः राम चतुर भाषण करणारा; तर ती दुर्भाषण करणारी; राम न्यायाने वागणारा, तर ती अत्यन्त दुर्वृत्तः राम सर्वांस प्रिय, तर ती सर्वांस अप्रिय, अशी ती कामपीडित (शूर्पणखा) राक्षसी रामाला म्हणाली. (या ठिकाणी राम व शूर्पणखा यांना दिलेली विशेषणे परस्पर विरुद्ध आहेत।)
४९१ सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ॥ ३.३७.२
(मारीच रावणाला म्हणतो.) हे राजा, (हिताहिताचा विचार न करितां केवळ) सतत मधुर भाषण करणारे पुरुष सुलभ आहेत, परंतु अप्रिय जरी असले तरी हितकारक भाषण करणारा वक्ता आणि तें ऐकून घेणारा श्रोता हे दुर्लभ आहेत.
४९२ सुहृदामर्थकृच्छेषु युक्तं बुद्धिमता सदा ।
समर्थेनोपसन्देष्टुं शाश्वती भूतिमिच्छता ॥ ६.१७.३३
(राम वानरांना म्हणतो.) मित्रांचा निरंतर अभ्युदय व्हावा, अशी इच्छा करणाऱ्या बुद्धिमान् व विचारसमर्थ पुरुषानें, कार्याकार्याविषयी संदेह प्राप्त झाला असता, मित्रांना उपदेश करणे सर्वदा योग्यच आहे.
४९३ सूक्ष्मः परमविज्ञेयः सतां धर्मः प्लवङ्गम ।
हृदिस्थः सर्वभूतानामात्मा वेद शुभाशुभम् ॥ ४.१८.१५
(राम वालीला म्हणतो.) हे वानरा, सज्जनांचा धर्म सूक्ष्म असल्यामुळे तो इतरांना समजणे अत्यंत अशक्य आहे. प्राणिमात्राच्या हृदयामध्ये वास करणारा परमात्मा मात्र प्राण्यांचे पापपुण्य जाणीत आहे.
४९४ सौमित्रे योऽभिषेकार्थे मम सम्भारसम्भ्रमः ।
अभिषेकनिवृत्त्यर्थे सोऽस्तु सम्भारसम्भ्रमः ॥ २.२२.५
(राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, माझ्या अभिषेकाचं सामान जितक्या त्वरेनें जुळविण्यात आले आहे, तितक्या त्वरेनें वनवासाला जाण्याच्या सामग्रीची तयारी झाली पाहिजे.
४९५ स्त्रिया भर्ता हि दैवतम् ॥ २.३९.३१
पति म्हणजे स्त्रियांचे दैवतच होय.
४९६ स्त्रीणां पवित्रं परमं पतिरेको विशिष्यते ॥ २.३९.२४
स्त्रियांना पति हेच उत्कृष्ट पुण्यसाधन आहे, स्त्रीला इतर सर्व पुण्यसाधनांपेक्षां पति अधिक आहे.
४९७ स्थिरं हि नूनं हृदयं ममायसं
न भिद्यते यद्भुवि नो विदीर्यते ।
अनेन दुःखेन च देहमर्पितं
ध्रुवं ह्यकाले मरणं न विद्यते ॥ २.२०.५१
(राम वनवासाला जाणार हे ऐकून शोकाकुल झालेली कौसल्या म्हणते.) खरोखर माझं हृदय ज्याअर्थी ह्या प्रसंगी फाटून जात नाही, त्याअर्थी तें लोखंडाचे बनविल्याप्रमाणे बळकट आहे आणि अशा प्रकारच्या दुःखाने देह व्याप्त झाला असतांना देखील ज्याअर्थी तो विदीर्ण होऊन पृथ्वीवर पडत नाही, त्याअर्थी मरण अकाली कोणाला येत नाही, हेच निश्चित आहे.
४९८ स्निग्धस्य भजमानस्य युक्तमर्थाय कल्पितुम् ॥ ७.२५.४९
प्रेमाने आपल्याजवळ येणाऱ्याच्या उपयोगी पडणे योग्य आहे.
४९९ स्वर्गों धनं वा धान्यं वा विद्याः पुत्राः सुखानि च ।
गुरुवृत्त्यनुरोधेन न किञ्चिदपि दुर्लभम् ॥ २.३०.३६
(राम सीतेला म्हणतो.) वडिलांच्या तंत्राने वागणाऱ्याला स्वर्ग, धन, धान्य, विद्या, पुत्र आणि सुख ह्यांपैकी काहींच दुर्लभ नाही.
५०० स्वामिना प्रतिकूलेन प्रजास्तीक्ष्णेन रावण ।
रक्ष्यमाणा न वर्धन्ते मृगा गोमायुना यथा ॥ ३.४१.१४
(मारीच रावणाला म्हणतो.) व्याध रक्षण करीत असतांना ज्याप्रमाणे मृग वृद्धिंगत होत नाहीत, त्याचप्रमाणे प्रतिकूल आणि उग्र असा राजा रक्षण करीत असतांना प्रजेची भरभराट होत नाही.
५०१ हंसो यथा राजतपञ्जरस्थः
सिंहो यथा मन्दरकन्दरस्थः ।
वीरो यथा गर्वितकुञ्जरस्थ
श्चन्द्रोऽपि बभ्राज तथाम्बरस्थः ॥ ५.५.४
(लंकेत गेलेल्या मारुतीने चंद्र अवलोकन केला.) रुप्याच्या पिंजऱ्यामध्ये असलेला हंस जसा शोभतो, मंदरपर्वताच्या गुहेत राहिलेला सिंह जसा दिसतो आणि मदोन्मत्त हत्तीवर आरूढ झालेला वीर जसा चमकतो, तसा आकाशांत असलेला चंद्र झळकू लागला.
५०२ हित्वा धर्मं तथार्थं च कामं यस्तु निषेवते ।
स वृक्षाग्रे यथा सुप्तः पतितः प्रतिबुध्यते ॥ ४.३८.२२
(राम सुग्रीवाला म्हणतो.) धर्म व अर्थ यांची पर्वा न करिता जो कामाचेच सेवन करितो, तो, वृक्षाग्रावर झोपी गेलेला पुरुष ज्याप्रमाणे खाली पडल्यावर जागा होतो, त्याप्रमाणे ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्यानंतर शुद्धीवर येतो.
इति ।
0 Comments
If you have any Misunderstanding Please let me know