Ad Code

सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि

  सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि 




नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।

देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥


१ अकाले कृत्यमारब्धं कर्तुर्नार्थाय कल्पते । (पहिला अ अक्षरा पासून श्लोक)

तदेव काल आरब्धं महतेऽर्थाय कल्पते ॥ १२.१३८.९५

कोणतेहि कार्य भलत्याच वेळी आरंभिलें असता त्यापासून कर्त्यांचे मनोगत सिद्ध होत नाही. तेच योग्य वेळी केले तर तेणेकरून मोठा लाभ होतो.


२ अकृत्वा कर्म यो लोके फलं विन्दति धिष्ठितः ।

स तु वक्तव्यतां याति द्वेष्यो भवति भूयशः ॥ १०.२.१७

काही परिश्रम न करता अधिकारारूढ आहे एवढ्यामुळेच अधिक लाभ घेतो, त्याची जगांत बहुत निंदा होते आणि तो दुसऱ्यांच्या द्वेषाला पात्र होतो.


३ अकृत्वा मानुषं कर्म यो दैवमनुवर्तते ।

वृथा श्राम्यति सम्प्राप्य पतिं क्लीबमिवाङ्गना ॥ १३.६.२०

कोणत्याही कार्यासाठी लोकप्रसिद्ध योग्य उपाय न करतां जो केवळ दैविक उपायांचाच अवलंब करितो त्याला, पौरुषहीन पतीशी गांठ पडलेल्या स्त्रीप्रमाणे, वृथा क्लेश मात्र होतात. तात्पर्य दोन्ही केली पाहिजेत.


४ अगोप्तारश्च राजानो बलिषड्भागतस्कराः ।

समर्थाश्चाप्यदातारस्ते वै निरयगामिनः ॥ १३.२३.८०

प्रजेचे रक्षण न करतां तिच्यापासून उत्पन्नाचा सहावा हिस्सा कर मात्र घेणारे राजे व सामर्थ्य असून दान न करणारे खचित नरकास जातात.


५ अग्निस्तेजो महल्लोके गूढस्तिष्ठति दारुषु ।

न चोपयुङ्क्ते तद्दारु यावन्नोद्दीप्यते परैः ॥ ५.३७.६०

पृथ्वीवरील अग्निरूप प्रचंड तेज लाकडांचे ठिकाणी गुप्तरूपाने वसत असते, पण जोपर्यंत ते दुसऱ्यांनी (घर्षणादिकांच्या योगाने) चेतविलेले नसतें तोपर्यंत ते लाकूड त्याचा उपयोग करीत नाही. (काही पुरुषांचे अंगीं लोकोत्तर शौर्यादिगुण असतात पण जोपर्यंत त्यांस दुसऱ्यांकडून अत्यंत त्रास पोंचला नाही किंवा प्रोत्साहन मिळाले नाही तोपर्यंत ते व्यक्त होत नाहीत।)


६ अग्नौ प्रास्तं तु पुरुषं कर्मान्वेति स्वयं कृतम् ।

तस्मात्तु पुरुषो यत्नाद्धर्मं सञ्चिनुयाच्छनैः ॥ ५.४०.१८

(मरणोत्तर) अग्नीत टाकून दिलेल्या मनुष्याबरोबर त्याने केलेले (बरे वाईट) कर्म तेवढे येत असते. यासाठीच मनुष्याने हळूहळू पण यत्नपूर्वक धर्माचा (पुण्याचा) संचय केला पाहिजे.


७ अग्न्याधानेन यज्ञेन काषायेण जटाजिनैः ।

लोकान्विश्वासयित्वैव ततो लुम्पेद्यथा वृकः ॥ १.१४०.१९

अग्निहोत्र ठेवून, यज्ञ करून, भगवी वस्त्रे परिधान करून, जटा वाढवून, मृगाजिन पांघरून, आधी लोकांचा विश्वास संपादन करावा; आणि मग लांडग्याप्रमाणे झडप घालून त्यांचा नाश करावा.


८ अङ्कुशं शौचमित्याहुरथानामुपधारणे ।

आनाम्य फलितां शाखां पक्वं पक्वं प्रशातयेत् ॥ १.१४०.२०

फळांनी भरेलली झाडाची फांदी (आकडीनें) वाकवून तिच्यावरील पिकलेली उत्तम फळे तोडून घ्यावी, त्याप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त करून घेण्याच्या कामी धर्माच्या बाह्य अवडंबराचा अंकुशासारखा उपयोग होतो.


९ अचिन्त्याः खलु ये भावा न तांस्तर्केण साधयेत् ।

प्रकृतिभ्यः परं यत्तु तदचिन्त्यस्य लक्षणम् ॥ ६.५.१२

मनाला अचिंत्य असलेल्या अशा ज्या गोष्टी त्यांचा निर्णय केवळ युक्तिवादाने होणे शक्य नाही. प्रकृतीच्या--म्हणजे पंचमहाभुते, मन, बुद्धि व अहंकार या मूलतत्त्वांच्या पलीकडे असलेल्या वस्तूला (आत्मतत्त्वाला) अचिंत्य असें म्हणतात.


१० अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।

नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ६.२८.४०

अज्ञ असून श्रद्धा न ठेवणारा असा संशयखोर मनुष्य सर्वथा नाश पावतो, अशा संशयात्म्याला ना इहलोक, ना परलोक, ना सुख.


११ अज्ञानतिमिरान्धस्य लोकस्य तु विचेष्टतः ।

ज्ञानाञ्जनशलाकाभिर्नेत्रोन्मीलनकारकम् ॥ १.१.८४

अज्ञानांधकाराने डोळ्यांवर झांपड येऊन धडपडणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत ज्ञानरूपी अंजन घालून त्यांना दिव्य दृष्टि देणारे (असे हे महाभारत आहे.)


१२ अज्ञानेनावृतो लोकः ॥ ३.३१३.८२

लोक अज्ञानांत गुरफटलेले आहेत.


१३ अञ्जलिः शपथः सान्त्वं शिरसा पादवन्दनम् ।

आशाकरणमित्येवं कर्तव्यं भूतिमिच्छता ॥ १.१४०.६७

हात जोडणे, शपथ घेणें, मधुर भाषण करणे, पायांवर डोके ठेवणे, लालूच दाखविणे या सर्व गोष्टी उत्कर्षेच्छु पुरुषाने केल्या पाहिजेत.


१४ अतिक्रान्तं हि यत्कार्यं पश्चाच्चिन्तयते नरः ।

तच्चास्य न भवेत्कार्यं चिन्तया च विनश्यति ॥ ८.३१.२९ गोष्ट होऊन गेल्यानन्तर तिच्याविषयों जो मागाहून चिन्ता करीत बसतो त्याचे ते कार्य तर होत नाहीञ्च, पण चिन्तेनें नाश मात्र होतो.


१५ अति धर्माद्बलं मन्ये बलाद्धर्मः प्रवर्तते ।

बले प्रतिष्ठितो धर्मो धरण्यामिव जङ्गमम् ॥ १२.१३४.६

बल हे धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण, बलापासूनच धर्माची प्रवृत्ति होते. सर्व जंगम पदार्थ ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आधाराने राहतात, त्याप्रमाणे बलाच्या आधारानेच धर्म राहतो.


१६ अतियोगमयोगं च श्रेयसोऽर्थी परित्यजेत् ॥ १२.२८७.२४

कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने (आहारविहारादिकांचें) अतिशय सेवन करणे व मुळीच सेवन न करणे या दोहोंचाहि सर्वथा त्याग करावा.


१७ अतीतेष्वनपेक्षा ये प्राप्तेष्वर्थेषु निर्ममाः ।

शौचमेव परं तेषां येषां नोत्पद्यते स्पृहा ॥ १३.१०८.१०

द्रव्य नष्ट झाले असता जे शोक करीत नाहीत, व प्राप्त झाले असता त्याच्या ठिकाणी जे आसक्त होत नाहीत, आणि ज्यांच्या अंतःकरणांत लोभ उत्पन्नच होत नाहीं ते अत्यंत शुचिर्भूतच होत.


१८ अतो हास्यतरं लोके किञ्चिदन्यन्न विद्यते ।

यत्र दुर्जनमित्याहु दुर्जनः सज्जनं स्वयम् ॥ १.७४.९५

स्वतः दुर्जन असलेल्याने उलट सज्जनालाच दुर्जन म्हणावें, यापेक्षा जगांत अधिक हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणतीच नसेल !


१९ अथवा जायमानस्य यच्छीलमनुजायते ।

श्रूयते तन्महाराज नामृतस्यापसर्पति ॥ ३.८.११

(व्यास महर्षि धृतराष्ट्र राजाला म्हणतात) हे राजा, प्राणी जन्मतःच जो स्वभाव बरोबर घेऊन येतो, तो मरेपर्यंत त्याला सोडून जात नाही असें ऐकण्यात येते.


२० अथवा वसतो राजन्वने वन्येन जीवतः ।

द्रव्येषु यस्य ममता मृत्योरास्ये स वर्तते ॥ १२.१३.१०

(सहदेव धर्मराजाला म्हणतो) हे राजा, वनांत राहून कंदमूळांवर उपजीविका करीत असतांनाहि ऐहिक वस्तूंविषयीं ज्याला ममत्वबुद्धि वाटते, तो खरोखर मृत्यूच्या जबड्यांत पडला आहे असे समजावें.


२१ अदत्तस्यानुपादानं दानमध्ययनं तपः ।

अहिंसा सत्यमक्रोध इज्या धर्मस्य लक्षणम् ॥ १२.३६.१०

कोणी देईल तेवढ्याचाच स्वीकार करणें, दान, अध्ययन, तप, अहिंसा, सत्य भाषण, क्रोध नसणे आणि यज्ञ करणे ही धर्माची लक्षणे होत.


२२ अद्रोहसमयं कृत्वा चिच्छेद नमुचेः शिरः ।

शक्रः, साभिमता तस्य रिपौ वृत्तिः सनातनी ॥ २.५५.१३

(दुर्योधन शकुनीला म्हणाला।) मी तुझ्याशी द्रोह करणार नाही' अशी प्रतिज्ञा करून इंद्राने नमुचि दैत्याचा शिरच्छेद केला. शत्रशी वागण्याची ही त्याची रीति पूर्वापार चालत आलेली असून सर्वसंमत आहे.


२३ अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा ।

अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते ॥ १२.१२४.६६

कृतीने, मनाने व वाणीने कोणत्याहि प्राण्यास त्रास न देणे, परोपकार करणे आणि दान करणे या प्रकाराचे शील प्रशस्त होय.


२४ अद्रोहेणैव भूतानामल्पद्रोहेण वा पुनः ।

या वृत्तिः स परोधर्मस्तेन जीवामि जाजले ॥ १२.२६२.६

(तुलाधार वैश्य जाजलि ब्राह्मणाला म्हणतो.) हे जाजले, कोणत्याहि प्राण्यास मुळीच उपद्रव न देता, अथवा (प्रसंगच पडल्यास) अगदी थोडी पीडा देऊन आपला निर्वाह करणे हा श्रेष्ठ प्रकारचा धर्म होय, त्याचेच अवलंबन करून मी रहात असतो.


२५ अधनं दुर्बलं प्राहुर्धनेन बलवान्भवेत् ।

सर्वं धनवता प्राप्यं सर्वं तरति कोशवान् ॥ १२.१३०.४९

निर्धनाला दुबळा समजतात, धनाने मनुष्य बलसंपन्न होतो, सर्व काही धनसंपन्न असलेल्याला प्राप्त करून घेता येते. द्रव्याचा खजिना ज्याच्यापाशी आहे तो सर्व (आपत्ति) तरून जातो.


२६ अधनस्य मृतं श्रेयः ॥ ६.९६.६

निर्धन मनुष्याला मरण श्रेयस्कर !


२७ अधनाद्धि निवर्तन्ते ज्ञातयः सुहृदो द्विजाः ।

अपुष्पादफलाद्वृक्षाद्यथा कृष्ण पतत्त्रिणः ॥ ५.७२.२०

ज्याप्रमाणे पक्षी पुष्परहित व फलरहित वृक्षांचा त्याग करतात त्याप्रमाणे दरिद्री मनुष्याचे नातलग व इष्टमित्र त्याला सोडून जातात.


२८ अधनेनार्थकामेन नार्थः शक्यो विधित्सितुम् ।

अर्थैरर्था निबध्यन्ते गजैरिव महागजाः ॥ १२.८.२०

धनाची इच्छा करणाऱ्याला, आरंभी थोडेतरी धन जवळ असल्याशिवाय, धन मिळणे शक्य नाही, हत्ती पकडण्यास जशी हत्तीचीच योजना करावी लागते, तसें द्रव्यानेच द्रव्य मिळवावे लागते.


२९ अधर्मः क्षत्रियस्यैष यच्छय्यामरणं भवेत् ॥ १२.९७.२३

अंथरुणावर पडून मरणे हा क्षत्रियाचा धर्म नव्हे.


३० अधर्मरूपो धर्मो हि कश्चिदस्ति नराधिप ।

धर्मश्चाधर्मरूपोऽस्ति तच्च ज्ञेयं विपश्चिता ॥ १२.३३.३२

(व्यास महर्षि युधिष्ठिराला सांगतात।) हे राजा, केव्हा केव्हां धर्माला अधर्माचे रूप येते, व अधर्माला धर्माचे स्वरूप येत असते. हे समजून घेणे शहाण्या पुरुषाचे काम आहे.


३१ अधर्मो धर्मतां याति स्वामी चेद्धार्मिको भवेत् ।

स्वामिनो गुणदोषाभ्यां भृत्याः स्युर्नात्र संशयः ॥ ११.८.३३

मालक जर धर्मनिष्ठ असला व सेवक अधार्मिक असला तरीसुद्धा धार्मिक बनतो. धन्याच्या आंगच्या गुणदोषांप्रमाणे चाकरांच्या ठिकाणी गुणदोष उत्पन्न होतात यांत संशय नाही.


३२ अध्रुवा सर्वमर्त्येषु श्रीरुपालक्ष्यते भृशम् ॥ ९.६५.२०

सर्व मनुष्यांचे ऐश्वर्य पूर्ण अशाश्वत आहे असे दिसून येते.


३३ अनन्तं बत मे वित्तं यस्य मे नास्ति किञ्चन ।

मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किञ्चन ॥ १२.१७.१९

(जनकराजा म्हणतो.) खरोखर माझें ऐश्वर्य अनंत (अविनाशि) आहे: कारण माझी कशावरहि ममता नाही. साऱ्या मिथिला नगरीला आग लागली तरी त्यांत माझें असें कांहीहि दग्ध व्हावयाचें नाही.


३४ अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ६.३३.२२

(भगवान् श्रीकृष्ण सांगतात) जे लोक अनन्यनिष्ठेने माझे चिंतन करून मला भजतात, अशा नित्य माझी भक्ति करणाऱ्या लोकांचा योगक्षेम मी चालवीत असतो.


३५ अनर्हते यद्ददाति न ददाति यदर्हते ।

अर्हानर्हापरिज्ञानाद्दानधर्मोऽपि दुष्करः ॥ १२.२०.९

दानाला पात्र कोण व अपात्र कोण हे न समजल्याने कोणी अपात्री दान करतो आणि सत्पात्री करीत नाही. तस्मात् दानरूप धर्म सुद्धा मोठा कठीण आहे.


३६ अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः ।

द्वावेव सुखमेधते दीर्घसूत्री विनश्यति ॥ १२.१३७.११

पुढे येणाऱ्या संकटाची आधी तरतूद करून ठेवणारा, व प्रसंग पडतांच ताबडतोब ज्याला युक्ति सुचते तो, अशा दोन प्रकारच्या मनुष्यांनाच सुखाचा लाभ होत असतो. दीर्घसूत्री सर्वथा नाश पावतो.


३७ अनायुष्यं दिवा स्वप्नं तथाभ्युदितशायिता ॥ १३.१०४.१३९

दिवसा झोप घेणे आणि सूर्योदयाचेवेळी निजणे ही आयुष्याची हानि करणारी आहेत.


३८ अनारम्भात्तु कार्याणां नार्थः सम्पद्यते क्वचित् ॥ १०.२.३४

केव्हांहि कार्याला आरंभ केल्याशिवाय कोणतीहि गोष्ट साध्य होत नसते.


३९ अनार्याचरितं तात परस्वस्पृहणं भृशम् ॥ २.५४.६

(धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणतो।) बाबा, परद्रव्याचा अभिलाष धरणे हे केव्हांहि आर्य मनुष्याचे ब्रीद नव्हे.


४० अनाहूतः प्रविशति अपृष्टो बहु भाषते ।

अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः ॥ ५.३३.३६

मूर्ख मनुष्य कोणी न बोलावितांच प्रवेश करतो, विचारल्यावांचून बडबडत सुटतो, आणि विश्वासास पात्र नसलेल्यावर विश्वास ठेवतो.


४१ अनित्यं यौवनं रूपं जीवितं द्रव्यसञ्चयः ।

आरोग्यं प्रियसंवासो गृध्येत्तत्र न पण्डितः ॥ १२.३३०.१४

तारुण्य, रूप, जीवित, द्रव्यसंचय, आरोग्य व प्रियजनांचा सहवास ही सर्व अशाश्वत आहेत. शहाण्या पुरुषाने त्यांचा लोभ धरूं नये.


४२ अनित्यचित्तः पुरुषस्तस्मिन्को जातु विश्वसेत् ॥


तस्मात्प्रधानं यत्कार्यं प्रत्यक्षं तत्समाचरेत् ॥ १२.८०.९

मनुष्याचे मन फार चंचल आहे. त्याच्यावर कोण विश्वास ठेवील ? (कोणाची युद्धि केव्हां कशी पालटेल याचा काय नेम ?) यासाठी, जे काम महत्त्वाचे असेल ते स्वतःच करावें.


४३ अनिर्वेदः श्रियो मूलं लाभस्य च शुभस्य च ॥ ५.३९.५९

लक्ष्मीचें, लाभाचे आणि कल्याणाचें मूळ सतत उद्योग करणे हे आहे.


४४ अनिर्वेदेन दीर्घेण निश्चयेन ध्रुवेण च ।

देवदेवप्रसादाच्च क्षिप्रं फलमवाप्यते ॥ १२.१५३.११७

दीर्घोद्योगानें, दृढनिश्चयाने व ईश्वरी कृपेने सत्वर कार्यसिद्धि होते.


४५ अनिष्टं सर्वभूतानां मरणं नाम भारत ।

मृत्युकाले हि भूतानां सद्यो जायति वेपथुः ॥ १३.११६.२७

(भीष्म धर्मराजाला सांगतात।) खरोखर कोणत्याहि प्राण्याला मरण नकोसे वाटते. मृत्युकाल जवळ आला की सर्वांना कापरे भरतें !


४६ अनीशश्चावमानी च स शीघ्रं भ्रश्यते श्रियः ॥ १०.२.२५

हातात सत्ता नसतांना जो दुसऱ्याचा उपमर्द करतो तो ऐश्वर्यापासून लवकरच भ्रष्ट होतो.


४७ अनुकम्प्यो नरः पत्न्या पुष्टो रक्षित एव च ।

प्रपतेद्यशसो दीप्तात्स च लोकान्न चाप्नुयात् ॥ १४.९०.४७

बायकोच्या जिवावर पोसलेल्या व जगलेल्या पुरुषाची कीवच केली पाहिजे ! असा पुरुष उज्ज्वल कीपिआसून च्युत होतो, व स्वर्गलोकहि गमावून बसतो.


४८ अनुक्त्वा विक्रमेद्यस्तु तद्वै सत्पुरुषव्रतम् ॥ ७.१५८.१९

न बोलतां पराक्रम करून दाखविणे हेच सत्पुरुषाचे व्रत होय.


४९ अनुग्रहं च मित्राणाममित्राणां च निग्रहम् ।

सङ्ग्रहं च त्रिवर्गस्य श्रेय आहुर्मनीषिणः ॥ १२.२८७.१६

मित्रावर उपकार करणे, शत्रूचा पाडाव करणे आणि (धर्म, अर्थ व काम या) तीनहि पुरुषार्थांची प्राप्ति करून घेणे हे श्रेयस्कर आहे असें ज्ञाते लोक सांगतात.


५० अनृतं जीवितस्यार्थे वदन्न स्पृश्यतेऽनृतैः ॥ ७.१९०.४७

जीव वाचविण्याकरिता असत्य भाषण करणाराला असत्य भाषण केल्याचा दोष लागत नाही.


५१ अन्त्येषु रेमिरे धीरा न ते मध्येषु रोमिरे ।

अन्त्यमाप्तिं सुखामाहुर्दुःखमन्तरमन्त्ययोः ॥ १२.१७४.३४

ज्ञाते लोक कोणती तरी एक तड पतकरतात, मधल्या स्थितीत आनंद मानीत नाहीत. कारण कोणती तरी शेवटची स्थिति ही सुखकारक आहे, आणि मधली स्थिति ही दुःखदायक आहे.


५२ अन्नपानानि जीर्यन्ते यत्र भक्षाश्च भक्षिताः ।

तस्मिन्नेवोदरे गर्भः किं नान्नामिव जीर्यते ॥ १२.३३१.२४

अन्नपान व भक्षण केलेले इतर पदार्थ ज्या उदरांत जिरतात त्याच उदरांत असलेला गर्भ अन्नादिकांप्रमाणे कसा जिरून जात नाही?


५३ अन्यत्र राजन्हिंसाया वृत्तिर्नेहास्ति कस्यचित् ।

अप्यरण्यसमुत्थस्य एकस्य चरतो मुनेः ॥ १२.१३०.२८

(भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे राजा, दुसऱ्याला मुळीच पीडा न देता जगांत कोणाचीही जीवितयात्रा चालू शकत नाही. मग तो अरण्यात जन्मलेला व एकटाच राहणारा एकादा मुनि का असेना ?


५४ अन्यथा चिन्तितो ह्यर्थः पुनर्भवति सोऽन्यथा ।

अनित्यमतयो लोके नराः पुरुषसत्तम ॥ ५.८०.६

(नकुल श्रीकृष्णाला म्हणतो) हे पुरुषोत्तमा, मनुष्याने एका प्रकाराने केलेला बेत पुनः फिरलेला दिसतो. (याचे कारण) जगांत माणसांची बुद्धि नेहमीं पालटत असते.


५५ अन्यया यौवने मर्त्यो बुद्धया भवति मोहितः ।

मध्येऽन्यया जरायां तु सोऽन्यां रोचयते मतिम् ॥ १०.३.११

मनुष्याला तरुणपणी एका विचाराची भरळ पडते; प्रौढ वयांत दुसरीच एकादी गोष्ट बरी वाटते; व म्हातारपणी तिसराच एखादा विचार आवडू लागतो.


५६ अन्यान्परिवदन्साधुर्यथा हि परितप्यते ।

तथा परिवदन्नन्यांस्तुष्टो भवति दुर्जनः ॥ १.७४.९२

दुसऱ्याची निंदा करण्यांत सज्जनाला जितका खेद वाटतो, तितकाच दुर्जनाला परनिंदा करण्यांत संतोष वाटतो.


५७ अन्यो धनं प्रेतगतस्य भुङ्क्ते

     वयांसि चाग्निश्च शरीरधातून् ।

द्वाभ्यामयं सह गच्छत्यमुत्र

     पुण्येन पापेन च वेष्टयमानः ॥ ५.४०.१६

कुडी सोडून गेलेल्या जीवाचें धन दुसरा कोणी भोगतो, (रक्त-मांसादि) देहस्थ धातु पक्षी व अग्नि यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. फक्त दोन गोष्टी बरोबर घेऊन जीव परलोकी जातो. त्या म्हणजे त्याने इहलोकी केलेले पुण्य व पाप.


५८ अन्यो धर्मःसमर्थानामापत्स्वन्यश्च भारत ॥ १२.१३०.१४

(भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे भारता, सामर्थ्य असतां आचरण्याचा धर्म निराळा आणि संकटप्रसंगाचा धर्म निराळा.


५९ अन्योन्यसमुपष्टम्भादन्योन्यापाश्रयेण च ।

ज्ञातयः सम्प्रवर्धन्ते सरसीवोत्पलान्युत ॥ ५.३६.३६

तळ्यांत वाढणाऱ्या कमलांप्रमाणे, परस्परांस साहाय्य करून व परस्परांचा आश्रय घेऊन ज्ञातींचा उत्कर्ष होत असतो.


६० अन्यो हि नाश्नाति कृतं हि कर्म

     मनुष्यलोके मनुजस्य कश्चित् ।

यत्तेन किंचिद्धि कृतं हि कर्म

     तदश्नुते नास्ति कृतस्य नाशः ॥ ३.२०७.२७

मृत्युलोकी एका मनुष्याने केलेल्या कर्माचे फळ दुसरा कोणीहि भोगीत नाही. त्याने जे काही केले असेल त्याचे फळ त्याला भोगावेच लागते. केलेल्याचा नाश केव्हांहि होत नाही.


६१ अपि च ज्ञानसम्पन्नः सर्वान्वेदान्पितुगृहे ।

श्लाघमान इवाधीयाद्ग्राम्य इत्येव तं विदुः ॥ १३.३६.१५

बापाच्या घरी राहून मोठ्या ऐटीत सर्व वेदांचा अभ्यास करून जरी कोणी. ज्ञानसंपन्न झाला तरी लोक त्याला खेडवळच म्हणणार.


६२ अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।

साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ६.३३.३०

(श्रीकृष्ण सांगतात) अत्यंत दुराचारी असलेला मनष्यहि जर अनन्यभावाने मला भजेल तर तो साधुच समजावा. कारण (तो मला भजू लागला म्हणजे) त्याचा निश्चय चांगला झाला. (तो चांगल्या मार्गाला लागला।)


६३ अपिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।

सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ६.२८.३६

(श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना,) सर्व पापी लोकांहून तूं जरी अधिक पापी असलास तरी ज्ञानरूप नौकेच्या योगानेच तूं सर्व पापसमुद्र तरून जाशील.


६४ अपि पापकृतो रौद्राः सत्यं कृत्वा पृथक्पृथक् ।

अद्रोहमविसंवादं प्रवर्तन्ते तदाश्रयाः ॥ १२.२५९.११

पाप करणारी आणि भयंकर अशी जरी मनुष्ये असली, तरी ती सुद्धां परस्परांशी सत्याने वागण्याची शपथ घेऊन त्या सत्याच्या आधाराने, परस्परांशी विश्वासघात व फसवणूक न करितां वागतात.


६५ अपि शाकं पचानस्य सुखं वै मघवन्गृहे ।

अर्जितं स्वेन वीर्येण नाप्यपाश्रित्य कञ्चन ॥ ३.१९३.२९

(बकमुनि म्हणतात) हे इंद्रा, कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या हिंमतीने मिळविलेली मीठभाकर सुद्धा स्वतःच्या घरी खाण्यांत सुख आहे.


६६ अपि सर्वस्वमुत्सृज्य रक्षेदात्मानमात्मना ॥ १२.१३८.१७९

सर्वस्वाचा त्याग करून देखील आपण आपले रक्षण करावे.


६७ अप्युन्मत्तात्पलपतो बालाच्च परिजल्पतः ।

सर्वतः सारमादद्यादश्मभ्य इव काञ्चनम् ॥ ५.३४.३२

वेडाच्या लहरींत बरळणाऱ्या वेड्यापासून, तसेच बोबडे बोल बोलणाऱ्या बालकापासून, सर्वांपासून, दगडांतून सोनें निवडावे त्याप्रमाणे, चांगले तेवढे ग्रहण करावे.


६८ अप्रयत्नागताः सेव्या गृहस्थैर्विषयाः सदा ।

प्रयत्नेनोपगम्यश्च स्वधमे इति मे मतिः ॥ १२.२९५.३५

(पराशर मुनि जनकराजाला म्हणतात) मुद्दाम प्रयत्न न करितां प्रारब्धानुसार ओघाने प्राप्त होतील तेवढ्याच विषयांचे गृहस्थाश्रमी पुरुषाने सेवन करावें, आणि स्वधर्माचे आचरण प्रयत्नपूर्वक करावे असे माझे मत आहे.


६९ अप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् ।

लभते बुद्धयवज्ञानमवमानं च भारत ॥ ५.३९.२

(विदुर घृतराष्ट्राला म्हणतो) समयाला न शोभण्यासारखे भाषण करणारा बृहस्पति जरी असला तरी त्याच्या बुद्धीचा तिरस्कार होतो व तोहि अपमानालाच पात्र होतो.


७० अबलस्य कुतः कोशो ह्यकोशस्य कुतो बलम् ।

अबलस्य कुतो राज्यमराज्ञः श्रीर्भवेत्कुतः ॥ १२.१३३.४

दुर्बळाला द्रव्य कोठून मिळणार ? व ज्याच्यापाशी द्रव्य नाही त्याला सामर्थ्य कोठलें ? तसेच ज्याला सामर्थ्य नाही त्याचे राज्य कसें राहणार ? व राज्य नाहींसें झाले म्हणजे संपत्ति तरी कशी टिकणार ?


७१ अब्रुवन्कस्यचिन्निन्दामात्मपूजामवर्णयन् ।

न कश्चिद्गुणसम्पन्नः प्रकाशो भुवि दृश्यते ॥ ३.२०७.५०

कोणाचीहि निंदा न करतां व आत्मस्तुति न करता कोणताहि गुणसंपन्न पुरुष जगांत प्रसिद्धीस येत असल्याचे दृष्टीस पडत नाही.


७२ अभिमानकृतं कर्म नैतत्फलवदुच्यते ।

त्यागयुक्तं महाराज सर्वमेव महाफलम् ॥ १२.१२.१६

(नकुल युधिष्ठिराला म्हणाला) (मी कर्ता अशा) अभिमानाने केलेले कर्म सफल झाले असे म्हणता येत नाही. त्यागबुद्धीने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ फार मोठे मिळतें.


७३ अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः ।

चत्वारि सम्प्रवर्धन्ते कीर्तिरायुर्यशो बलम् ॥ ५.३९.७६

नेहमी वृद्धजनांना वंदन करून त्यांच्या समागमांत जो राहतो, त्याची कीर्ति, आयुष्य, यश व सामर्थ्य ही चार वृद्धिंगत होतात.


७४ अभिशस्तं प्रपश्यन्ति दरिद्रं पार्श्वतः स्थितम् ।

दारिद्रयं पातकं लोके न तच्छंसितुमर्हति ॥ १२.८.१४

दरिद्री मनुष्य जवळ उभा राहिला तर एकाद्या पातकी मनुष्याप्रमाणे लोक त्याजकडे पाहतात. या लोकामध्ये दारिद्य हे एक पातकच आहे ! म्हणूनच त्याची प्रशंसा करणे योग्य नाही.


७५ अभ्यावहति कल्याणं विविधं वाक्सुभाषिता ।

सैव दुर्भाषिता राजन्ननथार्योपपद्यते ॥ ५.३४.७७

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, वाणीने चांगले भाषण केले असता त्यापासून अनेक प्रकारे कल्याण होते, परंतु, दुर्भाषण केले असता तीच वाणी अनर्थाला कारण होते.


७६ अमर्षजो हि सन्तापः पावकाद्दीप्तिमत्तरः ॥ ३.३५.११

असहिष्णुतेमुळे होणारा संताप अग्नीपेक्षांहि अधिक प्रखर असतो.


७७ अमित्रमुपसेवेत विश्वस्तवदविश्वसन् ।

प्रियमेव वदेन्नित्यं नाप्रियं किञ्चिदाचरेत् ॥ १२.१०.३९

(बृहस्पति इंद्राला म्हणतात।) शत्रूवर विश्वास न ठेवतां विश्वास ठेवल्याचा बहाणा करून त्याच्या कलाने वागावे. त्याच्याशी सदा गोड बोलावें, व त्याला न रुचणारी कोणतीहि गोष्ट करूं नये.


७८ अमित्रो न विमोक्तव्यः कृपणं बह्वपि ब्रुवन् ।

कृपा न तस्मिन्कर्तव्या हन्यादेवापकारिणम् ॥ १.१४०.२२

शत्रु अगदी दीनवाणीने बोलू लागला तरी त्याला मोकळा सोडूं नये. त्याच्यावर दया न करता त्या अपकार करणाऱ्याला ठार मारावें.


७९ अमित्रो मित्रतां याति मित्रं चापि प्रदुष्यति ।

सामर्थ्य योगात्कार्याणामनित्या वै सदा गतिः ॥ १२.१३८.१३

कार्याच्या महत्त्वाच्या मानाने शत्रुहि मित्र होतात व मित्रहि शत्रु होतात. कारण, कोणतीहि स्थिति ही कायमची अशी नसतेच.


८० अमृतस्येव सन्तृप्येदवमानस्य तत्त्ववित् ।

विषस्येवोद्विजेनित्यं संमानस्य विचक्षणः ॥ १२.२२९.२१

तत्ववेत्त्या पुरुषाला अपमान झाला तर अमृतप्राप्ति झाल्याप्रमाणे संतोष वाटला पाहिजे. व शहाण्याने विषाप्रमाणे सन्मानाचा तिटकारा मानला पाहिजे.


८१ अयुध्यमानो म्रियते युध्यमानश्च जीवति ।

कालं प्राप्य महाराज न कश्चिदतिवर्तते ॥ ११.२.५

(भारतीय युद्धानंतर विदुर धृतराष्ट्राचे सांत्वन करतो) हे राजा, रणांत पाऊल न टाकणाराहि मरून जातो, आणि घनघोर रणकंदन करूनहि मनुष्य जिवंत राहूं शकतो. सारांश, काळ आल्यावर त्याचा प्रतिकार कोणालाहि करितां यावयाचा नाही.


८२ अरक्षितारं राजानं बलिषड्भागहारिणम् ।

तमाहुः सर्वलोकस्य समग्रं पापचारिणम् ॥ १.२१३.९

जो राजा प्रजेचे रक्षण न करितां प्रजेपासून उत्पन्नाचा सहावा भाग कर म्हणून घेतो तो (त्या कराच्या रूपानें) सर्व प्रजेचें पापच ग्रहण करतो असें म्हणतात.


८३ अरक्षितारं हर्तारं विलोप्तारमनायकम् ।

तं वै राजकलिं हन्युःप्रजाः संनह्य निर्घृणम् ॥ १३.६१.३२

प्रजेचे रक्षण न करितां तिजपासून जो कर घेतो, व प्रजेला सन्मार्गाला न लाविता जो लुबाडतो तो राजरूपी कली प्रजेने सज्ज होऊन निष्ठुरपणे ठार मारावा.


८४ अरण्ये विजने न्यस्तं परस्वं दृश्यते यदा ।

मनसापि न हिंसन्ति ते नराःस्वर्गगामिनः ॥ १३.१४४३३१

अरण्यांत एकीकडे पडलेले दुसऱ्याचे द्रव्य दृष्टीस पडले असतांही जे लोक मनानेसुद्धा त्याचा अभिलाष धरीत नाहीत ते स्वर्गाला जातात.


८५ अराजकेषु राष्ट्रेषु धर्मो न व्यवतिष्ठते ।

परस्परं च खादन्ति सर्वथा धिगराजकम् ॥ १२.६७.१३

राजा नसलेल्या राष्ट्रामध्ये धर्म रहात नाही. तसेंच लोक एकमेकांना फाडून खातात. अराजकतेला सर्वथा धिक्कार असो !


८६ अरिणापि समर्थेन सन्धिं कुर्वीत पण्डितः ।

मूषिकश्च बिडालश्च मुक्तावन्योन्यसंश्रयात् ॥ १२.१३८.२०३

सुज्ञ मनुष्याने शत्रु सामर्थ्यसंपन्न असल्यास त्याच्याशीहि संधि करावा. परस्परांचा आश्रय केल्यानेच मूषिक आणि मार्जार हे उभयतांहि संकटांतून मुक्त झाले.


८७ अर्थं महान्तमासाद्य विद्यामैश्वर्यमेव वा ।

विचरत्यसमुन्नद्धो यः स पण्डित उच्यते ॥ ५.३३.४०

विपुल संपत्ति, विद्या किंवा अधिकार प्राप्त झाला असता जो निरभिमान वृत्तीने वागतो त्याला पंडित म्हणावें.


८८ अर्थयुक्त्या हि जायन्ते पिता माता सुतस्तथा ।

मातुला भागिनेयाश्च तथा संबन्धिबान्धवाः ॥ १२.१३८.१४५

आई, बाप, मुलगा, मामे भाचे, तसेंच इतर संबंधी आणि बांधव हे सर्व द्रव्याच्याच संबंधाने परस्पर (प्रीतियुक्त) होत असतात.


८९ अर्थसिद्धिं परामिच्छन् धर्ममेवादितश्चरेत् ।

न हि धर्मादपैत्यर्थः स्वर्गलोकादिवामृतम् ॥ ५.३७.४८

पुष्कळ द्रव्य मिळावे अशी इच्छा करणाऱ्याने प्रथम धर्माचेंच आचरण करावे, कारण, स्वर्गलोकाला सोडून जसें अमृत जात नाही तसा अर्थ (द्रव्य) धर्माला सोडून रहात नाही.


९० अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित् ।

इति सत्यं महाराज बद्धोऽस्म्यर्थेन कौरवैः ॥ ६.४३.४१

('तुम्ही कौरवांचा पक्ष का सोडीत नाही ? 'या युधिष्ठिराच्या प्रश्नाला भीष्मद्रोणादिकांनी दिलेले उत्तर) पुरुष हा अर्थाचा दास आहे, अर्थ कोणाचाहि दास नाही. ह्यास्तव, खरोखर, हे राजा ! मी अर्थामुळे कौरवांशी बांधला गेलों आहे.


९१ अर्थागमो नित्यमरोगिता च

     प्रिया च भार्या प्रियवादिनी च ।

वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या

     षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ॥ ५.३३.८२

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, सदोदित द्रव्यप्राप्ति, निकोप प्रकृति, मधुर भाषण करणारी प्रेमळ स्त्री, आज्ञाधारक पुत्र व धनोत्पादक विद्या ही सहा मृत्युलोकांतील सुखें होत.


९२ अर्थाद्धर्मश्च कामश्च स्वर्गश्चैव नराधिप ।

प्राणयात्रापि लोकस्य विना ह्यर्थं न सिध्यति ॥ १२.८.१७

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) अर्थ (द्रव्य) असेल तर धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ति होते. फार काय, पण लोकांची जीवितयात्रा देखील अर्थावाचून चालणार नाही.


९३ अर्थानामीश्वरो यः स्यादिन्द्रियाणामनीश्वरः ।

इन्द्रियाणामनैश्वर्यादैश्वर्याद्भ्रश्यते हि सः ॥ ५.३४.६३

जो मनुष्य संपत्तीचा मालक असून इंद्रियांचा दास होऊन राहतो तो इंद्रियांवर ताबा नसल्यामुळे ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो.


९४ अर्थानारभते बालो नानुबन्धमवेक्षते ॥ २.१५.१४

अज्ञ मनुष्य निरनिराळ्या कामांना हात घालतो पण पुढील परिणामाकडे लक्ष्य देत नाही.


९५ अर्थी तु शक्यते भोक्तुं कृतकार्योऽवमन्यते ।

तस्मात्सर्वाणि कार्याणि सावशेषाणि कारयेत् ॥ १२.१४०.२०

कोणत्याहि मनुष्याला आपली गरज आहे तोवरच त्याचा उपयोग करून घेता येतो. एकदा त्याचे कार्य झाले म्हणजे तो आपली पर्वा करीत नाही. यास्तव कोणतेहि काम पूर्णपणे न करता त्यांतील अवशेष ठेवावा.


९६ अर्थेन हि विहीनस्य पुरुषस्याल्पमेधसः ।

विच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितो यथा ॥ १२.८.१८

ज्याप्रमाणे ग्रीष्मऋतूंत लहान लहान नद्यांना खांडवे पडतात, त्याप्रमाणे द्रव्यहीन अशा मंदबुद्धि पुरुषाच्या सर्व क्रिया छिन विच्छिन्न होऊन जातात.


९७ अर्थेभ्यो हि विवृद्धेभ्यः संभूतेभ्यस्ततस्ततः ।

क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः ॥ १२.८.१६

पर्वतांपासून नद्या उगम पावतात त्याप्रमाणे सर्व बाजूंनी द्रव्य संपादन करून त्याची वाढ झाली म्हणजे त्यापासून सर्व कार्ये सिद्ध होतात.


९८ अर्थे सर्वे समारम्भाः समायत्ता न संशयः ।

स च दण्डे समायत्तः पश्य दण्डस्य गौरवम् ॥ १२.१५.४८

(अर्जुन युधिष्ठराला म्हणतो) सर्व प्रकारचे उद्योग द्रव्यावर अवलंबून आहेत यांत संशय नाही. आणि ते द्रव्य दंडाच्या (नियामक शक्तीच्या) अधीन आहे. यावरून दंडाची थोरवी केवढी आहे पहा !


९९ अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा ।

भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः ॥ १.७४.४१

स्त्री से पुरुषाचे अधे आंगच होय. स्त्री हाच पुरुषाचा सर्वोत्तम मित्र होय. (धर्म, अर्थ व काम या) तीनहि पुरुषार्थाचें मूळ स्त्रीच आहे. संसार तरून जाण्याची इच्छा करणाऱ्याचे मुख्य साधन स्त्रीच.


१०० अलातं तिन्दुकस्येव मुहूर्तमपि हि ज्वल ।

मा तुषाग्निरिवानर्चिर्धूमायस्व जिजीविषुः ॥ ५.१३३.१४

(विदुला माता संजयास म्हणते) टेंभुरणीच्या लाकडाच्या कोलतीप्रमाणे थोडा वेळ का होईना, पण चमकून जा. केवळ जिवाची आशा धरून ज्वाला न निधणाऱ्या कोंड्याच्या अग्नीसारखा नुसता धुमसत राहूं नको.


१०१ अल्पोऽपि ह्यरिरत्यर्थं वर्धमानः पराक्रमैः ।

वल्मीको मूलज इव ग्रसते वृक्षमन्तिकात् ॥ २.५५.१७

शत्रु क्षुद्र असला तरी तो आपल्या पराक्रमाने प्रबल होत जाऊन, बुंध्याशी असलेले वारूळ जसें अखेर झाडाला खाऊन टाकते त्याप्रमाणे, आपल्या प्रतिपक्ष्याचा नाश करतो.


१०२ अवज्ञानं हि लोकेस्मिन्मरणादपि गर्हितम् ॥ ३.२८.१२

या जगांत मानखंडना होणे हे मरणापेक्षांहि दुःखदायक आहे.


१०३ अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुनः ।

नयन्ति ह्यपथं नार्यः कामक्रोधवशानुगम् ॥ १३.४८.३७

जगांत कोणी विद्वान असो किंवा अविद्वान् असो, तो कामक्रोधांच्या तडाक्यांत सांपडला की स्त्रिया त्याला कुमार्गाला नेतात.


१०४ अविश्वासो नरेन्द्राणां गुह्यं परममुच्यते ॥ १२.८५.३४

कोणाचाहि विश्वास न धरणे हे राजे लोकांचे एक मोठे रहस्य आहे.


१०५ अविसंवादनं दानं समयस्याव्यतिक्रमः ।

आवर्तयन्ति भूतानि सम्यक्प्रणिहिता च वाक् ॥ ५.३८.३६

सरळ बुद्धीने दिलेलें दान, वचनाचे परिपालन आणि नीट विचार करून केलेले भाषण यांच्या योगाने सर्व लोक आपलेसे करून घेता येतात.


१०६ अवृत्तिर्भयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम् ।

उत्तमानां तु मानामवमानात्परं भयम् ॥ ५.३४.५२

निकृष्ट स्थितीतील लोकांना उपासमारीचे भय वाटते, मध्यम लोकांना मरणाचे भय वाटते. परंतु उत्तम कोटीतील मनुष्यांना अपमानाचे फार भय वाटते.


१०७ अवेक्षस्व यथा स्वैः स्वैः कर्मभिर्व्यापृतं जगत् ।

तस्मात्कर्मव कर्तव्यं नास्ति सिद्धिरकर्मणः ॥ १२.१०.२८

(भीम युधिष्ठिराला म्हणतो) असे पहा की, जगांतील सर्व प्राणी आपापली कर्मे करण्यांत गुंतलेले आहेत तस्मात्, कर्मच केले पाहिजे. कर्मावांचून सिद्धि नाही.


१०८ अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु ।

रक्षणं समुपात्तानामेतद्वैभवलक्षणम् ॥ २.१५.४७

दुसऱ्याच्या कामांत ढवळाढवळ न करणे, आपल्या कामांत सदा गर्क असणे आणि संपादन केलेल्या द्रव्याचे रक्षण करणे ही वैभवाची साधनें होत.


१०९ अशङ्कितेभ्यः शङ्केत शङ्कितेभ्यश्च सर्वशः ।

अशङ्कयाद्भयमुत्पन्नमपि मूलं निकृन्तति ॥ १.१४०.६१

संशयास्पद मनुष्यांवर मुळीच विश्वास ठेवू नये. इतकेच नव्हे ज्याच्याविषयी कोणाला शंका वाटत नाही अशाचा देखील विश्वास धरूं नये. कारण विश्वासू मनुष्याकडून काही संकट उत्पन्न झाले तर तें समूळ नाश करते.


११० अशाश्वतमिदं सर्वं चिन्त्यमानं नरर्षभ ।

कदलीसंनिभो लोकः सारो ह्यस्य न विद्यते ॥ ११.३.४

खरोखर विचार केला असता हे सर्व जग अशाश्वत आहे. याची स्थिति केळीसारखी आहे. यांत सार म्हणून काहीच नाही.


१११ अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः ॥ ५.४०.४

दुर्लक्ष्य, त्वरा व स्तुति हे तीन विद्येचे शत्रु होत.


११२ अशोचन्मतिकुर्वीत यदि पश्येत्पराक्रमम् ।

भैषज्यमेतद्दुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ॥ ११.२.२७

पराक्रम करता येईल असें दिसेल तर शोक न करतां प्रतिकार करावा, दुःखावर औषध हेच की, त्याचे एकसारखें चिंतन करीत बसू नये.


११३ अश्नाम्याच्छादयामीति प्रपश्यन्पापपूरुषः ।

नामर्षं कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः ॥ २.५०.१७

अन्न आणि आच्छादन आपल्याला मिळत आहे एवढ्यावरच नजर देऊन स्वस्थ राहणारा व शत्रूच्या उत्कर्षाविषयीं असहिष्णुता नसणारा पुरुष अधम पापी, असे म्हटले आहे.


११४ अश्रद्धा परमं पापं श्रद्धा पापप्रमोचनी ।

जहाति पापं श्रद्धावान्सर्पो जीर्णामिव त्वचम् ॥ १२.२६४.१५

अश्रद्धा हे मोठे पाप आहे. श्रद्धा ही पापापासून मुक्त करणारी आहे. जसा सर्प जीर्ण झालेली कात टाकून देतो तसा श्रद्धावान् मनुष्य पातकाचा त्याग करतो.


११५ अश्रुतश्च समुन्नद्धो दरिद्रश्च महामनाः ।

अर्थाश्चाकर्मणा प्रेप्सुर्मूढ इत्युच्यते बुधैः ॥ ५.३३.३०

अध्ययन नसतांनाहि गर्विष्ठ, दरिद्री असून मोठमोठ्या खर्चाच्या गोष्टी मनामध्ये आणणारा आणि उद्योग न करितां द्रव्यप्राप्तीची इच्छा करणारा अशाला शहाणे लोक मूढ म्हणतात.


११६ अश्वमेधसहस्रं च सत्यं च तुलया धृतम् ।

अश्वमेधसहस्रादि सत्यमेव विशिष्यते ॥ १२.१६२.२६

सहस्त्र अश्वमेध आणि सत्य ही तराजूत घातली तेव्हां सहस्र अश्वमेधांपेक्षां सत्यच अधिक भरले.


११७ अष्टादश पुराणानि धर्मशास्त्राणि सर्वशः ।

वेदाः साङ्गास्तथैकत्र भारतं चैकतः स्थितम् ॥ १८.५.४६

अठरा पुराणे, सर्व धर्मशास्त्रे (स्मृति) आणि सांग वेद एका बाजूला व एकटें भारत एका बाजूला (एवढी भारताची योग्यता आहे.)


११८ असंशयं दैवपरः क्षिप्रमेव विनश्यति ॥ १२.१०५.२२

दैववादी मनुष्य सत्वर सर्वथा नाश पावतो यांत संशय नाही.


११९ असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।

अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ६३०३५

(भगवान् श्रीकृष्ण म्हणतात) हे महाबाहो अर्जुना, खरोखरच मन हे चंचल असून त्याचा निग्रह करणे अति कठीण आहे. तरीपण अभ्यासाने व वैराग्याने ते ताब्यात आणता येते.


१२० असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ ६.२७.१९

आसक्ति न ठेवता कर्म करणारा मनुष्य परमपद खचित प्राप्त करून घेतो.


१२१ असतां प्रतिषेधश्च सतां च परिपालनम् ।

एष राज्ञां परो धर्मः समरे चापलायनम् ॥ १२.१४.१६

दुष्टांचे निवारण करणे, सज्जनांचे परिपालन करणे आणि युद्धात शत्रूला पाठ न दाखविणे हा क्षत्रियांचा श्रेष्ठ धर्म होय.


१२२ असतां शीलमेतद्वै परिवादोऽथ पैशुनम् ॥ १२.१३२.१३

दुसऱ्यांची निंदा करणे, आणि चुगल्या करणे हा दुर्जनांचा स्वभावच आहे.


१२३ असदुच्चैरपि प्रोक्तः शब्दः समुपशाम्यति ।

दीप्यते त्वेव लोकेषु शनैरपि सुभाषितम् ॥ १२.२८७.३२

अयोग्य भाषण मोठ्या जोराने केले तरी त्याचे तेज पडत नाही आणि योग्य भाषण हळू केलें तरी लोकांत त्याचें तेज पडतेच.


१२४ असन्तोषः श्रियो मूलम् ॥ २.५५.११

असंतोष हे उत्कर्षाचे मूळ आहे.


१२५ असंत्यागात्पापकृतामपापां-

स्तुल्यो दण्डः स्पृशते मिश्रभावात् ।

शुष्केणार्द्रं दह्यते मिश्रभावात्

तस्मात्पापैः सह सन्धि न कुर्यात् ॥ ५.३४.७०

पापी लोकांचा त्याग केला नाही, तर त्यांच्याशी मिसळल्यामुळे निदोषी माणसांनाहि त्यांच्या बरोबरीने दंड सोसावा लागतो. सुक्याबरोबर मिसळल्याने ओलेहि जळून जाते. यास्तव, पापी लोकांशी संबंध ठेवू नये.


१२३ असभ्याः सभ्यसङ्काशाः सभ्याश्चासभ्यदर्शनाः ।

दृश्यन्ते विविधाभावास्तेषु युक्तं परीक्षणम् ॥ १२.१११.६५

पुष्कळ असभ्य मनुष्यें सभ्य असल्यासारखी दिसतात व सभ्य असलेली असभ्य दिसतात. नानाप्रकारच्या वस्तु दिसतात. (त्या तशाच असतात असे नाही) यास्तव, त्यांची नीट परीक्षा करणे युक्त आहे.


१२७ असंभवे हेममयस्य जन्तो-

स्तथापि रामो लुलुभे मृगाय ।

प्रायः समासन्नपराभवाणां

धियो विपर्यस्ततरा भवन्ति ॥ २.७६.५

सोन्याचा मृग असणे संभवत नाही, असे असतांहि श्रीरामचंद्राला सुवर्णमृगाचा मोह पडला (यावरून असे दिसते की) बहुतकरून विनाशकाल जवळ आला की, माणसांच्या बुद्धीला भ्रम होतो.


१२८ असम्यगुपयुक्तं हि ज्ञानं सुकुशलैरपि ।

उपलभ्यं चाविदितं विदितं चाननुष्ठितम् ॥ ५.३९.३४

जे समजून घेणे अवश्य आहे तें जर समजून न घेतले अथवा समजल्यावरहि त्याप्रमाणे वर्तन न केले तर अतिनिपुण पुरुषांनाहि केलेला ज्ञानाचा उपदेश व्यर्थ जाणार.


१२९ असाधुभ्योऽर्थमादाय साधुभ्यो यः प्रयच्छति ।

आत्मानं सङ्क्रमं कृत्वा कृच्छ्रधर्मविदेव सः ॥ १२.१३२.४

जो राजा (आपन्न स्थितीत असलेल्या लोकांना) तरून जाण्याचा एक प्रकारचा सेतुच बनून, दुष्ट लोकांपासून द्रव्य काढून घेऊन ते सुष्ट लोकांना देतो, तोच आपद्धर्म जाणणारा होय.


१३० असुहृत्ससुहृच्चापि सशत्रुर्मित्रवानपि ।

सप्रज्ञः प्रज्ञया हीनो देवेन लभते सुखम् ॥ १२.१७४.२८

स्नेही असोत वा नसोत, मित्र असोत वा शत्रु असोत, बुद्धिहि असो अथवा नसो, तथापि मनुष्यास दैवयोगाने सुखप्राप्ति होते.


१३१ असूयैकपदं मृत्युरतिवादः श्रियो वधः ॥ ५.४०.४

एकटा मत्सर मृत्यूला कारण होतो. मर्यादा सोडून भाषण करणे हे लक्ष्मीच्या नाशाला कारण होते.


१३२ अस्मिन्महामोहमये कटाहे सूर्याग्निना रात्रिदिवेन्धनेन ।

मासर्तुदर्वीपरिघट्टनेन भूतानि कालः पचतीति वार्ता ॥ ३.३१३.११८

असें म्हणतात की मोहरूप प्रचंड कढईत दिवसरात्ररूपी सर्पणाने सूर्यरूपी अग्नीवर, मास-ऋतु-रूप पळीने ढवळीत ढवळीत, काल हा सर्व प्राण्यांना शिजवीत आहे.


१३३ अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः ।

स संहत्य निहन्तव्यः श्वेव सोन्माद आतुरः ॥ १३.६१.३३

'मी तुमचे रक्षण करीन' असे म्हणून जो राजा त्याप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत नाही त्याला, सर्वांनी एक होऊन, पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे, ठार करावे,


१३४ अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् ।

शेषाःस्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् ॥ ३.३१३.११६

रोजच्यारोज मृत्युलोकांतील प्राणी यमसदनास जात असूनहि बाकीचे लोक चिरंजीव आहों असें समजतात, यापरतें आश्चर्य ते कोणते ?


१३५ अहिंसा परमो धर्मः ॥ ३.२०७.७४

अहिंसा हा परमश्रेष्ठ धर्म होय.


१३६ अहिंसायां तु निरता यतयो द्विजसत्तम ।

कुर्वन्त्येव हि हिंसां ते यत्नादल्पतरा भवेत् ॥ ३.२०८.३४

(धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणाला) अहिंसेकरितां झटणाऱ्या यतींच्या हातून देखील हिंसा घडतेच; मात्र ती टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे फार थोडी घडते.


१३७ अहिंसार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।

यःस्यादहिंसासंयुक्तःस धर्म इति निश्चयः ॥ १२.१०९.१२

प्राण्यांना पीडा होऊ नये एवढ्यासाठीच धर्म सांगितला आहे. जो अहिसेनें युक्त असेल तोच धर्म, हा सिद्धांत आहे.


१३८ अहिंसा सत्यवचनं सर्वभूतेषु चार्जवम् ।

क्षमा चैवाप्रमादश्च यस्यैते स सुखी भवेत् ॥ १२.२१५.६

अहिंसा, सत्य भाषण, सर्वांशी सरळपणाची वागणूक, क्षमाशीलता व सावधानता हे गुण ज्याच्यापाशी असतील तो सुखी होईल.


१३९ अहिंसाऽसाधुहिंसेति श्रेयान्धर्मपरिग्रहः ॥ १२.१५.४९

दुष्टांची हिंसा ही धर्मशास्त्राप्रमाणे अहिंसाच होय असे मानणे युक्त आहे.


१४० अहो बत महत्कष्टं विपरीतमिदं जगत् ।

येनापत्रपते साधुरसाधुस्तेन तुष्यति ॥ ३२६४

अरेरे ! मोठी दुःखाची गोष्ट की, या जगाची रीत विपरीत आहे. ज्याच्या योगाने सज्जनाला खेद होतो त्यानेच दुर्जनाला संतोष वाटतो.


१४१ अहो ह्यनित्यं मानुष्यं जलबुद्बुदचञ्चलम् ॥ ७.७८.१७

पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचे जीवित किती क्षणभंगुर आहे !


१४२ आकिञ्चन्ये न मोक्षोऽस्ति किञ्चन्ये नास्ति बन्धनम् ।

किञ्चन्ये चेतरे चैव जन्तुर्ज्ञानेन मुच्यते ॥ १२.३२०.५०

दरिद्र्यात मोक्ष नाही किंवा श्रीमंतीत बंधन नाही. श्रीमंतीत काय आणि गरिबीत काय, मनुष्य ज्ञानाने मुक्त होत असतो.


१४३ आगमानां हि सर्वेषामाचारः श्रेष्ठ उच्यते ।

आचारप्रभवो धर्मो धर्मादायुर्विवर्धते ॥ १३.१०४.१५६

सर्व शास्त्रांत आचार हाच श्रेष्ठ म्हटला आहे. आचारापासून धर्माची उत्पत्ति होते. धर्माचरणाने आयुष्य वाढते.


१४४ आत्मदोषैर्नियच्छन्ति सर्वे दुःखसुखे जनाः ॥ १.७८.३०

सर्व लोकांना स्वतःच्या कर्मामुळेच सुख किंवा दुःख प्राप्त होत असते.


१४५ आत्मा जेयः सदा राज्ञा ततो जेयाश्च शत्रवः ।

अजितात्मा नरपतिर्विजयेत कथं रिपून् ॥ १२.६९.४

राजाने नेहमी प्रथम आपले मन जिंकावे. म्हणजे मग त्याला शत्रूवर जय मिळविता येईल. ज्याने स्वतःचे मन जिंकलें नाहीं तो राजा शत्रुंना कसा जिंकणार ?


१४६ आत्मानं कः समुद्बध्य कण्ठे बद्धा महाशिलाम् ।

समुद्रं तरते दोर्भ्यां तत्र किं नाम पौरुषम् ॥ ४.४९.१६

स्वतःस जखडून घेऊन आणि गळ्यांत मोठी धोंड बांधून नुसत्या बाहूच्या जोरावर समुद्र तरून जाण्याच्या भरीस कोण पडेल ? असलें साहस करण्यांत पुरुषार्थ कसला ?


१४७ आत्मानमसमाधाय समाधित्सति यः परान् ।

विषयेष्विन्द्रियवशं मानवाः प्रहसन्ति तम् ॥ १२.२६७.२७

आपले मन स्वाधीन न ठेवता जो दुसऱ्यांना आपल्या ताब्यात ठेवू पहातो, अशा विषयासक्त इंद्रियाधीन पुरुषाचा लोक उपहास करतात.


१४८ आत्मा पुत्रः सखा भार्या कुच्छं तु दुहिता किल ॥ १.१५९.११

पुत्र म्हणजे आपला आत्माच होय. भार्या हा मित्र होय. परंतु मुलगी म्हणजे मात्र खरोखर संकट होय!


१४९ आत्मार्थे सन्ततिस्त्याज्या राज्यं रत्नं धनानि च ॥ १२.१३८.१७९

स्वतःकरितां संततीचा, राज्याचा, रत्नांचा व सर्व प्रकारच्या द्रव्याचा त्याग करावा.


१५० आत्मा सर्वस्य भाजनम् ॥ ९.४.४२

जीव हाच सर्व गोष्टींचा आधार आहे. (आधी जीव जगेल तर सर्व काही अनुकूल होईल।)


१५१ आत्मैव ह्यात्मनः साक्षी कृतस्यापकृतस्य च ॥ १३.६.२७

आपला आत्माच आपल्या बऱ्या वाईट कृत्यांचा साक्षी आहे.


१५२ आत्मैवादौ नियन्तव्यो दुष्कृतं संनियच्छता ॥ १२.२६७.२९

पापाचे नियमन करू इच्छिणाऱ्याने प्रथम आपल्या मनाचे नियमन केले पाहिजे.


१५३ आत्मोत्कर्ष न मार्गेत परेषां परिनिन्दया ।

स्वगुणैरेव मार्गेत विप्रकर्ष पृथग्जनात् ॥ १२.२८७.२५

दुसऱ्याची निंदा करून आपला उत्कर्ष साधण्याची इच्छा धरूं नये. आपल्या अंगाच्या गुणांच्या जोरावरच सामान्य लोकांपेक्षा वरचढ होण्याची इच्छा करावी.


१५४ आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।

सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ६.३०.३२

(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, आपणांला जसें सुखदुःख होते तसेच सर्व प्राण्यांना होते, अशा बुद्धीने जो सर्वत्र सारखेच पहातो तो योगी परमश्रेष्ठ होय.


१५५ आददानस्य चेद्राज्यं ये केचित्परिपन्थिनः ।

हन्तव्यास्त इति प्राज्ञाः क्षत्रधर्मविदो विदुः ॥ १२.१०.१७

राज्य घेण्याच्या कामी जर कोणी अडथळा करतील तर त्यांचा वध करावा असें क्षत्रधर्म जाणणारे शहाणे लोक सांगतात.


१५६ आदावेव मनुष्येण वर्तितव्यं यथाक्षमम् ।

यथा नातीतमर्थं वै पश्चात्तापेन युज्यते ॥ ११.१.३५

आधीपासूनच मनुष्याने योग्य रीतीने वागावें. म्हणजे गोष्ट हातची गेल्यावर त्याकरितां पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाही.


१५७ आदित्यचन्द्रावनिलानलौ च

     द्यौभूमिरापो हृदयं यमश्च ।

अहश्च रात्रिश्च उभे च संध्ये

     धर्मश्च जानाति नरस्य वृत्तम् ॥ १.७४.३०

सूर्य, चंद्र, वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी, जल, तसेंच आपले अंतःकरण, यम, दिवस, रात्र, सकाळ संध्याकाळचा संधिप्रकाश आणि धर्म इतक्यांना मनुष्याचे बरेवाईट कृत्य समजतें.


१५८ आनृशंस्यं परो धर्मः परमार्थाच्च मे मतम् ॥ ३.३१३.१२९

(युधिष्ठिर यक्षाला म्हणतो) क्रौर्य नसणे म्हणजे दयाळूपणा हाच श्रेष्ठ धर्म होय, असें माझें निश्चित मत आहे.


१५९ आपत्सु विहितं स्तैन्यं विशिष्टं च महीयसः ।

विप्रेण प्राणरक्षार्थं कर्तव्यमिति निश्चयः ॥ १२.१४१.३९

आपत्काली एकवेळ पोट भरेल इतक्या धान्याचे चौर्य शास्त्रविहित आहे. त्यातूनहि विशेषतः मोठ्यांना. कारण ते प्राणान्तीही शास्त्राचे उल्लंघन न करणारे असल्यामुळे प्राणास मुकतील. म्हणून ब्राह्मणानेही प्राणरक्षणार्थ ते करावे असा सिद्धांत आहे.


१६० आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि ।

आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि ॥ ५.३७.१८

संकटप्रसंगी उपयोग व्हावा म्हणून धनाचे रक्षण करावें. धनाचा त्याग करूनसुद्धा स्वस्त्रीचे रक्षण करावें. आणि धनाचा व स्त्रीचा त्याग करून देखील नेहमी स्वतःचें रक्षण करावें.


१६१ आपदेवास्य मरणात्पुरुषस्य गरीयसी ।

श्रियो विनाशस्तद्धयस्य निमित्तं धर्मकामयोः ॥ ५.७२.२७

द्रव्यनाश हे मनुष्याला मरणापेक्षाहि अधिक मोठे संकट होय. कारण, त्याचा धर्म व काम या दोनहि पुरुषार्थाचे साधन द्रव्य हे आहे.


१६२ आभ्यन्तरं भयं रक्ष्यमसारं बाह्यतो भयम् ॥ १२.१०७.२८

आपापसांतील भयाचे प्रथम निरसन केले पाहिजे. कारण, बाह्य लोकांपासून उत्पन्न होणारी भीति (आपसांतील भीतीपेक्षा) निःसार असते.


१६३ आर्तिरार्ते प्रिये प्रीतिरेतावन्मित्रलक्षणम् ।

विपरीतं तु बोद्धव्यमरिलक्षणमेव तत् ॥ १२.१०३.५०

मित्र पीडित झाला असतां आपण पीडित होणे आणि तो आनंदित असतां आनंदित होणे हे मित्राचे लक्षण होय. आणि याच्या उलट स्थिति असणे हे शत्रूचेच लक्षण जाणावें.


१६४ आर्येण हि न वक्तव्या कदाचित्स्तुतिरात्मनः ॥ ७.१९५.२१

आर्य मनुष्याने केव्हांहि आत्मस्तुति करूं नये.


१६५ आलस्यं मदमोहौ च चापलं गोष्ठिरेव च ।

स्तब्धता चाभिमानित्वं तथाऽत्यागित्वमेव च

एते वै सप्त दोषाः स्युः सदा विद्यार्थिनां मताः ॥ ५.४०.५

आळस, गर्व व मोह, चंचलपणा, जनसमुदायांत जाणे, उद्धटपणा, अभिमान आणि लोभ हे विद्यार्थ्यांचे नेहमी सात दोष (त्याज्य) होत.


१६६ आशा कालवतीं कुर्यात्कालं विघ्नेन योजयेत् ।

विघ्नं निमित्ततो ब्रूयान्निमित्तं चापि हेतुतः ॥ १.१४०.८८

(प्रसंगविशेषीं शत्रूला) आशाहि दाखवावी पण तिला काळाची मर्यादा सांगावी. आणि तो काळ आला म्हणजे ती सफल होण्याच्या मार्गात विघ्ने उपस्थित करावी. त्या विघ्नांचेंहि काहीतरी कारण सांगावें. आणि त्या कारणाच्याहि मूळाशी काही मतलब असावा.


१६७ आशां महत्तरां मन्ये पर्वतादपि सद्रुमात् ।

आकाशादपि वा राजन्नप्रमेयैव वा पुनः ॥ १२.१२५.६

(युधिष्ठिर भीष्मांना म्हणतो) राजा, मला वाटते की वृक्षाच्छादित पर्वतापेक्षा आणि आकाशापेक्षाहि आशा ही मोठी आहे. खरोखर तिच्या मोठेपणाला सीमाच नाही !


१६८ आशीविषैश्च तस्याहुः सङ्गतं यस्य राजभिः ॥ १२.८२.२४

जो राजेलोकांच्या समागमात राहतो तो खरोखर सर्पांच्याच सहवासात राहतो.


१६९ आश्चर्याणामनेकानां प्रतिष्ठा भगवान् रविः ॥ १२.३६२.२

भगवान सूर्यनारायण अनेक चमत्कारांचे आश्रयस्थान आहे.


१७० आश्रमांस्तुलया सर्वान्धृतानाहुर्मनीषिणः ।

एकतश्च त्रयो राजन् गृहस्थाश्रम एकतः ॥ १२.१२.१२

एकीकडे बाकीचे तीन आश्रम व एकीकडे एकटा गृहस्थाश्रम ठेवला तरी बरोबरी हाईल असें ज्ञाते लोक म्हणतात.


१७१ इच्छतोरत्र यो लाभः स्त्रीपुंसोरमृतोपमः ।

अलाभश्चापि रक्तस्य सोऽपि दोषो विषोपमः ॥ १२.३२०.६९

परस्परांची इच्छा करणाऱ्या स्त्रीपुरुषांना परस्परांचा लाभ होईल तर तो अमृततुल्य असतो, आणि न होईल तर ते दुःखहि विषतुल्यच होय,


१७२ इज्याध्ययनदानानि तपः सत्यं क्षमा दमः ।

अलोभ इति मागोऽयं धर्मस्याष्टविधः स्मृतः ॥ ५.३५.५६

यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्यपालन, क्षमाशीलता, इंद्रियनिग्रह आणि निलोभता असा आठ प्रकारचा धर्मप्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे.


१७३ इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ।

बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति ॥ १.१.२६८

(रामायण महाभारतादि) इतिहास आणि पुराणे यांच्या अभ्यासाने वेदाध्ययनाची पूर्तता करावी. कारण, अर्धवट शिकलेल्या मनुष्याविषयी वेदाला अशी धास्ती वाटते की, हा माझ्यावर प्रहार करील. (म्हणजे अर्थाचा अनर्थ करून दुरुपयोग करील।)


१७४ इत्यर्थमिष्यतेऽपत्यं तारयिष्यति मामिति ॥ १.१५९.४

मनुष्याला अपत्य एवढ्याकरितां हवे असते की त्याने आपल्याला (नरकापासून) तारावें.


१७५ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।

तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ६.२७.३४

इंद्रिये आणि त्यांचे विषय यांच्यामधील प्रीति व द्वेष ही ठरलेली आहेत. त्यांच्या ताब्यात मनुष्याने ज्ॐ नये. कारण ते त्याचे शत्रु होत.


१७६ इन्द्रियाणामनुत्सर्गो मृत्युनापि विशिष्यते ॥


अत्यर्थं पुनरुत्सर्गो सादयेद्दैवतानपि ॥ ५.३९.५३

इंद्रियांचा आत्यंतिक निरोध मरणापेक्षाहि दुःसह होय, उलट तीच अजीबात मोकळी सोडली असतां देवतांचा देखील नाश करतील,


१७७ इन्द्रियाणां प्रसङ्गेन दोषमर्छत्यसंशयम् ।

संनियम्य तु तान्येव सिद्धिमाप्नोति मानवः ॥ १२.३२३.८

मनुष्य इंद्रियांच्या नादी लागला म्हणजे त्याच्या हातून निःसंशय पापाचरण घडते. परंतु तीच ताब्यात ठेवल्याने सिद्धि (मोक्ष) प्राप्त करून घेतो.


१७८ इन्द्रियाण्येव तत्सर्वं यत्स्वर्गनरकावुभौ ।

निगृहीतविसृष्टानि स्वर्गाय नरकाय च ॥ ३.२११.१९

स्वर्ग व नरक म्हणून जे काही आहे ते सर्व इंद्रियच होत. कारण इंद्रिये, आंवरून धरल्याने स्वर्गाला, आणि मोकळी सोडल्याने नरकाला, कारण होत असतात,


१७९ इन्द्रियाण्येव संयम्य तपो भवति नान्यथा ॥ ३.२११.१८

इंद्रियांचे संयमन केल्यानेच तपश्चर्या घडते, नाही तर घडत नाही.


१८० इष्टं च मे स्यादितरच्च न स्या-

देतत्कृते कर्मविधिः प्रवृत्तः ।

इष्टं त्वनिष्टं च न मा भजेते-

त्येतत्कृते ज्ञानविधिः प्रवृत्तः ॥ १२.२०१.११

मला इष्ट गोष्टी तेवढ्या घडाव्या व अनिष्ट टळाव्या यासाठी कर्मकांडाची प्रवृत्ति आहे. इष्ट व अनिष्ट या दोहोंचाहि लेप मला न लागावा यासाठी ज्ञानकांड आहे.


१८१ इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।

तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ ६.२७.१२

(श्रीकृष्ण म्हणतात) यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हांला (यज्ञ करणाऱ्यांना) इच्छित भोग देतील. त्यांनी दिलेल्या त्या भोगांचा त्यांना दिल्याशिवाय जो उपभोग घेतो तो चोरच म्हटला पाहिजे.


१८२ इह प्राज्ञो हि पुरुषः स्वल्पमप्रियामिच्छति ॥ ५.१३५.१७

(विदुला संजयाला म्हणते) इहलोकी शहाण्या मनुष्याला अल्पस्वल्पाने संतोष होत नाही.


१८३ इह लोके हि धनिनां स्वजनः स्वजनायते ।

स्वजनस्तु दरिद्राणां जीवतामपि नश्यति ॥ १२.३२१.८८

या जगांत धनवान् लोकांचे आप्तेष्ट आप्तेष्टांसारखे वागतात. दरिद्री मनुष्याला मात्र आप्तेष्ट असून नसल्यासारखे होतात.


१८४ ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।

भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६.४.६१

(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, परमेश्वर सर्व भूतांच्या अंतर्यामी वास करतो, व आपल्या मायेच्या योगाने यंत्राने चढविलेल्या (कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे) सर्व भूतांना नाचवीत असतो.


१८५ उच्चैर्वृत्तेः श्रियो हानिर्यथैव मरणं तथा ॥ १२.१३३.५

उच्च वृत्तीने राहणाऱ्या मनुष्याला संपत्तीचा नाश मरणासारखाच होय.


१८६ उत्थानवीरः पुरुषो वाग्वीरानधितिष्ठति ॥ १२.५८.१५

कर्तृत्ववान् पुरुष वाचाळ पुरुषांवर छाप ठेवतो.


१८७ उत्थानहीनो राजा हि बुद्धिमानपि नित्यशः ।

प्रधर्षणीयः शत्रूणां भुजङ्ग इव निर्विषः ॥ १२.५८.१६

राजा बुद्धिमान असला तरी दुसऱ्यांवर चढाई न करील तर, विषहीन सर्पाप्रमाणे, नेहमीं शत्रूच्या हल्ल्यांना पात्र होतो.


१८८ उत्थानेनामृतं लब्धमुत्थानेनासुरा हताः ।

उत्थानेन महेन्द्रेण श्रेष्ठयं प्राप्तं दिवीह च ॥ १२.५८.१४

(देवांनासुद्धा) प्रयत्नानेच अमृताची प्राप्ति झाली, व प्रयत्नानेंच दैत्यांचा संहार करितां आला. इंद्रदेखील प्रयत्नानेंच इहपरलोकी श्रेष्ठपणा मिळविता झाला.


१८९ उत्थायोत्थाय गच्छेत नित्ययुक्तो रिपोर्गृहान् ।

कुशलं चास्य पृच्छेत यद्यप्यकुशलं भवेत् ॥ १२.१४०.२२

नेहमीं सावध राहून दररोज उठून शत्रूच्या घरी जावे आणि तो जरी खुशाल नसला तरी त्याला कुशलप्रश्न विचारावे.


१९० उत्पन्नस्य रुरोः शृङ्गं वर्धमानस्य वर्धते ।

प्रार्थना पुरुषस्येव तस्य मात्रा न विद्यते ॥ १३.९३.४५

उपजलले हरिणाचे पोर वाढू लागले की त्याच्याबरोबर त्यांची शिंगेंही वाढत जातात. तद्वत् मनुष्याची हांव तो वाढू लागला की वाढू लागते. मग तिला काही मर्यादा रहात नाही.


१९१ उत्साहश्चापि यत्नेन कर्तव्यो भूतिमिच्छता ॥ १.१४०.८५

वैभवाची इच्छा करणाऱ्याने उत्साहाने उद्योग केला पाहिजे.


१९२ उदाराणां तु सत्कर्म दैवं क्लीवा उपासते ॥ १२.१३९.८२

श्रेष्ठ प्रकारचे लोक सत्कर्माची कास धरतात. दुबळे लोक दैवावर हवाला ठेवतात,


१९३ उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ६.३०.५

मनुष्याने आपण होऊन आपला उद्धार करावा. आपण आपला नाश करूं नये. कारण, प्रत्येक मनुष्य आपणच आपला बंधु (हितकर्ता) किंवा आपणच आपला शत्रु होतो.


१९४ उद्यच्छेदेव न नमेदुद्यमो ह्येव पौरुषम् ।

अप्यपर्वणि भज्येत न नमेतेह कस्यचित् ॥ १२.१३३.१०

मानी पुरुषाने नेहमी ताठ (बाणेदारपणाने) असावे कधी कोणापुढे वाकू नये. ताठपणाने मोडावें पण (कोणापुढेहि) वाकू नये. न वांकणे हाच खरा मानीपणा.


१९५ उद्यम्य शस्त्रमायान्तमपि वेदान्तगं रणे ।

निगृह्णीयात्स्वधर्मेण धर्मापेक्षी नराधिपः ॥ १२.५६.२९

रणांगणांत शस्त्र उपसून धावून येणारा शत्रु वेदान्तविद्यापारंगत असला तरी त्याचा, धर्माची आस्था बाळगणाऱ्या राजाने धर्मयुद्ध करून मोड करावा.


१९६ उन्मत्ता गौरिवान्धा श्रीः क्वचिदेवावतिष्ठते ॥ ५.३९.६६

उन्मत्त गाईप्रमाणे, अविचारी लक्ष्मी कोठे तरी रहात असते !


१९७ उपस्थितस्य कामस्य प्रतिवादो न विद्यते ।

अपि निर्मुक्तदेहस्य कामरक्तस्य किं पुनः ॥ ५.३९.४६

प्राप्त झालेल्या विषयाचा त्याग, देहाची पर्वा न करणाऱ्या जीवन्मुक्ताच्याहि हातून होणे शक्य नाही. मग विषयलंपट पुरुषाची गोष्ट कशाला पाहिजे !


१९८ ऊधश्छिन्द्यात्तु यो धेन्वाः क्षीरार्थी न लभेत्पयः ।

एवं राष्ट्रमयोगेन पीडितं न विवर्धते ॥ १२.७१.१६

दुधाच्या आशेनें जो गाईची कांस कापील त्याला दूध कधीच मिळणार नाही. त्याचप्रमाणे अयोग्य रीतीने कर वैगरे लादून राष्ट्राला पीडा दिली असतां राष्ट्राचा उत्कर्ष होत नाही.


१९९ ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे ।

धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते ॥ १८.५.६२

(महर्षि व्यास म्हणतात.) मी बाहू उभारून मोठ्याने ओरडून सांगतो आहे पण कोणीच माझे ऐकत नाही. बाबांनो, धर्मापासूनच अर्थ व काम प्राप्त होतात त्या धर्माचे आचरण तुम्ही कां करीत नाही ?


२०० ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति यूनः स्थविर आयति ।

प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ॥ ५.३८.१

कोणी वृद्ध पुरुष जवळ येऊ लागला की, तरुणाचे प्राण वर ज्ॐ लागतात. त्याला सामोरे जाऊन वंदन केल्याने ते पुनः तरुणाला प्राप्त होतात.


२०१ ऋणशेषमग्निशेषं शत्रुशेषं तथैव च ।

पुनःपुनःप्रवर्धन्ते तस्माच्छेषं न धारयेत् ॥ १२.१४०.५८

ऋण, अग्नि व शत्रु यांचा थोडासा भाग जरी शिल्लक राहिला तरी तो पुनः पुनः वाढू लागतो. यास्तव त्यांचा काही अवशेष ठेवू नये.


२०२ ऋषीणां च नदीनां च कुलानां च महात्मनाम् ।

प्रभवो नाधिगन्तव्यः स्त्रीणां दुश्चरितस्य च ॥ ५.३५.७२

ऋषि, नद्या व थोर लोकांचे कुल, त्याचप्रमाणे स्त्रियांचे दुश्चरित्र यांचे मूळ शोधण्याच्या भरीस पडूं नये.


२०३ एक एव चरेद्धर्मं नास्ति धर्मे सहायता ।

केवलं विधिमासाद्य सहायः किं करिष्यति ॥ १२.१९३.३२

केवळ धर्मविधीचा आश्रय करून स्वतः एकट्यानेच धर्माचे आचरण करावें. धर्माचरणांत दुसऱ्याच्या साहाय्याची अपेक्षाच नाही. मग साहाय्यकर्त्यांचा उपयोग काय?


२०४ एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च वध्यते ।

सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लवः ॥ ५.३३.४५

विष एकालाच ठार मारते आणि शस्त्रानेसुद्धा एकाचाच घात होतो. परंतु राजाच्या गुप्त मसलतीत काही बिघाड झाला, तर तो सर्व प्रजेसह राजाच्या नाशाला कारणीभूत होतो.


२०५ एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता ।

बुद्धिर्बुद्धिमतोत्सृष्टा हन्याद्राष्ट्रं सराजकम् ॥ ५.३३.४३

तिरंदाजाने सोडलेला तीर जेमतेम एका प्राण्याचा वध करील न करील. परंतु बुद्धिमान् पुरुषाने योजलेली युक्ति राजासह सर्व राष्ट्राचा घात करील.


२०६ एकः क्रुद्धो ब्राह्मणो हन्ति राष्ट्रम् ॥ ५.४०.८

क्रुद्ध झालेला एक ब्राह्मण सर्व राष्ट्राचा नाश करूं शकेल.


२०७ एकः क्षमावतां दोषो द्वितीयो नोपपद्यते ।

यदेनं क्षमया युक्तमशक्तं मन्यते जनः ॥ ५.३३.४८

क्षमाशील पुरुषांच्या ठायीं एकच दोष आढळतो, दुसरा नाही. तो दोष एवढाच की, त्याच्या सहनशीलतेमुळे लोक त्याला दुर्बल समजतात.


२०८ एकः पापानि कुरुते फलं भुङ्क्ते महाजनः ॥


भोक्तारो विप्रमुच्यन्ते कर्ता दोषेण लिप्यते ॥ ५.३३.४२

एकजण पाप करतो व त्याचे फळ पुष्कळ लोकांना भोगावे लागते. परंतु हे भोगणारे अजीबात सुटून जातात आणि कर्त्याला मात्र पापाचा दोष लागतो.


२०९ एकत्र चिरवासो हि न प्रीतिजननो भवेत् ॥ ३.३६.३६

एकाच ठिकाणी फार दिवस राहणें सुखावह होत नाही.


२१० एकमेव हि लोकेऽस्मिन्नात्मनो गुणवत्तरम् ।

इच्छन्ति पुरुषाः पुत्रं लोके नान्यं कथञ्चन ॥ ७.१९४.५

या जगांत एक पुत्रच तेवढा आपल्यापेक्षा अधिक गुणवान् व्हावा, असे लोक इच्छीत असतात; दुसरा कोणीहि असा वरचढ होण्याची इच्छा करीत नाहीत.


२११ एकशत्रुवधेनैव शूरो गच्छति विश्रुतिम् ॥ ५.१३४.२३

एका शत्रूचा वध करितांच शूराची प्रसिद्धि होत असते.


२१२ एकः शत्रुर्न द्वितीयोऽस्ति शत्रुः

अज्ञानतुल्यः पुरुषस्य राजन् ॥ १२.२९७.२८

मनुष्याचा एकच शत्रु आहे, अज्ञानासारखा दुसरा कोणताच शत्रु नाही.


२१३ एकस्मिन्नेव जायते कुले क्लीबमहाबलौ ।

फलाफलवती शाखे यथैकस्मिन्वनस्पतौ ॥ ५.३.३

एकाच वृक्षावर ज्याप्रमाणे फळांनी भरलेली व फलरहित अशा दोनहि प्रकारच्या खांद्या असतात, त्याप्रमाणे एकाच कुळांत अति बलिष्ठ व अत्यंत दुर्बळ पुरुष जन्माला येतात.


२१४ एकस्मिन्नेव पुरुषे सा सा बुद्धिस्तदा तदा ।

भवत्यकृतधर्मत्वात् सा तस्यैव न रोचते ॥ १.३.१३

मनावर धर्माचा संस्कार झालेला नसल्यामुळे एकाच मनुष्याच्या ठिकाणी समयानुरूप निरनिराळे विचार उत्पन्न होतात, व पुढे ते त्याचे त्यालाच आवडेनासे होतात.


२१५ एकान्ततो न विश्वासः कार्यो विश्वासघातकैः ॥ १२.१३९.२८

विश्वासघात करणाऱ्यांवर पूर्ण विश्वास टाकू नये.


२१६ एकान्तेन हि विश्वासः कृत्स्नो धर्मार्थनाशकः ।

अविश्वासश्च सर्वत्र मृत्युना च विशिष्यते ॥ १२.८०.१०

कोणावरहि सर्वथा विश्वास ठेविल्याने धर्म व अर्थ यांचा नाश होतो. उलट, कोणाचाच विश्वास न धरणे हे मरणापेक्षा दुःखदायक होय.


२१७ एकान्तेन हि सर्वेषां न शक्यं तात रोचितुम् ॥ १२.८९.१९

कोणतीहि गोष्ट सर्वांना सर्वथा आवडणे शक्य नाही.


२१८ एतज्ज्ञानं विदुर्विप्रा ध्रुवमिन्द्रियधारणम् ॥ ५.६९.२०

खरोखर इंद्रिये ताब्यात ठेवणे यालाच ज्ञाते पुरुष ज्ञान असें म्हणतात.


२१९ एतत्पृथिव्याममृतमेतच्चक्षुरनुत्तमम् ।

यद्ब्राह्मणमुखाच्छास्त्रमिह श्रुत्वा प्रवर्तते ॥ १३.३६.१०

ब्राह्मणाच्या तोंडून शास्त्रार्थ ऐकून त्याप्रमाणे वर्तन करणे हे पृथ्वीवरील अमृत होय, हेच सर्वोत्कृष्ट दिव्य ज्ञान होय.


२२० एतावानेव पुरुषः कृतं यस्मिन्न नश्यति ॥ १.१५७.१४

ज्याच्या ठिकाणी केलेला उपकार व्यर्थ जात नाही तोच मनुष्य म्हणावयाचा.


२२१ एतावानेव पुरुषो यदमर्षी यदक्षमी ॥ ५.१३३.३३

जो अपमान व अपकार सहन करीत नाही, तोच पुरुष.


२२२ ऐकगुण्यमनीहायामभावः कर्मणां फलम् ।

अथ द्वैगुण्यमीहायां फलं भवति वा न वा ॥ ५.१३५.२८

उद्योगरहित राहिले असता उद्योगानें प्राप्त होणारे जे फल त्याचा अभाव हा एकच प्रकार संभवतो. परंतु उद्योग करीत राहिले असतां, फल प्राप्त होणे व न होणे असे दोन प्रकार संभवतात.


२२३ ऐश्वर्यमदमत्तो हि नापतित्वा विबुध्यते ॥ ५.३४.५३

ऐश्वर्यमदानें धुंद झालेला मनुष्य ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्याशिवाय शुद्धीवर येत नाही.


२२४ कः कस्य चोपकुरुते कश्च कस्मै प्रयच्छति ।

प्राणी करोत्ययं कर्म सर्वमात्मार्थमात्मना ॥ १२.२९२.१

कोण कोणावर उपकार करणार ? आणि कोण कोणाला देणार ? जो तो प्राणी सर्व काही स्वतःकरितां करीत असतो.


२२५ कच्चिच्छारीरमाबाधमौषधैर्नियमेन वा ।

मानसं वृद्धसेवाभिः सदा पार्थापकर्षसि ॥ २.५.८९*

(नारदमुनि विचारतात) वा युधिष्ठिरा, शारीरिक पीडा औषधाने व नियमित आचरणाने आणि मानसिक पीडा वृद्ध जनांची सेवा करून तूं नेहमी दूर करतोस ना ?

* श्लोक २२५ ते २३१ नारदमुनींनी युधिष्ठिराला विचारलेल्या 'कच्चितप्रश्नांतील ' आहेत.


२२६ कच्चित्कृतं विजानीषे कर्तारं च प्रशंससि ।

सतां मध्ये महाराज सत्करोषि च पूजयन् ॥ २.५.११९

(नारदमुनि युधिष्ठिराला विचारितात) राजा, तूं केलेला उपकार स्मरतोस ना ? आणि उपकारकर्त्याची प्रशंसा करतोस ना ? त्याचप्रमाणे चांगल्या लोकांसमोर त्याचा गौरव करून सत्कार करतोस ना ?


२२७ कश्चित्ते सर्वविद्यासु गुणतोऽर्चा प्रवर्तते ॥ २.५.९६

(राजा), तूं सर्व विद्यांचा त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे परामर्ष घेतोस ना ?


२२८ कच्चित्सहस्रैर्मूर्खामाणामेकं क्रीणासि पण्डितम् ।

पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निःश्रेयसं परम् ॥ २.५.३५

हजारों मूर्ख देऊन त्यांच्या बद्दल एक पंडित तूं विकत घेतोस का ? कारण अडीअडचणीच्या प्रसंगी पंडिताचा फार उपयोग होईल.


२२९ कच्चिद्द्वौ प्रथमौ यामौ रात्रेः सुप्त्वा विशाम्पते ॥


सञ्चिन्तयसि धर्मार्थौ याम उत्थाय पश्चिमे ॥ २.५.८५

राजा, रात्रीच्या दुसऱ्या व तिसऱ्या ह्या दोन प्रहरांत झोप घेतोस ना ? शेवटच्या (चौथ्या) प्रहरी उठून तूं धर्मार्थाचे चिंतन करतोस ना ?


२३० कच्चिद्राष्ट्रे तडागानि पूर्णानि च बृहन्ति च

भागशो विनिविष्टानि न कृषिर्देवमातृका ॥ २.५.७७

तुझ्या राज्यांत पाण्याने तुडुंब भरलेले मोठाले तलाव जागोजाग खोदलेले आहेत ना ? शेती केवळ पावसावर अवलंबून नाही ना ?


२३१ कच्चिविद्याविनीतांश्च नराज्ञानविशारदान् ।

यथार्ह गुणतश्चैव दानेनाभ्युपपद्यसे ॥ २.५.५३

विद्याविनयसंपन्न व कलाकुशल गुणी जनांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे व गुणाप्रमाणे पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करतोस ना ?


२३२ कपाले यद्वदापः स्युः श्वदृतौ च यथा पयः ।

आश्रयस्थानदोषेण वृत्तहीने तथा श्रुतम् ॥ १२.३६१४२

ज्याप्रमाणे मस्तकाच्या कवटींत ठेवलेले पाणी किंवा कुत्र्याच्या कातड्याच्या पिशवीत घातलेले दूध आश्रयस्थान वाईट असल्यामुळे दूषित होते, त्याप्रमाणे आचारहीन मनुष्याचे ज्ञान व्यर्थ होते.


२३३ करिष्यन्न प्रभाषेत कृतान्येव तु दर्शयेत् ॥ ५.३८.१६

एकादी गोष्ट करण्याचे मनांत असतांच उगाच बोलू नये. काय तें करूनच दाखवावे.


२३४ कर्णिनालीकनाराचान् निर्हरन्ति शरीरतः ।

वाक्शल्यस्तु न निर्हर्तुं शक्यो हृदिशयो हि सः ॥ ५.३४.७९

शरीरांत रुतलेला बाण, तीर किंवा भाला उपटून काढता येतो. वाग्बाण मात्र उपटून काढता येत नाहीं; कारण तो हृदयांत खोल शिरून बसलेला असतो.


२३५ कर्तव्यमिति यत्कार्यं नाभिमानात्समाचरेत् ॥ ३.२.७६

कर्तव्य म्हणून जे करावयाचें तें अहंकारबुद्धीने करूं नये.


२३६ कर्मणा येन केनैव मृदुना दारुणेन च ।

उद्धरेद्दीनमात्मानं समर्थों धर्ममाचरेत् ॥ १.१४०.७२

सौम्य किंवा तीव्र कोणत्याहि उपायाने प्रथमतः आपला हीन स्थितीतून उद्धार करावा; आणि समर्थ होऊन धर्माचरण करावें.


२३७ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूमा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ६.२६.४७

(अर्जुना), फक्त कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, कर्मफलाच्या ठिकाणी मुळीच नाही. (यासाठी) तूं कर्मफलाची इच्छा करूं नकोस. तसेंच कर्म न करण्याचाहि आग्रह धरूं नको.


२३८ कर्मभूमिरियं ब्रह्मन् फलभूमिरसौ मता ॥ ३.२६१.३५

मृत्युलोक ही कर्मभूमि असून परलोक ही फलभूमि आहे, असे म्हणतात.


२३९ कल्योत्थानरतिर्नित्यं गृहशुश्रूषणे रता ।

सुसंमृष्टक्षया चैव गोशकृत्कृतलेपना ॥ १३.१४६.४८

(स्त्रीनें) सकाळी लवकर उठून दक्षतेने घरकाम करावे. सर्व घर उत्तमप्रकारे झाडून स्वच्छ करावे. आणि गाईच्या शेणाने सारवून काढावे.


२४० कश्चित्तरति काष्ठेन सुगम्भीरां महानदीम् ।

स तारयति तत्काष्ठं स च काष्ठेन तार्यते ॥ १२.१३८.६२

एकादा प्राणी लाकडाच्या ओंड्याचा आश्रय करून अतिखोल व विस्तीर्ण नदी तरून जातो. (त्यासमयीं) तो त्या लाकडाला नदीपार करतो, व लाकूडहि त्याला तारून नेते.


२४१ कामक्रोधग्राहवतीं पञ्चेन्द्रियजला नदीम् ।

नावं धृतिमयीं कृत्वा जन्मदुर्गाणि सन्तर ॥ ५.४०.२२

काम व क्रोध ह्या जिच्यांतील सुसरी आहेत, आणि चक्षुरादि पांच इंद्रिये हे जिच्यांतील उदक आहे, अशी ही संसाररूप नदी ज्ञानरूप नौकेचे अवलंबन करून जन्ममरणपरंपरारूप धोक्याची स्थळे चुकवून तरून जा.


२४२ कामचारी तु कामेन य इन्द्रियसुखे रतः ।

ब्रह्मचारी सदैवैष य इन्द्रियजये रतः ॥ १४.२६.१५

विषयलालसेने जो इंद्रियसुखांत गढून जातो तो कामचारी होय. जो सदैव इंद्रियांचे दमन करण्यांत आनंद मानतो तो ब्रह्मचारी होय.


२४३ कामं नैतत्प्रशंसन्ति सन्तः स्वबलसंस्तवम् ।

गुणसङ्कीर्तनं चापि स्वयमेव शतक्रतो ॥ १.३४.२

(गरूड म्हणतो) हे इंद्रा, स्वतःच्या बळाची स्तुति करणे आणि आपणच आपले गुणवर्णन करणे हे सज्जनांना मुळींच प्रशस्त वाटत नाही.


२४४ कामे प्रसक्तः पुरुषः किमकार्यं विवर्जयेत् ॥ १२.८८.२१

कामासक्त पुरुष कोणते अकार्य वर्ज्य करील ?


२४५ काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।

सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ ६.४२.२

(भगवान् श्रीकृष्ण सांगतात) सकाम कर्मांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष संन्यास असे म्हणतात. आणि सर्व कर्मांच्या फलाचा म्हणजे फलाशेचा त्याग करणे यालाच शहाणे लोक त्याग म्हणतात.


२४६ कारणात्प्रियतामेति द्वेष्यो भवति कारणात् ।

अर्थार्थी जीवलोकोऽयं न कश्चित्कस्यचित्प्रियः ॥ १२.१३८.१५२

कोणी झाला तरी काहीतरी कारणानेच प्रिय वाटतो, व कारणानेंच द्वेष्य वाटतो. हे जग सगळे स्वार्थी आहे. (खरोखर निष्कारण) कोणी कोणाला प्रिय नसतो.


२४७ कारणाद्धर्ममन्विच्छेन्न लोकचरितं चरेत् ॥ १२.२६२.५३

हेतूकडे लक्ष्य देऊन धर्माचरण करावे, केवळ लोकांनी केलें म्हणून आपणहि तसें करू नये.


२४८ कार्यापेक्षा हि वर्तन्ते भावस्निग्धाः सुदुर्लभाः ॥ १२.१११.८६

कार्याच्या अपेक्षेनेंच लोक प्रेमाने वागतात. खरोखर स्वभावतःच प्रेमळ असे लोक अत्यंत दुर्लभ.


२४९ कालः कर्षति भूतानि सर्वाणि विविधान्युत ।

न कालस्य प्रियः कश्चिन्न द्वेष्यः कुरुसत्तम ॥ ११.२.८

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो.) हे कुरुश्रेष्ठा, निरनिराळ्या प्रकारच्या सर्व प्राण्यांना काळ ओढून नेतो. काळाला कोणी प्रिय नाही, कोणी द्वेष्य नाही.


२५० कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः ।

काल: सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः ॥ ११.२.२४

काळ प्राण्यांना शिजवून काढतो काळ प्रजेचा संहार करतो, सर्व प्राणी झोपी गेले असता काळ जागा राहतो. खरोखर काळाचे अतिक्रमण करणे अशक्य आहे !


२५१ कालः पचति भूतानि सर्वाण्येवात्मनात्मनि ।

यस्मिन्तु पच्यते कालस्तं वेदेह न कश्चन ॥ १२.२३९.२५

काळ स्वतः सर्व प्राण्यांना आपल्या पचनी पाडतो, परंतु काळाला जो पचनी पाडतो त्या परमात्म्याला कोणीच जाणत नाही.


२५२ कालमूलमिदं सर्वं भावाभावौ सुखासुखे ॥ १.१.२४७

जन्म आणि मृत्यु, सुख आणि दुःख ही सर्व काळावर अवलंबून आहेत.


२५३ काले काले तु सम्प्राप्ते मृदुस्तीक्ष्णोऽपि वा भवेत् ॥ ३.२८.२४

जसजशी वेळ येईल त्याप्रमाणे सौम्य किंवा कठोर वृत्तीने वागावें.


२५४ कालेन पादं लभते तथार्थं

     ततश्च पादं गुरुयोगतश्च ।

उत्साहयोगेन च पादमृच्छेत्

     शास्त्रेण पादं च ततोऽभियाति ॥ ५.४४.१६

प्रथमतः गुरूंपासून चतुर्थांश विद्या प्राप्त होते; नंतर आपल्या बुद्धिवैभवाने चतुर्थांश; कालांतराने विचारपरिपक्कतेमुळे चतुर्थांश; आणि आपल्याबरोबरच्या लोकांशी चर्चा केल्याचे योगाने (विचारविनिमयाने) चतुर्थांश विद्या प्राप्त होते. (या श्लोकांत पाठक्रमाहून अर्थक्रम भिन्न आहे असें टीकाकारांनी म्हटले आहे त्याला अनुसरून वरील अर्थ दिला आहे।)


२५५ कालेन रिपुणा सन्धिः काले मित्रेण विग्रहः ।

कार्य इत्येव सन्धिज्ञाः प्राहुर्नित्यं नराधिप ॥ १२.१३८.२०८

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात।)

हे राजा प्रसंगानुसार शत्रूंशीहि संधि करावा, व मित्रांशीहि विरोध करावा, असेंच संधिवेत्ते लोक सदैव सांगत असतात.


२५६ कालेनाभ्याहताः सर्वे कालो हि बलवत्तरः ॥ १२.२२७.५६

काळाने सर्वांना मारून टाकले आहे. काळ सर्वांना पुरून उरला आहे.


२५७ काले मृदुर्यो भवति काले भवति दारुणः ।

प्रसाधयति कृत्यानि शत्रु चाप्यधितिष्ठति ॥ १२.१४०.६७

योग्य वेळी जो सौम्य होतो व योग्यवेळी भयंकर होतो त्याची सर्व कार्य सिद्धीस जातात आणि तोच शत्रूला आपल्या ताब्यात ठेवितो.


२५८ काले हि समनुप्राप्ते त्यक्तव्यमपि जीवनम् ॥ ५.९०.७७

तसाच प्रसंग पडला असतां जीविताचासुद्धा त्याग केला पाहिजे.


२५९ कालो न परिहार्यश्च न चास्यास्ति व्यतिक्रमः ॥ १२.२२७.९७

काळाला चुकवितां येणे शक्य नाही. तसेच त्याचा प्रतिकारहि करितां यावयाचा नाही.


२६० कालोपहतचित्ता हि सर्वे मुह्यन्ति भारत ॥ ९.६३.४७

खरोखर काळाने बुद्धि ग्रासून टाकली असता सर्वांना मोह पडत असतो.


२६१ कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् ।

इति ते संशयो माभूद्राजा कालस्य कारणम् ॥ १२.६९.७९

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात।) काळ हा राजाला कारण होतो का राजा हाच काळाला कारण होतो, याविषयीं तूं संशयांत पडूं नको. कां की, राजा हाच काळाला कारण आहे.


२६२ कालो हि परमेश्वरः ॥ १३.१४८.३९

काळ हा खरोखर परमेश्वरच आहे !


२६३ किञ्चिदेव ममत्वेन यदा भवति कल्पितम् ।

तदेव परितापार्थं नाशे सम्पद्यते पुनः ॥ १२.२७६.८

एकाद्या वस्तूविषयीं 'ही माझी' अशी भावना धरिली, म्हणजे त्या वस्तूचा नाश झाला असता तीच दुःखाला कारण होते.


२६४ किं तस्य तपसा राज्ञः किञ्च तस्याध्वरैरपि ।

सुपालितमजो यः स्यात् सर्वधर्मविदेव सः ॥ १२.६९.७३

जो राजा प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करितो तो सर्व धर्म जाणणाराच होय. अशा राजाला तप काय करावयाचे ? यज्ञांची तरी त्याला काय गरज ?


२६५ किं तु रोषान्वितो जन्तुर्हन्यादात्मानमप्युत ॥ ७.१५६.९५

खरोखर क्रोधाविष्ट झालेला मनुष्य स्वतःचा देखील घात करील.


२६६ किं तैर्येऽनडुहो नोह्याः किं धेन्वा वाप्यदुग्धया ।

वन्ध्यया भार्यया कोऽर्थः कोऽर्थो राज्ञाप्यरक्षता ॥ १२.७८.४१

जे वाहून नेण्याच्या कामी येत नाहीत त्या बैलांचा काय उपयोग ? दूध न देणारी गाय काय कामाची ? वांझ स्त्री काय करावयाची ! तसेंच, रक्षण न करणारा राजा हवा कशाला ?


२६७ किं नु मे स्यादिदं कृत्वा किं नु मे स्यादकुर्वतः ।

इति कर्माणि सञ्चिन्त्य कुर्याद्वा पुरुषो न वा ॥ ५.३४.१९

हे केल्याने माझा काय फायदा होईल, न केल्याने काय तोटा होईल, असा विचार करून मग कोणतेहि कार्य मनुष्याने करावे अथवा करूं नये.


२६८ कीर्तिरक्षणमातिष्ठ कीर्तिर्हि परमं बलम् ।

नष्टकीर्तेमेनुष्यस्य जीवितं ह्यफलं स्मृतम् ॥ १.२०३.१०

कीर्ति राखण्याकरितां झटून प्रयत्न कर. कारण, कीर्ति हे श्रेष्ठ प्रकारचे बल आहे. ज्याची कीर्ति नष्ट झाली त्या मनुष्याचे जिणे व्यर्थ गेलें.


२६९ कीर्तिर्हि पुरुषं लोके सञ्जीवयति मातृवत् ।

अकीर्तिजीवितं हन्ति जीवतोऽपि शरीरिणः ॥ ३.३००.३२

कीर्ति ही मातेप्रमाणे मनुष्याला जगांत खरेखुरे जीवन प्राप्त करून देते. अपकीर्ति जिवंत असलेल्या प्राण्याच्याहि जीविताचा नाश करिते.


२७० कुतः कृतघ्नस्य यशः कुतः स्थानं कुतः सुखम् ।

अश्रद्धेयः कृतघ्नो हि कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ॥ १२.१७३.२०

कृतघ्न मनुष्याला यश कोठून येणार ? अधिकार कोठचा ? आणि सुख तरी कोठचें ? (अर्थात् त्याला यांपैकी काहींच मिळत नाही). कारण, कृतघ्न हा अविश्वसनीय बनलेला असतो. कृतनाला प्रायश्चित्त नाही.


२७१ कुर्यात्कृष्णगतिः शेषं ज्वलितोऽनिलसारथिः ॥


न तु राजाभिपन्नस्य शेषं क्वचन विद्यते ॥ १२.६८.५०

वारा ज्याचा सहकारी आहे असा प्रज्वलित झालेला अग्नि एक वेळ दग्ध केलेल्या वस्तूंतील कांहीं शेष ठेवील. परंतु राजाने ज्याच्यावर हल्ला केला त्याचे काहीएक शिल्लक राहणार नाही.


२७२ कुर्यात्तृणमयं चापं शयीत मृगशायिकाम् ।

अन्धःस्यादन्धवेलायां बाधिर्यमपि संश्रयेत ॥ १२.१४०.२७

(राजाने प्रसंगविशेषी) तृणाचे देखील धनुष्य करावे, हरिणाप्रमाणे सावधपणाने झोप घ्यावी, अंध होण्याचा प्रसंग आल्यास अंधाप्रमाणे वागावे, व (बधिर होण्याचा प्रसंग आल्यास) बहिरेपणाचाहि आश्रय करावा.


२७३ कुलानि समुपेताति गोभिः पुरुषतोऽर्थतः ॥


कुलसङ्ख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्ततः ॥ ५.३६.२८

गोधन, कर्तबगार पुरुष आणि द्रव्य यांच्या योगाने कुलांना मोठेपणा प्राप्त होत असतो. पण ती आचारभ्रष्ट असली तर त्यांची गणना चांगल्या कुळांत होत नाही.


२७४ कुलीनस्य च या निन्दा वधो वाऽमित्रकर्शन ।

महागुणो वधो राजन्न तु निन्दा कुजीविका ॥ ५.७३.२४

(श्रीकृष्ण म्हणतात।) हे शत्रुनाशका धर्मराजा, कुलीन पुरुषाची निंदा अथवा वध होण्याचा प्रसंग आला असता त्याचा वध होणे फार बरें; जीवितच दुःखदायक करून टाकणारी निंदा बरी नव्हे.


२७५ कृतज्ञेन सदा भाव्यं मित्रकामेन चैव ह ॥ १२.१७३.२२

मनुष्याने सदैव कृतज्ञ असावे, व मित्र जोडण्याविषयी इच्छा बाळगावी.


२७६ कृतं ममाप्रियं तेन येनायं निहतो मृधे ।

इति वाचा वदन्हन्तृन् पूजयेत रहोगतः ॥ १२.१०२.३७

'संग्रामात ज्याने या योद्धयाचा वध केला असेल त्याने माझें अप्रिय केले' असे उद्गार तोंडाने काढावे, आणि अंतस्थ रीतीने त्या शत्रूला ठार मारणाऱ्यांचा गौरव करावा।.


२७७ कृतवैरे न विश्वासः कार्यस्त्विह सुहृद्यपि ।

छन्नं सन्तिष्ठते वैरं गूढोऽग्निरिव दारुषु ॥ १२.१३९.४४

वैर करणारा मनुण्य जरी मूळचा मित्र असला तरी त्याजवर विश्वास ठेवू नये. कारण, लाकडांत दडून राहिलेल्या अग्नीप्रमाणे वैर गुप्तपणे वसत असते.


२७८ कृतार्था भुञ्जते दूताः पूजां गृह्णन्ति चैव ह ॥ ५.९१.१८

चांगले दूत कामगिरी पार पाडल्यावरच आराम करतात व सत्कार स्वीकारतात.


२७९ कृती सर्वत्र लभते प्रतिष्ठां भाग्यसंयुताम् ।

अकृती लभते भ्रष्टः क्षते क्षारावसेचनम् ॥ १३.६.११

कार्यात सिद्धि पावलेल्या मनुष्याला सर्वत्र मानसन्मान व सद्भाग्य लाभते. यशस्वी न झालेला, जखमेवर खारे पाणी शिंपडावे त्याप्रमाणे तिरस्काराला पात्र होतो.


२८० कृपणं विलपन्नार्तो जरयाभिपरिप्लुतः ।

म्रियते रुदतां मध्ये ज्ञातीनां न स पूरुषः ॥ ९.५.३४

शरीर जरेने व्यापलेले, व्याधिग्रस्त होऊन करुणपणे विलाप करतो आहे आणि आप्तस्वकीय भोवताली बसून रडत आहेत अशा स्थितीत जो मरण पावतो, तो पुरुषच नव्हे.


२८१ कृपणाः फलहेतवः ॥ ६.२६.४९

कर्मफलाची इच्छा करणारे दीन होत.


२८२ के न हिंसन्ति जीवान्वै लोकेऽस्मिन्द्विजसत्तम ।

बहु सञ्चिन्त्य इति वै नास्ति कश्चिदहिंसकः ॥ ३.२०८.३३

(धर्मव्याध म्हणतो।) या मर्त्यलोकांत जीवांची हिंसा कोण करीत नाहीत ? या विषयी पुष्कळ विचार केला असतां (असे दिसून येते की) खरोखर मुळीच हिंसा न करणारा कोणीच नाही.


२८३ को हि जानाति कस्याद्य मृत्युकालो भविष्यति ।

युवैव धर्मशीलास्यादनित्यं खलु जीवितम् ॥ १२.१७५.१६

आज कोणाचा मरणदिवस आहे हे कोण जाणू शकेल ? (अर्थात् कोणीच नाही. या साठी) मनुष्याने तरुणपणीच धर्मपरायण व्हावें. कारण, जीवित हे खरोखर क्षणभंगुर आहे.


२८४ को हि नाम पुमाँल्लोके मर्षयिष्यति सत्त्ववान् ।

सपत्नानृध्यतो दृष्ट्वा हीनमात्मानमेव च ॥ २.४७.३२

आपल्या वैन्यांचा उत्कर्ष होत आहे, आणि आपण मात्र हीनस्थितीत आहों, असें पाहून खरोखर कोणता बाणेदार पुरुष तें सहन करील ?


२८५ कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ६.३३.३१

(श्रीकृष्ण म्हणतात।) अर्जुना, माझा (भगवंताचा) भक्त कधींहि नाश पावत नाही हे तूं पक्के समज.


२८६ क्रव्यादा अपि राजेन्द्र कृतघ्नं नोपभुञ्जते ॥ १२.१७२.२४

हिंस्त्र पशुपक्षीसुद्धां कृतघ्नाला भक्षण करीत नाहीत.


२८७ क्लीबा हि वचनोत्तराः ॥ ५१६२.४४

नामर्द लोक नुसते बोलण्यात शूर असतात.


२८८ क्लेशान्मुमुक्षुः परजात्स वै पुरुष उच्यते ॥ २.४९.१३

शत्रूकडून होणारी पीडा दूर करण्यास झटतो त्यालाच पुरुष म्हणावें.


२८९ क्षताद्भीतं विजानीयादुत्तमं मित्रलक्षणम् ।

ये तस्य क्षतमिच्छन्ति ते तस्य रिपवः स्मृताः ॥ १२.८०.१९

(राजावर) येणाऱ्या संकटाची भीति वाटणे हे (राजाच्या) उत्तम मित्राचें लक्षण होय आणि जे त्याचा नाश इच्छितात ते त्या राजाचे शत्रुच होत.


२९० क्षत्रधर्मं विदित्वाहं यदि ब्राह्मण्यमाश्रितः ।

प्रकुर्या सुमहत्कर्म न मे तत्साधुसंमतम् ॥ १०.३.२२

(अश्वत्थामा कृपाचार्यास म्हणतो.) क्षत्रिय धर्म एकदा पत्करल्यावर जर मी ब्राह्मणधर्माला अनुसरून शमदमादिक मोठमोठी साधनें करीत बसेन, तर ते माझें करणे सज्जनांना पसंत पडणार नाही. ('विदित्वा' म्हणजे जाणून असा नेहमींचा अर्थ असता या ठिकाणी 'पत्करल्यावर' असा अर्थ प्रसंगानें व लक्षणेने घेतला आहे।).


२९१ क्षत्रियस्य मलं भक्ष्यं ब्राह्मणस्याव्रतं मलम् ॥ ८.४५.२३

भिक्षा मागणे हे क्षत्रियाला लांछन आहे, व्रतादिकांचा त्याग करणे हे ब्राह्मणाल लांछन आहे.


२९२ क्षत्रियस्य महाराज जये वृत्तिः समाहिता ।

स वै धर्मस्त्वधर्मो वा स्ववृत्तौ का परीक्षणा ॥ २.५५.७

युद्धांत जय मिळविणे हा क्षत्रियाचा व्यवसाय ठरलेला आहे; मग त्यांत धर्म असो किंवा अधर्म असो. स्वतःच्या व्यवसायाची चिकित्सा करून काय फायदा ?


२९३ क्षत्रियस्य विशेषेण हृदयं वज्रसंनिभम् ॥ १२.२२.९

क्षत्रियाचे अंतःकरण विशेषेकरून वज्रासारखें कठीण असले पाहिजे.


२९४ क्षत्रियस्य सदा धर्मो नान्यः शत्रुनिबर्हणात् ॥ ४.२११४३

सदोदित शत्रूचे पारिपत्य करणे याशिवाय क्षत्रियाचा दुसरा धर्म नाही.


२९५ क्षत्रियस्य हि धर्मोऽयं हन्याद्धन्येत वा पुनः ॥ ७.१९७.३८

एकतर मारावें, नाही तर मरून जावें हाच क्षत्रियाचा धर्म.


२९६ क्षत्रियस्यातिवृत्तस्य ब्राह्मणेषु विशेषतः ।

ब्रह्मैव संनियन्तृ स्यात्क्षत्रं हि ब्रह्मसंभवम् ॥ १२.७८.२१

क्षत्रिय जर आपला धर्म सोडून विशेषतः ब्राह्मणांवर अत्याचार करूं लागेल, तर ब्राह्मणच त्याचे नियमन करील. कारण, क्षत्रिय हा ब्राह्मणापासून उत्पन्न झालेला आहे.


२९७ क्षत्रियाणां बलं तेजो ब्राह्मणानां क्षमा बलम् ॥ १.१७५.२९

क्षत्रियांचे बळ पराक्रम. ब्राह्मणांचे बळ क्षमाशीलता.


२९८ क्षममाणं नृपं नित्यं नीचः परिभवेज्जनः ।

हस्तियन्ता गजस्येव शिर एवारुरुक्षति ॥ १२.५६.३९

राजा सदैव अपराध सहन करूं लागला, म्हणजे निकृष्ट प्रतीचे लोकसुद्धा त्याची अवज्ञा करूं लागतात. (इतकेच नव्हे तर) हत्तीच्या मस्तकावर आरोहण करणाऱ्या महाताप्रमाणे ते त्याच्या डोक्यावर बसण्याची इच्छा करू लागतात.


२९९ क्षमा गुणो ह्यशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ॥ ५.३३.४९

क्षमा हा दुर्बळांचा गुण, व समर्थांचे भूषण होय.


३०० क्षमा प्रशस्यते लोके न तु पापोऽर्हति क्षमाम् ॥ ७.१९८.२६

क्षमा करणे ही गोष्ट लोकांत चांगली समजली जाते. तरीपण पापी मनुष्य क्षमेला पात्र नाही.


३०१ क्षमावन्तं हि पापात्मा जितोऽयमिति मन्यते ॥ ७.१९८.२७

क्षमा करणाऱ्याविषयीं दुष्ट मनुष्याला वाटते की आपण याला जिंकले.


३०२ क्षमावान्निरमर्षश्च नैव स्त्री न पुनः पुमान् ॥ ५.१३३.३३

जो अपमान सहन करतो, ज्याला राग येत नाही तो स्त्रीहि नव्हे, आणि पुरुष तर तो नव्हेच नव्हे !


३०३ क्षात्रो धर्मो ह्यादिदेवात्प्रवृत्तः पश्चादन्ये शेषभूताश्च धर्माः ॥ १२.६४.२१ ब्रह्मदेवापासून क्षात्रधर्म हाच प्रथम उत्पन्न झाला, व नन्तर दुसरे धर्म निर्माण झाले असून ते सर्व त्याचे अङ्गभूत आहेत.


३०४ क्षिप्रं विजानाति चिरं शृणोति

     विज्ञाय चार्थं भजते न कामात् ।

नासंपृष्टो व्युपयुक्ङ्ते परार्थे

     तत्प्रज्ञानं प्रथमं पण्डितस्य ॥ ५.३३.२२

सांगितलेले चटकन् समजणे, दुसऱ्याचे म्हणणे पुरेसा वेळ ऐकून घेणे, इच्छेची पर्वा न करता विचार करून कोणतीहि गोष्ट हाती घेणे आणि कोणी विचारिल्यावांचून दुसऱ्याच्या कामांत न पडणे, हे पंडिताचे मुख्य लक्षण होय.


३०५ क्षुधा निर्णुदति प्रज्ञां धर्मबद्धिं व्यपोहति ।

क्षुधापरिगतज्ञानो धृतिं त्यजति चैव ह ॥ १४.९०.९१

क्षुधा ही बुद्धिभ्रंश करते, धर्मबुद्धि नष्ट करते, आणि क्षुधेच्या योगाने मनुष्याचे ज्ञान पार नाहीसे होऊन त्याचे धैर्य गळून जाते.


३०६ क्षेत्रं पुरुषकारस्तु दैवं बीजमुदाहृतम् ।

क्षेत्रबीजसमायोगात्ततः सस्यं समृध्यते ॥ १३.६.८

उद्योग हे शेत व दैव हे बी आहे (उद्योगरूप) शेत व (दैवरूप) बी यांचा संयोग झाला म्हणजे उत्तम प्रकारचे (यशोरूपी) पीक येते.


३०७ खरीवात्सल्यमाहुस्तनिःसामर्थ्यमहेतुकम् ॥ ५.१३५.८

जे निष्कारण आणि निरुपयोगी वात्सल्य त्याला गाढवीचें प्रेम म्हणतात.


३०८ गतोदके सेतुबन्धो यादृक्तादृङ्मतिस्तव ।

सन्दीप्ते भवने यद्वत्कूपस्य खननं तथा ॥ ६.४९.२३

(पांडवांशी युद्धाचा प्रसंग आणूं नको, म्हणून मी दुर्योधनाला परोपरीने सांगितले असें धृतराष्ट्राने म्हटले त्यावर संजयाने दिलेले हे उत्तर आहे.) पाणी वाहून गेल्यावर बंधारा बांधावा, किंवा घराला आग लावल्यावर विहीर खणूं लागावे त्यासारखा हा तुझा विचार आहे.


३०९ गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रसङ्ग्रहैः ।

या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता ॥ ६.४३.१

एकट्या गीतेचे चांगले अध्ययन करावें. इतर भाराभर शास्त्रांची गीतेपुढे काय मातब्बरी ? गीता ही प्रत्यक्ष पद्मनाभ जो परमात्मा श्रीकृष्ण त्याच्या मुखकमलातून बाहेर पडलेली आहे.


३१० गुणयुक्तेऽपि नैकस्मिन्विश्वसेत विचक्षणः ॥ १२.२४.१८

गुणसंपन्न अशाहि एकट्या मनुष्यावर शहाण्याने विश्वास ठेवू नये.


३११ गुणानामेव वक्तारः सन्तः सत्सु नराधिप ॥ १२.१३२.१३

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) सज्जन हे सज्जनांचे गुण तेवढेच सांगत असतात.


३१२ गुणान्गुणवतां शल्य गुणवान्वेत्ति नागुणः ॥ ८.४०.०२

(कर्ण म्हणतो।) हे शल्या, गुणवान् लोकांच्या गुणांची पारख स्वतः गुणी असलेल्यालाच होत असते; गुणहीन असलेल्याला होत नाही.


३१३ गुरुरात्मवतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् ।

अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ॥ ५.३५.७१

सुष्टांचा शास्ता गुरु, आणि दुष्टांना शासन करणारा राजा होय. परंतु चोरून पापे करणाऱ्यांना शिक्षा करणारा विवस्वानाचा पुत्र यम हाच होय.


३१४ गुरुलाघवमादाय धर्माधर्मविनिश्चये ।

यतो भूयांस्ततो राजन्कुरुष्व धर्मनिश्चयम् ॥ ३.१३१.१३

(ससाण्याच्या रूपाने आलेला इंद्र शिबिराजाला म्हणतो.) हे राजा, धर्म कोणता व अधर्म कोणता, याचा निर्णय करितांना तारतम्य पाहून त्यांतल्या त्यांत जो अधिक श्रेयस्कर दिसेल तोच धर्म, असें निश्चित समज.


३१५ गुरुशुश्रुषया ज्ञानं शान्तिं योगेन विन्दति ॥ ५.३६.५२

गुरुशुश्रूषेनें ज्ञान आणि योगाने शांति मिळते.


३१६ गुरूणामवमानो हि वध इत्यभिधीयते ॥ ८.७०.५१

गुरुजनांचा अपमान करणे म्हणजे त्यांचा वधच करणे होय !


३१७ गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः ।

उत्पथप्रतिपन्नस्य न्याय्यं भवति शासनम् ॥ १.१४०.५४

गर्वाने फुगून गेलेला, कार्य कोणते अकार्य कोणते हे न जाणणारा, व दुर्मार्गाने चालणारा गुरु जरी असला तरी त्याला शिक्षा करणे न्याय्य आहे.


३१८ गृध्रदृष्टिर्बकालीनः श्वचेष्टः सिंहविक्रमः ।

अनुद्विग्नः काकशङ्की भुजङ्गचरितं चरेत् ॥ १२.१४०.६२

(कार्यसाधु पुरुषाने) गिधाडासारखी दूरदृष्टि ठेवावी, बगळ्याप्रमाणे निश्चल रहावे, कुत्र्यासारखें सावध असावे, सिंहासारखा पराक्रम गाजवावा. निर्भय राहून कावळ्याप्रमाणे साशंक असावें, व सर्पासारखें नागमोडी वर्तन ठेवावें.


३१९ गृहस्थस्त्वेष धर्माणां सर्वेषां मूलमुच्यते १२.२३४.६

गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्माचा मूळ आधार आहे


३२० गौरवेण परित्यक्तं निःस्नेहं परिवर्जयेत् ।

सोदर्यं भ्रातरमपि किमुतान्यं पृथग्जनम् ॥ १२.२९२.१२

सख्खा भाऊ जरी असला तरी त्याचे पूर्वीचे महत्त्व जाऊन तो शुष्क पडला, त्याचे द्रव्य संपले म्हणजे इतर बांधव त्याच्या वाऱ्यासही उभे रहात नाहीत. मग इतर सामान्य लोकांची गोष्ट कशाला ?


३२१ ग्रस्यतेऽकर्मशीलस्तु सदानर्थैरकिञ्चनः ॥ १२.१३९.८३

उद्योग न करणाऱ्या दरिद्री मनुष्यावर संकटे नेहमी कोसळत असतात.


३२२ चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलबद्दढम् ।

तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ६.३०.३४

(अर्जुन म्हणतो) हे श्रीकृष्णा, मन हे चंचल, (इंद्रियांना विषयांकडे) जबरदस्तीने ओढून नेणारें बलिष्ठ आणि दृढ आहे. त्याचा निग्रह करणे हे वाऱ्याची मोट. बांधण्याप्रमाणे मला अत्यंत कठीण वाटते.


३२३ चण्डालत्वेऽपि मानुष्यं सर्वथा तात शोभनम् ॥ १२.२९७.३१

(पराशर मुनि जनक राजाला म्हणतात) बाबारे, चांडाळयोनीत का होईना, पण मनुष्याचा जन्म येणे हे सर्वात उत्तम.


३२४ चतुर्वेदोऽपि दुर्वृत्तः स शूद्रादतिरिच्यते ॥ ३.३१३.१११

चारी वेद पढलेला असला तरी दुर्वर्तनी असेल तर तो शूद्रापेक्षांहि कनिष्ठ समजावा.


३२५ चत्वारि यस्य द्वाराणि सुगुप्तान्यमरोत्तमाः ।

उपस्थमुदरं हस्तौ वाक्चतुर्थी स धर्मवित् ॥ १२.२९९.२८

(हंसरूपाने आलेला ब्रह्मदेव म्हणतो।) देव हो, उपस्थ, उदर, हात व चवथी वाणी ही चार द्वारें जो दाबांत ठेवतो तो धर्म जाणणारा होय.


३२६ चराणामचरा ह्यन्नमदंष्टा दंष्ट्रिणामपि ।

आपः पिपासतामन्नमन्नं शूरस्य कातराः ॥ १२.९९.१५

स्थावर पदार्थ हे जंगम प्राण्यांचे अन्न होय. तसेंच दाढा नसलेले प्राणी दाढा असलेल्यांचे. पाणी हे तहानेलेल्यांचे अन्न. तसेंच भित्रे लोक शूराचे भक्ष्य होत.


३२७ चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ॥ ६.२८.१३

(भगवान् श्रीकृष्ण म्हणतात) गुण आणि कर्म यांच्या अनुरोधाने चातुर्वर्ण्य मीच उत्पन्न केलें.


३२८ चारैः पश्यन्ति राजानः ॥ ५.३४.३४

राजे लोक हेरांच्या द्वारे पहात असतात.


३२९ चिरं ह्यपि जडः शूरः पण्डितं पर्युपास्य ह ।

न स धर्मान्विजानाति दर्वी सूपरसानिव ॥ १०.५.३

जो बुद्धीचा जड तो धिमेपणाने फार दिवस जरी एकाद्या पंडिताजवळ राहिला तरी, पक्वान्नांतील पळीला पक्वान्नाची गोडी जशी कळत नाही, तसा त्याला धर्मतत्त्वांच बोध म्हणून होत नाही !


३३० चिरकारी हि मेधावी नापराध्यति कर्मसु ॥ १२.२६६.३

विचारपूर्वक फार वेळानें काम करणारा बुद्धिमान् मनुष्य कामांत चुकत नाही.


३३१ जरामृत्यू हि भूतानां खादितारौ वृकाविव ।

बलिनां दुर्बलानां च ह्रस्वानां महतामपि ॥ १२.२८.१४

सबळ दुर्बळ, लहान थोर, सर्व प्राण्यांना जरा व मरण ही लांडग्यांप्रमाणे खाऊन टाकितात.


३३२ जरा रूपं हरति हि धैर्यमाशा

     मृत्युः प्राणान्धर्मचर्यामसूया ।

क्रोधः श्रियं शीलमनार्यसेवा

     ह्रियं कामः सर्वमेवाभिमानः ॥ ५.३५.५०

वार्धक्य रूपाचा नाश करते; आशा धैर्याचा, मृत्यु प्राणांचा, मत्सर धर्माचरणाचा, क्रोध लक्ष्मीचा, दुर्जनसेवा शीलाचा, विषयेच्छा विनयाचा, आणि अभिमान सर्वस्वाचा नाश करतो.


३३३ जलौकावत्पिबेद्राष्ट्रं मृदुनैव नराधिपः ।

व्याघ्रीव च हरेत्पुत्रान् सन्दशेन्न च पीडयेत् ॥ १२.८८.५

एकाद्या जळूप्रमाणे राजाने सौम्यपणानेच राष्ट्रातील द्रव्य कराच्या रूपाने घ्यावे. वाघीण जशी पिलांना आपले दांत लागू न देतां उचलून नेते, त्याप्रमाणे प्रजेला त्रास न होईल अशा बेताने तिजपासून कर व्यावा.


३३४ जातमन्वेति मरणं नृणामिति विनिश्चयः ॥ १२.२९७.२२

मनुष्य जन्मास आल्याबरोबर मरण त्याच्या पाठोपाठ येते हे निश्चित होय.


३३५ जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।

तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ ६.२६.२७

(श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना,) जन्मास आलेल्याला मरण ठेवलेलेच आहे; तसेच मेलेल्याला पुनः जन्म ठेवलेलाच. यासाठी, या अपरिहार्य असलेल्या गोष्टीबद्दल शोक करणे तुला शोभत नाही.


३३६ जिता सभा वस्त्रवता मिष्टाशा गोमता जिता ।

अध्वा जितो यानवता सर्वं शीलवता जितम् ॥ ५.३४.४७

चांगली वस्त्रे परिधान करणाऱ्याला सभेमध्ये मान मिळतो. गाई बाळगणाऱ्या मनुष्याची मिष्टान्न खाण्याची हौस सिद्धीस जाते. ज्याच्यापाशी वाहन असते त्याला मार्ग सहज आक्रमण करता येतो. आणि शीलवान् पुरुषाचे सर्वच काही सिद्धीस जाते.


३३७ जीर्णमन्नं प्रशंसन्ति भार्यां च गतयौवनाम् ।

शूरं विजितसङ्ग्रामं गतपारं तपस्विनम् ॥ ५.३५.६९

खाल्लेल्या अन्नाची प्रशंसा ते पचल्यावर करावी. तसेच स्त्रीची तारुण्य उलटून गेल्यावर, शूराची लढाई जिंकल्यावर, आणि तपस्व्याची तपःसमाप्तीनंतर प्रशंसा करावी.


३३८ जीर्यन्ति जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः ।

चक्षुःश्रोत्रे च जीर्येते तृष्णैका न तु जीर्यते ॥ १३.७.२४

वार्धक्याने शरीर जर्जर झाले म्हणजे केस जीर्ण होतात, दांत जीर्ण होतात, डोळे आणि कानहि जीर्ण होतात; परंतु एकटी तृष्णा (लोभ) मात्र जीर्ण होत नाही !


३३९ जीवन्भद्राणि पश्यति ॥ ४.३८.४२

कोणी झाला तरी आधी जगेल तेव्हा मग चांगले दिवस पाहणार !


३४० ज्ञातयो वर्धनीयास्तैर्य इच्छन्त्यात्मनः शुभम् ॥ ५.३९.१८

स्वतःचे कल्याण व्हावे असे जे इच्छितात त्यांनी अगोदर आपल्या आप्तेष्टांचा उत्कर्ष करावा.


३४१ ज्ञानं तत्त्वार्थसंबोधः ॥ ३.३१३.९०

ज्ञान म्हणजे आत्मतत्त्वाचा बोध होणे.


३४२ ज्यायांसमपिचेद्वद्धं गुणैरपि समन्वितम् ।

आततायिनमायान्तं हन्याद्धातकमात्मनः ॥ ६.१०७.१०१

मारण्याच्या इच्छेने आपल्या अंगावर धावून येणारा आततायी मनुष्य वयाने मोठा असला, किंबहुना वृद्ध असला, आणि गुणसंपन्न जरी असला तरी त्यास ठार करावें.


३४३ तदा स वृद्धो भवति तदा भवति दुःखितः ।

तदा शून्यं जगत्तस्य यदा मात्रा वियुज्यते ॥ १२.२६६.३०

ज्यावेळी मनुष्याला मातेचा वियोग होतो त्यावेळीच तो खरा वृद्ध होतो, त्यावेळींच तो खरा दुःखी होतो आणि त्यावेळीच त्याला सर्व जग शन्य वाटते !


३४४ तदेवासनमन्विच्छेद्यत्र नाभिपतेत्परः ॥ ४.४.१३

ज्या ठिकाणी दुसरा कोणी येणार नाही (व ऊठ म्हणून म्हणणार नाही) अशीच जागा शोधून काढावी.


३४५ तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ६.२८.३४ (श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना,) प्रणाम केल्याने, परोपरीने प्रश्न विचारिल्याने आणि सेवा केल्याने तत्त्वद्रष्टे ज्ञानी लोक तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील असे समज.


३४६ तपः श्रुतं च योनिश्चाप्येतद्ब्राह्मण्यकारणम् ।

त्रिभिर्गुणैः समुदितस्ततो भवति वै द्विजः ॥ १३.१२१.१७

तप, वेदाध्ययन व ब्राह्मणकुलांत जन्म यांच्या योगाने ब्राह्मण्य प्राप्त होते. या तीन गुणांनी युक्त असेल तरच तो द्विज या संज्ञेला पात्र होतो.


३४७ तपसा प्राप्यते स्वर्गस्तपसा प्राप्यते यशः ।

आयुः प्रकर्षों भोगाश्च लभ्यन्ते तपसा विभो ॥ १३.५७.८

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात,) तपाने स्वर्ग मिळतो, तपाने यश प्राप्त होतें, आयुष्य, वैभव आणि सर्वप्रकारच्या उपभोग्य वस्तु तपाने प्राप्त होतात.


३४८ तपसा लभ्यते सर्वम् ॥ १२.१५३.३४

तपाने सर्व काही प्राप्त करून घेता येते.


३४९ तपसा विन्दते महत् ॥ ३.३१३.४८

तपाच्या योगाने मनुष्य महत्पदाला पोचतो.


३५० तपः स्वधर्मवर्तित्वम् ॥ ३.३१३.८८

तप म्हणजे स्वधर्माप्रमाणे वागणे.


३५१ तपोर्थीयं ब्राह्मणी धत्त गर्भं

     गौर्वोढारं धावितारं तुरङ्गी ।

शूद्रा दासं पशुपालं च वैश्या

     वधार्थीयं क्षत्रिया राजपुत्री ॥ ११.२६.५

ब्राह्मणस्त्री गर्भ धारण करते तो त्याने (जन्माला येऊन) तप करावे म्हणून, गाईने ओझी वाहणारा, घोडीने धावणारा, शूद्रस्त्रीने दास्यकर्म करणारा, वैश्य स्त्रीने गुरे राखणारा आणि क्षत्रिय राजकन्येने युद्धांत मरून जाणारा, गर्भ धारण केलेला असतो.


३५२ तरसा ये न शक्यन्ते शस्त्रैः सुनिशितैरपि ।

साम्ना तेऽपि निगृह्यन्ते गजा इव करेणुभिः ॥ १२.१३९.३९

जबरदस्तीने अथवा तीक्ष्ण शस्त्रांच्या योगानेंहि ज्यांना दाबांत ठेवितां येत नाही ते सुद्धा, हत्ती हत्तिणींना वश होतात त्याप्रमाणे, सामोपचाराने वश करितां येतात.


३५३ तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना

     नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् ।

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां

     महाजनो येन गतः स पन्थाः ॥ ३.३१३.११७

(धर्मतत्त्वाचा विचार करू लागले असता) युक्तिवाद लंगडा पडतो, श्रुतिवाक्ये पहावी तर ती निरनिराळ्या प्रकारची आहेत, ज्याचे मत सर्वांना प्रमाण आहे असा एकहि ऋषि आढळून येत नाही. तात्पर्य, धर्माचे तत्त्व गुहेत दडलेले आहे (म्हणजे अत्यंत गूढ आहे) अशा स्थितीत, थोर लोक ज्या मार्गाने गले तोच मार्ग उत्तम !


३५४ तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ॥ ६.४.२४

(श्रीकृष्ण म्हणतात।) अर्जुना, कार्य कोणतें, अकार्य कोणते याचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्रच प्रमाण मानिले पाहिजे.


३५५ तृणानि भूमिरुदकं वाक्चतुर्थी च सूनृता ।

सतामेतानि गेहेषु नोच्छिद्यन्ते कदाचन ॥ ५.३६.३४

गवताचें आसन, स्वच्छ जागा, पाणी आणि चौथे सत्य व प्रिय भाषण या चार गोष्टींची तरी सजनांच्या घरी केव्हांहि वाण पडत नाही.


३५६ तेजसोर्हि द्वयोर्देवाः सख्यं वै भविता कथम् ॥ ५.१०.२२

('तूं इंद्राशी सख्य कर' असे सांगण्याकरिता आलेल्या देवांना वृत्रासुर म्हणतो) देवहो, दोन तेजस्वी पुरुषांचे सख्य कसे व्हावयाचें ?


३५७ त्यजन्ति दारान्पुत्रांश्च मनुष्याः परिपूजिताः ॥ १२.९१.५३

मनुष्यांचा बहुमान केला म्हणजे ते आपल्या स्त्रीपुत्रांचाहि त्याग करण्यास तयार होतात.


३५८ त्यजेत्कुलार्थे पुरुषं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।

ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥ ५.३७.१७

(प्रसंग पडल्यास) कुलाच्या रक्षणाकरितां कुलांतील एका मनुष्याचा त्याग करावा. सबंध ग्रामाकरितां एका कुळाची पर्वा करू नये. देशाकरिता एका गांवावरहि उदक सोडावें. आणि आत्मकल्याणाकरितां सर्वे पृथ्वीचाहि त्याग करावा.


३५९ त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् ॥ ६.४०.२१

काम, क्रोध व लोभ ही तीन आत्मनाश करणारी नरकाची द्वारे होत. तस्मात् या तिहींचाही त्याग करावा.


३६० त्रीण्येव तु पदान्याहुः पुरुषस्योत्तमं व्रतम् ।

न द्रुह्येच्चैव दद्याच्च सत्यं चैव परं वदेत् ॥ १३.१२०.१०

तीनच गोष्टींना पुरुषाचे उत्तम व्रत असे म्हटले आहे. त्या म्हणजे, मत्सर करूं नये, दान करावें, आणि श्रेष्ठ असें सत्यच बोलावें।.


३६१ त्वमित्युक्तो हि निहतो गुरुर्भवति भारत ॥ ८.६९.८३

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) गुरूला 'तूं' असे संबोधिलें म्हणजे त्याचा वध केल्यासारखेच झाले.


३६२ दण्ड एव हि राजेन्द्र क्षत्रधर्मो न मुण्डनम् ॥ १२.२३.४७

(व्यासमुनि युधिष्ठिराला म्हणतात।) दंडन हाच क्षत्रियाचा धर्म आहे; मुंडन नव्हे !


३६३ दण्डनीत्यां यदा राजा सम्यक्कार्त्स्न्येन वर्तते ।

तदा कृतयुगं नाम कालसृष्टं प्रवर्तते ॥ १२.६९.८०

जेव्हां राजा योग्य रीतीने आणि पूर्णपणे दंडनीतीच्या अनुरोधाने चालतो, तेव्हां कालनिर्मित अशा कृतयुगाची प्रवृत्ति होते.


३६४ दण्डश्चेन्न भवेल्लोके विनश्येयुरिमाः प्रजाः ।

जले मत्स्यानिवाभक्ष्यन् दुर्बलान्बलवत्तराः ॥ १२.१५.३०

जगात जर दंड नसता तर प्रजा नाश पावल्या असत्या. पाण्यातील माशांप्रमाणे बलवत्तर लोकांनी दुर्बळांना खाऊन टाकले असते.


३६५ दण्डः शास्ति प्रजाः सर्वा दण्ड एवाभिरक्षति ।

दण्डः सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधाः ॥ १२.१५.२

दंड हाच सर्व प्रजेला वळण लावतो. दंडच सर्वांचे रक्षण करतो. सर्व लोक झोंपी गेले तरी दंड जागा राहतो. म्हणूनच दंड हाच धर्म आहे असें ज्ञानी लोक समजतात.


३६६ दण्डस्यैव भयादेके न खादन्ति परस्परम् ।

अन्धे तमसि मज्जेयुर्यदि दण्डो न पालयेत् ॥ १२.१५.७

दंडाच्याच भीतीमुळे काही प्राणी परस्परांना खाऊन टाकीत नाहीत. जर दंडशक्तीने लोकांचे रक्षण केले नाही तर ते घोर अंधकारांत बुडून जातील.


३६७ दत्तभुक्तफलं धनम् ॥ ५.३९.६७

दान करणे व भोग्य वस्तूंचा उपभोग घेणे हे धनाचे फळ होय.


३६८ दया सर्वसुखैषित्वम् ॥ ३.३१३.९०

दया म्हणजे सर्वांना सुख व्हावे अशी इच्छा.


३६९ दर्पो नाम श्रियः पुत्रो जज्ञेऽधर्मादिति श्रुतिः ॥ १२.९०.२६

दर्प हा लक्ष्मीचा पुत्र आहे; तो तिला अधर्मापासून झाला असें ऐकण्यात येतें.


३७० दाक्ष्यमेकपदं धर्म्यं दानमेकपदं यशः ।

सत्यमेकपदं स्वर्ग्यं शीलमेकपदं सुखम् ॥ ३.३१३.७०

दक्षता हेच धर्माचे मुख्य कारण होय. दान हेंच यशःप्राप्तीचे मुख्य साधन होय. सत्य हेच स्वर्गप्राप्तीचे मुख्य साधन हाय।आणि शील हेच सुखाचे मुख्य निधान होय.


३७१ दानपथ्यौदनो जन्तुः स्वकर्मफलश्नुमते ॥ १२.२९८.३९

दान हेच मनुष्याला परलोकींच्या मार्गात शिदोरीप्रमाणे उपयोगी पडते. प्राण्याला स्वतःच्याच कर्माचे फळ मिळत असते.


३७२ दानमेव हि सर्वत्र सान्त्वेनानभिजल्पितम् ।

न प्रीणयति भूतानि निर्व्यञ्जनमिवाशनम् ॥ १२.८४.७

दान झाले तरी गोड शब्द बोलून केले नाही, तर तें, तोंडी लावण्यावांचून दिलेल्या भोजनाप्रमाणे लोकांच्या मनाला आनंद देत नाही.


३७३ दानं मित्रं मरिष्यतः ॥ ३.३१३.६४

दान हा मरणोन्मुख झालेल्याचा मित्र होय.


३७४ दाने तपसि सत्ये च यस्य नोच्चरितं यशः ।

विद्यायामर्थलाभे वा मातुरुच्चार एव सः ॥ ५.१३३.२४

दान, तप, सत्यभाषण, विद्या किंवा संपत्ति यांपैकी कोणत्याहि बाबतींत ज्याची कीर्ति कोणी गात नाही तो आपल्या मातेचा केवळ मलोत्सर्ग होय. (म्हणजे त्याच्या जन्माच्या रूपाने त्याच्या आईने केवळ आपल्या पोटांतील घाण बाहेर टाकली।)


३७५ दान्तस्य किमरण्येन तथाऽदान्तस्य भारत ।

यत्रैव निवसेद्दान्तस्तदरण्यं स चाश्रमः ॥ १२.१६०.३६

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) इंद्रिये स्वाधीन असल्यावर अरण्यांत जाण्याची गरज काय ? व नसल्यावर जाऊन उपयोग काय ? जितेंद्रिय पुरुष ज्या ठिकाणी वास्तव्य करील तेच त्याचे अरण्य व तोच त्याचा आश्रम.


३७६ दुरन्वयं दुष्प्रधर्षं दुरापं दुरतिक्रमम् ।

सर्वं वै तपसाभ्येति तपो हि बलवत्तरम् ॥ १३.१२२.१८

दुस्तर, अजिंक्य, प्राप्त होण्यास कठीण, अनुल्लंघनीय असे सर्व काही तपाच्या योगाने साध्य होते. खरोखर तप हे अत्यंत सामर्थ्यवान आहे.


३७७ दूताः किमपराध्यन्ते यथोक्तस्यानुभाषिणः ॥ ५.१६२.३९

सांगितलेला निरोप कळविणाऱ्या दूतांचा तसे करण्यांत काय बरें अपराध आहे ?


३७८ देशकालौ समासाद्य विक्रमेत विचक्षणः ।

देशकालव्यतीतो हि विक्रमोनिष्फलोभवेत् ॥ १२.१४०.२८

देशकालांची अनुकूलता पाहून शहाण्याने पराक्रम गाजवावा. कारण योग्य देश आणि योग्य काल निघून गेल्यावर केलेला पराक्रम निष्फल होतो.


३७९ दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ॥ ६.४०.५

दैवी संपत्ति मोक्षाला, व आसुरी संपत्ति बंधनाला, कारणीभूत होते.


३८० दौष्कुलेयाश्च लुब्धाश्च नृशंसा निरपत्रपाः ।

ते त्वां तात निषेवेयुर्यावदार्द्रकपाणयः ॥ १२.८३.७

(भीष्म सांगतात) बा युधिष्टिरा, हलक्या कुळांत जन्मलेले, लोभी, दुष्ट, निर्लज्ज असे जे लोक आहेत, ते त्यांचा हात ओला होत आहे (अर्थात् त्यांना द्रव्यादिक पोचत आहे) तोपर्यंतच तुझी सेवा करतील.


३८१ द्रव्यागमो नृणां सूक्ष्मः पात्रे दानं ततः परम् ।

कालः परतरो दानाच्छ्रद्धा चैव ततः परा ॥ १४.९०.९४

द्रव्य संपादन करणे ही गोष्ट कमी महत्त्वाची आहे. सत्पात्री केलेल्या दानाची योग्यता त्याहून जास्त आहे. योग्य काळी दान करणे हे त्यापेक्षाहि श्रेष्ठ. आणि श्रद्धा ही तर त्याहिपेक्षा श्रेष्ठ आहे.


३८२ द्रोहाद्देवैरवाप्तानि दिवि स्थानानि सर्वशः ॥ १२.८.२८

द्रोहाच्याच योगाने देवांनी स्वर्गातील सर्व स्थाने संपादन केली.


३८३ द्वावम्भसि निवेष्टव्यौ गले बद्धा दृढां शिलाम् ।

धनवन्तमदातारं दरिद्रं चातपस्विनम् ॥ ५.३३.६०

धनवान् असून दान न करणाराआणि दरिदी असून तपश्चर्या न करणारा या दोघांना गळ्यात मोठी धोंड बांधून पाण्यात बुडवून टाकावें.


३८४ द्वाविमौ कण्टको तीक्ष्णौ शरीरपरिशोषिणौ ।

यश्चाधनः कामयते यश्च कुप्यत्यनीश्वरः ॥ ५.३३.५६

निर्धन असून चैनीची इच्छा करणे व अंगांत सामर्थ्य नसतां रागावणे हे दोन शरीरातील रक्त अगदी नाहीसे करून टाकणारे तीक्ष्ण कांटे होत.


३८५ द्वे कर्मणी नरः कुर्वन्नस्मिँल्लोके विरोचते ।

अब्रुवन्परुषङ्किञ्चिदसतोऽनर्चयंस्तथा ॥ ५.३३.५४

दोन गोष्टी करणारा मनुष्य या लोकी योग्यतेस चढतो. यत्किचितहि कठोर न बोलणे आणि दुर्जनांचा गौरव न करणे.


३८६ द्वेष्यो न साधुर्भवति न मेधावी न पण्डितः ।

प्रिये शुभानि कार्याणि द्वेष्ये पापानि चैव ह ॥ ५.३९.४

जो ज्याच्या द्वेषास पात्र झालेला असतो तो त्याला सज्जन, बुद्धिमान् अथवा शहाणा वाटत नाही. कारण, प्रिय असलेल्या मनुष्याची कृत्ये सर्व काही चांगली, आणि द्वेषास पात्र झालेल्या मनुष्याची कृत्ये सर्व काही वाईट (समजणे ही सामान्य लोकांची रीतच आहे।)


३८७ ह्यक्षरस्तु भवेन्मृत्युस्त्य्रक्षरं ब्रह्म शाश्वतम् ।

ममेति च भवेन्मृत्युर्न ममेति च शाश्वतम् ॥ १२.१३.४

दोन अक्षरे म्हणजे मृत्यु व तीन अक्षरे म्हणजे शाश्वत ब्रह्म होय. 'मम' म्हणजे माझे असें मानिल्याने मृत्यु, आणि 'न मम' म्हणजे माझें नव्हे असें मानिल्याने शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होते.


३८८ धनं लभेत दानेन मौनेनाज्ञां विशाम्पते ।

उपभोगांश्च तपसा ब्रह्मचर्येण जीवितम् ॥ १३.७.१४

दान करून धन मिळवावे, मौनाने, लोकांनी आपल्या आज्ञेप्रमाणे वागणे, तपश्चयेने उपभोग आणि ब्रह्मचर्याने (दीर्घ) जीवित ही प्राप्त करून घ्यावी,


३८९ धननाशेऽधिकं दुःखं मन्ये सर्वमहत्तरम् ।

ज्ञातयो ह्यवमन्यन्ते मित्राणि च धनाच्युतम् ॥ १२.१७७.३४

(वैराग्य संपन्न मंकि म्हणतो) मला वाटतें, द्रव्यनाशाचे दुःख सर्वात अत्यंत अधिक, कारण नातलग व मित्रहि द्रव्य नष्ट झालेल्याचा अपमान करितात.


३९० धनमाहुः परं धर्मं धने सर्व प्रतिष्ठितम् ।

जीवन्ति धनिनो लोके मृता ये त्वधना नराः ॥ ५.७२.२३

धन मिळविणे हा श्रेष्ठ धर्म होय असें म्हणतात. धनावरच सर्व काही अवलंबून आहे. धनसंपन्न लोकच जगांत जिवंत असतात. धनहीन पुरुष मेल्यातच जमा.


३९१ धनात्कुलं प्रभवति धनाद्धर्मः प्रवर्धते ।

नाधनस्यास्त्ययं लोको न परः पुरुषोत्तम ॥ १२.८.२२

(अर्जुन युधिष्ठराला म्हणतो) हे नरश्रेष्ठा, धनाच्या योगानें कुळाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते. निर्धनाला ना इहलोक ना परलोक.


३९२ धनेन किं यन्न ददाति नाश्नुते

     बलेन किं येन रिपुं न बाधते ।

श्रुतेन किं येन न धर्ममाचरेत्

     किमात्मना यो न जितेन्द्रियो वशी ॥ १२.३२१.९३

ज्याचा दान करण्याकडे किंवा भोगण्याकडे उपयोग केला जात नाही ते धन काय कामाचें ? ज्याच्या योगाने शत्रूला त्रास दिला जात नाही त्या बळाचा काय उपयोग? धर्मानुष्ठान नाही तर विद्येची काय किंमत ? आणि जो जितेन्द्रिय, मनोनिग्रही नाहीं तो जीव काय करावयाचा ?


३९३ धनेनाधर्मलब्धेन यच्छिद्रमपिधीयते ।

असंवृतं तद्भवति ततोऽन्यदवदीर्यते ॥ ५.३५.७०

अन्यायाने मिळविलेल्या द्रव्याने एकादें व्यंग झांकले तर ते खरोखर झांकलें जात नाहींच, परंतु त्यापासून आणखीहि एक उत्पन्न होते.


३९४ धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तमं श्रुतम् ।

लाभानां श्रेय आरोग्यं सुखानां तुष्टिरुत्तमा ॥ ३.३१३.७४

धन मिळविण्याच्या साधनांत दक्षता सर्वात श्रेष्ठ आहे. धनांमध्ये उत्तम धन विद्या. सर्व लाभांत उत्कृष्ट लाभ म्हणजे आरोग्य. आणि सर्व सुखांत संतोष श्रेष्ठ.


३९५ धर्म एको मनुष्याणां सहायः पारलौकिकः ॥ १३.११.१७

एकटा धर्मच मनुष्यांचा परलोकांतील सोबती आहे.


३९६ धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ॥ ३.३१३.१२८

आपण धर्माचा घात केला तर धर्मच आपला घात करतो. आणि आपण धर्माचें रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करतो.


३९७ धर्मं यो बाधते धर्मो न स धर्मः कुवर्त्म तत् ।

अविरोधात्तु यो धर्मः स धर्मः सत्यविक्रम ॥ ३.१३१.११

(ससाण्याच्या रूपाने आलेला इंद्र शिबि राजाला म्हणतो) ज्याच्या योगाने खऱ्या धर्माला बाध येतो तो धर्मच नव्हे, तो कुमार्ग होय. ज्याचा खऱ्या धर्माशी विरोध येत नाही तोच धर्म.


३९८ धर्म संहरते तस्य धनं हरति यस्य सः ।

ह्रियमाणे धने राजन्वयं कस्य क्षमेमहि ॥ १२.८.१३

(भीम युधिष्ठिराला म्हणतो।) जो ज्याचे द्रव्य हरण करतो त्याने त्याच्या धर्माचाच उच्छेद केल्यासारखे होते राजा, आमच्या द्रव्याचा अपहार होऊ लागला तर आम्ही कोणाला क्षमा करावी काय ?


३९९ धर्म हि यो वर्धयते स पण्डितो

य एव धर्माच्च्य वते स मुह्यति ॥ १२.३२१.७८

धर्माची जो वाढ करतो तोच पंडित. जो धर्मापासून च्युत होतो तो मोहांत सापडला असे समजावें.


४०० धर्मनित्यास्तु ये केचिन्न ते सीदन्ति कर्हिचित् ॥ ३.२६३.४४

सदोदित धर्माने जे वागतात त्यांचा कधीहि नाश होत नाही.


४०१ धर्ममूलः सदैवार्थः कामोऽर्थफलमुच्यते ॥ १२.१२३.४

केव्हां झालें तरी अर्थप्राप्तीचें मूळ धर्म होय. काम (म्हणजे इष्टप्राप्ति) हे अर्थाचें फळ होय.


४०२ धर्मं पुत्र निषेवस्व सुतीक्ष्णौ च हिमातपौ ।

क्षुत्पिपासे च वायुं च जय नित्यं जितेन्द्रियः ॥ १२.३२.४

(व्यास मुनि शुकाला सांगतात।) हे पुत्रा, तूं धर्माचरणाने वाग, नेहमी जितेंद्रिय राहून कडक थंडी व ऊन, तहान व भूक, आणि प्राणवायु यांना जिंक (म्हणजे सहन करण्यास शीक).


४०३ धर्मं पूर्वे धनं मध्ये जघन्ये काममाचरेत ।

अहन्यनुचरेदेवमेष शास्त्रकृतो विधिः ॥ ३.३३.४०

दिवसाच्या पूर्वभागांत धर्मानुष्ठान, मध्यभागात द्रव्यसंपादन व शेवटल्या भागांत विषयसेवन करावे. याप्रमाणे प्रत्यहीं वागावे हा शास्त्रोक्त विधि आहे.


४०४ धर्मव्युच्छित्तिमिच्छन्तो येऽधर्मस्य प्रवर्तकाः ।

हन्तव्यास्ते दुरात्मानो देवैर्दैत्या इवोल्बणाः ॥ १२.३३.३०

जे धर्माचा उच्छेद करूं पाहतात व अधर्माचा प्रसार करतात अशा दुरात्म्यांना, देवानी महाभयंकर अशा दैत्यांना ठार मारले त्याप्रमाणे, ठार मारावें.


४०५ धर्मश्च सूक्ष्मो निपुणोपलक्ष्यः ॥ २.६७.३८

सूक्ष्म अशा धर्माचे बारकाईने परीक्षण करावें.


४०६ धर्मश्चार्थेन महता शक्यो राजनिषेवितुम् ॥ ३.३३.४८

(भीम युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, धर्माचे आचरण विपुल द्रव्याच्याच योगाने करता येणे शक्य आहे.


४०७ धर्मस्य निष्ठात्वाचारस्तमेवाश्रित्य भोत्स्यसे ॥ १२.२५९.६

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) धर्माचा आधार आचार होय. त्याचाच आश्रय केल्यावर तुला धर्माचे ज्ञान होईल.


४०८ धर्मः सत्यं तथा वृत्तं बलं चैव तथाप्यहम् ।

शीलमूला महाप्राज्ञ सदा नास्त्यत्र संशयः ॥ १२.१२४.६२

(लक्ष्मी प्रहादास म्हणते) धर्म, सत्य तसेच सद्वर्तन, सामर्थ्य आणि मी (लक्ष्मी) या सर्वांचे मूळकारण शील हेच होय यांत संशय नाही.


४०९ धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम् ।

न तत्सेवेत मेधावी न तद्धितमिहोच्यते ॥ १२.२९३.८

धर्माला सोडून असलेले कृत्य केवढेंहि मोठे फल देणारे असले तरी ते शहाण्याने करू नये. कारण त्यापासून खरें कल्याण होत नाही.


४१० धर्माय राजा भवति न कामकरणाय तु ॥ १२.९०.३

धर्मरक्षणासाठी राजाची उत्पत्ति आहे, आपल्या इच्छा तृप्त करून घेण्यासाठी नव्हे. ४११ धर्मार्थकामकुशलो धर्मार्थावप्यपीडयन् ।

धर्मप्रधानकार्याणि कुर्याश्चेति पुनःपुनः ॥ ७.१५१.३७

(द्रोणाचार्य दुर्योधनाला सांगतात) तूं धर्म, अर्थ व काम यांविषयी कुशल आहेस. परंतु, धर्म व अर्थ या दोहोंसहि धक्का न लागू देतां धर्मप्रधान अशीच कृत्य करीत जा, हे मी तुला पुनः पुनः सांगतों,


४१२ धर्मार्थकामाः समसेव सेव्या यो

     हयेकभक्तः स नरो जघन्यः ।

तयोस्तु दाक्ष्यं प्रवदन्ति मध्यं

     स उत्तमो योऽभिरतस्त्रिवर्गे ॥ १२.१६७.४०

धर्म, अर्थ आणि काम यांचे सेवन सारख्याच प्रमाणाने केले पाहिजे. यांपैकी कोणत्याहि एकावरच जो भर देतो तो मनुष्य निकृष्ट होय. यातून दोहोंच्या ठिकाणी दक्ष असणारा मध्यम प्रतीचा होय. सर्वात श्रेष्ठ तोच की, जो या तीनहि पुरुषार्थामध्ये रममाण होऊन राहतो.


४१३ धर्मार्थौ धर्मकामौ च कामार्थौ चाप्यपीडयन् ।

धर्मार्थकामान्योऽभ्येति सोऽत्यन्तं सुखमश्नुते ॥ ९.६०.२२

धर्म व अर्थ, धर्म व काम, काम व अर्थ यांचा एकमेकांशी विरोध येऊ न देतां धर्म, अर्थ व काम या तिहींचें जो सेवन करतो त्याला आत्यंतिक सुख प्राप्त होते.


४१४ धर्मे चार्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ ।

यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्कचित् ॥ १.६२.५३

(वैशंपायन जनमेजय राजाला सांगतात) धर्माविषयीं, कामाविषयी आणि मोक्षाविषयीं यांत (महाभारतात) जे सांगितले आहे तेच इतर ग्रंथांत आहे. जे यांत नाही ते कुठेच नाही.


४१५ धर्मेण राज्यं विन्देत धर्मेण परिपालयेत् ॥


धर्ममूलां श्रियं प्राप्य न जहाति न हीयते ॥ ५.३४.३१

धर्माने राज्य मिळवावें व धर्मानेच त्याचे संरक्षण करावें. धर्माने मिळविलेल्या राजलक्ष्मीचा त्याग करण्याचा प्रसंग येत नाहीं; व तीहि राजाला सोडून जात नाही.


४१६ धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मे राजनि तिष्ठति ।

तं राजा साधु यः शास्ति स राजा पृथिवीपतिः ॥ १२.९०.५

धर्माच्या आधाराने प्राणी राहतात, धर्म, राजाच्या आधाराने राहतो, त्या धर्माचे पालन जो राजा उत्तम प्रकारे करतो तो राजा सर्व पृथ्वीचा राजा होतो.


४१७ धर्मे ते धीयतां बुद्धिर्मनस्तु महदस्तु च ॥ १५.१७.२१

(कुंती युधिष्ठिराला म्हणते) तुझी बुद्धि धर्माच्या ठिकाणी स्थिर होवो, आणि तुझें मन मोठे असो.


४१८ धर्मे मतिर्भवतु वः सततोत्थितानां

     स ह्येक एव परलोकगतस्य बन्धुः ।

अर्थाः स्त्रियश्च निपुणैरपि सेव्यमाना

     नैवाप्त भावमुपयान्ति न च स्थिरत्वम् ॥ १.२.३९१

(सौति शौनकादिक ऋषींना सांगतो) सतत प्रयत्नपूर्वक धर्मानुष्ठान करण्याकडे तुमची प्रवृत्ति असूं दे. कारण तोच एकटा परलोकी गेल्यावर आपल्या उपयोगी पडणारा आहे. कनक आणि कांता यांची दक्षतेने सेवा केली तरी ती कामास येत नाहीत, ती चिरकाल टिकतहि नाहीत.


४१९ धर्मेऽसुखकला काचिद्धर्मे तु परमं सुखम् ॥ १२.२७१.५६

धर्माचरणांत थोडेसे कष्ट वाटले तरी अत्यंत श्रेष्ठ सुख धर्मातच आहे.


४२० धर्मो हि परमा गतिः ॥ १२.१४७.८

धर्म हाच उत्कृष्ट प्रकारच्या गतीचे साधन होय.


४२१ धयोद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ॥ ६.२६.३१

धर्मयुद्धासारखें श्रेयस्कर क्षत्रियाला दुसरे काहीच नाही.


४२२ धारणाद्धर्ममित्याहुधर्मेण विधृताः प्रजाः ।

यः स्याद्धारणसंयुक्तःस धर्म इति निश्चयः ॥ १२.१०९.११

धारण करतो म्हणून धर्म म्हणतात. धर्मानेच लोकांना धारण केले आहे. धारण करण्याच्या गुणानें जो युक्त असेल तोच धर्म असा सिद्धांत आहे.


४२३ धिक्तस्य जीवितं राज्ञो राष्ट्रं यस्यावसीदति ।

अवृत्त्यान्यमनुष्योऽपि यो वैदेशिक इत्यपि ॥ १२.१३०.३४

ज्याचे राष्ट्र क्षीण दशेप्रत पावते आणि परदेशांत राहणारा अन्य मनुष्यहि ज्याच्या-राष्ट्रांत उपजीविका न झाल्यामुळे नाश पावतो त्या राजाच्या जीविताला धिक्कार असो!


४२४ धूमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च ।

धृतराष्ट्रोल्मुकानीव ज्ञातयो भरतर्षभ ॥ ५.३६.६०

(विदुर म्हणतो) हे भरतश्रेष्ठा धृतराष्ट्रा, लाकडाची कोलितें एकएकटी असली म्हणजे नुसती धुमसत राहतात; पण तीच एकत्र असली म्हणजे त्यांच्यापासून ज्वाला उत्पन्न होते. त्याचप्रमाणे नातलगांची गोष्ट आहे.


४२५ धूमो वायोरिव वशे बलं धर्मोऽनुवर्तते ।

अनीश्वरो बले धर्मो द्रुमे वल्लीव संश्रिता ॥ १२.१३४.७

धूर वाऱ्याच्या अंकित राहतो तसा धर्म बळाच्या पाठोपाठ येतो. वृक्षाच्या आश्रयाने राहणाऱ्या लतेप्रमाणे धर्म बळावर अवलंबून असतो.


४२६ धृतिर्दाक्ष्यं संयमो बुद्धिरात्मा

     धैर्यं शौर्यं देशकालाप्रमादः ।

अल्पस्य वा बहुनो वा विवृद्धौ ।

     धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि ॥ १२.१२०.३७

संथपणा, दक्षता, मनोनिग्रह, बुद्धिमत्ता, विचारशीलता, धैर्य, शौर्य आणि स्थळकालाविषयीं सावधगिरी, ही आठ साधनें मूळचे थोडे किंवा पुष्कळ असलेलें धन वाढविण्याची होत.


४२७ धेनुर्वत्सस्य गोपस्य स्वामिनस्तस्करस्य च ।

पयः पिबति यस्तस्या धेनुस्तस्येति निश्चयः ॥ १२.१७४.३२

गाईवर वासराची, गवळ्याची, मालकाची व (प्रसंगविशेषीं) चोराचीहि सत्ता असते. पण ज्याला तिचे दूध प्राशन करण्यास मिळते त्याचाच तिजवर खरा हक्क होय हे निश्चित.


४२८ न कश्चिज्जात्वतिक्रामेजरामृत्यू हि मानवः ।

अपि सागरपर्यन्तां विजित्येमा वसुन्धराम् ॥ १२.२८.१५

समुद्रवलयांकित ही सर्व पृथ्वी जिंकूनसुद्धा कोणीहि मनुष्य जरा आणि मृत्यु यांचे अतिक्रमण करू शकत नाही.


४२९ न कश्चित्कस्यचिन्मित्रं न कश्चित्कस्यचित्सुहृद् ।

अर्थतस्तु निबध्यन्ते मित्राणि रिपवस्तथा ॥ १२.१३८.११०

मुळातच कोणी कोणाचा मित्र नसतो, आणि कोणी कोणाचा शत्रुहि नसतो. कार्याच्याच अनुरोधाने मित्र आणि शत्रु हे होत असतात.


४३० न कश्चिन्नापनयते पुमानन्यत्र भार्गवात् ।

शेषसम्पतिपत्तिस्तु बुद्धिमत्स्वेव तिष्ठति ॥ ५.३९.३०

(नीतिशास्त्रप्रणेत्या) शुक्राचार्यांव्यतिरिक्त दुसरा कोणीहि मनुष्य कधीं चुकत नाहीं असें नाही. परंतु चूक झाल्यावर पुढे काय याचा विचार करण्याची अक्कल बुद्धिमान पुरुषांच्याच ठायी असते.


४३१ न कालो दण्डमुद्यम्य शिरः कुन्तति कस्यचित् ।

कालस्य बलमेतावद्विपरीतार्थदर्शनम् ॥ २.८.११

विनाशकाल प्राप्त झाला म्हणजे तो काही प्रत्यक्ष दंड उगारून कोणाचे डोके उडवीत नाही. तर बुद्धीत भ्रंश पाडून विपरीत प्रकार भासविणे एवढ्यापुरताच तो आपल्या बळाचा उपयोग करतो.


४३२ न कुलं वृत्तहीनस्य प्रमाणमिति मे मतिः ।

अन्तेष्वपि हि जातानां वृत्तमेव विशिष्यते ॥ ५.३४.१४१

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) दुर्वर्तनी माणसाच्या कुलीनपणाला काही किंमत देता येत नाही असे मला वाटते. हीन कुळांत जन्मलेल्यांच्यासुद्धां शीलालाच महत्त्व आहे.


४३३ न कृतस्य तु कर्तुश्च सख्यं सन्धीयते पुनः ।

हृदयं तत्र जानाति कतुश्चैव कृतस्य च ॥ १२.१३९.३६

अपराध करणारा आणि त्याचे प्रायश्चित्त देणारा ह्या उभयतांमध्ये पुनरपि मैत्री जडत नसते. कारण, परस्परांचा संबंध काय आहे हे प्रायश्चित्त देणारा व अपराध करणारा ह्या उभयतांचे अंतःकरणच जाणत असते.


४३४ न कोशः शुद्धशौचेन न नृशंसेन जातुचित् ।

मध्यमं पदमास्थाय कोशसङ्ग्रहणं चरेत् ॥ १२.१३३.३३

अगदी सोवळेपणाने राहून संपत्ति मिळत नसते; तशीच ती दुष्टपणानेही कधीच मिळत नाही. यास्तव मध्यम मार्गाचा अवलंब करून संपत्तीचा संग्रह करावा.


४३५ न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते ।

गृहं तु गृहिणीहीनमरण्यसदृशं मतम् ॥ १२.१४४.६

नुसत्या घराला घर म्हणत नाहीत. गृहिणी हेच घर, गृहिणी नसलेलें घर अरण्यासमान होय.


४३६ न च कश्चित्कृते कार्य कर्तारं समवेक्षते ॥ १२.१३८.११२

कार्य होऊन गेल्यावर कर्त्याकडे कोणाचें लक्ष्य जात नाही.


४३७ न च शत्रुरवज्ञेयो दुर्बलोऽपि बलीयसा ।

अल्पोऽपि हि दहत्यग्निर्निर्विषमल्पं हिनस्ति च ॥ १२.५८.१७

स्वतः बलाढ्य असलेल्यानेसुद्धा दुर्बळ अशाहि शत्रूला तुच्छ समजू नये. का की, अग्नि लहान असला तरी जाळल्यावांचून रहात नाही, आणि विष थोडे असले तरी प्राणनाश करतेंच.


४३८ न च शुद्धानृशंसेन शक्यं राज्यमुपासितुम् ॥ १२.७५.१८

निर्भेळ दयाळूपणाने राज्य चालविणे शक्य नाही.


४३९ न चैव पुरुषो द्रष्टा स्वर्गस्य नरकस्य च ।

आगमस्तु सतां चक्षुर्नृपते तमिहाचर ॥ १२.२८.५४

(अश्म नामक ब्राह्मण जनक राजाला सांगतो) हे राजा, स्वर्ग आणि नरक मनुष्याला दिसत नाहीत. परंतु त्यांना अवलोकन करण्याचे सज्जनांचे नेत्र म्हणजे शास्त्र होय. म्हणून तूं शास्त्रप्रमाणे वाग.


४४० न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।

हविषा कृष्णवर्मेव भूय एवाभिवर्धते ॥ १७५/५०

इच्छित वस्तूंच्या उपभोगाने भोगेच्छेची तृप्ति कधीच होत नसते. आहुतींच्या योगाने अधिक पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणे ती उलट अधिकच वाढते.


४४१ न जातु त्वमिति ब्रूयादापन्नोऽपि महत्तरम् ।

त्वङ्कारो वा वधो वेति विद्वत्सु न विशिष्यते ॥ १.१६२.५३

संकटात असतांनाहि मोठ्या मनुष्याला 'तू' असें एकेरी संबोधू नये. विद्वानाला तूं असें म्हणणे व त्याचा वध करणे सारखेच.


४४२ न जातु विवृत कार्यः शत्रुःसुनयमिच्छता ॥ १२.१०५.१४

उत्कृष्ट प्रकारच्या नीतीप्रमाणे वागू इच्छिणाऱ्या पुरुषानें केव्हांहि उघड रीतीने शत्रुत्व करूं नये.


४४३ न जानपदिकं दुःखमेकः शोचितुमर्हति ।

अशोचन्यतिकुर्वीत यदि पश्येदुपक्रमम् ॥ १२.३३०.१५

सर्व देशाच्या दुःखाचा एकट्याने शोक करणे युक्त नव्हे. शोक न करिता प्रतिकाराचा जर काही उपाय सुचला तर तो मात्र अंमलात आणावा.


४४४ न तत्तरेद्यस्य न पारमुत्तरेत्

     न तद्धरेद्यत्पुनराहरेत्परः ।

न तत्खनेद्यस्य न मूलमुद्धरेत्

     न तं हन्याद्यस्य शिरो न पातयेत् ॥ १२.१४०.६९

ज्याच्या पैलतीराला पोञ्चता येणार नाही ते तरून जाण्याच्या भरीस पडूं नये. जें फिरून कोणी आपल्यापासून हिरावून घेईल त्याचे हरण करू नये. ज्याचे मूळ उपटून टाकता येत नाहीं तें खणू नये. ज्याचे शीर खाली पाडता येत नाही त्याच्यावर प्रहार करूं नये.


४४५ न तत्परस्य सन्दध्यात्प्रतिकूलं यदात्मनः ।

एष सङ्क्षेपतो धर्मः कामादन्यः प्रवर्तते ॥ १३.११३.८

आपल्याला अनिष्ट अशी जी गोष्ट ती दुसऱ्याच्या संबंधाने करू नये. धर्माचें संक्षिप्त स्वरूप हे असे आहे. याला सोडून असलेला तो निव्वळ स्वेच्छाचार होय.


४४६ न तथा बाध्यते कृष्ण प्रकृत्या निर्धनो जनः ।

यथा भद्रा श्रियं प्राप्य तया हीनः सुखैधितः ॥ ५.७२.२९

(युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणतो) उत्तम प्रकारचे वैभव प्राप्त होऊन सुखांत वाढलेल्या मनुष्याला ते वैभव नष्ट झाले असतां जेवढे दुःख होते, तेवढे मूळांतच दरिद्री असलेल्या मनुष्याला होत नाही.


४४७ न तथेच्छन्ति कल्याणान्परेषां वेदितुं गुणान् ।

यथैषां ज्ञातुमिच्छन्ति नैगुण्यं पापचेतसः ॥ ५.३७.४७

दुष्ट मनुष्यांना दुसऱ्यांचे दोष जाणण्याची जशी इच्छा असते, तशी त्यांचे चांगले गुण समजून घेण्याची इच्छा नसते.


४४८ न तल्लोके द्रव्यमस्ति यल्लोकं प्रतिपूरयेत् ॥


समुद्रकल्पः पुरुषो न कदाचन पूर्यते ॥ १३.९३.४६

जगांत असे कोणतेच द्रव्य नाही की, जे लोकांना पुरून उरेल. मनुष्य हा समुद्रासारखा आहे. त्याला कधीच काही पुरत नाही.


४४९ न तृप्तिः प्रियलाभेऽस्ति तृष्णा नाद्भिः प्रशाम्यति ।

सम्प्रज्वलति सा भूयः समिद्भिरिव पावकः ॥ १२.१८०.२६

प्रिय वस्तूचा लाभ झाल्याने तृप्ति होते असे नाही. तृष्णा (हांव, लोभ) ही पाण्याने शांत होत नाही. समिधांनी जसा अग्नि, तशी ती (इष्टप्राप्तीने) अधिकच प्रज्वलित होते.


४५० न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः ।

बालोऽपि यःप्रजानाति तं देवाः स्थविरं विदुः ॥ ३.१३३.११

एकाद्याचे केस पांढरे झाले म्हणजे तेवढ्याने तो वृद्ध झाला असें नाही. वयाने लहान असला तरी, जो ज्ञानी आहे त्यालाच देव वृद्ध समजतात.


४५१ न त्वेवात्मावमन्तव्यः पुरुषेण कदाचन ।

न ह्यात्मपरिभूतस्य भूतिर्भवति शोभना ॥ ३.३२.५८

पुरुषाने स्वतःस केव्हांहि हीन लेखू नये कारण, स्वतःस हीन मानणारास उत्तम प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत नाही.


४५२ न दरिद्रो वसुमतो नाविद्वान्विदुषः सखा ।

न शूरस्य सखा क्लीबः सखिपूर्वं किमिष्यते ॥ १.११३.०९

(द्रुपदराजा द्रोणाचार्योना म्हणतो) दरिद्री हा श्रीमंताचा अथवा मूर्ख हा विद्वानाचा मित्र नसतो. शूराची नामर्दाशी मैत्री असणे शक्य नाही. तर सख्यपूर्वक काय मागतोस ?


४५३ न दृष्टपूर्वं प्रत्यक्षं परलोकं विदुर्बुधाः ।

आगमांस्त्वनतिक्रम्य श्रद्धातव्यं बुभूषता ॥ १२.२८.४२

परलोक हा पूर्वी कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे असें शहाणे लोक समजत नाहीत. परंतु शास्त्रमार्गाचे उल्लंघन न करिता उत्कर्षेच्छु पुरुषाने त्याविषयीं श्रद्धा ठेवावी.


४५४ न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत् ।

यं तु रक्षितुमिच्छन्ति बुद्धया संविभजन्ति तम् ॥ ५.३५.४०

देव काहीं एकाद्या गुराख्याप्रमाणे हातांत दंड घेऊन कोणाचे रक्षण करीत नाहीत. तर ज्याचे रक्षण करण्याची त इच्छा करतात, त्याला ते उत्तम प्रकारची बुद्धि देतात.


४५५ न देवैरननुज्ञातः कश्चिद्भवति धार्मिकः ॥ १२.२७१.४९

देवांची तशी इच्छा असल्याशिवाय कोणी धार्मिक बनत नाही.


४५६ न द्वितीयस्य शिरसश्छेदनं विद्यते क्वचित् ।

न च पाणेस्तृतीयस्य यन्नास्ति न ततो भयम् ॥ १२.१८०.२९

आपले दुसरे डोके कोणी कापील किंवा तिसरा हात तोडील अशी केव्हांहि भीति नसते. कां की, जे मूळातच नाही त्याची भीति मुळीच नसते.


४५७ न धर्मः प्रीयते तात दानैर्दत्तैर्महाफलैः ॥


न्यायलब्धैर्यथा मूक्ष्मैः श्रद्धापूतैः स तुष्यति ॥ १४.९०.९९

(धर्म उंछवृत्तीच्या ब्राह्मणाला म्हणतो) बाबारे, न्यायाने मिळविलेल्या आणि श्रद्धेनें पवित्र झालेल्या थोड्याशा द्रव्याच्या दानाने धर्म जसा संतुष्ट होतो, तसा केवळ मोठे फळ देणाऱ्या दानांनी संतोष पावत नाही.


४५८ न धर्मपर एव स्यान्न चार्थपरमो नरः ।

न कामपरमो वा स्यात्सर्वान्सेवेत सर्वदा ॥ ३.३३.३९

मनुष्याने केवळ धर्माचेंच अवलंबन करूं नये, एकट्या अर्थाच्याच पाठीमागे लागू नये आणि नुसत्या कामाकडेही सर्व लक्ष्य देऊ नये. परंतु, (धर्म, अर्थ व काम) या सर्वांचे सर्वदा सेवन करावे.


४५९ न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखम् ॥ १२.२५.२३

कोणालाहि नेहमीच दुःख होत नाही, किंवा नेहमीच सुख होत नाही.


४६० ननिर्मन्युःक्षत्रियोऽस्ति लोके निर्वचनं स्मृतम् ॥ ३.२७.३७

ज्याला अपमानाची चीड येत नाही तो क्षत्रिय नव्हे, अशी लोकांत म्हणच आहे.


४६१ न पश्यामोऽनपकृतं धनं किञ्चित्क्वचिद्वयम् ॥ १२.८.३०

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) दुसऱ्याला यत्किंचिथि उपद्रव न देतां कोणाला केव्हा काही धन मिळल्याचे आमच्या पाहण्यात नाही.


४६२ न पूर्वे नापरे जातु कामानामन्तमाप्नुवन् ॥ १२.१७७.२२

पूर्वकाळचे किंवा दुसरे कोणतेहि लोक इच्छेच्या अंतापर्यंत पोंचले नाहीत.


४६३ न बाह्यं द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवति भारत ।

शारीरं द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवति वा न वा ॥ १२.१३.१

(सहदेव युधिष्ठिराला म्हणतो) बाह्य द्रव्याचा त्याग केल्याने सिद्धि प्राप्त होत नसते. शरीरांत राहणाऱ्या (कामक्रोधादिविकाररूप) द्रव्याचा त्याग करूनहि सिद्धि मिळेल का नाही हा प्रश्नच आहे.


४६४ न बुद्धिर्धनलाभाय न जाड्यमसमृद्धये ।

लोकपर्यायवृत्तान्तं प्राज्ञो जानाति नेतरः ॥ ५.३८.३३

बुद्धि असली म्हणजे धन मिळते असे नाही, आणि बुद्धिमांद्य असले म्हणजे दारिद्र्य येते असेंहि नाही. लोकव्यवहार हा चतुर पुरुषालाच समजतो, इतरांना नाही.


४६५ न बुद्धिशास्त्राध्ययनेन शक्यं

     प्राप्तुं विशेष मनुजैरकाले ।

मूर्खोऽपि चाप्नोति कदाचिदर्थान्

     कालो हि कार्यं प्रति निर्विशेषः ॥ १२.२५.६

काळ प्रतिकूल असतां नुसत्या बुद्धिमत्तेने किंवा शास्त्राभ्यासाने मनुष्याला विशेषसा लाभ होणे शक्य नाही. उलट, एकादे वेळेस मूर्खालासुद्धा कार्यात यश येते. तस्मात् काळ हाच कार्यसिद्धीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा आहे.


४६६ न ब्रह्मचार्यधीयीत कल्याणी न दुहेत गाम् ।

न कन्योद्वहनं गच्छेद्यदि दण्डो न पालयेत् ॥ १२.१५.३७

जर दंड लोकांचे संरक्षण न करता, तर ब्रह्मचाऱ्याने अध्ययन केले नसते. सवत्सा धेनूने दूध दिले नसते; आणि मुलीने विवाह करून घेतला नसता.


४६७ न लोके दीप्यते मूर्खः केवलात्मप्रशंसया ।

अपि चापिहितःश्वभ्रे कृतविद्यःप्रकाशते ॥ १२.२८७.३१

लोकांत नुसत्या आत्मप्रौढीने मूर्खाचें तेज पडत नाही. परंतु जो खरा खरा विद्वान् आहे त्याला एखाद्या बिळांत कोंडून ठेविले, तरी तो चमकल्याशिवाय राहणार नाही.


४६८ नवनीतं हृदयं ब्राह्मणस्य

     वाचि क्षुरो निशितस्तीक्ष्णधारः ।

तदुभयमेतद्विपरीतं क्षत्रियस्य

     वाङ्नवनीतं हृदयं तीक्ष्णधारमिति ॥ १.३.१२३

ब्राह्मणाचे हृदय लोण्यासारखे मऊ असते, परंतु बोलण्यांत तीक्ष्ण धारेच्या पाजवलेल्या वस्तऱ्यासारखा तो कठोर असतो. क्षत्रियाच्या या दोनहि गोष्टी उलट असतात. म्हणजे बोलणे मृदु पण हृदय कठीण.


४६९ न विश्वसेदविश्वस्ते विश्वस्ते नातिविश्वसेत् ।

विश्वासाद्भयमुत्पन्नं मूलान्यपि निकृन्तति ॥ ५.३८.९

अविश्वासू माणसावर विश्वास ठेवू नये. विश्वासू मनुष्यावर देखील अति विश्वास टाकू नये. कारण, विश्वास ठेविल्यामुळे जर काही भय उत्पन्न झाले, तर ते आपली पाळेमुळे खणून काढते.


४७० न वै मानं च मौनं च सहितौ वसतः सदा ।

अयं हि लोको मानस्य असो मौनस्य तद्विदुः ॥ ५.४२.४४

मान व मौन ही सर्वदा एकत्र रहात नाहीत. हा लोक मानाचा असून परलोक मौनाचा आहे असे म्हणतात.

(अन्न, स्त्री इत्यादि भोगांचे ठिकाणी जो अभिलाष त्याला 'मान' असे म्हणतात. आणि ब्रह्मानंदसुखाच्या प्राप्तीचे जे कारण त्याला 'मौन' असे म्हणतात।)


४७१ न वै श्रुतमविज्ञाय वृद्धाननुपसेव्य वा ।

धर्मार्यौ वेदितुं शक्यौ बृहस्पतिसमैरपि ॥ ५.३९.४१

शास्त्र समजून घेतल्यावाचून अथवा वृद्धांचा समागम केल्यावांचून धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थाचें ज्ञान होणे बृहस्पतीसारख्या बुद्धिमान् पुरुषांनाहि शक्य नाही.


४७२ न वै सुखं प्राप्नुवन्तीह भिन्नाः ॥ ५.३६.५६

आपसांत फुटून राहणारांना जगांत सुख खचित प्राप्त होत नाही.


४७३ न शत्रुर्वशमापन्नो मोक्तव्यो वध्यतां गन्तः ॥ ५.३८.२९

ज्याचा अवश्य वध केला पाहिजे असा शत्रु हातांत सांपडला असतां सोडून देऊ नये.


४७४ न शत्रुर्विवृतः कार्यो वधमस्याभिकाङ्क्षता ।

क्रोधं भयं च हर्षं च नियम्य स्वयमात्मनि ॥ १२.१०३.८

शत्रुला ठार मारण्याची इच्छा करणाऱ्याने आपला शत्रु प्रगट करूं नये. म्हणजे त्याच्याशी उघड द्वेष करूं नये. राग, भय व आनंद ही आंतल्याआंत दाबून ठेवावी.


४७५ न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयसी क्षमा ॥ ३.२८.६

सदोदित तीव्रपणा श्रेयस्कर नाही, तसेंच नेहमीं सौम्यपणाहि कामाचा नाही.


४७६ नष्टं समुद्रे पतितं नष्टं वाक्यमशृण्वति ।

अनात्मनि श्रुतं नष्टं नष्टं हुतमनग्निकम् ॥ ५.३९.४२

जें समुद्रात पडले ते नष्ट झाले. न ऐकणाऱ्याला सांगितलेले वायां गेलें. स्वेच्छाचारी माणसाची विद्या फुकट गेली. राखेंत टाकलेली आहुति व्यर्थ गेली.


४७७ न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति ।

संशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति ॥ १२.१४०.३४

संकटात सापडल्यावांचून मनुष्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होत नाहीत. पण संकटांत सांपडल्यानंतर जर तो जिवंत राहिला तर त्याला आपलें कल्याण झालेले दिसून येईल.


४७८ न स क्षयो महाराज यः क्षयो वृद्धिमावहेत् ।

क्षयः स त्विह मन्तव्यो यं लब्ध्वा बहु नाशयेत् ॥ ५.३९.७

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जो क्षय उत्कर्षाला कारण होतो तो खरोखर क्षय नव्हे. जो प्राप्त झाला असतां बहुत नाश करतो त्यालाच क्षय म्हणावें.


४७९ न सख्यमजरं लोके हृदि तिष्ठति कस्यचित् ।

कालो ह्येनं विहरति क्रोधो वैनं रहत्युत ॥ १.१३१.७

जगांत कोणाच्याहि अंतःकरणांत स्नेहभाव कमी न होता एकसारखा टिकून रहात नाही. कालांतराने स्नेह नाहीसा होतो किंवा कोधामुळेहि नष्ट होतो.


४८० न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा ।

न ते वृद्धा ये न वदन्ति धर्मम् ।

नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति

न तत्सत्यं यच्छलेनाभ्युपेतम् ॥ ५.३५.५८

जेथे वृद्ध लोक नाहीत ती सभा नव्हे. जे धर्माला अनुसरून भाषण करीत नाहीत. ते वृद्ध नव्हेत. ज्यांत सत्य नाही तो धर्म नव्हे. आणि जे कपटाने युक्त असेल तें सत्यहि नव्हे.


४८१ न हायनैर्न पलितैर्न वित्तैर्न च बन्धुभिः ।

ऋषयश्चक्रिरे धर्मं योऽनूचानः स नो महान् ॥ १२.३२३.६

वयोमान, पिकलेले केस, धनदौलत आणि सोयरेधायरे यांचे बलावर कोणाला मोठेपणा प्राप्त होत नाही, ऋषींनी असा नियम ठरविला की, जो सांगवेदाचें अध्ययन करणारा त्यालाच आम्ही श्रेष्ठ समजतो.


४८२ न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥ ६.३०.४०

(श्रीकृष्ण सांगतात) बा अर्जुना, शुभ कर्मे करणारा केव्हांहि दुःस्थितीप्रत जात नाही.


४८३ न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ॥ ६.२७.५

काहीहि कर्म न करितां कोणीहि एक क्षणभर देखील राहू शकत नाही.


४८४ न हि खल्वनुपायेन कश्चिदर्थोऽभिसिध्यति ।

सूत्रजालैर्यथा मत्स्यान्बध्नन्ति जलजीविनः ॥ १२.२०३.११

उपाय केल्यावांचून कोणतेंहि कार्य खचित सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ, जलचरांवर उपजीविका करणारे लोक सुतांचे जाळे टाकूनच माशांना घेरीत असतात.


४८५ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ॥ ६.२८.३८

खरोखर ज्ञानासारखें पवित्र या जगांत दुसरे काहीच नाही.


४८६ न हि दैवेन सिध्यन्ति कार्याण्येकेन सत्तम ।

न चापि कर्मणैकेन द्वाभ्यां सिद्धिस्तु योगतः ॥ १०.२.३

(कृपाचार्य अश्वत्थाम्याला सांगतात) एकळ्या दैवाने किंवा एकट्या उद्योगाने कार्य सिद्धीस जात नसतात, परंतु या दोहोंच्या संयोगानें कोणतेहि काम साधत असते.


४८७ न हि पश्यामि जीवन्तं लोके कञ्चिदहिंसया ।

सत्त्वैः सत्त्वा हि जीवन्ति दुर्बलैर्बलवत्तराः ॥ १२.१५.२०

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) अहिंसावृत्तीने जगांत जिवंत राहणारा कोणी दिसून येत नाही. खरोखर बलवान् प्राणी आपल्याहून दुर्बल असलेल्या प्राण्यांवर उपजीविका करीत असतात.


४८८ न हि प्रमादात्परमस्ति कश्चित्

     वधो नराणामिह जीवलोके ।

प्रमत्तमर्था हि नरं समन्तात्

     त्यजन्त्यनर्थाश्च समाविशन्ति ॥ १०.१०.१९

या लोकी मनुष्यांना बेसावधपणापेक्षा अधिक घातक असे काहीच नाही. बेसावध राहणाऱ्या मनुष्याला सर्व प्रकारची संपत्ति सोडून जाते, आणि त्याच्यावर संकटे मात्र कोसळतात.


४८९ न हि प्राणात्प्रियतरं लोके किञ्चन विद्यते ।

तस्माद्दयां नरः कुर्याद्यथात्मनि तथा परे ॥ १३.११६.१२

मृत्युलोकी प्राणापेक्षा प्रियतर असे काहीच नाही. यास्तव, मनुष्याने स्वतःप्रमाणेच दुसऱ्याविषयी कळकळ बाळगून दया करावी.


४९० न हि बुद्धयान्वितः प्राज्ञो नीतिशास्त्रविशारदः ।

निमज्जत्यापदं प्राप्य महतीं दारुणामपि ॥ १२.१३८.४०

नीतिशास्त्रनिपुण, बुद्धिमान्, चतुर पुरुष केवढेंहि मोठे भयंकर संकट प्राप्त झालें तरी त्यांत बुडून जात नाही.


४९१ न हि वैरं महात्मानो विवृण्वन्त्यपकारिषु ।

शनैः शनैर्महाराज दर्शयन्ति स्म ते बलम् ॥ १२.१५७.१०

(भष्मि युधिष्ठिराला म्हणतात) थोर लोक आपला अपकार करणाऱ्याविषयींचें वैर एकदम प्रगट करीत नाहीत. तथापि हळू हळू आपलें सामर्थ्य दाखविल्यावाचून ते रहात नाहीत.


४९२ न हि वैराग्निरुद्भूतः कर्म चाप्यपराधजम् ।

शाम्यत्यदग्ध्वा नृपते विना ह्येकतरक्षयात् ॥ १२.१३९.४६

(पूजनी पक्षीण ब्रह्मदत्त राजाला म्हणते) वैररूपी अग्नि एकदा उत्पन्न झाला म्हणजे तो दग्ध केल्यावाचून शांत होत नाही. आणि अपराधजन्य पातक दोहोंतून एकाचा क्षय केल्यावांचून नाश पावत नाही.


४९३ न हि वैराणि शाम्यन्ति दीर्घकालधृतान्यपि ॥ ५.७२.६२

वैर दीर्घ कालपर्यंत धारण केले तरी सुद्धा नाहीसे होत नाही.


४९४ न हि शौर्यात्परं किञ्चित् ॥ १२.९९.१८

शौर्यापेक्षा श्रेष्ठ कांहींच नाही.


४९५ न हि सञ्चयवान्कश्चिदृश्यते निरुपद्रवः ॥ ३.२.४८

कोणीहि संचयी पुरुष उपद्रवरहित असल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाही.


४९६ न हि सर्वत्र पाण्डित्यं सुलभं पुरुषेण वै ॥ ३.२८.२७

मनुष्याची अक्कल सर्व बाबतीत चालणे खचित सोपे नाही.


४९७ न हीदृशमनायुष्यं लोके किञ्चन विद्यते ।

यादृशं पुरुषस्येह परदारोपसेवनम् ॥ १३.१०४.२१

खरोखर, परस्त्रीगमनाइतकें पुरुषाच्या आयुष्याची हानि करणारे जगांत दुसरे काही नाही.


४९८ न हृष्यत्यात्मसंमाने नावमानेन तप्यते ।

गाङ्गो हृद इवाक्षोभ्यो यः स पण्डित उच्यते ॥ ५.३३.२६

आपला सन्मान झाला असतां जो आनंद मानीत नाही, अपमान झाला असता कष्टी होत नाही, आणि गंगेच्या डोहाप्रमाणे ज्याची शांति केव्हाही ढळत नाहीं त्याला पंडित म्हणतात.


४९९ न ह्यनाढ्यः सखाढ्यस्य ॥ १.१३१.६९

दरिद्री श्रीमंताचा मित्र नसतो.


५०० न ह्यनुप्तं प्ररोहति ॥ १३.१६३.११

पेरल्याविना उगवत नाही.


५०१ न ह्यात्मनः प्रियतरं किञ्चिद्भूतेषु निश्चितम् ॥ ११.७.२७

प्राणिमात्राला स्वतःपेक्षां प्रिय काहीच नाही हे निश्चित होय.


५०२ न ह्यात्मस्तवसंयुक्तं वक्तव्यमनिमित्ततः ॥ १.३४.३

आत्मस्तुतीने युक्त असे भाषण कारणावांचून करूं नये.


५०३ न ह्युत्थानमृते दैवं राज्ञामर्थं प्रसाधयेत् ॥ १२.५६.१४

उद्योगावांचून नुसतें दैव राजांचे मनोरथ सिद्धीस नेणार नाही.


५०४ न हृतेऽर्थेन वर्तेते धर्मकामाविति श्रुतिः ॥ १२.१६७.१२

अर्थाला (द्रव्याला) सोडून धर्म व काम हे पुरुषार्थ रहात नाहीत अशी श्रुति आहे.


५०५ नाकारो गृहितुं शक्यो बृहस्पतिसमैरपि ॥ ७.१२.१४

मनांतील हेतु छुपविणे बृहस्पतीसारख्यांनाहि शक्य नाही.


५०६ नाकालतो म्रियते जायते वा

     नाकालतो व्याहरते च बालः ।

नाकालतो यौवनमभ्युपैति

     नाकालतो रोहति बीजमुप्तम् ॥ १२.२५.११

वेळ आल्याशिवाय कोणी मरत नाही किंवा जन्माला येत नाही. योग्य काळ आल्यावांचून लहान मूल बोलू लागत नाही. योग्य काळाशिवाय कोणास तारुण्यावस्था प्राप्त होत नाही. आणि पेरललेले बी अकाली उगवत नाही.


५०७ नाकृतात्मा वेदयति धर्माधर्मविनिश्चयम् ॥ ३.२१५.१८

मनोनिग्रह केल्याशिवाय धर्म कोणता, अधर्म कोणता याचे निश्चित ज्ञान होत नाही.


५०८ नाकृत्वा लभते कश्चित् किञ्चिदत्र प्रियाप्रियम् ॥ १२.२९८.३०

काही तरी केल्याशिवाय या लोकी कोणालाहि काही सुखदुःख प्राप्त होत नाही.


५०९ नागामिनमनर्थं हि प्रतिघातशतैरपि ।

शक्नुवन्ति प्रतिव्योढुमृते बुद्धिबलान्नराः ॥ १२.२२७.३२

शेंकडों प्रकारचे उपाय केले तरी मनुष्यांना बुद्धिसामर्थ्य असल्यावांचून भावी अनर्थांचा प्रतिकार करितां येणे शक्य नाही.


५१० नाघ्नतः कीर्तिरस्तीह न वित्तं न पुनः प्रजाः ।

इन्द्रो वृत्रवधेनैव महेन्द्रः समपद्यत ॥ १२.१५.१५

शत्रूचा वध न करणाऱ्या राजाला या लोकी कीर्ति लाभणार नाही, धन मिळणार नाही आणि त्याची प्रजाहि सुरक्षित राहणार नाही. इंद्र सुद्धा वृत्रासुराचा वध करूनच महेंद्रपदवीला पोचला.


५११ नाच्छित्वा परमर्माणि नाकृत्वा कर्म दारुणम् ।

नाहत्वा मत्स्यघातीव प्राप्नोति महतीं श्रियम् ॥ १२.१४०.५०

शत्रूच्या मर्मस्थानांवर घाव घातल्याशिवाय, भयंकर पराक्रम गाजविल्याशिवाय. आणि मासे मारणाऱ्या कोळ्याप्रमाणे हत्या केल्याशिवाय मोठ्या लक्ष्मीचा (राजलक्ष्मीचा) लाभ होणार नाही.


५१२ नातः पापीयसीं काञ्चिदवस्थां शम्बरोऽब्रवीत् ।

यत्र नैवाद्य न प्रातर्भोजनं प्रति दृश्यते ॥ ५.७२.२२

आजच्या अथवा उद्यांच्याहि अन्नाची तजवीज ज्या अवस्थेमध्ये दृष्टीस पडत नाही, त्या अवस्थेपेक्षां कोणतीहि अवस्था अधिक दुःखदायक नाही, असें शंबरानेहि सांगितले आहे.


५१३ नात्मच्छन्देन भूतानां जीवितं मरणं तथा ।

नाप्यकाले सुखं प्राप्यं दुःखं वापि यदूत्तम ॥ ५.७२.५०

(युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणतो) हे यदुश्रेष्ठा, प्राण्यांना आपल्या इच्छेप्रमाणे जन्म किंवा मरण येत नाही. तसेच, सुख काय किंवा दुःख काय, अकाली प्राप्त होत नसते.


५१४ नात्मच्छिद्रं रिपुर्विद्याद्विद्याच्छिद्रं परस्य तु ।

गूहेत्कूर्म इवाङ्गानि रक्षेद्विवरमात्मनः ॥ १२.१४०.२४

आपले मर्मस्थान शत्रूला समजू देऊ नये. आपण मात्र शत्रूचे मर्मस्थान शोधून काढावे. कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव आपल्या शरीरांतच दडवून ठेवतें त्याप्रमाणे राज्याची सर्व अंगें गुप्त राखावी. आणि आपल्या छिद्रांविषयी जपून असावे.


५१५ नात्यन्तं गुणवत्किञ्चिन्न चाप्यत्यन्तनिर्गुणम् ।

उभयं सर्वकार्येषु दृश्यते साध्वसाधु वा ॥ १२.१५.५०

सर्वस्वी गुणसंपन्न असे काही नाही, आणि सर्वथा गुणहीनहि काही नाही. सर्व गोष्टींत बरें व वाईट ही दोनहि असलेली दिसून येतात.


५१६ नादेशकाले किञ्चित्स्यादेशकालौ प्रतीक्षताम् ॥ ३.२८.३२

देशकाल अनुकूल नसतां काही होणार नाही. यास्तव, देशकालाकडे नजर द्यावी.


५१७ नाधनो धर्मकृत्यानि यथावदनुतिष्ठति ।

धनाद्धि धर्मः स्रवति शैलादभि नदी यथा ॥ १२.८.२३

द्रव्य नसतां धर्मकृत्ये यथासांग करितां येत नाहीत. पर्वतापासून जशी नदी, तसा द्रव्यापासून धर्म उत्पन्न होतो.


५१८ नाधर्मश्चरितो राजन्सद्यः फलति गौरिव ।

शनैरावय॑मानो हि कर्तुर्मूलानि कृन्तति ॥ १.१८.०२

(शुक्राचार्य वृषपर्व्याला म्हणतात।) हे राजा, केलेले पाप गाईप्रमाणे ताबडतोब फल देत नाही. परंतु ते पुनः पुनः केले जाऊन हळूहळू कर्त्याची पाळे मुळे खणून काढतें.


५१९ नाधर्मो विद्यते कश्विच्छत्रून्हत्वाततायिनः ।

अधर्म्यमयशस्यं च शात्रवाणां प्रयाचनम् ॥ ५.३.२१

आततायी अशा शत्रूंना ठार मारल्याने कसलाहि अधर्म होत नाही. परंतु शत्रूजवळ याचना करणे हे मात्र धर्माविरुद्ध असून कीर्तीला काळिमा लावणारे आहे.


५२० नान्यत्र विद्यातपसोर्नान्यत्रेन्द्रियनिग्रहात् ।

नान्यत्र लोभसन्त्यागाच्छान्तिं पश्यामि तेऽनघ ॥ ५.३६.५१

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे निष्पाप राजा, विद्या व तप यांच्यावांचून, इंद्रियनिग्रहावांचून, आणि लोभाचा सर्वथा त्याग केल्यावाचून तुला शांति प्राप्त होण्याचा अन्य मार्ग दिसत नाही.


५२१ नान्यद्दःखतरं किञ्चिल्लोकेषु प्रतिभाति मे ।

अर्थैर्विहीनः पुरुषः परैः सम्परिभूयते ॥ ३.१९३.२०

(बकमुनि इंद्राला म्हणतात) लोक द्रव्यहीन पुरुषाचा सर्व प्रकारें अपमान करतात, यापेक्षा अधिक दुःखदायक गोष्ट जगांत दुसरी कोणतीही असेल, असे मला वाटत नाही.


५२२ नापराधोऽस्ति नारीणां नर एवापराध्यति ।

सर्वकार्यपराध्यत्वान्नापराध्यन्ति चाङ्गन्नाः ॥ १२.२६६.४०

स्त्रियांचे पाऊल कुमार्गाकडे वळण्याच्या कामी स्त्रियांचा काहीएक अपराध नाही. या कामी पुरुष हाच सर्वस्वी दोषी असतो. अशा प्रकारच्या सर्व बाबतींत पहिली आगळीक पुरुषाकडून होत असल्यामुळे स्त्रीवर्गाकडे दोष येत नाही.


५२३ नापृष्टः कस्यचिद्ब्रूयान्नाप्यन्यायेन पृच्छतः ।

ज्ञानवानपि मेधावी जडवत्समुपाविशेत् ॥ १२.२८७.३५

कोणी प्रश्न न करितां किंवा अन्यायाने प्रश्न केला असतांही शहाण्या मनुष्याने उत्तर देऊ नये. तर त्यास त्या गोष्टीचें ज्ञान असूनहि त्याने अजाणत्याप्रमाणे गप्प बसावे.


५२४ नाप्राप्यं तपसः किञ्चित् ॥ १२.२९५.२३

तपाला अप्राप्य असे काहीच नाही.


५२५ नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् ।

आपत्सु च न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः ॥ ५.३३.३३

विचारी लोक अप्राप्य वस्तूचा अभिलाष धरीत नाहीत, गेलेल्याचा शोक करीत नाहीत, आणि अडचणीच्या प्रसंगी भांबावून जात नाहीत.


५२६ नाभीतो यजते राजन्नाभीतो दातुमिच्छति ।

नाभीतः पुरुषः कश्चित्समये स्थातुमिच्छति ॥ १२.१५.१३

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) राजा, (दंडाची) भीति असल्याशिवाय कोणी यज्ञ करीत नाही, भीति वाटल्याशिवाय कोणाला दान करण्याची इच्छा होत नाही, आणि भीति वाटल्याशिवाय कोणी मनुष्य केलेला करार पाळू इच्छित नाही.


५२७ नामर्षं कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः ॥ २.५०.१७

ज्या पुरुषाला दुसऱ्याने अपमान केला असतां क्रोध येत नाही, तो अधम समजावा.


५२८ नाऽमृतस्य हि पापीयान्भायोमालभ्य जीवति ॥ ४.१७.१५

(कीचकाने अपमान केला असतां द्रौपदी संतप्त होऊन पांडवांस म्हणते.) जिवंत पुरुषाच्या भार्येचा अपमान करणारा पापी कदापि जिवंत राहू शकणार नाही.


५२९ नायमत्यन्तसंवासो लभ्यते जातु केनचित् ।

अपि स्वेन शरीरेण किमुतान्येन केनचित् ॥ १२.२८.५२

कोणासहि खुद्द आपल्या शरीराचासुद्धा सहवास अनंत काळपर्यंत लाभत नाही. मग इतर वस्तूंची कथा काय ?


५३० नायं परस्य सुकृतं दुष्कृतं चापि सेवते ।

करोति यादृशं कर्म तादृशं प्रतिपद्यते ॥ १२.२९०.२२

हा जीवात्मा दुसऱ्याचे सुकृत किंवा दुष्कृत भोगीत नाही, तर स्वतः ज्या प्रकारचे कर्म करतो त्याप्रकारचे फळ भोगतो.


५३१ नारभेतान्यसामर्थ्यात्पुरुषः कार्यमात्मनः ।

मतिसाम्यं द्वयोर्नास्ति कार्येषु कुरुनन्दन ॥ २.५६.८

मनुष्याने दुसऱ्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून आपले कार्य हाती घेऊ नये, कारण एकाच कार्याविषयी दोघांचे मत सारखे नसते.


५३२ नालं सुखाय सुहृदो नालं दुःखाय शत्रवः ।

न च प्रज्ञालमर्थानां न सुखानामलं धनम् ॥ १२.१७४.२९

मित्र असले म्हणून ते सुख देऊ शकतात असे नाही, व शत्रु असले म्हणून ते दुःख देऊ शकतात असेंहि नाही, बुद्धीच्या योगाने द्रव्यप्राप्ति होतेच असे नाही. व द्रव्याच्या योगाने सुख होतेच असेंहि नाही.


५३३ नालसाः प्राप्नुवन्त्यर्थान्न क्लीबा नाभिमानिनः ।

न च लोकरवाद्भीता न वै शश्वत्प्रतीक्षिणः ॥ १२.१४०.२३

आळशी, दुर्बळ, गर्विष्ट, लोकापवादाला भिणारे, आणि नेहमी वाट पहात राहणारे दीर्घसूत्री अशांना इष्टप्राप्ति होत नाही.


५३४ नावं न शक्यमारुह्य स्थले विपरिवर्तितुम् ।

तथैव रथमारुह्य नाप्सु चर्या विधीयते ॥ १४.५०.३०

नावेत बसून जमिनीवर इकडे तिकडे हिंडता येणे शक्य नाही. आणि रथांत बसून पाण्यावर चालता येणार नाही.


५३५ नाश्रोत्रियः श्रोत्रियस्य नारथी रथिनः सखा ।

नाराजा पार्थिवस्यापि सखिपूर्वं किमिष्यते ॥ १.१३१.११

(द्रुपद राजा द्रोणाचार्यांना म्हणतो) वेदवेत्त्या ब्राह्मणाचा मित्र वेद न जाणणारा नसतो. रथांतून लढणा-या योद्धयाचा मित्र त्याच्याचसारखा असतो. राजाचा मित्र राजाच असतो. पूर्वीच्या मैत्रीला काय करावयाचें ?


५३६ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।

उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ ६.२६.१६

जे मूळांतच नाही ते अस्तित्वात येणे शक्य नाही, आणि जे आहे ते नाहीसे होणे शक्य नाही, असा दोहोंच्या खऱ्या स्वरूपाचा निर्णय तत्त्वदर्शी पुरुषांनी ठरविला आहे.


५३७ नासम्यक्कृतकारी स्यादप्रमत्तः सदा भवेत् ।

कण्टको ह्यपि दुश्छिन्नो विकारं कुरुते चिरम् ॥ १२.१४०.६०

निष्काळजीपणाने काही करू नये. नेहमी सावध असावे. कारण एकादा काटासुद्धा जर अयोग्य रीतीने तुटला तर तो पुष्कळ काळपर्यंत विकार उत्पन्न करतो.


५३८ नास्ति जात्या रिपुर्नाम मित्रं वापि न विद्यते ।

सामर्थ्य योगाज्जायन्ते मित्राणि रिपवस्तथा ॥ १२.१४०.५१

खरोखर जन्मतःच कोणी शत्रु नसतो किंवा मित्रहि नसतो. सामर्थ्याच्या योगाने मित्र आणि शत्रु हे होत असतात.


५३९ नास्ति भार्यासमं किञ्चिन्नरस्यार्तस्य भेषजम् ॥ १२.१४४.१५

आर्त पुरुषाला भार्येसारखे दुसरें औषध नाही.


५४० नास्ति भार्यासमो बन्धुर्नास्ति भार्यासमा गतिः ।

नास्ति भार्यासमो लोके सहायो धर्मसङ्ग्रहे ॥ १२.१४४.१६

भार्येसारखा मित्र नाही, भार्येसारखा आसरा नाही. या लोकी भार्येसारखा धर्मानुष्ठानांत साहाय्य करणारा कोणी नाही.


५४१ नास्ति मातृसमाच्छाया नास्ति मातृसमा गतिः ।

नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया ॥ १२.२६६.३१

मातेसारखी सावली नाही, मातेसारखी गति नाही, मातेसारखें छत्र नाही. मातेसारखी प्रिय कोणी नाही.


५४२ नास्ति विद्यासमं चक्षुर्नास्ति सत्यसमं तपः ।

नास्ति रागसमं दुःखं नास्ति त्यागसमं सुखम् ॥ १२.३२९.६

विद्येसारखा अन्य नेत्र नाही. सत्यासारखें तप नाही. विषयवासनेसारखे दुःख नाहीं, आणि त्यागासारखें सुख नाही.


५४३ नास्ति वै जातितः शत्रुः पुरुषस्य विशाम्पते ।

येन साधारणी वृत्तिः स शत्रुर्नेतरो जनः ॥ २.५५.१५

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) राजा, जन्मतःच कोणी मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा शत्रु नसतो. आपल्या सारखीच ज्याची उपजीविका असेल तोच आपला शत्रु; दुसरा कोणी नाही.


५४४ नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।

न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥ १.७४.१०५

सत्यापरता धर्म नाही, सत्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. असत्यापेक्षा अधिक भयंकर असें जगांत काहीच नाही.


५४५ नास्थाने प्रक्रिया क्षमा ॥ १२.११९.३

अस्थानी बहुमान करणे योग्य नव्हे.


५४६ नाहं राज्यं भवदत्तं भोक्तुमिच्छामि पार्थिव ।

बाहुवीर्यार्जितं राज्यमश्नीयामिति कामये ॥ १२.७४.१८

(मुचुकुंद कुबेराला म्हणतो) तुझ्याकडून दान मिळालेले राज्य भोगण्याची माझी इच्छा नाही. स्वतःच्या बाहुबलाने मिळवून त्याचा उपभोग ध्यावा असे मी इच्छितों.


५४७ नाह्रा पूरयितुं शक्या न मासैर्भरतर्षभ ।

अपूर्यां पूरयनिच्छामायुषापि न शक्नुयात् ॥ १२.१७.४

वासनेची तृप्ति एका दिवसाने किंवा काही महिन्यांनीहि होणे शक्य नाही, वासना ही 'अपूर्य ' असून तिची पूर्ति करणे सबंध आयुष्य खर्चून सुद्धा शक्य नाही.


५४८ निकृत्या निकृतिप्रज्ञा हन्तव्या इति निश्चयः ।

न हि नैकृतिकं हत्वा निकृत्या पापमुच्यते ॥ ३.५२.२२

कपटबुद्धि शत्रूचा कपटानेंच वध केला पाहिजे असा सिद्धांत आहे. कपटी शत्रूचा कपटाने वध केला असता त्याला पाप म्हणत नाहीत.


५४९ नित्यं यस्तु सतो रक्षेदसतश्च निवर्तयेत् ।

स एव राजा कर्तव्यस्तेन सर्वमिदं धृतम् ॥ १२.७८.४४

जो नेहमी सज्जनांचे पालन करील आणि दुर्जनांना घालवून देईल त्यालाच राजा करावे. त्याच्याच आश्रयाने सर्व विश्व असते.


५५० नित्यं रक्षितमन्त्रः स्याद्यथा मूकःशरच्छिरखी ॥ १२.१२०.१७

ज्याप्रमाणे मोर हा शरदऋतूंत मौन धारण करतो, त्याप्रमाणे राजाने आपली मसलत नेहमी गुप्त राखावी.


५५१ नित्यं विश्वासयेदन्यान् ।

परेषां तु न विश्वसेत् ॥ १२.१३८.१९५

आपल्याविषयी दुसऱ्यांच्या मनांत नेहमी विश्वास उत्पन्न करावा. आपण मात्र दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नये.


५५२ नित्यमुद्यतदण्डस्य भृशमुद्विजते नरः ।

तस्मात्सर्वाणि भूतानि दण्डेनैव प्रसाधयेत् ॥ १२.१४०.८

दंडशक्ति नेहमी सज्ज असली म्हणजे लोक फार वचकून असतात. यास्तव राजाने सर्व प्राण्यांना दंडशक्तीच्या योगानेच आपल्या ताब्यात ठेवावे.


५५३ नित्यं बुद्धिमतोऽप्यर्थः स्वल्पकोऽपि विवर्धते ।

दाक्ष्येण कुर्वतः कर्म संयमात्पतितिष्ठति ॥ १२.१३९.८८

बुद्धिमान् पुरुषाजवळ आरंभी अगदी थोडे द्रव्य असले तरी ते नेहमी वाढत जातें. दक्षतेनें, एकाग्रतेने उद्योग करणाराचे कार्य पक्के होते.


५५४ निमेषमात्रमपि हि वयो गच्छन्न तिष्ठति ।

स्वशरीरेष्वनित्येषु नित्यं किमनुचिन्तयेत् ॥ १२.३३०.२२

आयुष्य एकसारखे चालले असून एक पळभरसुद्धा थांबत नाही. स्वतःचे शरीरच जेथें अशाश्वत, तेथे कोणती वस्तु शाश्वत म्हणून समजावयाची ?


५५५ नियन्ता चेन्न विद्येत न कश्चिद्धर्ममाचरेत् ॥ ४.६८.४५

नियमन करणारा कोणी नसेल तर कोणीहि धर्माप्रमाणे वागणार नाही.


५५६ निरीहो नाश्नुते महत् ॥ ५.१३३.३४

काहीएक उद्योग न करणाऱ्या पुरुषाला मोठेपणा प्राप्त होत नाही.


५५७ निर्मन्युश्चाप्यसङ्ख्येयः पुरुषः क्लीबसाधनः ॥ ५.१३३.६

ज्याला कधी राग येत नाही असा नामर्द पुरुष कोणाच्या खिसगणतीत नसतो.


५५८ निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम् ।

तस्माद्वयाघ्रो वनं रक्षेद्वनं व्याघ्रं च पालयेत् ॥ ५.२९.५५

वन नसेल तर वाघांचा वध होत असतो, आणि ज्यांत वाघ नाही ते वनहि लोकांकडून तोडले जाते. यास्तव वाघाने वनाचे रक्षण करावें, आणि वनानेहि वाघाचे पालन करावे.


५५९ निश्चयःस्वार्थशास्त्रेषु विश्वासश्चासुखोदयः ॥ १२.१३९.७०

नीतिशास्त्राचा असा सिद्धांत आहे की, विश्वास हा सर्व दुःखांचे उत्पत्तिस्थान आहे.


५६० निश्चित्य यः प्रक्रमते नान्तर्वसति कर्मणः ।

अवन्ध्यकालो वश्यात्मा स वै पण्डित उच्यते ॥ ५.३३.२४

प्रथम निश्चय केल्यावरच जो कार्य हाती घेतो, कार्य हाती घेतल्यावर ते पार पडल्यावांचून जो स्वस्थ बसत नाही, जो आपला वेळ फुकट घालवीत नाही आणि ज्याचे मन स्वाधीन आहे त्याला पंडित असे म्हणतात.


५६१ निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते ।

अनास्तिकः श्रद्दधान एतत्पण्डितलक्षणम् ॥ ५.३३.१६

जो प्रशस्त कर्माचे आचरण करतो, निंद्य कर्मापासून दूर राहतो (पुनर्जन्म, परलोक इत्यादिकांविषयीं) आस्तिक्यबुद्धि धारण करतो, आणि (गुरु, वेदवाक्य इत्यादींवर) विश्वास ठेवतो तो पंडित होय.


५६२ नैकमिच्छेदगुणं हित्वा स्याच्चेदन्यतरग्रहः ।

यस्त्वेको बहुभिःश्रेयान्कामं तेन गणं त्यजेत् ॥ १२.८३.१२

श्रेयसो लक्षणं चैतद्विक्रमो यस्य दृश्यते ॥ १२.८३.१३

समुदायाला सोडून (राजाने) एकाच मनुष्याची इच्छा करू नये; व एकाचाच अंगीकार करणे अवश्य असल्यास, जो एकटा इतर पुष्कळांपेक्षा श्रेष्ठ असेल, त्याचा स्वीकार करून समुदायाचा खुशाल त्याग करावा. कारण, ज्या पक्षांत जास्त पराक्रम असेल तो स्वीकारणें हें कल्याणाचे लक्षण आहे.


५६३ नैवास्य कश्चिद्भविता नायं भवति कस्यचित् ।

पथि सङ्गतमेवेदं दारबन्धुसुहृज्जनैः ॥ १२.२८.३९

ह्या जीवात्म्याचा कोणी नाही आणि हा कोणाचा नाही. स्त्री, इतर नातलग व इष्ट मित्र यांचा सहवास हा केवळ रस्त्यांतील भेटीसारखा आहे.


५६४ नैवाहितानां सततं विपश्चितः

     क्षणं प्रतीक्षन्त्यपि दुर्बलीयसाम् ।

विशेषतोऽरीन्व्यसनेषु पण्डितो

     निहत्य धर्मं च यशश्च विन्दते ॥ ८.९०.७१

शत्रु दुर्बळ झाले म्हणजे शहाणे लोक केव्हांहि त्यांचा नाश करण्याला क्षणभरदेखील विलंब लावीत नाहीत. शत्रूचा वध करणें तो विशेषेकरून तो संकटांत असतांनाच केला पाहिजे. शहाण्याने अशाच स्थितीत शत्रूचा नाश केल्यास त्याजकडून धर्माचरण होऊन शिवाय त्यास कीर्तिहि प्राप्त होते.


५६५ नोदकक्लिन्नगात्रस्तु स्नात इत्यभिधीयते ।

स स्नातो यो दमस्नातः स बाह्याभ्यन्तरःशुचिः ॥ १३.१०८.९

पाण्याने आंग भिजविले म्हणजे स्नान केले असे म्हणत नाहीत. ज्याने इंद्रियदमनरूप उदकांत स्नान केलें तोच खरोखर 'स्नात' झाला. तो अंतर्बाह्य शुचिर्भूत झाला.


५६६ न्यायागतस्य द्रव्यस्य बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ ।

अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ॥ ५.३३.५९

न्यायाने मिळालेल्या द्रव्याचे दोन दुरुपयोग जाणावे. एक, अपात्री दान करणे. व दुसरा, सत्पात्री न करणे.


५६७ पक्वानां हि वधे सूत वज्रायन्ते तृणान्युत ॥ ७.११.४८

पक्व झालेल्यांचा वध करण्याच्या कामी तृणाचासुद्धा वज्रासारखा उपयोग होतो.


५६८ पञ्चमेऽहनि षष्ठे वा शाकं पचति स्वे गृहे ।

अनृणी चाप्रवासी च स वारिचर मोदते ॥ ३.३१३.११५

(युधिष्ठिर यक्षाला म्हणतो) पांचव्या अथवा सहाव्या दिवशी का होईना, जो, स्वतःचे घरीच असेल तो भाजीपाला उकडून खातो, ज्याला कोणाचे देणे नाही, आणि ज्याला प्रवास करावा लागत नाही तो, हे यक्षा, आनंदाने राहतो.


५६९ पञ्चेन्द्रियस्य मर्त्यस्य छिद्रं चेदेकमिन्द्रियम् ।

ततोऽस्य स्रवति प्रज्ञा दृतेः पात्रादिवोदकम् ॥ ५.३३.७७

मनुष्याच्या पांच इंद्रियांपैकी एकादें जरी ताब्यात नसेल तरी त्याच्या द्वारे, भांड्यांतील पाणी भोंकांतून गळून जावे त्याप्रमाणे, त्याची बुद्धि नष्ट होते.


५७० पठकाः पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्रचिन्तकाः ।

सर्वेव्यसनिनोमूर्खा यःक्रियावान्सपण्डितः ॥ ३.३१३.११०

शिकणारे व शिकविणारे तसेंच इतर जे कोणी शास्त्राविषयी विचार करतात ते सर्व अभागी, मूर्ख आहेत. जो काही तरी करून दाखवितो तोच खरा शहाणा.


५७१ पण्डितेन विरुद्धः सन् दूरस्थोऽस्मीति नाश्वसेत् ।

दीर्घौबुद्धिमतो बाहू याभ्यां हिंसति हिंसितः ॥ १२.१४०.६८

पंडिताशी विरोध आला असता, आपण त्याच्यापासून दूर आहो असे समजून निर्भयपणे राहूं नये. कारण बुद्धिमान् पुरुषाचे बाहू (दिसण्यांत जेवढे दिसतात तेवढे नसून ते) फार लांब असतात, व त्याला पीडा दिल्यास त्यांच्या योगानें तो पीडा देणाऱ्यांचा वध करतो.


५७२ पतितः शोच्यते राजन्निर्धनश्चापि शोच्यते ।

विशेषं नाधिगच्छामि पतितस्याधनस्य च ॥ १२.८.१५

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) राजा, लोक पातकी मनुष्याच्या संबंधाने हळहळतात आणि निर्धनाच्या संबंधानेहि हळहळतात. मला तर महापातकी आणि दरिद्री यांच्यामध्ये काहीं भेद दिसत नाही.


५७३ पतिर्हि देवो नारीणां पतिर्बन्धुः पतिर्गतिः ।

पत्या समा गतिर्नास्ति दैवतं वा यथा पतिः ॥ १३.१४६.५५

पति हाच स्त्रियांचा देव, पति हाच बांधव, आणि पति हेच आश्रयस्थान, स्त्रियांना पतीसारखी गति नाही, पति हा खरोखर देवासमान होय.


५७४ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ ६.३३.२६

(भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात) पान, फूल, फळ किंवा नुसते पाणी सुद्धा जो मला (परमेश्वराला) भक्तिपूर्वक अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्याचे भक्तीने अर्पण केलेले मी स्वीकारीत असतो.


५७५ परं विषहते यस्मात्तस्मात्पुरुष उच्यते ॥ ५.१३३.३५

शत्रूचा पराजय करतो म्हणून पुरुष म्हणतात.


५७६ परं क्षिपति दोषेण वर्तमानः स्वयं तथा ।

यश्च क्रुध्यत्यनीशानः स च मूढतमो नरः ॥ ५.३३.३७

जो दोष स्वतःचे ठिकाणी आहे त्याच दोषाबद्दल जो दुसऱ्याला नावे ठेवतो, तसेंच आंगी सामर्थ्य नसतां जो रागावतो तो मनुष्य पराकाष्ठेचा मूर्ख होय.


५७७ परनेयोऽग्रणीर्यस्य स मार्गान्प्रतिमुह्यति ।

पन्थानमनुगच्छेयुः कथं तस्य पदानुगाः ॥ २.५५.४

ज्याचा पुढारी दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा असतो. त्याचा स्वतःचाच मार्ग चुकतो. मग आणखीहि त्याच्या मागून जाणारांना योग्य मार्ग कसा सांपडावा ?


५७८ परवाच्येषु निपुणः सर्वो भवति सर्वदा ।

आत्मवाच्यं न जानीते जानन्नपि च मुह्यति ॥ ८.४५/४४

दुस-याचे दोष काढण्यात सर्वजण प्रवीण असतात. कोणालाही स्वतःचा दोष -मात्र समजत नाही; आणि समजला तर उमजत नाही.


५७९ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ६.२८.८

(श्रीकृष्ण म्हणतात) सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी, दुष्टांचे निर्दलन करण्यासाठी, आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी युगायुगांच्या ठिकाणी मी (परमेश्वर) अवतार घेत असतो.


५८० पर्जन्यः पवते वर्षन् किं नु साधयते फलम् ।

कृष्टे क्षेत्र तथा वर्षन् किं न साधयते फलम् ॥ १०.२.५

पाऊस डोंगरावर पुष्कळ पडला तरी त्यापासून कोणते फळ मिळणार ? तोच नांगरलेल्या शेतात पडला तर कोणते फळ मिळणार नाही ?


५८१ पर्जन्यनाथाः पशवो राजानो मन्त्रिबान्धवाः ।

पतयो बान्धवाः स्त्रीणां ब्राह्मणा वेदबान्धवाः ॥ ५.३४.३८

पर्जन्य हा पशूचा बांधव (हितकर्ता) होय. राजांचा बांधव प्रधान, स्त्रियांचा बांधव पति, आणि ब्राह्मणांचा बांधव वेद होय.


५८२ पर्यङ्कशय्या भूमिश्च समाने यस्य देहिनः ।

शालयश्च कदन्नं यस्य स्यान्मुक्त एव सः ॥ १२.२८८.३४

पलंगावर पहुडणे व जमिनीवर पडणे ही दोनहि ज्याला सारखींच वाटतात, तसेंच उंची पक्काने आणि कदन्न ज्याला सारखेच तो मुक्तच होय.


५८३ पात्रे दानं स्वल्पमपि काले दत्तं युधिष्ठिर ।

मनसा हि विशुद्धेन प्रेत्यानन्तफलं स्मृतम् ॥ ३.२५९.३४

(व्यासमुनि म्हणतात) हे युधिष्ठिरा, योग्य ठिकाणी योग्य वेळी शुद्ध मनाने केलेले दान अत्यल्प जरी असले, तरी त्यापासून मरणोत्तर मोठे फळ मिळतें.


५८४ पानमक्षास्तथा नार्यो मृगया गीतवादितम् ।

एतानि युक्त्या सेवेत प्रसङ्गो ह्यत्र दोषवान् ॥ १२.१४०.२६

मद्य, जुगार, त्याचप्रमाणे स्त्रिया, मृगया आणि गाणे बजावणे यांचे जपून सेवन करावे. कारण, यांची चटक लागणे फार वाईट.


५८५ पापानां विद्धयधिष्ठानं लोभमेव द्विजोत्तम ॥ ३.२०७.५८

(धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणतो) हे द्विजश्रेष्ठा, सर्व पापांचे आश्रयस्थान लोभ हेच आहे असें जाण.


५८६ पापेभ्यो हि धनं दत्तं दातारमपि पीडयेत् ।

तस्माद्धमार्थमनृतमुक्त्वा नानृतभाग्भवेत् ॥ ८.६९.६५

दुष्टांना धन मिळू दिले असता त्यापासून देणारालासुद्धा पीडा होते. (म्हणून चोराला धन कोठे आहे हे सांगण्यापेक्षा खुशाल खोटे सांगावे.) म्हणून धर्मासाठी खोटे बोललें असतां खोटे बोलण्याचे पाप लागत नाही.


५८७ पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।

पुत्राश्च स्थाविरे भावे न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ॥ १३.४६.१४

स्त्रीचें कुवारपणी बाप रक्षण करितो, तरुणपणी पति रक्षण करितो, आणि वृद्धपी मुलगे रक्षण करितात. एवंच, स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाही.


५८८ पित्रा पुत्रो वयःस्थोऽपि सततं वाच्य एव तु ।

यथा स्याद्गुणसंयुक्तः प्राप्नुयाच्च महद्यशः ॥ १.४२.४

मुलगा मोठा झाला असला, तरी सुद्धां तो सद्गुणी व्हावा आणि त्याला उत्तम प्रकारचे यश लाभावे, म्हणून बापाने त्याला तशा प्रकारचा उपदेश करावा.


५८९ पिबन्त्येवोदकं गावो मण्डूकेषु रुवत्स्वपि ॥ १२.१४१.८२

(तळ्यांतील) बेडकांनी कितीहि डरांव डरांव केले तरी गाई पाणी पितातच !


५९० पुत्र आत्मा मनुष्यस्य भायो दैवकृतः सखा ॥ ३.३१३.७२

पुत्र हाच मनुष्याचा आत्मा होय, आणि भार्या हा दैवानें प्राप्त झालेला सखा होय.


५९१ पुत्रं हि मातापितरौ त्यजतः पतितं प्रियम् ।

लोकोरक्षति चात्मानम्पश्यस्वार्थस्यसारताम् ॥ १२.१३८.१४६

आपला पुत्र प्रिय असूनहि पतित झाला तर आईबापसुद्धा त्याचा त्याग करतात, लोकहि (इतरांकडे न पाहतां) स्वतःचे संरक्षण करीत असतात. स्वार्थाचा प्रभाव केवढा आहे पहा!


५९२ पुत्र नात्मावमन्तव्यः पूर्वाभिरसमृद्धिभिः ॥ ५.१३५.२५

(विदुला माता संजयाला म्हणते) हे पुत्रा, प्रथमतः आपणापाशी जरी संपत्ति नसली तरी त्याकरितां पुरुषाने स्वतःला दीन समजू नये.


५९३ पुत्रपौत्रोपपन्नोऽपि जननीं यः समाश्रितः ।

अपि वर्षशतस्यान्ते स द्विहायनवञ्चरेत् ॥ १.२६६.२८

मनुष्य पुत्रपौत्रांनी युक्त असला तरी ज्याला मातेचा आश्रय आहे, तो आपल्या वयाच्या शंभराव्या वर्षीच्या शेवटीहि दोन वर्षांच्या लहान मुलाप्रमाणे वागेल !


५९४ पुत्रस्पर्शात्सुखतरः स्पर्शो लोके न विद्यते ॥ १.७४.५८

पुत्रस्पर्शापेक्षा सुखकर स्पर्श जगांत कोणताच नाही.


५९५ पुत्रः सखा वा भ्राता वा पिता वा यदि वा गुरुः ।

रिपुस्थानेषु वर्तन्तो हन्तव्या भूतिमिच्छता ॥ १.१४०.५२

पुत्र, मित्र, भाऊ, बाप किंवा गुरु, कोणीहि असो, तो जर शत्रुत्वाने वागत असेल तर त्याचा उत्कर्षेच्छु पुरुषाने वध करावा.


५९६ पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवाः ।

निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तमः ॥ १२.५७.३३

बापाच्या घरात जसे मुलगे, तसे ज्याच्या राज्यांत लोक निर्भयपणे संचार करूं शकतात, तो राजा सर्व राजांत श्रेष्ठ होय.


५९७ पुनरावर्तमानानां भग्नानां जीवितैषिणाम् ।

भेतव्यमरिशेषाणामेकायनगता हि ते ॥ ९.५८.१५

जिवाची इच्छा करणारे पण एकदा पराभव पावले असून, पुनः उलटून येणारे असे जे शत्रूकडील उरलेले लोक त्यांचे भय धरावें. कारण, (मारीन किंवा मरेन एवढा) एकच विषय त्याच्या दृष्टीपुढे असतो.


५९८ पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः ।

तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवा ॥ १.७४.३९

पुत् नामक नरकापासून मुलगा बापाचे रक्षण करतो, म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवानेच पुत्र असे म्हटले आहे.


५९९ पुरुषे पुरुषे बुद्धियो या भवति शोभना ।

तुष्यन्ति च पृथक्सर्वे प्रज्ञया ते स्वया स्वया ॥ १०.३.३

प्रत्येक मनुष्यामध्ये जो म्हणून शहाणपणाचा भाग असतो, तेवढ्यावरच जो तो आपापल्या ठिकाणी खुष असतो.


६०० पुष्पं पुष्पं विचिन्वीत मूलच्छेदं न कारयेत् ।

मालकार इवारामे न यथाङ्गारकारकः ॥ ५.३४.१८

बागेतील माळ्याप्रमाणे वृक्षाचे मूळ न तोडितां फूल येईल तेवढे घेत असावें. लोणाऱ्याप्रमाणे मुळासकट वृक्ष तोडून टाकू नये.


६०१ पूर्वं संमानना यत्र पश्चाच्चैव विमानना ।

जह्यात्तत्सत्त्ववान्स्थानं शत्रोःसंमानितोऽपि सन् ॥ १२.१३९.३३

जेथे पहिल्याने बहुमान मिळतो व मागाहून अपमान होतो ते ठिकाण, शत्रूकडून पुनरपि मानसन्मान मिळाला तरी, स्वाभिमानी पुरुषाने सोडूनच दिले पाहिजे.


६०२ पृथिवी रत्नसम्पूर्णा हिरण्यं पशवः स्त्रियः ।

नालमेकस्य तत्सर्वमिति मत्वा शमं व्रजेत् ॥ १.७५.५१

रत्नांनी परिपूर्ण असलेली सर्व पृथ्वी, सोने, पशु, स्त्रिया हे सर्व एकट्याला मिळालें तरी, पुरणार नाही असा विचार करून, मनुष्याने मनोनिग्रह करण्यास शिकावे.


६०३ प्रक्षालनाद्धि पङ्कस्य श्रेयो न स्पर्शनं नृणाम् ॥ ३.२.४९

चिखल (आंगावर उडाल्यावर) धुऊन टाकण्यापेक्षा त्याला स्पर्शच न करणे मनुष्यांना सुखावह होते.


६०४ प्रच्छन्नो वा प्रकाशो वा योगो योऽरिं प्रबाधते ।

तद्वै शस्त्रं शस्त्रविदा न शस्त्रं छेदनं स्मृतम् ॥ २.५५.९

उघड असो अथवा गुप्त असो, ज्या उपायाने शत्रूचा नाश होत असेल त्या उपायालाच वीरांचे शस्त्र म्हणतात. (हातपाय) तोडणाऱ्या शस्त्राला शस्त्र म्हणत नाहीत.


६०५ प्रज्ञया मानसं दुःखं हन्याच्छारीरमौषधैः ।

एतद्विज्ञानसामर्थ्यं न बालैः समतामियात् ॥ १२.२०५.३

मानसिक दुःख विवेकाने आणि शारीरिक दुःख औषधाने नाहीसे करावें. अशा प्रकारे दुःखाचा नाश करणे हेच ज्ञानाच्या सामर्थ्याचे लक्षण आहे. (दुःखाचा परिहार न करितां) लहान बालकांसारखे वागू नये.


६०६ प्रज्ञा प्रतिष्ठा भूतानां प्रज्ञा लाभः परो मतः ।

प्रज्ञा निःश्रेयसी लोके प्रज्ञा स्वर्गो मतः सताम् ॥ १२.१८०.१२

ज्ञान हाच प्राण्यांचा आधार आहे. ज्ञान हाच उत्कृष्ट असा लाभ आहे. लोकांत ज्ञान हेच मोक्षालाहि कारण आहे. ज्ञान हाच प्रत्यक्ष स्वर्ग आहे. असें सत्पुरुषांचे मत आहे.


६०७ प्रतिकूलः पितुर्यश्च न स पुत्रः सतां मतः ॥ १.८५.२४

बापाशी जो वैर करतो तो पुत्र सज्जनांना मान्य होत नाही.


६०८ प्रत्युपकुर्वन्बह्वपि न भाति पूर्वोपकारिणा तुल्यः ।

एक:करोतिहिकृतेनिष्कारणमेवकुरुतेऽन्यः ॥ १२.१३८.८२

उपकारांची भरपूर फेड करणारा मूळ उपकार करणाऱ्याच्या बरोबरीचा ठरेल असे वाटत नाही. कां की, एकजण आधी उपकृत झाल्यावर मग (फेड म्हणून) करीत असतो, तर दुसरा निरपेक्ष बुद्धीनेच उपकार करतो.


६०९ प्रत्युपस्थितकालस्य सुखस्य परिवर्जनम् ।

अनागतसुखाशा च नैव बुद्धिमतां नयः ॥ १२.१४०.३६

वेळेवर चालून आलेलें सुख सोडून द्यावयाचे आणि प्राप्त न झालेल्या सुखाची आशा करीत बसावयाचे ही शहाण्यांची रीतच नव्हे.


६१० प्रभवन् योऽनहंवादी स वै पुरुष उच्यते ॥ १३.१४६.१५

हाती सत्ता असून ज्याला गर्व नाही तोच पुरुष म्हणावयाचा.


६११ प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।

यः स्यात्प्रभवसंयुक्तःस धर्म इति निश्चयः ॥ १२.१०९.१०

जीवांचा उत्कर्ष व्हावा एवढ्यासाठीच धर्म कथन केला आहे. जो उत्कर्षाने युक्त असेल तोच धर्म असा सिद्धांत आहे.


६१२ प्रयोजनेषु ये सक्ता न विशेषेषु भारत ।

तानहं पण्डितान्मन्ये विशेषा हि प्रसङ्गिनः ॥ ५.३८.४४

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, जे केवळ कार्ये पार पाडण्याविषयीं तत्पर असतात, फाजील भानगडीत पडत नाहीत, त्यांना मी शहाणे समजतो. कारण, स्वतःचे आधिक्य दाखविणारे कलहाचा प्रसंग आणितात.


६१३ प्रवारणं तु बालानां पूर्वं कार्यमिति श्रुतिः ॥ ५.७.१७

बालकांची इच्छा प्रथम पुरवावी अशी श्रुति आहे.


६१४ प्रवृत्तवाक् चित्रकथ ऊहवान्प्रतिभानवान् ।

आशु ग्रन्थस्य वक्ता च यः स पण्डित उच्यते ॥ ५.३३.२८

बोलका, मनोरंजक गोष्टी माहीत असलेला, तर्कवान् अणि समयसूचक असून जो ग्रंथाचा अर्थ चटकन् सांगतो तो पंडित होय.


६१५ प्रसादो निष्फलो यस्य क्रोधश्चापि निरर्थकः ।

न तं भर्तारमिच्छन्ति षण्ढं पतिमिव स्त्रियः ॥ ५.३४.२१

ज्याच्या मेहरबानीचा काही उपयोग नाही आणि रागापासूनहि काही हानि नाही. असा अधिपति, ज्याप्रमाणे स्त्रियांना नामर्द पति नको असतो त्याप्रमाणे, प्रजेला नको असतो.


६१६ प्रसृतैरिन्द्रियैर्दुःखी तैरेव नियतैः सुखी ।

तस्मादिन्द्रियरूपेभ्यो यच्छेदात्मानमात्मना ॥ १२.२०४.९

इंद्रिये मोकळी सोडल्याने मनुष्य दुःखी होतो व तीच आवरून धरल्याने सुखी होतो; यासाठी, इंद्रियांच्या निरनिराळ्या विषयांपासून आपण आपले मन आवरून धरावें.


६१७ प्रस्थं वाहसहस्रेषु यात्रार्थं चैव कोटिषु ।

प्रासादे मञ्चकं स्थानं यः पश्यति स मुच्यते ॥ १२.२८८.३०

हजारों नव्हे कोट्यवधि गाडे धान्य पुढे पडले असताहि, जो केवळ निर्वाहाला लागणाऱ्या मापटेंभर धान्याचीच अपेक्षा करतो, व ज्याला मोठा राजवाडा रहावयास दिला असता, एक खाट ठेवण्याइतकीच जागा जो पुरेशी समजतो तो मुक्त होतो.


६१८ प्रहरिष्यन्प्रियं ब्रूयात्प्रहरन्नपि भारत ।

प्रहृत्य च कृपायीत शोचेत च रुदेत च ॥ १.१४०.५६

(कणिक ब्राह्मण धृतराष्ट्राला सांगतो) (शत्रूवर) प्रहार करण्याचे मनांत असता वरकरणी त्याच्याशी गोड बोलावे, तसेंच प्रहार करीत असतांहि गोडच बोलावें आणि प्रहार केल्यावर त्याच्याविषयी सहानुभूति दाखवावी, खेद प्रदर्शित करावा व रडावेंहि.


६१९ प्राकृतो हि प्रशंसन्वा निन्दन्वा किं करिष्यति ।

वने काक इवाबुद्धिर्वाशमानो निरर्थकम् ॥ १२.११४.८

हलका मनुष्य, प्रशंसा करून असो, अथवा निंदा करून असो, करणार काय आहे ? अरण्यांत निरर्थक ओरडणाऱ्या कावळ्याप्रमाणे मंदबुद्धि मनुष्याची स्थिति आहे.


६२० प्राज्ञस्तु जल्पता पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः ।

गुणवद्वाक्यमादत्ते हंसः क्षीरमिवाम्भसः ॥ १.७४.९१

यथेच्छ बरळणाऱ्या लोकांचे बरे वाईट बोलणे ऐकून, पाणी टाकून देऊन दूध ग्रहण करणाऱ्या हंसाप्रमाणे, त्यांतून चांगले बोलणे तेवढे शहाणा मनुष्य घेत असतो.


६२१ प्राज्ञो वा यदि वा मूर्खः सधनो निर्धनोऽपि वा ।

सर्वः कालवशं याति शुभाशुभसमन्वितः ॥ १२.१५३.४३

शहाणा असो, मूर्ख असो, श्रीमंत असो, दरिद्री असो सर्वांना आपापलें पापपुण्य बरोबर घेऊन काळाच्या स्वाधीन व्हावे लागते.


६२२ प्राणस्यान्नमिदं सर्वं जङ्गमं स्थावरं च यत् ॥ १२.१०.६

स्थावर जंगम जें जें कांही आहे ते सर्व प्राणाचे अन्न होय.


६२३ प्राप्तं च प्रहरेत्काले न च संवर्तते पुनः ।

हन्तुकामस्य देवेन्द्र पुरुषस्य रिपून्प्रति ॥ १२.१०३.२०

यो हि कालो व्यतिक्रामेत्पुरुषं कालकाङ्क्षिणम् ।

दुर्लभः स पुनस्तेन कालः कर्मचिकीर्षुणा ॥ १२.१०३.२१

(बृहस्पति इंद्राला म्हणतात) देवेंद्रा, शत्रूला मारण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाने योग्य संधि आली असतां प्रहार केला पाहिजे. गेलेली वेळ फिरून येत नसते; कार्य साधण्याच्या इच्छेने योग्य काळाची वाट पाहणाऱ्या पुरुषाने आलेली संधि गमावली तर ती त्याला फिरून मिळणे कठीण.


६२४ प्रायेण नीचा व्यसनेषु मग्ना

निन्दन्ति देवं कुकृतं न तु स्वम् ॥ ८.९१.१

नीच लोक संकटांत सांपडले म्हणजे बहुतकरून देवाला दोष लावतात; ते आपल्या दुष्कर्माला बोल लावीत नाहीत !


६२५ प्रायेण श्रीमतां लोके भोक्तुं शक्तिर्न विद्यते ।

जीर्यन्त्यपि हि काष्ठानि दरिद्राणां च सर्वशः ॥ १२.२८.२९

बहुतकरून श्रीमंत लोकांना जेवण्याची शक्तिच नसते. आणि दरिद्री मनुष्यांना लाकडेसुद्धां सर्व पचून जातात.


६२६ प्रार्थना विषम् ॥ ३.३१३.८६

याचना हे विषच होय.


६२७ प्रीयते हि हरन्पापः परवित्तमराजके ।

यदास्य उद्धरन्त्यन्ये तदा राजानमिच्छति ॥ १२.६७.१३

दुसऱ्याचे द्रव्य हरण करणाऱ्या पापी मनुष्याला देशांत राजा नसलेला बरा वाटतो; पण जेव्हा त्याचे द्रव्य दुसरे लोक नेऊं लागतात, तेव्हा त्याला राजा असावा, असें वाटू लागते.


६२८ फलशाकमपि श्रेयो भोक्तुं ह्यकृपणं गृहे ।

परस्य तु गृहे भोक्तुः परिभूतस्य नित्यशः ॥ ३.१९३.३०

नित्य अपमान सहन करून दुसऱ्याच्या घरी जेवण्यापेक्षा, मिंधेपणा न पत्करतां स्वतःच्या घरी मीठभाकरसुद्धा खालेली बरी !


६२९ बकवञ्चिन्तयेदर्थान् सिंहवच्च पराक्रमेत् ।

वृकवच्चाप्यलुम्पेत शशवच्च विनिष्पतेत् ॥ १२.१४०.२५

बगळ्याप्रमाणे आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष्य ठेवावे आणि सिंहाप्रमाणे पराक्रम गाजवावा. लांडग्याप्रमाणे शत्रूवर अचानक हल्ला करावा, व सशाप्रमाणे निसटून जावें.


६३० बलं हि क्षत्रिये नित्यं बले दण्डः समाहितः ॥ १२.२३.१३

क्षत्रियांचे ठिकाणी बल हे नियमाने वास्तव्य करणारे असून बलावरच दंड अवलंबून आहे.


६३१ बलज्येष्ठं स्मृतं क्षत्रं मन्त्रज्येष्ठा द्विजातयः ।

धनज्येष्ठाःस्मृता वैश्याःशूद्रास्तु वयसाधिकाः ॥ ५.१६८.१७

क्षत्रिय बळाने श्रेष्ठ, ब्राह्मण मंत्रसामर्थ्याने श्रेष्ठ आणि वैश्य धनानें श्रेष्ठ होत. शूद्र हे मात्र केवळ वयाने मोठे.


६३२ बलं तु वाचि द्विजसत्तमानां

क्षात्रं बुधा बाहुबलं वदन्ति ॥ ८.७०.१२

उत्तम ब्राह्मणांचे बळ वाणीत, व क्षत्रियांचे बळ बाहूंत असते असें शहाणे लोक सांगतात.


६३३ बलवत्संनिकर्षो हि न कदाचित्प्रशस्यते ॥ १२.१३८.१७५

बलवानाशी सान्निध्य असणे केव्हांहि प्रशस्त नव्हे.


६३४ बलवांश्च यथा धर्मं लोके पश्यति पूरुषः ।

स धर्मो धर्मवेलायां भवत्यभिहतः परः ॥ २.६९.१५

धर्मनिर्णय करण्याची वेळ आली म्हणजे, जगात बलसंपन्न पुरुष ठरवील तो धर्म ठरतो; दुसऱ्या धर्माची पायमल्ली होते.


६३५ बलवान्वा कृती वेति कृती राजन्विशिष्यते ॥ ९.३३.९

(श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, बलवान् आणि कृती यांच्यांत श्रेष्ठ कोण असा विचार करतां, कृती (म्हणजे डावपेच जाणणारा, युक्तिमान्) हाच श्रेष्ठ ठरतो.


६३६ बलिना संनिकृष्टस्य शत्रोरपि परिग्रहः ।

कार्य इत्याहुराचार्या विषमे जीवितार्थिना ॥ १२.१३८.४५

संकटांत सांपडल्यास जीविताची इच्छा करणाऱ्या बलाढ्यहि प्राण्याने आपल्या समीप असणाऱ्या शत्रूचाहि आश्रय करावा, असें नीतिशास्त्राच्या आचार्यांनी सांगितलेले आहे.


६३७ बहवः पण्डिता मूर्खा लुब्धा मायोपजीविनः ।

कुर्युर्दोषमदोषस्य बृहस्पतिमतेरपि ॥ १२.१११.६३

अनेक पंडित आणि मूर्ख लोक लोभी व कपटाचरणावरच उपजीविका करणारे असतात. आणि ते निर्दोष पुरुषालाच नव्हे तर प्रत्यक्ष बृहस्पतीच्याहि बुद्धीला दोष लावितात.


६३८ बालो युवा च वृद्धश्च यत्करोति शुभाशुभम् ।

तस्यां तस्यामवस्थायां तत्फलं प्रतिपद्यते ॥ १२.१८१.१५

बाल, तरुण अथवा वृद्ध पुरुष जें जें कांही शुभ अथवा अशुभ कर्म करतो, त्याचें फळ त्या त्या अवस्थेत त्याला अवश्य मिळतें.


६३९ बुद्धिमान्वृद्धसेवया ॥ ३.३१३.४८

वृद्धांचा समागम केल्याने मनुष्य चतुर होतो.


६४० बुद्धिश्च हीयते पुंसां नीचैः सह समागमात् ।

मध्यमैर्मध्यतां याति श्रेष्ठतां याति चोत्तमैः ॥ ३.१.३०

नीच लोकांच्या संगतीने मनुष्यांची बुद्धि भ्रष्ट होते, मध्यम लोकांच्या संगतीने ती मध्यम होते, आणि उत्तम लोकांशी सहवास ठेविल्याने उत्तम होते.


६४१ बुद्धौ कलुषभूतायां विनाशे प्रत्युपस्थिते ।

अनयो नयसङ्काशो हृदयान्नापसर्पति ॥ ५.३४.८२

बुद्धि मलिन झाली व विनाशकाल जवळ येऊन ठेपला म्हणजे नीतीसारखी दिसणारी अनीति मनुष्याच्या हृदयात ठाणे देऊन बसते.


६४२ बुभुक्षां जयते यस्तु स स्वर्गं जयते ध्रुवम् ॥ १४.९०.९१

ज्याने क्षुधा जिंकली त्याने खचित स्वर्ग जिंकला.


६४३ ब्रह्मक्षत्रं हि सर्वेषां वर्णानां मूलमुच्यते ॥ १२.७३.५

ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच सर्व वर्णाचें मूळ होत.


६४४ ब्रह्म क्षत्रेण सहितं क्षत्रं च ब्रह्मणा सह ।

संयुक्तौ दहतः शत्रून्वनानीवाग्निमारुतौ ॥ ३.१८५.२५

ब्राह्मणानें क्षत्रियाशी व क्षत्रियाने ब्राह्मणाशी सहकार्य केलें म्हणजे ते दोघे मिळून वनेंच्या वने जाळून फस्त करणाऱ्या अग्नि-वायूंप्रमाणे, शत्रूंना जाळून टाकतील.


६४५ ब्रह्मचर्यं परो धर्मः ॥ १.१७०.७१

ब्रह्मचर्य पाळणे हा श्रेष्ठ धर्म होय.


६४६ ब्रह्म वर्धयति क्षत्रं क्षत्रतो ब्रह्म वर्धते ॥ १२.७३.३२

ब्राह्मण क्षत्रियाचे सामर्थ्य वाढवितो आणि क्षत्रियामुळे ब्राह्मणाचा उत्कर्ष होतो.


६४७ ब्रह्महत्याफलं तस्य यः कृतं नावबुध्यते ॥ ७.१८३.२८

आपणांवर दुसऱ्याने केलेला उपकार जो स्मरत नाही, त्याला ब्रह्महत्त्येचें पातक लागते.


६४८ ब्राह्मणस्य तु देहोऽयं न कामार्थाय जायते ।

इह क्लेशाय तपसे प्रेत्य त्वनुपमं सुखम् ॥ १२.३२१.२३

ब्राह्मणाचा देह हा सुखोपभोगासाठी निर्माण झालेला नाही, इहलोकी क्लेश भोगून तपाचरण करण्यासाठी ब्राह्मण जन्मला आहे. असे केले तरच परलोकी जीवाला निरुपम सुख मिळेल.


६४९ ब्राह्मण्यं बहुभिरवाप्यते तपोभि-

स्तल्लब्ध्वा न रतिपरेण हेलितव्यम् ।

स्वाध्याये तपसि दमे च नित्ययुक्तः

क्षेमार्थी कुशलपरः सदा यतस्व ॥ १२.३२१.२४

(व्यासमुनि शुकाला सांगतात।) पुष्कळ प्रकारे तप करावें तेव्हांच ब्राह्मणत्व प्राप्त होत असते. ते लाभल्यावर विषयांच्या नादी लागून व्यर्थ दवडू नये, आत्मकल्याण साधून घेण्याची इच्छा असेल तर वेदाभ्यास, तप व इंद्रियदमन यांमध्ये नेहमी दक्ष राहून सत्कर्म करून झटून प्रयत्न कर.


६५० भक्ष्योत्तमप्रतिच्छन्नं मत्स्यो बडिशमायसम् ।

लोभाभिपाती ग्रसते नानुबन्धमवेक्षते ॥ ५.३४.१३

उत्तम प्रकारच्या खाद्य पदार्थाने आच्छादलेला लोखंडाचा गळ मासा लोभानें झडप घालून गिळून टाकतो, (असें करितांना) पाठीमागून परिणाम काय होईल इकडे त्याचे लक्ष्य नसते.


६५१ भज्येतापि न संनमेत् ॥ ९.५.१४

तुटून जावे पण वाकू नये.


६५२ भयेन भेदयेद्भीरुं शूरमञ्जलिकर्मणा ।

लुब्धमर्थप्रदानेन समं न्यूनं तथौजसा ॥ १.१४०.५०

भित्रा असेल त्याला भीति दाखवून फितूर करावा; शराला हात जोडून, लोभी असेल त्याला द्रव्य देऊन, आणि बरोबरीचा किंवा दुर्बळ असेल त्याला जबरदस्तीने वश करावा.


६५३ भर्तव्या रक्षणीया च पत्नी हि पतिना सदा ॥ ३.६९.४१

पतीनें निरंतर पत्नीचे पोषण व रक्षण केले पाहिजे.


६५४ भवितव्यं सदा राज्ञा गर्भिणीसहधर्मिणा ॥ १२.५६.४४

ज्याप्रमाणे गर्भिणी स्त्री गर्भाचे संगोपन करते, त्याप्रमाणे राजानें निरंतर प्रजाजनांचे रक्षण करावें.


६५५ भारं स वहते तस्य ग्रन्थस्यार्थं न वेत्ति यः ।

यस्तु ग्रन्थार्थतत्त्वज्ञो नास्य ग्रन्थागमो वृथा ॥ १२.३०५.१४

ज्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाहीं (पण जो नुसती घोकंपट्टी करतो) तो त्या ग्रंथाचा केवळ भार वाहतो. परंतु ज्याने ग्रंथाच्या अर्थाचे रहस्य जाणले त्याचाच अभ्यास सार्थकी लागला.


६५६ भार्यायां रक्ष्यमाणायां प्रजा भवति रक्षिता ।

प्रजायां रक्ष्यमाणायामात्मा भवति रक्षितः ॥ ३.१२.६९

भार्येचे संरक्षण होऊ लागले असतां संततीचे संरक्षण होतें, आणि संततीचे संरक्षण होऊ लागले असतां आपलें संरक्षण होते.


६५७ भार्या हि परमो ह्यर्थः पुरुषस्येह पठ्यते ॥


असहायस्य लोकेऽस्मिँल्लोक यात्रासहायिनी ॥ १२.१४४.१४

भार्या ही पुरुषाची इहलोकांतील परमश्रेष्ठ संपत्ति होय असे म्हटलेले आहे. या जगांत असहाय असलेल्या पुरुषाला संसाराच्या कामी साहाय्य करणारी तीच आहे.


६५८ भार्याहीनं गृहस्थस्य शून्यमेव गृहं भवेत् ॥ १२.१४४.५

भार्येवांचून गृहस्थाचे घर रिकामेच वाटते.


६५९ भिन्नानामतुलो नाशः क्षिप्रमेव प्रवर्तते ॥ १.२९.२०

ज्यांच्यांत भिन्नभाव उत्पन्न झाला त्यांचा तत्काळ सर्वथा नाश होतो.


६६० भिन्ना श्लिष्टा तु या प्रीतिर्न सा स्नेहेन वर्तते ॥ १२.१११.८५

एकदा मोडून पुनः जोडलेला स्नेह स्नेहाच्या रूपाने टिकत नाही.


६६१ भीतवत्संविधातव्यं यावद्भयमनागतम् ।

आगतं तु भयं दृष्ट्वा प्रहर्तव्यमभीतवत् ॥ १.१४०.८२

संकट जोवर प्राप्त झालेले नाही, तोवर भित्र्या माणसाप्रमाणे त्याच्या निवारण्याच्या तजविजीत असावे. परंतु संकट येऊन ठेपलें असें दिसताच, शूराप्रमाणे त्यास तोंड द्यावें.


६६२ भीमसेनस्तु धर्मेण युध्यमानो न जेष्यति ।

अन्यायेन तु युध्यन्वै हन्यादेव सुयोधनम् ॥ ९.५८.४

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) भीमसेन जर धर्माने लढेल तर त्यास जय मिळणार नाही; परंतु जर अन्यायाने युद्ध करील तर खात्रीने सुयोधनास ठार करील.


६६३ भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥ ६.२७.१३

जे केवळ आपल्यासाठी अन्न शिजवितात, ते पातकी लोक (त्या अन्नाच्या रूपानें) पापच भक्षण करितात.


६६४ भूतं हित्वा च भाव्यर्थे योऽवलम्बेत्स मन्दधीः ॥ १.२३३.१५

प्राप्त झालेल्या फळाचा त्याग करून पुढे मिळणाऱ्या फळाची जो आशा करीत बसतो तो मूर्ख होय.


६६५ भूतिः श्रीर्ह्रिर्धृतिः कीर्तिर्दक्षे वसति नालसे ॥ १२.२७.३२

वैभव, संपत्ति, विनयशीलपणा, धैर्य व कीर्ति ही सर्व तत्परतेने उद्योग करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी वास करितात; आळशाच्या ठिकाणी रहात नाहीत.


६६६ भूमिरेतौ निगिरति सर्पो बिलशयानिव ।

राजानं चाप्ययोद्धारं ब्राह्मणं चाप्रवासिनम् ॥ १२.२३.१५

युद्ध न करणारा राजा आणि प्रवास न करणारा ब्राह्मण या दोघांना, बिळांत राहणाऱ्या प्राण्यांना सर्प खाऊन टाकतो त्याप्रमाणे, भूमि गिळून टाकते.


६६७ भूयांसं लभते क्लेशं या गौर्भवति दुर्दुहा ।

अथ या सुदुहा राजन्नैव तां वितुदन्त्यपि ॥ १२.६७.९

जी गाय धार काढू देण्यास फार त्रास देते, तिला अतिशय क्लेश भोगावे लागतात; पण जी सुखाने दूध देते तिला मुळीच कोणी त्रास देत नाही.


६६८ भेदे गणा विनश्युर्हि भिन्नास्तु सुजयाः परैः ।

तस्मात्सङ्घातयोगेन प्रयतेरन्गणाः सदा ॥ १२.१०७.१४

समुदायांत भेद उत्पन्न झाला की त्यांचा सर्वथा नाश ठरलेलाच. कारण त्यांच्यांत फूट पडली म्हणजे शत्रु त्यांचा सहज पराभव करूं शकतात. यास्तव, समुदायांनी नेहमी संघशक्तीने कार्य करावें.


६६९ भैषज्यमेतद्दुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ।

चिन्त्यमानं हि न व्येति भूयश्चापि प्रवर्धते ॥ १२.३३०.१२

दुःखावर औषध हेच की त्याचे एकसारखे चिंतन करीत बसू नये. कारण, चिंतन केल्याने दुःख नाहींसें तर होत नाहीच, पण उलट अधिक वाढतें मात्र.


६७० मग्नस्य व्यसने कृच्छ्रे धृतिः श्रेयस्करी नृप ॥ १२.२२७.३

धैर्येण युक्तं सततं शरीरं न विशीर्यते ।

विशोकता सुखं धत्ते धत्ते चारोग्यमुत्तमम् ॥ १२.२२७.४

आरोग्याच्च शरीरस्य स पुनर्विन्दते श्रियम् ॥ १२.२२७.५

(भीष्म युधिष्ठिराला सांगतात) महत्संकटात सापडलेल्या मनुष्याने धीर धरणे श्रेयस्कर आहे. नेहमी धैर्य असले म्हणजे शरीराची हानि होत नाही. शोकाचा त्याग कल्याने सुख होते व त्यापासून उत्तम आरोग्य प्राप्त होते. आणि शरीर निरोगी राहिलें म्हणजे मनुष्य गेलेलें वैभव पुनः प्राप्त करून घेतो.


६७१ मद्यमांसपरस्वानि तथा दारा धनानि च ।

आहरेद्रागवशगस्तथा शास्त्रं प्रदर्शयेत् ॥ १२.८८.२२

विषयाधीन झालेला मनुष्य मद्य, मांस, परस्त्री आणि परद्रव्य यांचा अपहार करील, आणि (आपल्या दुष्कृत्याचे समर्थन करण्याकरितां) तसा शास्त्रार्थहि काढून दाखवील.


६७२ मधुदोहं दुहेद्राष्ट्रं भ्रमरा इव पादपम् ।

वत्सापेक्षी दुहेच्चेव स्तनांश्च न विकुट्टयेत् ॥ १२.८८.४

भुंगा जसा झाडाला धक्का न लावतां फुलांतील मध तेवढा हळूच काढून घेतो त्याप्रमाणे राजाने प्रजेचें मन न दुखवितां तिजपासून कराच्या रूपाने द्रव्य ग्रहण करावे. अथवा, ज्याप्रमाणे गाईची धार काढणारा वासराला दूध राहील अशा बेतानें धार काढतो, आंचळ अगदी पिळून काढीत नाही. त्याप्रमाणेच राजाने प्रजेचे पोषण होईल अशा बेतानेच कर घ्यावा.


६७३ मधु यः केवलं दृष्ट्वा प्रपातं नानुपश्यति ।

स भ्रष्टो मधुलोभेन शोचत्येवं यथा भवान् ॥ ११.१.३७

(भारती युद्धानंतर संजय घृतराष्ट्राला म्हणतो) ज्याला तुटलेल्या कड्यास लटकणारे मधाचे पोळे मात्र दिसते, पण तो तुटलेला कडा दिसत नाही, तो मधाच्या लोभाने पुढे जाऊन खाली घसरतो आणि हल्ली तूं शोक करीत आहेस असाच पश्चात्ताप करीत बसतो.


६७४ मन एव मनुष्यस्य पूर्वरूपाणि शंसति ॥ १२.२२८.२

मनुष्याचा अभ्युदय किंवा हानि ही पुढे व्हावयाची असली म्हणजे त्यांची पूर्वचिन्हें त्याचे मनच सांगत असते.


६७५ मनसश्चेन्द्रियाणां चाप्यैकाग्र्यं परमं तपः ।

तज्ज्यायः सर्वधर्मेभ्यः स धर्मः पर उच्यते ॥ १२.२५०.४

मन आणि इंद्रिये यांची एकाग्रता साध्य करणे हे फार मोठे तप आहे. ही एकाग्रता सर्व प्रकारच्या कर्माचरणापेक्षा श्रेष्ठ आहे. ती साध्य करणे हा श्रेष्ठ धर्म होय.


६७६ मनसो दुःखमूलं तु स्नेह इत्युपलभ्यते ॥ ३.२.२७

मनाला दुःख हाण्याचे मूळ कारण आसक्ति हेच असल्याचे आढळून येते.


६७७ मनुष्या ह्याढ्यतां प्राप्य राज्यमिच्छन्त्यनन्तरम् ।

राज्याद्देवत्वमिच्छन्ति देवत्वादिन्द्रतामपि ॥ १२.१८०.२४

खरोखर मनुष्यांना ऐश्वर्य प्राप्त झाले, म्हणजे त्यानंतर राज्य मिळविण्याची इच्छा होते. राज्य मिळाले की देवपद आणि देवत्वप्राप्तीनंतर इंद्रपदसुद्धा हवेसे वाटू लागते.


६७८ मन्यते कर्षयित्वा तु क्षमा साध्वीति शम्बरः ।

असन्तप्तं तु यद्दारु प्रत्येति प्रकृतिं पुनः ॥ १२.१०२.३१

शत्रूला जर्जर करून सोडल्यावर मग क्षमा केलेली चांगली, असें शंबराचे मत आहे. कारण तापविल्यावांचून वांकविलेले लाकूड पुनरपि पूर्वस्थितीस येते.


६७९ महत्त्वाद्भारवत्वाच्च महाभारतमुच्यते ॥ १८.५.४५

या भारत ग्रंथाचे महत्त्व (विस्तार) आणि भार (वजन) फार असल्यामुळे यास महाभारत अशी संज्ञा प्राप्त झाली आहे.


६८० महानप्येकजो वृक्षो बलवान्सुप्रतिष्ठितः ।

प्रसह्य एव वातेन सस्कन्धो मर्दितुं क्षणात् ॥ ५.३६.६२

अथ ये सहिता वृक्षाः सङ्घशः सुप्रतिष्ठिताः ।

ते हि शीघ्रतमान्वातान्सहन्तेऽन्योन्यसंश्रयात् ॥ ५.३६.६३

एकटा एक वृक्ष मोठा, बळकट असला, व भुईत खोल गेलेला असला तरी (सोसाट्याच्या) वाऱ्याने एका क्षणांत खोडासहवर्तमान त्याचा चुराडा होणे शक्य आहे. परंतु, जे एकत्र वाढलेले वृक्ष एका जमावाने बळकट पायावर उभे असतात, ते एकमेकांच्या आधारामुळे अति प्रचंड वायूंनाहि दाद देत नाहीत.


६८१ महान्भवत्यनिर्विष्णः सुखं चानन्त्यमश्नुते ॥ ५.३९.५९

सतत उद्योग करणाराच पुरुष योग्यतेला चढत असून अक्षय्य सुखहि त्यालाच प्राप्त होते.


६८२ माता पिता बान्धवानां वरिष्ठौ

     भार्या जरा बीजमात्रं तु पुत्रः ।

भ्राता शत्रुः क्लिन्नपाणिर्वयस्य

     आत्मा ह्येकः सुखदुःखस्य भोक्ता ॥ १२.१३९.३०

आईबाप हे सर्व आप्तवर्गात वरिष्ठ होत. भार्या ही पुरुषाला वार्धक्य आणण्यास कारणीभूत होत असते. पुत्र हा केवळ आपलें बीज होय. भाऊ हा (वाटणी घेत असल्यामुळे) शत्रुच होय, जोवर हात भिजत आहे तोवरच मित्र. सारांश, सुख किंवा दुःख भोगणारा आत्मा हा आपला एकटा एक आहे.


६८३ मातापितृसहस्राणि पुत्रदारशतानि च ।

संसारेष्नुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे ॥ १८.५.६०

निरनिराळ्या हजारों जन्मांत अनुभवलेली हजारों आईबापें व शेंकडों स्त्रिया आणि पुत्र ही सर्व मरून जातात व यापुढे होणारी इतरहि मरणारच.


६८४ मातृलाभे सनाथत्वमनाथत्वं विपर्यये ॥ १२.२६६.२६

आई असली तरच मनुष्य सनाथ असतो, ती नसली की अनाथ होतो.


६८५ मानं हित्वा प्रियो भवति ॥ ३.३१३.७८

अभिमान सोडल्याने मनुष्य (लोकांना) प्रिय होतो.


६८६ मायया निर्जिता देवैरसुरा इति नः श्रुतम् ॥ ९.५८.५

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात.) कपटाच्या योगानेच देवांनी असुरांना जिंकलें, असे आम्ही ऐकलें आहे.


६८७ मायावी मायया वध्यः सत्यमेतद्युधिष्ठिर ॥ ९.३१.७

(श्रीकृष्ण म्हणतात.) हे युधिष्ठिरा, कपटी मनुष्याचा कपटानेंच वध केला पाहिजे हे सत्य होय.


६८८ मास्तं गमस्त्वं कृपणो विश्रूयस्व स्वकर्मणा ।

मा मध्ये मा जघन्ये त्वं माधोभूस्तिष्ठ गर्जितः ॥ ५.१३३.१३

(विदुला संजयास म्हणते) तूं दीन होऊन स्वतःचा नाश करून घेऊ नको. स्वपराक्रमाने प्रसिद्धीस ये. तूं मध्यम स्थितीत अथवा हीन स्थितीत राहूं नको. हीन न होतां (कर्तृत्वानें) गाजत रहा.


६८९ मित्रं च शत्रुतामेति कस्मिंश्चित्कालपर्यये ।

शत्रुश्च मित्रतामेति स्वार्थो हि बलवत्तरः ॥ १२.१३८.१४२

एकादे वेळेस मित्र वैर करू लागतो आणि शत्रु मित्र बनतो. कारण, स्वार्थ हा फार प्रबळ आहे.


६९० मुहूर्तं ज्वलितं श्रेयो न च धूमायितं चिरम् ॥ ५.१३३.१५

थोडा वेळ का होईना पण चमकून जाणे चांगले; परंतु चिरकाल धुमसत राहणे बरे नव्हे.


६९१ मूखों हि जल्पतां पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः ।

अशुभं वाक्यमादत्ते पुरीषमिव सूकरः ॥ १७४.९०

बोलणाऱ्या लोकांचे बरे वाईट बोलणे ऐकून, त्यांतून वाईट बोलणे तेवढे, विष्ठा ग्रहण करणाऱ्या डुकराप्रमाणे, मूर्ख मनुष्य घेत असतो.


६९२ मूलमेवादितश्छिन्द्यात्परपक्षस्य नित्यशः ।

ततः सहायांस्तत्पक्षान्सर्वांश्च तदनन्तरम् ॥ १.१४०.१६

नेहमी आपल्या शत्रुपक्षाचें मूळच पहिल्याने तोडून टाकावे. नंतर त्याचे साथीदार व त्यानंतर त्याच्या पक्षांतील इतर सर्व लोक यांचा उच्छेद करावा.


६९३ मृतं वा यदि वा नष्टं योऽतीतमनुशोचति ।

दुःखेन लभते दुःखं द्वावनर्थौ प्रपद्यते ॥ ११.२६.४

मेल्यामुळे किंवा हरवल्यामुळे जे नाहींसें झालें, त्याविषयी जो शोक करीत बसतो, त्याला त्या दुःख करण्यापासून पुनः दुःख प्राप्त होते, व अशा रीतीने तो दोन अनर्थात सांपडतो.


६९४ मृतं शरीरमुत्सृज्य काष्ठलोष्टसमं जनाः ।

मुहूर्तमिव रोदित्वा ततो यान्ति पराङ्मुखाः ॥ १३.११.१४

मेलेले शरीर लाकडाप्रमाणे अथवा मातीच्या ढेकळाप्रमाणे फेंकून देऊन व क्षणभर रडून नंतर लोक पाठमोरे होऊन निघून जातात.


६९५ मृतकल्पा हि रोगिणः ॥ ५.३६.६७

रोगी मनुष्ये मेल्यांतच जमा.


६९६ मृतो दरिद्रः पुरुषः ॥ ३.३१३.८४

दरिद्री पुरुष जिवंतपणींच मेलेला असतो.


६९७ मृदुं वै मन्यते पापो भाषमाणमशक्तिकम् ।

जितमर्थं विजानीयादबुधो मार्दवे सति ॥ ५.४.६

कोणी सौम्यपणे बोलू लागला तर दुष्ट लोक त्याला दुर्बळ समजतात. सौम्यपणा असला म्हणजे मूर्खाला वाटावयाचें की आपला पक्ष सिद्ध झाला.


६९८ मृदुना दारुणं हन्ति मृदुना हन्त्यदारुणम् ।

नासाध्यं मृदुना किञ्चित्तस्मात्तीव्रतरं मृदु ॥ ३.२८.३१

मृदुपणानें भयंकर शत्रूचा नाश करितां येतो आणि मृदुपणाने भयंकर नसलेल्या शत्रूचाहि नाश करितां येतो. मृदुपणाने असाध्य असे काहीच नाही. यास्तव मृदपणा हा वस्तुतः तीक्ष्णापेक्षाहि तीक्ष्ण आहे.


६९९ मृदुरित्यवजानन्ति तीक्ष्ण इत्युद्विजन्ति च ।

तीक्ष्णकाले भवेत्तीक्ष्णो मृदुकाले मृदुर्भवेत् ॥ १२.१४०.६५

राजा मऊपणाने वागणारा असला तर लोक त्याची अवज्ञा करितात. आणि कठोरपणाने वागणारा असला तर लोक त्याला भितात. यासाठी कठोरपणे वागण्याची वेळ येईल तेव्हां कठोर व्हावें, आणि मऊपणाने वागण्याची वेळ असेल तेव्हां मृदु व्हावे.


७०० मौनान्न स मुनिर्भवति नारण्यवसनान्मुनिः ।

स्वलक्षणं तु यो वेद स मुनिः श्रेष्ठ उच्यते ॥ ५.४३.६०

मौनव्रत पाळले म्हणजे कोणी मुनि होत नाही. किंवा अरण्यांत राहिल्यानेहि मुनि होत नाही. ज्याने आत्मस्वरूप जाणले तोच मुनिश्रेष्ठ होय.


७०१ म्रियते याचमानो वै न जातु म्रियते ददत् ।

ददत्सञ्जीवयत्येनमात्मानं च युधिष्ठिर ॥ १३.६०.५

(भीष्म म्हणतात) हे युधिष्ठिरा, याचना करणारा मरण पावतो. देणारा कधीच मरत नाही. देणारा याचकाला व स्वतःलाहि जीवदान देतो.


७०२ य एव देवा हन्तारस्ताँल्लोकोऽर्चयते भृशम् ॥ १२.१५.१६

शत्रंना ठार मारणारे जे देव आहेत, त्यांनाच लोक अतिशय भजतात.


७०३ यः कश्चिदप्यसंबद्धो मित्रभावेन वर्तते ।

स एव बन्धुस्तन्मित्रं सा गतिस्तत्परायणम् ॥ ५.३६.३८

कसल्याहि प्रकारचा संबंध नसतांहि जो कोणी आपल्याशी मित्रभावाने वागतो, तोच आपला बंधु, तोच मित्र, तोच आसरा, आणि तोच मोठा आधार.


७०४ यः कृशार्थः कृशगवः कृशभृत्यः कृशातिथिः ।

स वै राजन्कृशो नाम न शरीरकृशः कृशः ॥ १२.८.२४

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, ज्याच्यापाशी द्रव्य नाही, गुरेढोरे नाहीत, नोकरचाकर नाहीत, अतिथींचा सत्कार करण्याचे सामर्थ्य नाही तोच खरोखर कृश म्हटला पाहिजे, जो केवळ शरीराने कृश तो खरोखर कृश नव्हे.


७०५ यच्च कामसुखं लोके यच्च दिव्यं महत्सुखम् ।

तृष्णाक्षयसुखस्यैते नार्हतः षोडशीं कलाम् ॥ १२.१७४.४६

इहलोकी विषयोपभोगापासून प्राप्त होणारे सुख आणि स्वर्गातील उच्च सुख ही दोनहि सुखें वासनाक्षयामुळे प्राप्त होणाऱ्या सुखाच्या पासंगास देखील लागणार नाहीत.


७०६ यच्छक्यं ग्रसितुं ग्रस्यं ग्रस्तं परिणमेच्च यत् ।

हितं च परिणामे यत्तदाद्यं भूतिमिच्छता ॥ ५.३४.१४

जें खाता येण्यासारखे असेल, खाल्ल्यावर जे पचेल, व परिणामी जे हितकर होईल तेंच अन्न कल्याणेच्छु पुरुषाने खाल्ले पाहिजे.


७०७ यतो धर्मस्ततो जयः ॥ १३.१६७.४१

जिकडे धर्म तिकडे जय.


७०८ यत्करोति शुभं कर्म तथा कर्म सुदारुणम् ।

तत्कर्तेव समश्नाति बान्धवानां किमत्र ह ॥ १२.१५३.४१

कोणीहि जे चांगले कर्म करतो अथवा वाईट कर्म करतो, त्याचे फळ त्याचे त्यालाच भोगावे लागते. यांत त्याच्या नातलगांचा काय संबंध ?


७०९ यत्तु कार्यं भवेत्कार्यं कर्मणा तत्समाचर ।

हीनचेष्टस्य यः शोकः स हि शत्रुर्धनञ्जय ॥ ७.८०.८

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) उद्दिष्ट साधण्यासाठी जे करावयाचे ते करण्याच्या उद्योगाला लाग, अर्जुना, जो प्रतिकाराचा काही उद्योग करीत नाही, त्याचा शोक हा शत्रुच होय.


७१० यत्नो हि सततं कार्यस्ततो दैवेन सिध्यति ॥ १२.१५३.५०

सतत प्रयत्न करीत असावे; म्हणजे दैववशात् यश मिळेल.


७११ यत्र दानपतिं शूरं क्षुधिताः पृथिवीचराः ।

प्राप्य तुष्टाः प्रतिष्ठन्ते धर्मः कोऽभ्यधिकस्ततः ॥ ५.१३२.२८

पृथ्वीवर हिंडणारे क्षुधित लोक ज्या शूर दानपतीपाशी आले असता संतुष्ट होऊन पुढे जातात, त्याच्या धर्मापेक्षां कोणता धर्म अधिक आहे ?


७१२ यत्र धर्मो ह्यधर्मेण सत्यं यत्रानृतेन च ।

हन्यते प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासदः ॥ ५.९५.४९

ज्या सभेत सभासदांच्या डोळ्यांदेखत धर्माचा अधर्माने व सत्याचा असत्याने खून केला जातो, त्या सभेतील सभासदांना धिक्कार असो !


७१३ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ ६.४२.७८

(संजय धृतराष्ट्राला म्हणतो) जिकडे योगेश्वर कृष्ण, जिकडे धनुर्धारी अर्जुन, तिकडेच लक्ष्मी, विजय, अखंड वैभव आणि नीति ही राहणार असे माझे मत आहे.


७१४ यत्र सूक्तं दुरुक्तं च समं स्यान्मधुसूदन ।

न तत्र प्रलपेत्माज्ञो बधिरेष्विव गायनः ॥ ५.९२.१३

(विदुर श्रीकृष्णांना म्हणतो) ज्याप्रमाणे जेथे चांगले बोलण्याचा किंवा वाईट बोलण्याचा उपयोग सारखाच होतो तेथें, बहिऱ्या लोकामध्ये बसून गायन करणे गवयास योग्य नाही त्याप्रमाणे, शहाण्या पुरुषाने काहीएक न बोलणे चांगले.


७१५ यत्र स्त्री यत्र कितवो बालो यत्रानुशासिता ।

मज्जन्ति तेऽवशा राजन्नद्यामश्मप्लवा इव ॥ ५.३८.४३

(विदुर धृतराष्ट्र राजाला म्हणतो) ज्यांच्यावर स्त्री किंवा लुच्चा मनुष्य किंवा अल्पवयी मुलगा अधिकार चालवीत असेल, ते लोक पराधीन होत्साते, नदीत बुडणाऱ्या पाषाणमय होड्यांप्रमाणे नाश पावतात.


७१६ यत्सुखं सेवमानोऽपि धर्मार्थाभ्यां न हीयते ।

कामं तदुपसेवेत न मूढव्रतमाचरेत् ॥ ५.३९.६१

ज्या सुखाचे सेवन केले तरी धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थांना काही बाधा येत नाही, तेंच यथेष्ट सेवन करावें. मूर्खासारखें (अविचाराचे) वर्तन करूं नये.


७१७ यथा कर्म तथा लाभ इति शास्त्रनिदर्शनम् ॥ १२.२७९.२०

जसे कर्म तसें फळ असा शास्त्राचा सिद्धांत आहे.


७१८ यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ।

समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागमः ॥ १२.२८.३६

ज्याप्रमाणे महासागरांत लाकडाचे दोन ओंडके वहात वहात एका ठिकाणी येतात, व (थोड्या वेळानें) फिरून एकमेकांपासून दूर जातात, त्यासारखा सर्व प्राण्यांचा एकमेकांशी असणारा सहवास आहे.


७१९ यथा छायातपो नित्यं सुसंबद्धौ निरन्तरम् ।

तथा कर्म च कर्ता च संबद्धावात्मकर्मभिः ॥ १३.१.७५

प्रकाश व छाया यांचा जसा निरंतर नित्यसंबंध असतो, तसाच कर्म व कर्ता यांचा त्या त्या स्थितीत नित्य संबंध असतो.


७२० यथा जीर्णमजीर्णं वा वस्त्रं त्यक्त्वा तु पूरुषः ।

अन्यद्रोचयते वस्त्रमेवं देहाः शरीरिणाम् ॥ ११.३.९

जुने झालेले किंवा कधीकधी नवेंही एक वस्त्र टाकून मनुष्य दुसरे घेतो, त्याप्रमाणेच प्राण्यांच्या देहांचीही गोष्ट आहे.


७२१ यथा दानं तथा भोग इति धर्मेषु निश्चयः ॥ १३.६२.८

जसे दिले असेल तसेंच भोगावयास मिळते, असा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे.


७२२ यथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम् ।

तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ॥ १२.३२२.१६

हजारों गाईतून वासरूं जसे नेमके आपल्या आईला हुडकून काढते, तसे पूर्वजन्मी केलेले कर्म कर्त्याच्या पाठोपाठ येते.


७२३ यथा नदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम् ।

एवमाश्रमिणः सर्वे गृहस्थे यान्ति संस्थितिम् ॥ १२.२९५.३९

ज्याप्रमाणे सर्व नद्या आणि नद अखेर समुद्राला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे इतर सर्व आश्रमांतील लोकांना गृहस्थाश्रमी पुरुषाचा आधार आहे.


७२४ यथा बर्हाणि चित्राणि बिभर्ति भुजगाशनः ।

तथा बहुविधं राजा रूपं कुर्वीत धर्मवित् ॥ १२.१२०.४

मोर जशी चित्रविचित्र पिसें धारण करतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य ओळखणाऱ्या राजाने (प्रसंगानुसार) निरनिराळी रूपे धारण करावी.


७२५ यथा बीजं विना क्षेत्रमुप्तं भवति निष्फलम् ।

तथा पुरुषकारेण विना दैवं न सिध्यति ॥ १३.६.७

शेत तयार न करिता त्यांत बी टाकिल्याने जसे ते वायां जाते, त्याप्रमाणे उद्योग केल्यावांचून नुसत्या दैवाने सिद्धि मिळत नाही.


७२६ यथामति यथापाठं तथा विद्या फलिष्यति ॥ १२.३२७.४८

जशी बुद्धि असेल आणि जसा अभ्यास असेल त्या मानाने विद्येचें फल मिळणार.


७२७ यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पदः ।

तद्वदर्थान्मनुष्येभ्य आदद्यादविहिंसया ॥ ५.३४.१७

भुंगा जसा फुलांना अपाय न करता त्यांतील मध तेवढा काढून घेतो, त्याप्रमाणे राजाने लोकांचे मन न दुखविता त्यांजपासून द्रव्य घ्यावे.


७२८ यथा मातरमाश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तवः ।

एवं गार्हस्थ्यमाश्रित्य वर्तन्त इतराश्रमाः ॥ १२.२६९.६

जसे सर्व प्राणी मातेचा आश्रय करून जिवंत राहतात, तसे गहस्थाश्रमाच्या आधाराने इतर आश्रम राहतात.


७२९ यथा यथा हि पुरुषो नित्यं शास्त्रमवेक्षते ।

तथा तथा विजानाति विज्ञानमथ रोचते ॥ १२.१३०.१०

मनुष्य जसजसा नेहमी शास्त्राचे अवलोकन करीत जाईल, तसतसे त्याला समजू लागेल, आणि नंतर त्याला ज्ञानाची आवड उत्पन्न होईल.


७३० यथा यथैव जीवेद्धि तत्कर्तव्यमहेलया ।

जीवितं मरणाच्छ्रेयो जीवन्धर्ममवाप्नुयात् ॥ १२.१४१.६५

ज्या ज्या प्रकारे जीविताचे संरक्षण होईल तें बेलाशक करावे. मरण्यापेक्षा जगणे हेच श्रेयस्कर आहे. कारण आधीं जगेल तर पुढे धर्म आचरण करील.


७३१ यथा राजन्हस्तिपदे पदानि

     संलीयन्ते सर्वसत्त्वोद्भवानि ।

एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान्

     सर्वावस्थं सम्पलीनान्निबोध ॥ १२.६३.२५

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलांत इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा सर्व प्रकारे अंतर्भाव होतो हे तूं पक्के समज.


७३२ यथाऽवध्ये वध्यमाने भवेद्दोषो जनार्दन ।

स वध्यस्यावधे दृष्ट इति धर्मविदो विदुः ॥ ५.८२.१८

(द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते) वधास पात्र नसलेल्याचा वध होऊ लागला असता जो दोष लागतो, तोच वधास पात्र असलेल्याचा वध होत नसल्यास दोष लागतो, असे धर्मवेत्त्यांचे मत आहे.


७३३ यथा वायुस्तृणाग्राणि संवर्तयति सर्वशः ।

तथा कालवशं यान्ति भूतानि भरतर्षभ ॥ ११.२.९

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जसा वारा गवताचे सर्व शेंडे हलवून सोडतो त्याप्रमाणे सर्व प्राणी काळाच्या तडाक्यांत सांपडतात.


७३४ यथाशक्ति मनुष्याणां शममालक्षयामहे ।

अन्येषामपि सत्त्वानामपि कीटपिपीलिकैः ॥ ४.५०.१४

(अश्वत्थामा कर्णाला म्हणतो) आम्हाला वाटते की, मनुष्यांच्या सहनशीलतेला झाली तरी काही मर्यादा असतेच. फार काय पण किडामुंगी वगैरे इतर प्राणीहि काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच दुःखें सहन करितात.


७३५ यथा शरीरं न ग्लायेन्नेयान्मृत्युवशं यथा ।

तथा कर्मसु वर्तेत समर्थो धर्ममाचरेत् ॥ १२.२६५.१४

ज्याप्रकारे शरीराला थकवा येणार नाही आणि तें मृत्युवश होणार नाही, अशा प्रकारचे कर्माचे आचरण करावें. समर्थ राहून धर्माचरण करावें.


७३६ यथा समुद्रो भगवान् यथा हि हिमवान् गिरिः ।

ख्यातावुभौ रत्ननिधी तथा भारतमुच्यते ॥ १८.५.६५

जसा भगवान् समुद्र आणि जसा पर्वतराज हिमालय रत्ननिधि म्हणून प्रसिद्ध आहेत तसेंच महाभारत हेहि आहे.


७३७ यथा हि पुरुषः शाला पुनः सम्प्रविशेन्नवाम् ।

एवं जीवः शरीराणि तानि तानि प्रपद्यते ॥ १२.१५.५७

मनुष्यानें (एक घर सोडून) पुनः दुसऱ्या नव्या घरांत प्रवेश करावा, तसा जीव हा निरनिराळ्या देहांत प्रविष्ट होत असतो.


७३८ यथा ह्यकस्माद्भवति भूमौ पांसुर्विलोलितः ।

तथैवेह भवेद्धर्मः सूक्ष्मः सूक्ष्मतरस्तथा ॥ १२.१३६.११

भुईवरील धुळीचा कण एकाएकी हलविला असतां जसा (सूक्ष्म असल्यामुळे दिसेनासा) होतो, तसाच धर्म हा सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आहे.


७३९ यथा ह्यामिषमाकाशे पक्षिभिः श्वापदैर्भुवि ।

भक्ष्यते सलिले मत्स्यैस्तथा सर्वत्र वित्तवान् ॥ ३.२.४०

ज्याप्रमाणे आकाशामध्ये पक्षी, भूतलावर श्वापदें, आणि पाण्यामध्ये मासे आमिषावर झडप घालीत असतात, त्याप्रमाणे द्रव्यवान् पुरुषाला लुटण्याकरितां सर्व ठिकाणी लोक टपून बसलेले असतात.


७४० यदतप्तं प्रणमते नैतत्सन्तापमर्हति ॥


यत्स्वयं नमते दारु न तत्संनामयन्त्यपि ॥ १२.६७.१०

तापविल्याशिवायच जे लवते ते तापविण्याची गरज नाही. जे लाकूड आपोआपच वाकतें तें तापविण्याच्या भरीस कोणी पडत नाही.


७४१ यदन्येषां हितं न स्यादात्मनः कर्म पौरुषम् ।

अपत्रपेत वा येन न तत्कुर्यात्कथञ्चन ॥ १२.१२४.६७

आपला जो प्रयत्न किंवा जी कृति दुसऱ्याच्या हिताची होणार नाही, अथवा जें केल्याने आपली आपल्यालाच लाज वाटेल ते केव्हांहि करूं नये.


७४२ यदन्यैर्विहितं नेच्छेदात्मनः कर्म पूरुषः ।

न तत्परेषु कुर्वीत जानन्नप्रियमात्मनः ॥ १२.२५९.२०

जे दुस-यांनी आपल्यासंबंधाने करूं नये असे मनुष्याला वाटते, ते आपल्याला अप्रिय आहे, हे लक्षात वागवून, त्यानेहि दुसऱ्यासंबंधाने तसे करूं नये.


७४३ यदर्थो हि नरो राजंस्तदर्थोऽस्यातिथिः स्मृतः ॥ १५.२६.३७

(धृतराष्ट्र युधिष्ठिराला म्हणतो) राजा, अतिथि कितीहि योग्यतेचा असला तरी, तो ज्याचा अतिथि असेल त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याने झाले पाहिजे असा नियमच आहे.


७४४ यदा तु कश्चिज्ज्ञातीनां बाह्यः प्रार्थयते कुलम् ।

न मर्षयन्ति तत्सन्तो बाह्येनाभिप्रधर्षणम् ॥ ३.२४३.३

जेव्हा कोणी परका मनुष्य भाऊबंदांच्या कुळावर उठतो, तेव्हां परक्याकडून आपल्या कुळाचा होत असलेला तो अपमान सज्जन सहन करीत नाहीत.


७४५ यदा मानं लभते माननार्ह-

स्तदा स वै जीवति जीवलोके ।

यदावमानं लभते महान्तं

तदा जीवन्मृत इत्युच्यते सः ॥ ८.६९.८१

सन्मान्य पुरुष जोपर्यंत मान मिळवितो, तोपर्यंतच या जगांत तो जिवंत असतो. एकदा त्याचा अतिशय अपमान झाला की, तो जिवंत असूनहि मेल्याप्रमाणेच झाला !


७४६ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ६.२८.७

(भगवान् श्रीकृष्ण सांगतात.) अर्जुना, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानि येते व अधर्माचा उत्कर्ष होतो त्या त्या वेळी मी (भगवान् श्रीकृष्ण) अवतार घेत असतो.


७४७ यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।

इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६.२६.५८

कासव जसे आपले सर्व अवयव आंत ओढून घेते त्याप्रमाणे जेव्हां मनुष्य आपली सर्व इंद्रिये त्यांच्या त्यांच्या विषयांपासून आवरून धरतो, तेव्हांच त्याची बुद्धि स्थिर झाली असें म्हणतात.


७४८ यदिदं ब्रह्मणो रूपं ब्रह्मचर्यमिति स्मृतम् ।

परं तत्सर्वधर्मेभ्यस्तेन यान्ति परां गतिम् ॥ १२.२१४.७

(परब्रह्माच्या प्राप्तीचे साधन असल्यामुळे) ब्रह्मचर्य हे परब्रह्माचें केवळ स्वरूपच आहे असे सांगितले आहे. ते सर्व प्रकारच्या धर्मनियमांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या योगानेच अत्यंत श्रेष्ठ गति प्राप्त होते. (मोक्ष मिळतो.)


७४९ यदि नात्मनि पुत्रेषु न चेत्पौत्रेषु नप्तृषु ।

न हि पापं कृतं कर्म सद्यः फलति गौरिव ॥ १२.९.२१

आपल्या पापकर्मांचे प्रायश्चित्त आपल्याला भोगावे लागले नाही तर आपल्या मुलांना, त्यांना नाही तर नातवांना (तरी भोगावे लागेल) कारण, गाईला खाणे घातले असता ती लगेच जास्त दूध देते, त्याप्रमाणे पापकर्माचे फळ ताबडतोब मिळते असे नाही. ('गो' म्हणजे भूमि असा अर्थ घेऊन या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीचा पुढील प्रमाणे दुसराहि अर्थ टीकाकारांनी केलेला आहे।- भूमीत धान्य पेरिले की ते लागलेच जसें पिकत नाही, तसेंच केलेल्या पापकर्माचे फळ तत्काळ मिळू शकत नाही.)


७५० यदि नैवंविधं जातु कुर्यां जिह्ममहं रणे ।

कुतो वा विजयो भूयः कुतो राज्यं कुतो धनम् ॥ ९.६१.६४

(श्रीकृष्ण पांडवांस म्हणतात) युद्धांत (भीष्मद्रोणादिकांना मारण्याच्या कामी) अशा प्रकारचे कपट जर मी केले नाही, तर तुम्हाला जय कसा मिळेल ? फिरून राज्य कसे मिळणार ? धन कोठून मिळणार ?


७५१ यदिष्टं तत्सुखं प्राहुर्द्देष्यं दुःखमिहेष्यते ॥ १२.२९५.२७

इहलोकी जे इष्ट वाटतें तें सुख, आणि जें द्वेष्य वाटते ते दुःख असें मानिले जाते.


७५२ यदि संन्यासतः सिद्धिं राजा कश्चिदवाप्नुयात् ।

पर्वताश्च द्रुमाश्चैव क्षिप्रं सिद्धिमवाप्नुयुः ॥ १२.१०.२४

संन्यासाने जर एकाद्या राजाला सिद्धि प्राप्त होती तर (निष्क्रिय अशा) पर्वतांना व वृक्षांनासुद्धा सिद्धि तत्काळ मिळाली असती !


७५३ यदि स्यात्पुरुषः कर्ता शक्रात्मश्रेयसे ध्रुवम् ।

आरम्भास्तस्य सिध्येयुर्न तु जातु पराभवेत् ॥ १२.२२२.१८

(स्थानभ्रष्ट व पाशबद्ध झालेला प्रऱ्हाद इंद्राला म्हणतो) इंद्रा, आत्मकल्याण साधन घेणे ही गोष्ट जर निश्चयेंकरून पुरुषाच्याच हातची असती तर त्याचे सर्व उद्योग सिद्धीस गेले असते; त्याला केव्हांहि अपयश आले नसते.


७५४ यदैव शत्रुर्जानीयात्सपत्नं त्यक्तजीवितम् ।

तदैवास्मादुद्विजते सर्पाद्वेश्मगतादिव ॥ ५.१३५.३६

आपला प्रतिपक्षी जिवावर उदार झाला आहे असे जेव्हां शत्रूला समजून येते, तेव्हांच त्याला घरांत शिरलेल्या सर्पासारखी त्याची भीति वाटू लागते.


७५५ यद्दुरापं दुराम्नायं दुराधर्षं दुरन्वयम् ।

तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम् ॥ १४.५१.१७

जे जे म्हणून असाध्य, अज्ञेय, अत्यंत भयंकर किंवा अत्यंत दुस्तर असे असेल तें सर्व तपाने साध्य होतें, खरोखरच, तपाचे अतिक्रमण करणे अशक्य आहे.


७५६ यद्भूतहितमत्यन्तं तत्सत्यमितिधारणा ॥ ३.२०९.४

ज्याच्या योगानें जीवाचे अतिशय कल्याण होतें तेच सत्य असा सिद्धांत आहे.


७५७ यद्यत्प्रियं यस्य सुखं तदाहु-

स्तदेव दुःखं प्रवदन्त्यनिष्टम् ॥ १२.२०१.१०

ज्याला जें प्रिय वाटते त्याला तो सुख म्हणतो, तेंच अप्रिय झाले की त्यालाच दुःख म्हणतो.


७५८ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।

स यत्पमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ६.२७.२१

श्रेष्ठ पुरुष ज्या ज्या प्रकारे वागतो त्या त्या प्रकारेंच इतर लोक वागतात. त्याला जें मान्य होते, त्याचेच अनुकरण लोक करीत असतात.


७५९ यद्यदाचरते राजा तत्प्रजानां स्म रोचते ॥ १२.७५.४

राजा जें जें करतो ते प्रजेला आवडू लागते.


७६० यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ ६.३४.४१

(भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात) जी जी वस्तु मोठेपणा, ऐश्वर्य किंवा वैभव यांनी युक्त असेल, ती ती प्रत्येक माझ्या (परमेश्वराच्या) तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असे तूं पक्कें समज.


७६१ यद्यपि भ्रातरः क्रुद्धा भार्या वा कारणान्तरे ।

स्वभावतस्ते प्रीयन्ते नेतरः प्रीयते जनः ॥ १२.१३८.१५४

कारणपरत्वें भाऊ जरी रागावले किंवा बायको रागावली तरी ती स्वभावतःच प्रेम करीत असतात. तसें इतर लोक प्रेम करीत नाहीत.


७६२ यन्निमित्तं भवेच्छोकस्तापो वा दुःखमेव च ।

आयासो वा यतो मूलमेकाङ्गमपि तत्त्यजेत् ॥ १२.१७४.४३

ज्याच्यामुळे शोक, ताप, दुःख किंवा कष्ट होतात, तें कारण जरी आपल्या शरीराचा एक अवयव असले तरीहि त्याचा त्याग केला पाहिजे.


७६३ यमाजीवन्ति पुरुषं सर्वभूतानि सञ्जय ।

पक्वं द्रुममिवासाद्य तस्य जीवितमर्थवत् ॥ ५.१३३.४३

(विदुला म्हणते) संजया, पक्व वृक्षाप्रमाणे ज्याच्याजवळ गेल्याने सर्व जीवांचे प्राणरक्षण होते त्याचेंच जीवित सफल झालें.


७६४ ययोरेव समं वित्तं ययोरेव समं श्रुतम् ।

तयोर्विवाहः सख्यं च न तु पुष्टविपुष्टयोः ॥ १.१३१.१०

ज्यांची श्रीमंती सारखी, ज्यांचे ज्ञान सारखें, त्यांचाच विवाहसंबंध म्हणा किंवा स्नेहसंबंध म्हणा, होत असतो. एक श्रीमंत आणि दुसरा गरीब अशांचा अशा प्रकारचा संबंध कधीहि होत नसतो.


७६५ यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।

न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ ६.४०.२३

शास्त्रांत सांगितलेला विधि सोडून जो स्वेच्छाचाराने वागतो, त्याला सिद्धि प्राप्त होत नाही, आणि श्रेष्ट गतिहि नाही.


७६६ यस्तु निःश्रेयसं श्रुत्वा प्राक्तदेवाभिपद्यते ।

आत्मनो मतमुत्सृज्य स लोके सुखमेधते ॥ ५.१२४.२४

आपलें खरें कल्याण कशांत आहे हे ऐकल्यावर, स्वतःचे मत बाजूला सारून, जो प्रथमतः त्याचेच आचरण करतो त्याला जगांत सुख होते.


७६७ यस्तु वृद्ध्या न तृप्येत क्षये दीनतरो भवेत् ।

एतदुत्तममित्रस्य निमित्तमिति चक्षते ॥ १२.८०.१६

अभ्युदय कितीही झाला तरी तृप्ति न होणे, आणि हानि झाल्यास अत्यंत दीन, होणे हे उत्तम प्रतीच्या मित्राचे लक्षण होय असे सांगितलेले आहे.


७६८ यस्माददान्तान्दमयत्यशिष्टान् दण्डयत्यपि ।

दमनाद्दण्डनाच्चैव तस्माद्दण्डं विदुर्बुधाः ॥ १२.१५.८

ज्याअर्थी (राजदंड हा) स्वैराचरण करणाऱ्यांना वठणीस आणतो आणि असभ्यपणे वागणारांना शिक्षा करतो, त्याअर्थी दमन करणे आणि दंड करणे या दोन गुणांमुळे ज्ञाते लोक त्याला दंड असें म्हणतात.


७६९ यस्मिन्क्षमा च क्रोधश्च दानादाने भयाभये ।

निग्रहानुग्रहौ चोभौ स वै धर्मविदुच्यते ॥ १२.१४.१७

ज्याच्या ठायीं (प्रसंगानुरूप) क्षमा व क्रोध, दान व ग्रहण, भय व अभय, तसेच निग्रह व अनुग्रह ही दोनहि आढळतात तोच खरोखर धर्म जाणणारा होय.


७७० यस्मिन्नर्थे हितं यत्स्यात्तद्वर्णं रूपमादिशेत् ।

बहुरूपस्य राज्ञो हि सूक्ष्मोऽप्यर्थो न सीदति ॥ १२.१२०.६

ज्या बाबतीत जे योग्य दिसेल त्याप्रकारचे रूप (राजानें) धारण करावे. कारण (प्रसंगाप्रमाणे) निरनिराळी रूपे धारण करणाऱ्या राजाची बारीकसारीक गोष्टीत सुद्धा फसगत होत नाही.


७७१ यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्य-

स्तस्मिंस्तथा वर्तितव्यं स धर्मः ।

मायाचारो मायया बर्तितव्यः

साध्वाचारः साधुना प्रत्युपेयः ॥ ५.३७.७

ज्याच्याशी जो मनुष्य ज्या प्रकारे वागतो, त्याच्याशी त्याने त्याचप्रकारे वागावे. असें करण्यांतच धर्म आहे. कपट करणाराशी कपटाने वागावे, आणि सरळपणाने चालणाराशी सरळपणा ठेवावा.


७७२ यस्मै देवाः प्रयच्छन्ति पुरुषाय पराभवम् ।

बुद्धिं तस्यापकर्षन्ति सोऽवाचीनानि पश्यति ॥ ५.३४.८१

देवांच्या मनांतून ज्याचा नाश करावयाचा असतो, त्याची बुद्धि ते हिरावून घेतात, आणि मग त्याला प्रतिकूल असलेल्या गोष्टी घडून आलेल्या दिसतात.


७७३ यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे ।

कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते ॥ ५.३३.१८

पुढे करावयाचें ज्याचे कृत्य अथवा योजलेला बेत दुसऱ्यांना कळत नाही, काय ते प्रत्यक्ष कृतीत आल्यावरच समजते त्याला पंडित म्हणतात.


७७४ यस्य दानजितं मित्रं शत्रवो युधि निर्जिताः ।

अन्नपानजिता दाराः सफलं तस्य जीवितम् ॥ ५.३९.८३

ज्याने उदारपणाने मित्र आपलासा केला, युद्ध करून शत्रुंना जिंकले आणि अन्नपानादिकांच्या योगाने स्त्रीला स्वाधीन ठेवले त्याचे जीवित सफल झाले.


७७५ यस्य धर्मो हि धर्मार्थः क्लेशभाङ् न स पण्डितः ।

न स धर्मस्य वेदार्थं सूर्यस्यान्धः प्रभामिव ॥ ३.३३.२३

(तत्त्व न जाणतां) केवळ धर्मासाठी जो धर्माचरण करतो तो शहाणा नसून दुःखाचा मात्र वाटेकरी होणारा असतो. अंधळ्याला ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा समजत नाही, त्याप्रमाणे त्याला धर्माचा अर्थ समजत नाही.


७७६ यस्य नास्ति निजा प्रज्ञा केवलं तु बहुश्रुतः ।

न स जानाति शास्त्रार्थं दर्वीं सूपरसानिव ॥ २.५५.१

ज्याला स्वतःची बुद्धि नाही पण ज्याने केवळ पुष्कळसे ऐकलेले आहे त्याला, आमटींतल्या पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे शास्त्राचे रहस्य कळत नाही.


७७७ यस्य बुद्धिः परिभवेत्तमतीतेन सान्त्वयेत् ।

अनागतेन दुष्पज्ञं प्रत्युत्पन्नेन पण्डितम् ॥ १.१४०.७४

ज्याची बुद्धि मंद असेल त्यास आपल्या पूर्वीच्या बढाईच्या गोष्टी सांगाव्या, जो मूर्ख असेल त्यास 'पुढे अमुक करीन' वगरे आशा लावावी, आणि जो शाहणा असेल त्यास धनादिक देऊन संतुष्ट करावें.


७७८ यस्य भार्या गृहे नास्ति साध्वी च प्रियवादिनी ।

अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥ १२.१४४.१७

ज्याच्या घरांत सत्त्वशील व प्रिय भाषण करणारी स्त्री नाही, त्याने अरण्यांत निघून जावे. कां की, जसें अरण्य तसेच त्याचें घर.


७७९ यस्य वृत्तं न जल्पन्ति मानवा महदद्भुतम् ।

राशिवर्धनमात्रं स नैव स्त्री न पुनः पुमान् ॥ ५.१३३.२३

ज्याच्या हातून एकादी मोठी अद्भुत गोष्ट घडल्याचे लोक बोलत नाहीत तो मनुष्य कुचकामाचा, केवळ (मनुष्यजातीची) संख्या वाढविणारा होय. वस्तुतः त्याला स्त्रीहि म्हणता येत नाही, मग पुरुष तर तो नव्हेच नव्हे.


७८० यस्य स्वल्पं प्रियं लोके ध्रुवं तस्याल्पमप्रियम् ॥ ५.१३५.१७

जगामध्ये अल्पस्वल्प सत्ता ज्याला प्रिय असते, त्याची ती सत्ता निःसंशय त्याच्या अनर्थालाच कारण होते.


७८१ यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तस्य बान्धवाः ।

यस्यार्थाः स पुमाँल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः ॥ १२.८.१९

ज्याच्याजवळ द्रव्य असेल त्याच्यासाठी मित्र असतात ज्याच्याजवळ द्रव्य आहे त्याच्याकरितां आप्तेष्ट आहेत. जगांत ज्याच्याजवळ द्रव्य असेल तोच खरा पुरुष आणि तोच पंडित.


७८२ यस्यैव बलमोजश्च स धर्मस्य प्रभुर्नरः ॥ १२.१५२.१८

ज्याच्या आंगीं सामर्थ्य आणि तेज ही असतात तोच मनुष्य धर्माचरणास समर्थ होतो.


७८३ यः सदारः स विश्वास्यः ॥ १.७४.४४

जो सपत्नीक असेल त्याच्यावर विश्वास ठेवावा.


७८४ यः सपत्नश्रियं दीप्तां हीनश्रीः पर्युपासते ।

मरणं शोभनं तस्य इति विद्वज्जना विदुः ॥ १.७९.१३

जो स्वतःचे ऐश्वर्य नष्ट झाले असता प्रतिपक्ष्याच्या डोळे दिपणाऱ्या वैभवाची आराधना करतो, त्याला मृत्यु आलेला फार उत्तम असें ज्ञाते लोक म्हणतात.


७८५ यः समुत्पतितं क्रोधं क्षमयेह निरस्यति ।

यथोरगस्त्वचं जीर्णा स वै पुरुष उच्यते ॥ १.७९.४

सर्प जसा जीर्ण झालेली त्वचा टाकून देतो त्याप्रमाणे अंतःकरणांत उत्पन्न झालेल्या क्रोधाचे क्षमेच्या योगानें जो निवारण करतो. तोच पुरुष म्हणावयाचा.


७८६ यः सौहृदे पुरुष स्थापयित्वा

पश्चादेनं दूषयते स बालः ॥ २.६४.१३

जो पहिल्याने आपणच एकाद्याला आपला स्नेही समजतो व मागून त्याला दूषण देतो तो पोरकट होय.


७८७ या दुस्त्यजा दुर्मतिभिर्या न जीर्यति जीर्यतः ।

योऽसौप्राणान्तिकोरोगस्तान्तृष्णान्त्यजतःसुखम् ॥ १३.७.२१

दुष्ट मनुष्यांना जिचा त्याग करितां येत नाहीं, शरीर जीर्ण होत असता जी कमी होत नाही, जी केवळ प्राणांतींच संपणाऱ्या रोगासारखी आहे त्या तृष्णेचा (लोभाचा) त्याग करणारास सुख प्राप्त होते.


७८८ यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः ।

सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम् ॥ १३.६.६

शेतकरी शेतांत ज्या प्रकारचे बीज टाकतो त्या प्रकारचे त्यास फळ मिळतें. जर त्याने चांगले बी पेरले तर त्यास चांगले फळ येते; आणि वाईट पेरिलें तर वाईट फळ येते.


७८९ यादृशः पुरुषस्यात्मा तादृशं सम्प्रभाषते ॥ ५.३.१

पुरुषाचे अंतःकरण जशा प्रकारचे असते तशा प्रकारचे तो भाषण करीत असतो.


७९० यादृशैः संनिविशते यादृशांश्चोपसेवते ।

यादृगिच्छेच्च भवितुं तादृग्भवति पूरुषः ॥ ५.३६.१३

कोणी मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांशी सहवास ठेवितो, ज्या प्रकारच्या मनुष्यांची सेवा करतो, आणि ज्या प्रकारचा होण्याची इच्छा धरतो त्या प्रकारचा तो होतो.


७९१ यादृशो जायते राजा तादृशोऽस्य जनो भवेत ॥ ११.८.३२

जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होते.


७९२ यावच्च मार्दवेनैतान् राजन्नुपचरिष्यसि ।

तावदेते हरिष्यन्ति तव राज्यमरिन्दम ॥ ५.७३.८

(श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणतात) हे शत्रूचे दमन करणाऱ्या धर्मराजा, जोपर्यंत तूं सामोपचाराने यांच्याशी (म्हणजे कौरवांशी) वागत राहाशील तोपर्यंत हे तुझें राज्य बळकावून बसतील.


७९३ यावत्कीर्तिर्मनुष्यस्य न प्रणश्यति कौरव ।

तावज्जीवति गान्धारे नष्टकीर्तिस्तु नश्यति ॥ १.२०३.११

(भीष्म म्हणतात) गांधारीपुत्रा दुर्योधना; जोपर्यंत मनुष्याची कीर्ति नष्ट झालेली नाही तोपर्यंत तो जिवंत असतो. कीर्ति नाहीशी झाली म्हणजे त्याचा नाश होतो.


७९४ यावद्धि तीक्ष्णया सूच्या विध्येदग्रेण केशव ।

तावदप्यपरित्याज्यं भूमेर्नः पाण्डवान्प्रति ॥ ५.१२७.२५

(दुर्योधन म्हणतो) कृष्णा, तीक्ष्ण सुईच्या टोकानें जेवढ्याचा वेध करता येईल तेवढी भूमि देखील आम्ही पांडवांना देणार नाही.


७९५ युक्ता यदा जानपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।

अभीक्ष्णं भिक्षुरूपेण राजानं घ्नन्ति तादृशाः ॥ १२.९.२३

राष्ट्रातील प्रजा उद्योगशील असूनहि जर (उद्योगाच्या अभावामुळे) भिक्षुरूपी बनून ब्राह्मणांप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली तर तिच्यायोगाने राजाचा वध होतो.


७९६ ये च मूढतमा लोके ये च बुद्धेः परं गताः ।

त एव सुखमेधन्ते मध्यमः क्लिश्यते जनः ॥ १२.२५.२८

जगांत जे अत्यंत मूढ असतील, अथवा जे ज्ञानाच्या पैलतीराला पोचलेले असतात तेच सुखाने नांदत असतात. मध्यम स्थितीतल्या लोकांना क्लेशच होतात.


७९७ ये तु बुद्धया हि बलिनस्ते भवन्ति बलीयसः ।

प्राणमात्रबला ये वै नैव ते बलिनो मताः ॥ १२.१५६.१३

जे बुद्धीने बलिष्ठ असतील, तेच खरे प्रबळ होत. जे केवळ शारीरिक बलाने संपन्न ते खरोखर बलवान् नव्हत.


७९८ ये दम्भान्नाचरन्ति स्म येषां वृत्तिश्च संयता ।

विषयांश्च निगृह्णन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते ॥ १२.११०.३

जे दांभिकाचरण करीत नाहीत, ज्यांची वृत्ति संयमशील आहे व जे विषयांना जिंकतात ते सर्व संकटांतून पार पडतात.


७९९ ये धनादपकर्षन्ति नरं स्वबलमास्थिताः ।

ते धर्ममर्थं कामं च प्रमथ्नन्ति नरं च तम् ॥ ५.७२.२४

स्वतःच्या बलाचा आश्रय करून जे एकाद्या मनुष्याचे द्रव्य हिरावून घेतात, ते त्याचा धर्म, अर्थ व काम आणि तो मनुष्य या सर्वांचा विध्वंस करतात.


८०० येन खट्वां समारूढः परितप्येत कर्मणा ।

आदावेव न तत्कुर्यादध्रुवे जीविते सति ॥ ५.३९.२९

खाटेवर (म्हणजे मृत्युशय्येवर) पडल्यावर ज्या कृत्यांमुळे पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येईल असे कृत्य प्रथमतःच करूं नये, कारण जीवित क्षणभंगुर आहे.


८०१ ये न मानित्वमिच्छन्ति मानयन्ति च ये परान् ।

मान्यमानान्नमस्यन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते ॥ १२.११०.१९

जे सन्मानाची इच्छा करीत नाहीत, जे दुसऱ्यांना मान देतात आणि सन्मानास पात्र असलेल्यांना प्रणाम करितात ते संकटांच्या पार जातात.


८०२ येन येन शरीरेण यद्यत्कर्म करोति यः ।

तेन तेन शरीरेण तत्तत्फलमुपाश्नुते ॥ १३.७.३

कोणीहि ज्या ज्या शरीराने जें जें कर्म करतो त्या त्या कर्माचे फळ तें तें शरीर धारण करून भोगतो.


८०३ ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ॥ ६.२८.११

(श्रीकृष्ण म्हणतात) जे मला (परमेश्वराला) जसे भजतात तसें मी त्यांना फल देतो.


८०४ येऽर्थाः स्त्रीषु समायुक्ताः प्रमत्तपतितेषु च ।

ये चानार्ये समासक्ताः सर्वे ते संशयं गताः ॥ ५.३८.४२

जी कामें स्त्रिया किंवा झिंगलेला अथवा पतित मनुष्य यांच्यावर सोपविली गेली, तसेंच जी कामें अनार्य मनुष्याकडे दिली गेली ती सगळी संशयांत पडली.


८०५ येषां त्रीण्यवदातानि विद्या योनिश्च कर्म च ।

तान्सेवेत्तैः समास्या हि शास्त्रेभ्योऽपि गरीयसी ॥ ३.१.२७

विद्या, कुल आणि आचरण ही तीन ज्यांची शुद्ध आहेत त्यांची संगत धरावी. खरोखर, त्यांचा समागम शास्त्राभ्यासापेक्षांहि श्रेष्ठ होय.


८०६ येषां शास्त्रानुगा बुद्धिर्न ते मुह्यन्ति भारत ॥ १.१.२४४

(संजय धृतराष्ट्राला म्हणतो) ज्यांची बुद्धि शास्त्रानुसार चालते ते भांबावून जात नाहीत.


८०७ ये हि धर्मस्य लोप्तारो वध्यास्ते मम पाण्डव ॥ ७.१८१.२८

(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, जे धर्म बुडवणारे असतील ते माझ्याकडून मारिले जाण्यास योग्य होत.


८०८ ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।

आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ६.२९.२२

(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, इंद्रियांचा विषयांशी संबंध घडल्याने जे भोग उत्पन्न होतात ते खरोखर दुःखाचें माहेरघरच होत, त्यांना आदि असून अंतहि असतो. त्यांच्या ठिकाणी शहाणा पुरुष रममाण होत नाही.


८०९ योगः कर्मसु कौशलम् ॥ ६.२६.५०

योग म्हणजे कमें करण्याचे कौशल्य. (कर्मफलाचा लेप न लागेल अशा रीतीने निष्कामबुद्धीने कर्मे करणे.)


८१० यो दुर्लभतरं प्राप्य मानुष्यं द्विषते नरः ।

धर्मावमन्ता कामात्मा भवेत्स खलु वञ्च्यते ॥ १२.२९७.३४

जो कोणी मनुष्य दुर्लभ मनुष्ययोनीत उत्पन्न होऊनहि धर्माचा द्वेष किंवा निदान अवमान करतो आणि कामोपभोगांत गढून जातो त्याची अखेर फसगत होते.


८११ यो न दर्शयते तेजः क्षत्रियः काल आगते ।

सर्वभूतानि तं पार्थ सदा परिभवन्त्युत ॥ ३.२७.३८

(द्रौपदी धर्मराजास म्हणते) हे कुंतीपुत्रा, समय प्राप्त झाला असतां जो क्षत्रिय आपलें तेज प्रकट करीत नाही त्याचा अपमान सर्व प्राणी नेहमी करीत असतात.


८१२ योऽन्यथा सन्तमात्मानमन्यथा प्रतिपद्यते ।

किं तेन न कृतं पापं चौरेणात्मापहारिणा ॥ ५.४२.३७

जो आपले खरे स्वरूप एकाप्रकारचे असतां ते दुसऱ्या प्रकारचे असल्याचे भासवितो, त्या स्वतःचे खरे स्वरूप लपविणाऱ्या चोराने कोणतें पाप केले नाही ?


८१३ यो मां प्रयतते हन्तुं ज्ञात्वा प्रहरणे बलम् ।

तस्य तस्मिन्पहरणे पुनः प्रादुर्भवाम्यहम् ॥ १४.१३.१३

(काम म्हणजे अहंकार म्हणतो) एकाद्या आयुधांत सामर्थ्य आहे असे समजून जो मला त्याने मारण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या त्या आयुधांतच मी फिरून उत्पन्न होतो.


८१४ यो यथा वर्तते यस्मिंस्तस्मिन्नेव प्रवर्तयन् ।

नाधर्मं समवाप्नोति नचाश्रेयश्च विन्दति ॥ ५.१७८.५३

जो ज्याच्याशी ज्याप्रकारे वागतो त्याच्याशी त्या प्रकारे वागण्यांत कोणताहि अधर्म घडत नाही, आणि त्यापासून अकल्याणहि होत नाही.


८१५ यो यस्मिञ्जीवति स्वार्थे पश्येत्पीडां न जीवति ।

स तस्य मित्रन्तावत्स्याद्यावन्नस्याद्विपर्ययः ॥ १२.१३८.१४०

जो जिवंत राहिला असतां स्वार्थाला बाध येणार नाही व आपले प्राण वाचतील असें ज्याला वाटत असेल त्याचा तो मित्र, उलट स्थिति आली नाही तोवरच असतो.


८१६ योऽरिणा सह सन्धाय सुखं स्वपिति विश्वसन् ।

स वृक्षाग्रे प्रसुप्तो वा पतितः प्रतिबुध्यते ॥ १२.१४०.३७

जो शत्रूशी तह केल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवून खुशाल झोपा काढतो तो, झाडाच्या शेंड्यावर झोपी गेलेल्या मनुष्याप्रमाणे, पडल्यावरच जागा होतो.


८१७ यो विद्यया तपसा संप्रवृद्धः

स एव पूज्यो भवति द्विजानाम् ॥ १.८९.३

जो विद्येनें व तपाने वृद्ध झाला तोच द्विजांना पूज्य वाटतो.


८१८ यो वै सन्तापयति यं स शत्रुः प्रोच्यते नृप ॥ २.५५.१०

(दुर्योधन धृतराष्ट्राला सांगतो) हे राजा, जो ज्याला पीडा करतो तो त्याचा शत्रु समजला जातो.


८१९ यो हि तेजो यथाशक्ति न दर्शयति विक्रमात् ।

क्षत्रियो जीविताकाङ्क्षी स्तेन इत्येव तं विदुः ॥ ५.१३४.२

जिवाच्या आशेने जो क्षत्रिय यथाशक्ति पराक्रम करून आपलें तेज प्रकट करीत नाहीं तो चोरच म्हटला पाहिजे !


८२० रक्षणं सर्वभूतानामिति क्षात्रं परं मतम् ॥ १२.१२०.१३

सर्व भूतांचे रक्षण करणे हाच क्षत्रियाचा परम धर्म होय.


८२१ रथः शरीरं भूतानां सत्त्वमाहुस्तु सारथिम् ।

इन्द्रियाणि हयानाहुः कर्मबुद्धिस्तु रश्मयः ॥ ११.७.१३

जीवाचें शरीर हा रथ व बुद्धि हा सारथि होय. इंद्रिये हे (या रथाला जोडलेले) घोडे होत. आणि मन हा लगाम होय.


८२२ राजन्सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यसि ।

आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यसि ॥ १.७४.८२

(शकुंतला दुष्यंताला म्हणते) राजा, दुसऱ्यांचे मोहरीएवढे बारीक दोष तुला दिसतात, पण स्वतःचे बेलफळा एवढे मोठे दोषहि तूं पहात असूनहि तिकडे डोळेझांक करतोस.


८२३ राजमूला महाबाहो योगक्षेमसुवृष्टयः ।

प्रजासु व्याधयश्चैव मरणं च भयानि च ॥ १२.१४१.९

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) प्रजेचा योगक्षेम नीट चालणे, पर्जन्य चांगला पडणे, तसेंच प्रजेला रोग, मरण अथवा भय प्राप्त होणे या सर्वांचे मुख्य कारण राजाच आहे.


८२४ राजमूलो महाप्राज्ञ धर्मो लोकस्य लक्ष्यते ।

प्रजा राजभयादेव न खादन्ति परस्परम् ॥ १२.६८.८

(बृहस्पति वसुमना राजाला सांगतात) लोक धर्माने वागतात याचे कारण राजाच होय असे दिसून येते. राजाच्या भीतीमुळेच लोक एकमेकांना खाऊन टाकीत नाहीत.


८२५ राजा कृतयुगस्रष्टा त्रेताया द्वापरस्य च ।

युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम् ॥ १२.६९.९८

जगांत कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय. तीच गोष्ट त्रेतायुगाची व द्वापर युगाची आणि चौथ्या म्हणजे कलियुगालाहि राजाच कारण होतो.


८२६ राजा चेन्न भवेल्लोके पृथिव्यां दण्डधारकः ।

जले मत्स्यानिवाभक्ष्यन्दुबैलं बलवत्तराः ॥ १२.६७.१६

पृथ्वीवर दंड धारण करणारा राजा जर नसता, तर पाण्यातील माशांप्रमाणे बलवत्तर लोकानी दुर्बळांना खाऊन टाकलें असतें.


८२७ राजानं प्रथमं विन्देत्ततो भार्या ततो धनम् ।

राजन्यसति लोकस्य कुतो भार्या कुतो धनम् ॥ १२.५७.४१

मनुष्यांनी प्रथमतः राजा प्राप्त करून घ्यावा. तदनंतर स्त्री व त्यानंतर धन. कारण राजाच जर नसेल तर लोकांना स्त्री तरी कोठून मिळणार ? आणि धन तरी कोठून मिळणार ?


८२८ राजा लोकस्य रक्षिता ॥ १२.९०.३

राजा हाच लोकांचा पालनकर्ता होय.


८२९ राजैव कर्ता भूतानां राजैव च विनाशकः ।

धर्मात्मा यःस कता स्यादधर्मात्मा विनाशकः ॥ १२.९१.९

प्राण्यांचे कल्याण करणारा राजाच आणि त्यांचा नाश करणाराहि पण राजाच. कारण, तो धर्माने वागेल तर कल्याणकर्ता आणि अधर्माने वागेल तर नाश करणारा ठरतो.


८३० राजैव युगमुच्यते ॥ १२.९१.६

राजालाच युग म्हणतात।(म्हणजे जसा राजा असेल तसें बरे वाईट युग उत्पन्न होतें)


८३१ राज्ञः प्रमाददोषेण दस्युभिः परिमुष्यताम् ।

अशरण्यःप्रजानां यःस राजा कलिरुच्यते ॥ १२.१२.२९

राजाच्या हलगर्जीपणामुळे चोरांकडून लुबाडल्या जाणा-या प्रजेला जो राजा अभय देऊ शकत नाही तो (मूर्तिमंत) कलिच होय.


८३२ राज्ञां हि चित्तानि परिप्लुतानि

सान्त्वं दत्त्वा मुसलैर्घातयन्ति ॥ २.६४.१२

राजाचे चित्त नेहमी कलुषित असल्यामुळे ते प्रथमतः गोड बोलतात आणि मागाहून डोक्यांत मुसळ घालून प्राण घेतात.


८३३ राज्ञा हि पूजितो धर्मस्ततः सर्वत्र पूज्यते ॥ १२.७५.४

राजानें अगोदर धर्माचा मान ठेवला म्हणजे सर्व लोक धर्माचा मान ठेवतात.


८३४ राज्यं हि सुमहत्तन्त्रं धार्यते नाकृतात्मभिः ।

न शक्यं मृदुना वोढुमायासस्थानमुत्तमम् ॥ १२.५८.२१

राज्य चालविणे हे अत्यंत अवघड काम आहे. ज्याने आपल्या बुद्धीला विशिष्ट प्रकारचे वळण लावलेले नाही, त्याला ते झेंपणार नाही. राज्यधुरा वाहणे हे अत्यंत कष्टप्रद असून ते लेच्यापेच्या मनुष्याला शक्य नाही.


८३५ राज्यं प्रणिधिमूलं हि मन्त्रसारं प्रचक्षते ॥ १२.८३.५१

हेर हा राज्याचा आधार, आणि सल्लामसलत ही शक्ति होय असें म्हणतात.


८३६ राष्ट्रस्यैतत्कृत्यतमं राज्ञ एवाभिषेचनम् ।

अनिन्द्रमबलं राष्ट्रं दस्यवोऽभिभवन्त्युत ॥ १२.६७.२

कोणत्यातरी राजाला राज्याभिषेक करणे हे एक राष्ट्राचे प्रमुख कर्तव्य आहे. कारण राष्ट्राला कोणी नियंता नसला म्हणजे ते दुर्बळ झाल्यामुळे शत्रु त्याच्यावर हल्ला करतात.


८३७ रोहते सायकैर्विद्धं वनं परशुना हतम् ।

वाचा दुरुक्तं बीभत्सं न संरोहति वाक्क्षतम् ॥ ५.३४.७८

बाणांनी वेधलेले अथवा कुन्हाडीने तोडलेलें वन फिरून वाढीस लागते. परंतु दुष्ट व बीभत्स बोलण्याने पडलेली जखम भरून येत नाही.


८३८ लोकयात्रार्थमेवेह धर्मस्य नियमः कृतः ॥ १२.२५९.५

लोकव्यवहार सुरळीतपणे चालावा एवढ्यासाठीच धर्माचरणाचा नियम घालून दिला आहे.


८३९ लोकरञ्जनमेवात्र राज्ञां धर्मः सनातनः ॥ १२.५७.११

या लोकी प्रजेला सुखी ठेवणे हाच राजांचा सनातन धर्म आहे.


८४० लोकवृत्ताद्राजवृत्तमन्यदाह बृहस्पतिः ॥ २.५५.६

प्रजेच्या कर्तव्याहून राजाचे कर्तव्य निराळे असल्याचे बृहस्पतीने प्रतिपादिले आहे.


८४१ लोको ह्यार्यगुणानेव भूयिष्ठं तु प्रशंसति ॥ १३.१२२.२

लोक चांगल्या गुणांचीच अतिशय प्रशंसा करीत असतात.


८४२ लोभं हित्वा सुखी भवेत् ॥ ३.३१३.७८

लोभ टाकिल्याने मनुष्य सुखी होतो.


८४३ लोभात्पापं प्रवर्तते ॥ १२.१५८.२

लोभापासून पातकाची प्रवृत्ति होते.


८४४ लोहितोदां केशतृणां गजशैलां ध्वजद्रुमाम् ।

महीं करोति युद्धेषु क्षत्रियो यः स धर्मवित् ॥ १२.५५.१८

जो संग्रामामध्ये पृथ्वीला रक्तरूपी जलाने युक्त, केशरूपी तृणाने आच्छादित झालेली, गजरूपी पर्वत असलेली व ध्वजरूपी वृक्षांनी युक्त अशी करितो, तोच क्षत्रिय खरा धर्म वेत्ता होय.


८४५ वधमेव प्रशंसन्ति शत्रूणामपकारिणाम् ॥ १.१४०.१०

अपकार करणाऱ्या शत्रूचा वधच करणे प्रशस्त मानतात.


८४६ वध्यन्ते न ह्यविश्वस्ताः शत्रुभिर्दुर्बला अपि ।

विश्वस्तास्तेषु वध्यन्ते बलवन्तोऽपि दुर्बलैः ॥ १२.१३८.१९८

जे सावध असतात ते दुर्बळ असले तरी शत्रूंकडून मारिले जात नाहीत. पण बलाढ्य असले तरी शत्रूविषयीं बेसावध राहणारे, दुर्बळ शत्रूकडूनहि मारिले जातात.


८४७ वर्तमानः सुखे सर्वो मुह्यतीति मतिर्मम ॥ ३.१८१.३०

(अजगर झालेला नहुष राजा युधिष्ठिराला म्हणतो.) सुखांत असतां सर्वांना मोह उत्पन्न होतो असे माझे मत आहे.


८४८ वर्धमानमृणं तिष्ठेत्परिभूताश्च शत्रवः ।

जनयन्ति भयं तीव्रं व्याधयश्चाप्युपेक्षिताः ॥ १२.१४०.५९

ऋण अवशिष्ट राहिले तर तें वृद्धिंगतच होत जाते. शत्रु शिल्लक ठेविले तर त्यांचा अपमान झाल्यामुळे ते पुढे अत्यंत भीति उत्पन्न करितात. आणि रोगांची उपेक्षा केली तर त्यापासूनहि अतिशय भीति उत्पन्न होते.


८४९ वशे बलवतां धर्मः सुखं भोगवतामिव ।

नास्त्यसाध्यं बलवता सर्वं बलवतां शुचि ॥ १२.१३४.८

सुख जसें भोगसाधनें अनुकूल असलेल्याच्या स्वाधीन, तसा धर्म बलसंपन्न असलेल्यांच्या अधीन, ज्यांच्यापाशीं बल आहे त्यांना असाध्य असे काहीच नाही. बलवान् असेल त्याचे सर्वच शुभ.


८५० वसन्विषयमध्येऽपि न वसत्येव बुद्धिमान् ।

संवसत्येव दुर्बुद्धिरसत्सु विषयेष्वपि ॥ १२.२९८.६

शहाणा मनुष्य विषयांच्या गराड्यात राहूनहि न राहिल्यासारखा असतो. मूर्ख मनुष्य विषय जवळ नसतांहि त्यांत गुरफटल्याप्रमाणे असतो.


८५१ वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालस्य पर्ययः ।

प्राप्तकालं तु विज्ञाय भिन्द्याद्घटमिवाश्मनि ॥ १२.१४०.१८

आपला काल उलट आहे तोवर शत्रूला खांद्यावर देखील बसवावें, परंतु योग्य काल आला आहेसे दिसून येतांच, मडके दगडावर आपटावें तसा, त्याचा चुराडा करून सोडावा.


८५२ वाक्शल्यं मनसो जरा ॥ ५.३९.७९

वाग्बाणामुळे मनाला वार्धक्य येते.


८५३ वाक्संयमो हि नृपते सुदुष्करतमो मतः ।

अर्थवञ्च विचित्रं च न शक्यं बहुभाषितुम् ॥ ५.३४.७६

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) वाणीचा संयम करणे अत्यंत दुर्घट म्हणून म्हटले आहे. परंतु यथार्थ असून चटकदार असें भाषण पुष्कळ करणे शक्यहि नाही.


८५४ वाक्सायका वदनानिष्पतन्ति

     यैराहतः शोचति रात्र्यहानि ।

परस्य नामर्मसु ये पतन्ति

     तान्पण्डितो नावसृजेत्परेषु ॥ १३.१०४.३२

वाग्बाण हे तोंडातून सुटत असतात. ते ज्याला लागले तो रात्रंदिवस तळमळत राहतो. यास्तव दुसऱ्याच्या वर्मी लागतील असे वाग्बाण सुज्ञ मनुष्याने दुसऱ्यावर केव्हाही टाकू नये.


८५५ वाग्वज्रा ब्राह्मणाः प्रोक्ताः क्षत्रिया बाहुजीविनः ॥ १२.१९९.४६

वाणी हे ब्राह्मणांचे शस्त्र असून क्षत्रिय हे बाहुबलावर जगणारे होत असें म्हटले आहे.


८५६ वाचा भृशं विनीतः स्याद्धृदयेन तथा क्षुरः ।

स्मितपूर्वाभिभाषी स्यात्सृष्टो रौद्रेण कर्मणा ॥ १.१४०.६६

बोलण्यांत अगदी विनयशील पण हृदयाने कठोर असावे. स्मितपूर्वक बोलावें परंतु आपले खरे स्वरूप भयंकर कृति करून प्रगट करावे.


८५७ वासांसि जीर्णानि यथा विहाय

     नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।

तथा शरीराणि विहाय जीर्णा-

     न्यन्यानि संयाति नवानि देही ॥ ६.२६.२२

ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीं घेतो, त्याप्रमाणे आत्मा हा जीर्ण झालेली शरीरे टाकून देऊन दुसऱ्या नव्या शरीरांत प्रवेश करतो.


८५८ विक्रमाधिगता ह्यार्थाः क्षत्रधर्मेण जीवतः ।

मनो मनुष्यस्य सदा प्रीणन्ति पुरुषोत्तम ॥ ५.९०.७९

(कुंती श्रीकृष्णाला म्हणते) हे पुरुषोत्तमा, पराक्रम करून मिळविलेलें द्रव्य क्षात्रधर्माने चालणाऱ्या मनुष्याच्या मनाला सदा संतोष देते.


८५९ विगुणा ह्यपि संरक्ष्या ज्ञातयो भरतर्षभ ॥ ५.३९.२०

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भरतश्रेष्ठा, आपल्या कुलांतील गुणहीन पुरुषांचेहि संरक्षण करणे अवश्य आहे.


८६० विजयो मन्त्रमूलो हि राज्ञो भवति भारत ॥ २.५.२७

(नारद युधिष्ठिराला म्हणतात.) राजाला विजय प्राप्त होण्याला मूळ कारण गुप्त सल्लामसलत हेच होय.


८६१ विदिते चापि वक्तव्यं सुहृद्भिरनुरागतः ॥ ४.४.९

एकाद्यास माहीत असलेली गोष्टहि आप्तेष्टांनी पुनः प्रेमाने सांगावी हे त्यांचे कर्तव्यच आहे.


८६२ विद्या तपो वा विपुलं धनं वा

सर्व ह्येतद्यवसायेन शक्यम् ॥ १२.१२०.४५

विद्या काय, तप काय अथवा विपुल द्रव्य काय हे सर्व उद्योगानेच मिळविणे शक्य आहे.


८६३ विद्यामदो धनमदस्तृतीयोऽभिजनो मदः ।

मदा एतेऽवलिप्तानामेत एव सतां दमाः ॥ ५.३४.४४

विद्येचा मद, धनाचा मद व तिसरा कुलाचा मद हे तीन गर्विष्ट लोकांच्या बाबतीत मद म्हणजे अहंकार वाढविणारे ठरतात, तेच सज्जनांच्या बाबतीत दम म्हणजे इंद्रियनिग्रहाला कारण होतात.


८६४ विद्या हि सा ब्रह्मचर्येण लभ्या ॥ ५.४४.२

विद्या म्हणून जी आहे ती ब्रह्मचर्यानेच साध्य होत असते.


८६५ विना वधं न कुर्वन्ति तापसाःप्राणयापनम् ॥ १२.१५.२४

जीवहत्या घडल्याविना तपस्व्याचे सुद्धा प्राणधारण होत नाही.


८६६ विरूपो यावदादर्शे नात्मनः पश्यते मुखम् ।

मन्यते तावदात्मानमन्येभ्यो रूपवत्तरम् ॥ १.७४.८७

कुरूप मनुष्य जोवर आरशांत आपले तोंड पहात नाही, तोवर त्याला वाटत असते की, आपण इतरांपेक्षा रूपवान् आहों.


८६७ विवर्जनं ह्यकार्याणामेतत्सुपुरुषव्रतम् ॥ ४.१४.३६

दुष्कृत्य सर्वथा वर्ण्य करणे हे सत्पुरुषांचे व्रत होय.


८६८ विवाहकाले रतिसंप्रयोगे

     प्राणात्यये सर्वधनापहारे ।

विप्रस्य चार्थे ह्यनृतं वदेत

     पञ्चानृतान्याहुरपातकानि ॥ ८.६९.३३

विवाहकाली, संभोगसमयीं, प्राणसंकट ओढवलें असतां, सर्वस्वाचा नाश होण्याचा समय आला असता, तसेंच एकाद्या ब्राह्मणाचे हित साधत असेल तर मनुष्याने असत्य भाषण केले तरी चालेल. या पांच प्रसंगी असत्य भाषणाच्या योगाने पातक लागत नाही.


८६९ विश्वासयित्वा तु परं तत्त्वभूतेन हेतुना ।

अथास्य प्रहरेत्काले किञ्चिद्विचलिते पदे ॥ १२.१४०.४४

खरेखुरे कारण दाखवून शत्रूचा विश्वास संपादन करावा. आणि कालांतराने त्याचे आसन जरासें डळमळीत झाले की, त्याच्यावर प्रहार करावा.


८७० विश्वासयेत्परांश्चैव विश्वसेच्च न कस्यचित् ।

पुत्रेष्वपि हि राजेन्द्र विश्वासो न प्रशस्यते ॥ १२.८५.३३

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) दुसऱ्यांचा विश्वास संपादन करावा. पण आपण मात्र कोणावरहि विश्वास ठेवू नये. राजा, फार काय, पण पोटच्या मुलाचासुद्धां पूर्ण विश्वास धरणे प्रशस्त नव्हे.


८७१ विश्वासाद्भयमभ्येति नापरीक्ष्य च विश्वसेत् ॥ १२.१४०.४३

(भलत्याच मनुष्यावर) विश्वास टाकिल्याने भीति उत्पन्न होत असते. यास्तव, परीक्षा पाहिल्यावांचून कोणावरहि विश्वास ठेवू नये.


८७२ विषमं न हि मन्यन्ते प्रपातं मधुदर्शिनः ॥ ५.५१.२६

मध पाहणारे (मधाच्या ठिकाणाचा) तुटलेला कडा किती भयंकर आहे इकडे. लक्ष देत नाहीत.


८७३ विषमां च दशां प्राप्तो देवान् गर्हति वै भृशम् ।

आत्मनः कर्मदोषाणि न विजानात्यपण्डितः ॥ ३.२०९.६

मूर्ख मनुष्य दुर्दशेच्या फेऱ्यांत सांपडला म्हणजे देवांच्या नावाने खडे फोडतो, पण आपले चुकते कोठे, हे त्याला समजत नाही.


८७४ विषमावस्थिते देवे पारुषेऽफलतां गते ।

विषादयन्ति नात्मानं सत्त्वोपाश्रयिणो नराः ॥ ३.७९.१४

दैव प्रतिकूळ होऊन प्रयत्न फुकट गेला असता, सत्वशील पुरुष अंतःकरण खिन्न होऊ देत नाहीत.


८७५ विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।

रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ६.२६.५९

निराहारी पुरुषाला विषय सोडून जातात, पण त्यांची आवड शिल्लक राहतेच, ही आवडसुद्धा परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर नष्ट होते.


८७६ विष्वग्लोपः प्रवर्तेत भिद्येरन्सर्वसेतवः ।

ममत्वं न प्रजानीयुर्यदि दण्डो न पालयेत् ॥ १२.१५.३८

दंडाने जर संरक्षण केले नसते तर चोहोकडे शून्य होऊन गेलें असतें; सर्व प्रकारच्या मर्यादांचा भंग होऊन गेला असता; आणि कोणाची कशावर मालकी राहिली नसती.


८७७ विहीनं कर्मणाऽन्यायं यः प्रगृह्णाति भूमिपः ।

उपायस्याविशेषज्ञं तद्वै क्षत्रं नपुंसकम् ॥ १२.१४२.३१

सामादिक उपाय व त्यांचे भेद यांचे ज्ञान नसणारा जो राजा, अन्यायाने प्रजेकडून कर वसूल करतो; पण आपलें प्रजापालनरूप कर्तव्य मात्र करीत नाही तो क्षत्रिय केवळ नपुंसक होय.


८७८ वृक्षमूलेऽपि दयिता

     यस्य तिष्ठति तद्गृहम् ।

प्रासादोऽपि तया हीनः

     कान्तार इति निश्चितम् ॥ १२.१४४.१२

कोणी झाडाखाली राहिला, तरी त्याची स्त्री बरोबर असेल, तर ते त्याचें घरच होय, आणि तिजवांचून जरी एकादें राजमंदिर असले तरी ते निःसंशय अरण्यच होय.


८७९ वृत्तं यत्नेन संरक्षेद्वित्तमेति च याति च ।

अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ॥ ५.३६.३७

शीलाचे यत्नपूर्वक रक्षण करावे. द्रव्य काय, मिळते आणि जातें, जो केवळ द्रव्याने क्षीण झाला तो खरोखर क्षीण नव्हे, पण ज्याचे शील भ्रष्ट झाले त्याचा सर्वस्वी नाश झाला.


८८० वृत्तेः कार्पण्यलब्धाया अप्रतिष्ठैव ज्यायसी ॥ ५.९०.७४

मिंधेपणाने उपजीविका करण्यापेक्षा अगदी निराधार असणेच चांगले.


८८१ वृत्तेन हि भवत्यार्यो न धनेन न विद्यया ॥ ५.९०.५३

शीलानेच मनुष्य आर्य गणला जातो; धनाने नव्हे, अथवा विद्येनेहि नव्हे.


८८२ वेदाढ्या वृत्तसम्पन्ना ज्ञानवन्तस्तपस्विनः ।

यत्र तिष्ठन्ति वै विप्रास्तन्नाम नगरं नृप ॥ ३.२००.९१

(मार्कडेय युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, वेदपारंगत, शीलसंपन्न, ज्ञानी व तपस्वी असे ब्राह्मण ज्यांत राहात असतील त्यालाच खरोखर नगर म्हणावे.


८८३ वेदाऽहं तव या बुद्धिरानृशंस्याऽगुणैव सा ॥ १२.७५.१८

(धर्माचरण करण्याच्या इच्छेने राज्य सोडून अरण्यांत जाऊ इच्छिणाऱ्या युधिष्ठिरास भीष्म म्हणतात) तुझ्या बुद्धीला क्रूरत्वाचा संपर्क नाही हे मी जाणून आहे पण तशा प्रकारची बुद्धि निष्फल होय.


८८४ वैद्याश्चाप्यातुराः सन्ति बलवन्तश्च दुर्बलाः ।

श्रीमन्तश्चापरे षण्ढा विचित्रः कालपर्ययः ॥ १२.२८.२२

वैद्यांनासुद्धा रोग होतात. आणि बलवान् देखील दुबळे ठरतात. तसेंच कित्येक श्रीमंत लोक नामर्द असतात. ही काळाचीच विचित्र गति आहे.


८८५ व्यक्तं हि जीर्यमाणोऽपि बुद्धिं जरयते नरः ॥ ७.१४३.१६

मनुष्य वृद्ध होऊ लागला म्हणजे त्याची बुद्धिहि त्याच्या शरीराबरोबरच जीर्ण होऊ लागते हे अगदी खरे आहे.


८८६ व्यवसायं समाश्रित्य सहायान् योऽधिगच्छति ।

न तस्य कश्चिदारम्भः कदाचिदवसीदति ॥ १२.२९८.४२

जो आपली मुख्य भिस्त स्वतःचे प्रयत्नावर ठेवून मग दुसऱ्यांचे साहाय्य घेतो, त्याचा कसलाहि प्रयत्न केव्हांहि फसत नाही.


८८७ व्रजे वाप्यथवारण्ये यत्र सन्ति बहुश्रुताः ।

तत्तन्नगरमित्याहुः पार्थ तीर्थं च तद्भवेत् ॥ ३.२००.९२

(मार्कडेय म्हणतात) हे युधिष्ठिरा, बहुश्रुत ब्राह्मण जेथे असतील तो गौळवाडा असला, अथवा अरण्य जरी असले तरी त्यालाच नगर म्हणतात, आणि तेच तीर्थ होतें.


८८८ शकुनानामिवाकाशे मत्स्यानामिव चोदके ।

पदं यथा न दृश्येत तथा पुण्यकृतां गतिः ॥ १२.३२२.१९

पक्ष्यांनी आकाशांत आणि माशांनी पाण्यांत आक्रमिलेल्या मार्गाची जशी काहीं खूण दिसत नाही, त्याप्रमाणे पुण्यवान् लोकांना प्राप्त होणारी गति उघड दिसत नाही.


८८९ शक्नोति जीवितुं दक्षो नालसः सुखमेधते ॥ १०.२.१५

तत्परतेने उद्योग करणारा मनुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. आळशी मनुष्याला सुख म्हणून मिळत नाही.


८९० शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।

कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ ६.२९.२३

शरीर टाकून देण्यापूर्वी या जगांत असतानाच, जो कामक्रोधांचा तडाका सहन करूं शकतो तो योगी होय. तोच मनुष्य सुखी होतो.


८९१ शक्यं ह्येवाहवे योद्धुं न दातुमनसूयितम् ॥ १३.८.१०

समरांगणांत लढणे सहज शक्य आहे; पण असूया (म्हणजे हेवा, लोभ वगैरे) न धरितां दान करणे हे मात्र शक्य नाही.


८९२ शत्रुः प्रवृद्धो नोपेक्ष्यो दुर्बलोऽपि बलीयसा ॥ ५.९.२२

शत्रु दुर्बळ जरी असला तरी तो वृद्धिंगत झाला असता, बलाढ्य पुरुषानेहि त्याची उपेक्षा करितां उपयोगी नाही.


८९३ शत्रुं च मित्ररूपेण सान्त्वेनैवाभिसान्त्वयेत् ।

नित्यशश्चोद्विजेत्तस्माद्गृहात्सर्पयुतादिव ॥ १२.१४०.१५

वरकरणी मित्रत्वाचा आव आणून शत्रूला सामोपचारानेच वश करावे; परंतु आंत सर्प शिरलेल्या घराप्रमाणे त्याचे निरंतर भय बाळगावें.


८९४ शत्रुपक्षं समृध्यन्तं यो मोहात्समुपेक्षते ।

व्याधिराप्यायित इव तस्य मूलं छिनत्ति सः ॥ २.५५.१६

भरभराटीत असलेल्या शत्रुपक्षाची जो मूर्खपणाने उपेक्षा करतो, त्याचा समूळ उच्छेद तो शत्रुपक्ष, विकोपास गेलेल्या व्याधीप्रमाणे करितो.


८९५ शत्रुर्निमज्जता ग्राह्यो जङ्घायां प्रपतिष्यता ।

विपरिच्छिन्नमूलोऽपि न विषीदेत्कथञ्चन ॥ ५.१३३.२०

बुडता बुडतां अथवा पडतां पडतां सुद्धा शत्रूची तंगडी पकडावी, आणि त्यासह बुडावे किंवा पडावें. मुळासकट सर्वनाश झाला तरी केव्हांहि खिन्न होऊन बसू नये.


८९६ शत्रुश्चैव हि मित्रं च न लेख्यं न च मातृका ।

यो वै सन्तापयति यं स शत्रुः प्रोच्यते नृप ॥ २.५५.१०

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, अमका हा शत्रु आणि अमका हा मित्र, असा कांहीं कोणावर छाप मारलेला नाही, किंवा अक्षरेंहि खोदलेली नाहीत ! तर, ज्याच्यापासून ज्याला ताप होतो, त्यालाच त्याचा शत्रु असें म्हणत असतात.


८९७ शत्रोरपि गुणा ग्राह्या दोषा वाच्या गुरोरपि ॥ ४.५१.१५

शत्रूचेसुद्धा गुण ध्यावे. आणि दोष गुरूचे असले तरीसुद्धां निंद्य मानावे.


८९८ शयानं चानुशेते हि तिष्ठन्तं चानुतिष्ठति ।

अनुधावति धावन्तं कर्म पूर्वकृतं नरम् ॥ ११.२.३२

पूर्वजन्मी केलेले कर्म मनुष्य झोंपी गेला की, त्याच्याबरोबरच झोपी जातें, उभा राहिला की लगेच उभे राहते, आणि तो धावू लागला म्हणजे त्याच्या मागोमाग धांवत जाते.


८९९ शरीरनियमं प्राहुर्ब्राह्मणा मानुषं व्रतम् ।

मनो विशुद्धां बुद्धिं च दैवमाहुर्व्रतं द्विजाः ॥ ३.९३.२१

(व्यासादिकमुनि पांडवांना म्हणतात.) शारीरिक नियम पाळणे हे ज्ञानी लोक मानवी व्रत समजतात. आणि मनावर जय मिळवून बुद्धि शुद्ध करणे हे दैवी व्रत मानतात.


९००. शरीरस्य विनाशेन धर्म एव विशिष्यते ॥ १.२१३.२०

आपला प्राण खर्ची घालूनहि धर्म पाळणे हेच अधिक श्रेयस्कर आहे.


९०१ शाश्वतोऽयं धर्मपथः सद्भिराचरितः सदा ।

यद्भार्यां परिरक्षन्ति भर्तारोऽल्पबला अपि ॥ ३.१२.६८

(द्रौपदी पांडवांस म्हणते.) भर्ते अशक्त असले तरीहि भार्येचे संरक्षण करितात. हा सनातन धर्ममार्ग असून सज्जनांनी नेहमी आचरलेला आहे.


९०२ शीलं प्रधानं पुरुषे तद्यस्येह प्रणश्यति ।

न तस्य जीवितेनार्थो न धनेन न बन्धुभिः ॥ ५.३४.४८

मनुष्याच्या ठिकाणी शील हेच मुख्य आहे. तेच ज्याचे नष्ट झाले त्याला या जगांत जीविताचा, धनाचा अथवा बांधवांचा काहीएक उपयोग नाही.


९०३ शीलवृत्तफलं श्रुतम् ॥ ५.३९.६७

विद्येचें फल म्हणजे उत्तम शील आणि सदाचार.


९०४ शीलेन हि त्रयो लोकाः शक्या जेतुं न संशयः ।

नहि किञ्चिदसाध्यं वै लोके शीलवतां भवेत् ॥ १२.१२४.१५

शीलाच्या जोरावर त्रैलोक्य जिंकणे शक्य आहे. यांत शंका नाही. खरोखर, शीलसंपन्न मनुष्यांना असाध्य असे काहीच नाही.


९०५ शुचेरपि हि युक्तस्य दोष एव निपात्यते ।

मुनेरपि वनस्थस्य स्वानि कर्माणि कुर्वतः ॥ १२.१११.६०

शुचिर्भूत व आपले कर्तव्य करण्यांत तत्पर अशाहि पुरुषावर दोषारोप केला जातो. आणि अरण्यामध्ये राहून केवळ आपली कमें करीत असणाऱ्या ऋषीवरहि दोषारोप केला जातो.


९०६ शुभं वा यदि वा पापं द्वेष्यं वा यदि वा प्रियम् ।

अपृष्टस्तस्य तद्ब्रूयाद्यस्य नेच्छेत्पराभवम् ॥ ५.३४.४

ज्याची हानि होऊ नये अशी आपल्याला इच्छा असते. त्याला त्याने जरी विचारिलें नसले तरी, त्याच्यासंबंधाने जे आपणाला दिसत असेल ते सांगावे: मग ते शुभ असो अथवा अशुभ असो. आणि त्याचप्राणे त्याला प्रिय होवो अथवा अप्रिय होवो.


९०७ शुभं सर्वपवित्रेभ्यो दानमेव परं द्विज ॥ १३.१२०.१६

(व्यास मैत्रेय मुनींना म्हणतात) सर्व पवित्र वस्तूंपेक्षा दान हेच अत्यंत कल्याणकारक आहे.


९०८ शुभानामशुभानां च द्वौ राशी पुरुषर्षभ ।

यः पूर्वं सुकृतं भुङ्क्ते पश्चान्निरयमेव सः ॥ १८.३.१३

(इंद्र युधिष्ठिराला म्हणतो.) पुण्य आणि पाप यांच्या दोन निरनिराळ्या राशी आहेत. यांपैकीं सुकृत म्हणजे पुण्य जो प्रथम भोगतो, त्याच्या वाट्याला मागाहून नरकच येतो.


९०९ शुभेन कर्मणा सौख्यं दुःखं पापेन कर्मणा ।

कृतं भवति सर्वत्र नाकृतं विद्यते क्वचित् ॥ ११.२.३६

सत्कर्माने सुख आणि दुष्कर्माने दुःख प्राप्त होते. जे पूर्वी केले असेल तेंच केव्हां झाले तरी फलाला येणार. जे केलें नाही त्याचें फळहि नाही.


९१० शुश्रूषुरपि दुर्मेधाः पुरुषोऽनियतेन्द्रियः ।

नालं वेदयितुं कृत्स्नौ धर्मार्थाविति मे मतिः ॥ १०.५.१

तथैव तावन्मेधावी विनयं यो न शिक्षते ।

न च किञ्चन जानाति सोऽपि धर्मार्थनिश्चयम् ॥ १०.५.२

(कृपाचार्य अश्वत्थाम्याला म्हणतात.) मंद बुद्धीचा मनुष्य जिज्ञासु असला तरी इंद्रियांवर ताबा मिळविल्यावांचून तो धर्मार्थ पूर्णपणे जाणण्यास समर्थ होणार नाही, असे माझे मत आहे. तीच गोष्ट, ज्याच्या मनाला चांगले वळण लागलेले नाही अशा बुद्धिमान् मनुष्याची, त्याला सुद्धा धर्मार्थाचे निश्चित ज्ञान कधीच होत नाही.


९११ शूरः सर्वं पालयति सर्वं शूरे प्रतिष्ठितम् ॥ १२.९९.१८

शूर पुरुष सर्वांचे रक्षण करतो. शूराच्या आधाराने सर्व राहतात.


९१२ शूरा वीराश्च शतशः सन्ति लोके युधिष्ठिर ।

येषां सङ्ख्यायमानानां दानशूरो विशिष्यते ॥ १३.८.११

(भीष्म म्हणतात.) हे युधिष्ठिरा, शूर वीर जगांत शेंकड्यांनी आहेत. पण त्यांची मोजदाद करूं म्हटले, तर दानशूर हाच विशेष श्रेष्ठ ठरेल.


९१३ शृगालोऽपि वने कर्ण शशैः परिवृतो वसन् ।

मन्यते सिंहमात्मानं यावत्सिंहं न पश्यति ॥ ८.३९.२८

(शल्य म्हणतो) हे कर्णा, वनांत सशांच्या जमावांत बसला असता कोल्ह्याला सुद्धा आपण सिंह आहो असे वाटते. (पण कोठवर ?) सिंह दृष्टीस पडला नाही तोवर.


९१४ शृणु यक्ष कुलं तात न स्वाध्यायो न च श्रुतम् ।

कारणं हि द्विजत्वे च वृत्तमेव न संशयः ॥ ३.३१३.१०८

(युधिष्ठिर म्हणतो।) बा यक्षा, ऐक. द्विजत्वाला कारण कुल नव्हे, वेदपठण नव्हे, किंवा शास्त्राभ्यासहि नव्हे, तर शील हेच द्विजत्वाला कारण होय यांत संशय नाही.


९१५ शोकः कार्यविनाशनः ॥ ७.८०.७

शोकाने कार्यनाश होतो.


९१६ शोककाले शुचो मा त्वं हर्षकाले च मा हृषः ।

अतीतानागतं हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय ॥ १२.२२७.६६

(बलि इंद्राला म्हणतो.) दुःखाच्या वेळी तूं दुःख करूं नको आणि आनंदाच्या वेळी हर्ष मानू नको. पूर्वी होऊन गेलेले आणि पुढे होणारे यांचा विचार करीत न बसतां वर्तमानकाळाकडे नजर देऊन वाग.


९१७ शोकस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च ।

दिवसे दिवसे मूढमाविशन्ति न पण्डितम् ॥ ११.२.२२

रोजच्यारोज हजारों शोक करण्याजोग्या गोष्टी आणि शेंकडों भय वाटण्याजोग्या गोष्टी मूढाला प्राप्त होत असतात, शहाण्याला प्राप्त होत नाहीत.


९१८ श्रद्दधानः शुभां विद्यां हीनादपि समाप्नुयात् ।

सुवर्णमपि चामेध्यादाददीताविचारयन् ॥ १२.१६५.३१

चांगली विद्या हीन मनुष्यापासून देखील श्रद्धेने ग्रहण करावी. सोनें अपवित्र पदार्थाशी मिसळले असल्यास त्यांतूनही खुशाल काढून घ्यावें.


९१९ श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ ६.४१.३

मनुष्य हा श्रद्धामय आहे ज्याची जशी श्रद्धा असेल तसा तो होतो.


९२० श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ६.२८.३९

इंद्रिये ताब्यात ठेवून दक्षतेने प्रयत्न करणाऱ्या श्रद्धावान् मनुष्याला ज्ञान प्राप्त होतें. ज्ञान प्राप्त झाल्यावर लवकरच त्याला परमशांतीचा लाभ होतो.


९२१ श्रिय एताः स्त्रियो नाम सत्कार्या भूतिमिच्छता ।

पालिता निगृहीता च श्रीः स्त्री भवति भारत ॥ १३.४६.१५

स्त्रिया म्हणजे खरोखर मूर्तिमंत लक्ष्मीच होत; कल्याणेच्छु पुरुषाने त्यांचा गौरव करावा. उत्तम प्रकारे पालनपोषण करून योग्य दाबांत ठेविल्याने स्त्री ही (गृह-) लक्ष्मी होते.


९२२ श्रियं ह्यविनयो हन्ति जरा रूपमिवोत्तमम् ॥ ५.३४.१२

वार्धक्याने जसा सुंदर रूपाचा, तसा अहंकाराने ऐश्वर्याचा नाश होतो.


९२३ श्रियो बलममात्यांश्च बलवानिह विन्दति ।

यो ह्यनाढ्यः स पतितस्तदुच्छिष्टं यदल्पकम् ॥ १२.१३४.४

ऐश्वर्य, सामर्थ्य, आणि अमात्य हे सर्व बलसंपन्न असलेल्याला प्राप्त होते. जो बलसंपन्न नसेल तो खरोखर पतित होय. अल्पशी सत्ता असणे हे केवळ उच्छिष्टच होय.


९२४ श्रीमन्तं ज्ञातिमासाद्य यो ज्ञातिरवसीदति ।

दिग्धहस्तं मृग इव स एनस्तस्य विन्दति ॥ ५.३९.२७

विषाने माखलेला बाण हातामध्ये घेऊन मृगहत्त्या करणाराला मृगहत्त्येचे पातक लागते, त्याप्रमाणे आपल्या कुलामध्ये श्रीमंत पुरुष असतांना जे ज्ञातिजन निकृष्ट दशेस पोचतात, त्यांचे पातक त्या श्रीमान् पुरुषाला प्राप्त होते.


९२५ श्रीमान्स यावद्भवति तावद्भवति पूरुषः ॥ ५.७२.३६

कोणीहि संपत्तीने युक्त असेल तोपर्यंतच खरोखर पुरुष गणला जातो.


९२६ श्रीर्हता पुरुषं हन्ति पुरुषस्याधनं वधः ॥ ५.७२.१९

लक्ष्मीचा घात झाला असतां पुरुषाचा वध होतो. कारण, निर्धनता हा पुरुषाचा वधच होय.


९२७ श्रुतमाप्नोति हि नरः सततं वृद्धसेवया ॥ १३.१६२.४९

सतत वृद्धजनांचा समागम केल्याने मनुष्य बहुश्रुत होतो.


९२८ श्रुतं प्रज्ञानुगं यस्य प्रज्ञा चैव श्रुतानुगा ।

असंभिन्नार्यमर्यादः पण्डिताख्यां लभेत सः ॥ ५.३३.२९

बुद्धीला अनुरूप ज्याचें अध्ययन आहे, अध्ययनाला अनुरूप ज्याचे विचार आहेत, आणि आर्य पुरुषाच्या मर्यादेचें ज्याच्या हातून उल्लंघन होत नाही त्याला पंडित ही संज्ञा प्राप्त होते.


९२९ श्रुतेन तपसा वापि

     श्रिया वा विक्रमेण वा ।

जनान्योऽभिभवत्यन्यान्

     कर्मणा हि स वै पुमान् ॥ ५.१३३.२५

विद्येने किंवा तपाने, संपत्तीने किंवा पराक्रमाने जो इतरांवर मात करतो, तो आपल्या कर्तृत्वामुळे खरा पुरुष ठरतो.


९३० श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ६.२७.३५

(श्रीकृष्ण सांगतात) आचरण्यास सोपा अशा परधर्मापेक्षा, सदोष असला तरीहि स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मात राहून मरण आले तरी बेहेत्तर. (कारण), परधर्माचा स्वीकार करण्यांत मोठे भय आहे.


९३१ श्रेष्ठो हि पण्डितः शत्रुर्न च मित्रमपण्डितः ॥ १२.१३८.४६

शहाणा शत्रु पत्करला, पण मूर्ख मित्र नको.


९३२ श्रोतव्यं खलु वृद्धानामिति शास्त्रनिदर्शनम् ।

न त्वेव ह्यतिवद्धानां पुनर्बाला हि ते मताः ॥ ५.१६८.२६

वृद्धांचे अवश्य ऐकावे असे शास्त्र सांगते; पण अतिवृद्ध झालेल्यांचे ऐकू नये, कारण त्यांची गणना पुनरपि बाल झालेल्यांतच केली पाहिजे.


९३३ श्रोत्रियस्येव ते राजन्मन्दकस्याविपश्चितः ।

अनुवाकहता बुद्धिर्नैषा तत्त्वार्थदर्शिनी ॥ १२.१०.१

(भीमसेन धर्मराजाला म्हणतो) एकाद्या मतिमंद मठ्ठ ब्राह्मणाची बुद्धि वेदांची अर्थशन्य घोकंपट्टी करण्याने नष्ट व्हावी तसा, राजा, तुझ्या बुद्धीला भ्रम झाला असून तिला खरे तत्त्व कळेनासे झाले आहे.


९३४ श्वःकार्यमद्य कुर्वीत पूर्वाह्ने चापराह्निकम् ।

न हि प्रतीक्षते मृत्युः कृतं वास्य न वा कृतम् ॥ १२.३२१.७३

उद्यांचे कार्य आज करावे; तिसऱ्या प्रहरी करावयाचे ते सकाळी करावें. कारण मृत्यु कोणाचे काम झाले अगर न झाले हे पहात बसत नाही.


९३५ षड्दोषाः पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता ।

निद्रा तन्द्री भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता ॥ ५.३३.७८

आपलें बरे व्हावे असे इच्छिणाऱ्या पुरुषाने सहा दोष टाळावे फार झोंप, सुस्ती, भय, क्रोध, आळस आणि दीर्घसूत्रीपणा.


९३६ स एव धर्मः सोऽधर्मो देशकाले प्रतिष्ठितः ।

आदानमनृतं हिंसा धर्मो ह्यावस्थिकः स्मृतः ॥ १२.३६.११

योग्य वेळी आणि योग्य स्थळी जो धर्म ठरतो. तोच अयोग्य वेळी आणि अयोग्य स्थळी अधर्म होतो. चौर्यकर्म, असत्यभाषण, हिंसा या सर्वांची गोष्ट अशीच आहे. धर्म हा परिस्थितीप्रमाणे ठरवावा लागतो.


९३७ संयोगा विप्रयोगान्ता जातानां प्राणिनां ध्रुवम् ।

बुद्बुदा इव तोयेषु भवन्ति न भवन्ति च ॥ १२.२७.३०

जन्माला आलेल्या प्राण्यांच्या संयोगांची अखेर वियोगांतच होत असते. पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे, ते एकसारखे उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात.


९३८ संवासाज्जायते स्नेहो जीवितान्तकरेष्वपि ।

अन्योन्यस्य च विश्वासःश्वपचेन शुनो यथा ॥ १२.१३९.४०

आपला प्राण घेणाऱ्याशी सुद्धा सहवासाने स्नेह जडतो, आणि एकमेकांना विश्वास वाटतो. उदाहरणार्थ, कुत्र्याचे मांस खाणारा चांडाल आणि कुत्रा.


९३९ संसारयति कृत्यानि सर्वत्र विचिकित्सते ।

चिरं करोति क्षिप्रार्थे स मूढो भरतर्षभ ॥ ५.३३.३४

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जो स्वतः करावयाची कामें दुसऱ्यांवर सोपवितो. प्रत्येक बाबतीत फाजील चिकित्सा करीत बसतो, आणि जें कार्य लवकर झाले पाहिजे त्याला दिरंगाई करतो तो मूढ होय.


९४० संहता हि महाबलाः ॥ ८.३४.७

संघ करून एकत्र राहिलेले लोक अत्यंत वलाढ्य होतात.


९४१ सख्यं सोदर्ययोर्भ्रात्रोर्-

दम्पत्योर्वा परस्परम् ।

कस्यचिन्नाभिजानामि

प्रीतिं निष्कारणामिह ॥ १२.१३८.१५३

सख्खे बंधु अथवा पतिपत्नी यांच्यामध्ये जो परस्पर स्नेह असतो, तोहि कारणामुळेच होय. काही तरी कारण असल्यावांचून जगांत कोणाचे कोणावर प्रेम असल्याचे पाहण्यांत नाही !


९४२ सङ्क्षेपो नीतिशास्त्राणामाविश्वासः परो मतः ॥ १२.१३८.१९७

सर्व नीतिशास्त्रांचे थोडक्यात सार हेच की, कोणाचा विश्वास म्हणून धरूं नये.


९४३ स चेन्निकृत्या युध्येत निकृत्या प्रतियोधयेत् ।

अथ चेद्धर्मतो युध्येद्धर्मेणैव निवारयेत् ॥ १२.९५.९

प्रतिपक्षी जर कपटाने लढेल तर आपणहि उलट कपटानेच लढावे. आणि तो जर धर्मयुद्ध करील तर आपणहि धर्मानेच लढून त्याचे निवारण करावें.


९४४ सत्यं स्वर्गस्य सोपानं पारावारस्य नौरिव ॥ ५.३३.४७

समुद्र तरून जाण्यास जशी नाव तसा सत्य, हा स्वर्गास जाण्याचा जिना आहे.


९४५ सत्यं दमस्तपो दानमहिंसा धर्मनित्यता ।

साधकानि सदा पुंसां न जातिर्न कुलं नृप ॥ ३.१८१.४३

(अजगर झालेला नहुषराजा युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, सत्यभाषण, इंद्रियनिग्रह, तप, दान, अहिंसा आणि नित्य धर्माचरण हीच नेहमी मनुष्यांच्या उपयोगी पडणारी आहेत. जातीचा काही उपयोग नाही, आणि कुलाचाहि नाही.


९४६ सत्यस्य वचनं श्रेयः सत्यज्ञानं तु दुष्करम् ।

यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं ब्रवीम्यहम् ॥ १२.२८७.२०

(नारद गालवाला म्हणतात) सत्य बोलणे चांगले खरे, पण सत्याचे निभ्रांत ज्ञान होणे मोठे कठीण. ज्याच्या योगाने जीवांचे अत्यंत कल्याण होते त्यालाच सत्य म्हणतों.


९४७ सत्यस्य वदिता साधुर्न सत्याद्विद्यते परम् ।

तत्त्वेनैव सुदुर्ज्ञेयं पश्य सत्यमनुष्ठितम् ॥ ८.६९.३१

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) सत्य साङ्गेल तो साधु. सत्यापरतें श्रेष्ठ काही नाही. परन्तु सत्याचे आचरण करितांना वास्तविक सत्य कोणते हे समजणेच अत्यन्त कठीण आहे.


९४८ सत्येन रक्ष्यते धर्मो विद्या योगेन रक्ष्यते ।

मृजया रक्ष्यते रूपं कुलं वृत्तेन रक्ष्यते ॥ ५.३४.३९

सत्याने धर्माचे रक्षण होते; व्यासंगाच्या योगाने विद्या जिवंत राहते. नेहमी साफसूफ ठेविल्याने रूप टिकून राहते; आणि सदाचरणानें कुलाचे रक्षण होते.


९४९ सत्येन विधृतं सर्वं सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ॥ १२.२५९.१०

सर्व काही सत्याच्या पायावर उभे आहे. सर्व काही सत्याच्या आधाराने राहतें.


९५० सन्तः परार्थं कुर्वाणा नावेक्षन्ति परस्परम् ॥ ३.२९७.४९

परोपकार करणारे संत उलट प्रत्युपकार होण्याची कधीही वाट पहात नाहीत.


९५१ सन्ति पुत्राः सुबहवो दरिद्राणामनिच्छताम् ।

नास्ति पुत्रः समृद्धानां विचित्र विधिचेष्टितम् ॥ १२.२८.२४

दरिद्री लोकांना इच्छा नसतां पुष्कळ मुलगे होतात आणि कित्येक श्रीमंतांना मुलगा नसतो. दैवाची लीला विचित्र आहे.


९५२ सन्तोषो वै श्रियं हन्ति ह्यभिमानं च भारत ।

अनुक्रोशभये चोभे यैर्वृतो नाश्नुते महत् ॥ २.४९.१४

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) अल्पसंतुष्ट राहिल्याने ऐश्वर्याचा व स्वाभिमानाचा नाश होतो. दया आणि भय यांचीही गोष्ट अशीच. यांचा मनुष्यावर पगडा बसला म्हणजे मोठेपणाचें नांवच ध्यावयास नको !


९५३ संनिमज्जेज्जगदिदं गम्भीरे कालसागरे ।

जरामृत्युमहाग्राहे न कश्चिदवबुध्यते ॥ १२.२८.४४

जरामृत्युरूपी मोठमोठ्या नक्रांनी व्याप्त असलेल्या खोल अशा कालसागरांत हे सर्व जग (एक दिवस) बुडून जाईल हे कोणाच्याच लक्ष्यात येत नाही !


९५४ सपत्नसहिते कार्ये कृत्वा सन्धिं न विश्वसेत् ।

अपक्रामेत्ततः शीघ्रं कृतकार्यो विचक्षणः ॥ १२.१४०.१४

जे कार्य केले असतां शत्रूचे आणि आपले सारखेच हित होईल, त्या कार्यापुरता शत्रूशी समेट करावा. तथापि त्याजवर विश्वास ठेवू नये; आणि कार्य झाले म्हणजे सुज्ञ मनुष्याने लागलेच शत्रूपासून दूर व्हावें.


९५५ समत्वं योग उच्यते ॥ ६.२६.४८

(सुखदुःख, यशापयश इत्यादि द्वंद्वांविषयीं सारखी बुद्धि ठेवणे अशा प्रकारच्या) समत्वबुद्धीला योग असें म्हणतात.


९५६ समर्थं वाऽसमर्थं वा कृशं वाप्यकृशं तथा ।

रक्षत्येव सुतं माता नान्यः पोष्टा विधानतः ॥ १२.२६६.२९

समर्थ असो वा असमर्थ असो, कृश असो वा लठ्ठ असो, मुलगा कसाहि असला तरी, आईच त्याचा प्रतिपाळ करते. तसें पोषण करणारा दुसरा कोणी नाही.


९५७ समुच्छ्रये यो यतते स राजन् परमो नयः ॥ २.५५.११

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, भाग्योदय करण्याकडे जिची प्रवृत्ति असते तीच नीति श्रेष्ठ होय.


९५८ सम्पन्नतरमेवान्नं दरिद्रा भुञ्जते सदा ।

क्षुत्स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ॥ ५.३४.५०

दरिद्री लोक नेहमीच अतिशय मिष्टान्नभक्षण करीत असतात. कारण भुकेने तोंडाला चव येत असते. आणि ती तर श्रीमंतांना फारच दुर्लभ.


९५९ सम्प्रीतिभोज्यान्यन्नानि आपद्भोज्यानि वा पुनः ॥ ५.९१.२५

प्रेम असल्यास अथवा काही आपत्ति असल्यास एकाने दुसऱ्याकडचे अन्न भक्षण करावें.


९६० संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ६.२६.३४

संभावित पुरुषाची अपकीर्ति होणे मरणापेक्षा वाईट.


९६१ संभोजनं सङ्कथनं सम्प्रश्नोऽथ समागमः ।

एतानि ज्ञातिकार्याणि न विरोधः कदाचन ॥ ५.६४.११

एकत्र भोजन करणे, एकत्र गप्पागोष्टी करणे, एकमेकांस प्रश्न विचारणे आणि भेट देणे या गोष्टी ज्ञातिबांधवांनी कराव्या. केव्हांहि परस्परांशी विरोध करू नये.


९६२ सर्वकालं मनुष्येण व्यवसायवता सदा ।

पीडाकरममित्राणां यत्स्यात्कर्तव्यमेव तत् ॥ ७.१४३.६८

ज्या ज्या गोष्टीमुळे शत्रूंना पीडा होईल ती प्रत्येक गोष्ट मनुष्याने सर्वकाळी मुद्दाम यत्नपूर्वक केली पाहिजे.


९६३ सर्वं जिह्मं मृत्युपदमार्जवं ब्रह्मणः पदम् ।

एतावाञ्ज्ञानविषयः किं प्रलापः करिष्यति ॥ १२.७९.२१

कपटाने युक्त असलेले सर्व काही मरणाला कारण होते. सरळपणांत ब्रह्मप्राप्ति आहे. जे काय जाणावयाचे ते एवढेच. जास्त बोलण्यात काय अर्थ ?


९६४ सर्वतीर्थेषु वा स्नानं सर्वभूतेषु चार्जवम् ।

उभे त्वेते समे स्यातामार्जवं वा विशिष्यते ॥ ५.३५.२

सर्व तीर्थांत स्नान करणे आणि सर्वांशी निष्कपटाने वागणे या दोहोंची योग्यता सारखीच, कदाचित् निष्कपटपणाच कांकणभर श्रेष्ठ ठरेल.


९६५ सर्वथा धर्ममूलोऽर्थो धर्मश्चार्थपरिग्रहः ।

इतरेतरयोर्नीतौ विद्धि मेघोदधी यथा ॥ ३.३३.२९

(भीम युधिष्ठिराला म्हणतात.) अर्थ हा सर्वस्वी धर्ममूलक असून धर्म हा अर्थावर अवलंबून आहे. सारांश, मेघ व समुद्र यांप्रमाणे धर्म व अर्थ हे परस्परांवर अवलंबून आहेत.


९६६ सर्वथानार्यकर्मैतत्प्रशंसा स्वयमात्मनः ॥ ५.७६.६

आपली आपण प्रशंसा करणे हे सर्वस्वी अनार्य माणसाचे काम होय.


९६७ सर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि ।

अमित्रः शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव ॥ ३.३३.७०

पोळ्यांतील मध काढणाऱ्याचा मधमाशा एकजुटीने (तुटून पडून) प्राण घेतात. त्याप्रमाणे सर्वांची पूर्ण एकी असेल तर दुर्बळ लोक देखील बलिष्ठ अशाहि शत्रूला ठार करू शकतात.


९६८ सर्वभूतहितः साधुरसाधुर्निर्दयः स्मृतः ॥ ३.३१३.९२

सर्व भूतांच्या हितासाठी झटतो तो साधु. आणि निर्दयतेने वागतो तो असाधु (दुष्ट) होय.


९६९ सर्वभूतेषु सस्नेहो यथात्मनि तथाऽपरे ।

ईदृशः पुरुषोत्कर्षो देवि देवत्वमश्नुते ॥ १३.१४४.५८

(महेश्वर म्हणतात।) हे देवि, पार्वति, जो सर्व प्राण्यांविषयीं वत्सलता धारण करतो आणि आपल्यासारखेच सर्व भूतांना मानतो, तो श्रेष्ठ पुरुष देवत्वाला पोचतो.


९७० सर्वं प्रियाभ्युपगतं धर्ममाहुर्मनीषिणः ॥ १२.२५९.२५

ज्या ज्या योगाने दुसऱ्याचे प्रिय होईल ती ती प्रत्येक गोष्ट धर्मच होय असें ज्ञाते लोक सांगतात.


९७१ सर्वं बलवतां पथ्यं सर्वं बलवतां शुचि ।

सर्वं बलवतां धर्मः सर्वं बलवतां स्वकम् ॥ १५.३०.२४

बलसंपन्न असलेल्यांना सर्व काही हितकर आणि सर्व काही पवित्र आहे. पाहिजे तो त्यांचा धर्म आणि सर्व काही त्यांच्या सत्तेचें !


९७२ सर्वं बलवतो वशे ॥ १२.१३४.३

सर्व काही बलवानाच्या हाती असते.


९७३ सर्वस्य जीवलोकस्य राजधर्मः परायणम् ॥ १२.५६.३

सर्व जीवसृष्टीला राजधर्म हाच मोठा आधार आहे.


९७४ सर्वस्य हि स्वका प्रज्ञा साधुवादे प्रतिष्ठिता ।

परबुद्धिं च निन्दन्ति स्वां प्रशंसन्ति चासकृत् ॥ १०.३.५

ज्याला त्याला स्वतःची बुद्धि सांगते, ते योग्य, असे ठाम वाटते. सर्वजण दुसऱ्याच्या बुद्धीची निंदा करितात, आणि स्वतःच्या बुद्धीची वारंवार प्रशंसा करितात.


९७५ सर्वस्वमपि सन्त्यज्य कार्यमात्महितं नरैः ॥ १२.१३९.८४

सर्वस्वाचा त्याग करून सुद्धा मनुष्यांनी आत्मकल्याण साधावें.


९७६ सर्वः सर्वं न जानाति सवज्ञो नास्ति कश्चन ।

नैकत्र परिनिष्ठास्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित् ॥ ३.७२.८

सर्वांनाच सर्व गोष्टींचें ज्ञान नसते. सर्वज्ञ असा कोणीच नाही. कोणाहि एकाच मनुष्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान एकवटलेले नाही.


९७७ सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः

सर्वे लोका राजधर्मे प्रविष्टाः ॥ १२.६३.२९

सर्व विद्यांचा राजधर्माशी संबंध आहे. आणि सर्व प्रकारचे लोकव्यवहार राजधर्माशी निगडित झालेले आहेत.


९७८ सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्या: ।

संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं हि जीवितम् ॥ १२.२७.३१

सर्व प्रकारच्या संचयांचा शेवट क्षयांत होत असतो, चढण्याची अखेर पडण्यांत होते, संयोगांचे पर्यवसान वियोगांत आणि जीविताचा अंत मरणांत होत असतो.


९७९ सर्वेण खलु मर्तव्यं मर्त्यलोके प्रसूयता ।

कृतान्तविहिते मार्गे मृतं को जीवयिष्यति ॥ १२.१५३.१३

मृत्युलोकांत जन्मास येणाऱ्या प्रत्येकाला खचित मरावयाचे आहे, हा मार्ग कृतांतानें (यमाने) ठरविला असल्यामुळे मेलेल्याला जिवंत कोण करणार ?


९८० सर्वे धर्मा राजधर्मप्रधानाः ॥ १२.६३.२७

सर्व धर्मामध्ये राजधर्म हा अग्रगण्य आहे.


९८१ सर्वे लाभाःसाभिमाना इति सत्यवती श्रुतिः ॥ १२.१८०.१०

सर्व प्रकारच्या लाभाच्या मुळाशी अहंकारवुद्धि असते, अशी श्रुति आहे ती यथार्थ आहे.


९८२ सर्वेषां कृतवैराणामविश्वासः सुखोदयः ॥ १२.१३९.२८

आपणांशी वैर करणाऱ्या कोणाचाहि विश्वास न धरल्याने सुख होते.


९८३ सर्वो दण्डजितो लोको दुर्लभो हि शुचिर्जनः ।

दण्डस्य हि भयाद्भीतो भोगायैव प्रवर्तते ॥ १२.१५.३४

सर्व लोक दंडाच्या योगाने वठणीवर येतात. स्वभावतःच शुचिर्भूत असलेला मनुष्य विरळा. खरोखर, दंडाच्या भयानेच कोणी झाला तरी, आपले ठरलेले काम करीत असतो.


९८४ सर्वोपायैरुपायज्ञो दीनमात्मानमुद्धरेत् ॥ १२.१४१.१००

चतुर पुरुषाने हरप्रयत्न करून हीन स्थितीतून आपला उद्धार करावा.


९८५ सो विमृशते जन्तुः कृच्छ्रस्थो धर्मदर्शनम् ।

पदस्थः पिहितं द्वारं परलोकस्य पश्यति ॥ ९.३२.५९

कोणीहि मनुष्य संकटांत सांपडला, म्हणजे मग धर्मशास्त्राचा विचार करू लागतो. उच्चस्थितीत असतांना त्याला स्वर्गाचे द्वार बंद असलेलेच दिसते.


९८६ सर्वो हि मन्यते लोक आत्मानं बुद्धिमत्तरम् ॥ १०.३.४

प्रत्येक मनुष्य स्वतःला अधिक शहाणा समजतो.


९८७ सर्वो हि लोको नृपधर्ममूलः ॥ १२.१२०.५६

सर्व लोकांना राजधर्म हा आधारभूत आहे.


९८८ सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।

सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ६.४२.४८

(श्रीकृष्ण सांगतात.) अर्जुना, स्वभावतः प्राप्त झालेले कर्म सदोष असले तरी, त्याचा त्याग करूं नये, कारण, अग्नि जसा धुराने वेष्टिलेला असतो, तसा प्रत्येक कर्मात काहीना काही दोष हा असतोच.


९८९ सहस्रशक्तिश्च शतं शतशक्तिर्दशापि च ।

दद्यादपश्च यः शक्त्या सर्वे तुल्यफलाः स्मृताः ॥ १४.९०१९७

ज्याच्याजवळ एक हजार रुपये आहेत त्याने शंभर दिले, किंवा ज्याच्यापाशी शंभर आहेत त्याने दहा दिले आणि ज्याच्यापाशी कपर्दिकहि नाही त्याने यथाशक्ति नुसतें ओंजळभर पाणी दिले, तर या तिघांस सारखेच फळ मिळतें.


९९० सहायबन्धना ह्यर्थाः सहायाश्चार्थबन्धनाः ।

अन्योन्यबन्धनावेतौ विनान्योन्यं न सिध्यतः ॥ ५.३७.३८

द्रव्य साहाय्यकर्त्यांवर अवलंबून असून साहाय्यकर्ते द्रव्यावर अवलंबून असतात. सारांश, परस्परांवर अवलंबून असलेल्या या दोन गोष्टी परस्परांवांचून सिद्ध होत नाहीत.


९९१ साङ्गोपाङ्गानपि यदि यश्च वेदानधीयते ।

वेदवेद्यं न जानीते वेदभारवहो हि सः ॥ १२.३१८.५०

सर्व अंगे आणि उपांगे यांसहित चारहि वेदांचे ज्याने अध्ययन केले, परंतु वेदांनी जाणावयाचें जें परमात्मतत्त्व ते ज्याने जाणले नाही, तो केवळ वेदग्रंथाचा भार वाहणारा होय.


९९२ सा भार्या या प्रियं ब्रूते स पुत्रो यत्र निर्वृतिः ।

तन्मित्रं यत्र विश्वासः स देशो यत्र जीव्यते ॥ १२.१३९.९६

जी प्रिय भाषण करते तीच भार्या, जो सुखाला कारण होतो तोच पुत्र, ज्याच्यावर विश्वास ठेवितां येतो तोच मित्र, आणि ज्या ठिकाणी उपजीविका होते तोच देश.


९९३ साम्याद्धि सख्यं भवति वैषम्यान्नोपपद्यते ॥ १.१३१.६७

काहीतरी सारखेपणा असेल तेव्हां सख्य होते; विषमता असेल तर ते शक्य नाही.


९९४ सायं प्रातर्मनुष्याणामशनं वेदनिर्मितम् ।

नान्तरा भोजनं दृष्टमुपवासी तथा भवेत् ॥ १२.१९३.१०

मनुष्यांनी सकाळसंध्याकाळ भोजन करावे, असा नियम वेदाने घालून दिलेला आहे. मध्यंतरी कांहीं खाऊ नये, अशा रीतीनें जो राहतो तो उपवासीच असतो.


९९५ साहसोत्पतितानां च निराशानां च जीविते ।

न शक्यमग्रतः स्थातुं शक्रेणापि धनञ्जय ॥ ९.५८.१६

(श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना, जिवावर उदार होऊन साहसाने हल्ला करणाऱ्यांच्या पुढे उभे राहण्याची इंद्राची सुद्धा प्राज्ञा नाही.


९९६ सिंहस्य सततं पार्श्वे सिंह एवानुगो भवेत् ।

असिंहः सिंहसहितः सिंहवल्लभते फलम् ॥ १२.११९.११

यस्तु सिंहः श्वभिः कीर्णः सिंहकमफले रतः ।

न स सिंहफलं भोक्तुं शक्तः श्वभिरुपासितः ॥ १२.११९.१२

सदोदित सिंहाच्या संनिध असणारा त्याचा अनुचर सिंहच बनतो. सिंह ज्याच्या बरोबर आहे तो स्वतः सिंह नसला तरी त्याला सिंहाप्रमाणेच फल मिळते, परंतु जो स्वतः सिंह असूनही कुत्र्यांच्या जमावांत राहतो आणि सिंहाप्रमाणे कर्मफल मिळण्याची इच्छा करतो, त्याला कुत्र्यांच्या सहवासांत असेपर्यंत तसें फळ मिळणे शक्य नाही.


९९७ सुखं वा यदि वा दुःखं प्रियं वा यदि वाऽप्रियम् ।

प्राप्तं प्राप्तमुपासीत हृदयेनापराजितः ॥ १२.२५.२६

सुख असो किंवा दुःख असो, प्रिय असो अथवा अप्रिय असो जें जें म्हणून प्राप्त होईल त्याचा, मनांतून नाउमेद न होता, स्वीकार करावा.


९९८ सुखं सुखेनेह न जातु लभ्यं ।

दुःखेन साध्वी लभते सुखानि ॥ ३.२३४.४

(द्रौपदी सत्यभामेस सांगते) इहलोकी सुखासुखीं सुख लाभणे कधीच शक्य नाही. दुःख सोसल्यानेच साध्वीला सुखप्राप्ति होत असते.


९९९ सुखं च दुःखं च भवाभवौ च ।

लाभालाभौ मरणं जीवितं च ।

पर्यायशः सर्वमेते स्पृशन्ति

तस्माद्धीरो न च हृष्येन्न शोचेत् ॥ ५.३६.४७

सुख आणि दुःख, उत्कर्ष आणि हास, फायदा आणि तोटा, उत्पत्ति आणि लय ही क्रमाक्रमाने सर्वांनाच प्राप्त होत असतात. म्हणून शहाण्याने त्याविषयी हर्षेहि मानू नये आणि शोक पण करू नये.


१००० सुखं दुःखान्तमालस्यं

दाक्ष्यं दुःखं सुखोदयम् ॥ १२.२७.३२

आळसांत (प्रारंभी) सुख वाटते पण त्याचा शेवट दुःखांत होतो. तत्परतेनें उद्योग करण्यांत (प्रथम) दुःख वाटले तरी त्यापासून परिणामी सुख होते.


१००१ सुखं निराशः स्वपितिनैराश्यं परमं सुखम् ॥ १२.१७४.६२

ज्याने आशा सोडली त्याला सुखाने झोप येते. निराशेसारखें सुख नाही.


१००२ सुखमेव हि दुःखान्तं कदाचिद्दुःखतः सुखम् ।

तस्मादेतद्वयं जह्याद्य इच्छेच्छाश्वतं सुखम् ॥ १२.२५.२४

सुखाचा अंत दुःखांतच होतो. उलट केव्हां केव्हां दुःखांतून सुखाचा उदय होतो. म्हणून ज्याला शाश्वत सुख हवे असेल त्याने या दोहोंचाहि त्याग करावा.


१००३ सुखं मोक्षसुखं लोके न च मूढोऽवगच्छति ।

प्रसक्तः पुत्रपशुषु धनधान्यसमाकुलः ॥ १२.२८८.५

खरे सुख म्हणजे मोक्षसुख. परंतु मूढ मनुष्याला हे समजत नाही. तो जगांत पुत्र, पश्वादि संपत्ति यांतच गुंतून राहतो आणि धन, धान्य इत्यादिकांतच गडून गेलेला असतो.


१००४ सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम् ।

पर्यायेणोपसर्पन्ते नरं नेमिमरा इव ॥ ३.२६१.४९

चाकाच्या धावेमध्ये एकामागून एक अरे येत असतात त्याप्रमाणे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख आळीपाळीने मनुष्यांना प्राप्त होत असते.


१००५ सुखाद्बहुतरं दुःखं जीविते नास्ति संशयः ।

स्निग्धस्य चेन्द्रियार्थेषु मोहान्मरणमप्रियम् ॥ १२.२०५.६

आयुष्यात सुखापेक्षा दुःखच पुष्कळ अधिक आहे यांत संशय नाही. परंतु मोहानें इंद्रियांच्या विषयाच्या ठिकाणी आसक्त होऊन राहिल्यामुळे मनुष्याला मरण अप्रिय वाटते.


१००६ सुखार्थिनः कुतो विद्या

नास्ति विद्यार्थिनः सुखम् ॥ ५.४०.१७

सुखेच्छु पुरुषाला विद्या कोठून प्राप्त होणार ? आणि विद्येची इच्छा करणाऱ्याला सुख कोठून मिळणार ?


१००७ सुतेषु राजन्सर्वेषु हीनेष्वभ्याधिका कृपा ॥ ३.९.१९

(व्यासमुनि धृतराष्ट्राला म्हणतात) हे राजा, सर्व मुलांत जे गुणहीन असतील त्यांची (आईबापांना) काळजी अधिक.


१००८ सुपूरा वै कुनदिका सुपूरो मुषिकाञ्जलिः ।

सुसन्तोषः कापुरुषः स्वल्पकेनैव तुष्यति ॥ ५.१३३.९

लहानसा ओढा पाण्याने तेव्हांच भरून जातो. उंदराची ओंजळ सहज भरते. त्याचप्रमाणे क्षुद्र मनुष्यहि सहज संतुष्ट होत असून त्याचे थोडक्यानेच समाधान होते.


१००९ सुप्रज्ञमपि चेच्छूरमृद्धिर्मोहयते नरम् ॥ ३.१८१.३०

तीव्र बुद्धीच्या शूर पुरुषाला देखील ऐश्वर्याचा मोह पडत असतो.


१०१० सुप्रणीतो बलौघो हि कुरुते कार्यमुत्तमम् ।

अन्धं बलं जडं पाहुः प्रणेतव्यं विचक्षणैः ॥ २.२०.१६

शक्तीचा ओघ कुशलतेने वळविला म्हणजे त्याच्याकडून उत्तम प्रकारचे कार्य होते. बळ हे अंधळे असून जड (म्हणजे अचेतन) आहे. त्याचा शहाण्याने (इष्टकार्याकडे) उपयोग करून घेतला पाहिजे.


१०११ सुप्राकृतोऽपि पुरुषः सर्वः स्त्रीजनसंसदि ।

स्तौति गर्वायते चापि स्वमात्मानं न संशयः ॥ १२.२८४.२७

कोणीहि अगदी सामान्य प्रतीचा सुद्धां पुरुष स्त्रीजनांच्या समुदायांत आपली आपणच स्तुति करून प्रौढी मिरवतो यांत संशय नाही.


१०१२ सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबन्धः श्लथायते ॥ १.२२१.१७

(अर्जुन सुभद्राविवाहानंतर आपल्या नव्या सवतीला उद्देशून द्रौपदी अर्जुनाला म्हणते.) ओझे एकदां घट्ट बांधले असले, तथापि त्यास जर पुनः दुसरी दोरी बांधिली, तर पहिली दोरी सैल पडावयाचीच !


१०१३ सुमन्त्रिते सुविक्रान्ते सुकृते सुविचारिते ।

सिध्यन्त्यर्था महाबाहो दैवं चात्र प्रदक्षिणम् ॥ ३.३६.७

(युधिष्ठिर भीमसेनाला म्हणतो) हे महाबाहो, चांगल्या तऱ्हेची सल्लामसलत, चांगल्या तऱ्हेचा पराक्रम, चांगल्या तऱ्हेचा विचार आणि चांगल्या तऱ्हेचे कर्तृत्व यांच्या योगानें मनोरथ सिद्धीस जातात; परंतु या ठिकाणी दैवाचीहि अनुकूलता असावी लागते.


१०१४ सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः ।

अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ॥ ५.३७.१५

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो.) हे राजा, सतत प्रिय भाषण करणारे पुष्कळ आढळतात; परंतु अप्रिय असले तरी हितकर असेल तेच सांगणारा विरळा. आणि ऐकणारा त्याहूनहि विरळा.


१०१५ सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य दुर्ज्ञेया ह्यकृतात्मभिः ॥ १३.१०.६८

धर्माचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून मनोजय ज्यांनी केलेला नाही त्यांस तें समजणे कठिण.


१०१६ सेनापतौ यशो गन्ता न तु योधान्कथञ्चन ॥ ५.१६८.२८

यशाचे श्रेय नेहमीं सेनापतीला मिळणार, सैनिकांना कधीच नाही.


१०१७ सोपानभूतं स्वर्गस्य मानुष्यं प्राप्य दुर्लभम् ।

तथात्मानं समादध्याद्भ्रश्यते न पुनर्यथा ॥ १२.३२१.८०

स्वर्गास जाण्याचा (जणू) जिनाच अशा मनुष्यजन्माला येऊन परमात्म्याकडे असें ध्यान लावावे की, जेणेकरून स्थानभ्रष्ट होण्याचा प्रसंग पुनश्च येणार नाही.


१०१८ सौहृदान्यपि जीर्यन्ते कालेन परिजीर्यतः ॥ १.१३१.६

कालांतराने मनुष्य जीर्ण होतो तसा स्नेह सुद्धा कमी होत असतो.


१०१९ स्थापयेदेव मर्यादां जनचित्तप्रसादिनीम् ।

अल्पेऽप्यर्थे च मर्यादा लोके भवति पूजिता ॥ १२.१३३.१३

लोकांची अंतःकरणे प्रसन्न राहतील अशाच प्रकारचे नियम केले पाहिजेत. लहानसहान गोष्टीतसुद्धा नियम असलेला लोकांना मान्य होतो.


१०२० स्तेयं कुर्वश्च गुर्वर्थमापत्सु न निषिध्यते ।

बहुशः कामकारेण न चेद्यः सम्प्रवर्तते ॥ १२.३४.२३

आपत्काली गुरुदक्षिणा देण्यासाठी चोरी करणे हे निषिद्ध नाही. मात्र मनुष्याने बुद्धिपूर्वक अनेकवार तसे करण्यास प्रवृत्त होऊ नये.


१०२१ स्त्रियो यत्र च पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ॥ १३.४६.५

जेथें स्त्रियांचा गौरव होतो तेथें देवता रममाण होतात.


१०२२ स्वबाहुबलमाश्रित्य योभ्युज्जीवति मानवः ।

स लोके लभते कीर्तिं परत्र च शुभां गतिम् ॥ ५.१३३.४५

आपल्या बाहुबळाचा आश्रय करून जो मनुष्य आत्मोद्धार करून घेतो, त्याची इहलोकी कीर्ति होऊन त्याला परलोकी उत्तम गति मिळते.


१०२३ स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ६.४२.१७

स्वभावतः ठरलेले कर्म करण्यांत पाप लागत नाही.


१०२४ स्वमांसं परमांसेन यो वर्धयितुमिच्छति ।

नास्ति क्षुद्रतरस्तस्मात्स नृशंसतरो नरः ॥ १३.११६.११

दुसऱ्याचे मांस भक्षण करून आपलें मांस वाढविण्याची जो इच्छा करतो, त्याच्यासारखा नीच कोणी नाही. तो मनुष्य अत्यंत दुष्ट होय.


१०२५ स्वयमुत्पद्यते जन्तुः स्वयमेव विवर्धते ।

सुखदुःखे तथा मृत्यु स्वयमेवाधिगच्छति ॥ १२.२८८.१६

प्राणी स्वतःच जन्म घेतो, स्वतःच वाढतो. तसेंच सुखदुःखें आणि मृत्यु त्याला स्वतःलाच प्राप्त होत असतात.


१०२६ स्वयं प्राप्त परिभवो भवतीति विनिश्चयः ॥ १३.८२.१४

(दुसऱ्याने न बोलावितां) आपण होऊन जर कोणी दुसऱ्याकडे गेले तर त्याचा अपमान होतो, हे अगदी निश्चित होय.


१०२७ स्ववीर्यं यः समाश्रित्य समाह्वयति वै परान् ।

अभीतो युध्यते शत्रून् स वै पुरुष उच्यते ॥ ५.१६३.३

स्वतःच्या सामर्थ्याचा आश्रय करून जो शत्रूंना युद्धाला आव्हान करतो आणि न भितां लढतो तोच खरा पुरुष म्हणावयाचा.


१०२८ स्वार्थे सर्वे विमुह्यन्ति येऽपि धर्मविदो जनाः ॥ ४.५१.४

स्वार्थाचा मोह सर्वांना - जे धर्म जाणणारे त्यांनासुद्धां - पडत असतो.


१०२९ स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ॥ ६.४२.४५

आपापले कर्तव्य आनंदाने करीत राहिल्याने मनुष्यास परमसिद्धि प्राप्त होते.


१०३० हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ६.२६.३७

भगवान कृष्ण कहते हैं, अर्जुन, यदि तुम युद्ध में मरोगे, तो तुम्हें स्वर्ग मिलेगा, और यदि तुम जीत गए, तो तुम पूरी पृथ्वी के राज्य का आनंद ले सकोगे। इसके लिए हे कुंतीपुत्र, युद्ध का संकल्प लेकर उठो।


१०३१ हर्षो योधगणस्यैको जयलक्षणमुच्यते ॥ ६.३.७५

जीत का मुख्य संकेत सभी सैनिकों की लड़ने की इच्छा है।

१०३२ हितं यत्सर्वभूतानामात्मनश्च सुखावहम् ।

तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये ॥ ५.३७.४०

सर्व भूतांना जे हितकर आणि स्वतःलाहि सुखावह तेंच ईश्वरार्पणबुद्धीने करीत असावे. कारण, हेच सर्व गोष्टी सिद्धीस जाण्याचे मूळ आहे.


इति ।

Post a Comment

0 Comments

Ad Code