Ad Code

श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि सार्थ मराठी

  श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि सार्थ मराठी 



वर्णाद्याक्षरक्रमः

       १ अकृत्रिमं सुखं कीर्तिमायुश्चैवाभिवाञ्छता । प्र०स०श्लो ।

         सर्वाभिमतदानेन पूजनीया गुणान्विताः ॥ ३.७७.२६

स्वाभाविक सुख, कीर्ति आणि आयुष्य ह्यांची इच्छा करणाऱ्या मनुष्याने सर्वांना इष्ट अशा दानाच्या योगाने गुणिजनांचा सत्कार करणे योग्य आहे.


       २ अकृत्रिमफलं त्यक्त्वा यः कृत्रिमफलं ब्रजेत् ।

         त्यक्त्वा स मन्दारवनं कारनं याति काननम् ॥ ६.२९.१२६

स्वाभाविक फळ सोडून कृत्रिम फळाच्या मागे लागणारा, स्वर्गातील मंदारवन सोडून कडू करंजाच्या वनांत जाणारा समजावा.


       ३ अजितात्मा जनो मूढो रूढो भोगैककर्दमे ।

         आपदा पात्रतामेति पयसामिव सागरः ॥ ७.३३.२२

ज्याप्रमाणे पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे आत्मसंयमन न करणाऱ्या व भोगरूपी चिखलात रुतून गेलेल्या मूढ मनुष्याला सर्व आपत्ति प्राप्त होतात.


       ४ अज्ञतातज्ज्ञते पूर्वं वक्तुनिर्णीय कार्यतः ।

         यः करोति नरः प्रश्नं प्रच्छकः स महामतिः ॥ २१४७

व्यवहारावरून वक्ता तज्ज्ञ आहे किंवा नाही, याचा प्रश्न करण्यापूर्वी विचार करून नंतर जो मनुष्य प्रश्न करितो तो खरोखरीच बुद्धिमान होय.


       ५ अज्ञस्यार्धप्रबुद्धस्य सर्वं ब्रह्मेति यो वदेत् ।

         महानरकजालेषु स तेन विनियोजितः ॥  ४.।३९.२४

अगदी अज्ञ असलेल्या व अर्धवट ज्ञान झालेल्या शिष्याला `` हे सर्व ब्रह्म आहे `` असा बोध जो गुरु करितो तो त्या शिष्याला महानरकांतच लोटतो.


       ६ अज्ञानमपि नास्त्येव प्रेक्षितं यन्न लभ्यते ।

         विचारिणा दीपवता स्वरूपं तमसो यथा ॥ ७.५७.५

ज्याप्रमाणे दिवा घेऊन अंधकाराचा शोध करणाऱ्याला अंधकार कधीहि दिसावयाचा नाही, त्याप्रमाणे विचारपूर्वक पाहणारास अज्ञान देखील नाही, असे दिसून येईल.


       ७ अज्ञोऽपि तज्ज्ञतामेति शनैः शैलोऽपि चूर्ण्यते ।

         बाणोऽप्येति महालक्ष्यं पश्याभ्यासविजृम्भितम् ॥ ७.६७.२६

(विद्याधरी वसिष्ठांना म्हणते) अभ्यासाचा म्हणजे पुनः पुनः एखादी गोष्ट केल्याचा परिणाम पहा. या अभ्यासाने अज्ञ देखील तज्ज्ञ होतो, हळूहळू पर्वताचेंहि चूर्ण अभ्यासामुळे होते, आणि अचेतन असलेला बाण देखील धनुर्धराच्या अभ्यासामुळेच सूक्ष्म लक्ष्याचा वेध करू शकतो.


       ८ अत उक्तं मया राम यदि शुद्धे हि चेतसि ।

         उपदेशः प्रसरति तैलबिन्दुरिवाम्भसि ॥ ७.१६.४

श्रीवसिष्ठ म्हणतात-पाण्यामध्ये पडलेला तेलाचा थेंब जसा सहज पसरतो, तसा शुद्ध अन्तःकरणाच्या शिष्याला केलेला उपदेश तत्काळ ठसतो.


       ९ अतज्ज्ञायैव विषया स्वदन्ते न तु तद्विदः ।

         न हि पीतामृतायान्तः स्वदते कटु काञ्जिकम् ॥ ७.४५.४०

तत्त्व न जाणणा-या पुरुषालाच विषय आवडतात, तत्त्ववेत्त्याला कधीहि आवडत नाहीत. कारण अमृत पिऊन तृप्त झालेल्याला कडू कांजी पिण्याची इच्छाच होणार नाही.


       १० अत्राहारार्थं कर्म कुर्यादनिन्दयं

              कुर्यादाहारं प्राणसन्धारणार्थम् ।

          प्राणाः सन्धार्यास्तत्त्वजिज्ञासनार्थम् ।

              तत्त्वं जिज्ञास्यं येन भूयो न दुःखम् ॥ ७.२१.१०

मुमुक्षु पुरुषाने या लोकी आहारासाठी निंद्य कर्म करू नये. आहार प्राणधारण होण्यासाठी करावा. तत्त्वजिज्ञासेकरितांच प्राणांच धारण करावे व ज्याच्या ज्ञानाने पुनः  दुःख उत्पन्न होण्याचा प्रसंग येणार नाहीं, तेंच तत्त्व जाणण्याची इच्छा करावी.


       ११ अथापदं प्राप्य सुसंपदं वा

              महामतिः स्वप्रकृतं स्वभावम् ।

          जहाति नो मन्दरवेल्लितोऽपि

              शौक्लयं यथा क्षीरमयाम्बुराशिः ॥ ५.९३.९८

ज्याप्रमाणे मंदरपर्वताच्या योगाने घुसळला जाणारा क्षीरसागर आपलें शुक्लत्व सोडीत नाही, त्याप्रमाणे महामति पुरुष आपत्काली किंवा संपत्कालीं आपला मूळ स्वभाव सोडीत नाही.


       १२ अदर्शितमुखा एव दुर्जना मर्मवेधिनः ॥ ३.७०.६०

दुर्जन मनुष्य नेहमी आपले तोंड लपवून दुसऱ्याचा मर्मभेद करीत असतात.


       १३ अद्यैव कुरु यच्छ्रेयो वृद्धः सन्किं करिष्यसि ।

          स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये ॥ ७.१६२.२०

आजच आपले कल्याण करून घे।तूं वृद्ध झाल्यावर काय करूं शकणार ! कारण वृद्धापकाली आपलीं गात्रेच आपणांला भारभूत होत असतात.


       १४ अद्यैव न चिकित्सां यः करोति मरणापदः ।

          सम्प्राप्तायां मृतो मूढः करिष्यति किमातुरः ॥ ७.१०३.३८

मरणरूपी आपत्तीची चिकित्सा जो मूढ मनुष्य आजच्या आज करीत नाही, तो, मरणकाल प्राप्त झाला असतां, पीडित झाल्यावर काय करूं शकेल ?


       १५ अनन्तं समतानन्दं परमार्थं विदुर्बुधाः ।

          स येभ्यःप्राप्यते नित्यं ते सेव्याः शास्त्रसाधवः ॥ २.६.३४

समत्वापासून होणाऱ्या शाश्वत आनंदाला ज्ञाते लोक परमार्थ म्हणतात. या परमार्थाची प्राप्ति शास्त्र व सत्पुरुष यांच्या योगाने होते, म्हणून निरंतर त्यांची सेवा केली पाहिजे.


       १६ अनन्तमपतृष्णस्य स्वयमेव प्रवर्तते ।

          ध्यानं गलितपक्षस्य संस्थानमिव भूभृतः ॥  ७.४५.४४

पंख तुटून गेल्यामुळे पर्वत जसा एकाच जागी स्थिर राहतो, तसा निरिच्छ पुरुष सहजच ध्यानस्थ होतो.


       १७ अनन्ताः पितरो यान्ति यान्त्यनन्ताश्च मातरः ।

          इह संसारिणां पुंसां वनपादपपर्णवत् ॥ ५.२०.३३

ज्याप्रमाणे वनामधील वृक्षावर असंख्य पाने येतात आणि गळून जातात, त्याप्रमाणे या संसारांत आपले अनंत आईबाप होतात आणि जातात.


       १८ अनन्तानीह दुःखानि सुखं तृणलवोपमम् ।

          नातः सुखेषु बध्नीयादृष्टिं दुःखानुबन्धिषु ॥ २.१३.२३

या जगांत सुख पहावें तर अत्यंत अल्प आहे, व दुःख पहावें तर अनंत आहे; यासाठी परिणामी दुःख देणा-या विषयसुखाची आस्था बाळगू नये.


       १९ अनहंवेदनं सिद्धिरहंवेदनमापदः ॥ ६.९९.१३

``अहम्'' असें न जाणणे हीच सिद्धि व ``अहम्'' असें जाणणे ह्याच सर्व आपत्ति.


       २० अनागतानां भोगानामवाञ्छनमकृत्रिमम् ।

          आगतानां च सम्भोग इति पण्डितलक्षणम् ॥ ४.४६.८

अप्राप्त विषयांची इच्छा स्वाभाविक नसणे आणि प्राप्त विषयांचा उपभोग घेणे हे पंडिताचे लक्षण आहे.


       २१ अनायासकदर्थिन्या गृहीते जरसा जने ।

          पलाय्य गच्छति प्रज्ञा सपत्न्येवाहताङ्गना ॥ १.२२.५

आयास न पडतां दीन करून सोडणा-या जरेचा पगडा मनुष्यावर बसला म्हणजे त्याची बुद्धि सवतीमत्सराने रागावलेल्या स्त्रीप्रमाणे त्याला सोडून निघून जाते.


       २२ अनार्तेन हि सम्मानो बहुमानो न बुध्यते ।

          पूर्णानां सरितां प्रावृट्पूरः स्वल्पो न राजते ॥ ४.२३.५४

पाण्याने नेहमी भरलेल्या नद्यांना पावसाच्या लहान लहान सरींनी येणा-या पुराचे महत्त्व नाही, त्याप्रमाणे ज्याला दुःख कधीं माहीत नाही, अशा मनुष्याचा सन्मान केला तर त्याला त्याची फारशी किंमत वाटत नाही.


       २३ अनित्यं यौवनं बाल्यं शरीरं द्रव्यसञ्चयाः ।

          भावाद्भावान्तरं यान्ति तरङ्गवदनारतम् ॥ १.२८.१०

बाल्य, तारुण्य, शरीर, द्रव्यसंचय इत्यादि सर्व वस्तू अनित्य असून समुद्रावरील लाटांप्रमाणे त्यांची रूपं एकसारखी पालटत असतात.


       २४ अनुद्वेगः श्रियो मूलम् ॥ ३.१११.२२

उद्विग्न न होणे हे संपत्तीचें मूळ होय.


       २५ अनुरक्ताङ्गनालोललोचनालोकिताकृति ।

          स्वस्थीकर्तुं मनः शक्तो न विवेको महानपि ॥ १.२६.३८

अनुरक्त असलेल्या तरुणीने चंचल नेत्रकटाक्ष फेकले असता मोठा विवेकी मनुष्य असला तरी, तो आपले मन आवरण्याला समर्थ होत नाही.


       २६ अनेकजन्मनामन्ते विवेकी जायते पुमान् ॥ ६.१२६.४

अनेक जन्मांचा अनुभव घेऊन पुरुष विवेकी होतो.


       २७ अन्तकः पर्यवस्थाता जीविते महतामपि ।

          चलन्त्यायूंषि शाखाग्रलम्बाम्बूनीव देहिनाम् ॥ ७.९३.८५

मोठमोठ्यांच्या जीवितालाही ग्रासण्यासाठी यम त्यांच्याभोंवतीं घिरट्या घालीत असतो. प्राण्यांचे आयुष्य शाखाग्रावर लोंबणाऱ्या जलबिंदूइतकेंच स्थिर आहे!


       २८ अन्तर्नैराश्यमादाय बहिराशोन्मुखेहितः ।

          बहिस्तप्तोऽन्तरा शीतो लोके विहर राघव ॥ ५.१८.२१

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, आंतून निराश राहा, पण बाहेरून आशावान असल्यासारखा उद्योग कर. तसेंच धनादिकांचा नाश झाला असतां आंतून शांत रहा, पण बाह्यतः संतप्त असल्याप्रमाणे वर्तन ठेव.


       २९ अन्तःशीतलता या स्यात्तदनन्ततपःफलम् ॥ ५.५६.९

अन्तःकरण शांत असणे, हे अनंत तपांचे फल होय.


       ३० अन्तस्तृष्णोपतप्तानां दावदाहमयं जगत् ।

          भवत्यखिलजन्तूनां यदन्तस्तद्बहिःस्थितम् ॥ ५.५६.३४

तृष्णेमुळे अन्तःकरण संतप्त झालेल्या लोकांना हे जग वणवा लागल्यासारखे दिसते. कारण, जें मनुष्याच्या मनांत असते, तेंच त्याच्या दृष्टीला बाह्य जगांत दिसते.


       ३१ अन्तःसंसक्तिरेवैकं कारणं बन्धमोक्षयोः ॥ ५.६७.३४

अन्तःकरणाची आसक्ति असणे व नसणे हेच बंध आणि मोक्ष यांचे मुख्य कारण होय.


       ३२ अन्तःसन्त्यक्तसर्वाशो वीतरागो विवासनः ।

          बहिःसर्वसमाचारो लोके विहर राघव ॥ ५.१८.१८

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, अन्तःकरणांतील सर्व आशा, विषयप्रेम व वासना यांना पार झुगारून दे, आणि बाह्यतः सर्व लोकव्यवहार करीत जा.


       ३३ अन्तःसारतया कार्यं लघवोऽप्याप्नुवन्ति हि ॥ ३.७२.१९

एखादा क्षुद्र मनुष्यदेखील आपले कार्य अन्तःकरणाच्या दृढनिश्चयाच्या सामर्थ्यामुळे पार पाडतो.


       ३४ अन्नभूता हि महतां लघवो यत्नशालिनाम् ।

          यथेष्टं विनियोज्यन्ते तेन कर्मसु लोष्टवत् ॥ २.६.१३

दैववादी दुबळे लोक उद्योगी बलिष्ठ लोकांच्या भक्ष्यस्थानी पडतात. मातीच्या ढेकळांना तुडवून वाटेल तसा आकार देतां येतो, त्याप्रमाणे प्रयत्न करणारे लोक आपल्या कार्यामध्ये दुबळ्या आळशी लोकांचा वाटेल तसा उपयोग करून घेतात.


       ३५ अपरीक्ष्य च यः शिष्यं प्रशास्त्यतिविमूढधीः ।

          स एव नरकं याति यावदाभूतसम्प्लवम् ॥ ४.३९.२६

शिष्याची परीक्षा न करतां आणि त्याची योग्यता न जाणतां जो गुरु त्याला ज्ञानोपदेश करितो, तो चिरकाल नरकवासाचें दुःख भोगितो.


       ३६ अपश्यन्काष्ठरन्ध्रस्थवृषणाक्रमणं यथा ।

          कीलोत्पाटी कपिर्दुःखमेतीदं हि तथा मनः ॥ ३.९९.४१

लाकडामध्ये ठोकलेली पाचर उपटणाऱ्या एखाद्या अविचारी वानराचा वृषण फटीमध्ये सांपडून तो मूर्ख वानर जसा संकटांत सांपडतो, त्याप्रमाणे नेहमी काहींना कांहीं उलाढाली करण्यांत दंग झालेले चंचल मन दुःख भोगते.


       ३७ अपि कष्टतरां प्राप्तैर्दशां विवशतां गतैः ।

          मनागपि न सन्त्याज्या मानवैः साधुसङ्गतिः ॥ २.१६.८

कसल्याही प्रकारची कष्टदशा प्राप्त होऊन मनुष्य विव्हल झाला, तरी त्याने सत्संगाचा त्याग क्षणभरहि करूं नये।.


       ३८ अपि जीवितदानेन गुणिनं परिपालयेत् ।

          गुणवत्सङ्गमौषध्या मृत्युरप्येति मित्रताम् ॥ ३.७७.२८

गुणिजनांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष जीवितावर पाणी सोडण्याचा प्रसंग आला तरी, त्याला माघार घेतां कामा नये, कारण गुणिजनांच्या समागमरूपी औषधीमुळे प्रत्यक्ष मृत्युसुद्धा मित्र बनत असतो.


       ३९ अपि पौरुषमादेयं शास्त्रं चेद्युक्तिबोधकम् ।

          अन्यत्त्वार्षमपि त्याज्यं भाव्यं न्याय्यैकसेविना ॥ २.१८.२

युक्तिबोध करणारे शास्त्र एखाद्या सामान्य पुरुषाने केलेले असले तरी ते ग्राह्य आहे. परंतु एखाद्या प्राचीन ऋषीने केलेलेंहि शास्त्र युक्तिशून्य असले, तर न्यायी मनुष्याने त्याचा त्याग करणेच उचित आहे.


       ४० अपि मेरुसमं प्राज्ञमपि शूरमपि स्थिरम् ।

          तृणीकरोति तृष्णैका निमेषेण नरोत्तमम् ॥ १.१७.५०

एखादा मनुष्य मेरूप्रमाणे अढळ, विद्वान्, शूर आणि स्थिर बुद्धीचा असला तरी त्याला, तृष्णा क्षणामध्ये तृणाप्रमाणे तुच्छ करून सोडते.


       ४१ अपि शूरा अतिप्राज्ञास्ते न सन्ति जगत्त्रये ।

          अविद्यया ये पुरुषा न नाम विवशीकृताः ॥ ४.४१.३७

अविद्येच्या तडाक्यांत सांपडला नाही असा शूर किंवा महाबुद्धिमान् पुरुष त्रिभुवनांतहि विरळा.


       ४२ अपूर्वाह्लाददायिन्य उच्चैस्तरपदाश्रयाः ।

          अतिमोहापहारिण्यः सूक्तयो हि महीयसाम् ॥ ५.४.५

थोर पुरुषांच्या सूक्ति अपूर्व आह्लाद देणाऱ्या, अत्युच्चपदाला पोचविणाऱ्या आणि अनर्थकारक मोह घालविणाऱ्या असतात.


       ४३ अपेक्षैव घनो बन्ध उपेक्षैव विमुक्तता ॥ ७.२६.३६

विषयांची अपेक्षा हाच दृढबंध होय. आणि उपेक्षा हाच मोक्ष होय.


       ४४ अप्यब्धिपानान्महतः सुमेरून्मूलनादपि ।

          अपि वह्नशनात्साधो विषमश्चित्तनिग्रहः ॥ १.१६.२४

समुद्र पिऊन टाकणे, मेरुपर्वत उपटून काढणे, किंवा अग्नि भक्षण करणे याच्यापेक्षांहि चित्ताचा निग्रह करणे हे जास्त कष्टतर आहे.


       ४५ अप्यापदि दुरन्तायां नैव गन्तव्यमक्रमे ॥ ४.३२.९

केवढेंहि अनिवार संकट कोसळले तरी सन्मार्ग सोडून जाऊ नये.


       ४६ अप्राप्तकारिणं भूपं रोधयन्ति च वै प्रजाः ॥ ६.८४.२७

प्रजा अयोग्य कार्य करणाऱ्या राजाचे निवारण करतात.


       ४७ अबन्धुर्बन्धुतामेति नैकट्याभ्यासयोगतः ।

          यात्यनभ्यासतो दूरात्स्नेहो बन्धुषु तानवम् ॥ ७.६७.२९

नेहमींच्या सहवासामुळे जो आप्त नसतो तोही आप्त होतो, आणि प्रत्यक्ष बंधु असून तो निरंतर दूर राहिल्यास स्नेहसंबंध कमी होऊन परक्याप्रमाणे भासतो.


       ४८ अभ्यासभास्वति तपत्यवनौ वने च

        वीरस्य सिध्यति न यन्न तदस्ति किञ्चित् ।

अभ्यासतो भुवि भयान्यभयीभवन्ति

        सर्वासु पर्वतगुहास्वपि निर्जनासु ॥ ७.६७.४५

जितेंद्रिय वीर पुरुषाचा अभ्याससूर्य प्रकाशमान होत असतांना भूमि, जल, अंतरिक्ष इत्यादिकांतील कोणतीही वस्तू त्याला प्राप्त करून घेता येते. इतकेच नव्हे कोणत्याही निर्जन पर्वतगुहेतील व्याघ्रसर्पादि भयंकर प्राणीहि त्याला भय उत्पन्न करूं शकत नाहीत.


       ४९ अभ्यासेन कटु द्रव्यं भवत्यभिमतं मुने ।

          अन्यस्मै रोचते निम्बस्त्वन्यस्मै मधु रोचते ॥ ७.६७.२८

(विद्याधरी श्रीवसिष्ठांना म्हणते) हे मुने, अभ्यासाने कडू पदार्थही गोड वाटू लागतो. एखाद्याला मध आवडतो, तर एखाद्याला अभ्यासामुळे कडू लिंबच आवडतो.


       ५० अम्लं मधुरसासिक्तं मधुरं मधुरञ्जितम् ।

          बीजं प्रतिविषाकल्कसिक्तं च कटु जायते ॥ ४.३५.२९

चिंचेच्या झाडाला मध, साखर इत्यादि पदार्थाचे खत घातले तर त्या चिंचेच्या झाडावर येणाऱ्या चिंचा गोड असतात. परंतु चिंचेला धोतरा, करंज यांच्या रसांचे खत घातल्यास त्याच चिंचा कडू निपजतात, असा आरामशास्त्राचा नियम आहे.


       ५१ अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसाम् ।

          उदारचरितानां तु विगतावरणैव धीः ॥ ५.१८.६१

``हा माझा बंधु'' आणि ``हा माझा बंधु नव्हे'' ही विचारसरणी क्षुद्र पुरुषांच्या ठिकाणी असते. परंतु श्रेष्ठ आचरणाच्या महात्म्यांच्या बुद्धीवरील संकुचित भावनेचे आवरण नाहीसे होऊन त्यांची बुद्धि सर्वत्र सम झालेली असते.


       ५२ अयोऽयसि च सन्तप्ते शुद्धे तप्तं तु लीयते ॥ ४.१७.२९

लोखंडाचे दोन तुकडे एकत्र ठेवल्याने एकमेकांत मिसळत नाहीत, परंतु काही क्षार टाकून शुद्ध केलेले आणि तापवून द्रवमय झालेले तेच तुकडे एकमेकांत पूर्णपणे मिसळतात.


       ५३ अर्थिनां यन्निराशत्वं सत्तमेऽभिभवो हि सः ॥ १.७.१०

आपल्याकडे याचना करण्यासाठी आलेल्या मनुष्याची निराशा होणे हे सत्पुरुष लांछन समजतात.


       ५४ अर्ध सज्जनसम्पर्कादविद्याया विनश्यति ।

          चतुर्भागस्तु शास्त्रार्थश्चतुर्भागं स्वयत्नतः ॥ ७.१२.३७

सजनांच्या सहवासाने अर्धी अविद्या नष्ट होते. चतुर्थांश अविद्या शास्त्रविचाराने जाते. राहिलेला चतुर्थभाग आपल्या प्रयत्नानें घालवितां येतो.


       ५५ अलब्धज्ञानदृष्टीनां क्रिया पुत्र परायणम् ।

          यस्य नास्त्यम्बरं पट्ट कम्बलं किं त्यजत्यसौ ॥ ६.८७.१७

ज्यांना ज्ञानदृष्टि प्राप्त झाली नाही, त्यांना कर्म हेच परम साधन आहे. ज्याचेपाशी उंची वस्त्र नाहीं त्याने आपल्या जवळचा कांबळा टाकून देणे योग्य होईल काय ?


       ५६ अवश्यभाव्यस्तमयो जातस्याहर्पतेरिव ॥ ४.४८.२७

सूर्याचा उदय झाला म्हणजे त्याचा अस्त व्हावयाचा हा नियम जसा ठरलेला आहे, तसा जो प्राणी जन्मास आला तो केव्हांतरी मरणारच.


       ५७ अविरुद्धैव सा युक्तिर्ययापदि हि जीव्यते ॥ ३.६८.१२

आपत्तीमध्ये वाटेल ती युक्ति योजून जिवंत राहणे ही गोष्ट शास्त्राला केव्हाही संमतच आहे.


       ५८ अशिष्यायाविरक्ताय यत्किचिदुपदिश्यते ।

          तत्प्रयात्यपवित्रत्वं गोक्षीरं श्वदृताविव ॥ २.२.२१

जे ज्ञान विषयासक्त अयोग्य शिष्याला दिले जाते, ते कुत्र्याच्या कातड्याच्या पात्रांत ठेविलेल्या गाईच्या दुधाप्रमाणे अपवित्र होते.


       ५९ असतः शशशृङ्गादेः कारणं मार्गयन्ति ये ।

          वन्ध्यापुत्रस्य पौत्रस्य स्कन्धमासादयन्ति ते ॥ ७.२२.९

सशाच्या शिंगासारख्या मुळीच नसलेल्या वस्तूंच्या कारणांचा जे शोध करीत बसतात, ते वन्ध्येच्या मुलाच्या नातवाच्या खांद्यावर बसतात असेच म्हटले पाहिजे.


       ६० असतामपि संरूढं सौहार्दं न निवर्तते ॥ ३.८२.४७

दुष्टांच्याही अंतःकरणांत एकदां प्रेम दृढ झाले, म्हणजे ते नाहींसें होणे शक्य नसते.


       ६१ असत्यभूतं तोयान्तश्चन्द्रव्योमतलादिकम् ।

          बाला एवाभिवाञ्छन्ति मनोमोहाय नोत्तमाः ॥ ४.४५.४७

पाण्यामध्ये पडलेले चंद्राचे किंवा आकाशाचे असत्य प्रतिबिंब धरण्याचा मोह अज्ञ मुलांना पडतो, परंतु ज्ञात्या पुरुषाला असा मोह कधीही उत्पन्न होणार नाही.


       ६२ अस्माच्छास्त्रवराद्बोधा जायन्ते ये विचारितात् ।

          लवणैर्व्यञ्जनानीव भान्ति शास्त्रान्तराणि तैः ॥ ७.१६३.५४

मिठाच्या योगाने चटणी, भाजी यांना जशी रुचि येते त्याप्रमाणे या मुख्य शास्त्राच्या  (योगवासिष्ठाच्या) विचाराने होणाऱ्या बोधामुळे इतर शास्त्रे सहज समजतात.


       ६३ अहङ्कारघने शान्ते तृष्णा नवतडिल्लता ।

          शान्तदीपशिखावृत्त्या क्वापि यात्यतिसत्वरम् ॥ १.१५.१३

अहंकाररूपी मेघ एकदा नाहीसा झाला, म्हणजे तृष्णारूपी वीज विझलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे कोठे नाहीशी होते तेही समजत नाही.


       ६४ अहङ्कारानुसन्धानवर्जनादेव राघव ।

          पौरुषेण प्रयत्नाच्च तीर्यते भवसागरः ॥ ४.३३.७०

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, मोठ्या प्रयत्नाने आणि धैर्याने अहंकाराला हद्दपार कर म्हणजे, तूं भवसागर तरून जाशील.


       ६५ अहङ्काराम्बुदे क्षीणे दृश्यते चिद्दिवाकरः ॥ ५.६४.४५

अहंकाररूपी मेघ दूर झाला म्हणजे चैतन्यरूपी सूर्याचे दर्शन होते.


       ६६ अहमित्येव बन्धाय नाहमित्येव मुक्तये ॥ ७.२५.२०

देहादिकालाच ``मी'' असे मानणे हा बंध, व देहादिक ``मी'' नाहीं असे मानणे हाच मोक्ष.


       ६७ अहो नु चित्रा मायेयं तता विश्वविमोहिनी ।

          असत्यैवापि सद्रूपा मरुभूमिषु वारिवत् ॥ ६.६३.७

खरोखर विश्वाला मोह पाडणारी ही विचित्र माया पसरली आहे ! ही असत्य आहे, तथापि निर्जल प्रदेशावर भासणाऱ्या मृगजळाप्रमाणे सत्यच आहे असे वाटते.


       ६८ अहो बत दुरुच्छेदाः प्राणिनां स्नेहवागुराः ॥ ३.४३.४८

प्राण्यांना बद्ध करणारे स्नेहपाश तोडून टाकणे खरोखर अतिशय कठीण आहे.


       ६९ अहो मोहस्य माहात्म्यं यदयं सर्वदुःखहा ।

          चिन्तामणिर्विचाराख्यो हृत्स्थोऽपि त्यज्यते जनैः ॥ ७.१.१२

केवढे हो हे मोहाचें माहात्म्य, की लोक आपल्या हृदयांत असलेल्याही सर्वदुःखनाशक विचार नांवाच्या चिंतामणीला टाकून देतात.


       ७० आज्ञाचरणमेवाहुर्मुख्यमाराधनं सताम् ॥ ६.२३.४

सज्जनांच्या आज्ञेप्रमाणे वर्तन ठेवणे हेच त्यांचे मुख्य आराधन आहे.


       ७१ आत्मज्ञानं विदुर्ज्ञानं ज्ञानान्यन्यानि यानि तु ।

          तानि ज्ञानावभासानि सारस्यानवबोधनात् ॥ ७.२१.७

आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असून बाकीची ज्ञाने म्हणजे ज्ञानाभास आहेत. कारण, त्यांच्या योगानें साररूप तत्व कळत नाही.


       ७२ आत्मवत्सर्वभूतानि परद्रव्याणि लोष्टवत् ।

          स्वभावादेव न भयाद्यः पश्यति स पश्यति ॥ ५.५६.४९

जो भयामुळे नव्हे, तर स्वभावतःच सर्व भूतांना आपल्याप्रमाणे मानतो आणि परद्रव्याला मातीच्या ढेकळांप्रमाणे समजतो, तोच खरा तत्त्ववेत्ता होय.


       ७३ आत्मीयेष्वर्थजातेषु मिथ्यात्मसु सुतादिषु ।

          बुद्धदेष्विव तोयानां न स्नेहस्तत्त्वदर्शिनाम् ॥ ७.१०२.१६

स्वकीय धनपुत्रादिकांवर ती मिथ्या असल्यामुळे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे तत्त्ववेत्त्यांची आस्था नसते.


       ७४ आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ७.१६२.१८

प्रत्येक मनुष्य आपणच आपला हितकर्ता होतो व अहितकर्ताहि होतो.


       ७५ आत्यन्तिकी विरसता यस्य दृश्येषु दृश्यते ।

          स बुद्धो नाप्रबुद्धस्य दृश्यत्यागे हि शक्तता ॥ ७.४५.३६

ज्याच्या ठिकाणी दृश्य वस्तूंविषयी पूर्णपणे वैराग्य असेल तोच ज्ञानी, असें जाणावें. कारण अज्ञ पुरुषाला दृश्य वस्तूंचा त्याग करण्याचे सामर्थ्य नसते.


       ७६ आदावन्ते च यन्नास्ति कीदृशी तस्य सत्यता ।

          आदावन्ते च यन्नित्यं तत्सत्यं नाम नेतरत् ॥ ५.५.९

जें पूर्वकाली आणि उत्तरकाली नाही ते मधल्या कालांत तरी सत्य कसें असणार ? जें सर्वदा (तिन्हीकालांत) असते. तें वास्तविक सत्य होय, तद्यतिरिक्त सत्य असणे शक्य नाही.


       ७७ आदावेव हि नोत्पन्नं यत्तस्येहास्तिता कुतः ।

          कुतो मरौ जलसरिद्वितीयेन्दौ कुतो ग्रहः ॥ ३.७.४२

जें आरंभी उत्पन्नच झालेले नाही त्याला अस्तित्व कोठून असणार ? रखरखीत वाळवंटांत भासणारी नदी आणि दृष्टिदोषामुळे आकाशांत भासणारा दुसरा चंद्र यांना अस्तित्व कसे असेल ?


       ७८ आदौ शमदमप्रायैर्गुणैः शिष्यं विशोधयेत् ।

          पश्चात्सर्वमिदं ब्रह्म शुद्धस्त्वमिति बोधयेत ॥ ४.३९.२३

शिष्याची बुद्धि प्रथम शमदमादि गुणांनी चांगली शुद्ध करावी, नंतर हे सर्व जग ब्रह्म आहे'' आणि ``तूंहि शुद्ध ब्रह्मच आहेस'' असा उपदेश करावा.


       ७९ आनन्दायैव भूतानि यतन्ते यानि कानिचित् ॥ ६.१०८.२०

कोणताहि प्राणी सुखासाठींच यत्न करीत असतो.


       ८०। आपतन्ति प्रतिपदं यथाकालं दहन्ति च ।

          दुःखचिन्ता नरं मूढं तृणमग्निशिखा इव ॥ २.११.४०

अग्नीची ज्योत गवताला जाळून टाकते त्याप्रमाणे दुःख आणि चिंता यांचे तडाखे मूढ मनुष्याला पावलोपावली सहन करावे लागतात; व त्याच्या आंगाचा नेहमी दाह करतात.


       ८१ आपदः क्षणमायान्ति क्षणमायान्ति सम्पदः ।

          क्षणं जन्म क्षणं मृत्युर्मुने किमिव न क्षणम् ॥ १.२८.३१

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) क्षणांत आपत्ति, क्षणांत संपत्ति क्षणांत जन्म, क्षणांत मृत्यु अशा त-हेने हे मुने, जगांतील सर्व गोष्टी क्षणिक आहेत.


       ८२ आपदो या दुरुत्तारा याश्च तुच्छाः कुयोनयः ।

          तास्ता मौर्ख्यात्प्रसूयन्ते खदिरादिव कण्टकाः ॥ २.१३.१६

खैराच्या झाडापासून कांटे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे सर्व त-हेच्या अधम योनि आणि दुस्तर आपत्ति मूर्खपणापासून उत्पन्न होतात.


       ८३ आपातमात्ररम्येभ्यो भोगेभ्यः किमवाप्यते ।

          सत्सङ्गचिन्तामणितः सर्वसारमवाप्यते ॥ ६.२०.३९

विचार करी पर्यंतच रम्य वाटणाऱ्या भोगांपासून काय मिळणार ? कांहीं नाही. पण सत्संगरूप चिंतामणीपासून सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेले पद प्राप्त होते.


       ८४ आयुः पल्लवकोणाग्रलम्बाम्बुकणभङ्गुरम् ।

          उन्मत्तमिव सन्त्यज्य यात्यकाण्डे शरीरकम् ॥ १.१४.१

झाडावरील पानाच्या टोकावर लोंबणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे जीवित क्षणभंगुर आहे. उन्मत्त मनुष्याप्रमाणे जीवित शरीराचा त्याग करून केव्हांच निघून जाते.


       ८५ आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते ।

          नीयते तद्वृथा येन प्रमादः सुमहानहो ॥ ७.१७५.७८

आयुष्याचा एक क्षण सुद्धा रत्नांच्या राशी दिल्यानेही मिळणार नाही, हे जर निश्चित आहे, तर आयुष्य व्यर्थ घालविणे हा मोठा बेसावधपणा नव्हे काय ?


       ८६ आयुषः खण्डखण्डाश्च निपतन्तः पुनः पुनः ।

          न कश्चिद्वेत्ति कालेन क्षतानि दिवसान्यहो ॥ ७.९३.५१

हरहर ! काळ हा प्राण्यांच्या आयुष्याचे तुकडे तुकडे करून टाकीत असतो. पण प्रत्येक दिवशी अशा प्रकारें क्षय पावणारे आयुष्य संपत आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही.


       ८७ आलस्यं यदि न भवेज्जगत्यनर्थः

              को न स्याद्बहुधनको बहुश्रुतो वा ।

          आलस्यादियमवनिः ससागरान्ता

              सम्पूर्णा नरपशुभिश्च निर्धनैश्च ॥ २.५.३०

या जगामध्ये अनर्थकारक आळस नसता, तर प्रत्येक मनुष्य संपत्तिमान आणि विद्वान् झाला असता. परंतु आळसामुळे ही समुद्रवलयांकित संपूर्ण पृथ्वी नरपशूंनी आणि निर्धन लोकांनी भरून गेली आहे.


       ८८ आशा हि लोहरज्जुभ्यो विषमा विपुला दृढा ।

          कालेन क्षीयते लोहं तृष्णा तु परिवर्धते ॥ ६.९१.६

आशा ही लोखंडी साखळदंडाहून अतिशय कठीण व मोठी मजबूत आहे. लोखंड कांहीं कालाने घासून घासून झिजून जाते, परंतु आशा मात्र उत्तरोत्तर वाढतच जाते.


       ८९ आस्थामात्रमनन्तानां दुःखानामाकरं विदुः ।

          अनास्थामात्रमभितः सुखानामाकरं विदुः ॥ ४.२७.२५

आसक्ति असणे ही केवळ अनंत दुःखांची खाण आहे. आणि आसक्ति नसणे ही स्थिति सर्व सुखांची खाण आहे.


       ९० इच्छोदयो यथा दुःखमिच्छाशान्तिर्यथा सुखम् ।

          तथा न नरके नापि ब्रह्मलोकेऽनुभूयते ॥ ७.३६.२४

इच्छा उत्पन्न झाल्याने दुःख होते तसें दुःख नरकांतही होत नाहीं; आणि इच्छा नाहीशी झाली असतो जें सुख मिळते तसे श्रेष्ठसुख ब्रह्मलोकामध्येही अनुभवाला येत नाही.


       ९१ इच्छोपशमनं कर्तुं यदि कृत्स्नं न शक्यते ।

          स्वल्पमप्यनुगन्तव्यं मार्गस्थो नावसीदति ॥ ७.३६.३०

सर्व इच्छा एकदम नाहींशा करणे अशक्य झाल्यास क्रमाक्रमाने थोडथोड्या इच्छा सोडीत जाव्या. कारण, सन्मार्गाने जाणारा पुरुष कधीही क्लेश भोगीत नाही.


       ९२ इतो नाभिमताः सर्वे ज्ञस्य भोगाः स्वभावतः ।

          भवन्ति कोऽतितृप्तो हि दुरन्नं किल वाञ्छति ॥ ६.५९.३०

ज्ञानी पुरुषाला स्वभावतःच कोणताही भोग स्वीकारणे मान्य नसते. कारण जो मिष्टानाने अतिशय तृप्त झाला तो कदन्नाची इच्छा कशी धरील ?


       ९३ इत्युक्तवत्यथ मुनौ दिवसो जगाम

              सायन्तनाय विधयेऽस्तमिनो जगाम ।

          स्नातुं सभा कृतनमस्करणा जगाम

              श्यामाक्षये रविकरेण सहाजगाम ॥ २.५.३२

(श्रीवाल्मीकि भरद्वाजाला म्हणाले) - वसिष्ठ मुनींनी अशा त-हेचें भाषण केल्यानंतर संध्याकाळ झाली, व सूर्य अस्तास गेला. तेव्हां सभेतील मुनि वसिष्ठमुनींना नमस्कार करून सायंकाळची स्नानसंध्यादि विहित कर्मे करण्यासाठी निघून गेले, आणि रात्र सरल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्याच्या किरणांबरोबर वसिष्ठमुनींकडे आले.


       ९४ इन्द्रियोत्तमरोगाणां भोगाशावर्जनादृते ।

          नौषधानि न तीर्थानि न च मन्त्राश्च शान्तये ॥ ७.६.४५

इंद्रियरूपी रोगावर भोगांची आशा सोडणे यावांचून दुसरें कोणतेही औषध नाही. तीर्थे, मंत्र इत्यादिकांच्या योगाने हा रोग नाहीसा होत नाही.


       ९५ इष्टवस्त्वर्थिनां तज्ज्ञसूपदिष्टेन कर्मणा ।

          पौनःपुन्येन करणान्नेतरच्छरणं मुने ॥ ७.६७.२३

(विद्याधरी श्रीवसिष्ठांना म्हणते) हे मुने, लौकिक शिल्प अथवा वैदिक विद्या इत्यादि फलांची इच्छा करणाऱ्या विद्यार्थ्यांस त्या त्या विद्यांच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे पुनः पुनः त्याचा अभ्यास करणे हेच श्रेयस्कर आहे.


       ९६ इहैव नरकव्याधेश्चिकित्सां न करोति यः ।

          गत्वा निरौषधं स्थानं सरुजः किं करिष्यति ॥ ७.१०३.५१

येथे असतांनाच पुढच्या नरकव्याधीची चिकित्सा केली पाहिजे. औषध मिळणार नाही अशा ठिकाणी गेल्यावर रोगग्रस्त मनुष्य काय करणार ?


       ९७ ईप्सितावेदनाख्यात्तु मनःप्रशमनादृते ।

          गुरूपदेशशास्त्रार्थमन्त्राद्या युक्तयस्तृणम् ॥ ३.१११.१४

इष्टवस्तूविषयीं वैराग्य उत्पन्न होऊन मन शांत झाल्याशिवाय गुरूपदेश, शास्त्रार्थ, मंत्र इत्यादि युक्त्या व्यर्थ होत.


       ९८ ईश्वरप्रेरितो गच्छेत्स्वर्गं नरकमेव वा ।

          स सदैव पराधीनः पशुरेव न संशयः ॥ २.६.२७

केवळ ईश्वराने प्रेरणा केल्यामुळे मनुष्य स्वर्गाला किंवा नरकाला जातो, असें ज्याला वाटते, असा मनुष्य नेहमीं पराधीनच राहणार, व असला मनुष्य निःसंशय पशु होय.


       ९९ ईश्वरो न महाबुद्धे दूरे न च सुदुर्लभः ।

          महाबोधमयैकात्मा स्वात्मैव परमेश्वरः ॥ ७.४८.२२

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) ईश्वर दूर नाहीं, तो अतिशय दुर्लभही नाही. परमेश्वर ज्ञानस्वरूप, एकरूप असून स्वतःचा आत्माच आहे.


       १०० उत्कन्धरो विततनिर्मलचारुपक्षो ।

               हंसोऽयमत्र नभसीति जनैः प्रतीतः ।

           गृह्णाति पल्वलजलाच्छफरीं यदासौ

               ज्ञातस्तदा खलु बकोऽयमितीह लोकैः ॥ ७.११८.५

आकाशांतून जात असतांना वर उंच केलेली मान व पसरलेले शुभ्र सुंदर पंख यांवरून `` हा हंसच असावा, `` असें प्रथम लोकांना वाटले; परंतु पुढे जेव्हां डबक्यांतील पाण्यांतून मासे गट्ट करीत आहे असे दृष्टीस पडले, तेव्हां ``हा बगळा आहे'' अशी लोकांची खातरी झाली. (बाह्य आकारावरून जरी एखाद्याची बरोबर ओळख न पटली, तरी त्याचे आचरण पाहिल्यावर ती सहज पटते.)


       १०१ उत्थितानुत्थितानेतानिन्द्रियाहीन्पुनःपुनः ।

           हन्याद्विवेकदण्डेन वज्रणेव हरिर्गिरीन् ॥ ५.८.१७

इंद्र आपल्या वज्राने पर्वतांचे चूर्ण करून टाकितो, त्याप्रमाणे इंद्रियरूपी सर्पांनी आपली डोकी वर केलेली असोत किंवा नसोत, ती विवेकरूपी दंडाने पुनः पुन्हां फोडून टाकावी.


       १०२ उत्सवादपि नीचानां कलहोऽपि सुखायते ॥ ३.७०.७६

नीचवृत्तीच्या लोकांना आनंदोत्सवापेक्षाहि कलहच अधिक प्रिय असतो.


       १०३ उदारगुणयुक्ता ये विहरन्तीह देहिनः ।

           धरातलेन्दवः सङ्गाद्भृशं शीतलयन्ति ते ॥ ३.७७.३०

जे उदार व गुणवान पुरुष या जगांत विहार करतात, ते आपल्या सहवासाने सर्व लोकांना शीतलता आणि आह्लाद देणारे पृथ्वीवरील दुसरे चंद्रच होत.


       १०४ उपदेशक्रमो राम व्यवस्थामात्रपालनम् ।

           ज्ञप्तेस्तु कारणं शुद्धा शिष्यप्रज्ञैव राघव ॥ ६.८३.१३

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, उपदेश करणे हे केवळ शास्त्रीय व्यवस्थेचे परिपालन करणे आहे. पण ज्ञानाचे कारण केवळ शिष्याची शुद्ध बुद्धिच आहे.


       १०५ उभाभ्यामेव पक्षाभ्यां यथा खे पक्षिणां गतिः ।

           तथैव ज्ञानकर्मभ्यां जायते परमं पदम् ॥ १.१.७

पक्ष्यांना आकाशांत संचार करण्याला ज्याप्रमाणे दोन पंखांची गरज असते, त्याप्रमाणे कर्म आणि ज्ञान या दोन साधनांच्या योगाने मोक्षरूपी परमपदाची प्राप्ति होते.


       १०६ उह्यन्ते वारणा यत्र तत्रोर्णायुषु का कथा ॥ ७.६८.३७

हत्तीसारखे मोठेमोठे प्राणीही ज्या प्रवाहांतून वाहत जातात, तेथे क्षुद्र मेंढ्यांची काय कथा !


       १०७ ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न च कश्चिच्छृणोति तत् ।

           असङ्कल्पः परं श्रेयःस किमन्तर्न भाव्यते ॥ ६.१२६.९४

(श्रीवसिष्ठ म्हणतात) मी हात वर करून मोठ्याने ओरडत आहे पण माझ्या आक्रोशाकडे कोणी लक्ष देत नाही. विषयसंकल्पाचा त्याग केल्याने मोक्षप्राप्ति होईल, ही गोष्ट लोक अंतःकरणांत कां ठसवून घेत नाहीत ?


       १०८ एतया तदलं मेऽस्तु तुच्छया पूर्वचिन्तया ।

           पौरुषं याति साफल्यं वर्तमानचिकित्सया ॥ ५.२५.१६

(बलि म्हणतो) गत गोष्टीबद्दल शोक करण्यांत काय अर्थ आहे ? वर्तमानकाळी कोणती गोष्ट कर्तव्य आहे, याचा विचार केल्याने पुरुषप्रयत्न सफल होतो.


       १०९ एतावति धरणितले सुभगास्ते साधुचेतनाः पुरुषाः ।

           पुरुषकलासु च गण्या न जिता ये चेतसा स्वेन ॥ ४.२३.६०

या पृथ्वीवर तेच भाग्यवान, साधु, खरे पुरुष, आणि कलावान होत की, ज्यांना त्यांच्या चित्ताने जिंकून त्यांच्यावर आपला पगडा बसविला नाही.


       ११० एतावतैव देवेशः परमात्मावगम्यते ।

           काष्ठलोष्टसमत्वेन देहो यदवलोक्यते ॥ ५.६४.४४

देह हा काष्ठ व ढेकूळ यांच्या सारखा जड आहे ही गोष्ट मनांत निरंतर वागवीत जाणे हाच देवश्रेष्ठ परमात्म्याच्या ज्ञानाचा उपाय आहे.


       १११ एतावदेव बोधस्य बोधत्वं यद्वितृष्णता ।

           पाण्डित्यं नाम तन्मौर्ख्यं यत्र नास्ति वितृष्णता ॥ ७.१९४.३४

हेच खरें ज्ञान की, ज्याच्या योगाने विषयलालसा नाहींशी होईल. ज्याच्यायोगाने विषयतृष्णा नाहीशी होत नाही असें पांडित्य म्हणजे केवळ मूर्खत्वच होय.


       ११२ कपर्दकार्धलाभेन कृपणो बहु मन्यते ॥ ३.७०.७७

एखाद्या कृपणाच्या हाती एखादी फुटकी कवडी लागली, तरी तेवढ्यामुळे त्याला एखादा मोठा निधि सांपडल्यासारखा आनंद होतो [ अशा रीतीने प्राण्यांच्या अहंकाराचा चमत्कार खरोखर दुर्निवार आहे ]


       ११३ कवलयति नरकनिकरं परिहरति मृणालिकां ध्वाङ् क्षः ।

           यदतोऽस्तु मा स्मयस्ते स्वभ्यस्तं सर्वदा स्वदते ॥ ७.११६.६४

(एकजण मित्राला म्हणतो) कावळा कमलतंतु सोडून घाणेरडे पदार्थ खातो, यांत आश्चर्य नाहीं; कारण रोजच्या सवयीने निंद्य पदार्थही स्वादिष्ट वाढू लागतात.


       ११४ कान्तावियोगजातेन हृदि दुःस्पर्शवह्निना ।

           यौवने दह्यते जन्तुस्तरुर्दावाग्निना यथा ॥ १.२०.१७

तारुण्यांत स्त्रीचा वियोग झाला म्हणजे, स्पर्श करण्यास कठीण अशा शोकरूपी अग्नीने मनुष्याचे अंतःकरण वणव्याने जळणाऱ्या वृक्षाप्रमाणे जळून जाते.


       ११५ कामनाम्ना किरातेन विकीर्णा मुग्धचेतसाम् ।

           नार्यो नरविहङ्गानामङ्ग बन्धनवागुराः ॥ १.२१.१८

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) कामरूपी भिल्लाने मूढमनुष्यरूपी पक्ष्यांना पकडण्यासाठी तरुण स्त्रिया हे एक जाळे पसरून ठेविलें आहे.


       ११६ कारणेन विना कार्य न च नामोपपद्यते ॥ ७.५७.१३

कारणावांचून कार्य संभवतच नाही.


       ११७ कार्यमण्वपि काले तु कृतमेत्युपकारताम् ।

           महदप्युपकारोऽपि रिक्ततामेत्यकालतः ॥ १.७.२६

योग्यवेळी एखाद्याचे लहानसें काम केले तरी तो मनुष्य आभारी होतो; परंतु वेळ निघून गेल्यावर कितीही मोठा उपकार केला तरी फुकट जातो.


       ११८ कालः कवलनैकान्तमतिरत्ति गिरन्नपि ।

           अनन्तैरपि लोकौधैर्नायं तृप्तो महाशनः ॥ १.२३.१०

काल हा सर्वांना खाऊन टाकण्यांत अगदी दंग झालेला आहे. तो एकाच वेळी अनेकांचा संहार करीत असतो. तो इतका अधाशी आहे की, अगणित लोकांचा संहार करूनही त्याची तृप्ति होत नाही. (तोंडात घास असतांना आणखी खातच असतो.)


       ११९ कालविद्भिर्विनिर्णीतं पाण्डित्यं यस्य राघव ।

           अनध्यापित एवासौ तज्ज्ञश्चेदैवमुत्तमम् ॥ २.८.१९

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, एखादा मनुष्य पंडित होणार, असें ज्योतिष्याने भाकीत केले, परंतु अध्ययन न करतां असा मनुष्य विद्वान होऊ शकेल, तर दैव बलिष्ठ आहे असे म्हणता येईल.


       १२० कालविद्भिर्विनिर्णीता यस्यातिचिरजीविता ।

           स चेज्जीवति सञ्छिन्नशिरास्तद्दैवमुत्तमम् ॥ २.८.१८

एखादा मनुष्य पुष्कळ दिवस जगणार असें ज्योतिष्याने सांगितले, आणि अशा स्थितीत त्या मनुष्याचे डोके उडविलें असतांही तो जगला, तर मात्र दैव समर्थ आहे, असे म्हणता येईल.


       १२१ कालः सर्वङ्कषो ह्ययम् ॥ ७.१४०.१५

काल हा सर्वांचाच नाश करणारा आहे.


       १२२ किं दूरं व्यवसायिनाम् ॥ ३.२९.३८

उद्योग करणाऱ्या लोकांना मिळविण्यास कठीण असें या जगांत काय आहे ?


       १२३ कुटिला कोमलस्पर्शा विषवैषम्यशंसिनी ।

           दशत्यपि मनाक्स्पृष्टा तृष्णा कृष्णेव भोगिनी ॥ १.१७.१७

विषयतृष्णा ही कुटिल असून तिचा स्पर्श आरंभी मोठा गोड वाटतो, परंतु परिणामी ती विषाप्रमाणे घात करिते. एकाद्या काळ्या नागिणीला जरा स्पर्श होतांच ती डसते त्याप्रमाणे तृष्णेला स्पर्श केल्याबरोबर ती मनुष्याला मूढ बनविते.


       १२४ कुरङ्गालिपतङ्गेभमीनास्त्वेकैकशो हताः ।

           सर्वैयुक्तैरनथैस्तु व्याप्तस्याज्ञ कुतः सुखम् ॥ ५.५२.२१

(उद्दालक मुनि अज्ञ चित्ताला बोध करितात) शब्दस्पर्शादि विषय इतके अनर्थकारक आहेत की, एकेका विषयामध्ये आसक्त होणारे हरिण, भ्रमर, पतंग, हत्ती आणि मासा हे जीव घात करून घेतात. पांचही विषयांमध्ये रममाण होणाऱ्या मनुष्यावर सर्व त-हेचे अनर्थ कोसळतील यांत नवल काय ? त्याला कोठून सुख मिळणार ?


       १२५ कृच्छ्रेषु दूरास्तविषादमोहाः

               स्वास्थ्येषु नोसिक्तमनोभिरामाः ।

           सुदुर्लभाः संप्रति सुन्दरीभि

               रनाहतान्तःकरणा महान्तः ॥ १.२७.८

विपत्तीमध्ये ज्यांना विषाद वाटत नाही व मोह पडत नाहीं आणि संपत्ति प्राप्त झाली असतां जे गर्वाने फुगून जात नाहीत, तसेंच सुंदर स्त्रिया पाहून ज्यांच्या अंतःकरणांत मुळींच विकार उत्पन्न होत नाही असे महात्मे सांप्रतकाळी फारच दुर्मिळ आहेत.

       १२६ केनापदि विचार्यन्ते वर्णधर्मकुलक्रमाः ॥ ३.१०६.५२

आपत्तीमध्ये सांपडलेला मनुष्य आपला वर्ण, धर्म, किंवा आपली कुलपरंपरा ह्यांचा विचार कधी तरी करतो का ?


       १२७ केवलात्कर्मणो ज्ञानान्न हि मोक्षोऽभिजायते ।

           किं तूभाभ्यां भवेन्मोक्षः साधनं तूभयं विदुः ॥ १.१.८

केवळ कर्माने किंवा केवळ ज्ञानाने मोक्ष साध्य होत नाही. तर कर्म आणि ज्ञान ही दोन्ही मोक्षाची साधने आहेत.


       १२८ कोकिलः काकसङ्घातैः समवर्णाननाकृतिः ।

           गदितैर्व्यक्ततामेति सभायामिव पण्डितः ॥ ७.११६.७३

कावळ्यांच्या समूहांत असलेला कोकिल पक्षी हा वर्ण, मुख व आकृति यांच्यामध्ये साम्य असल्यामुळे जरी ओळखू आला नाही, तरी ज्याप्रमाणे पंडित कोण आहे हे सभेतील भाषणावरून समजते, त्याप्रमाणे मधुर शब्दांवरून कोकिल पक्षी सहज ओळखू येतो.


       १२९ को न गृह्णाति मूढोऽपि वाक्यं युक्तिसमन्वितम् ॥ ७.१८३.२२

ज्या भाषणांत काहीतरी युक्ति आहे, असे भाषण मूर्ख मनुष्य देखील मानीत असतो.


       १३० को नाम परिपृच्छन्तं विनीतं वञ्चयेत्पुमान् ॥ ६.८५.८४

नम्रतेने प्रश्न करणाराला कोणता बरें पुरुष फसवील ?


       १३१ कोपं विषादकलनां विततं च हर्ष

           नाल्पेन कारणवशेन वहन्ति सन्तः ॥ १.५.१५

सत्पुरुषांना अल्पकारणावरून क्रोध, खेद किंवा हर्ष कधीही उत्पन्न होत नाही.


       १३२ कोऽहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः ।

           न्यायेनेति परामर्शो विचार इति कथ्यते ॥ २.१४.५०

माझें खरें स्वरूप काय व हा संसाररूपी दोष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसा उत्पन्न झाला, इत्यादि प्रश्नांचे शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने चिंतन करणे यालाच विचार असें म्हणतात.


       १३३ क्षणमानन्दितामेति क्षणमेति विषादिताम् ।

           क्षणं सौम्यत्वमायाति सर्वस्मिन्नटवन्मनः ॥ १.२८.३८

मनाची स्थिति एकाद्या नटाप्रमाणे क्षणांत आनंदाची तर क्षणांत खिन्नतेची व क्षणांत सौम्यतेची दिसून येते.


       १३४ क्षणमायाति पातालं क्षणं याति नभःस्थलम् ।

           क्षणं भ्रमति दिक्कुञ्जे तृष्णा हृत्पद्मषट्पदी ॥ १.१७.३१

तृष्णा ही क्षणामध्ये पातालांत जाते, व क्षणामध्ये आकाशांत गमन करते अशा रीतीने तृष्णा ही हृदयरूपी कमळावरील भ्रमरी असून दिशारूपी कुंजामध्ये भ्रमण करीत असते.


       १३५ गम्भीराणि प्रसन्नानि साधुचेतःसरांसि हि ॥ ७.२३.३५

साधूंचीं अतःकरणरूपी सरोवरें खोल व स्वच्छ असतात.


       १३६ गुणं ममेमं जानातु जनः पूजां करोतु मे ।

           इत्यहङ्कारिणामीहा न तु तन्मुक्तचेतसाम् ॥ ७.१०२.३१

माझा हा गुण लोकांना कळावा, त्यांनी माझा सत्कार करावा, ही इच्छा अहंकार असलेल्या लोकांना असते. मुक्त झालेल्यांना अशी इच्छा मुळीच नसते.


       १३७ गुणवति जने बद्धाशानां श्रमोऽपि सुखावहः ।७.११८.२६

गुणी मनुष्याच्या आशेवर राहून श्रम पडले तरी ते सुखावह होतात


       १३८ गुणैः कतिपयैरेव बहुदोषोऽपि कस्यचित् ।

           उपादेयो भवत्येव शौर्यसन्तोषभक्तिभिः ॥ ७.११६.५५

पुष्कळ दोष असलेल्या मनुष्यालाही त्याच्या आंगच्या शौर्यादि काही थोड्याशा गुणांमुळे काही लोक पदरीं बाळगतात.


       १३९ गुरुश्चेदुद्धरत्यज्ञमात्मीयात्पौरुषादृते ।

           उष्ट्रं दान्तं बलीवर्दं तत्कस्मान्नोद्धरत्यसौ ॥ ५.४३.२६

शिष्याने स्वतः प्रयत्न केला नसतांही जर गुरु त्याचा अज्ञानांतून उद्धार करू शकतात, तर वठणीस आणलेल्या उंट, बैल इत्यादि जनावरांनासुद्धा त्या गुरूने आत्मज्ञानी केलें असतें.

       १४०। गेहमेवोपशान्तस्य विजनं दूरकाननम् ।

           अशान्तस्याप्यरण्यानी विजना सजना पुरी ॥ ७.३.३८

शांत पुरुषाला त्याचे घरच निर्जन अरण्य आहे. पण शांत नसलेल्या पुरुषाला निर्जन अरण्यही लोकांनी गजबजून गेलेले नगर आहे.


       १४१ गोरर्थे ब्राह्मणस्यार्थे मित्रस्यार्थे च सन्मते ।

           शरणागतयत्नेन स मृतः स्वर्गभूषणम् ॥ ३.३१.२८

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) गाई, ब्राह्मण, मित्र आणि शरण आलेला यांच्या रक्षणासाठी लढत असतां, जो वीरपुरुष आपला देह धारातीर्थी अर्पण करतो, तो स्वर्गलोकाला खरोखर अलंकृतच करतो.


       १४२ चन्द्रांशव इवोत्सार्य तमांस्यमृतनिर्मलाः ।

           अन्तः शीतलयन्त्येता महताममला गिरः ॥ ५.४.४

महात्म्यांची वाणी चंद्रकिरणासारखी निर्मल, शीतल आणि अमृतमय असून मोहांधकार नष्ट करणारी व अंतःकरणाला सुख देणारी असते.


       १४३ चित्तमिन्द्रियसेनाया नायकं तज्जयाज्जयः ।

           उपानद्गूढपादस्य ननु चर्मावृतैव भूः ॥ ७.१६३.६

इंद्रियरूपी सेनेचा अधिपति चित्त आहे. या चित्ताला जिंकलें असतां इंद्रिये जिंकली जातात. पायांत जोडे घातलेल्या मनुष्याला सर्व पृथ्वी चामड्याने आच्छादिल्यासारखीच आहे. (जोडे घालून पाय झांकले म्हणजे पृथ्वीवरील सर्व कांट्यांचे निवारण झालेच, त्याप्रमाणे एका चित्ताला जिंकल्याने सर्व इंद्रियांना जिंकल्यासारखेच होते.)


       १४४ चित्रसङ्गरयुद्धस्य सैन्यस्याक्षुब्धता यथा ।

           तथैव समता ज्ञस्य व्यवहारवतोऽपि च ॥ ७.३०.५

चित्रांतील समरांगणांत युद्ध करीत असलेले सैन्य निश्चेष्ट असते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष व्यवहार करीत असतांही आंतून निश्चल असतो.


       १४५ चित्रामृतं नामृतमेव विद्धि

               चित्रानलं नानलमेव विद्धि ।

           चित्राङ्गना नूनमनङ्गनेति

               वाचा विवेकस्त्वविवेक एव ॥ ४.१८.६९

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) चित्रांतील अमृत खरें अमृत नव्हे, चित्रांतील अग्नि हा खरा अग्नि नव्हे, आणि चित्रांतील स्त्री ही खरी स्त्री नव्हे, त्याप्रमाणे केवळ बोलण्यांतील विवेक म्हणजे खरा विवेक नव्हे, तर तो अविवेकच होय.


       १४६ चिन्तनेनैधते चिन्ता त्विन्धनेनेव पावकः ।

           नश्यत्यचिन्तनेनैव विनेन्धनमिवानलः ॥ ५.२१.६

ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन टाकीत गेल्यास तो एकसारखा वाढत जातो, त्याप्रमाणे विषयांचे चिंतन करीत गेल्याने चिंता वाढू लागते; परंतु इंधन टाकण्याचे बंद केल्यास अग्नि आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे विषयांचे चिंतन थांबविलें म्हणजे चिंतेचाही नाश होतो.


       १४७ चिन्तामणिरियं प्रज्ञा हृत्कोशस्था विवेकिनः ।

           फलं कल्पलतेवैषा चिन्तितं सम्प्रयच्छति ॥ ५.१२.३४

विचारी पुरुषांच्या हृदयकोशांत असलेली बुद्धि हा चिन्तामणिच आहे. अथवा चिंतिलेले फल देणारी ती एक कल्पलताच आहे.


       १४८ जगदृश्यं तु यद्यस्ति न शाम्यत्येव कस्यचित् ।

           नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ॥ ३.१.२६

दृश्यजग जर खरोखरच असेल तर त्याचा कोणाच्याही ठिकाणी बाध होणे शक्य नाही. कारण जें नाहीं तें आहेसे होत नाही, व जें आहे तें नाहींसें होत नाही.


       १४९ जडः क इव वा नाम गुणागुणमपेक्षते ॥ ३.७०.६२

मूर्ख मनुष्याच्या ठिकाणी गुण आणि अवगुण यांचे तारतम्य बेताचेच असते.


       १५० जडत्वानिःस्वरूपत्वात्सर्वदेव मृतं मनः ।

           मृतेन मार्यते लोकश्चित्रेयं मौर्ख्यञ्चक्रिका ॥ ५.१३.१००

मन हे जड आणि निःस्वरूप असल्यामुळे सर्वदा मेलेलेच आहे परंतु या मृत मनाकडून अनेक लोक मारले जातात, ही मूर्खपरंपरा विचित्रच म्हणावयाची.


       १५१ जडेन मुकेनान्धेन निहतो मनसापि यः ।

           मन्ये स दह्यते मूढः पूर्णचन्द्रमरीचिभिः ॥ ५.१३.१०३

जड, मूढ आणि अंध अशा मनाकडून जो मारला जातो, असा मूढ पुरुष पूर्ण चंद्राच्या शीतळ किरणांनी सुद्धा जाळला जाण्याला काय हरकत आहे ?


       १५२ जडो देहो मनश्चात्र न जडं नाजडं विदुः ॥ ३.११०.१३

देह हा केवळ जड आहे, परंतु मन हे धड जडही नाही, आणि चेतनही नाही.


       १५३ जन्मान्तरशताभ्यस्ता राम संसारसंस्थितिः ।

           सा चिराभ्यासयोगेन विना न क्षीयते क्वचित् ॥ ५.९२.२३

संसारस्थितीचा अभ्यास मागील शेंकडों जन्मांत झालेला आहे, त्यामुळे दीर्घ काल साधनांचा अभ्यास केल्यावांचून संसारस्थिति क्षीण होणार नाही.


       १५४ जयन्ति ते महाशूराः साधवो यैर्विनिर्जितम् ।

           अविद्यामेदुरोल्लासैः स्वमनो विषयोन्मुखम् ॥ ४.३५.१

अविद्येच्या योगाने विलक्षण रीतीने उल्लास पावणारे आणि विषयोन्मुख होणारे स्वतःचे मन ज्यांनी जिंकले अशा महाशूर सत्पुरुषांचा जयजयकार असो !


       १५५ जराकुसुमितं देहद्रुमं दृष्ट्वैव दूरतः ।

           अध्यापतति वेगेन मुने मरणमर्कटः ॥ १.२२.१६

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) हे मुने, देहरूपी वृक्ष म्हातारपणामुळे फुलला आहे असे दुरून दृष्टीस पडतांच मरणरूपी माकड त्यावर जोराने झडप घालतें.


       १५६ जरा जगत्यामजिता जनानां

           सर्वैषणास्तात तिरस्करोति ॥ १.२२.३८

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) म्हातारपण हे अजिंक्य आहे, ते मनुष्यांच्या सर्व इच्छांना न जुमानतां त्यांच्यावर आपला पगडा बसवितें.


       १५७ जरामार्जारिका भुङ्क्ते यौवनाखुं तथोद्धता ।

           परमुल्लासमायाति शरीरामिषगर्धिनी ॥ १.२२.२५

जरा ही उद्धट मांजरी असून ती तारुण्यरूपी उंदीर गट्ट करून टाकते आणि शरीररूपी भक्ष्य भक्षण करण्यास अगदीं टपून बसलेली असते.


       १५८ जरासुधालेपसिते शरीरान्तःपुरान्तरे ।

           अशक्तिरार्तिरापञ्च तिष्ठन्ति सुखमङ्गनाः ॥ १.२२.३६

जरारूपी चुन्याचा लेप दिल्यामुळे शरीररूपी अंतःपुर फटफटीत दिसू लागले, म्हणजे अशक्तता, पीडा व आपत्ति ह्या स्त्रिया त्या अंतःपुरांत आनंदाने राहूं लागतात.


       १५९ जलमेव यथाम्भोधिर्न तरङ्गादिकं पृथक् ।

           आत्मैवेदं तथा सर्वं न भूतोयादिकं पृथक् ॥ ५.७१.१४

समुद्र म्हणजे पाणीच असून लाटा पाण्याहून निराळ्या नसतात त्या प्रमाणे हे सर्व जग तत्त्वतः आत्माच असून पृथ्वी, उदक इत्यादि भूतें आत्म्याहून भिन्न नाहीत.


       १६० जले जलचरव्यूहान् सूक्ष्मान्स्थूलो निकृन्तति ।

           ग्रासार्थं निर्दयो मत्स्यः कैवात्र परिदेवना ॥ ५.१४.२०

पाण्यातील मोठा निर्दय मासा आपणापेक्षा लहान जलचर प्राण्यांना खाऊन टाकतो, या ठिकाणीं शोक तरी किती करणार ? (प्रबलांकडून दुर्बलांना पीडा व्हावयाची असा या सृष्टीतील नियमच आहे.)


       १६१ जाग्रत्येव सुषुप्तस्थः कुरु कर्माणि राघव ।

           अन्तः सर्वपरित्यागी बहिः कुरु यथागतम् ॥ ६.१२५.६

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, जागृतीमध्ये सुषुप्तीमध्ये असल्याप्रमाणे राहून कर्मे करीत जा. आंतून सर्वांचा परित्याग कर, पण बाहेर प्राप्त झालेला व्यवहार करण्यास चुकू नकोस.


       १६२ जायते जीव्यते पश्चादवश्यं च विनश्यति ॥ ४.४८.२५

उत्पन्न होऊन जगणे, हे जसे सृष्टीतील एक कार्य आहे, तसेंच शेवटी मरणे हेही एक अवश्य कार्य होय.


       १६३ जायते दर्शनादेव मैत्री विशदचेतसाम् ॥ ३.७८.३५

मोकळ्यामनाची माणसे एकमेकांना भेटताक्षणी त्यांची परस्पर मैत्री जमत असते.


       १६४ जायन्ते च म्रियन्ते च शरीराणि शरीरिणाम् ।

           पादपानां च पर्णानि का तत्र परिदेवना ॥ ६.३२.५०

झाडांना पाने येतात, व पुढे गळून पडतात; त्याप्रमाणे प्राण्यांची शरीरें उत्पन्न होतात व पुढे नष्ट होतात; यांत दुःख कशाचे ?


       १६५ जितेन्द्रिया महासत्त्वा ये त एव नरा भुवि ।

           शेपानहमिमान्मन्ये मांसयन्त्रगणांश्चलान् ॥ ७.६.४३

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) ज्यांनी इंद्रिये जिंकिली आहेत, आणि जे अत्यन्त धैर्यवान् व बुद्धिशाली आहेत, त्यांनाच या पृथ्वीवर खरोखर ``मनुष्य'' असे म्हणता येईल. बाकीचे लोक म्हणजे केवल हालचाल करणारी मांसाची यंत्रेच होत असें मी समजतो.


       १६६ जिते मनसि सर्वैव विजिता चेन्द्रियावलिः ।

           शीर्यते च यथा तन्तौ दग्धे मौक्तिकमालिका ॥ ३.११०.२५

दोरा जळतांच त्यांत ओंवलेले मोत्यांचे दाणे गळून पडतात; त्याप्रमाणे एक मन जिंकलें म्हणजे सर्व इंद्रिये जिंकली गेली असे समजावे.


       १६७ जीयन्ते जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः ।

           क्षीयते जीर्यते सर्वं तृष्णैवैका न जीर्यते ॥ ७.९३.८६

वृद्ध झालेल्या प्राण्यांचे केस पिकतात, दांत पडतात, सर्व अवयव शिथिल होतात, पण एक तृष्णा मात्र तरुण राहते, ती कमी होत नाही.


       १६८ जीवं विवेकिनमिहोपदिशन्ति तज्ज्ञा

           नो बालमुद्धममसन्मयमार्यमुक्तम् ॥ ६.४१.५९

तत्त्वज्ञ लोक विवेकी जीवालाच उपदेश करतात. श्रेष्ठ लोकांनी ज्याची उपेक्षा केली आहे, देहादिकांच्या ठिकाणी जो आसक्त आहे अशा अत्यंत भ्रमिष्ट मूर्खाला ते उपदेश करीत नाहीत.


       १६९ जीवितं गलति क्षिप्रं जलमञ्जलिना यथा ।

           प्रवाह इव वाहिन्या गतं न विनिवर्तते ॥ ७.१९३.८९

ओंजळीत घेतलेले पाणी ज्याप्रमाणे गळून जाते, त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होत जाते. नदीचा पुढे गेलेला ओघ जसा मागे येत नाही, तसे गेलेले आयुष्य परत येत नाही.


       १७० जेतुमन्यं कृतोत्साहैः पुरुषैरिह पण्डितैः ।

           पूर्व हृदयशत्रुत्वाज्जेतव्यानीन्द्रियाण्यलम् ॥ ४.२३.५९

दुसऱ्यांना जिंकण्याची हाव धरणाऱ्या सुज्ञ पुरुषांनी प्रथम आपल्या हृदयाच्या शत्रुभूत असलेल्या इंद्रियांना जिंकावें.


       १७१ ज्ञातज्ञेयस्य मनसो नूनमेतद्धि लक्षणम् ।

           न स्वदन्ते समग्राणि भोगवृन्दानि यत्पुनः ॥ २.२.३

ज्ञेयतत्त्व जाणल्याची म्हणजे परब्रह्मसाक्षात्कार झाल्याची हीच खूण आहे की, त्या स्थितीनंतर सर्व त-हेच्या विषयोपभोगांबद्दल कायमचा वीट येऊन जातो.


       १७२ ज्ञानं हि परमं श्रेयः ॥ ६.८७.१६

ज्ञान हेच परमश्रेष्ठ आहे.


       १७३ ज्ञानवानेव सुखवान् ज्ञानवानेव जीवति ।

           ज्ञानवानेव बलवांस्तस्माज्ज्ञानमयो भव ॥ ५.९२.४९

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, जो ज्ञानी असतो, तोच खरा सुखी, तोच खरा जिवंत, आणि तोच खरा बलवान असतो; म्हणून तूं ज्ञानी हो.


       १७४ ज्ञानाविषयवैरस्यं स समाधिर्हि नेतरः ॥ ७.४६.१५

ज्ञानामुळे विषयांची आवड नाहीशी होणे, हीच समाधि होय. इतर कारणांमुळे विषय नावडणे ही समाधि नव्हे.


       १७५ ज्ञानिनैव सदा भाव्यं राम न ज्ञानबन्धुना ।

           अज्ञातारं वरं मन्ये न पुनर्ज्ञाबन्धुताम् ॥  ७.२१.१

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) प्रत्येकाने ज्ञानी व्हावे, पण ज्ञानाच्या योगाने यथेष्ट आचरण करणारा ज्ञानबंधु होऊ नये. अशा ज्ञानबंधूपेक्षा मुळींच ज्ञान नसलेला बरा; असें मी समजतों


       १७६ तच्चिन्तनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रबोधनम् ।

           एतदेकपरत्वं च तदभ्यासं विदुर्बुधाः ॥ ३.२२.२४

श्रवणाच्या योगाने समजलेले तत्त्व बुद्धीमध्ये आरूढ व्हावें, अशा दृष्टीने त्याचे निरंतर चिंतन करणे, ज्ञात्या पुरुषांशी संवाद करणे, समान अधिकाऱ्यांनी तें तत्त्व एकमेकांना सांगून त्यासंबंधाने परस्परांना बोध करून देणे आणि अखंड तदाकार वृत्ति राखण्याचा प्रयत्न करणे, याला ज्ञाते पुरुष अभ्यास असें म्हणतात.


       १७७ तडित्सु शरदभ्रेषु गन्धर्वनगरेषु च ।

           स्थैर्य येन विनिर्णीतं स विश्वसितु विग्रहे ॥ १.१८.६१

आकाशांतील वीज, शरद ऋतूमधील मेघ आणि गंधर्वनगर ही सर्व स्थिर आहेत, असें ज्याला वाटत असेल, त्याने देहाच्या शाश्वतीविषयी खुशाल विश्वास बाळगावा.


       १७८ तपसैवं महोग्रेण यद्दुरापं तदाप्यते ॥ ३६.६८.१४

मिळविण्यास कठीण अशी कोणतीही वस्तु मोठ्या उग्रतपाने प्राप्त होते.


       १७९ तरङ्गं प्रतिबिम्बेन्दुं तडित्पुञ्जं नमोऽम्बुजम् ।

           ग्रहीतुमास्थां बध्नामि नत्वायुषि हतस्थितौ ॥ १.१४.७

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) पाण्यावरील लाटा, चंद्राचे प्रतिबिंब, विजेची चमक, आकाशांतील कमळे यांना पकडतां येईल. परंतु चंचल आयुष्यावर विश्वास ठेवता येणार नाही.


       १८० तर तारुण्यमस्तीदं यावत्ते तावदम्बुधेः ।

           ननु संसारनाम्नोऽस्माद्बुद्ध्या नावा विशुद्धया ॥ ७.१६२.१९

(श्रीवसिष्ठ रामाला सांगतात) तारुण्य आहे तोपर्यंतच ``शुद्धबुद्धि'' या नौकेच्या योगानें संसारसागरांतून तरून जाण्याचा यत्न कर.


       १८१ तरन्ति मातङ्गघटातरङ्गं

               रणाम्बुधिं ये मयि ते न शूराः ।

           शूरास्त एवेह मनस्तरङ्गं

               देहेन्द्रियाम्भोधिमिमं तरन्ति ॥ १.२७.९

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) ज्या रणरूपी समुद्रामध्ये शेकडों हत्तींचे कळप तरंगाप्रमाणे दिसत आहेत, असा समुद्र तरून जाणारे लोक खरे शूर, असें मी समजत नाही, तर खरे शूर योद्धे तेच की, जे मनोरूपी तरंगांनी युक्त असलेल्या देहेंद्रियरूपी समुद्रांतून सुरक्षितपणे तरून जातात.


       १८२ तरवोऽपि हि जीवन्ति जीवन्ति मृगपक्षिणः ।

           स जीवति मनो यस्य मननेन न जीवति ॥ १.१४.११

जगांत वृक्ष किंवा पशुपक्षी जगतच आहेत; परंतु ते जगणे खरे नव्हे. तोच खरा जिवंत की, ज्याचे मन वासनाक्षयामुळे जिवंत नाही. किंवा तत्त्वबोधामुळे जो मनाला तुच्छ लेखतो.


       १८३ ताडितस्य हि यः पश्चात्सम्मानः सोऽप्यनन्तकः ।

           शालेर्ग्रीष्माभितप्तस्य कुसेकोऽप्यमृतायते ॥ ४.२३.५३

उन्हाने करपून गेलेल्या भाताच्या शेतावर थोडासा पाऊस पडला तरी त्याला ती अमृतवृष्टि वाटते, त्याप्रमाणे पुष्कळ कालपर्यंत निग्रह केलेल्या मनाला थोडासा मान दिला म्हणजे ते संतुष्ट होते.


       १८४ तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणाः

           क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति ॥ ७.१६३.५६

हेकेखोर लोक जवळ असलेले गंगोदक न पितां, ही आमच्या बापाची विहीर आहे, असे म्हणून तिचेच खारट पाणी पितात.


       १८५ तावदुत्तमतामेति पुमानपि दिवौकसाम् ।

           कृपणैरिन्द्रियैर्यावत्तृणवन्नापकृष्यते ॥ ७.६.४२

विषयासक्त होणारी इंद्रिये जोपर्यंत मनुष्याला गवताप्रमाणे आकर्षण करीत नाहीत, तोपर्यंतच तो देवांना देखील मान्य होतो.


       १८६ तावन्नयति सङ्कोचं तृष्णा वै मानवाम्बुजम् ।

           यावद्विवेकसूर्यस्य नोदिता विमला प्रभा ॥ २.१३.२०

जोपर्यंत विवेकरूपी सूर्याचा उदय होऊन त्याचा स्वच्छ प्रकाश सर्वत्र पसरला नाही, तोपर्यंतच तृष्णा ही मनुष्यरूपी कमलाला संकुचित करते.


       १८७ तिष्ठतस्तव कार्येषु

               मास्तु रागेषु रञ्जना ।

           स्फटिकस्येव चित्राणि

               प्रतिबिम्बानि गृह्णतः ॥ ३.११४.७६

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) स्फटिक मणि अनेक प्रकारच्या वस्तूंची प्रतिबिबें ग्रहण करतो, परंतु तो त्या वस्तूंचे ठिकाणी आसक्त होत नाही; त्याप्रमाणे व्यवहारांत वावरत असतां मोह उत्पन्न करणाऱ्या विषयांच्या ठिकाणी तुझे चित्त आसक्त न होवो.


       १८८ तुच्छोऽप्यर्थोऽल्पसत्त्वानां

           गच्छति प्रार्थनीयताम् ॥ ३.७०.३१

क्षुद्र अंतःकरणाचे लोक नेहमीं क्षुद्र फलासाठीच धडपडत असतात.


       १८९ तुल्यवर्णच्छदैः कृष्णः सङ्गतैः किल कोकिलैः ।

           केन विज्ञायते काकः स्वयं यदि न भाषते ॥ ७.११६.६६

कोकिल पक्ष्यांप्रमाणेच पंख, रंग हे असणारा कावळा त्या कोकिलांच्या बरोबर असतां जोपर्यंत स्वतःचा शब्द करीत नाही, तोपर्यंत तो कोणाला ओळखू येणार आहे ?


       १९० ते पूज्यास्ते महात्मानस्ते एव पुरुषा भुवि ।

           ये सुखेन समुत्तीर्णाः साधो यौवनसङ्कटात् ॥ १.२०.४१

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) जे पुरुष यौवनरूपी संकटांतून सुखाने तरून जातात, तेच पृथ्वीवर पूज्य, तेच महात्मे, आणि तेच खरे पुरुष होत.


       १९१ ते महान्तो महाप्राज्ञा निमित्तेन विनैव हि ।

           वैराग्यं जायते येषां तेषां ह्यमलमानसम् ॥ २.११.२४

ते महाबुद्धिमान् महात्मे खरोखरच धन्य होत की, ज्यांच्या निर्मल मनामध्ये निमित्ताशिवायच वैराग्य उत्पन्न होते.


       १९२ त्यक्तावनेर्विटपिनो भूयः पत्राणि नो यथा ।

           निर्वासनस्य जीवस्य पुनर्जन्मादि नो तथा ॥ ५.४८.५५

वृक्षाची मुळेच तोडून टाकली म्हणजे त्याच्यावर पुन्हा पाने येत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या वासना नाहीशा झालेल्या आहेत, अशा प्राण्याला पुनर्जन्मादि अवस्था प्राप्त होत नाहींत.


       १९३ त्यजत्स्वात्मसुखं सौम्यं मनो विषयविद्रुतम् ।

           अङ्कुशेनेव नागेन्द्र विचारेण वशं नयेत् ॥ ४.२३.५१

हत्तीला अंकुशाच्या योगानें कह्यांत ठेवतात, त्याप्रमाणे स्वात्मसुखाचा त्याग करून विषयसुखाच्या मागे धांव घेणाऱ्या मनाला विचाराच्या योगाने ताब्यात ठेवावे.


       १९४ त्यजन्त्युद्युममुदयुक्ता न स्वकर्माणि केचन ॥ ३.२.५

उद्योगी पुरुष स्वकर्मापासून कधीही पराङ्मुख होत नाहीत.


       १९५ त्यागो न युक्त इह कर्मसु नापि रागः ॥ ५.५.५४

अवश्य प्राप्त कर्माचा त्याग करणे व त्याविषयी आसक्ति ठेवणे ही दोन्ही युक्त नव्हेत.


       १९६ दासाः पुत्राः स्त्रियश्चैव बान्धवाः सुहृदस्तथा ।

           हसन्त्युन्मत्तकमिव नरं वार्धककम्पितम् ॥ १.२२.६

उन्मत्त मनुष्याकडे पाहून लोक हसतात, त्याप्रमाणे म्हातारपणी मनुष्याचे शरीर कापूं लागले म्हणजे त्याचे नोकर चाकर, मुलगे, बायका, बधु, आणि मित्र त्याच्याकडे पाहून हसू लागतात.


       १९७ दीनो वासनया लोकः कृतान्तेनापकृष्यते ।

           रज्ज्वेव बालेन खगो विवशो भृशमुच्छ्रवसन् ॥ ४.२७.३४

जाळयांत किंवा फासांत सांपडून पराधीन झालेल्या व घाबरलेल्या पक्ष्याला एकांदे लहान पोर दोरी धरून सहज ओढते, त्याप्रमाणे वासनेच्या योगाने दीन झालेल्या मनुष्याला यम आपल्या फासांनी ओढतो.


       १९८ दीर्घसंसाररोगस्य विचारो हि महौषधम् ॥ २.१४.२

संसाररूपी दीर्घरोगावर विचार हे रामबाण औषध आहे.


       १९९ दुःखशोकमहाष्ठीलः कष्टकण्टकसङ्कटः ।

           सहस्रशाखतां याति दारिद्यदृढशाल्मलिः ॥ ६.७.१९

दुःख व शोक या ज्याच्यामोठ्या बिया आहेत, कष्टरूपी कांट्यांनी जो भरून गेला आहे, असा हा दारिद्यरूपी बळकट सावरीचा वृक्ष हजारों खांद्यांनी विस्तार पावतो.


       २०० दुःखानि मौर्ख्यविभवेन भवन्ति यानि

           नैवापदो न च जरामरणेन तानि ॥ ६.८८.२७

आपत्ति, जरा व मरण यांच्या पासून जें दुःख होत नाही, ते दुःख मूर्खपणाच्या प्रभावाने भोगावे लागते.


       २०१ दुःखाद्यथा दुःखकाले हा कष्टमिति कथ्यते ।

           हाकष्टशब्दपर्यायस्तथा हादैवमित्यपि ॥ २.६.३

दुःखाचे वेळी ``हाय हाय, केवढी दुःखाची गोष्ट'' असे उद्गार निघतात. या अर्थानेच कधी कधी ``हाय हाय, दैव केवढे बलिष्ठ आहे'' असेही उद्गार पर्यायाने निघतात.


       २०२ दुःखितस्य निशा कल्पः सुखितस्यैव च क्षणः ॥ ३.६०.२२

मनुष्य दुःखी कष्टी असला म्हणजे त्याला एक रात्र कल्पाप्रमाणे दीर्घ वाटते आणि सुखामध्ये कितीही काळ लोटला, तरी तो त्याला एक क्षणाप्रमाणेच वाटतो.


       २०३ दुरीहितं दुर्विहितं सर्वं सज्जनसूक्तयः ।

           प्रमार्जयन्ति शीतांशोस्तमःकाण्डमिवाञ्जयः ॥ ५.४.७

ज्याप्रमाणे चंद्राचे किरण अंधकाराचा नाश करतात, त्याप्रमाणे सज्जनांची चांगली वचने सर्व शारीरिक व मानसिक दोष दूर करतात.


       २०४ दुरुत्तरा या विपदो दुःखकल्लोलसङ्कुलाः ।

           तीर्यते प्रज्ञया ताभ्यो नावापद्भयो महामते ॥ ५.१२.२०

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) दुःखरूपी लाटांच्या योगाने भयंकर आणि दुस्तर भासणारी विपत्तिरूपी नदी प्रज्ञारूपी नौकेचा आश्रय केल्याने सहज तरून जातां येते.


       २०५ दुर्जनो येन तेनैव नाशितेनैति हृष्टताम् ॥ ३.७०.८२

कोणत्या तरी रीतीने दुसऱ्याचा नाश झाला म्हणजे दुर्जनाला आनंद होत असतो.


       २०६ दुःसाध्याः सिद्धिमायान्ति रिपवो यान्ति मित्रताम् ।

           विषाण्यमृततां यान्ति सन्तताभ्यासयोगतः ॥ ७.६७.३३

सतत अभ्यासाने, मिळण्यास कठीण अशी कोणतीही वस्तू प्राप्त होते, शत्रु मित्र होतात, आणि विष हे अमृताप्रमाणे होते.


       २०७ दुःसाध्यो वासनात्यागः सुमेरून्मूलनादपि ॥ ५.९२.१०

मेरु पर्वत उपटून टाकण्यापेक्षाही वासनांचा त्याग करणे कठीण आहे.


       २०८ दूरमुत्सहते राजा महासत्त्वो महापदि ।

           अल्पसत्त्वो जनः शोच त्यल्पेऽपि हि परिक्षते ॥ ६.१२७.४३

महाबलवान् राजा युद्धादिकांच्या मोठ्या आपत्तींत सांपडला, तरी साधनसंपन्न असल्यामुळे फार मोठा उत्साह धारण करतो. पण अल्प सामर्थ्य असलेला मनुष्य त्याची थोडीशी जरी हानि झाली तरी फार शोक करतो.


       २०९ दृष्टान्तेन विना राम नापूर्वार्थोऽवबुध्यते ।

           यथा दीपं विना रात्रौ भाण्डोपस्करणं गृहे ॥ २.१८.५१

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशाशिवाय घरांतील भांडी वगैरे वस्तू दिसत नाहीत, त्याप्रमाणे दृष्टांताशिवाय अदृष्ट अर्थाचा बोध होत नाही.


       २१० देहपादपसंस्थस्य हृदयालयगामिनः ।

           तृष्णा चित्तखगस्पेयं वागुरा परिकत्पिता ॥ ४.२७.३३

देहरूपी वृक्षावरील हृदयरूपी घरट्याकडे जाणाऱ्या चित्तरूपी पक्ष्याला पकडण्याकरितांच हे तृष्णारूपी जाळे जणूंकाय निर्माण करण्यांत आले आहे.


       २११ देहोऽहमिति या बुद्धिः सा संसारनिबन्धनी ।

           न कदाचिदियं बुद्धिरादेया हि मुमुक्षुभिः ॥ ६.११८.८

``मी देह आहे,'' अशी जी बुद्धि ती संसारांत जखडून टाकणारी आहे. यासाठी मुमुक्षूंनी त्या बुद्धीचा स्वीकार केव्हाही करूं नये.


       २१२ दैन्यदारिद्यदुःखार्ता अप्यन्ये पुरुषोत्तमाः ।

           पौरुषेणैव यत्नेन याता देवेन्द्रतुल्यताम् ॥ २.५.२७

दैन्य, दारिद्य आणि दुःख यांनी युक्त असलेले उत्तम पुरुष पूर्वी पुरुषप्रयत्नानेंच इंद्रपदाला पोचले आहेत.


       २१३ दैवं सम्प्रेरयति मामिति दग्धधियां मुखम् ।

           अदृष्टश्रेष्ठदृष्टीनां दृष्ट्वा लक्ष्मीनिवर्तते ॥ २.५.२०

``मला दैव प्रेरणा करीत आहे'' असे म्हणणाऱ्या लोकांची बुद्धि होरपळून गेली आहे, असे समजावे. ज्यांच्या दृष्टीला दैवच श्रेष्ठ आहे असे वाटते, अशा लोकांचे तोंड दिसल्याबरोबर लक्ष्मी त्यांच्याकडे पाठ फिरविते.


       २१४ दैवमेवेह चेत्कर्तुं पुंसः किमिव चेष्टया ।

           स्नानदानासनोच्चारान्दैवमेव करिष्यति ॥ २.८.६

सर्व गोष्टी जर दैवानेच होत असतील, तर मनुष्याला काही हालचाल तरी करून काय करावयाचे आहे ? तसे असेल तर स्नानदानादि क्रियाही दैवच करूं शकेल.


       २१५ दैवात्तमिति मन्यन्ते ये हतास्ते कुबुद्धयः ॥ २.५.२९

कोणतीही गोष्ट दैवाने घडून येते, अशी ज्यांची भावना असते, ते मनुष्य दुष्टबुद्धीचे असून त्यांचा अखेरीस नाश होतो.


       २१६ दोषान्प्रसवति स्फारान्वासनावलिता मतिः ।

           कीर्णकण्टकबीजा भूः कण्टकासरं यथा ॥ ४.।३५.६

काटेरी झाडे तोडून टाकली, पण त्या झाडांची मुळे भूमीत तशीच कायम असली, तर त्यांची पुन्हां जोराने वाढ होऊन सर्व भूमि कांट्यांनी भरून जाते; त्याचप्रमाणे विषयांचा त्याग केला, तरी जोपर्यंत अंतःकरणांत वासनाबीज शिल्लक आहे, तोपर्यंत तें विषयांचे स्मरण करवून रागद्वेषादि दोष उत्पन्न केल्याशिवाय राहणार नाही.


       २१७ द्विविधो भवति प्रष्टा तत्त्वज्ञोऽज्ञोऽथवापि च ।

           अज्ञस्याज्ञतया देयो ज्ञस्य तु ज्ञतयोत्तरः ॥ ७.२९.३२

तत्त्वज्ञ आणि अज्ञ असे दोन प्रकारचे प्रश्न करणारे असतात, तत्त्वज्ञाला तात्त्विक उत्तर दिले पाहिजे आणि अज्ञ मनुष्याला त्याच्या सारखे सांगून शांत केले पाहिजे.


       २१८ द्वौ हुडाविव युध्येते पुरुषार्थौ समासमौ ।

           प्राक्तनश्चैहिकश्चैव शाम्यत्यत्राल्पवीर्यवान् ॥ २.५.५

दोन एडके आपसांत लढू लागले म्हणजे त्यांची कधी बरोबरी होते किंवा एक अधिक बलिष्ठ असल्यास तो दुसऱ्याला जिंकतो, त्याचप्रमाणे पूर्वीचा व हल्लांचा प्रयत्न हे एकमेकांशी लढत असतात, त्यामध्ये कमी सामर्थ्याचा असेल त्याला हार खावी लागते.


       २१९ धीमन्तो न निषेवन्ते पर्यन्ते दुःखदां क्रियाम् ॥ ५.५२.८

ज्या कृत्याचा परिणाम दुःखदायक होणार, असे कृत्य करण्याला विचारी लोक केव्हांच तयार होत नाहीत.


       २२० धीरोऽप्यतिबहुज्ञोऽपि कुलजोऽपि महानपि ।

           तृष्णया बध्यते जन्तुः सिंहः शृङ्खलया यथा ॥ ४.२७.३२

ज्याप्रमाणे सिंह श्रृंखलेने बद्ध होतो त्याप्रमाणे मनुष्य कितीही धैर्यवान, ज्ञानी आणि कुलीन असला, तरी तृष्णेच्या जाळ्यांत सांपडून बद्ध होतो.


       २२१ धीः सम्यग्योजिता पारमसम्यग्योजिताऽऽपदम् ।

           नरं नयति संसारे भ्रमन्ती नौरिवार्णवे ॥ ५.१२.३६

बुद्धि चांगल्या रीतीने योजिली तर मनुष्य संकटांतून पार पडतो, अयोग्य रीतीने तिचा उपयोग केल्यास आपत्ति प्राप्त होते. ज्याप्रमाणे अशिक्षित नावाड्याची नौका समुद्रामध्ये गिरक्या खाते, त्याप्रमाणे मंदबुद्धि पुरुष या संसारसागरांत गटंगळ्या खात राहतो.


       २२२ न कदाचन जायन्ते शीतांशोरुष्णरश्मयः ॥ १.९.३

चंद्राचे किरण कधीही उष्ण होत नाहीत.


       २२३ न कारणं विना कार्य भवतीत्युपपद्यते ॥ ७.१७९.८

कारण असल्यावांचून कार्य होणे संभवत नाही.


       २२४ न कालमतिवर्तन्ते महान्तः स्वेषु कर्मसु ॥ ५.१०.९

महात्मे आपल्या कर्तव्यकर्माविषयी केव्हाही कालातिक्रम होऊ देत नाहीत. (वेळच्यावेळी काम करतात।)


       २२५ न किञ्चन फलं धत्ते स्वाभ्यासेन विना क्रिया ॥ २.१८.११

अभ्यास केल्याशिवाय कोणतेच कृत्य फलद्रूप होत नाही.


       २२६ न किञ्चिद्दीर्घसूत्राणां सिध्यत्यात्मक्षयाहते ॥ ३.७८.८

दीर्घसूत्री मनुष्य विलंब करून आपल्या कार्याचा नाश करून घेतात, यापेक्षा जास्त कांही त्यांच्या पदरांत पडत नाही.


       २२७ न केचन जगद्भावास्तत्त्वज्ञं रञ्जयन्त्यमी ।

           मर्कटा इव नृत्यन्तो गौरीलास्यार्थिनं हरम् ॥ ४.५७.५६

गौरीच्या नृत्याची इच्छा करणा-या शंकरापुढे माकडे नाचूं लागली असता त्याला त्याबद्दल प्रेम वाटणे शक्य नाही, त्याप्रमाणे या जगांतील कोणतीही वस्तु ज्ञानी पुरुषाचे चित्त आकर्षण करूं शकत नाही.


       २२८ न क्षमन्ते महान्तोऽपि

           पौनःपुन्येन दुष्क्रियाम् ॥ ५.३०.१२

वारंवार केलेल्या अपराधांची महात्मे देखील क्षमा करीत नाहीत.


       २२९ नगर्यां दह्यमानायां भूषितायां तथोत्सवे ।

           सम एव महीपालो जनको भूभृतां वरः ॥ ७.१९८.३१

राजधानीची मिथिलानगरी जळू लागली किंवा उत्सवाचे वेळी ती सशोभित केली, तरी दोन्ही स्थितीत राजश्रेष्ठ जनकराजाची अंतःकरणाची समता कायम असे.


       २३० न च निस्पन्दता लोके दृष्टेह शवतां विना ।

           स्पन्दाच्च फलसम्प्राप्तिस्तस्मादैवं निरर्थकम् ॥ २.८.८

हालचाल ही फक्त प्रेतामध्येच काय ती होत नाहीं; हालचाल केल्यानेच फलप्राप्ति होत असल्यामुळे दैव हे निरर्थक आहे.


       २३१ न जातु ते विगण्यन्ते गणनासु गरीयसाम् ।

           ये तरङ्गैस्तृणानीय ह्रियन्ते हर्षशोकयोः ॥ ६.१२७.५०

लाटांबरोबर गवत वाहत जाते त्याप्रमाणे जे हर्षशोकांच्या तडाक्यात सांपडतात, त्यांची गणना श्रेष्ठ लोकांमध्ये होत नाही.


       २३२ न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा क्वचित् ।

           पौरुषेण प्रयत्नेन यन्नाप्नोति गुणान्वितः ॥ ४.६२.१९

या पृथ्वीवर, आकाशांत किंवा देवलोकांत अशी एकही वस्तू नाही की, जी प्रयत्न करणाऱ्या गुणवानाला साध्य होत नाही.


       २३३ न तदस्ति विमोहाय यद्विविक्तस्य चेतसः ॥ ३.७८.२१

विचार करणा-या अंतःकरणाला मोह पाडील अशी कोणतीही स्थिति नाही.


       २३४ न तपांसि न तीर्थानि न शास्त्राणि जयन्ति च ।

           संसारसागरोत्तारे सज्जनासेवनं विना ॥ ४.३३.१४

संसारसागरांतून तरून जाण्यासाठी केलेले तप, तीर्थादन आणि शास्त्राध्ययन ही सर्व सज्जनसेवेवांचून व्यर्थ होत.


       २३५ न देशो मोक्षनामास्ति

           न कालो नेतरा स्थितिः ॥ ६.१२१.१२

मोक्ष म्हणून कांहीं कोणता निराळा देश नाहीं, निराळा काल नाही, किंवा निराळी स्थिति नाही.


       २३६ न मे मनोरमाः कामा न च रम्या विभूतयः ।

           इदं मत्ताङ्गनापाङ्गभङ्गलोलं च जीवितम् ॥ ७.९३.६०

(सिद्ध श्रीवसिष्ठांना म्हणतात) विषय व ऐश्वर्य ही दोन्ही रमणीय असतील, परंतु माझे मन विषयांचे ठिकाणी रमत नाही, व ऐश्वर्यापासूनही आनंद पावत नाही. कारण, जीवित हेच मुळी मत्तस्त्रियांच्या कटाक्षाइतकेंच चंचल आहे.


       २३७ न मोक्षो नभसः पृष्ठे न पाताले न भूतले ।

           मोक्षो हि चेतो विमलं सम्यग्ज्ञानविबोधितम् ॥ ५.७३.३५

मोक्ष हा काही कोठे आकाशांत, पाताळांत किंवा पृथ्वीवर आहे असें नाही, तर योग्य तऱ्हेचे ज्ञान होऊन झालेली मनाची निर्मल स्थिति म्हणजेच मोक्ष होय.


       २३८ न मौर्ख्योदधिको लोके कश्चिदस्तीह दुःखदः ॥ ५.२९.५७

या लोकांत मूर्खपणापेक्षा अधिक दुःखदायक असे काही नाही.


       २३९ न वैराग्यात्परो बन्धुर्न संसारात्परो रिपुः ॥ ६.१२७.५९

वैराग्याहून श्रेष्ठ दुसरा बंधु नाही व संसाराहून दुसरा शत्रु नाही.


       २४० न व्याधिर्न विष नापत्तथा नाधिश्च भूतले ।

           खेदाय स्वशरीरस्थं मौख्यम्मेकं यथा नृणाम् ॥ २.१३.१३

स्वतःच्या मूर्खपणामुळे जितकें दुःख भोगावे लागते, तितकें दुःख मानसिक चिंता, शारीरिक पीडा, विष व आपत्ति यांच्यापासूनही भोगावे लागत नाही.


       २४१ न शास्त्रैर्नापि गुरुणा दृश्यते परमेश्वरः ।

           दृश्यते स्वात्मनैवात्मा स्वया सत्त्वस्थया धिया ॥ ६.११८.४

परमेश्वर शास्त्रे व गुरु यांच्या योगाने दिसत नाही. तर आपल्या स्वतःच्या सत्त्वस्थ बुद्धीनेच त्याचे दर्शन होते.


       २४२ नष्टं नष्टमुपेक्षेत प्राप्तं प्राप्तमुपाहरेत् ।

           निर्विकारतयैतद्धि परमार्चनमात्मनः ॥ ६.३९.४४

जें जें नष्ट झाले असेल त्याची उपेक्षा करणे आणि जें जें यदृच्छेनें प्राप्त होईल त्याचा स्वीकार करणे या दोन्ही गोष्टी निर्विकार चित्ताने कराव्या, म्हणजे हेच आत्म्याचे श्रेष्ठ पूजन होईल.


       २४३ न सज्जनाद्दूरतरः क्वचिद्भवे-

               द्भजेत साधून्विनयक्रियान्वितः ।

           स्पृशन्त्ययत्नेन हि तत्समीपगं

               विसारिणस्तद्गतपुष्परेणवः ॥ ७.९८.२४

सज्जनांपासून केव्हाही दूर राहूं नये, नम्रतापूर्वक त्यांची सेवा करावी. कारण, सज्जनांच्याजवळ राहणाराला त्यांच्या गुणरूपी पुष्पांतील पसरणाऱ्या रजःकणाचा लाभ अनायासे होतो.


       २४४ न स्तौमि न च निन्दामि क्वचित्किञ्चित्कदाचन ।

           आत्मनोऽन्यस्य वा साधो तेनाहं शुभमागतः ॥ ६.२६.१३

(भुशुंड श्रीवसिष्ठांना म्हणतो) मी केव्हाही व कोठेही थोडीसुद्धा आपली स्तुति करीत नाही व दुसऱ्याची निंदा करीत नाहीं त्यामुळे मला कल्याणकारक स्थिति प्राप्त झाली आहे.


       २४५ न स्वकर्म विना श्रेयःप्राप्नुवन्तीह मानवाः ॥ ५.४८.६९

स्वकर्माचे अनुष्ठान केल्याशिवाय मनुष्यांना या जगांत श्रेयःप्राप्ति होत नाही.


       २४६ न स्वधैर्यादृते कश्चिदभ्युद्धरति सङ्कटात् ॥ ५.२१.१०

स्वतःच्या धैर्यावांचून आपणाला संकटांतून कोणीही पार पाडणार नाही.


       २४७ न हि चन्द्रं विना शुद्धा सविकासा कुमुद्वती ॥ २.१२.६

चंद्रावांचून श्वेत कमलिनी विकास पावत नाही.


       २४८ न हि जानाति दुर्बुद्धि-

           र्विनाशं प्रत्युपस्थितम् ॥ ३.१०२.३६

दुर्बुद्धि असलेल्या मनुष्याला आपल्या पुढे येऊन ठेपलेला स्वतःचा नाश समजून येत नाही.


       २४९ न हि तज्ज्ञस्य शान्तस्य ममाहमिति विद्यते ॥ ७.३०.२

तत्त्वज्ञ आणि शांत मनुष्याचे ठिकाणी ``मी'' आणि ``माझें'' असे दोन्ही भाव नसतात.


       २५० न हि पर्यनुयोक्तव्याः स्वप्नविभ्रमरीतयः ।

           न तदस्ति जगत्यस्मिन् यन्न सम्भवति भ्रमे ॥ ६.६१.१६

परमात्म्याची माया अघटितघटना करण्यांत मोठी पटाईत आहे, त्यामुळे या जगांत स्वप्न भ्रम इत्यादिकांप्रमाणे ``असे कसे होऊ शकेल'' असं म्हणताच येत नाही. जे भ्रमांत संभवत नाही, असें या जगांत कांहीं नाही.


       २५१ न हि सत्त्ववतामस्ति दुःसाध्यमिह किञ्चन ॥ ३.८२.२९

उद्योगी लोकांना मिळविण्यास कठीण असे या जगांत कांहीं एक नाही.


       २५२ ना यथा यतते नित्यं यद्भावयति यन्मयः ।

           यादृगिच्छेच्च भवितुं तादृग्भवति नान्यथा ॥ ७.१५७.३१

मनुष्य नित्य ज्यासाठी अगदीं तन्मय होऊन अनन्य भावाने प्रयत्न करतो व जसे होण्याची इच्छा करतो, तसाच तो होतो. एरवीं कधीही होत नाही.


       २५३ नाशोऽपि सुखयत्यज्ञमेकवस्त्वतिरागिणम् ॥ ३.७०.२३

एखाद्या वस्तूवर आसक्त झालेल्या अज्ञ मनुष्याला स्वतःचा नाश झाला तरी तो सुद्धां सुखदायकच वाटतो.


       २५४ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।

           यत्तु नास्ति स्वभावेन कः क्लेशस्तस्य मार्जने ॥ ३.७.३८

जें असत् आहे, त्याला कधीं अस्तित्वच नाही, आणि जे सत् आहे त्याचा केव्हाही अभाव होऊ शकत नाही. म्हणून जे वस्तुतः नाही, तें नाहींसें करण्याला क्लेश कसले ?


       २५५ नासिधारा न वज्रार्चिर्न तप्तायःकणार्चिषः ।

           तथा तीक्ष्णा यथा ब्रह्मंस्तृष्णेयं हृदि संस्थिता ॥ १.१७.४८

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) मनुष्याच्या हृदयामध्ये राहणारी तृष्णा ही जितकी तीक्ष्ण असते, तितकी तरवारीची धार, वज्राचे तेज किंवा तापलेल्या लोखंडांतून बाहेर पडणाऱ्या ठिणग्या तीक्ष्ण नसतात.


       २५६ नास्ति शत्रुः प्रकृत्यैव न च मित्रं कदाचन ।

           सुखदं मित्रमित्युक्तं दुःखदाः शत्रवः स्मृताः ॥ ५.५३.५८

कोणी कोणाचा मूळचाच शत्रु नाही, व मूळचाच मित्रही नाही. सुख देणारा तो मित्र, व दुःख देणारा तो शत्रु, असेंच मानले जाते.


       २५७ नाहं देहस्य नो देहो मम नायमहं तथा ।

इति विश्रान्तचित्ता ये ते मुने पुरुषोत्तमाः१.१८.५३

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) ``मी देहाचा कोणी नाही, देह माझा कोणी नाही, व हा देह हे माझे खरे स्वरूप नव्हे,'' या भावनेने जे मनुष्य परमात्मस्वरूपांत स्थिर होतात, तेच उत्तम पुरुष होत.


       २५८ नित्यं सज्जनसम्पर्काद्विवेक उपजायते ।

           विवेकपादपस्यैव भोगमोक्षौ फले स्मृतौ ॥ २.११.५८

सज्जनांचा सहवास केल्याने विवेक अवश्य उत्पन्न होतो, व भोग आणि मोक्ष ही त्या विवेकरूपी वृक्षाचींच फळे आहेत.


       २५९ नित्याशुचेऽप्रियजने भषणैकनिष्ठ

               रथ्यान्तरभ्रमणनीतसमस्तकाल ।

           कौलेयकाशयसमानतयैव मन्ये

               मुर्खेण केनचिदहो बत शिक्षितोऽसि ॥ ७.११६.५८

हे कुत्र्या, तुझ्यामध्ये आपल्यासारखेच गुण आहेत असे पाहून, नित्य अपवित्रता, अप्रिय जनांवर भों भों करणे, रस्त्यांतून फिरत सारा वेळ फुकट घालविणे, इत्यादि गुण कोणी मूर्खाने तुला शिकविले आहेत असे मला वाटते. (अर्थात् तुझ्यापेक्षां तुझ्या गुरूमध्ये असले गुण अधिक असले पाहिजेत.)


       २६० निरिच्छतैव निर्वाणं सेच्छतैव हि बन्धनम् ॥ ७.३६.३८

इच्छा नसणे हाच मोक्ष होय. आणि इच्छा असणे हाच बंध होय.


       २६१ निर्दयः कठिनः क्रूरः कर्कशः कृपणोऽधमः ।

           न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम् ॥ १.२३.९

काल हा निर्दय, कठीण, क्रूर, कर्कश, कृपण आणि अधम आहे. काळ हा ज्याला गिळून टाकीत नाही. असें अद्यापि कांहींच नाही.


       २६२ निर्मले मुकुरे वक्रमयत्नेनैव बिम्बति ॥  २.२.१९

स्वच्छ आरशामध्ये तोंडाचे प्रतिबिंब सहज रीतीने पडते.


       २६३ निर्वासनं जीवितमेव मोक्षः ॥ ७.१७७.४३

जीवित वासनारहित असणे हाच मोक्ष होय.


       २६४ निःसङ्कल्पो यथाप्राप्तव्यवहारपरो भव ॥ ४.५३.४७

(दाशूर तपस्वी आपल्या पुत्राला म्हणतो।) संकल्परहित होऊन प्राप्त झालेला व्यवहार योग्य रीतीने करीत जा.


       २६५ नैर्घृण्यमस्थैर्यमथाशुचित्वं

               रथ्याचरत्वं परिकुत्सितत्वम् ।

           श्वभ्यो गृहीतं किमु नाम मूखै-

               र्मूर्खेभ्य एवाथ शुना न जाने ॥ ७.११६.५४

निर्दयता, चंचलता, अपवित्रता, रस्त्यांतून व्यर्थ भटकणे, निंद्य असणे हे धर्म मूर्खांनी कुत्र्यांपासून घेतले, किंवा कुत्रे मूखौंपासून शिकले हे नक्की समजत नाही.


       २६६ नैवास्त्यसौ जगति यः परदुःखशान्त्यै

           प्रीत्या निरन्तरतरं सरलं यतेत ॥ ७.११९.३

दुसऱ्याचे दुःख नाहीसे करण्यासाठी मनापासून निरंतर योग्य रीतीने झटणारा या जगामध्ये कोणीही नाही.


       २६७ नोदेति नास्तमायाति सुखे दुःखे मुखप्रभा ।

           यथाप्राप्तस्थितेर्यस्य जीवन्मुक्तः स उच्यते ॥ ३.९.६

सुखाचे वेळी ज्याच्या तोंडावरील तेज वाढत नाही, आणि दुःखाचे वेळी ते कमी होत नाही. याप्रमाणे प्राप्त स्थितीमध्ये जो निर्विकार असतो तोच जीवन्मुक्त होय.


       २६८ नोद्विजन्ते स्वकार्येषु जना अध्यवसायिनः ॥ ६.८८.१९

निश्चयी लोक आपल्या कार्याविषयीं कधीं उद्विग्न होत नाहीत.


       २६९ नोपपत्रं हि यद्यत्र तत्र तन्न विराजते ।

           मध्ये काचकलापस्य महामूल्यो मणिर्यथा ॥ ५.३२.२८

जें ज्या ठिकाणी योग्य नसते, ते त्या ठिकाणीं शोभतही नाही. काचेच्या मण्यांच्या ढिगांत महामूल्यवान रत्न कसे शोभणार ?


       २७० पथिकाः पथि दृश्यन्ते रागद्वेषविमुक्तया ।

           यथा धिया तथैवैते द्रष्टव्याः स्वेन्द्रियादयः ॥ ६.११८.५

प्रवासी ज्या मार्गाने जातात, त्या मार्गावर आसक्ति ठेवीत नाहीत त्याप्रमाणे आपल्या देहेंद्रियादिकांस रागद्वेषरहित बुद्धीने पाहावें.


       २७१ पदमतुलमुपैतुमिच्छतोच्चैः

               प्रथममियं मतिरेव लालनीया ।

           फलमभिलषता कृषीवलेन

               प्रथमतरं ननु कृष्यते धरैव ॥ ५.१२.४०

चांगल्या पिकाची इच्छा करणारा शेतकरी प्रथम जमीन नांगरून तिची उत्तम मशागत करतो, त्याप्रमाणे अतुल अशा परमात्मपदाच्या प्राप्तीची इच्छा करणा-या पुरुषाने प्रथम विवेकाच्या योगाने आपली बुद्धि शुद्ध करावी.


       २७२ परं विवर्धनं बुद्धेरज्ञानतरुशातनम् ।

           समुत्सारणमाधीनां विद्धि साधुसमागमम् ॥ २.१६.५

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) साधूंचा समागम बुद्धीची वाढ करतो, अज्ञानरूपी वृक्षाला तोडून टाकतो आणि सर्व मानसिक दुःखें नाहीशी करतो.


       २७३ परं विषयवैतृष्ण्यं समाधानमुदाहृतम् ।

           आहृतं येन तन्नूनं तस्मै नृब्रह्मणे नमः ॥ ७.४५.४६

विषयांविषयी अत्यंत वैराग्य हेच समाधान आहे. ते ज्याने संपादन केले आहे, त्या मनुष्यरूपी ब्रह्माला नमस्कार असो.


       २७४ परमपदप्रतिमो हि साधुसङ्गः ॥ ५.६.४८

सत्पुरुषांच्या सहवासाची योग्यता प्रत्यक्ष मोक्षसुखाइतकी आहे.


       २७५ परं पौरुषमाश्रित्य दन्तैर्दन्तान्विचूर्णयन् ।

           शुभेनाशुभमुद्युक्तं प्राक्तनं पौरुषं जयेत् ॥ २.५.९

दातांनी दांतांचं चूर्ण होईल इतक्या जोराने शास्त्रीय प्रयत्न करून अनर्थ उत्पन्न करणाऱ्या पूर्वीच्या कर्माचा पाडाव करावा.


       २७६ परस्परेच्छाविच्छित्तिर्न हि सौहार्दबन्धनी ॥ ३.५५.७२

परस्परांच्या इच्छांचा भंग झाला असतां खरी मैत्री टिकत नाही.


       २७७ परस्परेप्सितस्नेहो दुर्लभो हि जगत्त्रये ॥ ६.१०८.२१

परस्परांना इष्ट असलेला, अर्थात् कृत्रिम नसलेला, स्नेह त्रैलोक्यांत दुर्लभ आहे.


       २७८ परामृश्य विवेकेन संसाररचनामिमाम् ।

           वैराग्यं येऽधिगच्छन्ति त एव पुरुषोत्तमाः ॥ २.११.२६

या संसाररचनेचा विवेकाने विचार करून ज्यांना वैराग्य उत्पन्न होते, ते खरोखर उत्तम पुरुष होत.


       २७९ परायणं हि प्रभवः सन्देहेष्वनुजीविनाम् ॥ ३.२.१६

सेवकांना कोणतेही संकट उत्पन्न झाले असता, त्याप्रसंगी धनी हाच त्यांचा मुख्य आधार होय.


       २८० परिज्ञातोपभुक्तो हि भोगो भवति तुष्टये ।

           विज्ञाय सेवितो मैत्रीमति चोरो न शत्रुताम् ॥ ४.२३.४१

अमुक चोर आहे, असे पक्के ज्ञान झाल्यावर त्याच्याशी वागतांना सावधपणा ठेवता येतो, यामुळे स्नेहभाव जुळतो, वैरभाव राहात नाही. त्याप्रमाणे विषयांचे वास्तविक स्वरूप ओळखून, ते योग्य रीतीनें सेवन करणाराला त्यांची बाधा होत नाही.


       २८१ परोपकारकारिण्या परार्तिपरितप्तया ।

           बुद्ध एव सुखी मन्ये स्वात्मशीतलया धिया ॥ १.२६.३९

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) परोपकार करणारी, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणारी व आत्मज्ञानाने तप्त झालेली अशी बद्धि ज्या ज्ञानी पुरुषाची आहे, तो खरा सुखी असे मला वाटते.


       २८२ पापस्य हि भयाल्लोको राम धर्मे प्रवर्तते ॥ ५.७५.३७

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, पापाच्या भयानेच लोकांची धर्माकडे प्रवृत्ति होत असते.


       २८३ पीताशेषविवेकाम्बुः शरीराम्भोधिवाडवः ।

           न निर्दहति यं कोपस्तं मृत्युर्न जिघांसति ॥ ६.२३.९

ज्याने विवेकरूपी सर्व उदक पिऊन टाकले आहे, असा शरीररूपी समुद्रातील क्रोधरूपी वडवाग्नि ज्याला जाळीत नाही, त्याला ठार मारण्याची इच्छा मृत्यु करीत नाही.


       २८४ पुण्यानि यान्ति वैफल्यं

               वैफल्यं यान्ति मातरः ।

           भाग्यानि यान्ति वैफल्यं

               नाभ्यासस्तु कदाचन ॥ ७.६७.३२

``मी अमुक पुण्य केले'', असे आपल्या तोंडाने दुसऱ्यास सांगितले असता ते पुण्य व्यर्थ जाते. प्रसंगी मातेचा व ऐश्वर्याचाही उपयोग होत नाही, परंतु अभ्यास हा कधीही फुकट जात नाही.


       २८५ पुत्रमित्रकलत्रादि तृष्णया नित्यकृष्टया ।

           खगेष्विव किरात्येदं जालं लोकेषु रच्यते ॥ १.१७.१५

भिल्लीण पक्ष्यांना पकडण्याकरितां जाळे तयार करते, त्याप्रमाणे मनुष्यांना नेहमी आकर्षण करणारी तृष्णा ही पुत्र, मित्र, स्त्री इत्यादिकांचे जाळे तयार करते.


       २८६ पुरुषार्थात्फलप्राप्तिर्देशकालवशादिह ।

           प्राप्ता चिरेण शीघं वा यासौ दैवमिति स्मृता ॥ २.७.२१

पुरुषप्रयत्नानेच होणारी फलप्राप्ति देश व काल यांच्या परिस्थितीप्रमाणे लवकर किंवा उशिरा होत असते. यालाच दैव असें म्हणतात.


       २८७ पूजनं ध्यानमेवान्तर्नान्यदस्त्यस्य पूजनम् ।

           तस्मात्रिभुवनाधारं नित्यं ध्यानेन पूजयेत् ॥ ६.३८.६

परमेश्वराचे अंतःकरणांत ध्यान करणे हेच त्याचे मुख्य पूजन होय. त्याहून दुसरें पूजन नाही. यासाठी त्रिभुवनाचा आधार जो परमात्मा, त्याचें ध्यानाच्या योगाने नेहमीं पूजन करावे.


       २८८ पूर्णस्तु प्राकृतोऽप्यन्यत् पुनरप्यभिवाञ्छते ।

           जगत्पूरणयोग्याम्बुर्गृण्हात्येवार्णवो जलम् ॥ ४.२३.५५

सर्व जगाला बुडवून टाकता येईल, इतका पाण्याचा साठा ज्यांत भरलेला आहे, असा समुद्र देखील तेवढ्याने तृप्त न होतां जास्त जास्त पाणी सांठवीत असतो; त्या प्रमाणे प्राकृत मनुष्य कितीही श्रीमान् असला, तरी अधिकाधिक संपत्तीची हाव बाळगीतच असतो.


       २८९ पूर्वसिद्धस्वभावोऽयमादेहं न निवर्तते ॥ ३.८२.४०

देह पडेपर्यंत पूर्वसिद्ध स्वभाव पालटत नाही.


       २९०। पूर्वापरविचारार्थचारुचातुर्यशालिनी ।

           सविकासा मतिर्यस्य स पुमानिह कथ्यते ॥ २.११.७२

पूर्वापर विचार आणि कोणताही सूक्ष्म अर्थ उत्तम रीतीने ग्रहण करण्याचे चातुर्य जिला आहे, अशी विकास पावलेली बुद्धि ज्याचे ठिकाणी आहे तोच खरा मनुष्य समजावा.


       २९१ पौनःपुन्येन करणमभ्यास इति कथ्यते ।

           पुरुषार्थः स एवेह तेनास्ति न विना गतिः ॥ ७.६७.४३

पुन्हा पुन्हा तेच तेच करणे याला अभ्यास असे म्हणतात, हाच पुरुषार्थ होय. या अभ्यासावांचून मनुष्याला दुसरा मार्ग नाही.


       २९२ पौरुषं सर्वकार्याणां कर्तृ राघव नेतरत् ।

           फलभोक्तृ च सर्वत्र न दैवं तत्र कारणम् ॥ २.९.२

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा; कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांचा संबंध मनुष्याच्या प्रयत्नाकडे आहे, दैवाचा त्याच्याशी कांहीं एक संबंध नाही.


       २९३ पौरुषं स्पन्दफलवदृष्टं प्रत्यक्षतो न यत् ।

           कल्पितं मोहितैर्मन्दैर्दैवं किञ्चिन्न विद्यते ॥ २.४.१०

मनुष्याने प्रयत्नपूर्वक एखादें कार्य केले असता, त्याचा परिणाम प्रत्यक्ष दृष्टीस पडतो. परंतु दैव प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे ती केवळ मंदबुद्धीच्या मूर्ख लोकांची कल्पना आहे.


       २९४ पौरुषस्य महत्त्वस्य सत्त्वस्य महतः श्रियः ।

           इन्द्रियाक्रमणं साधो सीमान्तो महतामपि ॥ ७.६.४१

(विद्याधर भुशुंडाला म्हणतो) इंद्रियांवर आपला पगडा बसविण्यासाठी महात्म्यांनाही आपलें पौरुष, महत्त्व, मोठे धैर्य व शांतिरूपी संपदा यांची पराकाष्ठा करावी लागते.


       २९५ पौरुषादृश्यते सिद्धिः पौरुषाद्धीमतां क्रमः ।

           दैवमाश्वासनामात्रं दुःखे पेलवबुद्धिषु ॥ २.७.१५

कार्यसिद्धि उद्योगाने होते. ज्ञाते पुरुष आपला वर्तनक्रम पौरुषाच्याच योगाने चालवितात. दुबळ्या बुद्धीच्या लोकांना दुःखाचे वेळी समाधानासाठी देवाचा उपयोग होतो.


       २९६ पौरुषेण प्रयत्नेन त्रैलोक्यैश्वर्यसुन्दराम् ।

           कश्चित्प्राणिविशेषो हि शक्रतां समुपागतः ॥ २.४.१३

पौरुषप्रयत्नाचा अवलंब करून कोणा एका मनुष्यानें त्रैलोक्याच्या ऐश्वर्याने युक्त असलेले श्रेष्ठ इंद्रपद प्राप्त करून घेतले.


       २९७ पौरुषेणान्नमाक्रम्य यथा दन्तेन चूर्ण्यते ।

           अन्यः पौरुषमाश्रित्य तथा शूरेण चूर्ण्यते ॥ २.६.१२

प्रयत्नाने अन्न मिळवून तोंडांत घातल्यानंतर त्याचे चर्वण दातांनी केले जाते, त्याप्रमाणे पौरुषाचाच आश्रय करून शूर मनुष्य दुबळ्या लोकांचे मर्दन करतो.


       २९८ प्रज्ञया नखरालूनमत्तवारणयूथपाः ।

           जम्बुकैर्विजिताः सिंहाः सिंहैर्हरिणका इव ॥ ५.१२.३१

आपल्या भयंकर पंजांनी मस्त हत्तीच्या कळपातील मुख्य हत्तींना फाडून टाकणाऱ्या बलाढ्य सिंहांनाही कोल्ह्यांनी, आपल्या बुद्धीच्या बळावर सिंहांनी हरणांना सहज जिंकावे, त्याप्रमाणे अनेक वेळां जिंकलें आहे.


       २९९ प्रज्ञावानसहायोऽपि कार्यान्तमधिगच्छति ।

           दुष्प्रज्ञः कार्यमासाध्य प्रधानमपि नश्यति ॥ ५.१२.२३

बुद्धिमान मनुष्याला कोणत्याही प्रकारची मदत नसली तरी तो मोठमोठी कार्ये करतो. पण बुद्धि नसलेल्या मनुष्याला केवढेही मोठे साहाय्य असले तरी त्याच्या मुख्य कार्याचाच नाश होतो.


       ३०० प्रज्ञासौजन्ययुक्तेन शास्त्रसंवलितेन च ।

           पौरुषेण न यत्प्राप्तं न तत्क्वचन लभ्यते ॥ ६.२९.९

शास्त्रीय मार्गाने विचार करणारी बुद्धि, सौजन्य व पौरुषप्रयत्न यांच्या योगानें प्राप्त होत नाही, अशी कुठेही वस्तू नाही.


       ३०१ प्रत्यक्षमानमुत्सृज्य योऽनुमानमुपेत्यसौ ।

           स्वभुजाभ्यामिमौ सर्पाविति प्रेक्ष्य पलायते ॥ २.५.१९

प्रत्यक्ष ज्याचें फळ दिसत आहे अशा पौरुषप्रयत्नाचा त्याग करून, केवळ अनुमानाने सिद्ध होणान्या देवाचा आश्रय जो मनुष्य करतो, तो आपल्याच हातांना सर्प मानून पळू लागतो, असे म्हणण्यास काय हरकत आहे?


       ३०२ प्रभुताबृंहितं चेतो नाहार्यमभिनन्दति ॥ ५.४६.६

ज्याच्या ठिकाणी प्रभुत्व आले आहे, व अधिकार चालविण्याचे सामर्थ्य आहे, त्याला कृत्रिम भूषणादिकांचे काय महत्त्व आहे.


       ३०३ प्रवाहपतितं कार्यं कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ४.५६.३४

प्रवाहपतित कार्य करणारा दोषांपासून अलिप्त असतो.


       ३०४ प्राक्तनं चैहिकं चेति द्विविधं विद्धि पौरुषम् ।

           प्राक्तनोऽद्यतनेनाशु पुरुषार्थेन जीयते ॥ २.४.१७

पूर्वीचें व हल्लींचे असे दोन प्रकारचे पौरुष आहे. या जन्मांत मनुष्याने नेटाने प्रयत्न केला असतां पूर्वजन्मांतील पौरुष नाहींसें करून टाकितां येते.


       ३०५ प्राक्स्वकर्मेतराकारं देवं नाम न विद्यते ।

           बालः प्रबलपुंसेव तजेतुमिह शक्यते ॥ २.६.४

आपणच पूर्वी केलेल्या कर्माशिवाय दैव म्हणून काही निराळी वस्तु नाहीं; इतकेच नव्हे तर शक्तिमान् मनुष्य एखाद्या लहान मुलाला आपल्या कह्यांत ठेवतो, त्याप्रमाणे पूर्वीच्या दुष्टसंस्कारांना सध्या केलेल्या प्रयत्नांनी जिंकून टाकतां येणे अगदीं शक्य आहे.


       ३०६ प्राज्ञं प्राप्य न पृच्छन्ति ये केचित्ते नराधमाः ३.७८.३३

विद्वानाची गांठ पडली असता प्रश्न विचारून जे आपला संशय नाहींसा करून घेत नाहीत, ते केवळ नराधम होत.


       ३०७ प्राप्तकालं कृतं कार्यं राजते नाथ नेतरत् ।

           वसन्ते राजते पुष्पं फलं शरदि राजते ॥ ६.८४.२२

(चूडाला शिखिध्वज पतीला म्हणते) योग्य समयीं केलेलेंच कार्य शोभते. दुसरें शोभत नाही. वसंतऋतूमध्ये फूल शोभते आणि शरद ऋतूंत फळ शोभतें.


       ३०८ प्राप्तेन येन नो भूयः प्राप्तव्यमवशिष्यते ।

           तत्प्राप्तौ यत्नमातिष्ठेत्कष्टयापि हि चेष्टया ॥ ७.६.३१

जे मिळविले असतां पुन्हा काही एक मिळवावयाचे उरणार नाही, असेंच पद मिळविण्याविषयी जोराचा प्रयत्न करावा. मग त्यामध्ये कितीही कष्ट पडले तरी चालतील.


       ३०९ प्रामाणिकस्य तज्ज्ञस्य वक्तुः पृष्टस्य यत्नतः ।

           नानुतिष्ठति यो वाक्यं नान्यस्तस्मानराधमः ॥ २.११.४६

प्रमाणशुद्ध भाषण करणाऱ्या तज्ज्ञ मनुष्याला प्रश्न केल्यानंतर जो त्याच्या वचनाप्रमाणे वागत नाही, त्याच्यापेक्षा अधम मनुष्य दुसरा कोणीही नाही.


       ३१० प्रायः परपरित्राणमेव कर्म निजं सताम् ॥ ३.२६.२०

दुसऱ्याचे रक्षण करण्यासाठीच सत्पुरुषांच्या हातून कोणतेही कर्म होत असते.


       ३११ बद्धो हि वासनाबद्धो मोक्षः स्याद्वासनाक्षयः ॥ ४.५७.१९

जो वासनेने बद्ध असतो, तोच खरा बद्ध, आणि ज्याचा वासनाक्षय झाला, तोच मुक्त समजावा.


       ३१२ बन्धमुक्तो महीपालो ग्राममात्रेण तुष्यति ।

           परैरबद्धो नाक्रान्तो न राज्यं बहु मन्यते ॥ ४.२३.५७

अटकेत असलेला राजा मोकळा झाल्यावर त्याला जरी एखादा गांव मिळाला तरी तेवढ्याने तो संतुष्ट होतो. परंतु ज्याला शत्रूंनी बद्ध केले नाही व ज्याच्यावर कोणाचा ताबा नाही अशा राजाला राज्य देऊ केले, तरी सुद्धा त्याचे त्याला काहीच महत्त्व वाटत नाही.


       ३१३ बलं बुद्धिश्च तेजश्च क्षयकाल उपस्थिते ।

           विपर्यस्यति सर्वत्र सर्वथा महतामपि ॥ ७.१४०.६

नाश होण्याची वेळ आली म्हणजे सर्वठिकाणी सर्वप्रकारें मोठमोठ्यांचीही बुद्धि विपरीत होते, बळ चालेनासे होते, व तेज लोपून जाते.


       ३१४ बहुनात्र किमुक्तेन संक्षेपादिदमुच्यते ।

           सङ्कल्पनं परो बन्धस्तदभावो विमुक्तता ॥ ६.१२६.९७

अधिक बोलून काय करावयाचे आहे ! थोडक्यात सांगावयाचे हे की, संकल्प करणे हाच मोठा बंध होय, व संकल्परहित असणे हाच मोक्ष होय.


       ३१५ बाल्यमल्पदिनैरेव यौवनश्रीस्ततो जरा ।

           देहेऽपि नैकरूपत्वं कास्था बाह्येषु वस्तुषु ॥ १.२८.३७

बाल्यदशेनंतर थोडक्याच दिवसांनी तारुण्य, व नंतर म्हातारपण अशा भिन्न दशा प्रत्यक्ष देहाचे ठिकाणी दिसून येतात; मग बाह्य वस्तु एकरूप राहतील असा भरंवसा ठेवण्यांत काय अर्थ आहे !


       ३१६ बीजात्कारणतः कार्यमङ्कुरः किल जायते ।

           न बीजमपि यत्रास्ति तत्र स्यादङ्करः कुतः ॥ ७.५७.१२

कारणापासून कार्य उत्पन्न होते. या नियमाप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न होतो. परंतु ज्या ठिकाणी बीजच नाही तेथे अंकुर कसा उत्पन्न होईल ?


       ३१७ बीभत्सं विषयं दृष्ट्रा को नाम न विरज्यते ।

           सतामुत्तमवैराग्यं विवेकादेव जायते ॥ २.११.२३

बीभत्स विषय पाहुन त्यांच्याबद्दल कोणाला तिटकारा बाटणार नाहीं ? परंतु सत्पुरुषांचे ठिकाणी जें उत्कृष्ट वैराग्य असते तें विवेकामुळे उत्पन्न होते.


       ३१८ भवत्यखिलजन्तूनां यदन्तस्तद्धहिःस्थितम् ॥ ५.५६.३४

कोणत्याही प्राण्याच्या अंतःकरणांत ज्याविषयी विचार चालू असतो त्याप्रमाणेच त्याला बाह्य जगांत दिसत असते.


       ३१९ भविष्यं नानुसन्धत्ते नातीतं चिन्तयत्यसौ ।

           वर्तमाननिमेषं तु हसन्नेवानुवर्तते ॥ ५.१२.१४

जनक राजा भावी गोष्टींची चिंता वहात नसे. आणि गत गोष्टींचं स्मरण करीत नसे. तसेंच वर्तमानकाळी सर्व व्यवहार आनंदाने करीत असे.


       ३२० भारोविवेकिनः शास्त्रं भारो ज्ञानं च रागिणः ।

           अशान्तस्य मनो भारो भारो नात्मविदो वपुः ॥ १.१४.१३

अविवेकी मनुष्याला शास्त्र, विषयी मनुष्याला ज्ञान व रागीट मनुष्याला मन हे भारभूत वाटते. परंतु आत्मज्ञान झालेल्या मनुष्याला शरीर हे भारभूत होत नाही.


       ३२१ भूतानि सन्ति सकलानि बहूनि दिक्षु

               बोधान्वितानि विरलानि भवन्ति किन्तु ।

                          वृक्षा भवन्ति फलपल्लवजालयुक्ताः ।

                          कल्पद्रुमास्तु विरलाः खलु सम्भवन्ति ॥ ७.९७.४७

    पाने, फळे यांनी भरून गेलेले सामान्य वृक्ष सर्वत्र आढळतात परंतु कल्पवृक्ष सर्वत्र दिसत नाहीत. त्याप्रमाणे मोहांत गुरफटून गेलले लोक सर्व ठिकाणी दृष्टीस पडतात, परंतु ज्ञानसंपन्न लोक अगदी क्वचितच आढळतात.


       ३२२ भोगेच्छामात्रको बन्धस्तत्यागो मोक्ष उच्यते ॥ ४.३५.३

विषयोपभोगांची इच्छा असणे हाच बंध, आणि भोगेच्छा नसणे हाच मोक्ष होय.


       ३२३ भोगेष्वस्वदमानेषु पुंसः श्रेयः पुरो गतम् ॥ ४.३३.६९

ज्याला विषयोपभोगांचा अत्यंत तिटकारा आला, त्याच्या पुढे मोक्ष हात जोडून उभा आहे !


       ३२४ मत्त ऐरावतो बद्धः सर्षपस्येव कोटरे ।

           मशकेन कृतं युद्धं सिंहौधैरणुकोटरे ॥ ३.२०.९

               पद्माक्षे स्थापितो मेरुर्निगीर्णो भृङ्गसनुना ।

                      स्व्प्नाब्दगर्जितं श्रुत्वा चित्रं नृत्यन्ति बर्हिणः ॥ ३.२०.१०

    (असमंजस विधानें) एकाद्या मत्तहत्तीला मोहरीच्या गाभ्यांत बांधून ठेवलें, एखाद्या चिलटान परमाणूच्या पोटांत सिंहांच्या कळपाबरोबर युद्ध केलें, एखाद्या कमलाच्या बीजामध्ये मेरुपर्वत सांठविला व तो एखाद्या लहानशा भुंग्याने गिळून टाकला, स्वप्रांतील मेघांची गर्जना ऐकून चित्रांतील मोर नाचूं लागले.


       ३२५ मन एव समर्थ वो मनसो दृढनिग्रहे ।

           अराजा का समर्थः स्याद्राज्ञोराघव निग्रहे ॥ ३.११२.१९

(श्रीवसिष्ठ म्हणतात) श्रोतृजनहो, तुमच्या मनाचा दृढनिग्रह करण्याला तुमचे मनच समर्थ आहे. हे राघवा, राजाचा निग्रह करण्याला जो राजा नाही , असा कोणता सामान्य मनुष्य समर्थ होईल ?


       ३२६ मनः कृतं कृतं लोके न शरीरकृतं कृतम् ॥ ३.।८९.१

मनाने जें केलें तेच खरोखर केलेले असे समजावें; केवळ शरीराने केले, तें केलें असें म्हणता येत नाही.


       ३२७ मनो हि न जडं राम नापि चेतनतां गतम् ॥ ३.९६.३७

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, मन हे धड जडही नाही, आणि चेतनही नाही.


       ३२८ मरणस्य मुने राज्ञो

               जराधवलचामरा ।

           आगच्छतोऽग्रे नियति

               स्वाधिव्याधिपताकिनी ॥ १.२२.३०

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) मरण हा एक राजा असून त्याची स्वारी आपल्याकडे येऊ लागली, म्हणजे त्याच्या अगोदर आधिव्याधिरूपी सेना बाहेर पडत असून जरारूपी पांढरी चवरी पुढे दिसू लागते.


       ३२९ महतां दर्शनं नाम न कदाचन निष्फलम् ॥ ३.२६.३९

महात्म्यांचे दर्शन केव्हाही निष्फळ होत नाही.


       ३३० महतामेव सम्पर्कात्पुनर्दुःखं न बाधते ।

           को हि दीपशिखाहस्तस्तमसा परिभूयते ॥ ३.८२.८

जळणारी मशाल हातांत असली म्हणजे अंधारांत चाचपडण्याचा कोणालाही प्रसंग येत नाही, त्याप्रमाणे महात्म्यांचा सहवास झाल्यावर कोणालाही दुःख भोगण्याचा प्रसंग येत नाही.


       ३३१ महाकर्ता महाभोक्ता महात्यागी भवानघ ।

           सर्वाः शङ्काः परित्यज्य धैर्यमालम्ब्य शाश्वतम् ॥ ६.११५.१

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे निष्पाप रामा, तूं सर्व शंका सोडून देऊन, शाश्वत धैर्याचा आश्रय करून, महाकर्ता, महाभोक्ता, व महात्यागी हो.


       ३३२ महाशनानामेकान्ते भोजनं हि सुखायते ॥ ३.८२.४४

पुष्कळ आहार करणारांना एकान्तांत भोजन करणे सुखावह होत असते.


       ३३३ मांसपाञ्चालिकायास्तु यन्त्रलोलेऽङ्गपञ्जरे ।

           स्नाय्वस्थिग्रन्थिशालिन्याः स्त्रियाः किमिव शोभनम् ॥ १.२१.१

यंत्रांतील निरनिराळे भाग अत्यंत चंचल असतात. त्याप्रमाणे स्त्रीचे शरीर असून ते स्नायु, अस्थि इत्यादिकांनों बनलेले असते. स्त्री केवळ मांसाची पुतळी असून तिच्यामध्ये रमणीय असे काय आहे ?


       ३३४ मुकुरे निर्मले द्रव्यमयत्नेनैव बिम्बति ॥ ७.७.४

           स्वच्छ आरशामध्ये कोणत्याही वस्तूचे प्रतिबिंब सहज पडते.


       ३३५ मुख्याङ्कुरं सुभग विद्धि मनो हि पुंसो

                देहास्ततः प्रविसृतास्तरुपल्लवाभाः ।

           नष्टेऽङ्कुरे पुनरुदेति न पल्लवश्री

                र्नैवाङ्कुरः क्षयमुपैति दलक्षयेषु ॥ ३.८९.५२

(इंद्रब्राह्मण इंदद्युम्न राजाला म्हणतो) मनुष्याचे मन हाच संसारतरूचा मुख्य अंकुर आहे. आणि ह्या अंकुरापासून संसाररूपी वृक्षाला देहरूपी पालवी फुटत असते. मूळ अंकुरच नाहीसा झाला, तर झाडाला पुन्हा पालवी फुटत नाही; पण नुसती पाने गळून पडली असतां मुळ अंकुर नष्ट होत नाही.


       ३३६ मूढानुमानसंसिद्धं दैवं यस्यास्ति दुर्मतेः ।

           दैवाद्दाहोऽस्ति नैवेति गन्तव्यं तेन पावके ॥ २.८.५

केवळ मूर्खपणाच्या अनुमानामुळे दैव आहे असे ज्याला वाटते, त्याने त्या दैवाची परीक्षा करण्याकरितां अग्नीमध्ये उडी टाकून आंगाचा दाह होतो किंवा नाही ते पहावें !


       ३३७ मूढैः प्रकल्पितं दैवं तत्परास्ते क्षयं गताः ।

           प्राज्ञास्तु पौरुषार्थेन पदमुत्तमतां गताः ॥ २.८.१६

दैव ही केवळ मूर्खाची कल्पना आहे या दैवाच्या नादी जे लागतात त्यांचा नाश होतो. ज्ञाते लोक उद्योगाच्या योगाने उत्तम पदाला जाऊन पोहोचतात.


       ३३८ मूढोत्तारणमेवेह स्वभावो महतामिति ॥ ३.७६.१२

मूढ लोकांचा उद्धार करणे हाच महात्म्यांचा स्वभाव असतो.


       ३३९ मृतिर्गुणितिरस्कारो जीवितं गुणिसंश्रयः ॥ ३.७७.३१

गुणिजनांचा तिरस्कार म्हणजेच मृत्यु. आणि गुणिजनांचा आश्रय म्हणजेच खरे जीवित होय.


       ३४० मोक्षद्वारे द्वारपालाश्चत्वारः परिकीर्तिताः ।

           शमो विचारः सन्तोषश्चतुर्थः साधुसङ्गमः ॥ २.११.५९

शम, विचार, संतोष आणि साधुसमागम हे मोक्षाच्या द्वारावरील चार द्वारपाल आहेत.


       ३४१ मोक्षः शीतलचित्तत्वं बन्धः सन्तप्तचित्तता ॥ ७.९५.२९

चित्त शांत असणे हा मोक्ष व चित्त संतप्त असणे हा बंध होय.


       ३४२ मोहनाशाय महतां वचो नो मोहवृद्धये ॥ ५.४९.६

महात्म्यांचे भाषण मोहाचा नाश करते त्याची वाढ करीत नाही.


       ३४३ मौख्यं हि बन्धनमवेहि परं महात्मन् ॥ ६.८९.३१

(चूडाला शिखिध्वजाला म्हणते) मूर्खपणा हे मोठे बंधन आहे असे समज.


       ३४४ य एव यत्नः क्रियते बाह्यार्थोपार्जने जनैः ।

           स एव यत्नः कर्तव्यः पूर्व प्रज्ञाविवर्धने ॥ ५.१२.२६

द्रव्यादि बाह्य पदार्थ मिळविण्यासाठी मनुष्य जसा प्रयत्न करतो तसा जोराचा प्रयत्न प्रथमतः बुद्धि वाढविण्यासाठी करावा.


       ३४५ यत्कृतं मनसा तात तत्कृतं विद्धि राघव ।

           यत्त्यक्तं मनसा तावत्तत्त्यक्तं विद्धि चानघ ॥ ३.११०.१४

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे निष्पाप रामा, जें मनाने केलें तेंच खरोखर केलें असें जाण. आणि ज्याचा मनाने त्याग केला त्याचाच त्याग केला असें समज.


       ३४६ यत्नवद्भिदृढाभ्यासैः प्रज्ञोत्साहसमन्वितैः ।

           मेरवोऽपि निगीर्यन्ते कैव प्रापौरुषे कथा ॥ २.४.१८

बुद्धिमान, उत्साही, उद्योगी पुरुषांनी प्रयत्नपूर्वक दृढ अभ्यास केला असता, त्यांना मेरुपर्वत सुद्धा गडप करून टाकतां येतो, मग पूर्वजन्मांतील पौरुष नाहीसे करता येईल, यांत नवल काय ?


       ३४७ यत्नेनापि पुनर्बद्धं केन वृन्तच्युतं फलम् ॥ ७.१२५.३२

देठापासून गळलेले फळ पुन्हां कोणीतरी प्रयत्न करून देठाला पूर्वीप्रमाणे चिकटवू

शकेल काय ?


       ३४८ यत्सुखं दुःखमेवाहुः क्षणनाशानुभूतिभिः ।

           अकृत्रिममनाद्यन्तं यत्सुखं तत्सुखं विदुः ॥ ७.६८.१३१

क्षणांत नाश पावण्याचा अनुभव येत असल्यामुळे ज्ञाते लोक विषयसुखाला दुःखच असे म्हणतात. आणि जें स्वाभाविक, अनादि, अनंत असे आत्मस्वरूपाचे सुख त्यालाच खरे सुख म्हणतात.


       ३४९ यथाचारं यथाशास्त्रं यथाचित्तं यथास्थितम् ।

           व्यवहारमुपादत्ते यःस आर्य इति स्मृतः ॥ ६.१२६.५५

वृद्धांचा आचार व शास्त्र यांच्या अनुरोधाने प्रसन्नचित्ताने यथास्थित कर्म करणारा व लौकिक व्यवहारही पाळणारा, त्याला आर्य असें म्हणतात.


       ३५० यथा देहोपयुक्तं हि करोत्यारोग्यमौषधम् ।

           तथेन्द्रियजयेऽभ्यस्ते विवेकः फलितो भवेत् ॥ ४.१८.६६

औषध पथ्यपूर्वक सेवन केल्यानेच आरोग्य प्राप्त होते, त्याप्रमाणे इंद्रियजयाचा अभ्यास केला, तरच आत्मानात्मविवेक फलद्रूप होईल.


       ३५१ यथा न किञ्चित्कलयन्मञ्चके स्पन्दते शिशुः ।

           तथा फलान्यकलयन्कुरु कर्माणि राघव ॥ ५.७०.२०

(श्रीवसिष्ठ म्हणतात।) हे राघवा, एखादें लहान मूल कोणत्याही तऱ्हेचा संकल्प न करितां आनंदाने पलंगावर लोळत असते, त्याप्रमाणे कर्मफलाचा मुळींच विचार न करतां तूं आपली प्राप्तकमे करीत जा.


       ३५२ यथा नाशेन वा भाव्यं तथोदेत्यशुभा मतिः ॥ ३.७१.१७

जशा रीतीने नाश व्हावयाचा असतो, तशा त-हेची दुर्बुद्धि अगोदर उत्पन्न होते.


       ३५३ यथाप्राप्तं हि कर्तव्यमसक्तेन सदा सता ।

           मुकुरेणाकलङ्केन प्रतिबिम्बक्रिया यथा ॥ ३.८८.११

एखादा स्वच्छ आरसा आपल्यासमोर येणाऱ्या पदार्थाचे प्रतिबिंब धारण करतो, त्याप्रमाणे आसक्त न होतां आपलें प्राप्त झालेले कर्तव्य प्रत्येकाने अवश्य करीत राहिले पाहिजे.


       ३५४ यथा रजोभिर्गगनं यथा कमलमम्बुभिः ।

           न लिप्यते हि संश्लिष्टैर्देहैरात्मा तथैव च ॥ ५.५.३१

आकाशांत धूळ उडाली म्हणून ते मलिन होत नाही, किंवा कमलपत्रावर उदक पडले तरी ते त्याला चिकटत नाही, त्याप्रमाणे आत्म्याशी कितीहि देहांचा संबंध आला तरी तो त्यांच्या योगाने लिप्त होत नाही.


       ३५५ यथा वन्ध्यासुतो नास्ति यथा नास्ति मरौ जलम् ।

           यथा नास्ति नभोवृक्षस्तथा नास्ति जगद्भ्रमः ॥ ३.७.४३

ज्याप्रमाणे वंध्येचा मुलगा, मृगजळांतील पाणी, आकाशांतील वृक्ष यांना अस्तित्व नसते त्याप्रमाणे जगाच्या भ्रमाची स्थिति आहे.


       ३५६ यथा शाम्येन्मनोऽनिच्छं नोपदेशशतैस्तथा ॥ ७.३६.२३

इच्छा सोडल्याने मन जसे शांत होते, तसे शेंकडों उपदेशांनीही शांत होत नाही.


       ३५७ यथा स्पर्शेन पवनः सत्तामायाति नो गिरा ।

           तथेच्छातानवेनैव विवेकोऽस्य विबुध्यते ॥ ४.१८.६८

नुसता ``वारा'' हा शब्द ऐकल्याने त्याचे अस्तित्व कळत नसते, तर त्यासाठी  वाऱ्याचा अंगाला स्पर्श व्हावा लागतो, त्याप्रमाणे ``मी विवेकी आहे'' असे म्हटल्याने विवेकाची परीक्षा होत नाही, तर विषयाची तृष्णा कमी असणे हीच विवेक असल्याची खूण होय.


       ३५८ यथा हि काष्ठजतुनोर्यथा बदरकुण्डयोः ।

           श्लिष्टयोरपि नैकत्वं देहदेहवतोस्तथा ॥ ३.११४.६२

लाकूड आणि लाख किंवा बोरे आणि भांडें ही एकमेकांशी चिकटलेली दिसली, तरी त्यांचे वास्तविक ऐक्य संभवत नाही, त्याचप्रमाणे देह आणि जीवात्मा यांची स्थिति आहे.


       ३५९ यदवध्यवधात्पापं वध्यत्यागात्तदेव हि ॥ ३.९०.३

अवध्याचा वध केल्याने जितके पातक लागते, तितकेंच पातक वध्याचा वध न केल्याने लागत असते.


       ३६० यदार्यगर्हितं यद्वा न्यायेन न समार्जितम् ।

           तस्माद् ग्रासाद्वरं मन्ये मरणं देहिनामिदम् ॥ ३.७६.७

आर्य लोकांनी निंद्य ठरविलेले किंवा अन्यायाचे कृत्य करून आपले पोट भरण्यापेक्षा मनुष्यांनी मरून जाणे हेच श्रेयस्कर होय.


       ३६१ यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित् ।

           इमं समस्तविज्ञानशास्त्रकोशं विदुर्बुधाः ॥ ३.८.१२

जें या योगवासिष्ठ ग्रंथांत आहे, तेच इतर ग्रंथांतून आहे आणि जें यांत नाही ते कोठेही नाही. कारण हा ग्रंथ म्हणजे सर्व विज्ञानशास्त्रांचे भांडार आहे, असे विद्वान् लोक मानतात.


       ३६२ यदेव क्रियते नित्यं रतिस्तत्रैव जायते ॥ ३.२.४८

मनुष्य जे कृत्य नेहमी करतो, तेंच पुन्हा करण्याची आवड त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते.


       ३६३ यद्यथा कल्पितं येन स सम्पश्यति तत्तथा ॥ ७.१७७.३

ज्याने ज्या वस्तूची ज्या प्रकाराने कल्पना केली, तो त्या वस्तूला तशा प्रकाराने पाहतो.


       ३६४ यद्वस्तु विद्यमानं सत् प्रश्नस्तत्र विराजते ॥ ६.९६.४२

जी वस्तु विद्यमान व सद्रूप असते, तिच्याविषयी प्रश्न केला तर तो शोभतो.


       ३६५ यन्त्रं तिलानां कठिनं राशिमुग्रमिवाकुलम् ।

           यं पीडयति नानङ्गस्तं मृत्युर्न जिघांसति ॥ ६.२३.१० तेल काढण्याचा कठीण घाणा तिळाञ्ची मोठी रास पिळून काढतो, त्याप्रमाणे मदन ज्याला व्याकुळ करून पीडा देत नाही, त्याला ठार मारण्याची इच्छा मृत्यु करीत नाही.


       ३६६ यन्नाम किल नास्त्येव

           तच्छान्तौ का कदर्थना ॥ ७.१४२.४५

मुळांत जी वस्तु नाही, तिचा परिहार करण्याविषयी क्लेशतरी कसले !


       ३६७ यन्मयो हि भवत्यङ्ग पुरुषो वक्ति तादृशम् ॥ ७.२९.४०

(श्रीवसिष्ठ रामाला सांगतात।) मनुष्याचे जसें ज्ञान असेल, तसें तो भाषण करतो.


       ३६८ यमो निघृणराजेन्द्रो नार्तं नामानुकम्पते ।

           सर्वभूतदयोदारो जनो दुर्लभतां गतः ॥ १.२६.७

यम हा अत्यंत निर्दय असून त्याला दुःखितांची मुळींच कीव येत नाही. सर्व प्राण्यांवर दया करणारा थोर मनुष्य या जगांत फारच विरळा.


       ३६९ ययैवाजीव्यते युक्त्या सैवापदि विराजते ॥ ७.१९६.१६

आपत्काली ज्या युक्तीने प्राण वाचतात, तीच उत्तम होय.


       ३७० यस्त्विच्छातानवे यत्नं न करोति नराधमः ।

           सोऽन्धकूपे स्वमात्मानं दिनानुदिनमुज्झति ॥ ७.३६.३१

जो नीच मनुष्य आपल्या इच्छा कमी करण्याचा प्रयत्न करीत नाहीं तो आपणाला प्रत्येक दिवशी अंधकूपांत फेकीत असतो.


       ३७१ यस्याग्रे न गलति संशयः समूलो

           नैवासौ क्वचिदपि पण्डितोक्तिमेति ॥ ३.७९.३३

जो आपल्यापुढे मांडलेल्या शंकेचे समूल निरसन करीत नाही, त्याला पंडित ही पदवी केव्हांच प्राप्त होत नाही.


       ३७२ यस्यान्तर्वासनारज्ज्वा ग्रन्थिबन्धः शरीरिणः ।

           महानपि बहुज्ञोऽपि स बालेनापि जीयते ॥ ४.२७.२०

जो मनुष्य अंतःकरणांतील वासनारूपी दोरीने घट्ट बांधलेला असतो, तो कितीही बलवान किंवा विद्वान असो, प्रसंगी लहानशा पोराकडूनही पराजित होतो.


       ३७३ यस्येच्छाननुसन्धानमात्रे दुःसाध्यता मतेः ।

           गुरूपदेशशास्त्रादि तस्य नूनं निरर्थकम् ॥ ७.३६.३५

इच्छेचा संबंध न ठेवणे, एवढे देखील ज्याच्या बुद्धीला दुःसाध्य वाटत असेल, त्याने घेतलेला गुरूपदेश, त्याचे शास्त्रज्ञान इत्यादि सर्व खरोखर व्यर्थ होय.


       ३७४ यस्योज्ज्वलति तीक्ष्णाग्रा पूर्वापरविचारिणी ।

           प्रज्ञादीपशिखा जातु जाड्यान्ध्यं तं न बाधते ॥ ५.१२.१९

ज्याच्या ठिकाणी पूर्वापरविचार करणाऱ्या कुशाग्र बुद्धीची ज्योति प्रज्वलित झालेली असते, त्याला अज्ञानरूपी अंधकार केव्हाही बाधा करीत नाही.


       ३७५ यः स्नातः शीतसितया

               साधुसङ्गतिगङ्गया ।

           किं तस्य दानैः किं तीर्थैः

               किं तपोभिः किमध्वरैः ॥ २.१६.१०

ज्याने सत्संगरूपी गंगेच्या थंड व स्वच्छ पाण्यांत स्नान केले आहे. त्याला दान, तीर्थ, तप आणि यज्ञ यांच्यापासून कोणतें पुण्य प्राप्त व्हावयाचे राहिले आहे ?


       ३७६ यावत्तिलं यथा तैलं यावद्देहं तथा दशा ।

           यो न देहदशामेति स च्छिनत्त्यसिनाम्बरम् ॥ ६.१०४.४२

जोपर्यंत तीळ असतात तोपर्यंत त्यांत तेल असतेच. त्याप्रमाणे जोपर्यंत शरीर असतें तोपर्यंत हर्ष, खेद इत्यादि विकार होणारच देह असेपर्यंत ज्याला हे विकार होत नाहीत तो तरवारीने आकाशच कापून काढतो.


       ३७७ यावत्सर्वं न सन्त्यक्तं तावदात्मा न लभ्यते ।

           सर्वावस्थापरित्यागे शेष आत्मेति कथ्यते ॥ ५.५८.४४

जोपर्यंत मनाने सर्व विषयांचा पूर्णपणे त्याग केला नाही, तोपर्यंत कोणालाही आत्मप्राप्ति होणार नाही. कारण मनाच्या सर्व अवस्थांचा त्याग झाल्यानंतर अवशिष्ट राहणारा तोच आत्मा, असा सिद्धांत आहे.


       ३७८ यावदन्यन्न संत्यक्तं तावत्सामान्यमेव हि ।

           वस्तु नासाद्ध्यते साधो स्वात्मलाभे तु का कथा ॥ ५.५८.४५

(मांडव्य ऋषि सुरघु राजाला म्हणतात।) सामान्य व्यवहारामध्येदेखील एखादी क्षुद्र वस्तु तिच्या विरोधी वस्तूंचा त्याग केल्याशिवाय हाती लागत नाही, असा नियम आहे. तर आत्मलाभाच्या संबंधाने हा नियम विशेषच लागू पडावा, यांत काय आश्चर्य आहे ?


       ३७९ यावद्देहं स्वभावोऽस्य देहस्य न निवर्तते ॥ ३.७६.५

जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत त्याचे धर्म नाहीसे होत नाहीत.


       ३८० या विवेकविकासिन्यो मतयो महतामिह ।

           न ता विपदि मजन्ति तुम्बकानीव वारिणि ॥ २.१४.११ भोपळा पाण्यात बुडत नाही, त्याप्रमाणे विवेकाने विकास पावलेली महात्म्याञ्ची बुद्धि विपत्काळी निराशेन्त बुडून जात नाही.


       ३८१ युक्तियुक्तमुपादेयं वचनं बालकादपि ।

           अन्यत्तृणमिव त्याज्यमप्युक्तं पद्मजन्मना ॥ २.१८.३

एखाद्या मुलानेही केलेले सयुक्तिक भाषण ग्राह्य समजावें, परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेही केलेले भाषण युक्तीच्या विरुद्ध असल्यास तें त्याज्य समजावें.


       ३८२ युक्त्या च व्यवहारिण्या स्वार्थःप्राज्ञेन साध्यते ॥ ३.७८.२५

ज्ञाते लोक आपले कार्य व्यवहार्य युक्तीने साधीत असतात.


       ३८३ युक्त्या प्रबोध्यते मूढः प्राज्ञस्तत्त्वेन बोध्यते ॥ ६.४९.२१

मूढाला युक्तीने बोध करावा लागतो व जाणत्याला तत्त्व सांगून बोध करावा लागतो.


       ३८४ युक्त्यैव बोधयित्वैष जीव आत्मनि योज्यते ।

           यद्युक्त्यासाद्ध्यते कार्यं न तद्यत्नशतैरपि ॥ ६.४९.१९

युक्तीनेच बोध करून या जीवाला आत्मप्राप्ति करून द्यावी लागते. कारण जें कार्य युक्तीने साधतें तें शेकडो प्रयत्नांनीही साधत नाही.


       ३८५ युज्यते वेष्टनं वायोराकाशस्य च खण्डनम् ।

           ग्रथनं च तरङ्गाणामास्था नायुषि युज्यते ॥ १.१४.५

वाऱ्याची गुंडाळी करता येते, आकाशाचे तुकडे करता येतात, पाण्यावरील लाटांना एकत्र ओवतां येतें. इत्यादि गोष्टींवर एकवेळ विश्वास बसेल, परंतु आयुष्यावर विश्वास बसत नाही.


       ३८६ ये केचन समारम्भा ये जनस्य क्रियाक्रमाः ।

           ते सर्वे देहमात्रार्थमात्मार्थं न तु किञ्चन ॥ ४.५७.३१

बाह्य विषयांवर दृष्टि ठेवणारे लोक सर्व वैदिक किंवा लौकिक कर्में केवळ देहाच्या सुखासाठी करीत असतात; परंतु आत्मज्ञानासाठी मुळींच प्रयत्न करीत नाहीत.


       ३८७ येन नासादितं हेम रीतिं किं स परित्यजेत् ॥ ६.१०१.४०

ज्याला सोन्याची माहितीच नाहीं तो पितळ मिळविण्याच्याच मार्गात असणार.


       ३८८ येन प्राप्तेन लोकेऽस्मिन्न प्राप्यमवशिष्यते ।

           तत्कृतं सुकृतं मन्ये शेष कर्म विषूचिका ॥ ६.७४.१७

(भगीरथ म्हणतो) जें प्राप्त झाले असतां या लोकांत कांहीं अधिक मिळावयाचे राहात नाही, तेंच करणे याला मी ``सुकृत'' समजतो. बाकीचे कर्म म्हणजे पटकीप्रमाणे अपवित्र व दुःखदायक होय.


       ३८९ येनाभ्यासः परित्यक्त इष्टे वस्तुनि सोऽधमः ।

           कदाचिन्न तदाप्नोति वन्ध्या स्वतनयं यथा ॥ ७.६७.३४

ज्याने इच्छिलेल्या वस्तूविषयींचा अभ्यास सोडून दिला, तो नीच होय. वंध्येला ज्याप्रमाणे स्वतःचा मुलगा प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे अभ्यास सोडून देणाराला इष्ट वस्तु कधीही प्राप्त होत नाही.


       ३९० ये शूरा ये च विक्रान्ता ये प्राज्ञा ये च पण्डिताः ।

           तैस्तैः किमिव लोकेऽस्मिन्वद दैवं प्रतीक्ष्यते ॥ २.८.१७

(श्रीवसिष्ठ म्हणतात हे रामा,) या जगांत जे लोक शूर, पराक्रमी, बुद्धिमान व पंडित म्हणून प्रसिद्धीला आले ते केवळ पौरुषाच्याच योगाने होत. तूंच सांग की, ते कधी दैवाची वाट पहात बसले होते काय ?


       ३९१ येषां गुणेष्वसन्तोषो रागो येषां श्रुतं प्रति ।

           सत्यव्यसनिनो ये च ते नराः पशवोऽपरे ॥ ४.३२.४३

ज्यांचा हावरेपणा सद्गुणांविषयी आहे, ज्यांना प्रेम विद्येचे आहे, आणि व्यसन सत्याचे आहे, तेच खरोखर मनुष्य होत. इतर लोक केवळ पशुतुल्य होत.


       ३९२ यैरेव जायते रागो मूर्खस्याधिकतागतैः ।

           तैरेव भोगैः प्राज्ञस्य विराग उपजायते ॥ ४.४६.५

ज्या विषयोपभोगांच्या समृद्धीमुळे मूर्ख मनुष्यांना प्रेम उत्पन्न होते, त्याच विषयांच्या अभिवृद्धीमुळे ज्ञात्यांना वैराग्य उत्पन्न होतें.


       ३९३ यो न निर्वासनो नूनं सर्वधर्मपरोऽपि सः ।

           सर्वज्ञोऽप्यभितो बद्धः पञ्जरस्थो यथा खगः ॥ ६.५५.४४

ज्याच्या वासना नाहीशा झाल्या नाहीत, तो खरोखर सर्वधर्मपरायण व सर्वज्ञ जरी असला तरी पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे सर्व बाजूंनीं बद्धच आहे.


       ३९४ योऽन्तःशीतलतां यातो यो भावेषु न मञ्जति ।

           व्यवहारी न सम्मृढः स शान्त इति कथ्यते ॥ २.१३.७८

ज्याचे अंतःकरण तृप्त आहे, विषयांच्या पसाऱ्यात राहूनही जो विषयासक्त होत नाही, आणि व्यवहार करीत असूनही जो मोह पावत नाही, तोच खरा शांत होय.


       ३९५ यो यादृक्क्लेशमाधातुं समर्थस्तादृगेव सः ।

           अवश्यं फलमाप्नोति प्रबुद्धोऽस्त्वज्ञ एव वा ॥ ७.१०२.३३

ज्ञानी असो अज्ञानी असो, जो ज्या प्रकारचे कष्ट करण्यास समर्थ असेल, त्याप्रकारचे फल त्याला अवश्य प्राप्त होते.


       ३९६ यो यो यथा प्रयतते स स तत्तत्फलैकभाक् ।

           न तु तूष्णीं स्थितेनेह केनचित्प्राप्यते फलम् ॥ २.७.१९

जो जो मनुष्य जसा जसा प्रयत्न करतो, तसे तसें फल त्याला प्राप्त होते; परंतु स्वस्थ बसून कोणालाही फल प्राप्त होत नाही.


       ३९७ यो यो यादृग्गुणो जन्तुः स तामेवैति संस्थितिम् ।

           सदृशेष्वप्यजेषु श्वा न मध्ये रमते क्वचित् ॥ ५.३२.२९

जो ज्या गुणाचा असेल तो त्या गुणाला योग्य अशा स्थितीतच राहातो. रंगारूपाने एखादा कुत्रा बकऱ्यासारखा असला तरी तो त्यांच्या कळपांत केव्हाही रमत नाही.


       ३९८ योऽस्मत्तातस्य कूपोऽयमिति कोपं पिबत्यपः ।

           त्यक्त्वा गाङ्गं पुरःस्थं तं को न शास्त्यतिरागिणम् ॥ २.१८.४

``ही विहीर आमच्या वडिलांनी खणलेली आहे'' असे म्हणून आपल्या पुढे असलेले गंगेचे पाणी टाकून जो त्या विहिरीचेच पाणी पितो, त्या हट्टी मनुष्याला कोण बरें सांगणार ?


       ३९९ रम्यवस्तुक्षयायैव मूढानां जृम्भते पदम् ॥ ६.६२.२५

सुंदर वस्तूंचा नाश करण्यासाठींच मूढलोकांचे स्थान वाढत असते.


       ४०० राग एव हि शोभायै निर्गुणानां जडात्मनाम् ॥ ७.१२०.१०

(हा फुललेला पळसाचा वृक्ष केवळ रंगीत फुलांच्या योगाने राजासारखा शोभत आहे. त्याप्रमाणे) खरी शोभा देणारे औदार्यादि गुण मूर्खाच्या ठिकाणी नसल्यामुळे शोभा आणण्यासाठी त्यांना केवळ रंगीत वस्त्रालंकारच धारण करावे लागतात.


       ४०१ राजते हि पदार्थश्रीर्महतामर्पणाच्छुभा ॥ ३.१०४.३७

एखादा मूल्यवान चांगला पदार्थ योग्य असलेल्या थोर लोकांना अर्पण केला असतां शोभू लागतो.


       ४०२ राज्यानि सम्पदः स्फारा भोगो मोक्षश्च शाश्वतः ।

           विचारकल्पवृक्षस्य फलान्येतानि राघव ॥ २.१४.१०

(श्रीवसिष्ठ म्हणतात) राज्य, विपुलसंपत्ति, विषयोपभोग आणि मोक्ष ही सर्व विचाररूपी कल्पवृक्षाचींच फळे होत.


       ४०३ लोकनिन्द्यस्य दुर्जन्तोर्जीवितान्मरणं वरम् ॥ ५.४६.४३

लोकांच्या निंदेला पात्र झालेल्या दुष्ट पुरुषाने जगण्यापेक्षा मरून जाणे हेच श्रेयस्कर आहे.


       ४०४ लोकस्थितिरलङ्घया हि महतामपि मानद ॥ ५.६५.३०

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) महात्म्यांनासुद्धा लोकस्थितीचे उल्लंघन करता येत नाही.


       ४०५ वरं शरावहस्तस्य चाण्डालागारवीथिषु ।

           भिक्षार्थमटनं राम न मौर्ख्यहतजीवितम् ॥ २.१३.२७

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, चांडालांच्या वस्तीतून हातांत थाळी घेऊन भीक मागण्याचा प्रसंग आला तरी पुरवला, परंतु मूर्खपणामुळे निष्फळ झालेलें जीवित कंठण्याचा प्रसंग नको.


       ४०६ वरं कर्दमभेकत्वं मलकीटकता वरम् ।

           वरमन्धगुहाहित्वं न नरस्याविचारिता ॥ २.१४.४६

चिखलात बेडूक होऊन राहावे लागणे, घाणीमधील किडा बनावें लागणे किंवा एखाद्या गुहेमध्ये आंधळा सर्प होऊन रहावे लागणे चांगले, परंतु मनुष्य होऊनही विचाररहित असणे चांगले नाही.


       ४०७ वसनाशनमात्रेण तुष्टाः शास्त्रफलानि ये ।

           जानन्ति ज्ञानबन्धुंस्तान्विद्याच्छास्त्रार्थशिल्पिनः ॥ ७.२१.५

उत्तमवस्त्रे आणि भोजनादि पदार्थ मिळणे हेच शास्त्रज्ञानाचे फल असे समजून आनंद मानणारे लोक शास्त्रार्थाचे केवळ शिल्पी (कसबी) होत. ज्ञानी नव्हेत. (कारागीर लोकांनी तयार केलेल्या सुंदर वस्तूंचे भोक्ते दुसरे, कारागीर फक्त मजुरीचे मालक. तीच यांची त-हा.)


       ४०८ वसन्तो नन्दनोद्यानमिन्दुरप्सरसः स्मृताः ।

           इत्येकतः समुदितं सन्तोषामृतमेकतः ॥ ७.४७.४४

वसंत ऋतु, नंदनवन, चंद्र, आणि अप्सरा या सर्वांपासून होणारे सुख एका संतोषरूपी अमृतापासून मिळतें.


       ४०९ वस्त्वल्पमप्यतिबृहल्लघुसत्त्वो हि मन्यते ॥ ७.१८.२३

कोणताही प्राणी आपल्या बुद्धिसामर्थ्याप्रमाणे वस्तूला महत्त्व देतो. कमी बुद्धीचा मनुष्य अतिशय मूल्यवान् पदार्थाला कमी किंमतीचा समजून क्षुद्रवस्तूला फार महत्त्व देतो. (उदीर रत्नादिकांना तुच्छ मानून धान्याचे कण गोळा करतात. तसेंच खेळणारे मूल मातीचे नवीन चित्र घेण्यासाठी जवळचा मूल्यवान दागिना देण्यासही तयार होते.)


       ४१० वस्त्वस्थानगतं सर्वं शुभमप्यशुभं भवेत् ॥ ७.११६.५२

कोणतीही शुभवस्तु अयोग्य ठिकाणी राहिल्यास ती अशुभ होते.


       ४११ वातान्तर्दीपकशिखालोलं जगति जीवितम् ।

           तडित्स्फुरणसङ्काशा पदार्थश्रीर्जगत्रये ॥ १.२८.११

वाऱ्याच्या झोतांत सांपडलेल्या दिवटीच्या ज्योतीप्रमाणे जगांतील जीविताची स्थिति क्षणभंगुर आहे. त्रैलोक्यांतील सर्व पदार्थाची शोभा विजेच्या प्रकाशाप्रमाणे चंचल आहे.


       ४१२ वासनातन्तुबद्धा ये आशापाशवशीकृताः ।

           वश्यतां यान्ति ते लोके रज्जुबद्धाः खगा इव ॥ ४.२७.१८

जे आशापाशांत गुरफटले जाऊन वासनातंतूंनी बद्ध झालेले असतात, ते जाळ्यांत अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे कोणालाही सहज जिंकता येतात.


       ४१३ वासनातानवं राम मोक्ष इत्युच्यते बुधैः ।

           पदार्थवासनादार्ढ्यं बन्ध इत्यभिधीयते ॥ २.२.५

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, वासना क्षीण होत जाणे या स्थितीलाच ज्ञाते पुरुष मोक्ष असें म्हणतात. व पदार्थाबद्दलची वासना दृढ होत जाणे हाच बंध होय असे त्यांचे मत आहे.


       ४१४ वासनावागुराकृष्टो मनोहरिणको नृणाम् ।

           परां विवशतामेति संसारवनगुल्मके ॥ ३.११०.११

वासनारूपी जाळ्यांत सांपडलेलें मनुष्याचे मनोरूपी हरिण संसाररूपी वनांतील झाडींत अतिशय विव्हल होऊन जाते.


       ४१५ विचारसन्तोषशमसत्समागमशालिनि ।

           प्रवर्तन्ते श्रियो जन्तौ कल्पवृक्षाश्रिते यथा ॥ २.१६.२४

कल्पवृक्षाचा आश्रय केला म्हणजे सर्व त-हेचें ऐश्वर्य प्राप्त होते याप्रमाणे विचार, संतोष, शम आणि सत्समागम यांनी युक्त असलेल्या मनुष्याला सर्व ऐश्वर्य प्राप्त होते.


       ४१६ विचारः सफलस्तस्य विज्ञेयो यस्य सन्मतेः ।

           दिनानुदिनमायाति तानवं भोगगृध्नुता ॥ ४.१८.६५

चांगली बुद्धि असलेल्या ज्या पुरुषाचा विषयोपभोगांचा लोभ दिवसेंदिवस कमी होत असतो, त्याचाच आत्मविषयक विचार सफल होत जातो.


       ४१७ विचारोदयकारिण्या धिया व्यवहरन्ति ये ।

           फलानामत्युदाराणां भाजनं हि भवन्ति ते ॥ २.१४.१२

जे लोक विचार करणाऱ्या बुद्धीने व्यवहार करतात, ते अतिशय उत्कृष्ट फळ मिळविण्याला पात्र होतात.


       ४१८ विद्राविते शत्रुजने समस्ते

               समागतायामभितश्च लक्ष्म्याम् ।

           सेव्यन्त एतानि सुखानि यावत्

               तावत्समायाति कुतोऽपि मृत्युः ॥ १.२७.२०

सर्व शत्रूचें पारिपत्य करून, सर्व प्रकारची संपत्ति मिळवून मनुष्य अनेक सुखांचा अनुभव घेत आहे, तोच मृत्यु अचानक येऊन त्याच्यावर झडप घालतो.


       ४१९ विना पुरुषयत्नेन दृश्यते चेद्जनार्दनः ।

           मृगपक्षिगणं कस्मात्तदासौ नोद्धरत्यजः ॥ ५.४३.५

मनुष्याने स्वतः उद्योग केल्यावांचून जर त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकले असते, तर पशु, पक्षी इत्यादिकांचा सुद्धा उद्धार त्याने कां केला नसता !


       ४२० वियोगायैव संयोगाः ॥ ६.१२६.२८

वियोग होण्यासाठीच संयोग होत असतात.


       ४२१ विविधवनकुसुमकेसरधवलवपुर्हंस इव दृष्टः ।

           काकः कृमिकुलकवलं क्लिनमथो कवलयन् ज्ञातः ॥ ७.११६.६५

वनांतील नानाप्रकारच्या पुष्पपरागांनी शुभ्र झालेला कावळा हंसासारखा जरी वाटला, तरी किड्यांनी भरलेलें व माखून गेलेले मांस खाण्यासाठी तो उचलून घेत आहे असें दिसल्याबरोबर हा कावळाच आहे अशी खात्री झाली.


       ४२२ विवेकोस्ति वचस्येव चित्रेऽग्निरिव भास्वरः ।

           यस्य तेनापरित्यक्ता दुःखायैवाविवेकिता ॥ ४.१८.६७

ज्याचा विवेक बोलण्यांतच मात्र आहे, त्याला चित्रांतील अग्नीप्रमाणे विवेकाचा मुळीच उपयोग होत नाही. त्याच्या ठिकाणीं अविवेकच असल्यामुळे त्यापासून दुःख होतें.


       ४२३ विश्वामित्रेण मुनिना देवमुत्सृज्य दूरतः ।

           पौरुषेणैव सम्प्राप्तं ब्राह्मण्यं राम नान्यथा ॥ २.८.२०

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, विश्वामित्र मुनींनी दैव दूर बाजूला झुगारून देऊन केवळ पौरुषाच्याच बलावर ब्राह्मण्य प्राप्त करुन घेतले.


       ४२४ विषं विषयवैषम्यं न विषं विषमुच्यते ।

           जन्मान्तरघ्ना विषया एकदेहहरं विषम् ॥ १.२९.१३

ज्याला आपण विष म्हणून म्हणतो, तें वास्तविक विष नसून विषय हेच खरें विष होय. विषप्राशन केले असतां एका देहाचा नाश होतो, परंतु विषयांचे सेवन हे अनेक जन्मांचा नाश करतें.


       ४२५ विषयान्प्रति भोः पुत्र सर्वानेव हि सर्वथा ।

           अनास्था परमा ह्येषा सा युक्तिर्मनसो जये ॥ ५.२४.१७

(विरोचन बलीला म्हणतो) हे पुत्रा, सर्व विषयांसंबंधाने पूर्णपणे अनास्था असणे हीच मनोजयाची सर्वोत्कृष्ट युक्ति आहे.


       ४२६ वृक्षाः प्रतिवनं सन्ति नित्यं सफलपल्लवाः ।

           नत्वपूर्वचमत्कारो लवङ्गः सुलभः सदा ॥ १.३३.४१

प्रत्येक वनामध्ये फळांनी व फुलांनी भरलेले असे शेंकडों वृक्ष आढळून येतात. परंतु आश्चर्यकारक लवंगवृक्ष एखादाच आढळतो.


       ४२७ व्याचष्टे यः पठति च शास्त्रं भोगाय शिल्पिवत् ।

           यतते न त्वनुष्ठाने ज्ञानबन्धुः स उच्यते ॥ ७.२१.३

कारागीर द्रव्य मिळविण्यासाठी प्रयत्न करतो, त्याप्रमाणे उपभोग मिळविण्यासाठी जो शास्त्र पढतो व त्याचे व्याख्यान करतो, पण स्वतः त्याप्रमाणे वागण्याविषयीं झटत नाहीं, तो ज्ञानबंधु म्हणजे नांवाचाच ज्ञानी होय.


       ४२८ शतादेकतमस्यैव सर्वोदारचमत्कृतिः ।

           ईप्सितार्थार्पणैकान्तदक्षा भवति भारती ॥ १.३३.३२

शेंकडों वक्त्यांमध्ये एकाद्याचेंच भाषण सहृदय मनुष्यांच्या अंतःकरणांत विस्मय उत्पन्न करणारे आणि इच्छिलेल्या अर्थाचा निश्चयाने बोध करणारे असते.


       ४२९ शमेनासाद्ध्यते श्रेयः शमो हि परमं पदम् ॥ २.१३.५२

शमानेच मोक्ष प्राप्त होतो. व शम हेच श्रेष्ठपद आहे.


       ४३० शरदम्बुधरच्छायागत्वर्यो यौवनश्रियः ।

           आपातरम्या विषयाः पर्यन्तपरितापिनः ॥ ७.९३.८४

शरदृतूंतील मेघांच्या छायेप्रमाणे तारुण्याची शोभा क्षणिक आहे. आणि शब्दादिविषय वरवर सुखदायक खरे, परंतु शेवटीं अत्यंत दुःखदायक होत.


       ४३१ शरीरमरुतापोत्थां युवतामृगतृष्णिकाम् ।

           मनोमृगाःप्रधावन्तः पतन्ति विषयावटे ॥ १.२०.३२

शरीर हे रखरखीत वाळवंट आहे, त्यांतील तापाने उत्पन्न झालेल्या तारुण्यरूपी मृगजळाकडे मनोरूपी हरिण धांवत जातात आणि शेवटी विषयांच्या खड्डयांत जाऊन पडतात.


       ४३२ शस्त्राणि दयिताङ्गानि लग्नान्यङ्गे निरम्बरे ।

           यो बुध्यमानः सुसमः स परस्मिन्पदे स्थितः ॥ ७.११.१

ज्याच्या उघड्या आंगावर झालेले शस्त्रांचे प्रहार आणि स्त्रीच्या अवयवांचा स्पर्श ही दोन्ही ज्याला सारखींच वाटतात, तो ब्रह्मपदाला पोचला असे समजावें.


       ४३३ शास्त्रं सुबोधमेवेदं सालङ्कारविभूषितम् ।

           काव्यं रसमयं चारु दृष्टान्तैः प्रतिपादितम् ॥ २.१८.३३

हा योगवासिष्ठ शास्त्रीय ग्रंथ अतिशय सुबोध आहे, अनेक अलंकार व पुष्कळ दृष्टांत यांच्या योगाने एखाद्या काव्याप्रमाणे रम्य व सरस बनला आहे.


       ४३४ शास्त्रसज्जनसंसर्गैः प्रज्ञां पूर्वं विवर्धयेत् ।

           सेकसंरक्षणारम्भैः फलप्राप्तौ लतामिव ॥ ५.१२.२४

एखाद्या वेलीला चांगली फळे यावी असे वाटत असेल, तर तिला पाणी घालून तिचे रक्षण करावे लागते, त्याप्रमाणे कार्य सिद्धीस नेणाऱ्या पुरुषाने शास्त्र आणि सत्समागम यांच्या योगाने प्रथम आपली बुद्धि वाढवावी.


       ४३५ शिखी वार्यपि नादत्ते भूमेर्भुङ्क्ते बलादहिम् ।

           दौरात्म्यं तन्न जाने किं सर्पस्य शिखिनोऽथवा ॥ ७.११८.१९

मोर भूमीवरील पाणीही पीत नाही पण सर्पाला मात्र बलात्काराने खाण्यासाठी उचलून नेतो, तेव्हां याठिकाणी अंतःकरणाचा दुष्टपणा सर्पाचा आहे किंवा मोराचा आहे ते समजत नाही.


       ४३६ शिष्यप्रज्ञैव बोधस्य कारणं गुरुवाक्यतः ॥ ६.१२८.६३

ज्ञान होण्याला गुरुवाक्यापेक्षा शिष्याची बुद्धिच अधिक कारण आहे.


       ४३७ शुद्धेऽल्पोऽप्युपदेशो हि निर्मले तैलबिन्दुवत् ।

           लगत्युत्तानचित्तेषु नादर्श इव मौक्तिकम् ॥ ७.५.३

तेलाचा थेंब निर्मल वस्त्रावर पडला असतां आंत शिरून जसा पसरतो तसा थोडाही उपदेश शुद्ध चित्तामध्ये चांगल्या रीतीने बिंबतो, परंतु चित्त गंभीर नसल्यास आरशांत पडलेल्या मोत्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे उपदेश ठसत नाही.


       ४३८ शुभवासनया चेतो महत्या जायते महत् ।

           भवतीन्द्रमनोराज्य इन्द्रतास्वप्नभाङ्नरः ॥ ४.३५.३०

शुभ वासनेमुळे मन शुभ होते, आणि मोठ्या वासनेमुळे मनही मोठे होते. `` मी इंद्र होईन `` असें मनोराज्य करणारा स्वनामध्ये इंद्र होतो.


       ४३९ शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां वहन्ती वासनासरित् ।

           पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभे पथि ॥ २.९.३०

वासनारूपी नदी शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही मार्गानी वाहत असते. आपल्या वासनेचा प्रवाह अशुभमार्गाने जात आहे असे दिसून आल्यास प्रयत्न करून तो प्रवाह शुभ मार्गाकडे वळवावा.


       ४४० शून्यमाकीर्णतामेति मृतिरप्युत्सवायते ।

           आपत्सम्पदिवाभाति विद्वजनसमागमे ॥ २.१६.३

विद्वान लोकांच्या सहवासांत असणाऱ्याला एखादें शून्यस्थानही मनुष्यांनी गजबजल्याप्रमाणे दिसते, मृत्युही उत्सवाप्रमाणे आनंददायक वाटतो. व आपत्तीलाही त्याच्या दृष्टीने संपत्तीचे स्वरूप प्राप्त होते.


       ४४१ शैशवं वार्धकं ज्ञेयं तिर्यक्त्वं मृतिरेव च ।

           तारुण्यमेव जीवस्य जीवितं तद्विवेकि चेत् ॥ ७.१६२.२१

बाळपण आणि म्हातारपण या दोन्ही अवस्थांत ज्ञान प्राप्त होत नसल्यामुळे त्या पशुपक्ष्यांप्रमाणे व्यर्थ होत. त्या मरणतुल्यच आहेत. प्राण्याचे खरे जीवित म्हणजे तारुण्य होय. परंतु ते देखील विचार करणारे असेल तर.


       ४४२ शैशवं च मनश्चैव सर्वास्वेव हि वृत्तिषु ।

           भ्रातराविव लक्ष्येते सततं भङ्गुरस्थिती ॥ १.१९.१६

बाळपण आणि मन या दोहोंचे स्वरूप सारखेंच चंचल आहे,। यावरून सर्व वृत्तींमध्ये ही दोन्ही भावंडेंच आहेत, असे वाटते.


       ४४३ श्मशानमापदं दैन्यं दृष्ट्वा को न विरज्यते ।

           तद्वैराग्यं परं श्रेयः स्वतो यदभिजायते ॥ २.११.२८

स्मशानांत गेल्यानंतर किंवा आपत्ति आणि दैन्य प्राप्त झाल्यानंतर कोणाला वैराग्य उत्पन्न होत नाहीं ! परंतु असले वैराग्य खरें नव्हे, स्वतः विचार करून जें वैराग्य उत्पन्न होते, तेच अत्यंत श्रेयस्कर होय.


       ४४४ श्रीमानजननिन्द्यश्च शूरश्चाप्यविकत्थनः ।

           समदृष्टिः प्रभुश्चैव दुर्लभाः पुरुषास्त्रयः ॥ १.१३.११

लोकांच्या निंदेला पात्र न झालेला श्रीमंत, स्वतः प्रौढि न सांगणारा शूर, आणि सर्वत्र समदृष्टि असणारा राजा हे तीन पुरुष या जगांत दुर्लभ आहेत.


       ४४५ श्रुत्वा स्पृष्ट्वा च दृष्ट्वा च भुक्त्वा घ्रात्वा शुभाशुभम् ।

           न हृष्यति ग्लायति यः स शान्त इति कथ्यते ॥ २.१३.८२

चांगल्या किंवा वाईट गोष्टी ऐकून, पाहून, तसेंच चांगल्या किंवा वाईट पदार्थांना स्पर्श करून, त्यांचा वास घेऊन, किंवा उपभोग घेऊन ज्याला हर्ष किंवा विषाद उत्पन्न होत नाही, त्यालाच शांत असे म्हणतात.


       ४४६ संयोगेच वियोगेच महान्तो हि महाशयाः ॥ ६.१११.११

पुत्र, मित्र इत्यादिकांचा समागम किंवा वियोग झाला असतां महात्मे पुरुष मेरुपर्वताप्रमाणे स्थिर असतात.


       ४४७ संशान्ताहङ्कृतेर्जन्तोर्भोगा रोगा महामते ।

           न स्वदन्ते सुतृप्तस्य यथा प्रतिविषा रसाः ॥ ४.३३.६८

(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात।) भोजन करून अत्यंत तृप्त झालेल्या मनुष्याला उत्तमोत्तम पक्वान्नेही विषाप्रमाणे वाटतात; त्याप्रमाणे अहंकार नाहीसा होऊन आत्मज्ञानाने तृप्त झालेल्या मनुष्याला विषयोपभोग रोगांप्रमाणे वाटतात.


       ४४८ संशान्ते चित्तवेताले यामानन्दकलां तनुः ।

           याति तामपि राज्येन जागतेन न गच्छति ॥ ४.१५.२०

चित्तरूपी वेताळ शांत झाला असतां, शरीराला प्राप्त होणाऱ्या सुखाच्या एका कलेची म्हणजे सोळाव्या हिश्शाची बरोबरी सर्व जगताचे राज्य मिळाल्याने होणा-या आनंदालाही करता येणार नाही.


       ४४९ संसार एव दुःखानां सीमान्त इति कथ्यते ।

           तन्मध्यपतिते देहे सुखमासाद्यते कथम् ॥ ५.९.५२

संसार म्हणजे दुःखाची पराकाष्ठा असे सत्पुरुष सांगतात. तेव्हां अशा संसारांत पडलेल्या देहामध्ये सुखप्राप्ति कोठून होणार ?


       ४५०। संसारविषवृक्षोऽयमेकमास्पदमापदाम् ।

           अझं सम्मोहयेन्नित्यं मौर्ख्यं यत्नेन नाशयेत् ॥ २.११.६

संसार हा एक विषवृक्ष असून त्याच्यापासून सर्व तऱ्हेच्या आपत्ति उत्पन्न होतात. अज्ञमनुष्याला हा संसार मोह उत्पन्न करतो, यासाठी प्रयत्न करून अज्ञानाचा नाश केला पाहिजे.


       ४५१ संसारस्यास्य दुःखस्य सर्वोपद्रवदायिनः ।

           उपाय एक एवास्ति मनसः स्वस्य निग्रहः ॥ ४.३५.२

सर्व प्रकारे उपद्रव होणाऱ्या अशा या संसारदुःखाचा नाश होण्याला स्वतःच्या मनाचा निग्रह हाच काय तो एक उपाय आहे.


       ४५२ संसारात्तरणे जन्तोरुपायो ज्ञानमेव हि ॥ २.१०.२२

संसारांतून तरून जाण्याला ज्ञान हाच काय तो एक उपाय आहे.


       ४५३ संसाराम्बुनिधावस्मिन्वासनाम्बुपरिप्लुते ।

           ये प्रज्ञानावमारूढास्ते तीर्णा बुडिताः परे ॥ ४.४६.२२

वासनारूपी पाण्याने ओतप्रोत भरलेल्या या संसारसमुद्रांत जे बुद्धिरूपी नावेचा आश्रय करतात, तेच या समुद्राच्या पलीकडे तरून जातात, इतर बुडून जातात.


       ४५४ सङ्कटे विस्मरत्येव जनो गौरवसत्क्रियाम् ॥ ३.७४.२५

कोणीही झाला तरी संकटाचे वेळी आदर सत्कार करणे विसरून जातोच.


       ४५५ सङ्कल्पः परमो बन्धस्त्वसङ्कल्पो विमुक्तता ॥ ३.११४.२४

संकल्प हाच मोठा बंध असून असंकल्प हाच खरा मोक्ष आहे.


       ४५६ सजनाशयनीकाशं त्यक्त्वा बर्ही महत्सरः ।

           पिबत्यम्ब्बभ्रनिष्ठयूतं मन्ये तन्नतिभीतितः ॥ ७.११८.२०

(सहचर राजाला म्हणतो) सज्जनांच्या अंतःकरणाप्रमाणे स्वच्छ असलेले मोठे सरोवर सोडून, मोर मेघांतून गळलेले पाणी पितो, याचे कारण आपले मस्तक वाकवावे लागेल, हेच असावे असे वाटते.


       ४५७ सज्जनो हि समुत्तार्य विपद्भयो निकटस्थितम् ।

           नियोजयति सम्पत्सु स्वालोकेष्विव भास्करः ॥ ७.४७.३०

सूर्य स्वतःच्या प्रकाशाने इतरांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे सज्जन आपल्याजवळ असलेला कोणी विपत्तींत पडल्यास त्याला विपत्तीपासून सोडवून चांगली स्थिति प्राप्त करून देतात.


       ४५८ सतां साप्तपदं मैत्रम् ॥ ७.२१६.४

सज्जनांच्या मागून सात पावले चालल्याने त्यांच्याशी सख्य होते.


       ४५९ सतो हि मार्जनक्लेशो नासतस्तु कदाचन ॥ ३.६०.२

जी सद्वस्तु आहे ती नाहीशी करणे शक्य नाही, परंतु जी असद्वस्तु आहे तिचा बाध करण्याला मुळींच क्लेश पडत नाहीत.


       ४६० सत्यं मनोरमाः कामाः सत्यं रम्या विभूतयः ।

           किं तु मत्ताङ्गनापाङ्गभङ्गलोलं हि जीवितम् ॥ ७.९३.७९

विषय आणि ऐश्वर्य ही रमणीय आहेत, असें धरून चाललों, तथापि जीवित हेच मुळी मत्त स्त्रियांच्या कटाक्षा इतकें चंचल आहे याला काय करणार ?


       ४६१ सत्यां प्रज्ञामहानावि विवेके सति नाविके ।

           संसारसागरादस्माद्यो न तीर्णो धिगस्तु तम् ॥ ५.७६.१३

बुद्धिरूपी मोठी नौका व विवेकरूपी नावाडी असता, या संसारसागराच्या पैल तीराला जो जात नाही, त्याला धिक्कार असो.


       ४६२ सन्तोऽतीतं न शोचन्ति भविष्यच्चिन्तयन्ति नो ।

           वर्तमानं च गृह्णन्ति कर्म प्राप्तमखण्डितम् ॥ ६.१२४.१३

सज्जन भूतकालाच्या गोष्टीविषयीं शोक करीत बसत नाहीत व पुढील कार्याबद्दलही चिंता करीत नाहीत, तर वर्तमानकाळी प्राप्त झालेले कर्म मात्र सतत करीत राहतात.


       ४६३ सन्तोषः परमो लाभः सत्सङ्गः परमा गतिः ।

           विचारः परमं ज्ञानं शमो हि परमं सुखम् ॥ २.१६.१९

संतोष हा अत्यंत श्रेष्ठ लाभ, सत्संग ही परमगति, विचार हे परमज्ञान, आणि शम हेच परम सुख होय.


       ४६४ सन्तोषः साधुसङ्गश्च विचारोऽथ शमस्तथा ।

           एत एव भवाम्भोधावुपायास्तरणे नृणाम् ॥ २.१६.१८

संतोष, सत्संग, विचार आणि शांति हीच काय ती मनुष्यांना संसाररूपी सागरांतून तारून नेणारी मुख्य साधने आहेत.


       ४६५ सन्तोषो हि परं श्रेयः सन्तोषः सुखमुच्यते ॥  २.१५.१

संतोष हाच मोक्ष, व संतोष हेच आत्यंतिक सुख होय.


       ४६६ समया स्वच्छया बुद्धया सततं निर्विकारया ।

           यथा यत्क्रियते राम तददोषाय सर्वदा ॥ ७.१९९.७

सम, निर्मल व निर्विकार बुद्धीने जें जें करावें तें तें नेहमी निर्दोषच असते.


       ४६७ समुद्रस्येव गाम्भीर्यं धैर्यं मेरोरिव स्थितम् ।

           अन्तःशीतलता चेन्दोरिवोदेति विचारिणः ॥ २.१८.१८

समुद्राचे गांभीर्य, मेरूचे धैर्य व चंद्राची शीतलता ही विचारी मनुष्याच्या अंतःकरणाला प्राप्त होतात.


       ४६८ सम्पदः प्रमदाश्चैव तरङ्गोत्तुङ्गभङ्गुराः ।

           कस्तास्वहिफणच्छत्रच्छायासु रमते बुधः ॥ ७.४७.४९

संपदा आणि प्रमदा म्हणजे तरुण व सुंदर स्त्रिया या पाण्यावरील मोठ्या तरंगाप्रमाणे क्षणभंगुर आहेत. सर्पाच्या फणांच्या छायेप्रमाणे असलेल्या संपदा आणि प्रमदा यांच्या ठिकाणी कोणता शाहाणा मनुष्य रममाण होईल ?


       ४६९ सम्भवत्यङ्ग जगति न बीजेन विनाङ्करः ॥ ६.९४.६२

(कुंभमुनि शिखिध्वज राजाला म्हणतात) या जगांत बीजावांचून अंकुर संभवत नाही.


       ४७० सर्वकर्माणि सन्त्यज्य कुर्यात्सजनसङ्गमम् ।

           एतत्कर्म निराबाधं लोकद्वितयसाधनम् ॥ ७.९८.२३

सर्व कमें सोडून प्रथम सज्जनांचा सहवास करावा. सत्समागम हा उपाय मुळींच त्रासदायक नसून इहलोक व परलोक साधून देणारा आहे.


       ४७१ सर्वं काले हि शोभते ॥ ३.६७.६१

सर्व गोष्टी योग्यवेळीच शोभत असतात.


       ४७२ सर्वज्ञोऽपि बहुज्ञोऽपि माधवोऽपि हरोऽपि च ।

           अन्यथा नियतिं कर्तुं न शक्तः कश्चिदेव हि ॥ ५.८९.२६

कोणी एखादा सर्वज्ञ असो, बहुज्ञ असो, स्वतः भाग्यवान विष्णु असो, किंवा शंकर असो नियतीला म्हणजे सृष्टिनियमाला बदलण्यास कोणीही समर्थ नाही.


       ४७३ सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।

           यदा पश्यत्यभेदेन तदा जीवो विमुच्यते ॥ ६.१२८.४९

सर्वभूतांमध्ये आत्म्याला व आत्म्यामध्ये सर्व भूतांना हा जीव जेव्हां अभेदाने पाहतो तेव्हां तो मुक्त होतो.


       ४७४ सर्वमेवेह हि सदा संसारे रघुनन्दन ।

           सम्यक्प्रयुक्तात्सर्वेण पौरुषात्समवाप्यते ॥ २.४.८

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, या संसारांत योग्य दिशेने प्रयत्न केला असता सर्वांना नेहमी वाटेल ती वस्तु प्राप्त करून घेता येते.


       ४७५ सर्वं ब्रह्मेति यो ब्रूयादप्रबुद्धस्य दुर्मतेः ।

           स करोति सुहृद्वृत्त्या स्थाणोर्दुःखनिवेदनम् ॥ ६.४९.२०

दुष्टबुद्धीच्या मूर्ख मनुष्याला ``हे सर्व ब्रह्मच आहे'' असें जो सांगतो, तो, जड खांबाला आपला मित्र समजून आपले दुःख सांगतो; असेंच म्हटले पाहिजे.


       ४७६ सर्वस्य जन्तुजातस्य सर्ववस्त्ववभासने ।

           सर्वदेवैक एवोचैर्जयत्यभ्यासभास्करः ॥ ७.६७.४१

सर्व प्राण्यांना कोणतीही वस्तु सर्वदा भासविणारा एक अभ्यासरूपी सूर्यच सवोत्कृष्ट आहे.


       ४७७ सर्वस्य बीजे सन्त्यक्ते सर्वं त्यक्तं भवत्यलम् ॥ ६.९३१३५

सर्वांचे बीज टाकले असतां सर्वांचा त्याग पूर्णपणे केल्यासारखा होतो.


       ४७८ सर्वस्याः सरितो वारि प्रयात्यायाति चाकरात् ।

           देहनद्याः पयस्त्वायुर्यात्येवायाति नो पुनः ॥ ७.९३.४८

सर्व नद्यांचं पाणी जरी वाहुन जात असले, तरी ते पुनः मेघ, पर्वत इत्यादिकांपासून येत असते. परंतु या देहरूपी नदीतील आयुष्यरूपी पाणी एकसारखें जात मात्र असते, पण त्यांत दुसरी कडून भर पडत नाही.


       ४७९ सर्वः स्वसङ्कल्पवशाल्लघुर्भवति वा गुरुः ॥ ३.७०.३०

जो तो प्राणी आपल्या संकल्पाच्या योगाने उच्च किंवा नीच स्थिति प्राप्त करून घेत असतो.


       ४८० सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्र्याः ।

           संयोगा विप्रयोगान्ताः सर्वे संसारवर्त्मनि ॥ ५.८६५५

या संसारांत सर्व संग्रहांचा शेवटी नाश होतो, उंचावर चढलेले अखेरीस पतन पावतात, आणि ज्यांचा संयोग झाला असेल, त्या सर्वांचा शेवटी वियोग होतो.


       ४८१ सर्वेषामेव धर्माणां कर्मणां शर्मणामपि ।

           पण्डितः पुण्डरीकाणां मार्तण्ड इव मण्डनम् ॥ ७.१४३.१

आकाशाचे भूषण असलेला सूर्य ज्याप्रमाणे कमलांना विकसित करतो, त्याप्रमाणे सभेचे भूषण असलेला पंडित सर्व धर्माचा, कर्माचा, आणि सुखांचा निर्णय करतो.


       ४८२ सर्वेषु सुखदुःखेषु सर्वासु कलनासु च ।

           मनः कर्तृ मनो भोक्तृ मानसं विद्धि मानवम् ॥ ३.११५.२४

(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, सर्व सुखदुःखांचे आणि कल्पनांचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व मनाकडे आहे. यासाठी मन म्हणजेच मनुष्य हे लक्षात ठेव.


       ४८३ सर्वैव लोकयात्रेयं प्रोता तृष्णावरत्रया ।

           रज्जुबन्धाद्विमुच्यन्ते तृष्णाबन्धान्न केचन ॥ ५.१५.२३

हे सर्व लोकसमुदाय तृष्णारूपी चामड्याच्या वादीमध्ये ओवले गेले आहेत. इतर कसल्याही दोरीने बद्ध झालेला मनुष्य त्या बंधापासून मुक्त होऊ शकतो, परंतु तृष्णेच्या बंधांतून कोणीही सहसा मुक्त होऊ शकत नाही.


       ४८४ सलिलं स्थलतां याति स्थलीभवति वारिभूः ।

           विपर्यस्यति सर्वं हि सकाष्ठाम्बुतृणं जगत् ॥ १.२८.९

ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी काही काळाने भूमि दिसते; व ज्या ठिकाणी भूमि असते, त्या ठिकाणी काही दिवसांनी पाणी दिसू लागते. अशारीतीने काष्ठ, उदक आणि तृण यांनी युक्त असलेले जग कालमानाने बदलत असते.


       ४८५ सहस्रेभ्यः सहस्रेभ्यः कश्चिदुत्थाय वीर्यवान् ।

           भिनत्ति वासनाजालं पञ्जरं केसरी यथा ॥ ७.१९४.३९

ज्याप्रमाणे सिंह पिंज-यातून बाहेर पडतो, त्याप्रमाणे हजारों लोकांतील एखादाच सामर्थ्यवान पुरुष वासनेचे जाळे तोडून मोकळा होतो.


       ४८६ साधुसङ्गतयो लोके सन्मार्गस्य च दीपिकाः ॥ २.१६.९

या जगामध्ये साधूंचा समागम हा सन्मार्ग दाखविणारा दिवा आहे.


       ४८७ साधूपदिष्टमार्गेण यन्मनोऽङ्गविचेष्टितम् ।

           तत्पौरुषं तत्सफलमन्यदुन्मत्तचेष्टितम् ॥ २.४.११

सत्पुरुषांनी आंखून दिलेल्या मार्गाने काया, वाचा आणि मन यांनी जे कर्म केले जाते, तेंच पौरुष होय. अशा पौरुषानेच फलप्राप्ति होते. याशिवाय केलेले इतर कर्म उन्मत्त मनुष्याच्या कर्माप्रमाणे निष्फल होते.


       ४८८ सिंहवत्सर्ववेगेन पतन्त्यर्थे किलार्थिनः ॥ ३.७८.६

कार्य साधणारे लोक आपल्या कार्यावर सिंहाप्रमाणे एकदम झडप घालीत असतात.


       ४८९ सीमान्तं सर्वदुःखानामापदां कोशमुत्तमम् ।

           बीजं संसारवृक्षाणां प्रज्ञामान्दयं विनाशयेत् ॥ ५.१२.२७

सर्व दुःखांची पराकाष्ठा, आपत्तीचे मोठे भांडार, व संसारवृक्षाचें बीज, अशा प्रकारच्या बुद्धिमांद्याचा नाश करावा.


       ४९० सुनिर्मलापि विस्तीर्णा पावन्यपि हि यौवने ।

           मतिः कलुषतामेति प्रावृषीव तरङ्गिणी ॥ १.२०.१८

पावसाळ्यांत नदीचे पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे बुद्धि कितीही निर्मल, उदार आणि शुद्ध असली, तरी ती तारुण्यांत मलिन होते.


       ४९१ सुभगाः सुलभारोहाः फलपल्लवशालिनः ।

           जायन्ते तरवो देशे न तु चन्दनपादपाः ॥ १.३३.४०

दिसण्यांत सुंदर आणि चढण्याला सुलभ असे फल आणि पल्लव यांनी युक्त असलेले वृक्ष सर्वत्र दिसून येतात; परंतु चंदनाचे वृक्ष मात्र विरळा होत.


       ४९२ सुरज्ज्वेव बलीवर्दो बध्यते जन्तुरास्थया ॥ ६.२८.६४

दोरीने बैल बांधला जातो त्याप्रमाणे आशेच्या योगाने प्राणी बद्ध होतो.


       ४९३ सुलभो दुर्जनाश्लेषो दुर्लभः सत्समागमः ॥ १.२६.२१

दुर्जनांची संगति सुलभ आहे, परंतु सत्समागम मात्र दुर्लभ आहे.


       ४९४ सुविरक्तं मुनेश्चेतो रक्तं च विषयार्थिनः ।

           रमयन्ति समं रम्या विजना वनभूमयः ॥ ७.१२०.२९

मुनिजनांचे विरक्त चित्त आणि कामी पुरुषांचे विषयासक्त चित्त या दोहोंना एकांत असलेल्या रम्य वनभूमि सारख्याच आनंद देतात.


       ४९५ सुसाध्यः करटोद्धेदो मत्तैरावणदन्तिनः ।

           नोत्पथप्रतिपन्नानां स्वेन्द्रियाणां विनिग्रहः ॥ ७.६.४०

इंद्राच्या मत्त ऐरावत हत्तीचे गंडस्थळ सहज फोडतां येईल, परंतु भलत्याच मार्गाने जाणाच्या स्वतःच्या इंद्रियांचा निग्रह करणे सुलभ नाही.


       ४९६ सौहार्दं सुजनानां हि दर्शनादेव वर्धते ॥ ३.८२.३७

चांगल्या लोकांची भेट होतांच मैत्री वाढत असते.


       ४९७ सौहार्देन प्रवृत्तस्य को वाक्यं नाभिनन्दति ॥ ३.८२.४८

प्रेमाने बोलणाऱ्याच्या भाषणाचे कोण बरे कौतुक करणार नाहीं !


       ४९८ स्त्रीलोचनैस्तडित्पुञ्जैर्ज्वालाजालैस्तरङ्गकैः ।

           चापलं शिक्षितं ब्रह्मञ्छैशवाक्रान्तचेतसः ॥ १.१९.१५

(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) स्त्रियांचे नेत्र, विद्युल्लता, अग्नीच्या ज्वाला, आणि समुद्रावरील लाटा यांनी बाल्यदशेकडूनच चांचल्याचे शिक्षण घेतले आहे, असे वाटते.


       ४९९ स्फटिकः प्रतिबिम्बेन यथा याति न रञ्जनम् ।

           तज्ज्ञः कर्मफलेनान्तस्तथा नायाति रञ्जनम् ॥ ६.१२२.६

स्फटिकमणि प्रतिबिंबाच्या योगाने जसा रंगीत होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य अंतःकरणांत कर्मफलाच्या योगाने काहीएक विकार पावत नाही.


       ५०० स्वधर्मेण च हिंसैव महाकरुणया समा ॥ ३.८२.४६

स्वधर्माप्रमाणे केलेली हिंसा ही मोठ्या दयेसारखीच आहे.


       ५०१ स्वया वासनया लोको यद्यत्कर्म करोति यः ।

           स तथैव तदाप्नोति नेतरस्येह कर्तृता ॥ ४.१३.११

जगामध्ये आपल्या वासनेप्रमाणे लोक जें जें कर्म करितात, त्या त्या कर्माचेच फळ ते भोगतात, त्यांत इतरांच्या कर्तृत्वाचा मुळीच संबंध नाही.


       ५०२ स्ववासनानुसारेण सर्व आस्पदमीहते ॥ ३.७३.२९

प्रत्येक प्राणी आपापल्या वासनेप्रमाणेच स्थानाची इच्छा करितो.


       ५०३ हरिवक्षोगता लक्ष्मीरपि शोभार्थमेव यत् ।

           बिभर्ति कमलं हस्ते कान्याशंसाधिका भवेत् ॥ ७.११७.२१

कमल हे इतके सुंदर आहे की, प्रत्यक्ष विष्णूच्या वक्षःस्थळाच्या ठिकाणी बसणारी, सर्व सौंदर्याची अधिदेवता जी लक्ष्मी तिनें शोभा येण्यासाठी आपल्या हातांत कमल धारण केले आहे. दुसरा कोणी यापेक्षा कमलाची अधिक प्रशंसा काय करणार आहे ?


       ५०४ हस्तं हस्तेन सम्पीड्य दन्तैर्दन्तान्विचूर्ण्य च ।

           अङ्गान्यङ्गैरिवाक्रम्य जयेच्चेन्द्रियशात्रवान् ॥ ४.२३.५८

हातावर हात चोळून, दांतांनी दांत चावून, गात्रांनी गात्रे आवळून धरून, अर्थात् वाटतील ते दृढ प्रयत्न करून इंद्रियरूपी शत्रूंना जिंकून टाकावें.


       ५०५ हृदि यावदहम्भावो वारिदः प्रविजृम्भते ।

           तावद्विकासमायाति तृष्णाकुटजमञ्जरी ॥ ४.३३.३०

जोपर्यंत अंतःकरणरूपी आकाशांत अहंकाररूपी मेघ वावरत आहे तोपर्यंत तृष्णारूपी कुड्याची वेल विकास पावत असते.


       ५०६ हृद्गुहावासिचित्तत्त्वं मुख्यं सानातनं वपुः ।

           शङ्खचक्रगदाहस्तो गौण आकार आत्मनः ॥ ५.४३.२७

हृदयरूपी गुहेमध्ये वास करणारें चैतन्यतत्त्व हेच आत्म्याचे मुख्य आणि सनातन शरीर आहे; हातांत शंख, चक्र व गदा हीं असलेला आकार हे मुख्य शरीर नव्हे.


       ५०७ हृयाकाशे विवेकार्के शमालोकिनि निर्मले ।

           अनर्थसार्थकोरो नोद्यन्ति किल केतवः ॥ २.१८.२१

हृदयाकाशांत विवेकरूपी सूर्याचा उदय झाला म्हणजे शांतिरूपी स्वच्छ प्रकाश पडतो, मग अनर्थसूचक कामादि धूमकेतु उदय पावत नाहीत.


       ५०८ हेलया राजहंसेन यत्कृतं कलकूजितम् ।

           न तद्वर्षशतेनापि जानात्याशिक्षितुं बकः ॥ ७.११७.३५

राजहंसाने सहज केलेला मधुर किलबिल शब्द बगळ्याला शंभर वर्षे अभ्यास करूनही करता येणार नाही.

Post a Comment

0 Comments

Ad Code